आता आपण जर नाट्यप्रेमी असाल तर आपल्याला बोकलवाडीच्या एका अज्ञात पण महान लेखकाने लिहिलेले तुफान विनोदी वगनाट्य "इश्काचा खटाटोप अर्थातच तेरा लुंगी बदला" नक्कीच माहित असेल. नाही?? नसू देत काहीच हरकत नाही कारण अजून काही हे वगनाट्य रसिका पर्यंत आलेलं नाहीये. या महान कलाकृतीचा लेखक मीच असल्याचे मीच नम्रपणे इथे आपल्याला सांगू इच्छितो. आमच्या गावातील काही सत्य घटनांवरून मला स्फुरलेले हे धत्तिंन्ग वगनाट्य नाकात वारे गेलेल्या सांडा प्रमाणे रसिकांच्या मनात धुडघूस घालेल अशी मला खात्री आहे. याची स्टोरी थोडक्यात अशी:
एका गावातील गरीब मास्तर अनिलचे एका धिनचाक नृत्यांगना लोला लुंगीवालावर एकतर्फी प्रेम असते पण लोलाचे शाळेच्या रंगेल पण विवाहित हेडमास्तरवर श्री. ढोरे यांच्यावर प्रेम असते आणि तसेच त्याच शाळेतील रासवट बद्रीनाथ शिपायांवर देखील प्रेम असते. त्यातच लोला फार दुख्खी पण असते कारण तिने पैशासाठी एका लुंग्या विकणाऱ्या मिस्टर लुंगीवाला या म्हाताऱ्या लुंग्यासुंग्या व्यापाऱ्यांशी लग्न केलेले असते. आता तुम्ही म्हणाल व्हिलन कोण तर तिचा एक मित्र गावातील पाटील जालीम सिंग याचा सुध्दा तिच्यावर डोळा असतो आणि एकदा तो नराधम एका दिलखेचक डान्स नंतर दुर्योधना सारखा तिचे वस्त्रहरणाचा प्रयत्न करतो तेव्हा दैवी चमत्कार (ट्रिक सिन) होऊन आकाशातून तेरा लुंग्यांचा सप्लाय होतो. आता लक्षात आले ना की नाटकाचे नाव "इश्काचा खटाटोप अर्थातच तेरा लुंगी बदला" असे का आहे?
थोडक्यात काय तर प्रेमाचा त्रिकोण-चौकोन-पंचकोन, दुःख, नाच, गाणी, क्रूरता, कोमलता, रोमांस, लुंगी बदलाचा ट्रिक सिन आणि सर्वात महत्वाचा म्हणजे अशक्य चावटपणा हे सर्व काही या नाटकात ठासून भरल्याने हे सुपर हिट होणार यात मला काहीच शंका नव्हती. या मधले डायलॉग्स सुध्दा मी एव्हढे जबरदस्त लिहिले होते की पैशा टाळयांचा पाऊस पडणारच याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. उदाहरणार्थ ह्या दोन सीन्स मधले डायलॉग्ज पहा:
सिन ८:
(अनिल कोणीच नाही बघून लबाड मिसेस लोलाला बागेत लिंबाच्या झाडा खाली प्रपोज करतो. ती नाही नाही अशी मान हलवते)
अनिल: लोला मी प्रेमाच्या झाडावरील एक लोचट लिंबू आहे मला टिनपाट टीम्बु समजून नकार देऊ नका.
लोला लुंगीवाला: नाही नाही नाही ... प्यारे अनिल बाबू मै वो बेकार कार हू जिसके प्रेमके चारो टायर पंक्चर है.
अनिल: मै तो स्टेफनी हू, लोलाजी!
(लोला लाजेने चूर होते)
सिन १२:
(लोला आणि जालीमसिंग त्याच्या हवेलीवर दारू पीत बसले आहेत)
लोला लुंगीवाला: या अर्ध्या रिकाम्या दारूच्या ग्लासची शप्पथ जालीम सिंग खरे प्रेम तुम्हाला समजूच शकत नाही.
जालीम सिंग : (विक्राळ हसत) हा हा हा हा मग तूच सांग ना लोला.
लोला: जालीमसिंग खरे प्रेम असते "पवित्रा" लुंगी सारखे (पवित्रा हे लुंगीवालाच्या लुंगीच्या ब्रँडचे नाव). ते असते कधी चौकडा, कधी प्लेन तर कधी रंगीत आणि हो कधी कधी हृदया सारखी लुंगीला पण पडतात दुख्खाची भोके ... मग मारावी लागतात तडजोडीची ठिगळे. मी लुंगीवालाशी लग्न त्यांचे पैसे पाहून - आपले हे - कर्तृत्व पाहून केले. लुंगीवाला मेल्यावर मी लग्न करेन तर एक तर बद्रीशी नाही तर हेडमास्तरशी. माफ कर जालीम (दारूचा घुटका घेते) तुला मी कधीच आपला पती मानू शकत नाही. आपण फक्त दारू पार्टनर्स आहोत बस्स!
जालीम सिंग: (रागाने दारूचा ग्लास फोडत) वा म्हणजे दारू माझी आणि नशा दुसऱ्याला? ठीक आहे बेवफा औरत नाच या फुटलेल्या काचेवर.
(लोला फुटलेल्या काचेवर मदहोश नाच करते. जालीम मिशा पिळीत नाच बघतो)
घरी बसून सुद्धा टाळ्या शिट्या वाजवल्या बद्दल धन्यवाद रसिक मित्रहो. तुमचे कौतुक हेच मला मिळालेले पारितोषिक. मला ठाऊक आहे आपल्या सारखे रसिक मोठ्या आतुरतेने या नाटकाची वाट पाहत आहेत. आता फक्त प्रोड्युसर मिळाला की कामाला सुरवात करणे एव्हडेच बाकी आहे.
म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी. माझ्या नाटकाचा जन्म होण्याची वेळ जवळ आली होती हे मला पेपरात एक बातमी वाचून कळाले. अमेरिकेत शिकागोला म्हणे महाराष्ट्राची लोकधारा का काय कार्यक्रम होता आणि त्यात लोकनाट्य सादर करण्याची संधी होती. मी ऍप्लिकेशन पाठवून दिली. अजरामर कलाकृती ही पारखी नजरेला कितीही लांबून दिसते म्हणे. मला शिकागोवरून महाराष्ट्र मंडळाचे ताबडतोब पत्र आले की एकमेव ऍप्लिकेशन आल्याने अर्थात आमचे वगनाट्य निवडले गेले आहे आणि महिनाभरात सादर करायचे आहे! व्हिसा तिकीट वगैरे महाराष्ट्र मंडळ करणार होते म्हणे. ढेण टे ढेणssss!!! (क्रमशः)