विन-विन

Submitted by विद्या भुतकर on 24 November, 2019 - 23:03

मागच्या आठवड्यात काही कपडे खरेदीसाठी बाहेर जायचं होतं. थंडी वाढेल तसं बाहेर पडण्याचा आळस टाळून काही ना काही घेणं गरजेचं होतं. लेकाला प्लेडेट (play date , इथे तो डोळे फिरवणारा स्माईली पाहिजे) ला सोडून दोन तासांत यायचं ठरवून बाहेर पडलो. एकतर खूप दिवसांनी असे फक्त खरेदीला बाहेर पडलो होतो त्यात लेकीला कधी नव्हे ते एकटीला घेऊन. सुरुवातीला दुकानांत गेल्यावर तिच्यासाठी न घेता माझी खरेदी सुरु केली. तरीही तिने कुरकुर न करता स्वतः मला काय चांगलं दिसेल ते सुचवायला सुरुवात केली. दोन चार झगमगीत कपडे मी पाहिले तर म्हणे,"आई तू हे असलं घालशील?". म्हटलं, का नाही? तिने तसा बराच वेळ संयम ठेवला. पुढे लेकाला घ्यायची वेळ झाल्याने मी आणि दोघीच उरलो.

म्हटलं चल आता तुझी खरेदी करु. मी सुचवेन त्यातलं बरंचसं ती नाहीच म्हणत होती. मग एकदा बोललीही," मला तुला प्रत्येकवेळी नाही म्हणताना वाईट वाटतंय, पण मला खरंच ते आवडत नाहीयेत." म्हटलं, असू दे चल अजून बघून पुढे.". मग एखादा कपडा कसा दिसतोय यावर हसत, 'हे काये?' वगैरे कमेंट करत आम्ही पुढे चालत राहिलो. मोजून दोन कपडे घेतले. दुसऱ्या दुकानात फिर फिर फिरुन तिने एक शर्ट उचलला. विकत घ्यायला जावं म्हटलं तर तिथे भली मोठी रांग होती. ती म्हणे,"आई मला या टॉपसाठी इतका वेळ उभं राहायची गरज नाहीये." असं म्हणून तो तिथेच ठेवून पुढे निघालो. तिला आता दोन तास फिरुन भूक लागली होती. तिचे आवडते 'प्रेत्झल (pretzels) घ्यायची माझी इच्छा नव्हती. म्हटलं,"तुला खरंच सांगते तो नुसता मैद्याचा गोळा असतो. त्यापेक्षा काहीतरी चांगलं खाऊ." ती नाईलाजाने हो म्हणाली. मग आम्ही माझा आवडता 'समोसा चाट' घेतला. तिने आधी समोसा खाल्लेला पण समोसा चाट खाल्लेलं नव्हतं. सोबत मँगो लस्सीही.

दोघी मग एका ठिकाणी निवांत बसून एकाच प्लेटमधून समोसा चाट खाऊ लागलो. भुकेला काय? पण 'खूप भारी लागतंय' म्हणाली. ती ते मन लावून खात असताना मी तिला सांगायला लागले. म्हटलं,"प्रत्येकवेळी खूप किंमत असलेली वस्तूच चांगली असते असं नाही. उलट तू आज्जीला सांग एखादी साडी छान आहे म्हणून ती तुला सांगेल तिने कशी कमी दरात चांगली साडी घेतली ते. आपल्याला आवडली वस्तू तर त्याची किंमत बघायची नाही. उलट कमी असेल तर 'इट्स गुड डील' म्हणून आनंद मानायचा. प्रत्येकवेळी ब्रँड बघायला तू अजून लहान आहेस. blah blah ..... " मी बोलत राहिले ती खात ऐकत राहिली. परत येताना म्हणालीही,"खूप मजा आली आज आपणच खरेदीला जायला."

बरं गोष्ट इथेच संपत नाही..... Happy लेकाची बाजू आहेच ना? हिला जितका खरेदीमध्ये उत्साह आणि संयम तितका हा उतावीळ आणि कंटाळलेला. दोन दिवसांनी सान्वी क्लासला गेलेली असताना त्याला घेऊन खरेदीला गेलो. तर याचं गाडीतच सुरु झालं,"मला कशाला घेऊन जाताय, मी शाळेत असताना का जात नाही? तुम्ही खूप वेळ लावता. बाबांचे कपडे घ्यायला माझं काय काम?...." तोंड वाकडं करुनच मॉलमध्ये आला. थोडा वेळ झाल्यावर निवळला तेव्हा मी बोलायला सुरुवात केली.

म्हटलं, "चल बाबा कपडे ट्राय करताहेत त्यांना अजून काही चांगलं दिसतं का बघू. " त्याला विचारुन दोन टी शर्ट उचलले. त्यानेही कुठला रंग चांगला वगैरे सांगितलं, बाबाला एक शर्ट 'टाईट आहे, पुढचा साईज घे' म्हणून सांगितलं.
बाबा ट्रायल रुममधे असताना मी लेकाला म्हटलं, "बाबू तुला सांगू का काय होतं? तू आता कंटाळा करशील हे कपडे घ्यायला. पण उद्या तू मोठा झाल्यावर तुझ्या गर्लफ्रेंड सोबत गेलास शॉपिंगला तर काय करशील?".

हे ऐकल्यावर त्याने कान टवकारले. "
म्हटलं," तुला कपड्यातलं काही माहीतच नसेल. तू बाहेर आपला फोन घेऊन बसशील. आणि ती म्हणेल हा किती बोअरिंग माणूस आहे."

यावर हसला आणि पुढची खरेदी एकदम सुरळीत झाली. Happy अगदी दीदीसाठी लिपग्लॉस घ्यायचा का यावर चर्चाही झाली आमची. निघताना स्टारबक्स दिसलं आणि त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याचा आवडता केकपॉप तिथे होता ना? नवराही खुश होऊन एक केकपॉप त्याच्यासाठी घेऊन आला.

म्हटलं,"हे बघ याला म्हणतात win-win. तुला खाऊ मिळाला आणि आम्हांला चांगले कपडे. " म्हणे,"हो ५०-५० ना?". म्हटलं,"५०-५० मधेही, you lose 50%. Win-Win मध्ये दोघांचाही फायदा असतो, नुकसान नसतं." अशा गप्पा करत घरी परतलो.

यावर विचार करताना वाटलं, दोन्ही पोरं आपलीच. पण ते आपल्यासोबत एकटेच असताना जे बोलणं होतं ते किती वेगळं आणि खास असतं. ती जवळीक वेगळीच. आणि याहीपेक्षा, रोज अभ्यास, शाळा, क्लासेस आणि चांगलं वागायचं वळण लावणं या सगळ्या नियमांच्या गराड्यात आपण त्यांचे लाड करायचं विसरुनच जातो. ते हे असे एकटे सोबत असतांना जास्त जाणवतं. नाही का?

अरे हो, सांगायचंच राहिलं, परत येताना स्वनिक म्हणे,"आई खरंच असे लोक असतात? जे आपल्या बायको-गर्लफ्रेंड सोबत खरेदीला जात नाहीत?". म्हटलं, किती भोळं ते पोरगं माझं. आता त्याला काय सांगणार? Happy

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Use group defaults

प्रेट्झेल ला पर्याय समोसा चाट व मँगो लस्सी? अरे रे. अहो तोफु सलाड मीट लेस बर्गर नाही का मिळत तिथे?! ग्रीन स्मूदी? किती शुगर कार्ब्स!

असे घडी घडी संस्कार कर ण्याचे कंपल्शन नसलेले आई बाप लाभले हे माझे परम भाग्य. मनबा मधल्या अथर्व सारखी ही मुले अनेक वर्शे एकाच वयाची आहेत असे का जाण वते ? माय बॅड.

सुरेख Happy

मुलासोबत खरेदी होते, त्यामुळे रिलेट झाले. गर्लफ्रेंडचे उदाहरण भारीये Lol

अगदी अगदी झालं मला. मुलांबरोबर असा one on one time मिळून छान गुफ्तगु होणं म्हणजे उभयपक्षी आनंद असतो. आणी तो बराच काळ विस्मरणात जात नाही. मस्तं लिहिलयं. तुमचं साधं सरळ काही अभिनिवेश न घेता केलेलं लेखन छान असतं. लिहीत रहा.

छान लिहिले आहे.
लेकीच्या खरेदीचा वृत्तांत वाचून 'सेम पिंच' म्हणावेसे वाटले. Happy
लेकीच्या सल्ल्याने कपडे घ्यायला मलापण आवडतं. तिला विचारुन घेतले की तीही कंटाळत नाही, भुणभुण लावत नाही. आणि तिच्या खरेदी वेळी मलाही विचारते Wink एकदम win-win :
बऱ्याचदा मी सुचवलेले तिला आवडत नाही. पण आता तिची आवडच माझ्या पेक्षा वेगळी आहे हे मान्य करुन मी प्रयत्न करत असते. कधी पटते, कधी नाही. Happy

मलाही थोडं अमांसारखंच वाटलं. समोसा चाटबद्दल नव्हे तर पावलोपावली संस्कार. एस्पेशली मुलीला जे सांगितलंत ते. मुलांबरोबरचा मी टाईम त्यांना शिकवण्यातच घालवावा असं काही नाही. आज लहान आहेत म्हणून ऐकून घेतील पण उद्या शिंगं फुटली की तुमची कंपनी नकोशीही होऊ शकते.

छान लिहिले आहे.
तुला खरंच सांगते तो नुसता मैद्याचा गोळा असतो. त्यापेक्षा काहीतरी चांगलं खाऊ.>>>+१ मीही स्वतःला हेच सांगते. Happy

आता हा एक प्रसंग लिहिलाय तर लेखिका २४/७/ ३६५ दिवस संस्कारच करते असे समजून का प्रतिसाद येत आहेत.

सोनाली, दोनच प्रतिसाद आले आहेत. आणि त्या २४/७/३६५ दिवस हेच करत असतील असं समजून लिहिलेले नाहीत. त्यांच्या लेखात त्यांनीच म्हटलं आहे की लेकीला कधी नव्हे ते एकटीने घेऊन. म्हणजे त्यांना अशी संधी वरचेवर मिळत नसावी. नुसतं सुचवलं आहे त्यांनी ऐकायला हवं अशी अपेक्षा नाही.

छान अनुभव कथन.
मात्र हे संगोपनात लिहिले आहे तर माझे २ पैसे. लेक समजुतदार आहे , मोठी होतेय तर तिला निवडीचे स्वातंत्र्यही हवे आणि काही अंशी चुका करायची परवानगीही. जे काही उपदेश-होमवर्क असेल ते घरी करायचे. एकत्र वेळ घालवायला बाहेर पडले की शक्यतो 'नो शाळा' .
लेकाला नुसत्या नजरेने मागितल्यावर केकपॉप दिले आणि लेकीला प्रेत्झलऐवजी चांगला पर्याय म्हणत समोसा चाट ही स्वतःचीच आवड पुढे केलीत ते नाही पटले. . सगळेच जंक फूड तेव्हा दोन्ही ऑर्डर करुन लेकीला माझ्यातले चाट ट्राय करणार का विचारायचे , तिच्या प्रेत्झलचा एक तुकडा आपणही खायचा.

संस्कार करण्याचा कल्पनविस्तार चांगला आहे. असे काहीतरी करता यावे किंवा आपण तसे करतो आहोत अशी समजूत करून घ्यायला पालकांना फार आवडते पण पोरांना तुम्ही संस्कार करायला सुरु केलेत याचा बरोब्बर वास येतो आणि ते अजिबात तसले काही मनावर घेत नाहीत!

लेकाला नुसत्या नजरेने मागितल्यावर केकपॉप दिले आणि लेकीला प्रेत्झलऐवजी चांगला पर्याय म्हणत समोसा चाट ही स्वतःचीच आवड पुढे केलीत ते नाही पटले. . >>> ह्म्म . मलाही तसच काहीसं वाटलं .
लेकीला ब्रॅण्डच्या मागे लागू नको अस सांगताना लेकाला स्टारबक्सचे केकपॉप्स का बरं ??
पण वन - ओ - वन वाली कल्पना पटली .

>>>>>>> याहीपेक्षा, रोज अभ्यास, शाळा, क्लासेस आणि चांगलं वागायचं वळण लावणं या सगळ्या नियमांच्या गराड्यात आपण त्यांचे लाड करायचं विसरुनच जातो. ते हे असे एकटे सोबत असतांना जास्त जाणवतं. नाही का?>>>>> +३०००
आणि मग टीनेजमध्ये शिंग काय फुटतात नंतर नंतर उडुन काय जातात. लाड न केल्याची विलक्षण बोच लागते.