वळण (चिंतन)

Submitted by mi manasi on 20 November, 2019 - 22:36

वळण
गाडी घाटदार वळण घेत होती. असं वळतांना एकदम मस्त वाटत होतं. प्रत्येक वळणावर हेलकावे घेणाऱ्या शरीरासोबत मनानेही एक वेगळीच सुखाची सुंदर लय पकडली होती. क्षणभर घाटातला प्रवास धोक्याचा म्हणणं बालीश वाटलं; इतकं मन सुखावलं होतं. म्हणूनच जागोजागी लावलेले सावधगीरीचे इशारे आणि अनेक जाणत्या लोकांचे सल्ले, सहज नजरेआड झाले होते. हा रस्ता, हे सुख कधी संपुच नये असं वाटू लागलं होतं....
अचानक छोटी वळणं आली. प्रत्येक वेळी नव्या वळणावरून वळतांना आता शरीराला हिसके बसू लागले. शरीर-मनाचं संतुलन सुटु लागलं. भितीने हळूहळू जीव गोळा होऊ लागला. आता गाडी कुठेही, कधीही घसरणारच नाही याची मनाला शाश्वती उरली नव्हती. मन आता इतकं धास्तावलं होतं की मघाच्या त्या आनंदाचा मागमूसही उरला नव्हता...
वळणं संपली तेव्हा "हुश्श! सुटलो एकदाचे" असं झालं. खरतर आता गाडी अगदी सरळ रस्त्यावर होती. पण तरीही शरीर-मनावरचा आधीचा थकवा अजून तसाच होता. आता मनाला वेगाव्यतिरिक्त कसली जाणीवच उरली नव्हती... मघाचं 'ते वळण' बरच काही सांगून गेलं होतं .... सांगून गेलं की, असाच असतो ना आपला जीवनप्रवासही. त्यात येणारी वळणं अगदी अपरिहार्य. ती कशी असतील, हेही बरंच अनाकलनीय. पुढे गेल्यावर येणारा नवा अनुभव कसा असेल, सुखाचा असेल की दुःखाचा तेही कुठे सांगता येतं?
सुरुवात जेव्हा सरळ रस्त्यावरुन होते तेव्हा फक्त भावी जीवन, आणि त्याच्या सुखसोयींच्या सुंदर कल्पनाच घोळत असतात मनात! त्या आनंदाला मग हव्या प्रसंगांचे नवे नवे धुमारे फुटतात. आणि डोळ्यांना मनाला तेच मनोहारी देखावे भुरळ घालतात. मनावर ही अशी सुखाची साय धरत असतांना, जीवन किती सुंदर आहे याचीच अनुभुती होत असते सतत. सगळंच कसं हवहवसं संपू नये असं वाटणारं असतं ना?
मनावर जर हुरहुर लावणाऱ्या एखाद्या अशुभाची सावली नसली ना, की वाहत्या नदीच्या दुधाळ, फेसाळ पदराआडचं तिने वाहून आणलेलं किडुकमिडुक सहजच नजरेआड होतं मग. उंच डोंगर पहातांना.. "खाली पडल्यावर किती ठिकऱ्या होत असतील ना दगडाच्याही?"....असले तसले विचार मनांत येतच नाहीत... झाडावरच्या, जीवनाने सळसळणाऱ्या या पानांचं अस्तित्व किती क्षणिक ?".... हे माहित असुनही मन कातर होत नाही. पाखरांचे थवे सुगीच्याच दारात थांबतात! ह्याचाही विसर पडतो तेव्हा. कारण तेव्हा आपल्यासाठी जीवन सुंदर असतं. निदान तसंच वाटावं असंच सगळं घडत असतं.
अशावेळी आलंच कधी मधी एखादं घाबरवणारं वळण तर ते सहज पार करु अशी उमेद असते. मन पुरं कोलमडत नाही. त्याची उभारी मोडत नाही. पुढे पुढे तर त्याच्या आठवणीही काळाबरोबर पुसट होऊन जातात. त्याची फक्त एखादं थ्रील अनुभवल्यासारखी उजळणी असते फक्त. किंवा अशुभाचं फक्त सावट!
जीवनात अचानक, न थांबणारी वळणं यायला लागली तर मग मात्र मन पुरं धास्तावतं. शरीर-मनाचा ताळमेळ चुकतो. कलाकलाने रुळता आलं तर ठिक नाहीतर जगण्याचा तोल सांभाळणं कठिण होऊन बसतं मग. आज आणि उद्या, असणं आणि नसणं यात धुसर पडदा उरतो तो फक्त आशेचा. तोही निसटला तर मात्र...
असा प्रवास मग रुतुन आतच मोडलेल्या काट्यासारखा दुखरा होतो. सगळं काही आलबेल झालं तरी जगणं आक्रसुन जातं. सैलावता येत नाही कधी. स्वतःबाहेर बघणं जमत नाही आणि मन स्वतःतही रमत नाही. त्या जीवघेण्या आठवणींबरोबर फरफट होत रहाते फक्त आयुष्यभर. आणि त्यालाच आपलं जीवन समजून पुढे चालावं लागतं.
सुख आणि दुःख. दोन्ही शब्दात फक्त पहिलंच अक्षरच वेगळं असतं. पण त्याने त्या दोन चित्रातले सगळे रंगच बदलतात. तसंच जेव्हा जेव्हा माणसाचा, तो कुठे जन्मला, कसा वाढला, त्याने काय काय भोगलं, केवढं सोसलं, हा सगळा 'क'च्या कक्षेतला प्रवास इतरांपेक्षा वेगळा होतो, तेव्हा तेव्हा त्याच्या जीवनालाही वेगळा वेगळा अर्थ मिळत जातो. तो दुसऱ्यापेक्षा वेगळा ठरतो. तो प्रवास त्याचा एकट्याचा ठरतो. त्याला वेगळं घडवणारा ठरतो.
हा खेळ ज्याला समजला त्याचं सगळं जगणंच वेगळं होऊन जातं. मग जगतांना मनात कसलेच आडाखे, कसले डावपेच नसतात. समोर येईल ते फक्त जीव ओतून करायचं. काही जिंकण्या- हरवण्यासाठी नाही, तर मांडलेला हा डाव रंगायला हवा म्हणून खेळायचं हे कळलेलं असतं. आता असेल तो क्षण आपला म्हणायचा आणि जे जेवढ्या काळासाठी आत्ता आपल्याला लाभलंय त्यात समरस व्हायचं. एवढंच उरतं मग जगणं म्हणजे!
म्हणूनच... आपण नाही का, थोड्या काळासाठीच पर्यटणाला जातो आणि तिथल्या फक्त चांगल्या आठवणी घेऊन येतो पुन्हा परत, त्याच आपल्या घरात. तस्सं आणि तितकंच रमायचं जीवनात. उरलेलं हे समजुन जगायचं.
पण होतं काय... काय बरोबर, काय चूक ह्यामधले आपलेच संभ्रम मिटता मिटत नाहीत कधी कधी. कारण आपलं खेळात लक्ष नसतं, तर आउट होऊ की काय याकडेच असतं. आउट होऊ नये म्हणून कायम आपण जिंकण्यासाठीचे आडाखे बांधण्यातच गुंतलेले असतो. त्यामागे धावत असतो. त्यामुळे निखळ, सहज जगण्यातली मजाच संपवून जाते. हल्ली चढाओढ, स्वार्थ इतका बोकाळलाय की आधीच अनिश्चित असलेलं जगणं अजून अस्थिर होतंय. संतांनीही सगळे अडथळे पार करतांनाच जीवन समजून घेतलं. म्हणूनच तर त्यांनी सांगितलं ...खेळाऐसा प्रपंच मानावा..तो प्रसन्नतेने, सहजतेने, खेळाचे सगळे नियम समजून उमजून खेळावा. काहीही वेगळं करायचं नाही. फक्त समोर येईल तसं जगायचं. जरा मनाला या वळणावर नेऊन तर बघा!
सहज जगण्यात वेगळीच मजा असते!
. ..... मी मानसी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडले.
खरे आहे. शाश्वती कशाचीच नाही. पण एक मात्र आहे, देव जेव्हा चोच देतो तेव्हा चारा जरुर देतो. तद्वतच, दु:ख दिले तर सोसायचे बळ जरुर देतो.

सामो...हल्ली चढाओढ, स्वार्थ इतका बोकाळलाय की आधीच अनिश्चित असलेलं जगणं अजून अस्थिर होतंय...हे मी आता लेखात टाकलंय...धन्यवाद!

समोर येईल ते फक्त जीव ओतून करायचं. काही जिंकण्या- हरवण्यासाठी नाही, तर मांडलेला हा डाव रंगायला हवा म्हणून खेळायचं हे कळलेलं असतं. आता असेल तो क्षण आपला म्हणायचा आणि जे जेवढ्या काळासाठी आत्ता आपल्याला लाभलंय त्यात समरस व्हायचं. एवढंच उरतं मग जगणं म्हणजे! >>>>>> सुरेखच.... Happy