आमचं परसदार

Submitted by मनीमोहोर on 11 November, 2019 - 12:53

आमचं कोकणातलं घर परसभागाशिवाय अपूर्ण आहे. म्हणून चला ... आज मी तुम्हाला आमचं परसदार फिरवून आणते. परसदार म्हणजे नावातच अर्थ दडलेला आहे... घराचा मागचा भाग.

माजघराच्या चार पाच पायऱ्या उतरून खालच्या पडवीत आलं की परसदार सुरू होतं. ही आमची पडवी व्हरांड्या सारखी आहे... पुढे गज नसलेली... त्यामुळे पडवीतून समोरचं नारळी पोफळी च आगर खूप सुंदर दिसत. आंब्याची ओझी, फणस, रातांबे, घरच्या भाज्या, इतर फळ हे सगळं ह्याच पडवीत आणून टाकलं जातं. त्यामुळे इथे नेहमीच संमिश्र वास दरवळत असतात. दिवाळीत पाट रांगोळी करून सगळयांना तेल - उटणं लावण्याचा मान ही ह्याच पडवीचा. पूर्वीच्या काळी स्त्रिया पुढच्या खळ्यात क्वचितच जात असत. त्यामुळे घरातील बायकांची ही पडवी विशेष आवडती आहे. इथे भिंतीला लागून एक लाकडी बाक ही ठेवलं आहे बसण्यासाठी. कधी विरंगुळा म्हणून, कधी थोडी बाहेरची हवा खायला, मोकळ्यावर निवडणं टिपणं करायला, घरी आलेल्या माहेरवाशिणीचे किंवा जिवाभावाच्या पाव्हण्याचे कुशल क्षेम विचारण्यासाठी वैगेरे बायकांची हक्काची जागा म्हणजे ही मागची पडवी.. माझ्या तिथे रहाणाऱ्या सासूबाई ह्या पडवीच्या पायऱ्यांवर बसून मला अनेक गोष्टी सांगत असत. मिळकत अपुरी आणि प्रपंचाची जबाबदारी मोठी ह्यामुळे ते दिवस सगळ्याच आघाड्यांवर कसोटी पाहणारे होते. म्हणून त्या दिवसांच्या आठवणी सांगताना ही त्यांचा व्यथित झालेला चेहरा त्या पायरीवर बसलं की आज ही माझ्या डोळ्यासमोर येतो.

ह्या पडवीच्या डाव्या बाजूला आणखी पाच सहा पायऱ्या उतरल्या की बाथरूम , कपडे धुवायची जागा हे सगळं दिसत आपल्याला. पूर्वी आमच्याकडे खाली आगरात एक पत्र्याची बाथरूम होती आणि त्याच्या बाजूलाच पाणी तापवायची चूल होती. तेव्हा बाथरूम घरातील फक्त तरुण मुली, सुनाच वापरीत असत. कारण मोठ्या स्त्रिया पालटणं घेऊन पहाटेच बाहेरच स्नान करीत असत आणि पुरुष तर विहिरीवरच डोक्यावर कळश्या ओतून घेत असत. मुलांना विहिरीजवळच्या पाथरी वरच अंघोळ घातली जाई. आता काळ बदलला आहे. बाथरूम घराजवळ बांधल्या आहेत. चूल जाउन तिथे आता धूर न होणारा बंब बसवला आहे आणि त्याच गरम पाणी बाथरूम मध्ये ही फिरवलं आहे. कपडे धुण्यासाठी , भांडी घासण्यासाठी स्वतंत्र पाथऱ्या आहेत आणि विहिरीवर बसवलेल्या पंपामुळे नळाचे पाणी ही खेळवल गेलं आहे सगळीकडे. कोकणातल्या प्रथेप्रमाणे शौचालय घरापासून खूप लांब असल्याने न्हाणीघरा जवळ लघुशंकेसाठी स्त्रिया आणि पुरुषांसाठी स्वतंत्र सोय आहे. घरातलं तीन चार वर्षाच शेम्बड पोर जेव्हा आईचा हात धरून “मी पुलुष आहे मी इकडे जाणार” म्हणत आई बरोबर हट्टाने तिकडे जातं तेव्हा हसू आल्या खेरीज रहात नाही. ☺

पहाटे उठलं की पहिलं काम म्हणजे पाणी तापवणे. पहाटेच्या काळोखात ती धगधगलेली लाकडं अगदी काळजाचा ठाव घेतात. हा बंब म्हणजे चूल आणि बंब याच कॉम्बो आहे. त्यामुळे लाकडं धगवण्यासाठी फुकणी लागेतच. आणि प्रमाण कमी असले तरी धूर ही होतोच . मे महिन्यात पाव्हणे मंडळी जमली की अंघोळीआठी नंबर लागतात आणि तिथे ही मग गप्पांचे फड रंगतात. कार्य प्रसंगी तर काही अति उत्साही मेंबर नंतर नंबर लावायला नको म्हणून पहाटे तीन चार लाच उठून अंघोळ उरकून घेतात आणि मग हवं तर परत एखादी डुलकी घेतात. मे महिन्यात छोटी मुलं एकत्र जमली की एकमेकांच्या अंगावर गार पाणी उडवत , दंगा मस्ती करत ,बाहेर पाथरी वर यथेच्छ अंघोळ करतात. ह्या आठवणी त्यांच्या साठी संस्मरणीय आणि पुढे जन्मभरासाठी अंगावर मोरपीस फिरवणाऱ्या असतात. अशा तऱ्हेने अंघोळी, कपडे धुणे, भांडी घासणे ह्यात सकाळपासून गजबजलेली ही एरिया दुपारी जरा विश्रांती घेते. परंतु संध्याकाळी पुन्हा पाणी तापविले जाते आणि या भागातली वर्दळ वाढते. दिवसभर अंगमेहनतीने शिणलेले गडी संध्याकाळी गरम पाण्याने अंघोळ करून चहा घेतात आणि मगच घरी जातात.

आमच्याकडील पूर्वीची स्वच्छता गृह हा खरं तर स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. आता जरी आधुनिक अश्या स्वच्छतागृहांची घरातच सोय केलेली असली तरी तेव्हा ती पार आगाराच्या दुसऱ्या टोकाला व्हाळाच्या कडेवर बांधली गेली होती. इथे ही पुरुष आणि स्त्रिया यांच्या साठी स्वतंत्र व्यवस्था होती आणि अगदी चित्र वैगेरे काढून ते स्पष्ट ही केलं गेलं होतं. पावसात भिजुन जाऊ नये म्हणून पुढे छोटासा व्हरांडा होता. तिथे छत्री, कंदिल ठेवण्यासाठी खुंट्या होत्या . आत ही खुंटी होती कंदीलासाठी. आत नळाच पाणी होतं.. आणि दाराच्या मागच्या बाजूला स्वच्छता राखण्यासाठी काय करा ह्याच्या अगदी लफ्फेदार मराठीत सूचना लिहिल्या होत्या. फलकाच्या कोपऱ्यात पाना फुलांची वेलबुट्टी ही काढली होती. त्याकाळी फोटो काढणं दुर्मिळ होतं म्हणून त्या सूचनांचा फोटो माझ्याकडे नसला तरी त्या माझ्या हृदयात जणू कोरल्या गेल्या आहेत. आज इतक्या वर्षा नंतर ही सगळे जण जमलो की त्यांची आठवण निघाल्या शिवाय रहात नाही. हे सगळं वाचायला मजेशीर वाटत असलं तरी पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडत असताना पोफळीच्या आगर तुडवत रात्री अपरात्री जावं लागलं तर अक्षरशः ब्रम्हांड आठवे. आधी एक धीट ,धाडसी, न घाबरणारी सोबत शोधायची. मग त्या सोबतीला बाहेर उभं रहायला सोबत म्हणून दुसरी एक सोबत हुडकायची. एवढं झालं की मग छत्री, बॅटरी, कंदिल, काठ्या अशी आयुधं घेऊन मोहिमेवर निघायचं.

परसदारचा मोठा भाग नारळी पोफळी च्या आगराने व्यापला आहे त्यामुळे तिथे नेहमीच थंड वाटत. आगरात आमच्या दोन विहिरी आहेत. एक खालची आगरातली, जी व्हाळाच्या समांतर लेव्हल ला आहे आणि दुसरी घराजवळची जी त्याहून थोडी अधिक वर आहे. दोन्ही विहिरी खाली बघितलं तर डोळे फिरतील एवढया खोल आणि चिऱ्यानी बांधलेल्या आहेत. खालच्या विहिरीचे पाणी वर वापरासाठी आणि वरच्या विहिरीचे पाणी जनरली पिण्यासाठी उपयोगात आणले जाते. पाणी अतिशय गोड आणि मधुर आहे. तहान भागणे , पाणी पिऊन तृप्त होणे ह्या वाकप्रचारांची प्रचिती हे पाणी प्यायलं की होते. कुळथाच्या पिठल्याला मुंबईत ती चव येत नाही म्हणून काही जण दोन चार बाटल्या पाणी खास पिठल्या साठी म्हणून मुंबईला घेऊन येतात. (स्मित). उन्हाळ्यात पाणी खाली गेलं की दोन चार वर्षतून एखाददा विहिरींची गाळ काढून सफाई केली जाते. पाणी शुद्ध राखण्यासाठी कासव सोडलं आहे विहिरीत जे मुंबईच्या मुलांचं खास आकर्षण ठरतं.

एकदा एका मनीच पिल्लू खेळता खेळता विहिरीत पडलं. मग रात्री लक्षात आल्यावर त्याचा शोध घेतला . बॅटरीच्या उजेडात बांबूची छोटी टोपली दोरी बांधून विहिरीत सोडली आणि महत् प्रयासाने त्याला त्या टोपलीत घेऊन वर काढण्यात आणि त्याचा जीव वाचवण्यात यश मिळवलं. ही गोष्ट तिथल्या आणि मुंबईच्याच नाही तर परदेशात रहाणाऱ्या बच्चे कंपनी ची ही अतिशय आवडती आहे. कधी कधी व्हिडीओ कॉल वर ही माझ्याकडे ह्या गोष्टीची फर्माईश केली जाते. आणि विहीर फक्त कल्पनेतच पाहिली असल्याने गोष्ट संपली की प्रत्येक वेळी “ मी तिकडे आले की शोत्ता विहिलीतून पिल्लू काढीन. ” हे धाडसी विधान ही ऐकायला मिळतं.

जेव्हा आमच्याकडे वीज नव्हती तेव्हा पाणी लाटणे हे एक मोठेच काम असे. खालच्या आगरातल्या विहिरी वर रहाटगाडग बसवलं होतं आणि एक गडी जवळ जवळ दिवसभर पाणी लाटायचेच काम करत असे. सहाजिकच कपडे, भांडी अंघोळी वैगेरे सारखी सगळी पाण्यातली कामं तिथेच केली जात असत. दुपारी परत आगराला शिपण करण्यासाठी पाणी लागत असेच. वरच्या विहिरीवर हात रहाट होता म्हणजे emergency साठी अजून ही आहे. त्याने सोवळ्यातलं पाणी घरातील स्त्रियाच भरत असत. एवढं पाणी कळशीने विहिरी पासून सैपाक घरा पर्यंत आणणे हे सुद्धा खूप भारी पडत असे. अर्थात त्याला त्या काळी पर्याय नव्हता. उलट दुसऱ्यांकडे पाण्या साठी जावं लागत नाही हेच खूप मोठं वाटत असे तेव्हा.

म्हणून गावात वीज आल्यावर माझ्या तिथल्या सासऱ्यांनी प्रथम काय केलं तर विहिरीवर पंप बसवला. घरापासून उंचावर एक मोठी टाकी बांधली. आणि नैसर्गिक उताराचा फायदा घेऊन ते पाणी गोठा, खळं, आगर सैपाकघर, बाथरूम अस सगळीकडे फिरवलं. त्यामुळे पाणी वाहून आणण्याचा त्रास संपला. घरातल्या स्त्रियांचे मोठेच कष्ट कमी झाले. एवढंच नाही तर आजूबाजूच्या वस्तीत जर कधी पाण्याचा आटाट झाला तर त्यांच्या साठी आगरात एक नळ घेऊन ठेवला आहे. तसेच आमच्या विहीरी ही त्यांच्या साठी सदैव खुली असतात. असो.

विहिरीला उतराई होण्यासाठी पावसाळ्यात ती भरून वाहू लागली की तिची विधीवत पूजा केली जाते. मंगल कार्य प्रसंगी शहरात जल कलशाचे पूजन केले जाते पण आमच्याकडे ह्या विहिरींचे पूजन करतात. कृतज्ञता व्यक्त करण्याची किती ही अनोखी पद्धत.

असं आमचं परसदार...आम्हाला पुढच्या खळ्या इतकच प्रिय आहे ह्यात शंका नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे एकदम भारी नेहेमीप्रमाणे.

खूप गोष्टी रिलेट केल्या, अजूनही घरात संडास नाही, लागून एक बाथरूम केलीय पण आता घराला लागून कमोड बांधणार आहेत. एक संडास बाथरूम खाली उतरून आहे, तिथेच शेजारी खोपी आणि चूल आहे, अजूनही आम्ही तिथे चुलीवर पाणी तापवतो मस्त पातेरा गोळा करून त्यात टाकतो, मजा येते.

माझं लग्न व्ह्यायच्या आधीपासूनच विहिरीवर पंप आहे आणि ते पाणी असं फिरवलं आहे की वर दोणीत येतं, खाली माड पोफळीला शिपणे होतं आपोआप, घरात नळाचे पाणी आहे.नळ खाली बाथरूम मध्ये पण आहे.

माहेरी मात्र लाईट नव्हते, विहिरीवरून पाणी काढून आणणे हे अनुभवलं आहे पण विहीर जवळ आहे आणि माहेर डोंगराच्या पायथ्याशी आहे त्यामुळे उंच सखल नाही, सासर अर्ध्या डोंगरात असल्याने तिथे मात्र उंच सखल पणा जाणवतो, मागच्या अंगणात पायऱ्या उतरून जायला लागतात, खाली आगरात जाताना तर अजून जास्त पायऱ्या उतरून जावं लागतं, तिथेच विहिरी आहेत दोन, एक हल्ली बांधलीय.

तुमचे लेख माहेरी सासरी फिरवून आणतात, तो फील देतात, धन्यवाद यासाठी.

बाकी माझ्या बोलण्यात खळे नाही येत, अंगण म्हणते मी, माहेरची सवय, मी माहेरचं कोकण जास्त अनुभवलं आहे आणि माहेरच्या कोकणातल्या शब्दांची जास्त सवय आहे.

छानच लेख. आता आम्हाला रोज बघून कोकणातल्या घराचा पूर्ण ले आउट एकदम पाठ झाला आहे. परसदारात केळी, त्यात पुर लेलो खजिनो,
जवळच असलेले भुयार. आता वरच्या मजल्यावरचे किती खोल्या बाल्कनी ते लिहा. मला अश्या घरात एकदा राहाय्चेच आहे. वाइच चाय वाइच पेज क्राउड बरोबर. हाउ क्युट. मला तर मांगरातले साधे घर पण फार आवड ते.

लेख प्रचंड आवडला आणी भावला. ममो फोटो देत जा की गं लेखाबरोबर. म्हणजे जरा कोजागिरी चे केशर बदाम जायफळ युक्त दूध प्यायल्यासारखे वाटेल.

अंजू तर नुसते प्रतीसादच देत बसते. तू पण टाक की गं फोटो बिटो.

म मो, लेख मस्त आहे, नेहमीप्रमाणे. तुमची वर्णनशैली छान आहे. सगळं डोळ्यासमोर उभं राहतं.
कोकणाचा आणि माझा दूरानव्येही संबंध नाही. एकदा लहानपणी गणपतीपुळे ला गेले होते पण त्याच्या काही जास्त आठवणी नाहीत. काही वर्षपूर्वी गुहागरला गेले होते ते मात्र अजिबातच आवडलं नव्हते. स्वच्छतागृह मात्र मला जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी attached आणि जेवढे शक्य असेल तेवढे व्यक्तिगत आवडते.

देवाssss लोक परसदाराचे फोटो मागताहेत. Wink

हेमाताई, ह्या विषयावर कुणी इतका चांगला लेख लिहील आणि मी तो वाचीन यावर माझा कालपर्यंत विश्वास नसता बसला. केवळ तुम्ही लिहिलाय म्हणून वाचला आणि चक्क आवडला.

ममो, लेख नेहमी प्रमाणेच सुंदर झाला आहे! आवडला!
जरी कोकणात घर नसलं तरी अशा घरांत रहाणारे भरपूर परिचित आहेत त्यामुळे परसदार चांगलं माहिती आहे. माधव यांची प्रतिक्रिया वाचून खुदकन हसू आले! परसाकडे जाऊन येणे हा शब्दप्रयोग आमच्याकडे अजूनही सर्रास वापरला जातो! परसाचे बाकीचे संदर्भ जाऊन आता केवळ हाच शिल्लक राहिला आहे! मला संडास आणि न्हाणीघर वेगवेगळे आणि संडास शक्यतो घरापासून काही अंतरावर अशी रचना असलेले घर आवडते.
एकदा श्रीवर्धनला एका घरगुती ठिकाणी उतरलो होतो तेव्हा सकाळी त्यांच्या परसात मस्त मोठे निर्धूर बंब पाहीले होते पाणी तापवण्यासाठी. ते फारच आवडले होते मला.

नेहेमीप्रमाणे रोचक, मनोरंजक आणि आठवणींच्या प्रदेशात दूरवर नेऊन आणणारे >>> खरच.

माधव, लोक परसदाराचे फोटो मागत आहेत, देवाssss असं करताय जसं परसाकडेचे मागितलेत >>> Rofl Rofl Rofl

देवाssss असं करताय जसं परसाकडेचे मागितलेत >>> हो ना. परसदार म्हणजे काही नुसतं संडास नव्हे.

परसदार म्हणजे काही नुसतं संडास नव्हे. >>> बरोबर... पण 'परसदारी जाउन येणे' असाही शब्दप्रयोग सर्रास केला जातो कोकणात.

बरोबर आहे माधव. पण आजकाल ( म्हणजे जुने जाणते लोक व आपल्यासारखे हा शब्द माहीत असलेले लोक) परसाकडे हाच शब्द वापरतात. परसदार म्हणले की मागचे अंगण आठवते. Happy

नेहमीप्रमाणे मस्त! तुझ्या लेखांमुळे तुझ्या घराबद्दल, माणसाबद्दल आपुलकी, ओढ निर्माण झालीये .... प्रत्यक्ष लवकरच भेटण्याचा योग यावा....
माधव, Happy

इतक्या संयत आणि सकारात्मक प्रतिसादांसाठी सगळयांना खूप खूप धन्यवाद.

मी खरं तर स्वच्छता गृहाचा प्रॅरिग्राफ लास्ट ला लिहिला होता पण शुगोलच्या सजेशन मुळे तो मध्ये आणला आहे. शुगोल ने तिचा प्रतिसाद एडिट केल्यामुळे ते दिसत नाहीये. ह्या सुचनेसाठी शुगोल पुन्हा एकदा धन्यवाद.

अंजू मस्त लिहिले आहेस. अर्थात तुझे प्रतिसाद नेहमीच आवडतात मला.

अमा, तुम्ही फुल राखेचा मय ,☺ माझी ही आवडती सिरीयल आहे ती.
स्वच्छतागृह मात्र मला जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी attached आणि जेवढे शक्य असेल तेवढे व्यक्तिगत आवडते. >> राजसी , काळ 360 ° ने बदलला आहे आणि तुम्ही लिहिलेलं आताच्या काळाला अनुसरूनच आहे. पण मी लिहितेय जेव्हा कोकणातल्या दुर्गम खेड्यात पक्क्या बांधकामाची, पाण्याची सोय असलेली स्वच्छता गृहे ही सुखवस्तू पणाची कमाल मर्यादा होती त्या काळा बद्दल.

हेमाताई, ह्या विषयावर कुणी इतका चांगला लेख लिहील आणि मी तो वाचीन यावर माझा कालपर्यंत विश्वास नसता बसला. केवळ तुम्ही लिहिलाय म्हणून वाचला आणि चक्क आवडला. >> माधव खूप खूप आभार. माझ्या ही मनात अगदी हेच विचार होते . म्हणजे ह्यावर लिहावं असं मनातून खूप वाटे पण शब्दांकन नीट जमेल का आपल्याला ही धास्ती पण वाटे. शेवटी हिम्मत एकवटून लिहिलं .

तेव्हा सकाळी त्यांच्या परसात मस्त मोठे निर्धूर बंब पाहीले होते पाणी तापवण्यासाठी. ते फारच आवडले होते मला. >> होय हल्ली कोकणात ते खूप पॉप्युलर झालेत जिज्ञासा.

परसाचे बाकीचे संदर्भ जाऊन आता केवळ हाच शिल्लक राहिला आहे! >> अगदी बरोबर जिज्ञासा. परसभाग, परसु यावरून परसातल्या भाज्या वैगेरे शब्दप्रयोग प्रचलित होते .ते सगळे काळाच्या ओघात गायब झालेत.

नेहेमीप्रमाणे रोचक, मनोरंजक आणि आठवणींच्या प्रदेशात दूरवर नेऊन आणणारे >> हार्पेन एकदम नेटका आणि मस्त प्रतिसाद.

प्रत्यक्ष लवकरच भेटण्याचा योग यावा.... येस्स, मंजू, नक्की येईल हा योग.

आगराचे फोटो आहेत पण ते तुम्ही पाहिले आहेत. बाकी फोटो नाहीयेत माझ्याकडे. कोणाकडे असतील जर जरूर दाखवा. स्पेशली अंजू कडे , कारण तिच आणि आमचं गाव खूप जवळ आहे त्यामुळे साधर्म्य असेल .

ममो, तुमचे कोकणातल्या घरावरचे लेख कायमच आवडतात वाचायला. इतका आपलेपणा असतो त्यात. आम्हांला वाचतानाही खूप छान वाटतं. मला कायम आमच्या कोकणातल्या घराची, बालपणी तिथे घालवलेल्या सुट्ट्यांची आठवण येते.

त्यावेळेस दर सुट्टीला कोकणात जायचं याशिवाय दुसरा पर्याय माहितही नव्हता. सगळी चुलत भावंडं वगैरे असायची. सुट्टी कशी संपायची ते कळायचंही नाही. आता कळतं ते दिवस किती छान होते ते.

फोटो मी गेले तर काढेन, किंवा नवऱ्याला सांगेन, मागे काही फोटो नवऱ्याने काढलेले आहेत पण ते खालच्या आगरातले, ते फार खास नाहीयेत, मोबाईल इतका खास नव्हता तेव्हा, लेक लहान असताना एक दोणीत पंपाचे पाणी येतं त्यात खेळताना आहे, बरा असेल तर देईन.

मी तर नवऱ्याला सांगते की ते लिझिकी चॅनेल वगैरे आहेत तसे कोकणातले व्हिडीओज केले पाहिजेत, फणस भाजी चिरून तो करेपर्यंतचा. रातांबे फोडून त्याची आमसुले म्हणजे कोकम आणि इतर प्रकार करतो त्याचा, आंबे झाडावरून काढून त्याचे विविध प्रकार कसे केले जातात त्याचा, पण वेळ आणि चांगला कॅमेरा हवा.

हेमाताई विचार करा याचा, तुमच्या घरातल्या कोणाला इंटरेस्ट असेल तर असे व्हिडिओज काढून youtube वर टाकू शकतो.

मी तर नवऱ्याला सांगते की ते लिझिकी चॅनेल वगैरे आहेत तसे कोकणातले व्हिडीओज केले पाहिजेत, फणस भाजी चिरून तो करेपर्यंतचा. रातांबे फोडून त्याची आमसुले म्हणजे कोकम आणि इतर प्रकार करतो त्याचा, आंबे झाडावरून काढून त्याचे विविध प्रकार कसे केले जातात त्याचा, पण वेळ आणि चांगला कॅमेरा हवा. >>> ही आयडीयाची कल्पना भारी आहे अंजू.

हो नताशा, कोणी केले तर एकदम छान होतील. कोकणातले काही युट्युब व्हिडीओज बघितले पण असे दिसले नाहीत. सासरी आणि माहेरी आम्ही अजुनही आम्ही चुलही वापरतो, गॅस असला तरी. पोळ्या, दुपारचा चहा अशा गोष्टी जास्त करुन गॅसवर.

आंबा रस आटवताना तो खदखदत उडतो, फणस कापून त्याचे गरे तळणे ही खरंच कौशल्याची कामं आहेत. इथे आम्हाला आयतं मिळतं पण तिथे रहाणा-या लोकांच्या मेहेनतीची कल्पना आहे. माहेरी तर हळदीची बाग पण आहे छोटीशी का होईना, हळद करणं पण जाम कष्टाचं काम ऐकून माहीतेय, त्याची जाणीव आहे मला, त्यामुळे ते कोणी पोचवलं तर बरं होईल. मला स्वतःला शक्य नाही. कोकणातल्या कोणीही असं पोचवलं तर ते प्रातिनिधिक होईल.

आडो धन्यवाद.

अंजू, ही व्हिडीओ बनवून यू ट्युब चॅनेल वर टाकण्याची कल्पना भारीच आहे ग. सांगते घरी असे व्हिडीओ बनवायला.

आरारूटाच्या कंदापासून आरारूट तयार करणे, नागकेशराच्या फुलातून केशर गोळा करणे ह्याचे युनिक व्हिडीओ बनू शकतात.

आरारूटाच्या कंदापासून आरारूट तयार करणे, नागकेशराच्या फुलातून केशर गोळा करणे ह्याचे युनिक व्हिडीओ बनू शकतात. >>> भारीच, हे मीही नाही बघितलं कधी.

Pages