रांगोळीच्या शोधात दशदिशा

Submitted by mi_anu on 6 November, 2019 - 02:58

(लेखनमूल्य बिल्य शोधत असाल तर हे लिखाण वाचू नका.कोण रे ते मागून "तुझ्या कोणत्या लेखात असतं तसं पण.." पुटपुटतंय?)

याची सुरुवात झाली ती 15 दिवसांपूर्वी. तेव्हा मी एक शहाणी,उगीच कोणाशीही न बोलणारी,आपलं काम करणारी,आपले पैसे जपणारी शांत बाई होते.

अचानक गुगल पे ने दिवाळी स्टॅम्प योजना काढली आणि तेव्हापासून मी कोणालाही काहीही मेसेज, पैसे, स्टॅम्प पाठवणारी, काहीही खरेदी करणारी वेडी बाई झाले.

म्हणजे योजना अशी की झुमका, रांगोळी, फुल,आकाश कंदील, दिवा अश्या चित्रांचे प्रत्येकी 1 स्टॅम्प जमा करायचे आणि मग गुगल पे आपल्याला 251 रुपये "फुकट" देणार आणि एका लकी ड्रॉ मध्ये भाग घ्यायची संधी पण देणार.

हे स्टॅम्प मिळणार कसे?तर रोज जास्तीत जास्त 5 लोक/कंपनी/बिल पे ट्रान्स्फर करायच्या, रोज जास्तीत जास्त 5 वेळा दिवाळी आयटम(लावलेली पणती, प्रकाशमान कंदील) स्कॅन करायचा किंवा रोज जास्तीत जास्त 5 नव्या लोकांना एक स्टॅम्प गिफ्ट करायचा, मग आपल्याला एक स्टॅम्प गिफ्ट मिळतो.

हे सगळे उद्योग करून लगेचच 5 वेगवेगळ्या प्रकारचे 5 स्टॅम्प मिळतील आणि 251 रुपये बक्षीस मिळतील असा एखाद्या अश्राप निरागस माणसाचा गैरसमज असेल.बिझनेस मॉडेल्स अशी बनत नाहीत."3 दिवस 2 रात्री" वाली ट्रिप फुकट केव्हा मिळते?दीड लाखाची मॅग्नेटिक गादी घेतल्यावर किंवा 75000 ची वार्षिक मेम्बरशिप भरून ऑरगॅनिक प्रॉडक्ट विकून आपल्या सारखे सात ग्राहक(कोण ते 'बकरे' म्हणून ओरडतंय मागे?') 75000 रुपये गमवायला लावून.त्यामुळे गुगल पे पण सगळ्यांना भरपूर स्टॅम्प देते.रांगोळी किंवा फुल सोडून.ते आपल्याला फुल 'देण्या'ऐवजी 'बनवत' आहेत अशी सुप्त शंका अनेक जणांच्या मनात येते आहे.पण उपयोग नाही.एकदा एक स्टॅम्प मिळाला की तुमची बाकी 4 स्टॅम्प मिळवायची भूक जागी होते.

माझी पण पाचही स्टॅम्प मिळवायची भूक जागी झाली.मी भक्तीभावाने आजूबाजूच्याना पैसे पाठवू लागले.आधी नवरा, मग इतर नातेवाईक, टाटा स्काय,एअरटेल,जिओ, बीएसएनएल.35 रु किंवा त्यापेक्षा जास्त पाठवल्यास स्टॅम्प मिळतो.त्यामुळे अचानकपणे टाटा स्काय मध्ये रोज 35 रुपये जमा व्हायला लागले.अचानक मोबाईल बिलं पुढच्या महिन्याची आगाऊ भरली जायला लागली.ओला मनी मध्ये पैसे आले.किंडल वर पुस्तकं घेऊन अमेझॉन पे मध्ये गुगल पे वरून पैसे टाकले जाऊ लागले.इतक्या दिशेतून इतक्या दिशेला पैसे गेले आणि आले की हिशोब करून गरगरायला लागले."कार्तिक कॉलिंग कार्तिक" सारखं स्वतःच्या क्रेडिट कार्ड ला पैसे देऊन पण झाले.

रोज हापिसातून घरी आल्यावर देवापुढे दिवा लावावा त्याच उत्कटतेने आणि आस्तिकतेने मी गॅलरीत जाऊन आमचा सोलर कंदील 5 वेळा स्कॅन करू लागले.नवऱ्याला त्याच्या बऱ्याच मित्रांचे गोंधळलेले फोन येऊ लागले."अरे तुझ्या बायको कडून 35 रु मिळाले.कसलं कॉन्ट्री बाकी होतं का?"

आता माझ्या स्टॅम्प व्रताची कीर्ती (मी सगळ्यांना रोज स्टॅम्प देत असल्याने) पंचक्रोशीत पसरली आणि इतर भक्तजन माझ्याकडे रांगोळी आणि फुलांचा स्टॅम्प मागू लागले.रोज गुगल वर टीप येतात: "आज तुमचे मोबाईल बिल गुगल पे ने भरा आणि फुल किंवा रांगोळी स्टॅम्प मिळायची जास्तीत जास्त गॅरंटी!!". अश्या प्रकारे मी 2-3 मोठी बिलं भरून फुलं मिळवली आणि नवऱ्याला आणि एक दोन मित्राना दिली आणि त्यांना रांगोळी ची विनंती केली.

"हाऊ टू गेट रांगोळी स्टॅम्प" असं गुगल केलं असता माझ्या सारखे येडे भक्त भरपूर आहेत आणि त्यातल्या काही जणांनी रांगोळी स्टॅम्प साठी अनोळखी लोकांचे टेलिग्राम ग्रुप बनवले आहेत असं कळलं.व्हॉटसप वर 'जे1 झालं का' आणि 'मयत्री करणार का' वालं स्पॅम नको असल्याने टेलिग्राम गृप चा मोह आवरता घेतला.लोकांनी आवडत्या मुलीला प्रपोज करताना "माझ्याकडे रांगोळी स्टॅम्प आहे" सांगून छाप पाडणाऱ्या मुलांचे विनोद पण बनवले.आता माझ्याकडे 45 आकाश कंदील,50 दिवे, 15 झुमके, 1 फुल आणि 0 रांगोळी आहे.

एकंदर हिशोब आणि अनेक उगीचच जादाची भरलेली आगाऊ बिलं पाहता नवऱ्याच्या मते हा "10 किलो डिटर्जंट वर एक चमचा मोफत" लेव्हल चा सौदा आहे.पण "फुकट" या शब्दाचा मोह भल्या भल्या विश्वामित्राना आवरला नाही.मी तर एक साधा वाल्या कोळी.एखाद्या ड्रॅकुला चावलेल्या माणसाने इतरांचं रक्त पिऊन त्यांना ड्रॅकुलापदाची दीक्षा द्यावी किंवा एखाद्या अमली पदार्थ विकणाऱ्या एजंट ने पाहिलं पाकीट फुकट देऊन लोकांना व्यसन लावावं तसं मी बऱ्याच ऑफर माहीत नसलेल्या भाबड्याजनांना स्टँप जमवायची सवय लावली आहे.

माझ्यापासून सावध राहा!! हा लेख वाचू नका.एखाद्या ड्रॅकुला ने चावलेल्या माणसाला रक्ताची चटक लागावी तशी तुम्हाला पण स्टँप जमवायची आणि 11 नोव्हेंबर पर्यंत रांगोळी साठी जंग जंग पछाडायची सवय लागेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मी 50 करते
रोज सकाळी उठले की भक्तिभावाने नवऱ्याला 50, माझ्या बँक अकाउंट ला 50, जॉईंट अकाउंट ला 50 करते
मग नवरा 'तू त्यांच्या जाळ्यात फसते आहेस' असं व्याख्यान देऊन 50 परत ट्रान्स्फर करून गो इंडिया गेम खेळतो.

नसावे लागत
गुगल पे ने लोकप्रियता मिळवायला बरेच नियम बायपास केलेत.
तो दिवस लांब नाही जेव्हा भारतात गुगल पे बॅन होईल.अर्थात त्याला वेळ आहे तोवर देत राहा गुगल आर्टिफिशियल इंटेलिजन्स ला डाटा आणि गुगल पे ला ट्रांझक्षन्स. Happy

Lol
मी शक्य असेल तेंव्हा भीम वापरण्याचा प्रयत्न करते. पण त्यात transactions विनाकारण फेल होतात. तसंच सगळ्या सोयी ( सगळे billers / prepaid etc) नाहीयेत.

गुगल पे ने जर फ्रॉड transaction झाले तर RBI हस्तक्षेप करणार नाही असे सर्क्युलर वाचल्याचे आठवतेय.
मी अजून तरी गुगल पे वापरले नाही. मला ते सेफ वाटत नाही

सेफ नाहीचे
आम्ही अनेक गोष्टींना एक्स्पोज करून, आधार आणि त
पत्ते देऊन अलरेडी उघडे आहोत त्यामुळे वापरतो Happy

मागच्या वर्षी वाचला होता पण गुगल पे करत नसल्याने काही कळलं नव्हतं. आता परत वाचला. Lol
बरं आहे मग मी तिकीट, स्टिकर्स किमी च्या मोहमयी दुनियेपासून लांब आहे ते.
ते बेटर लक नेक्स्ट टाइम हेच नशिबात असतं. किरकोळ 4, 9 रु मिळाले तरी आम्ही बापडे खूश .

अखेर मला रात्री 12.15 वाजता टाटा स्काय रिचार्ज करून नैनिताल स्टॅम्प व 110 रु मिळाले(त्यासाठी किती उलाढाली केल्या हे कोणी विचारू नये Happy )

माझ्याकडे ५६ तिकिटे आणि सत्राशे साठ किमी आहेत
पण बस्तर, गया आणि गोवा नाही.
माझ्याकडे रिचार्ज करायला प्रिपेड मोबाईल आणि डिटीएच नाही.
त्यामुळे आता खेळ थांबवल्यातच जमा आहे.

पण मागच्या वर्षीपेक्षा ह्यावर्षीचा खेळ जास्त आवडला. या वर्षी कुठे फिरता न आल्याने आभासी फिरण्याचा आनंद लुटता आला.
भारतात कुठे कुठे जायला हवे त्या यादीतली गावे वाढली.

माझीही गाडी केवळ गया, गोवा, बस्तर, व पुरी ह्या चार शहरांवाचून थांबली आहे. ईतर 26 शहर जमा झालीत आणि सुमारे 18000 किमी शिल्लक आहेत. सध्या कुठलेही व्यवहार केल्यास आधीच जमा असलेल्या 26 शहरांचीच तिकीटे सातत्याने मिळत आहेत आणि त्यात किलोमीटरांची भर पडत आहे. माझ्याकडे 26 शहरांची किमान 2 तरी तिकीटे आहेत. कुणाला हवी असल्यास विपू करा.

Pages