रांगोळीच्या शोधात दशदिशा

Submitted by mi_anu on 6 November, 2019 - 02:58

(लेखनमूल्य बिल्य शोधत असाल तर हे लिखाण वाचू नका.कोण रे ते मागून "तुझ्या कोणत्या लेखात असतं तसं पण.." पुटपुटतंय?)

याची सुरुवात झाली ती 15 दिवसांपूर्वी. तेव्हा मी एक शहाणी,उगीच कोणाशीही न बोलणारी,आपलं काम करणारी,आपले पैसे जपणारी शांत बाई होते.

अचानक गुगल पे ने दिवाळी स्टॅम्प योजना काढली आणि तेव्हापासून मी कोणालाही काहीही मेसेज, पैसे, स्टॅम्प पाठवणारी, काहीही खरेदी करणारी वेडी बाई झाले.

म्हणजे योजना अशी की झुमका, रांगोळी, फुल,आकाश कंदील, दिवा अश्या चित्रांचे प्रत्येकी 1 स्टॅम्प जमा करायचे आणि मग गुगल पे आपल्याला 251 रुपये "फुकट" देणार आणि एका लकी ड्रॉ मध्ये भाग घ्यायची संधी पण देणार.

हे स्टॅम्प मिळणार कसे?तर रोज जास्तीत जास्त 5 लोक/कंपनी/बिल पे ट्रान्स्फर करायच्या, रोज जास्तीत जास्त 5 वेळा दिवाळी आयटम(लावलेली पणती, प्रकाशमान कंदील) स्कॅन करायचा किंवा रोज जास्तीत जास्त 5 नव्या लोकांना एक स्टॅम्प गिफ्ट करायचा, मग आपल्याला एक स्टॅम्प गिफ्ट मिळतो.

हे सगळे उद्योग करून लगेचच 5 वेगवेगळ्या प्रकारचे 5 स्टॅम्प मिळतील आणि 251 रुपये बक्षीस मिळतील असा एखाद्या अश्राप निरागस माणसाचा गैरसमज असेल.बिझनेस मॉडेल्स अशी बनत नाहीत."3 दिवस 2 रात्री" वाली ट्रिप फुकट केव्हा मिळते?दीड लाखाची मॅग्नेटिक गादी घेतल्यावर किंवा 75000 ची वार्षिक मेम्बरशिप भरून ऑरगॅनिक प्रॉडक्ट विकून आपल्या सारखे सात ग्राहक(कोण ते 'बकरे' म्हणून ओरडतंय मागे?') 75000 रुपये गमवायला लावून.त्यामुळे गुगल पे पण सगळ्यांना भरपूर स्टॅम्प देते.रांगोळी किंवा फुल सोडून.ते आपल्याला फुल 'देण्या'ऐवजी 'बनवत' आहेत अशी सुप्त शंका अनेक जणांच्या मनात येते आहे.पण उपयोग नाही.एकदा एक स्टॅम्प मिळाला की तुमची बाकी 4 स्टॅम्प मिळवायची भूक जागी होते.

माझी पण पाचही स्टॅम्प मिळवायची भूक जागी झाली.मी भक्तीभावाने आजूबाजूच्याना पैसे पाठवू लागले.आधी नवरा, मग इतर नातेवाईक, टाटा स्काय,एअरटेल,जिओ, बीएसएनएल.35 रु किंवा त्यापेक्षा जास्त पाठवल्यास स्टॅम्प मिळतो.त्यामुळे अचानकपणे टाटा स्काय मध्ये रोज 35 रुपये जमा व्हायला लागले.अचानक मोबाईल बिलं पुढच्या महिन्याची आगाऊ भरली जायला लागली.ओला मनी मध्ये पैसे आले.किंडल वर पुस्तकं घेऊन अमेझॉन पे मध्ये गुगल पे वरून पैसे टाकले जाऊ लागले.इतक्या दिशेतून इतक्या दिशेला पैसे गेले आणि आले की हिशोब करून गरगरायला लागले."कार्तिक कॉलिंग कार्तिक" सारखं स्वतःच्या क्रेडिट कार्ड ला पैसे देऊन पण झाले.

रोज हापिसातून घरी आल्यावर देवापुढे दिवा लावावा त्याच उत्कटतेने आणि आस्तिकतेने मी गॅलरीत जाऊन आमचा सोलर कंदील 5 वेळा स्कॅन करू लागले.नवऱ्याला त्याच्या बऱ्याच मित्रांचे गोंधळलेले फोन येऊ लागले."अरे तुझ्या बायको कडून 35 रु मिळाले.कसलं कॉन्ट्री बाकी होतं का?"

आता माझ्या स्टॅम्प व्रताची कीर्ती (मी सगळ्यांना रोज स्टॅम्प देत असल्याने) पंचक्रोशीत पसरली आणि इतर भक्तजन माझ्याकडे रांगोळी आणि फुलांचा स्टॅम्प मागू लागले.रोज गुगल वर टीप येतात: "आज तुमचे मोबाईल बिल गुगल पे ने भरा आणि फुल किंवा रांगोळी स्टॅम्प मिळायची जास्तीत जास्त गॅरंटी!!". अश्या प्रकारे मी 2-3 मोठी बिलं भरून फुलं मिळवली आणि नवऱ्याला आणि एक दोन मित्राना दिली आणि त्यांना रांगोळी ची विनंती केली.

"हाऊ टू गेट रांगोळी स्टॅम्प" असं गुगल केलं असता माझ्या सारखे येडे भक्त भरपूर आहेत आणि त्यातल्या काही जणांनी रांगोळी स्टॅम्प साठी अनोळखी लोकांचे टेलिग्राम ग्रुप बनवले आहेत असं कळलं.व्हॉटसप वर 'जे1 झालं का' आणि 'मयत्री करणार का' वालं स्पॅम नको असल्याने टेलिग्राम गृप चा मोह आवरता घेतला.लोकांनी आवडत्या मुलीला प्रपोज करताना "माझ्याकडे रांगोळी स्टॅम्प आहे" सांगून छाप पाडणाऱ्या मुलांचे विनोद पण बनवले.आता माझ्याकडे 45 आकाश कंदील,50 दिवे, 15 झुमके, 1 फुल आणि 0 रांगोळी आहे.

एकंदर हिशोब आणि अनेक उगीचच जादाची भरलेली आगाऊ बिलं पाहता नवऱ्याच्या मते हा "10 किलो डिटर्जंट वर एक चमचा मोफत" लेव्हल चा सौदा आहे.पण "फुकट" या शब्दाचा मोह भल्या भल्या विश्वामित्राना आवरला नाही.मी तर एक साधा वाल्या कोळी.एखाद्या ड्रॅकुला चावलेल्या माणसाने इतरांचं रक्त पिऊन त्यांना ड्रॅकुलापदाची दीक्षा द्यावी किंवा एखाद्या अमली पदार्थ विकणाऱ्या एजंट ने पाहिलं पाकीट फुकट देऊन लोकांना व्यसन लावावं तसं मी बऱ्याच ऑफर माहीत नसलेल्या भाबड्याजनांना स्टँप जमवायची सवय लावली आहे.

माझ्यापासून सावध राहा!! हा लेख वाचू नका.एखाद्या ड्रॅकुला ने चावलेल्या माणसाला रक्ताची चटक लागावी तशी तुम्हाला पण स्टँप जमवायची आणि 11 नोव्हेंबर पर्यंत रांगोळी साठी जंग जंग पछाडायची सवय लागेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काही मीम्स बघितले होते यावरचे. पण मी गुगलपे वापरत नसल्याने असे काही आहे हे माहित नव्हतं.
छान लिहिलंय.

लेट मी गेट धिस राईट- सो लोक हा गेम २५१ रुपयांसाठी खेळत आहेत???>>>>> हो. मलाही हेच वाटतंय. Happy

डायलॉग:
"जब (फ्री शब्द से) प्यार हो जाता है तो उस दर्या मे आँख बंद करके डुबा जाता है, ये नही सोचा जाता क्या सही है और क्या बेवकुफी." ☺️

भारीच लिहिलयस!

मला मिळाले बा एक्दाचे २५१/- रुप्ये.
कलीग ला सगळे श्ट्यांप २ होते त तिला ५०२ रुप्ये दिलेन गुगल नं. Uhoh

मी छोटी बिलं भरली पण मोठं भरायला नको वाटतंय कारण क्रेडीट कार्डावर miles मिळतात प्लस zero इंटरनेट महिनाभर फंडस् वापरता येतात. गूगलवर direct अकाउंट डेबिट होतं. आमचे इस्त्री, पेपर, कार धुणारे, swiggy boys गूगल घेतात. (स्वीगजि वर prepayment बंद केलं, त्यांना काहीच incentive राहत नाही वेळेवर डेलीवर करायचा!)

यावेळी गुगल चा 2020 केक चॅलेंज आला.त्यात मी भावनेच्या भरात वाहून न जाता फक्त स्वतःला आणि नवऱ्याला रोज पैसे पाठवले.4 दिवस भक्तीभावे गुगल युट्युब चॅनल वर जाहिराती श्रवण आणि रेकॉर्ड केले, दिवसातून 2 वेळा 2020 हा आकडा स्कॅन केला.
आणि माझ्या मेहनतीला फळ म्हणून 221 रु मिळाले ☺️☺️
Screenshot_2019-12-27-16-24-48-709_com.google.android.apps_.nbu_.paisa_.user_.jpg

@अनु
त्यात मी भावनेच्या भरात वाहून न जाता फक्त स्वतःला आणि नवऱ्याला रोज पैसे पाठवले
>>> एकदा एका account/UPI ID ला पैसे पाठवले की Google pay consider नाही करत पुढे स्टॅम्प द्यायला.
:विचारात पडलेला बाहूला:

स्वतःच्या आणि नवऱ्याच्या वेगवेगळ्या बँक अकौंटस ना पाठवले.
टाटा स्काय वर जमा केले.
अमेझॉन पे वर जमा केले.
पेटीएम वर जमा केले.
कोणाला खालचा लेयर पूर्ण करायला लागणारे हवे असल्यास सांगणे.16 बलून 11 डीजे 1 सेल्फी देऊ शकते.

मी कुठेच नाही फिरले बसल्याजागी कॉम्पुटर वर स्कॅन केले दिवे आणि कंदील भेटले होते. आणि दोन बिल पेड केली तर एकातून ९ आणि एकातून २१ रुपये मिळाले. Happy

20191230_183921.jpg

अखेर.......
टॉप लेयर नाही झाली

मी पण पडलो होतो रांगोळीच्या फंदात...शेवटी स्पर्धा संपल्यावर काहीच मिळालं नाही (आपण गंडले गेलो आहोत) म्हणून गूगल पे अनिंस्टॉल केलं

फोन अँड्रॉइड असल्याने काही दिवसांनी आपोआप होतं इंस्टॉल ते...मग अकाउंट delete करून टाकलं

गुगल पे वाले अत्यंत बिलंदर माणसे आहेत.
यावेळी आणलेला गो इंडिया लोकांना अजून जास्त पैश्याच्या उलाढाली करायला लावणारा आहे.गुगल पे केले की काही तिकिटं मिळतात.मग अजून तिकिटं आणि किलोमीटर मिळवायला अजून व्यवहार करावे लागतात.मला बरीच तिकिटं मिळाली होती पण गेम न कळल्याने फार लक्ष दिलं नव्हतं.काल लक्ष गेल्यावर फटाफट 25 सिटी व्हिजिट करून टाकल्या.यावेळी मी नेहमीची बिल पे करता करता होईल तितकेच करणार आहे.
100 रु डिस्काउंट चे कुपन देऊन मिनीमम 500 ची खरेदी करायला लावायची हे लोकांना आधी फ्री ड्रग चवीला देऊन सवय लावण्या सारखे आहे Happy
अर्थातच मनावर संयम ठेवून असे मोह टाळणे.

माझा भाचा यातून शेअर की म्य्चुअल फंड मध्ये इन्वेस्टमेंट की ट्रेडिंग करतोय. एकही पैसा न लावता.

मी व्हर्च्युअल सोने घेतले होते कधीतरी
ते विकून 382 फायदा आला
म्हणून परत घेतले तर आता वरच जात नाहीये
बरेच महिने ठेवावे लागेल
चोरांचे खरेदी आणि विक्री रेट पण वेगळे आहेत.

मला तर आता कळतय..असं पण काही असतं..
अनु लिहिलय मस्त Lol

अशीच एक गंमत आठवली...भावाच्या एका मित्राला शंभर रूपयाच्या ट्रान्झैक्शनवर आठशे रूपये चे स्क्रैच कार्ड मिळाले होते.. मग मी आणि भाऊ उगीचच एकमेकांना गुगल पेवरून पैसे ट्रान्सफर करत बसलो पण खुप वेळा बेटर लक नेक्स्ट टाईम आणि एखादे वेळी चार रूपये इतकेच मिळाले. Lol

मी पण रोज नवऱ्याला 100 रुपये ट्रान्स्फर करते. दिवाळी पाडव्याला 200 केले. तरी अजून सगळी तिकिटं आणि किलोमीटर्स व्हायचेत. Lol

Pages