चक्राताचे संस्मरणीय अनुभव- भाग १

Submitted by वावे on 5 November, 2019 - 06:14
female portrait

गेली दोन वर्षे मी आजूबाजूचे पक्षी उत्सुकतेने बघायला लागले आहे. पक्ष्यांचे फोटो काढायलाही मला आवडतात. पण एक रंगनथिट्टू सोडलं तर खास पक्षीनिरीक्षणासाठी असं कुठे लांबवर जायला जमलं नव्हतं. मायबोलीवर साक्षीने लिहिलेलं चक्राताचं प्रवासवर्णन मला खूप आवडलं होतं. तोपर्यंत मी चक्राता हे नावही ऐकलं नव्हतं. पण साक्षीचे लेख वाचून चक्राताला जावंसं तीव्रतेने वाटायला लागलं. त्यामुळे किकांच्या ऑक्टोबरमधल्या चक्राता कॅम्पबद्दल समजताच, काहीतरी करून हे जमवूयाच असं ठरवलं. माझ्या एका आतेबहिणीचंही माझ्याबरोबर यायचं ठरलं.

किकांनी दिलेल्या यादी आणि सूचनांप्रमाणे सामानाची खरेदी आणि पॅकिंग झालं. डीएसएलआर
कॅमेर्याने काढलेले फोटो उत्कृष्ट येतात हे खरं असलं तरी लांबवरचे फोटो काढण्यासाठी तोफेसारखी मोठी लेन्स बाळगत फिरावं लागतं आणि चार-पाच दिवसांच्या कँपसाठी ते अडचणीचं ठरू शकतं. त्यामुळे डीएसएलआर तिकडे नेण्याच्या भानगडीत न पडता मायबोलीकर शाली यांच्या शिफारशीवरून एक नवीन ब्रिज कॅमेरा विकत घेतला.

चक्राता हे गाव डेहराडूनपासून साधारण ९० किलोमीटरवर आहे. कँपला येणारे सगळेजण आपापल्या सोयीच्या मार्गांनी डेहराडूनला येऊन पोचणार होते. तिथून पुढे आम्ही एकत्र असणार होतो. आम्ही दोघींनी पुणे ते दिल्ली विमान आणि दिल्ली ते डेहराडून ट्रेन असा प्रवास आखला होता. दिल्लीला पोचल्यावर थोडा वेळ हाताशी असणार होता. या वेळात विकी रॉय या फोटोग्राफरला भेटायचा बेत होता. शून्याच्याही खालून सुरुवात करून आज आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचलेला हा फोटोग्राफर आहे. माझ्या आतेबहीण विकी रॉयच्या एका मुलाखतीच्या संयोजनात सहभागी असल्यामुळे तिची त्याच्याशी चांगली ओळख झाली होती. त्यामुळे आम्हाला त्याला सहजपणे भेटता आलं.

दहा-बारा वर्षांचा असताना हा मुलगा कलकत्त्याहून पळून दिल्लीला आला. अशा प्रकारे पळून आलेल्या मुलांचे दिवस जितके खडतर जातात तसेच त्याचेही गेले. दिल्लीला स्टेशनवर अशाच इतर बेघर मुलांबरोबर रहायचं, कचर्यातून भंगार गोळा करून विकायचं, लांब पल्ल्याची एखादी ट्रेन येऊन थांबली की पॅन्ट्री कारमधे घुसून हाताला लागेल ते खाणं पळवायचं आणि खायचं, रेल नीरच्या रिकाम्या बाटल्या कचर्यातून गोळा करून आणून स्वच्छ धुवून त्यात स्टेशनवरचं पाणी भरून ट्रेनमधे पाच पाच रुपयांना विकायचं, रात्री कचर्याच्या ढिगावर झोपायचं ( ही सगळ्यात सुरक्षित जागा कारण तिथून पोलिस हाकलून लावत नाहीत!!) असं आयुष्य तो जगला. असे काही महिने गेल्यावर त्याच्या आयुष्यात ’ सलाम बालक’ नावाची स्वयंसेवी संस्था आली. घर सोडून पळून आलेल्या, रस्त्यावरच्या मुलांसाठी काम करणारी ही संस्था. विकी या संस्थेत रहायला गेला. तिथे दहावीपर्यंत शिकला. पुढे काय करायचं आहे, या प्रश्नाला त्याने फोटोग्राफी असं उत्तर दिलं. भारतात फोटोग्राफी करायला आलेल्या एका परदेशी फोटोग्राफरच्या सोबत त्याला काही दिवस रहायला मिळालं. संस्थेकडून एक कॅमेराही मिळाला. सुरुवातीला मित्रांचे फोटो काढून तो त्यांना प्रत्येकी पाच रुपयांना ( फिल्म डेव्हलपिंगचा खर्च) विकत असे. त्रिवेणी कला संगम या संस्थेत आणि नंतर अनय मान या फोटोग्राफरच्या हाताखाली तो फोटोग्राफी शिकला. विकी रॉयने काढलेल्या फोटोंच्या स्ट्रीट ड्रीम्स, होम स्ट्रीट होम, स्कार्ड लँड अशा मालिका नावाजल्या गेल्या आहेत.

आम्ही ज्या दिवशी दिल्लीला जाणार होतो, त्या दिवशी तोही दिल्लीत असणार होता. मग त्याने आम्हाला त्याच्या मेहरौली भागातल्या घरीच यायचं आमंत्रण दिलं. त्याप्रमाणे त्याच्या घरी गेलो. खाली रस्त्यावर दुकानं, रिक्षा स्टँड, रहदारी यांचा कोलाहल असला तरी चौथ्या मजल्यावरचं विकीचं मोजकी सजावट असलेलं नीटनेटकं घर आणि मुख्य म्हणजे त्याची गच्ची या दोन्ही गोष्टी आवडल्या. विकी आणि त्याच्या एका मित्राने आमचं खूपच चांगलं आदरातिथ्य केलं. गेल्या गेल्या चविष्ट आणि गरमागरम समोसे, ढोकळा आणि चहा झाला. त्याच्या गच्चीवरून एका बाजूला झाडीच्या मागून उंच डोकावणारा कुतुबमिनार अगदी जवळून दिसतो आणि अगदी समोर आदमखान का मकबरा नावाचं अजून एक जुनं घुमटाकार बांधकाम दिसतं.

0511-2019-03269143312546965658.jpeg

आदमखान का मकबरा

0511-2019-03288963314528341273.jpeg

कुतुबमिनार

गच्चीवर बसून विकीबरोबर चांगल्या गप्पा झाल्या, त्याच्या फोटोंचं प्रसिद्ध झालेलं पुस्तक पाहिलं, त्याचे काही अनुभव ऐकले आणि त्याचे इतर काही प्रोजेक्ट्समधले फोटो नंतर त्याने त्याच्या लॅपटॉपवर दाखवले. वास्तव आणि त्या वास्तवाकडे पाहण्याचा आपल्याला अपेक्षित असलेला दृष्टिकोन मांडण्यासाठी फोटोग्राफीतल्या तंत्रांचा केलेला वापर कसा प्रभावी असतो ते पहायला मिळालं. उदा. एका कृष्णधवल फोटोत एक बेघर मुलगा प्लॅटफॉर्मवर बसला आहे आणि आजूबाजूला भराभर चालणार्या माणसांचे हलते पाय फक्त आपल्याला दिसतात. सगळे घाई्घाईने कुठेतरी चाललेत, पण या मुलाला जाण्यासारखी जागा नाही. दिङ्मूढ असल्यासारखा तो बसला आहे. त्याच्या नशिबी शहरातल्या माणसांचे फक्त पायच येतात. A picture is really worth a thousand words! असे कितीतरी फोटो पाहण्यात वेळ कसा गेला ते कळलंच नाही. रात्री साडेदहाची ट्रेन पकडायची होती. फारशी भूक खरं तर नव्हती पण विकीने जेवूनच जायचा आग्रह केला. त्याच्या स्वयंपाकाच्या बाईंनी साधा डाळ-भात-भाजीचा रुचकर स्वयंपाक केला होता. थोडंसं जेवलो आणि निघालो. एरवी आपण ज्या कहाण्या मुलाखतींमधून आणि पुस्तकांमधून, चार हात अंतरावरून ऐकतो तशी कहाणी प्रत्यक्ष जगलेल्या व्यक्तीशी झालेली ही भेट नक्कीच कायम लक्षात राहील.

पण खरा रोमहर्षक प्रसंग तर पुढेच घडला. Wink त्याच्या घरापासून पुरानी दिल्ली रेल्वे स्टेशन १५-१६ किमी होतं. दहा-पंचवीसची गाडी होती. आम्ही साडेआठला टॅक्सीने निघालो. साडेनऊपर्यंत आरामात पोचू असं सगळ्यांना ( गूगललाही!!) वाटलं होतं. पण कसलं काय! साधारण साडेनऊ वाजता स्टेशनपासून दीडेक किलोमीटरवर असताना प्रचंड ट्रॅफिकचा भाग लागला. एक अत्यंत अरुंद पूल, त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला तुंबलेली वाहनांची गर्दी आणि समोरून येणार्या वाहनांसाठीही जागा ठेवायची असते हे विसरण्याची आपली अखिल भारतीय मानसिकता. व्हायचं तेच झालं. पावणेदहापर्यंत आम्ही तिथेच. ड्रायव्हर म्हणत होता, एकदा हा एवढा पूल पार केला की पुढे वेळ लागणार नाही. पुढच्या पंधरा मिनिटांत जेमतेम पूल पार केला. तरीही गती मुंगीचीच. टॅक्सीतून उतरून पायी जावं म्हटलं तर अक्षरशः गाडीचं दार उघडण्याइतकीही जागा नव्हती. रस्त्यावरून चालायलाही जागा नव्हती. आमचा धीर सुटायला लागला होता. शेवटी थोडी मोकळी जागा आल्यावर निर्णय घेतला. ड्रायव्हरला पैसे दिले, सामान घेऊन खाली उतरलो आणि स्टेशनच्या दिशेने भराभर चालायला लागलो. स्टेशन अजूनही सातशे-आठशे मीटरवर होतं. १०. २५ च्या गाडीसाठी सव्वादहा वाजून गेल्यावर आम्ही धापा टाकत स्टेशनवर पोचलो. आणि तिथे पोचल्यावर कळलं की आमचा फलाट बरोब्बर विरुद्ध दिशेला आहे!! आमच्या गाडीचा प्लॅटफॉर्म होता १६ नंबरचा, म्हणजे शेवटचा आणि आम्ही पोचलो होतो १ नंबरवर. इतका वेळ आमची आशा जिवंत होती, पण आता मात्र आपल्याला गाडी मिळणं शक्य नाही असं वाटायला लागलं कारण सामानासकट जिने चढून शेवटच्या प्लॅटफॉर्मपर्यंत इतक्या कमी वेळात पोचणं शक्यच नव्हतं. पण आमचं नशीब जोरदार असल्यामुळे स्टेशनवर ज्या इलेक्ट्रिक गाड्या असतात त्यातली एक समोर आली आणि त्या गाडीवाल्याने पन्नास-पन्नास रुपये घेऊन आम्हाला पाच मिनिटात बरोब्बर आमच्या डब्यासमोर नेऊन सोडलं. त्याला अतिशय मनापासून धन्यवाद देऊन सामान घेऊन आमच्या सीटवर जाऊन बसलो आणि घड्याळात पाहिलं तर १०.२३ झाले होते! Happy

२ तारखेला सकाळी १० वाजता डेहराडूनला पोचलो. जिथे भेटायचं ठरलं होतं त्या आंगन या रेस्टॉरंटला जाऊन थांबलो. किका आणि इतर मंडळी दीडच्या सुमारास येऊन पोचली. किरण पुरंदरे हे नाव एक पक्षीतज्ज्ञ म्हणून आणि लेखक म्हणून गेली अनेक वर्षे परिचित असलं तरी त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट आत्ताच प्रथम झाली. किकांसकट आम्ही एकूण आठजण होतो. किकांची ही चक्राताला विसावी भेट होती. बाकी सगळे पहिल्यांदाच येत होते. एकमेकांशी ओळख, थोड्याफार गप्पा झाल्या. जेवणही झालं आणि लगेचच दोन गाड्यांमधून आम्ही चक्राताकडे निघालो. याच दोन गाड्या पुढे कायम आमच्यासाठी होत्या. किका आमच्याच गाडीत होते. चक्राताला पोचेपर्यंत त्यांचा उत्साही, दिलखुलास स्वभाव आणि अनुभव, किस्से सांगण्याची हातोटी लक्षात आली आणि आपले पुढचे चारपाच दिवस मस्त जाणार आहेत याची खात्री झाली. वाटेत यमुना नदीवरच्या एका पुलाजवळ उतरून दहा-पंधरा मिनिटांचा ब्रेक घेतला आणि पुढे निघालो.

0511-2019-03257563311388269350.jpeg

यमुना ब्रिज

0511-2019-03280653313697885427.jpeg

चक्राताच्या वाटेवर

सगळा वळणावळणांचा आणि चढाचा रस्ता. आम्ही जिथे राहणार होतो ते हॉटेल मुख्य चक्राता गावापासूनही अजून थोडं पुढे आहे. तिथे पोचलो तेव्हा चांगलाच काळोख पडला होता. गाडीतून उतरल्याबरोबर तीव्र थंडीची जाणीव झाली. कधी एकदा खोलीमध्ये जातो असं झालं. आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन सामान ठेवून थोडंफार स्थिरस्थावर होतोय न होतोय तोच बाहेरून किकांनी सगळ्यांना हाका मारल्या. एका विशिष्ट प्रकारच्या घुबडाचा (mountain scops owl) आवाज येत होता, तो आम्हाला ऐकवण्यासाठी. सगळेच बाहेर आले. तो आवाज ऐकला, रेकॉर्डही केला. किकांनी हुबेहूब त्या घुबडासारखीच शीळ घातली आणि त्या शिळेला प्रतिसाद देत देत ते घुबड जवळ जवळ आलं. ( किकांना सत्तरएक पक्ष्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करता येते.) आधी त्याचा आवाज लांबच्या डोंगरातून येत होता, पण नंतर अगदी जवळून यायला लागला. चांगली टॉर्च असती तर कदाचित ते आम्हाला दिसलंही असतं. पण तेव्हा आवाजावरच समाधान मानून शेवटी जेवायला गेलो. प्रवासाचा शीणही होताच त्यामुळे लवकरच झोपलोही.

त्यानंतर चारपाच दिवस आमचा दिनक्रम साधारणपणे एकाच प्रकारचा होता. पहाटे साडेपाच-सहाला उठून बाहेर यायचो. हॉटेलच्या सज्जातूनच भरपूर प्रकारचे भरपूर पक्षी दिसतात. red-billed blue magpie, black-headed jay, blue whistling thrush (शीळकरी कस्तुर), great barbet (थोर तांबट किंवा पहाडी तांबट) , grey treepie (टकाचोर) हे पक्षी तिथे अगदी भरपूर दिसले. ते बघायचो, फोटो काढायचो. एकीकडे गरमागरम मसाला चहाचा आनंद घ्यायचा. किकांबरोबर चालत जवळपास एखादी चक्कर मारायची. साधारण साडेआठला भरपेट नाश्ता करायचा, आवरून साडेनऊपर्यंत गाड्यांमध्ये बसून बाहेर पडायचं. रोज वेगवेगळी ठिकाणं आणि तिथले पक्षी, तिथला निसर्ग बघितला. दुपारचं जेवण सोबत घेतलेलं असायचं. संध्याकाळी ६ च्या सुमारास परत यायचो.

0511-2019-03226873248319583116.jpeg

पहाडी तांबट

0511-2019-03260893311721184196.jpeg

black-headed jay

0511-2019-03266413312273564042.jpeg

शीळकरी कस्तुर

0511-2019-03271923312824694273.jpeg

red-billed blue magpie

0511-2019-03286383314270528658.jpeg

हॉटेलच्या समोरचा परिसर

तिथले अरुंद रस्ते आणि तिथले कुशल ड्रायव्हर्स हा एक स्वतंत्रच विषय होईल. आमचे दोन्ही ड्रायव्हर्स अतिशय चांगले होतेच, पण वाटेत इतरही कुठलीच स्थानिक गाडी आक्रमक किंवा धोकादायक पद्धतीने चालताना दिसली नाही. पहिल्या दिवशी कोटी कनासर या ठिकाणी जाताना वाटेत रस्त्यावर काही काम चालू होतं. त्या तशा अरुंद रस्त्यावर एक कॊंक्रीट मिक्सर, एक बुलडोझर आणि काही माणसं काम करत होती. एवढी मोठी वाहनं अगदी रस्त्याच्या कडेपर्यंत नेऊन मागेपुढे करताना बघून पोटात गोळाच आला. खाली खोल दरी. पण हा सगळा सवयीचा भाग असतो हेच खरं. ते सगळे अगदी सहज रस्त्याच्या खाली उतरूनसुद्धा काम करत होते. त्या भागात हिवाळ्यात भरपूर बर्फ पडतो. रस्ते बंद होतात. घरात सगळं वाणसामान आधीच भरून ठेवावं लागतं. बर्फ नसतो तेव्हाही इतर अडचणी असतातच. दरडी कोसळतात, रस्ते बंद होतात. पण तरी एकंदरीत तिथे सगळीच माणसं हसतमुख होती. आमच्या हॊटेलचा स्टाफ़, वाटेतल्या चहाच्या टपरीवर दिसलेली माणसं, आम्ही ज्या गावांमधून गेलो तिथली माणसं, सगळीच आतिथ्यशील आणि आनंदी होती.

0511-2019-03263243311956136581.jpeg

झाडावरचा अक्रोड

0511-2019-03274893313122030966.jpeg

अक्रोडाचा आतला भाग. साधारणपणे जायफळासारखी रचना असते.

कोटी कनासर या जागी महादेवाचं एक छोटंसं घुमटीवजा देऊळ आहे. जुने, प्रचंड देवदाराचे वृक्ष आहेत. गवताळ मैदानही आहे. तिथे दुपारचं जेवण करून आम्ही तिथे पलीकडे असलेल्या मंगटाड या गावी चालत गेलो. थोडा चढ, बराच उतार असलेली ही डोंगरातली वाट होती. वाटेने जाताना पक्षी, पानं, फुलं, झाडं, वेली सगळ्याचाच आनंद घेत रमतगमत गेलो. एकूणच किकांची हीच पद्धत दिसली. खूप घाई घाई करायची नाही, पक्ष्यांबरोबरच इतर काहीही रोचक दिसलं तरी त्याचंही निरीक्षण करायचं. त्यामुळे फार दमछाक न होता चालण्याचा आनंद मिळाला. चढउताराचा रस्ता असेल तर ज्यांना चालणं शक्य नाही ते मेंबर्स गाडीजवळच थांबून रहात होते. गावाजवळ गेल्यावर सफरचंदाची झाडं, मटार, मोहरी, मुळा, पालेभाज्यांची शेती दिसली.

0511-2019-03291303314762561273.jpeg

वाटेत भेटलेली लहान लहान शाळकरी मुलं आम्हाला चक्क वाकून नमस्कार करत होती. आम्हाला खूपच संकोच वाटला, पण तशी त्यांची पद्धत असणार. बाकी तिथल्या सगळीकडच्याच माणसांना छान हात जोडून नमस्कार करायची सवय आहे. गावातल्या बायकांशी थोड्या गप्पा मारल्या. एक जवळजवळ शंभरीला पोचलेली आजी होती. तिला विचारून तिचा एक फोटोही काढला.

0511-2019-03283283313960247273.jpeg

जौन्सारी ही तिथली स्थानिक भाषा आहे. अर्थात हिंदीही बहुतेक सगळ्यांना येतंच. एका घरात जाऊन थोडा वेळ बसलो. थंडी आत जास्त येऊ नये म्हणून असेल कदाचित, पण घरांची दारं खूपच ठेंगणी असतात. वाकूनच आत जायला लागतं. घरांच्या बांधकामात लाकडाचा भरपूर वापर केलेला असतो. याच गावात असं नाही, तर इतर गावांमध्ये, चहाच्या टपर्यांवरसुद्धा खटकलेली एकच गोष्ट म्हणजे माश्या. थंड प्रदेशात इतक्या माश्या म्हणजे आश्चर्यच आहे. पण स्वच्छता फार चांगली नसल्यामुळे त्या येत असणार. थोडा वेळ गावात घालवून मग आल्या वाटेने परत फिरलो. गाड्यांमध्ये बसून हॊटेलवर परत आलो. गरम चहा तयार होताच. खरं म्हणजे एरवी घरी रोज २ कपच चहा होतो. पण इथे सकाळी एक, नाश्त्याबरोबर एक, जाताना वाटेत एक, येताना वाटेत एक, आल्यावर एक असे अनेक कप चहा पोटात जात होता आणि तरीही कुठल्याच कपाला ’ नाही’ म्हणावंसं वाटत नव्हतं अशी थंडी होती.

0511-2019-03277963313428249504.jpeg

भाग दुसरा
https://www.maayboli.com/node/72240

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह वावे वाह !
नितांत सुंदर अनुभव, शब्द आणि फोटोही

हर्पेन +१११११ ( हर्पेनने मनातले लिहील्याने जास्त लिहीले नाही, पण फोटो बघुन मनाला शांत वाटले हे तितकेच खरे )

भन्नाट लेखन, मस्तच
किरण पुरंदरे म्हणजे अफलातून .....
फोटोसुद्धा एकसो एक
पुढील लेखाच्या प्रतीक्षेत

मस्त लेख! उत्तम फोटो!
पहिला भाग अगदी छानच झालाय. फोटो मात्र अजुन हवेत. Happy
पुढच्या भागात तुम्हाला आवडलेले फोटो द्याच पण तुम्हाला न आवडलेले फोटोही द्या.
पु.भा.प्र.

सर्व प्रतिसादकांना मनापासून धन्यवाद!
पुढचे भाग लगेचच टाकणार आहे. जवळजवळ सगळं लिहून झालेलंच आहे. फोटो निवडायचे आहेत. शाली, जास्त फोटो टाकते पुढच्या भागात Happy

मस्त फोटो, मस्त लेख. पण आता मायबोलीवरची ही प्रवासवर्णनं वाचू नयेत असं वाटू लागलं आहे. कारण ह्या सगळ्याच ठिकाणी जावंसं वाटायला लागतं मग. ते तर शक्य नाही. मग मरताना उगाच मनात राहिलं तर त्यापायी पुन्हा जन्म घ्यावा लागेल की Proud

एक चांगला अनुभव फोटोंसह पोहोचवलात, धन्यवाद.
" ( किकांना सत्तरएक पक्ष्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करता येते.) " - - ऐकलेत. मजा येते.

srd, नुसते आवाज ऐकायला तर मजा येतेच, पण जेव्हा तो पक्षी किकांनी काढलेल्या आवाजाला प्रतिसाद देऊ लागतो, तेव्हा जास्त मजा येते. एकदा चहाच्या टपरीजवळ कोंबड्या चरत होत्या. किकांनी गंमत म्हणून कोंबडा आरवतो तसा आवाज काढला. तर त्या कोंबड्या चमकून इकडेतिकडे बघायला लागल्या Lol
ॲमी, धन्यवाद! विकी रॉयची डॉ आनंद नाडकर्णींंनी घेतलेली मुलाखत यूट्यूबवर उपलब्ध आहे.

October हा सिझन बरा? तिकडे हॉटेल्स रेट कमी केव्हा असतात? कोणतेही बुकिंग न करता जायचे झाल्यास डेहराडून परिसर? कारण तिकडे शाळा फार आहेत ना?

Srd, ऑक्टोबर- नोव्हेंबर- डिसेंबरचा पहिला पंधरवडा. कारण नंतर बर्फ पडायला सुरुवात होते. नंतर मग मार्च एप्रिल.
हॉटेल रेट्सची कल्पना नाही कधी कमी असतात ते.
तिकडे शाळा फार आहेत ना म्हणजे काय? मला कळलं नाही.

मस्त आहे डेहराडुन साईड, हिमाचल, नॉर्थ इस्ट Happy

हे सगळे एकाच ठिकाणी हवे असेल तर भुतान बेस्ट आहे.

लॅमरगियर लै भारी!!

तिकडे शाळा फार आहेत ना
म्हणजे पाचगणीसारख्या शाळा. मुलांच्या पालकांची गर्दी वगैरे.
पक्षी पाहायचे आहेत. हॉटेल्सचा ओफ सिजन हवाय.

अच्छा, Srd, आलं लक्षात Happy
चक्राता तसं डेहराडूनपासून बरंच लांब आहे. मुलांच्या पालकांची वगैरे गर्दी तिथे होत असेल असं मला तरी वाटत नाही. पक्षीनिरीक्षण, निसर्ग निरीक्षण, वनस्पतींंचा, फुलपाखरांचा अभ्यास किंवा चार दिवस नुसते निवांत घालवणे अशा कारणांनी तिथे जाणारे पर्यटक जास्त प्रमाणात असतील असं मला वाटतं.
ऑफ सीझन इज ऑफ फॉर अ रीझन Wink असं मला वाटतं. म्हणजे रस्त्यावर बर्फ पडलेला असल्यामुळे आपण तिथे जाऊन जर कुठे फिरू शकणार नसलो तर काय उपयोग?

रॉनी, कांदापोहे, प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

शेवटून वाचायला सुरू केली लेखमाला आणि आत्ता संपवली...खूप मस्त आलेत फोटो आणि वर्णन पण अगदी चित्रदर्शी....मजा आली...