देव कसा आहे आणि तो का आहे?

Submitted by मी सुंदर आहे. on 22 October, 2019 - 12:22

गावाबाहेरच्या देवळात साधू बाबा येतात. लोक आम्हाला उपदेश करा, सत्संग करा असा आग्रह करतात. तेव्हा साधूबाबा प्रवचनाची वेळ देतात. दिलेल्या वेळेला गावकरी जमतात. बाबा म्हणतात देव आहे असं किती लोकांना वाटतं? जवळपास निम्मे लोक हात वर करतात.
साधूबाबा म्हणतात म्हणजे बाकीच्या लोकांना देव नाही असं वाटतं तर.‌ मग एक काम करा, ज्यांना देव आहे असं वाटतं त्यांनी देव नाही असं वाटणाऱ्यांना देव आहे हे पटवून द्या. व बाकीच्यांनी देव कसा नाही हे आहे वाल्यांना पटवून द्या. मी चाललो. कारण आता माझी गरज नाही.
मला सुद्धा देव आहे की नाही या प्रश्नानं खूप छळले आहे. हिंदू धर्मातील तत्त्वज्ञाना प्रमाणे देव आहे व चौऱ्यांशी लक्ष योनी फिरुन झाल्यावर मानवी जन्म मिळतो, फक्त मानवी जीवनात योग्य आचरणातून मोक्ष मिळून देवपदाला पोचता येते.
आता विज्ञानाच्या अंगाने विचार केला तर पृथ्वी वर अगोदर एक पेशीय सजीव तयार झाले, पुढे पुढे उत्क्रांती होत निसर्गाच्या अनुकुलनातून वेगवेगळ्या प्रकारचे जीव तयार झाले. हजारो किलोमीटर दूर असलेल्या, वेगवेगळ्या भाषा, रंग, रुप, आहारविहार असलेल्या अनेक समुहांमध्ये देव सुध्दा वेगवेगळ्या रुपात हजर होता व आहे. काहींचा देव मनुष्य रुपात, काहींचा पशु, पक्षी, दगड, वृक्ष, पर्वत, पाणी, सूर्य अशा वेगवेगळ्या वस्तूत, रुपकांत आहे. तर काही लोकांचा देव अदृष्य आहे. तो सर्वशक्तिमान आहे असं एकमत आहे.
देव जणू मायबोलीचा अॅडमिन आहे. समोर येत नाही, दिसत नाही पण आहे.
देव कनवाळू कैवारी असल्याचा संतांनी दावा केला आहे पण इथं मर्त्यलोकात कैक लोक अर्धपोटी, उपाशी राहतात. आजाराने ग्रस्त, अभावाने गांजलेले, परिस्थिती मुळे रंजलेले लाखो जीव आहेत. मग देवाला त्यांची दया का येत नाही. निदान त्याला मानणाऱ्या, पुजणाऱ्या लोकांना संकटातून, पुरातून, आगीतून, दुष्काळातून का वाचवित नाही?
डॉ. श्रीराम लागू यांच्या विचारांनुसार देवाला हद्दपार केले पाहिजे का? देव हा माणसा माणसात भांडणं लावतोय असे मला वाटते. देव ही कल्पना आहे. समुहाच्या अंतर्मनातील देव आहे हा विश्वास एखाद्या तरंगाप्रमाणं कार्य करीत असावा व त्या विश्वास रुपी बलालाच देव समजलं जात असावे असे वाटते.
विषय खूप मोठा आहे. पुर्ण विषयाला हात घालणं माझ्या आवाक्याबाहेर आहे. तेव्हा आपल्या जाणीवा, अनुभव यांतून आपण देवाला मानता किंवा मानत नाही, देव आहे की नाही हे जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चावून चोथा झालेला बोअर विषय आहे , इथेही खूप लोक प्रतिसाद देतील असं वाटत नाही ... खालच्या लिंक्स मधल्या चर्चा पहा ,बघा त्यातून काही उत्तरं मिळतात का तुमच्या प्रश्नांची ...

तुम्ही कोण म्हणून काय पुसता ?... तुम्ही असा... आस्तिक?... नास्तिक? ...??? :
https://misalpav.com/comment/600306

देव कोण आहे? :
https://www.misalpav.com/node/3279

देव आहे का नाही...वाद कशाला? स्वतःच पडताळून पाहा आणि ठरवा :

https://www.misalpav.com/node/42094

देव अन माणूस : https://www.misalpav.com/node/34519

देव जरी मज... : https://www.misalpav.com/node/16593

देव,धर्मादी संकल्पना- एंटरटेनमेंट विथ लाईफटाईम वॅलिडीटी: https://www.maayboli.com/node/64720

व्यक्ति तितक्या देव : https://www.maayboli.com/node/20521

चांगला विषय आहे. आधी चर्चा झाल्या म्हणून काय झाले.. अजून होऊ शकतात. नवे लोक... नवे विचार.

लबाडजी, पुढे जाण्याआधी एक प्रश्न विचारू का?

गावाबाहेरच्या देवळात साधू बाबा येतात. लोक आम्हाला उपदेश करा, सत्संग करा असा आग्रह करतात. तेव्हा साधूबाबा प्रवचनाची वेळ देतात. दिलेल्या वेळेला गावकरी जमतात. बाबा म्हणतात देव आहे असं किती लोकांना वाटतं? जवळपास निम्मे लोक हात वर करतात.
साधूबाबा म्हणतात म्हणजे बाकीच्या लोकांना देव नाही असं वाटतं तर.‌ मग एक काम करा, ज्यांना देव आहे असं वाटतं त्यांनी देव नाही असं वाटणाऱ्यांना देव आहे हे पटवून द्या. व बाकीच्यांनी देव कसा नाही हे आहे वाल्यांना पटवून द्या. >> ज्यांना देव नाही असं वाटतं ते देवळात का येतील?

देव आहे की नाही ते माहीत नाही. असला तर काय घ्या अशा भीतीतुन , अर्थात टु बी ऑन सेफर साईड - नामस्मरण करते. LOL
अजुन एक - स्तोत्र वाचल्याने फार शांत वाटते परंतु त्यामागे शास्त्रिय कारणे आहेत जसे हार्ट्बीट मंदावतात, विचार कमी होतात, शब्दांमुळे, एकाग्रता होते.
________________
बाकी देव असला तरी कुचकामी आहे. आपल्यावर संकट येउ देतो, ढिम्म बसतो. अशा देवाचा उपयोगच काय? Sad
____________
अजुन एक जाणवलेली गोष्ट म्हणजे - क्वचित अचानक देव आहे असे वाटलेले आहे पण ते अगदी ओझरते असते म्हणजे तो/ती डायरेक्ट प्रचीती देत नाही पण क्वचित सुचवुन जाते - मी बघते/बघतो आहे बरं कं, लक्ष आहे माझं. ते प्रसंग सांगण्याइतके महत्वपूर्ण नाहीत पण माझ्यापुरते महत्वाचे वाटलेले आहेत.
______________________
उदाहरणं च द्यायची झाली तर -
(१) गुरुद्वारामध्ये जाण्याच्या आदल्या दिवशी पडलेले सुंदर निळ्या , स्वच्छ जलाशयाचे स्वप्न.
(२) एकदा ऑफिसात, फार उदास वाटत असताना, अचानक स्क्रीन बॅक्ग्राऊंडवरती उमटलेला तळ्याकाठचा देखावा आणि शब्द - Here you find grace and tranquility
हे अगदी साधे प्रसंग आहेत पण मला वाटत आलेले आहे की ते प्रसंग माझी श्रद्धा वाढविण्याकरता, पेरलेले आहेत.

कैक लोक अर्धपोटी, उपाशी राहतात. आजाराने ग्रस्त, अभावाने गांजलेले, परिस्थिती मुळे रंजलेले लाखो जीव आहेत. मग देवाला त्यांची दया का येत नाही. >>>
लोक झाडं कापतात, शेतीच्या नावाखाली पीक वाढवून ते कचाकचा कापतात, कोंबड्या, बकरे कापतात, मासे पकडतात केमिकल वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन वापरून झुरळ, मुंग्या, डास यांच्या कॉलोनीज उडवतात तेव्हा तरी देवाला दया कुठं येते?

काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एकाने भगतसिंगांची आपण नास्तिक असण्याची कारणं , त्यामागची भूमिका शेअर केली होती ... त्या लेखाला जे उत्तर दिलं ते इथे लिहित आहे साधारण .

भगतसिंगांचा तो सात - आठ पानांचा लेख पीडीएफ स्वरूपात बराच काळ इंटरनेटवर उपलब्ध आहे . त्यात त्यांनी आपण सुरुवातीला कसे पूर्ण भाविक होतो , आपले वडील आस्तिक असून आपल्यावरही त्यांनी तसेच संस्कार केले होते , पुढे क्रांतीकार्यात पडल्यावर आपले वेगवेगळ्या नेत्यांशी संबंध येत गेले , त्यातले बहुतेक आस्तिक होते तर मोजके कट्टर नास्तिक होते , त्यांच्या वेगवेगळ्या प्रभावामुळे आपल्या मतांमध्ये कशी हळूहळू लवचिकता येत गेली म्हणजे देवाचं अस्तित्व पूर्ण नाकारेपर्यंत तयारी झाली नव्हती पण आंधळ्या विश्वासाऐवजी का , कशासाठी , कशामुळे असे प्रश्न पडू लागले होते .... पुढे दुसऱ्यांचं अनुकरण करण्यात काही अर्थ नाही आपली स्वतःची निश्चित अशी ठाम भूमिका हवी असा विचार करून त्यासाठी अनेक ग्रंथांचं वाचन केलं ... लेनिन , ट्रॉट्स्की , जगातील क्रांतींचा त्यांचे नेते यांचा इतिहास सांगणारी पुस्तकं .... लवकरच देव वगैरे सर्व अज्ञानी लोकांना आपल्या वर्चस्वाखाली ठेवण्यासाठी धर्ममार्तंडांनी / समाजातील एका विशिष्ट चलाख गटाने विकसित केलेलं खोटं तत्वज्ञान आहे अशी त्यांची विचारसरणी बनली .

हा दृष्टीकोन काही नवीन नाही ... अनेक नास्तिकांचा हा दृष्टीकोन असतो ... पण भगतसिंगांनी विचारलेल्या एका प्रश्नाने मला अस्वस्थ केलं आणि विचार करायला भाग पाडलं .

त्यांनी विचारलं आहे ,

""तुमच्या श्रद्धेनुसार जर ही पृथ्वी किंवा हे विश्व त्या सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान अशा विधात्याने निर्माण केले असेल; तर त्याने मुळात हे सर्व का निर्माण केले, हे मला कृपया सांगाल काय? दैन्य आणि यातनांनी भरलेले हे जग, लाखो शोकान्तिकांची ही सतत बदलती पण चिरंतन गुंफण, ज्यात एकही प्राणिमात्र सर्वार्थाने समाधानी नाही, हे सर्व त्याने का निर्माण केले?

कृपा करून हाच त्याचा कायदा आहे असे म्हणू नका. जर तो नियमांनी व कायद्यांनी बांधलेला असेल तर तो सर्वशक्तिमान नाही, तो आपल्यासारखाच गुलाम आहे. कृपा करून ही त्याची लीला आहे, व यात त्याला आनंद मिळतो, असे म्हणू नका. नीरोने फक्त एक रोम जाळले, त्याने तशी अगदी थोडीच माणसे मारली. त्याने फारच थोड्या शोकान्तिका निर्माण केल्या. त्याने हे सर्व केले ते त्याच्या आनंदोपभोगासाठी. पण इतिहासात त्याचे स्थान काय आहे? इतिहासकार त्याचा कोणत्या नावाने उल्लेख करतात? सगळ्या जहरी विशेषणांचा त्याच्यावर वर्षाव होत असतो. जुलुमी, हृदयशून्य, विकृत व दुष्ट नीरोचा निषेध करून त्याची निंदा करणाऱ्या लिखाणाने पानेच्या पाने भरली गेली आहेत. स्वत:च्या सुखासाठी काही हजारोंचे प्राण घेणारा एक चंगेजखान होता, व आपण त्याच्या नावाचादेखील तिरस्कार करतो. तर मग प्रत्येक दिवशी, प्रत्येक घटकेला, प्रत्येक क्षणाला असंख्य शोकान्तिका घडवत आलेल्या व अजूनही घडवत असलेल्या तुमच्या अनादी अनंत नीरोचे-त्या सर्वशक्तिमान ईश्वराचे – समर्थन तुम्ही कसे करणार आहात? प्रत्येक क्षणी चेंगिजखानालाही मागे टाकणाऱ्या त्याच्या दुष्कृत्यांची तुम्ही कशी काय पाठराखण करणार आहात?

मी विचारतो, खरोखरच नरक असणाऱे, चिरंतनपणे असंतोषाने धगधगणारे हे जग त्याने निर्माणच का केले? अशी सृष्टी निर्माण न करण्याचे सामर्थ्य जर त्याच्यापाशी होते तर त्याने मनुष्याची ही सृष्टी निर्माणच कां केली? या सगळ्याचे काय औचित्य आहे? काय म्हणालात? यातना भोगणाऱ्या निष्पाप माणसांना पुढे बक्षीस देण्यासाठी, आणि पापी लोकांना पुढे शिक्षा करण्यासाठी त्याने हे सर्व निर्माण केले. वा, वा! तर मग एक सांगा, नंतर एक मुलायम, सुखकारक मलम चोळायचे म्हणून जर एखाद्या माणसाने तुमच्या अंगावर असंख्य जखमा केल्या तर तुम्ही त्याचे कोठवर समर्थन करणार आहात? भुकेल्या, चवताळलेल्या सिंहापुढे माणसे फेकायची आणि त्या हिंस्त्र पशूच्या तावडीतून, मृत्यूपासून जर ते वाचलेच तर त्यांची काळजी घ्यायची व शुश्रूषा करायची, असा खेळ करणारेरोममधील ग्लॅडिएटर संस्थेच्या पाठिराख्यांचे हे आचरण कुठवर समर्थनीय होते? आणि म्हणून मी विचारतो, ‘त्या जाणत्या सर्वोच्च विधात्याने हे जग आणि त्यातला हा मानव का निर्माण केला? स्वतःच्या मौजेसाठी? तर मग नीरो आणि तो विधाता यात फरक काय?"""
.
.
.
.

हा असा प्रश्न आहे जो माझ्यामते बहुतेक सगळ्या संवेदनशील आस्तिक माणसांच्या मनातही किमान एकदातरी येऊन गेला असेल .... नास्तिकांबद्दल इथे बोलत नाहीये ... त्यांचा देवाच्या अस्तित्वावर विश्वासच नाही त्यामुळे त्यांना असा प्रश्न पडायचं काही कारण नाही ... वैयक्तीकदृष्ट्या मलातरी या प्रश्नाने खूप अस्वस्थ केलं होतं .

यावर विचार करून जो काही निष्कर्ष काढला तोच 100 % बरोबर आहे असा दावा अजिबात करायचा नाही ... माझं चुकलेलंही असू शकतं ... फक्त मी माझ्यापुरतं जे उत्तर शोधलं आहे त्यामागची कारणीमीमांसा कुणातरी आस्तिक व्यक्तीला सांगावी , त्यांचं त्याबद्दलचं मत जाणून घ्यावं असं वाटलं म्हणून इथे लिहित आहे .

या लेखातील अनेक मतं नास्तिकच काय अस्तिकांनाही आवडणार नाहीत असा माझा अंदाज आहे ... पण एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते - हे माझं मतच अंतिम सत्य आहे असा दावा करण्याची माझी इच्छा नाही , माझं चूकही असेल .... उदाहरणार्थ " अमुक गोष्ट ही पाप या सदरात मोडते असं मला वाटतं " म्हटल्यावर कुणी आक्रमक पवित्रा घेऊ नये अशी माझी इच्छा आहे ... कुणाला दोषी ठरवण्याचा माझा प्रयत्न नाही , किंवा मला तसा काही अधिकारही अजिबात नाही . फक्त जर परमेश्वर अस्तित्वात आहे तर जगात एवढं दुःख का या पडलेल्या प्रश्नाला उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात मी माझ्या अल्पबुद्धीनुसार स्वतःपुरते काढलेले हे निष्कर्ष आहेत .... फिलॉसॉफी किंवा धर्म यामधली मी तज्ज्ञ नाही त्यामुळे अनेक गोष्टी चुकलेल्या असू शकतात ...

असं धरून चाला की आपल्यासमोर 2 ऑप्शन्स आहेत - १ . पृथ्वीची आणि त्यानंतर सगळ्या प्राण्यांची निर्मिती ही या अफाट विश्वातली एक नैसर्गिक घटना आहे , त्याला कोणताही उद्देश वगैरे काही नाही ... ओघानेच आलं की कोणीही निर्माता अस्तित्वात नाही ... थोडक्यात वैज्ञानिक वगैरे लोकांचा दृष्टीकोन . हा दृष्टीकोन स्वीकारला तर आपण सगळे आत्मे वगैरे नसून मेंदूमधील काही रासायनिक / न्यूरोलॉजिकल जोडण्या आहोत आणखी काही नाही ... एकदा जीवनज्योत मावळली की या जोडण्यांतली धुगधुगी विझून जाते आणि आपण या विश्वपटावरून डिलीट होतो . त्यानंतर कुठल्याही स्वरूपात आपलं अस्तित्व उरत नाही सो पुनर्जन्म वगैरे भानगडी नाहीत .

जर हा दृष्टीकोन स्वीकारायचा ठरवलात तर जगणं खूप सोपं होईल कदाचित ... हवं तसं जगा , कर्मफळांची किंवा शिक्षेची काही भीती नाही ... एकदा नास्तिक बनलं की असे प्रश्न , शंका सतावणार नाहीत .

२ . दुसरा दृष्टीकोन म्हणजे कोणीतरी निर्माता आहे ज्याने हे विश्व , पृथ्वीवरच्या प्राणीजाती आणि मानवजात निर्माण केली आहे . आपण म्हणजे मेंदूतल्या ठराविक जोडण्यांव्यतिरिक्त अधिक काहीतरी आहोत आणि शरीराच्या मृत्यूनंतरही वेगळ्या स्वरूपात आपलं अस्तित्व राहतं ते पूर्ण नष्ट होत नाही ... मग पुनर्जन्म किंवा मरणोत्तर जीवन या गोष्टी आल्या .

पहिला दृष्टीकोन स्वीकारलात तर काही प्रॉब्लेमच नाही ...एकदा मृत्यू झाला की सगळं संपलं , फुलस्टॉप . पण जर दुसरी शक्यता खरी असण्याची शक्यता 10 % जरी धरून चालली म्हणजेच निर्माता / देव , कर्मफल , पुनर्जन्म ,मुक्ती वगैरे तर त्याबाबत आपल्याला काही करण्यासारखं असेल तर आताच शरीर धडधाकट असताना , संसारात गुंतले असताना वेळ आहे... वृद्धापकाळी , मरणासन्न अवस्थेत जगाशी ऍक्टिव्ह देवाणघेवाण थांबल्यानंतर काहीतरी करायला हवं होतं असं वाटून उपयोग नाही ...

मृत्यूनंतर मुक्ती मिळेल याची काही हमी नाही त्यामुळे जिवंत असतानाच मुक्त होणं गरजेचं आहे . इंग्रजीत एनलाईटमेंट म्हणतात ते .. आपल्याला स्वतःला जिवंतपणीच कळायला हवं - की मी आता मुक्त झालेलो आहे . यासाठी उपासना , नामस्मरण , भजन , कीर्तन हा एकमेव मार्ग आहे असं कुठेच म्हटलेलं नाही . भजन कीर्तनात प्रत्येकालाच गोडी असणार नाही , ज्ञानयोग , हठयोग वगैरेही सगळ्यांना शक्य होणार नाही .. पण कर्म तर हरेकाला करावंच लागतं ... त्यातच थोडासा बदल करून कर्मयोग सहज शक्य आहे .

भरपूर मार्ग आहेत ... त्यातला एक किंवा काही मार्गांचं कॉम्बिनेशन करून आचरणात आणून पाहणं गरजेचं आहे .. कोणताही रिजल्ट न मिळता आयुष्यभर एकाच मार्गावर चालणं हा तर शुद्ध अव्यावहारिकपणा होईल , त्याचा अर्थ मार्ग चुकला असा होईल .... एक टाईम फ्रेम निश्चित करावी , 1 वर्ष किंवा 5 वर्षे . ह्या काळात मी हे - हे प्रयत्न करणार आहे , जर भौतिक जगापालिकडे देव वगैरे काही असेल तर 5 वर्षात जरासा तरी अनुभव येईल ... दरवाजा आहे असं गृहीत धरलं तर 5 वर्षात दार जरातरी किलकिलं होईल ( जर खरोखरच योग्य प्रयत्न केले तर ) हे अनुभव मनाने निर्माण केलेले काल्पनिक असता नयेत ... तर असा अनुभव ज्याची सत्यता आपल्याला 100 % पटेल ...

देव आहे याचा काय पुरावा ? या प्रश्नाचं उत्तर वैज्ञानिक देऊ शकणार नाहीयेत ... आहे की नाही हे ज्याचं त्यालाच शोधून काढायचं आहे किंवा आपल्यापुरतं ठरवायचं आहे . " नाही आहे असं ठरवा आणि चिंतारहीत जीवन जगा "

पण आहे असं जर तुम्ही ठरवलंत किंवा आहे असं जर तुम्ही मानत असाल / थोडक्यात तुम्ही स्वतःला आस्तिक म्हणवता , नास्तिकांशी कडाडून वाद घालता ; तर त्याचा शोध घ्यावा , त्याला अनुभवावं , त्याच्याशी एकरूप व्हावं असं तुम्हाला वाटत नाही का ? देवाचा उपयोग फक्त तुम्हाला , तुमच्या कुटुंबाला सुरक्षित आणि सुखात ठेवण्यापुरता ...

बरं ठीक आहे , नाही वाटत बहुतेकांना देवाचा शोध घ्यावा , त्याला समोरासमोर पाहावं . पण जर असा निर्माता आहे हे तुम्ही मानत आहात तर निदान तो कसा असेल , त्याला कसं वागलेलं आवडेल कसं वागलेलं आवडणार नाही याचा तरी तुम्ही कधी विचार करता का ? तसं बनायचा आयुष्यात प्रयत्न करता का ? तुम्ही म्हणजे तुम्ही असं म्हणत नाही .... बहुसंख्य लोक जे स्वतःला आस्तिक म्हणवतात ...

सत्य , अहिंसा , दया , करुणा हे देवाला प्रिय गुण आहेत असं सांगितलं तर कोणीही आस्तिक नाही म्हणणार नाही , पण तुम्ही करत असलेली अमुक गोष्ट या गुणांना धरून होत नाहीये असं सांगून पाहा , चटकन आक्रमक पवित्रा धारण करतील ... जज केलेलं कुणालाच आवडत नाही पण जर तुम्ही निर्मात्याचं अस्तित्व मानता तर इथल्या लोकांनी केलेल्या जजिंग कडे तुम्ही दुर्लक्ष करू शकाल , वाद घालून खोडून काढू शकाल पण निर्मात्याची जी सिस्टीम आहे ज्यात प्रत्येक गोष्ट जज करून त्याचं फळ दिलं जातं , त्या जजिंग पासून सुटका होईल का ?

ह्या सिस्टीमचं किंवा दुसऱ्या शब्दात कर्मसिद्धांताचं अस्तित्व मानायचं की नाही हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे ... कोणता धर्मग्रंथ सांगतो म्हणून , भगवद्गीता सांगते म्हणून मान्य करू नका . आपल्याला बुद्धी , तर्कशास्त्र मिळालेलं आहे , ते यासाठी वापरायचं नाही तर आणखीन कशासाठी ?

बहुतेक " पाप " म्हणून गणल्या जाणाऱ्या गोष्टींना तर्काचा काडीचा आधार नसतो पण लोक त्या खुशीने मान्य करायला तयार होतात .... मुळात पाप , पुण्य हे मानवनिर्मित शब्द झाले... एकदा कर्मफल मान्य केलं की या शब्दांची गरजच उरत नाही , चांगल्या कर्माचं चांगलं फल आणि वाईट कर्माचं वाईट फल इतका सोपा नियम आहे पण माणसांना सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेट केल्याशिवाय त्यात काही अर्थ वाटत नाही , आणि त्यातूनही पळवाटा काढण्यात तो एक्स्पर्ट आहे . मुस्लिम धर्मात स्त्रियांनी व्यवस्थित अंग झाकेल असा पोशाख केला नाही , इतर वर्तनाचे नियम पाळले नाहीत तर अल्लाह त्यांच्यावर नाराज होतो .... ज्याने हे अफाट विश्व निर्माण केलं , अनंत प्राणिजाती निर्माण केल्या त्या ट्रिलीयन प्राणीजातींपैकी एका प्राणिजातीतली मादी आपलं अंग झाकते की नाही याच्याशी तो सर्वशक्तिमान निर्मात्याला का काही घेणंदेणं असेल ?

ख्रिश्चन धर्मात ( ज्या युरोपियन लोकांनी आज विज्ञानाच्या / तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सगळ्यात जास्त प्रगती केली आहे ) होमोसेक्शुऍलिटी अजूनही " पाप " मानतात आणि " यू हॅव ऑफेंडेड गॉड , गॉड विल पनिश यू " अशा प्रतिक्रिया देतात ... परत एकदा , ज्याने अब्जावधी प्रजाती निर्माण केल्या त्याला कुठल्यातरी एका प्रजातीतील प्राणी विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत संबंध ठेवतात की समलिंगी , ह्याने काय फरक पडतो ? नैसर्गिक का अनैसर्गिक हा वाद वेगळा आहे , त्याचे आणखी वेगवेगळे पैलू आहेत , पण त्या विषयात धर्म आणून "गॉड विल पनिश यू फॉर धीस सिन " अशी वॉर्निंग दिली जाते .

आपल्या हिंदू धर्मात ठराविक जातींना देवळात प्रवेश नाही , कारण त्या अपवित्र हा समज शेकडो वर्षे समाजात जोपासला गेला , त्यांची समाजातली अवस्था अतिशय दयनीय होती ... ठराविक जातींना निर्माता स्वतः अपवित्र समजेल हा किती अज्ञानी समज आहे .

एकूण पापाच्या कल्पनांपैकी 99 % समाजातील एका वर्गाने दुसऱ्या वर्गाचं कुठल्या ना कुठल्या स्वरूपात शोषण करण्यासाठी निर्माण केल्या आहेत हे सुर्यप्रकाशाइतकं उघड सत्य आहे ...

पण आज आपण आपल्या धर्मातल्या विश्वासांना प्रश्न विचारू लागलो आहोत , गेल्या काही शतकांत अनेक जुन्या रूढी परंपरा रीतिरिवाज मागे सोडले आहेत ... आता कर्मसिद्धांत खरा आहे की आणखी एक मिथक आहे हेही आपण स्वबुद्धीने विचार करून ठरवू शकतो की ! तुम्ही आस्तिक आहात तर स्वतःशी विचार करा आणि मग निर्णय घ्या की खरा आहे किंवा काही अर्थ नाही ह्यात .

तुम्ही आस्तिक आहात ह्याचा अर्थ तुम्ही निर्मात्याचं अस्तित्व मानता ... मग हा निर्माता कसा आहे असं तुम्हाला वाटतं ? एकूण एक धर्मग्रंथ सांगतात परमेश्वर म्हणजे सर्वशक्तिमान आहे , प्रेमाचा सागर आहे , क्षमाशील आहे ... कारण लोकांना तेच ऐकायचं असतं ...कोणत्याही परिस्थितीत आपल्या पाठीशी उभी राहील अशी शक्ती आहे हा मानसिक आधार हवा असतो .परमेश्वर न्यायनिष्ठुर आहे , सांगितलं तर कोणाला फारसं आवडणार नाही पण तुम्ही फक्त पश्चातापदग्ध मनाने माफी मागा , तो क्षमाशील आहे , दयेचा सागर आहे तो तुमच्या सगळ्या चुका पोटात घालेल आणि तुमची सगळी संकटं दूर करेल सांगितलं की लोकांचा जीव भांड्यात पडतो... तसं सांगण्यावर प्राचीन काळापासून ते आजपर्यंत धार्मिक संस्थांचा , धर्मगुरू , पुजारी , पंडीत यांचा फायदा आहे .... अशा या प्रेमसागर , क्षमाशील देवाला प्रसन्न करायचे नुस्खे त्यांच्याकडे असतात , पूजा , यज्ञ वगैरे .... त्यासाठी देवाची तशी प्रतिमा लोकांच्या मनात उभी करणं त्यांच्या व्यवसायासाठी अत्यावश्यक होतं .

पण आज जे आस्तिक धर्मातल्या चुकीच्या रूढी परंपरांवर प्रश्न उपस्थित करतात , ते सुद्धा देवाची ही जी ओळख करून दिली आहे ती 100 % योग्य आहे का नाही हा प्रश्न स्वतःला विचारू इच्छित नाहीत .... जे देव मानू इच्छितात त्यांना तो दयासागर , प्रेमसागर आणि क्षमाशीलच हवा असतो ....

ठीक आहे , त्यात काही गैर नाही . पण बहुतेक आस्तिक हे देव सोयीने वापरणारे आहेत ... अमुक दिवशी मांसाहार करू नको देवाला ते आवडत नाही असं सांगितल्यावर काहीजण ते ऐकतील कारण त्यात फारसे कष्ट नसतात पण अमुक व्यक्तीशी तू जे वागत आहेस ते योग्य नाही , देवाला ते आवडणार नाही असं जर सांगितलं तर त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतील ...

जर आपण जगातील लोकांच्या अवस्थेकडे पाहिलं तर देव दयासागर आणि क्षमाशील आहे ही कल्पना एक सेकंदसुद्धा टिकत नाही .... हे सगळं निर्माता आहे असं मानणाऱ्या लोकांसाठी आहे हां . आज जगात एवढं विविध प्रकारचं दुःख आहे की निर्माता असेल तर तो सॅडिस्टिक आहे की काय असा प्रश्न पडावा ... त्यामुळे धर्मग्रंथ किंवा पुजारी -पंडीत ,आपली पुराणं , देवांच्या कृपेच्या आणि लीलांच्या सुरस कथा ज्या आपण लहानपणापासून वाचल्या - ऐकल्या - आणि टीव्ही / नाटक मधून पाहिल्या आहेत आणि त्यातून देवाची जी प्रतिमा डोक्यात तयार केली आहे ती बाजूला ठेवून उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहणं गरजेचं आहे आणि ह्या जगाचा निर्माता खरा कसा असेल हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे .

भगतसिंगसारखे नास्तिक म्हणतात " निर्माता आहे असं मानलं तर तो सॅडिस्टिक , क्रूर आहे असा निष्कर्ष काढावा लागेल " तर जगातले सगळे धर्मग्रंथ सांगतात तो प्रेम आणि दयेचा सागर आहे . तुम्ही स्वतः या जगाकडे पाहा आणि विचार करा , निर्माता कसा असेल ?

दयेचा सागर असता तर जगात इतके भयानक प्रकारचे रोग , शारीरिक आणि मानसिक आजार , अपंगत्व , लैंगिक शोषण , बलात्कारासारखे गुन्हे , पोट भरण्यासाठी शरीर विकावं लागणे आणि हजारो - लाखो मुलींवर वेश्याव्यवसाय लादणे , मांसासाठी कोट्यवधी प्राण्यांची कत्तल हे सगळं त्याने चालू दिलं असतं का ?

आणि जर सॅडीस्टिक म्हणावा तर जगातली सुंदर स्थळं , साध्या सूर्योदय , सुर्यास्तासारख्या गोष्टी , जंगलं , वेगवेगळे प्राणी - पक्षी , अंडरवॉटर लाईफ इतक्या अलौकिक सुंदर गोष्टी एक सॅडिस्टिक अस्तित्व निर्माण करू शकेल का / का करेल ? मुळात जर तो क्रूर असता तर जेमतेम पाऊस पाडणं / मोठमोठी नैसर्गिक संकटं , 90 % लोकसंख्या भयानक आजारांनी ग्रस्त , वेदनामयी जीवन किंवा असंख्य मार्गांनी माणसाचं जीवन हलाखीचं करू शकला असता . पण जास्तीत जास्त प्राण्यांना अन्न - पाणी , वस्त्र, निवारा मिळू शकेल अशी परिस्थिती त्याने ह्या ग्रहावर निर्माण केली . माणसाला बुद्धीचं वरदान दिलं , ज्याद्वारे त्याने आपली प्रगती करून घेतली . त्याने निर्मिलेला माणूस हा दया , प्रेम , निःस्वार्थीपणा , सहानुभूती , परोपकार ह्या भावनांच्या अत्युच्च शिखरावर जाऊन पोहोचतो ... जर निर्माता हृदयशून्य असता तर अशी माणसं निर्माणच झाली नसती .... वेगवेगळ्या प्रजातीच्या प्राण्यांमधले प्रेमाचे संबध पाहिले की मला तरी खात्रीपूर्वक वाटतं जर निर्माता असेल तर तो हृदयशून्य असणं शक्यच नाही ( गायी कुत्र्याला चाटताना / मांजर आणि माकडाच्या पिल्लाची मैत्री , कुत्रा आणि पक्षी किंवा इतर प्राण्यांची मैत्री आणि असंख्य माणसं जी मुक्या प्राण्यांना पाळतात , आजारी असतील तर उपचार करतात त्यांच्यावर प्रेम करतात ) ... कलाकार साहित्यिक यांची प्रतिभा जर त्याच्याचकडून मिळते असं मानलं तर इतक्या सुंदर कलाकृती , लिटरेचर यांची प्रेरणा देणारा निष्ठूर क्रूर हृदयशून्य कसा असू शकेल ? कितीतरी लोक असे आहेत जे वैयक्तिक स्वार्थापलीकडे जाऊन समाजाच्या हितासाठी आयुष्य खर्ची घालतात ... असे लोक सॅडिस्टिक निर्मात्याकडून निर्माण झालेच नसते / त्याने होऊ दिले नसते .

मग निर्माता जर आहे असं आपण मानत असू तर तो कसा असेल असं वाटतं ? ह्या ग्रहावर सगळ्या प्राण्यांना चांगल्या दर्जाचं जीवन जगता येईल अशी बेसिक परिस्थिती त्याने निर्माण केली ... चांगलं वाईट ठरवण्यासाठी बुद्धी दिली / सद्सदविवेकबुद्धी ...... आपण निर्माण केलेल्या या प्राण्याने चांगलं वागावं आणि आयुष्य अनुभवावं अशी मिनीमम अपेक्षा ठेवली . चुका होतील ही शक्यता गृहीत धरून चुकांची परस्पर नोंद ठेवून परस्पर शिक्षा देणारी एक यंत्रणा निर्माण केली .... जी शिक्षा देताना कुणावर अन्याय होऊ देत नाही आणि जाणीवपूर्वक केलेली चूक माफ करत नाही .... प्रत्येकासाठी शिक्षा ठरवण्याचं काम तो स्वतः करत असेल असं वाटत नाही , ऑटोमेटिक कर्मांची नोंद आणि योग्य ते फल चांगलं किंवा वाईट दिलं जाईल अशी ही यंत्रणा असावी असं वाटतं ... ज्यात तो हस्तक्षेप करतो का नाही आपल्याला माहीत नाही . समजा करत असेल तर त्याचे निकष आपल्याला माहीत नाहीत , म्हणजे आपण अंदाज बांधू शकतो पण खात्रीपूर्वक निष्कर्ष काढू शकत नाही .

मी हे कुठले धर्मग्रंथ वाचून म्हणत नाही आहे ... युट्युब वर भारतातल्या कनजॉईन्ड ट्विन्स बहिणींचा व्हिडीओ कोणी पाहिला आहे ? तशी युरोपातीलही बरीच उदाहरणं आहेत पण त्यांना सरकारकडून उपजीविकेसाठी लागणारा सगळा खर्च मिळण्याची सोय आहे , काही जॉबही करतात .... भारतातल्या ह्या बहिणी सर्कशीत एक आयटम म्हणून सादर केल्या जातात , अद्भुत / विचित्र ... तिथे त्या चालून / आणखी काही हालचाली करून दाखवतात , वस्तू उचलणे वगैरे ... ह्यातून जे काही पैसे मिळतात त्यातून त्यांच्या घराला हातभार लागतो ... त्यांचं लग्नही झालं आहे एकाच माणसाशी अर्थात ....एकूण बऱ्याच खुश दिसल्या ....

एरवी अपंग माणस असतात हे माहीत नव्हतं असं नाही , व्हीलचेअर मध्ये बसलेली माणसं माहीत होतीच पण कधी त्यावर विचार केला नव्हता . ह्या बहिणींना बघून विचार आला साधी बाथरूमला जाण्याची क्रिया , सामान्य माणूस दिवसातून 5 - 6 वेळा जातो ... ह्यांना किती कठीण जात असेल .. वर चढून बसायचं असेल तर कुणीतरी उचलून ठेवावं लागतं ... मग विचार आला तेच व्हीलचेअर मध्ये बसणाऱ्या / स्नायूंचे काही आजार असणाऱ्यांना सुद्धा अनेक नॉर्मल क्रिया कठीण होत असतील .... जन्मजात अपंगत्व किंवा नंतर काही अपघात वा आजाराने आलेलं अपंगत्व किती त्रासदायक असतं याचा विचार तो व्हिडीओ पाहीपर्यंत पूर्वी कधीच केला नव्हता .... अर्थात अशा लोकांसाठी मनात वाईट वाटल्याशिवाय राहत नसेच पण क्षणभरासाठीही स्वतःला त्यांच्या जागी ठेवून त्यांचं आयुष्य कसं असेल असा विचार केला नव्हता .

मुंबईतल्या वेश्यांचं जीवन , तरुण मुलींना फसवून वेश्याव्यवसायात ढकलणे हा विषय असलेल्या लव्ह सोनिया या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आणि अंगावर सरसरून काटा आला .

येमेन देशामध्ये 10 - 12 वर्षांच्या मुलींचे बाप भरपूर रक्कम घेऊन 25 - 30 वर्षाच्या नवऱ्यामुलाशी लग्न लावून देतात , तिथे अजून बालविवाह कायद्याच्या विरुद्ध नाही .

ही मोजकीच उदाहरणं झाली ... जगात ह्यापेक्षाही भयानक वाईट संकटं लोकांवर आलेली असतात , मला माहित आहे .

पण मला ह्या विचाराने अस्वस्थ केलं की मी इथे या संकटांपासून मुक्त आहे , धडधाकट शरीर , मेंदू मिळाला आहे , चांगले पालक मिळाले , डोक्यावर छप्पर आहे , सेक्शुअल अब्युज पासून सुरक्षितता आहे , 2 वेळच्या जेवणाची चिंता नाही .... हे सगळं मला मिळालं आहे आणि अक्षरशः लाखो लोकांना नाही ह्याचा अर्थ देवाचं माझ्यावर त्या लाखो लोकांपेक्षा अधिक प्रेम आहे किंवा त्यांची त्याला काळजी नाही पण माझी आहे , असा अर्थ काढणं म्हणजे मूर्खपणा होईल .

पण बहुतेक आस्तिक आणि चांगल्या परिस्थितीत असलेले लोक असंच धरून चालत आहेत .... की मी देवाला विशेष प्रिय आहे , म्हणूनच मला जे काही मिळालं आहे ते मिळालं आहे , त्याच्या कृपेने आणि हीच कृपा नेहमी राहील . बहुतेक आस्तिक लोक पुनर्जन्माबद्दल फारसा विचार करून डोक्याला ताण देऊ इच्छित नाहीत . लाखो लोक हलाखीच्या परिस्थितीत जगत असताना आपल्याला जे काही मिळालं आहे ते निव्वळ देवाच्या आपल्यावरील विशेष प्रेमाने मिळालं आहे असं मानून जीवन जगणं म्हणजे मला आंधळेपणा वाटतो ... पूर्वजन्मात जाणता अजाणता केलेल्या चांगल्या कर्मांचं फळ म्हणून हे सगळं मिळालं आहे ... जी काही कर्म अजाणता घडली ती सुदैवाने चांगली या कॅटॅगरीत मोडणारी होती म्हणून हा जन्म मिळाला ..... जर या जन्मात चुकीची कर्मं घडली तर पुढच्या जन्मी त्या लाखो लोकांपैकी आपणही एक असू आणि तो काहीही हस्तक्षेप करणार नाही जसा तो याक्षणी त्यांच्या कर्मफळांमध्ये हस्तक्षेप करत नाहीये . पुढील जन्मात कशाला ह्याच जन्मात आजार , अपघात किंवा आणखी अक्षरशः हजार मार्गांनी वाईट कर्मांची शिक्षा मिळू शकते .... शिक्षा हा आपला शब्द झाला , त्याच्या लेखी ते केवळ कर्मफल आहे . हे एकदा समजून घेतलं तर आपण प्रत्येक कर्म करताना 10 वेळा विचार करू ....

खरं म्हणजे कुणालाही वेदना न पोहोचवता जगणे ह्यापेक्षा साधा नियम असू शकतो का ? हा एकुलता एक आणि इतका साधा नियमही आपल्याला आजवरच्या जन्मात पाळता आलेला नाही म्हणून वारंवार जन्म होत राहिले , त्यापैकीच हा एक .. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने आपल्याला गतजन्मांची स्मृती नाही .... हा जन्म चांगला आहे असं आपण धरून चालू , मागचा एखादा जन्म कदाचित झोपडपट्टीतला असेल , एखाद्या जन्मी आपल्या मुलाला किंवा आईला हालहाल होऊन मरताना पाहिलं असेल , एखाद्या जन्मी आपणच एखादा भयानक आजार होऊन परावलंबी होऊन जगलेलो असू .... एखाद्या जन्मी नवऱ्याने आयुष्यभर छळ केला असेल , सगळे जन्म वाईटच नसतील , एखाद्या जन्मी खूप श्रीमंत यशस्वी बिझनेसमन असू , सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले , एखाद्या जन्मी लोकप्रिय अभिनेता , एखाद्या जन्मी सुखवस्तू उच्चमध्यमवर्गीय पूर्ण जन्म विनाकष्टाचा , एकही प्रॉब्लेम नसलेला गेला असेल ...... पण पुन्हा पुन्हा जन्म याचा अर्थ चुकीची कर्म घडण्याच्या जास्तीत जास्त शक्यता .. आजचा जन्म सुखी असेलही पुढचा तसाच असेल याची काडीची गॅरंटी नाही ...... पुन्हा पुन्हा जन्म ... पुढचा कुठे - कसा असेल याच्या निर्णयात तुम्हाला काही ठरवण्याचा अधिकार नाही ही शक्यता तुम्हाला भयावह वाटत नाही का ?

त्याने चांगलं वाईट ठरविण्यासाठी बुद्धी दिली आहे , कॉन्शन्स दिला आहे . आणि कुणालाही वेदना न देता जगा , जी वेदना दुसऱ्यांना द्याल ती फिरून तुम्हालाही भोगावी लागेल फक्त वेगळ्या स्वरूपात , जो आनंद दुसऱ्यांना द्याल तोही तुम्हाला परत मिळेल , वेगळ्या स्वरूपात .... इतका साधा नियम सांगितला आहे .... रॉकेट सायन्स नाहीये की इतक्या शतकानंतर समजू नये .... साधे डोळे उघडे ठेवून आजूबाजूला पाहिलं तरी समजतं ... तुम्ही नास्तिक असाल तर प्रश्नच नाही पण निर्मात्याचं अस्तित्व मानत असाल तर निर्माता कुठल्या निष्पाप जीवाला वेदना भोगू देईल का ? तरी जर एखादं बालक अपंग जन्मत असेल तर ती पूर्वकर्मांची फळं आहेत , त्याच्या किंवा पालकांच्या हे उघड वाटतं . स्वतःच्या मुलाला त्या अवस्थेत पाहणे , हातीपायी अपंग किंवा मनोरुग्ण / मानसिकदृष्टीने अधू ही कुठल्याही पालकांसाठी सर्वात अधिक वेदनादायी गोष्ट असते ..... स्वतःच्या मुलाला असाध्य आजार आहे आणि त्याला कणाकणाने जाताना पाहण्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही ह्याहून वाईट शिक्षा पालकांसाठी असू शकत नाही ....

कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबातच हेतू नाही .. मी बोलून दाखवलं इतकंच , बोलून दाखवणारे इनसेन्सेटीव्ह ठरतात लगेच . पण अशा मुलाला बघून पाहणाऱ्याच्या मनात काय बक्षीस दिलं आहे देवाने या भाग्यवान जोडप्याला असा विचार तर निश्चित येत नाही .. " बिचारे " अशीच नोंद होते मनात ... ती बोलून दाखवणं योग्य नाही , सहानुभूती नाही आवडत काही जणांना , तेही साहजिकच आहे .

पण जर एवढ्या वाईट परिस्थितीत लोक जगत आहेत तर कर्मं करताना लाखवेळा विचार केला पाहिजे असं कोणाला कसं वाटत नाही ? आज 90 % लोकसंख्या काही ना काही कारणाने पूर्ण सुखी नाही .. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत , काहींचे दुसऱ्यांपेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे एवढंच ...

याचा अर्थ आयुष्यात प्रत्येकाचं काही ना काही चुकत आहे .. जाणता अजाणता कुणालातरी वेदना दिल्या जात आहेत ज्या पुन्हा आपल्याला या ना त्या स्वरूपात भोगाव्या लागत आहेत...

कधी शिक्षा सुरू होईल याचे काही फिक्स्ड नियम नाहीत ... सगळं आलबेल चालू असताना अचानक प्रॉब्लेम सुरू होताना दिसतात लोकांच्या आयुष्यात ...

आपल्या हातात काय आहे ? एक म्हणजे कर्म करताना ती काळजीपूर्वक करणे .. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्मसंचित जे साठलं आहे ते नष्ट / झिरो / निल करण्याचा प्रयत्न करणे .. त्यासाठी काही जण वर म्हटल्याप्रमाणे नामस्मरण , उपासनेचा मार्ग सांगतात ...

पण आपण आपला मार्ग स्वतः निश्चित करावा . आयुष्यभर पूजाअर्चा केलेल्यांचा मुलगा अपघातात जाऊन त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेल्याच उदाहरण दिसतं , देवाचं सगळं व्यवस्थित ( म्हणजे प्रार्थना - सण किंवा उपास किंवा आणि काही यज्ञ - पूजा ) केलेले लोक 100 % सुखी आहेतच असं चित्र काही समाजात दिसत नाही ... बाकीच्यांसारखंच त्यांनाही त्या प्रॉब्लेमना तोंड द्यावं लागतं आहे असं दिसून येतं ... फारतर मानसिक बळ जे काही मिळत असेल ते ....

तेव्हा कर्मफळ शून्य झालं / कमी होत आहे हे आपलं आपल्याला समजण्याचा खात्रीशीर मार्ग अवलंबणं गरजेचं वाटतं . एखाद्या खुनाच्या गुन्हेगाराने कितीही पश्चातापदग्ध मनाने माफी मागितली म्हणून त्याची शिक्षा रद्द होत नाही . त्यामुळे माफी मागणं हा पर्याय आपल्यापुढे नाही .

पण कर्मफळ संपवायचं तर सगळ्यांनाच आहे , एकतर भोगाने ( म्हणजे ते संपण्याची शक्यताच नगण्य , त्यात सतत भरच पडत राहणार ) किंवा योगाने हा ऑप्शन आपल्यासमोर आहे . योगाने संपवण्याचा प्रयत्न केला तर याच जन्मात आपल्याला ते संपवता येईल . अनिश्चित ठिकाणी , परिस्थितीत जन्म घेण्याचा धोका नाहीसा होईल आणि सगळेच कष्ट संपतील ...

भक्तियोग प्रभावी असेलही ... पण आपली भक्ती कितपत शुद्ध आहे ? तुकारामांची आई , बायको मरण पावली तरी त्यांची ईश्वरभक्ती जराही ढळली नाही , त्यांनी स्वतःच्या कुटुंबाच्या सुखासाठी कधी ईश्वरभक्ती केली नाही ; काही मागितलं नाही ... कुठलं कारण शोधलं नाही .. फक्त कुठलीही अपेक्षा न ठेवता देवावर प्रेम केलं . त्याला भक्तियोग म्हणता येईल . आपण तासभर जरी देवासमोर हात जोडून बसलो तरी त्या दर्जाची भक्ती आपल्याला जमणार आहे का ? काहीही न मागता , कसलीही अपेक्षा न ठेवता तासाभरासाठी , किमान 10 मिनिटांसाठी तरी ईश्वराशी एकरूप होणं आपल्याला जमणार आहे का ? तेव्हा अमुक इतका जप केला , अमक्या देवळात जाऊन आलो , अमुक मठाला जाऊन आलो , अमुक ग्रंथाची पारायणं केली , इतके गुरुवार केले नि तितके सोमवार केले ह्यावर अवलंबून आपलं कर्मफल कमी होईल अशा भ्रमात राहण्यात अर्थ नाही . हे सगळं करण्यात मनाला आनंद असेल तर जरूर करावं , या सगळ्याने देवाशी जवळीक वाढत आहे किंवा तुमच्यात चांगले बदल होत आहेत असं वाटत असेल तर जरूर करा .

पण कर्मफल शून्य होणं आणि परमेश्वर / कॉसमॉसशी एकरूपता प्रस्थापित होणं / एनलाईटमेंट ही वेगवेगळी नावं असलेली एकच गोष्ट आहे . आणि ती जेव्हा होईल तेव्हा आपलं आपल्याला 100 % कळतं असं मला वाटतं ... मग कसल्या शंका उरतच नाहीत , प्रश्न उरत नाहीत , सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात . ती अवस्था गाठणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे . भक्तियोग , कर्मयोग , राजयोग किंवा आपल्याला सूट होईल , जमेल असा मार्ग लवकरात लवकर शोधून अवलंबला पाहिजे .. पुढच्या जन्मात एवढा विचार करण्याची आर्थिक , बौद्धिक , भावनिक , शारीरिक परिस्थिती असेल याचीही काही हमी नाही .

तो अवलंबत असताना चुकीची कर्म न घडू देणं फार महत्त्वाचं आहे . बालगुन्हेगाराला दया / सुधारणेची शक्यता म्हणून बाहेर सोडतीलही पण मोकळ्यावर असताना पुन्हा पुन्हा त्याच चूका केल्या तर शिक्षेपासून फार काळ वाचता येणार नाही .....

एकीकडे साधना आणि दुसरीकडे त्याच चुका करणे म्हणजे साधनेत वेळ फुकट घालवण्यासारखं आहे , सगळी साधना म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी ... त्यापेक्षा साधना सरळ बासनात गुंडाळून मनमर्जी आयुष्य जगावं म्हणजे मग एवढं करून पण काहीच झालं नाही / साक्षात्कार / एनलाईटमेंट काहीही झालं नाही , एवढंच काय आयुष्यातले प्रॉब्लेम्स पण तसेच्या तसेच आहेत अशी तरी तक्रार करण्याची वेळ येणार नाही , काहीच केलं नाही तेव्हा जे फळ मिळालं ते आपल्याच कर्माचं फळ आहे अशी तरी समजूत घालता येईल ...

कर्मयोग अंगात भिनवला तर वेगळ्या साधना करण्याची गरज वाटत नाही . बाबा आमटे , प्रकाश आमटे यांना देवाला मानण्याची गरजच नाही , त्यांचं कर्म इतक्या वरच्या दर्जाचं आहे की तो प्रत्यक्ष भेटला नसेल तरी सदैव त्यांच्याबरोबर आहे यात शंका नाही . आपल्याला त्या दर्जाचं कर्म शक्य नसेलही , पण स्वार्थ आणि आसक्ती कमीत कमी करून असं काहीतरी कर्म आपल्या हातून घडावं की निर्मात्याला आपल्या निर्मितीचा अभिमान वाटेल , कौतुक वाटेल ... त्याला कौतुक वाटावं असं आपण वागत आहोत का ? स्वतःच्या कुटुंबासाठी धन कमावणं आणि खर्च करणं हे पुरेसं आहे का त्याला प्रसन्न करण्यासाठी ? कुटुंबाला हलाखीत ठेवण्यापेक्षा नक्कीच प्रशंसनीय आहे .... पण त्याच्याशी एकरूप करेल एवढ्या दर्जाचं आहे का ? ते करावंच , ते न करणं शक्य नाही ... पण त्याबरोबर निःस्वार्थीपणे कोणासाठी काहीतरी केलं तर कदाचित त्याच्यापर्यंत पोहोचेल .

हे जाऊ द्या पण निर्मात्याला आपल्या निर्मितीबद्दल चुकचुक / अफसोस वाटेल असं तरी वर्तन आपल्या हातून घडू नये याबद्दल आपण किती दक्ष राहतो ? अहिंसा देवाला प्रिय आहे हे एकूण एक भारतीय संतांनी आणि संप्रदायांनी सांगितलं आहे . पण आपल्या जीभेच्या सुखापुढे आपण त्याकडे साफ दुर्लक्ष करतो . चिकनच्या दुकानातून चिकन घेताना आपल्या डोळ्यासमोर कोंबडीची मान कापली जात असते , तिचं वेदनेने ओरडणं आपल्या कानावर येत असतं पण मनापर्यंत पोहोचत नाही ..... देवाने कॉन्शन्स फक्त माणसाला दिला आहे , बाकीच्या मांसाहारी प्राण्यांना नाही आणि ते भाजीपाला खाऊन जिवंत राहूही शकत नाहीत .

कल्पना करा तुम्ही आणि आणखी 15 - 20 माणसं एका मोठ्या पिंजऱ्यात आहेत आणि एक मोठ्ठा एलियन हात घालून एका वेळी एकाला बाहेर काढतो आणि तुमच्या डोळ्यासमोर तिथे बाहेरच त्याचे तुकडे करतो ... तुम्हाला माहीत आहे , आता लवकरच तुमची वेळ येणार आहे आणि जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला वाचवायला येणार नाही आहे . त्या असह्ययतेच्या तीव्रतेच्या पराकोटीची कल्पना करा क्षणभर .... कोंबडी फारसा बुद्धिमान जीव नाही पण आता आपलं मरण जवळ आहे , तेपण भयानक वेदना होऊन , सुटकेची काही शक्यता नाही हे समजायला फारशा बुद्धीची आवश्यकता नसते ..... बुद्धीचाच विचार करायचा तर पिलांच्या रक्षणासाठी धावून जाणारी गावठी कोंबडी बहुतेकांना माहीत असते ... तिच्यात जे मदर इन्स्टिनक्ट / मातृत्वाची भावना असते तीच कुठल्याही मानवी मातेत असते ... पण मानवातील ती भावना सर्वश्रेष्ठ मानली जाते , एखादी बाई आई झाली / असली की समाजाकडून तिला एक प्रकारचा आदर मिळतो जो कुमारी मुली किंवा मूल नसलेल्या स्त्रियांच्या वाट्याला येत नाही , मूल आहे म्हणजे तिची अधिक काळजी घेतली पाहिजे , ती आपोआप थोड्याशा अधिक आदरास पात्र होते बाकीच्या प्राण्यांमधली तीच भावना मात्र तुच्छ , त्यात काय आहे या नजरेने पाहिली जाते ..

ही पराकोटीची असहायता जी त्या कोंबडीला किंवा त्या बकऱ्याला कापण्यासाठी ओढत नेत असताना अनुभवावी लागते तीच कशावरून आपली अतिप्रिय व्यक्ती हालहाल होऊन मरताना पहावी लागण्यातून माणसांना अनुभवावी लागत नसेल ?

बीफ साठी गुरांना मारताना त्यांच्या डोक्यात कठोर तीक्ष्ण वस्तू घुसवून मेंदू निकामी करण्याचा प्रयत्न केला जातो , किंवा मानही कापली जाते . क्रूर वाटतं का वाचताना ? पण तुम्ही खात असाल त्या कोंबडी / बकऱ्यालाही तेवढीच वेदना होत असते ... मासे जे ऑक्सिजनअभावी तडफडून मरतात त्यांचं मरणही वेदनारहीत नसतं , वाटल्यास 3-4 मिनिटं एक प्लास्टिक पिशवी डोक्यात घालून ऑक्सिजन बंद करून पाहा , किती वेळ राहता येतं , तेही हाल हाल होऊनच मरतात .. फक्त तुम्ही त्या विचाराकडे दुर्लक्ष करता .... जाणूनबुजून नाही ... विचार केला तर गिल्टी वाटेल कदाचित म्हणून मन त्यावर विचारच करत नाही आणि कोणी विषय काढलाच तर मुद्दे खोडून काढायला पुढे सरसावतं - " पण वनस्पतींनाही वेदना होतात असं सिद्ध झालं आहे , मग काय उपाशी मरायचं का " वगैरे वगैरे .... वाद घालून तुम्ही इथलं ऑर्ग्युमेंट जिंकल्याचं समाधान मिळवाल पण कर्म सिद्धांत खरा असेल तर जे जे दिलं ते सगळं परत मिळणार आहे .

अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांना कायदा काहीही शिक्षा करू शकत नाही ... त्या गुन्हा मानल्या जात नाहीत . माणसाची हत्या ह्याला शिक्षा आहे.. खून ही संज्ञा आहे .

पण कोंबडी - बकरा - मांसासाठी मारले जाणारे इतर प्राणी यांच्या हत्येला मानवी कायद्याने गुन्हा समजलं जात नाही . काल मी एका बकऱ्याचा खून होताना पाहिला असं विधान ऐकून काही लोक हसतील कदाचित .

का ? जिवंत राहू इच्छिणाऱ्या एका जीवाची हत्या म्हणजेच खून ना ? गुन्ह्यासाठी दिलेल्या फाशीला खून म्हणता येणार नाही त्याला मृत्युदंड हे नाव आहे . त्यातही त्या व्यक्तीने गुन्हा तरी केलेला असतो .... कुठलाही गुन्हा न केलेल्या जीवाची हत्या हा खूनच आहे ... पण तो शब्द लोक वापरत नाहीत , कुणाला आवडेल ? गिल्ट येऊ शकतं ना .. तेव्हा ते हास्यास्पद ठरवून तसं म्हणणाऱ्याला वेड्यात काढणं सोपं ... किंवा वनस्पतींनाही वेदना होतात हा वाद घालायचा . इथे दुसऱ्यांना स्पष्टीकरण देण्याची / आपलं वागणं क्रूर वगैरे नाही हे पटवून देण्याने त्यांची तोंडं बंद करता येतील पण तिथे वर ही वाद घालण्याची - तर्क वितर्क करण्याची सोय असेल असं वाटत नाही .

मांसाहार वगळता आपण आपल्या परिघात येणाऱ्या सगळ्या लोकांशी चांगले वागतो का ? बहुतेक लोक वागतात असं धरून चालू ..... पण सोवळं ओवळं पाळणाऱ्या म्हणजे आस्तिक असलेल्या बाईने सुनेला छळून घर सोडायला भाग पाडल्याचं उदाहरण नजरेत आहे .... शत्रूची ( ! ) खोड मोडावी म्हणून दररोज तासभर देवासमोर खड्या आवाजात स्तोत्रपठण करणारे महाभाग परिचयाचे आहेत .... आस्तिक असणं आणि किमान नैतिकतेने वागणं ह्या दोन गोष्टींचा दूरदूरवरचा संबध नाही असं समजून जगणारे अनेक लोक तुमच्याही परिचयाचे असतील ... आपणही त्यातलेच एक तर होत नाही ना ह्यासाठी डोळ्यात तेल घालून दक्ष राहणं गरजेचं आहे . प्रत्येक कर्म करताना 10 वेळा विचार केला पाहिजे ... आस्तिक असाल तर हां , नास्तिक हवे तसे जगायला मोकळे आहेतच ... पण अस्तिकांनी धर्म पुराणात दिलेल्या गोष्टी आंधळेपणाने न मानता देवाने दिलेल्या डोक्याचा वापर करून - माझ्याकडून कुणाला जराही वेदना त्रास मनस्ताप होऊ देणार नाही , शक्य होईल तेवढा इतरांच्या आयुष्यात आनंद आणण्याचा मी प्रयत्न करेन , कोणाहीबद्दल राग - द्वेष ठेवणार नाही एवढा साधा नियम पाळून जगलं तर देवाचा अनुभव येण्यात काहीतरी हातभार लागेल असं मला वाटतं .. मनाला वाटेल तसं वागून नंतर देवाने माझ्यासोबत / त्या अमुक देवभक्त अस्तिकांसोबत असं का होऊ दिलं हा प्रश्न विचारणं निरर्थक आहे ... देव कर्मफळात हस्तक्षेप करत असेल असं वाटत नाही .. मध्ये खरोखर चांगली कर्मं केली तर पुढच्या वाईट घटना टळतही असतील कदाचित .. पण ती चांगली कर्मं म्हणजे पूजा अर्चा , यात्रा , यज्ञ नाहीत तर खरोखर कोणाला तरी निःस्वार्थी हेतूने केलेली मदत वगैरे ...

हे माझं मत आहे ... ते साफ चूकही असेल .. पण देव दयाळू असून जगात एवढं दुःख का या प्रश्नाची मी माझ्यापुरती शोधलेली ही उत्तरं आहेत .

माझे स्वतःपुरते तत्वज्ञान -

आपल्या बुद्धीचा तेवढा विस्तार झालेला नाही की आपण या प्रश्नाचे उत्तर शोधू शकू तेव्हा थोरा मोठ्या संतांनी जे सांगीतले आहे ते निमूट ऐकावे = नामस्मरण करावे, सर्वांशी चांगले वागावे, उत्तम विचार करावेत. आणि संतांनी सांगीतलेल्या मार्गावरुन जाताना, डोक्याला उगाच शिणवु नये = embrace your inner sloth. आराम करा, चिल!!!

देव, इश्वर व परमेश्वर ही तिन्ही संकल्पना वेगळ्या आहेत. त्या समानार्थी वापरल्या की धमाल सुरू होते.
Happy

जगात सर्व ठिकाणी देव
ही संकल्पना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आहे.
त्याचे उत्तर आपण निसर्गाचे रौद्र रूप बघून त्या पासून बचाव करण्यासाठी देव निर्माण झाले असे ठोकळेबाज उत्तर देतो.
असंख्य प्राण्या मध्ये मानव च का जास्त प्रगत झाला?
पृथ्वी वर सजीव सृष्टी कशी निर्माण झाली ?
पृथ्वी कशी निर्माण झाली?
आणि सजीवांना अनुकूल असे सर्वच कसे निर्माण झाले?
असे खूप प्रश्न आहेत.
आपल्या कडे उत्तर आहे ,सजीव सृष्टी अस्तित्वात आहे .
आपण उत्तरा वरून प्रश्न काय आहे हे शोधत निष्कर्ष काढत आहोत.
ह्या सर्व गोष्टी घडून गेलेल्या आहेत आपण फक्त कसे घडले ह्याचा अंदाज घेत आहोत .
एक प्रश्न शोधताना असंख्य प्रश्न निर्माण होत आहेत.
प्रत्येक प्राणी स्वतःच्या बुध्दी नुसार विश्व विषयी ठोकताळे मांडत असेल .
त्यात माणूस पण आला.
बुध्दीचा क्षमतेच्या बाहेर आपल्या कडे उत्तर नाहीत आणि प्रश्न सुद्धा पडत नाहीत .
त्या मुळे देव असेल तर दाखवा ह्या प्रश्नाला काही अर्थ नाही.
निर्जीव वस्तू मधून सजीव निर्मिती करणे अजुन तरी मानवाला शक्य झाले नाही
त्या मुळे सजीव निर्मितीचे दावे खोकले आहेत त्याला भक्कम असा पुरावा नाही.
जेव्हा माणूस निर्जीव वस्तू मधून सजीव निर्माण करेल तेव्हा देव नाही हे सिद्ध होईल .
ह्या विश्वाच्या अफाट पसऱ्याचे आपण आपल्या बुध्दी नुसार विश्लेषण करत आहोत आणि आपण जे समजत आहोत ते खरेच आहे हे फक्त आपल्या पुरतेच मर्यादित आहे.
आपण समजत आहोत त्या पेक्षा वेगळेच सत्य असू शकत

असंख्य घटक आणि एका पेशा जास्त प्रक्रिया करून एकदा पदार्थ बनवला आणि ते सर्व घटक आपल्या माहिती मधील नाहीत .
आणि तो पदार्थ प्रयोग शाळेत तपासून त्या पदार्थाची recipe शोधून काढणे जेवढे अवघड आहे त्या पेक्षा किती तरी गुंतागुंत असलेली ही विश्वची डिश आपल्या समोर आहे आणि आपण रेसिपी आणि त्या रेसिपी चा निर्माता शोधत आहोत

देव, ईश्वर, परमेश्वर सगळेच मानवी मेंदुची निर्मिती आहे.
या संकल्पनेने, श्रद्धेने ज्यांना मानसीक आधार,आनंद मिळतो त्यांनी याचा लाभ घ्यावा. जाहीर प्रदर्शन व इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नये असे माझे वैयक्तीक मत आहे.
तसेच नास्तिकांनी भोंदुगिरी, श्रद्धेच्या नावाखाली फसवणूक वगैरे याला विरोध जरूर करावा पण नास्तिकत्व लादण्याचा प्रयत्न करू नये असेही माझे वैयक्तीक मत आहे.

छान.

देव, ईश्वर, परमेश्वर सगळेच मानवी मेंदुची निर्मिती आहे.
सहमत.
प्रत्येक सजीव जो इथे अस्तित्वात आहे त्यांनी विश्व विषयी स्वतःच्या कल्पना आपल्या स्वतःच्या मेंदू च्या क्षमते नुसार ठरवल्या आहेत .
त्या मानव प्राणी सुद्धा आला .
प्रश्न हा आहे आपण सर्वात प्रगत प्राणी असून सुद्धा अन्य सजीवांची भाषा आणि भावना समजायची क्षमता मानवी मेंदूत नसल्या मुळे अन्य सजीव काय विचार करत असतील आणि काय उत्तर शोधले असेल हे आपल्याला माहीत नाही

देव आहे की नाही … माझ उत्तर आहे मला फरक पडत नाही.

माझा फ्लो चार्ट असा आहे.

दोन एक्स्ट्रीम केस पाहू.

माणूस १ : दिवसभर देव देव करतो पण लोकांशी अतिशय वाईट वागतो, त्याना लुबाडतो, मारतो.

माणूस २ : कधीही देवाचे नाव घेत नाही, देव मानत नाही , पण सगळ्याना मदत करतो , प्रामाणिकपणे वागतो.

देव नसेल तर प्रश्नच नाही . तुम्ही सगळ्यांशी चांगल वागा हे महत्वाच Happy

तर जर देव असेल अन् त्याच्या मते ,

१. माणूस २ > माणूस १ , मग देव असला काय अन नसला काय , तुम्ही सगळ्यांशी चांगल वागा हे महत्वाच Happy
२. माणूस १ > माणूस २ , मग असल्या देवाला मानण्यात काय अर्थ आहे , तुम्ही सगळ्यांशी चांगल वागा हे महत्वाच Happy

तात्पर्य : तुम्ही सगळ्यांशी चांगल वागा हे महत्वाच Happy

देव म्हणजे माणसचं आहेत. माणूस भरपूर प्रगत झाला आणि टाईम मशीनच्या साहाय्याने भूतकाळात गेला. ती भविष्यातली भूतकाळात गेलेली माणसं म्हणजे देव. हीच थेअरी एलियन्सनापण लागू होते.

आपण स्वतः ला असाधारण समजायला
सुरवात केली आहे .
आपल्या शोधानी आपलेच डोळे दिपत आहेत.
दगड धोंडे सुद्धा ह्या विश्वात पूर्ण galaxy मध्ये फिरत असतात(ना इंजिन , ना ड्रायव्हर).

दैन्य आणि यातनांनी भरलेले हे जग, लाखो शोकान्तिकांची ही सतत बदलती पण चिरंतन गुंफण, ज्यात एकही प्राणिमात्र सर्वार्थाने समाधानी नाही, हे सर्व त्याने का निर्माण केले>>>>>

माणसाने स्वतःसाठी दैन्य व यातना निर्माण केल्या. त्याची दृष्टी इतकी अधू आहे की तो स्वतः म्हणजेच संपूर्ण जग ह्या भासात तो निरंतर राहिला आणि पुढे राहील. पण मानवी समूहाबाहेर, मानवी विचारशक्ती कुंठित होईल इतके मोठे जग आहे, याची जाणीव/झलक सतत मिळत असूनही तिकडे दुर्लक्ष करून स्वतःच स्वतःला त्याने जगाचा केंद्रबिंदू घोषित केलेले आहे. जिथे जिथे ते जग मानवी संपर्कात आले तिथे तिथे त्या जगातील सजीवांची माणसाने स्वतःसारखीच दैन्यावस्था केलीय व त्यांचे आयुष्य यातनामय केलेय. जिथे मानव नाही तिथले सजीव आजही मजेत आहेत. मुळात दुःख, मजा वगैरे विचार त्यांच्यासाठी अस्तित्वात नाहीत. जन्माला आले की निसर्गक्रमानुसार व नियमानुसार वाढून आपले वंशसातत्य राखायचे काम करून ते मरून जातात. ह्यांच्याकडे नसलेली एक गोष्ट माणसाकडे आहे, ती म्हणजे बुद्धी, विचारशक्ती. या अमूल्य वरदानाचा वापर करून माणसाने स्वतःचे आयुष्य दैन्य व यातनांनी भरून टाकले.

आणि स्वतःच हे करून यासाठी देवाला दोष देणे यात वेगळे किंवा नविन काहीच नाही. मानवाने विचारशक्तीचा वापर फक्त स्वतःच्या जबाबदाऱ्या टाळण्यासाठी केलेला आहे.

काही ही काय साधनाताई. काही क्षुल्लक माणसांनी केला असेल अविचार. पण जन्माला का आलो याचा शोध माणूसच घेतोय. वंश तर कुणीही वाढवतच की. माणूस म्हणून जन्माला आल्याचा तुला पश्चाताप होतोय का? माणसांनी हे जग समृध्द केलय असं मला वाटतं.

माणसांनी हे जग समृध्द केलय >>> शाली, यावर एक लेख येउ द्या. वाचायला नक्की आवडेल. फक्त त्या लेखात 'जगा'तले इतर घटक असावेत ज्यांना माणसाने समृध्द केलय.

ह्यांच्याकडे नसलेली एक गोष्ट माणसाकडे आहे, ती म्हणजे बुद्धी, विचारशक्ती. X
( शिकारी पक्षी प्राणी बुध्दिचा योग्य वापर करतात... ट्रेण्ड डॉग्स विचारशक्तीचा योग्य वापर करतात)

पशु पक्षी वगैरे पासून माणूस वेगळा असतो कारण ...ह्यांच्याकडे नसलेली एक गोष्ट माणसाकडे आहे, ती म्हणजे मन √

कर्मकांड करण्यापेक्षा चांगले कर्म करा.
कर्मसिद्धांताला खरे माना.
कर्मकांड करून जर का तुम्ही वाईट वागत असाल तर काय उपयोग?
(अगदी जवळचे उदाहरणं सा. बा )

जर का तुमचं पूर्वकर्म वाईट असेल तर त्याची फळे तुम्हाला भोगावीच लागतात मग साक्षात ब्रह्मदेव जरी आला तरी तोही तुमची सुटका करू शकणार नाही.
म्हणून चांगले कर्म करा.

(अगदी जवळचे उदाहरणं सा. बा ) >>

चांगल्या कर्मात कुणाच्या (खास करून दुनियेने बदनाम केलेल्या नात्याच्या) नावाने खडे न फोडणे मोडत नाही का?

जो है वोह है >>>

मग यासाठी द्राविडी प्राणायाम कशाला? अध्यात्माची पळवाट कशाला?

जो है सो है!
हे स्वीकारणं जमलं तर अध्यात्म / आधुनिक मानसशास्त्र दोहोंचाही डोलारा असा कोसळतो!

Pages