"अरे मासे मिळालेत मासे!! मला घरी घेऊन येता येणार नाहीत एकटीने.तू ये कार घेऊन."
मी फोनवर कँटीन च्या गलक्यात कोपऱ्यात उभी राहून किंचाळत होते.समोरच्या फोन वरच्या प्राण्याला आपली शाकाहारी बायको ऑफिसातून मासे घेऊन घरी का येतेय हे कोडं उलगडत नव्हतं.अशी कोडी संदर्भासहित उलगडायला नवऱ्याना बायकांच्या आयुष्यातले अति सूक्ष्म अपडेट बारकाव्यासह लक्षात ठेवावे लागतात.
"मासे?आपण काय करणार त्याचं?"
"अरे बाबा तू ये ना कार घेऊन.मग बघू.सगळं फोनवर कसं सांगू?हे एवढे एवढे आहेत मासे." आता 'एवढे एवढे' म्हणताना फोनवर केलेले हातवारे समोरच्या पार्टीला दिसणं शक्यच नव्हतं.पण आमचं लग्न 'समान शीले व्यसनेषु सख्यम' नसून 'अपॉझिटस अट्रॅक्ट' च्या पायावर उभं असल्याने अश्या गोंधळाची आम्हाला सवय आहे.
आता परवाच नाही का,मी चाललेय रेडिमेड ब्लाउजच्या शोकेस मधले सोनेरी पाठरूपी मोहक भगदाड वाले ब्लाउज बघत.'मला काय वाटतं माहितीये का सोनू,साड्या नसतील तर नसुदे, 2-3 छान ब्लाउज घेऊन ठेवते.मॅचिंग साड्या नंतर घेता येतील.' असं म्हणून शेजारी पाहिलं तर शेजारी कोणीतरी वेगळीच दोन बॅचलरं ज्ञानेश्वरांच्या रेड्याचे भाव चेहऱ्यावर आणून चाललेली.त्यांना पुढे जायला देऊन या गोंधळावर साहेबांची रिएक्शन काय म्हणून मागे बघावं तर साहेब ऍप्पल च्या शोरूम मध्ये घुसलेले.याच्याच आधी एकदा आय एफ बी च्या दुकानासमोर पार्क केलेली ऍक्टिवा काढताना साहेब मला विसरून तसेच घरी निघालेले आणि मी (आता पब्लिकमध्ये ओरडून सोनू कसं म्हणायचं म्हणून) बिना नाव घेता अरे अरे, शुक शुक, थांब थांब वगैरे काहीतरी ओरडत बसलेले.आणि यावेळी पण मी मासे, 2 फिश पॉंड, सामानाची पिशवी घेऊन फुटपाथवर उभी होते.अगदी छान डिटेल पत्ता सांगितला होता तरी.समोरून सरळ पुढे जाऊन 1 किलोमीटरवर थांबला.मग फोनवर थोडी प्रेमळ वाक्य ऐकवून परत बोलावला.
हां, तर माश्यांवर परत येऊ.मी आणि माझ्या मैत्रिणींनी ऑफिसात कोल्ड कॉफी,आईस्क्रीम, कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम चा धर्मार्थ स्टॉल लावला होता.(म्हणजे, आम्ही फुकट देत नव्हतो कॉफी पण त्यातून मिळालेल्या कुपन परत देऊन तितके पैसे चॅरिटी ला दान होणार होते.) पाणीपुरी,भेळ,दडपे पोहे,पुरी भाजी, माहूरगड का स्पेशल पान, सालसा चाट वगैरे महारथी स्पर्धेत असताना आम्हाला पहिल्या तीन मध्ये येणे शक्य नव्हते पण सर्व स्पर्धकांना बक्षीस म्हणून एक एक प्लॅस्टिक च्या पिशवीत खरा फायटर फिश आणि फिशपॉन्ड ची काचेची बरणी मिळाली आणि ती हिंजवडी च्या खड्ड्यातून घरी सुखरूप पोहोचवायची होती.त्यात ऑफिस पासून 35 किलोमीटर राहणाऱ्या मैत्रिणीने 'तूच घे, माझ्याच्याने नाही होणार' म्हणून तिचा मासा आणि बरणी मला देऊन टाकली.दारी येणाऱ्या लक्ष्मीला, चहाला, ऑनसाईटला आणि कोणत्याही फुकट गोष्टीला मी कधीही नाही म्हणत नाही.त्यामुळे 2 मासे आणि 2 बरण्या आणि एक मोठी पिशवी आणि ऑफिस बॅग आणि मी यातलं काहीही न तोडता फोडता घरी न्यायची जबाबदारी होती.
पडद्यावर लाटा.फ्लॅशबॅक.
"ए मी देतेय हां आपली चौघींची नावं.आपण करायचंय हे."
"नाही गं जमणार.तुझा साहेब ऑस्ट्रेलिया चा माझा कॅनडा चा हिचा स्वीडन चा तिचा अमेरिकेचा.संध्याकाळी 4 ते 7 मध्ये प्रत्येकीचं काही न काही असणार.सामान आणणार कधी?तयारी करणार कधी?"
"आपण करू.अगदी नसलाच वेळ तर अगदी कमी सामान आणू.अर्ध्या तासात विकून संपवू आणि मोठ्या अक्षरात "सगळे संपले आहे" अशी पुणेरी पाटी लावू."
"पण करायचं काय?"
"पावभाजी/चना चोर चाट/भेळ/कोथिंबीर वडी घरून करून/ताक/दाबेली/मसाला पाव"
"भेळ चा स्टॉल गेलाय. चाट चा पण.वड्या तळायला वेळ नाही."
"बाय द वे,रिझन टू गिव्ह म्हणजे काय?आपण स्वस्तात विकायचं आणि ngo ची लहान मुलं स्टॉल वर येणार का?"
"नाही.आपल्याला स्टॉल चा अर्धा खर्च मिळेल आणि कागदी पैसे.आपली गिऱ्हाईकं खरे पैसे मोजून कागदी पैसे विकत घेणार आणि कागदी पैसे आपल्याला देऊन पदार्थ घेणार.आलेला कागदी पैसा मोजायचा आणि तितका पैसा कमिटीचे लोक ngo ला देणार."
(आता "विकून खरा पैसा मिळणार नाही" हा तपशील ऐकल्यावर मीच नाव मागे घ्यायच्या बेतात होते.ऑस्ट्रेलियातल्या भारतीय साहेबाला गप्प बसवून 2 तास काढून पुढच्या दिवशी भल्या पहाटे येऊन काम करायचं इतक्या उद्योगासाठी "नफा" हे मोटिव्हेशन हवंच.)
स्टॉल 2 दिवसांवर आला आणि आम्ही रोज काल्पनिक पदार्थ मनात/स्काईपवर हवेत बनवत होतो आणि रद्द करत होतो.नाचो भेळ?कधी बनवली नाही.शेजवान चाट?खाल्ली आहे, बनवता येईल.सँडविच?लोक ग्रील शिवाय पाव खाणार नाहीत.ताक?आंबट होईल.पाव भाजी/मिसळ कट?पाव गरम करावे लागतील.शेवटी कोल्ड कॉफी ठरली.मग हे खूप साधं होतंय म्हणून कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम ठरले.मग आईस्क्रीम पटापट संपवावे लागेल म्हणून नुसतं आईस्क्रीम विकायचं ठरलं.हनुमानाचं शेपूट वाढतच चाललं होतं.
आमचे(प्रत्येकी 1) नवरे घरी वेगवेगळ्या सूचना देत होते.
"चॉकलेट सॉस नका टाकू.खर्च कमी येईल."
"अरे मग उम्फ फॅक्टर कसा येणार कॉफीत?"
"आता हे काय असतं?"
"उम्फ फॅक्टर.ते msn लाइफस्टाइल वर बातम्यात हिरॉईन नि जिम वर्क आऊट चे कमी कपड्यातले फोटो टाकल्यावर येतो तो."
"थांब msn वर जिम वर्क आऊट च्या बातम्या बघून येतो.म्हणजे क्लियर पिक्चर मिळेल."
"नको नको,कॉफीवर चॉकलेट सॉस चा बदाम कसा काढतात गुगल करून सांग त्यापेक्षा."
सामान आणायला लांब जायचं होतं त्या दिवशी आमच्या आधीच्या कंपनी मधल्या एकाची निरोप पार्टी होती.हा प्राणी इतका शांत की हा इंटरव्ह्यू मध्ये तोंड उघडून बोलताना कसा दिसतो आणि ऐकू येतो हे बघायची प्रत्येकाला उत्सुकता होती.पण बोलत असावा.त्याच्या कडे 1 बंगलोर ची आणि 2 हैदराबाद च्या ऑफर होत्या आणि सगळ्यांशी पैशाची बोलणी करत चौथी अजून पैसे देणारी नोकरी मिळते का असे प्रयत्न चालू होते.आम्ही एक ऑफर स्वीकारली की दुसऱ्या कंपनीच्या इंटरव्ह्यू वेळ पक्का करणाऱ्या फोन मध्येच 'मै मन ही मन मे उनको अपना सब कुछ मान चुकी हूँ, शादी के लिये हां कह चुकी हूँ' सांगून रद्द करवणारी माणसं असल्याने अश्या वीरांकडे पराक्रमी गोष्टीतली पात्रं असल्या प्रमाणे बघतो आणि त्यांच्याशी या विषयावर भरपूर माहिती घेतो.पार्टीत येणारा एक पंटर त्याच्या साहेबाला ceo समोर नीट बोलायला आवश्यक मुद्दे 3 तास बसून तयार करून देऊन आल्याने त्याला स्ट्रेस घालवायला रम प्यायची होती.असं करत करत पार्टी संपवून घरी येईपर्यंत सगळी दुकानं बंद. शेवटी एक गिफ्ट शॉप अर्धं शटर बंद होताना थांबवून चमचे द्रोण घेतले.
यापूर्वी मागच्या दसऱ्यात सोसायटीत मिसळ आणि सासूबाई स्पेशल फॉर्म्युला ने बनवलेला कांदा लसूण मसाला विकायचा माझा आणि जावेचा अनुभव होता.त्यावेळी पण मिसळीच्या आत उदार हाताने टाकलेले ओलं खोबरं,उकडलेले बटाटे,कोथिंबीर इ.इ. धरून आपल्याला 'ना नफा ना तोटा' तत्वावर सगळं पडलं असावं अशी आम्हाला शंका होती.वुमेन्स डे ला पाऊण तासात पाणीपुरी विकायचा अनुभव होता.त्यात मात्र नफा झाला होता.
आमच्या रेसिपी चा हाय क्लास कच्चा माल म्हणजे नेस कॅफे,5 लिटर दुध,1 चॉकलेट सॉस,1.5 लिटर साखर,6 क्रीम चे छोटे बॉक्स,आईस्क्रीम फॅमिली पॅक, ड्रिंकिंग चॉकलेट हा खर्च कमिटी देणार असलेल्या खर्चाच्या बराच वर जायला लागला."इको फ्रेंडली पाहिजे सगळं" वाला कमिटी चा नियम पाळला तर पांढरे चांगले कागदी ग्लास 2.5 रु प्रत्येकी पडत होते.शिवाय "कोल्ड कॉफी चांगली दिसायला पारदर्शक ग्लास पाहिजे" हा मुद्दा समोर यायला लागला.अजून पारदर्शक बायोडिग्रेडेबल ग्लास चा शोध लागलाय की नाही काय माहीत.आमच्या आजूबाजूचे दुकानदार प्लास्टिक बंदी मुळे प्लास्टिक ग्लास आणून द्यायला तयार होईना.आम्ही सगळ्या '(ऑफिस बाहेर मावळता)सूर्य न पाहिलेला माणूस' असल्याने फार लांब जाऊन शोधायला वेळ नव्हता.शेवटी कँटीन वाल्याकडे उरलेले प्लास्टिक ग्लास विकत घेतले.त्याला लागलं तर 2-3 लिटर दुध विकत द्यायला पण सांगितलं.येता जाता दिसणाऱ्या, कमी किंमतीत मोठा टंपर भर कोल्ड कॉफी विकणाऱ्या दुकानदारांकडे आम्ही अपार करुणेने वगैरे बघायला लागलो.
स्टॉल चा दिवस उजाडला.सकाळी सकाळी कामाला येऊन 5 लिटर दुध आणि आईस्क्रीम खाली ठेवायला 2 आईस ट्रे भरून फ्रिजर मध्ये ठेवायला दिले.आईस्क्रीम ऐन वेळी समोरच्या दुकानातून आणणार होतो.सजावटीला घरून कॉफी बीन्स आणल्या होत्या.आता एकदम मान खाली घालून 5 तास काम करून मग स्टॉल ला जायचं होतं.
"If anything can go wrong, it will." हा मर्फी बाबाचा नियम तुम्हाला माहीत असेलच.मला हा नियम लहानपणी माहिती नव्हता तेव्हापासून हा मर्फी बाबा कायम त्याच्या नियमाची सिद्धता पटवत बसला आहे.त्याचेही मी एक दिवस दात पाडणार आहे.त्या प्रमाणे अचानक कस्टमर डेमो ठरणं, ठरलेलं काम कोणाकडून तरी माहिती उशिरा आल्याने लांबणं वगैरे वगैरे आलेले 'कहानी मे ट्विस्ट' आम्ही यशस्वी रित्या परतवून लावले आणि 4 ला स्टॉल सजवून हजर झालो.आमच्या भारतीय ऑस्ट्रेलियन गुरुजींना सांगायचा प्रश्नच नव्हता.आमचा प्रोजेक्ट नेहमीच घाईला असतो.'इकडे प्रोजेक्ट चं रोम 3 आठवड्यात जळणार आहे आणि तुला स्टॉल चं फिडल वाजवायला सुचतंय?' म्हणून माझी बिनपाण्याने झाली असती.
'भरपूर बर्फावर आईस्क्रीम ठेवणे' या आमच्या बेताचा बँड वाजला होता.चॉकलेट मूस विकणाऱ्या टीम ने फ्रिजर मध्ये जागा पाहिजे म्हणून आमचे आईस ट्रे दारात कप्प्यात उभे कोंबून ठेवले होते.एकातलं पाणी खाली वाहून गेलं होतं.दुसऱ्यात अगदी थोडा बनलेला बर्फ होता. शेवटी 'आईस्क्रीम लवकर संपवायचं' असं ठरवून आहे तितक्या बर्फावर भांड्यात फॅमिली पॅक ची कोनशीला उभी ठेवली.
मैत्रिणीच्या घरून आणलेला आईस्क्रीम स्कुप स्पून 'सुंदर, गोल स्कुप' देईना झाला.त्याचा खटका दाबल्यावर स्कुप पडेचना.मग शेवटी चमच्याने स्कुप मध्ये आईस्क्रीम स्कुप काढून देणे असा प्रकार चालू करावा लागला.'100 लाकडी चमचे' या साध्या सुध्या प्लॅन मध्ये घोळ दिसायला लागला.लोक कोल्ड कॉफी शेअर करून प्यायला 2 चमचे मागायला लागले.आईस्क्रीम स्लॅब आणि खालचा बर्फ वितळत होता.आईस्क्रीम थोडे मऊ झाल्याने असेल, स्कुप आता चांगले निघायला लागले.'नुसते आईस्क्रीम' स्वस्त असल्याने ते पटापट संपायला लागले.चॉकलेट सॉस आम्ही अंमळ सढळ हस्ते टाकत असल्याने आणि 'नुसत्या कोल्ड कॉफी वर सॉस नाही नुसते ड्रिंकिंग चॉकलेट' ही आमची स्ट्रॅटेजी आम्हीच विसरून सर्व प्रकारावर यज्ञात तूप ओतावं तश्या सढळ हस्ते हर्षीज चॉकोलेट सॉस ओतत असल्याने ती बाटली लवकर तळाला यायला लागली.दूध संपल्यावर कॉफी परत बनवायला टेट्रा पॅक आणि क्रीम घ्यायला 50 लोकांमधून आट्या पाट्या खेळत 7 वेळा कँटीन फ्रिज ला जावे लागले.आम्ही 5 लिटर कोल्ड कॉफी एकत्र बनवून ठेवायला घाबरलो होतो. पावसाळा, थंडी, कोल्ड कॉफी कोण पिणार,वर्स्ट केस प्रत्येकीने 1 लिटर टेट्रा पॅक घरी नेऊन वापरायचा वगैरे वगैरे.त्यामुळे आमच्या कस्टमराना 'ताजी ताजी डोळ्यासमोर क्रीम, दूध घालून हँड ब्लेंडर ने फिरवलेली कॉफी' काही वेळ थांबून मिळायला लागली.आमची सर्व भांडी लहान असल्याने हे बिझनेस मॉडेल काही शेवट पर्यंत बदलले नाही.
आम्हाला बराच सहनशील गिऱ्हाईक वर्ग लाभला असावा.इतके सावकाश सर्व्हिस देऊनही 8 लिटर दुधाची कॉफी, आईस्क्रीम चा एक डबल आणि नंतर विकत आणून एक सिंगल,सर्व चॉकलेट सॉस, नेसकॅफे,4 क्रीम बॉक्स हे सर्व संपले.शेवटी आमच्या चौघींपुरती 4 ग्लास कॉफी आणि एक मुलगा आला त्याला कुपन मोजणी अलरेडी झाल्याने एक ग्लास बिना कुपन असाच इतकेच उरले.2-3 जणींनी कॉफी ची चव चांगली जमली होती असं सांगितलं.
आमच्या पेक्षा सुंदर सजावट वाले,खूप मस्त बोर्ड बनवलेले,चांगली प्रसिद्धी करणारे, प्रसिध्द पदार्थ बनवणारे अनेक स्टॉल्स होते.आणि तरीहि कोल्ड कॉफी सारखा चिकट, मेसी पदार्थ 8 लिटर आणि हाताशी कोल्ड स्टोरेज/बर्फ फार नसताना 2.5 फॅमिली पॅक आईस्क्रीम विकणे हे दोन्ही धंदे करून 1680 रु ची काल्पनिक (आमच्यासाठी कागदी नोटा,ngo ला खरे पैसे) कमाई ngo साठी करू शकलो याने एक नवाच आत्मविश्वास मिळवून दिला.आता पुढच्या वर्षी वाढायला अजून सोपा आणि गोड नसलेला पदार्थ या लष्करच्या भाकऱ्या भाजायची महत्वाकांक्षा तयार झाली आहे.बघूया कसं जमतं ते.
छान छान मी अनु, कोल्ड कॉफीचा
छान छान मी अनु, कोल्ड कॉफीचा स्वाद जिभेवर आला
छान! लेख जमलाय नेहमीप्रमाणे.
छान! लेख जमलाय नेहमीप्रमाणे.
अशा हौशी स्टॉलवर मजा येते ना! ओळखीचेच लोक असतात. कौतुकाने घेतात.आम्ही अकरावीत असताना gathering च्या वेळी असा शेव बटाटा पुरी, ढोकळा आणि अजून कसला कसला स्टॉल ठेवला होता. एका गुजराती मैत्रिणीने ढोकळा घरून करून आणलेला. मजा आली. नफाही झाला होता. (आणि त्या पैशातून आम्ही 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' पाहिला होता)
वाह!! खुसखुशीत नेहमीप्रमाणेच.
वाह!! नेहमीप्रमाणेच लेख खुसखुशीत आहे.
मस्त खुसखुशीत लेख..
मस्त खुसखुशीत लेख..
तुमच्या टीमचं कौतुक..
बादवे ते मासे घरी कसे पोचले आणि आता कसे आहेत ,ह्याची कहाणी वाचायला आवडेल
8 लिटर दुधाची कॉफी, >>>>>
8 लिटर दुधाची कॉफी, >>>>> देवा! अंदाज बरा आला ग तुम्हाला! मस्त मस्त लिहितेस.
उत्साही आहात! प्रीमियम
उत्साही आहात! प्रीमियम ingredients आणि सीन्सरली3 केल्यामुळे आलेली चव ह्यामुळे तुमचा माल मस्त खपला. माशांबद्दल अभिनंदन
मासे अजून जिवंत आहेत
मासे अजून जिवंत आहेत
आम्हाला मेल वर सूचना होत्या
रोज अर्धे पाणी बदल, बोरिंग चे पाणी, क्लोरीन चे पाणी वापरल्यास दिक्लोयझर चे 3 थेंब वगैरे
यातलं फक्त रोज अर्धे पाणी बदल आणि डबाभर मेलेले किडे आणून रोज 3 खाऊ घालणे इतकेच जमलेय.
("माणसं नीट पाळत नाहीस हल्ली, मासे काय पाळणार डोंबल !!" वगैरे अर्थपूर्ण कटाक्ष ते मासे गाडीत ठेवतानाच मिळाले आहेत.)
डबाभर मेलेले किडे आणून रोज 3
डबाभर मेलेले किडे आणून रोज 3 खाऊ घालणे >>>>> सिरियसली? किडे जिवंत असताना फिशटँकमधे घालायचे असतात.
@देवकी - हा फायटर फिश आहे.
@देवकी - हा फायटर फिश आहे. त्याला मेलेले कीडे लागत असतील
________________________
मुलीनेही हॉस्टेलवरती एक बेटा फिश का काय पाळलाय. काय माहीत काय घालते.
डब्यात पॅक मिळतात ते मेलेले
डब्यात पॅक मिळतात ते मेलेले(किंवा मेले घाणेरडे कुत्रे जिवंत फ्रिज केलेले पण असतील, मी नाही टाकत ते) असतात.
मी लहान असताना टॅंक होता, आम्ही त्या काकुंकडून 1 आठवड्याचे जिवंत किडे आणून चिमट्याने रोज खाऊ घालायचो.आता तसे किडे बहुधा पेट शॉप वालेच ठेवत नाहीत.सगळी पब्लिक लाल डब्यातले वाळके कीडे देतात.
मस्त आणि खुसखूशीत लेख.
मस्त आणि खुसखूशीत लेख.
)
(मी एकदा बायकोला पेट्रोलपंपावर विसरुन घरी गेलो होतो आणि लक्षात आल्यावर ती घरी यायच्या आत घर स्वच्छ आवरुन ठेवलं होतं. अर्थात चुकीला माफी नाहीच मिळाली.
मस्त खुसखुशीत लेख! अशा
मस्त खुसखुशीत लेख! अशा इवेंट्सची एक वेगळीच मजा असते!
लेख छान आहे, आवडला
लेख छान आहे, आवडला
वाचून संपताना मासे प्रकरण विसरायला झाले पण किल्लीने बरोबर लक्षात ठेवून विचारलं
कथा मूळपदावर आणण्याकरिता वाढवायला हरकत नाही
खूप छान लिहिलंय . स्टॉल
खूप छान लिहिलंय . स्टॉल वरच्या गमतीजमती मस्तच. मासे पाळायची हौस किती काळ राहतेय ते बघ. मी पण हौसेने अनेकदा मासे पाळले होते. मग तो टॅंक स्वच्छ करणे, पाणी बदलणे आणि 7- 8 महिन्यांनी मासे मरणे याला वैतागुन रिकामा टॅंक ठेवला , कालांतरानं तो ही स्वाहा झाला
मस्त जमलंय,
मस्त जमलंय,
आमची एक मैत्रीण अतिशय उत्साहाने प्रत्येक फनफेअर मध्ये स्टॉल लावते.
त्याची पूर्वतयारी अगदी खच्चून करते
म्हणजे अगदी सबुदानेवडे असतील तर 3 प्रकार चा साबुदाणा आणून कोणता किती फुगतो, आणि एक वाटीत किती वडे वगैरे चे कॉस्टिंग करून ती मैदानात उतरते,
कौतुक वाटते तुम्हा लोकांचे
मस्त लेख!
मस्त लेख!
रेसिपी मैत्रिणीची बरं का
रेसिपी मैत्रिणीची बरं का
आम्ही घरी कोल्ड कॉफी करत नाही, ताक किंवा चहाच पितो.
1 लिटर दुध(आम्ही अमूल ताजा चा लो फॅट टेट्रा पॅक वापरला) मोठ्या पातेल्या/बाउल मध्ये ओतणे
6 चमचे नेसकॅफे छोट्या बाउल मध्ये किंचित कोमट पाण्यात भरपूर फेसणे
1 लिटर दुधाची 7-8 कप( 200 मिली ग्लास पाऊण भरलेला) कॉफी होईल असे धरून 9 सपाट नॉर्मल चमचे साखर आणि केलेले कॉफी द्रावण घालून परत सर्व दूध फेसणे
खोलगट भांड्यात हे मिश्रण 200 ml अमूल क्रीम चा पाऊच रिकामाँ करून परत हँड मिक्सर ने फेटणे
प्लास्टिक ग्लासाला आतल्या बाजूने चॉकलेट सिरप झीग झ्याग मारणे
कॉफी ओतून हवा असल्यास व्हॅनिला स्कुप टाकून परत चॉकलेट सिरप मारून चमचा टाकून देणे. नको असल्यास नुसती कॉफी ओतून सिरप मारून देणे.
कृती छान आहे..
कृती छान आहे..
Mast कृती!
Mast कृती!
लेख आणि कृती दोन्ही मस्त.
लेख आणि कृती दोन्ही मस्त.
वाह! मस्त!
वाह! मस्त!
कोल्ड कॉफीमध्ये आम्ही पक्षी मी मिल्क पावडर वापरतो. क्रीम घालून पहायला हवं.
मस्तच!
मस्तच!
एवढा खटाटोप केल्याबद्दल कौतुक वाटलं.
माश्यांचं काय चालु आहे सध्या? ते दुसर्या लेखात लिहणार आहात का?
कोल्ड कॉफीची रेस्पी छान आहे. करुन बघेन.
रेसिपीपण छान! मी ड्रिंकिंग
रेसिपीपण छान! मी ड्रिंकिंग चॉकलेट पावडर घालते कोकॉ वर. चॉकलेट सॉस घालून बघायला पाहिजे आता.
भारी लिहिलेय एकदम. खूप आवडले
भारी लिहिलेय एकदम. खूप आवडले. ऑफिसात जेवल्यानंतर खाली फिरत फिरत वाचत होते आणि कोण काय बोलेल याची फिकीर न करता मनमुराद जोरात हसत होते

बाकी मी स्टॉलमालकीण असते तर अर्धी कोल्डकॉफी विथ आईस्क्रिम माझ्याच पोटात गेले असते
आवडलं. त्या दिवसभरातल्या
आवडलं. त्या दिवसभरातल्या धावपळीची द्रुत लय लेखनात उतरली आहे.
तुम्ही कधी संथ लयीतलं काही लिहिलंय का?
नेहमीप्रमाणेच मस्त!
नेहमीप्रमाणेच मस्त!

तुमच्या लेखनात आयटी इंडस्ट्रीचे रेफरन्स मस्त असतात.... त्यामुळे साहजिकच बऱ्याच ठिकाणी रिलेट व्हायला होते.
मस्त लेख
मस्त लेख
आवडलं.
आवडलं.
वा मस्त लिहीलय..
वा मस्त लिहीलय..

बायकांना सोडून (विसर्ल्यामुळे) जाणारे खरेच खूप आहेत की..
रेडिमेड ब्लाउजच्या शोकेस मधले
रेडिमेड ब्लाउजच्या शोकेस मधले सोनेरी पाठरूपी मोहक भगदाड वाले ब्लाउज ...
अगदी अगदी......
मस्त लिहीलंय, अनु!
Pages