माझी सैन्यगाथा (भाग २९)

Submitted by nimita on 17 October, 2019 - 04:59

सृष्टीच्या पहिल्या वाढदिवसानंतर डिसेंबर मधे (ऐश्वर्या च्या ख्रिसमसच्या सुट्टीत) आम्ही तिघी थोड्या दिवसांकरता राजौरीला राहायला गेलो. तोपर्यंत तिथली परिस्थिती बरीचशी निवळली असल्यामुळे काही दिवसांकरता आम्हांला (आणि आमच्यासारख्याच इतर परिवारांना) तिकडे जायची परवानगी देण्यात आली होती. जम्मू ते राजौरी हा प्रवास माझ्यासाठी जरी खूप नयनरम्य असला तरी माझ्या दोघी मुलींसाठी खूपच त्रासदायक ठरला आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे ते डोंगरातले नागमोडी रस्ते आणि चढ उतार….त्या दोघींनाही मोशन सिकनेस असल्यामुळे राजौरीला पोचेपर्यंत त्यांची हालत खूपच खराब झाली होती. पण एकदा तिथे पोचल्यावर जेव्हा त्यांनी (खास करून ऐश्वर्या नी) त्यांच्या बाबांना बघितलं ना, तेव्हा प्रवासाचा सगळा शीण कुठल्या कुठे पळून गेला.
तिथली परिस्थिती जरी सामान्य झाली असली तरी आम्हां परिवारजनांना काही बंधनं पाळणं अनिवार्य होतं.आम्हांला कॅन्टोन्मेंट एरिया च्या बाहेर जायची परवानगी नव्हती. जर कधी काही कामानिमित्त मुख्य गावात किंवा तिथल्या बाजारात जायचं असेल तर सुरक्षेसाठी हत्यारबंद सैनिक बरोबर असायचे. पण हा सगळा द्राविडी प्राणायाम टाळण्यासाठी म्हणून आम्ही फारसे बाहेर पडायचोच नाही. हे जेव्हा नंतर माझ्या एका कॉलेजच्या मैत्रिणीला कळलं तेव्हा तिला इतकं आश्चर्य वाटलं होतं… ती मला म्हणाली," हे काय, म्हणजे जवळजवळ महिनाभर तुम्ही तुमच्या कॉलनीबाहेर पडलाच नाहीत? कंटाळा नाही आला का तुम्हांला अशा बंदिस्त वातावरणात ?" तिच्या पामर बुद्धीला मनातल्या मनात क्षमा करत मी म्हणाले," आम्हांला इतके दिवस तिथे नितीन बरोबर राहायला मिळालं यातच आम्ही खुश होतो..आणि आम्ही काही तिकडे sight seeing किंवा शॉपिंग करायला नव्हतो गेलो. ज्या कारणासाठी गेलो होतो ते कारण साध्य झालं….बस्, मग अजून काय पाहिजे ? "
तसंही तिथे आम्ही फक्त २०-२५ दिवसच राहणार असल्यामुळे जास्तीत जास्त वेळ आम्ही चौघांनी एकत्र घालवायचं ठरवलं होतं. रोज संध्याकाळी नितीन ऐश्वर्या ला घेऊन त्याचा evening walk करायला जायचा. तीही अगदी आवडीनी जायची त्याच्या बरोबर. त्या अर्ध्या पाऊण तासात खूप गप्पा व्हायच्या दोघांच्या .. तसं पाहता खरं म्हणजे नितीनचा चालण्याचा स्पीड खूप जास्त आहे. आमच्या लग्नानंतर सुरुवातीला (आगरतला ला असताना) एक दोन वेळा मी त्याच्या बरोबर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते, पण त्याच्याबरोबर चालायचं म्हणजे मला अक्षरशः पळायला लागत होतं..त्यामुळे त्यानंतर आजपर्यंत परत ती चूक केली नाही. पण ऐश्वर्या बरोबर असताना मात्र तो अगदी हळू, तिच्या स्पीड नी चालायचा… मला -"जरा स्पीड वाढव ना तुझा"- असं म्हणणारा माझा नवरा आमच्या मुलीबरोबर मात्र अगदी सावकाश , तिच्या स्पीडनी चालायचा!
राजौरी मधले ते मंतरलेले दिवस बघता बघता उडून गेले . त्या काही दिवसांत आम्ही आमचा एकत्र राहण्याचा आधीचा बॅकलॉग क्लिअर करून घेतला. सृष्टीच्या पहिल्या वाढदिवसाला नितीन येऊ शकला नव्हता म्हणून मग आम्ही चौघांनी परत एकदा तिचा वाढदिवस साजरा केला. तिथल्या इतर ऑफिसर्स आणि त्यांच्या परिवारांबरोबर नवीन वर्षाचं स्वागत केलं.
आता आमचा तिघींचा पुन्हा जम्मूला जायचा दिवस जवळ येऊन ठेपला होता. मी आठवड्याभरा पासूनच दोघी मुलींना त्या दृष्टीनी मानसिकरित्या तयार करत होते.. त्यामागचा हेतू एकच- त्यांच्या बाबांना सोडून जाताना त्यांना जास्त अवघड जायला नको.
ठरलेल्या दिवशी सकाळी लवकरच आम्ही तिघींनी राजौरीला रामराम ठोकला आणि पुन्हा जम्मूच्या दिशेनी प्रस्थान ठेवलं. आदल्या रात्री दोघी मुली त्यांच्या बाबांशी खूप उशिरापर्यंत खेळत, गप्पा मारत जाग्या होत्या; त्यामुळे प्रवास सुरु झाल्यावर थोड्याच वेळात दोघींची विकेट पडली. पण मला प्रवासात फारशी झोप येत नाही- आणि प्रवास जर दिवसाचा असेल तर मग झोपण्याचा प्रश्नच उद्भवत नाही - कारण मला अशा वेळी बाहेर रस्त्यावर दिसणारी दृश्यं बघायला खूप आवडतं. कोसा कोसावर बदलत जाणारी माती, झाडं झुडुपं, घरांची बदलत जाणारी रचना, लोकांची वेशभूषा - सगळं किती इंटरेस्टिंग वाटतं ! आपल्या देशात आढळून येणारी ही विविधता मला नेहेमीच खूप अद्भुत वाटते.
तर सांगायचा मुद्दा हा की त्या दिवशी सुद्धा मी प्रवासात जागीच होते आणि गाडीच्या खिडकीतून बाहेरची दृश्यं बघत होते. डोंगर दऱ्या कापत जाणारा रस्ता...साहजिकच दोन्ही बाजूला निसर्गाची, भूमातेची विविध रूपं डोळ्यांसमोरून धावत होती..कधी छोट्या-मोठ्या टेकड्या तर कधी हिरवीगार कुरणं !जसजसा दिवस वर येऊ लागला तशीतशी रस्त्यांवर तिथल्या स्थानीय गावकऱ्यांची, शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींची वर्दळ वाढायला लागली.
तेव्हाची नाजूक परिस्थिती लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीनी प्रत्येक मिलिटरी च्या गाडी बरोबर एक हत्यारबंद गाडी तैनात असायची. या नियमानुसार अर्थातच आमच्या गाडीच्या पुढे देखील एक हत्यारबंद गाडी होतीच. आणि गंमत म्हणजे रस्त्यावरून येणारी जाणारी छोटी छोटी मुलं आमच्या गाड्या बघून जागेवरच उभी राहून आम्हांला सॅल्युट ठोकायची...एकानी सुरू केलं की मग काय - त्याच्या बरोबरची सगळीच मुलं ' एक साथ सॅल्युट' करायची ! त्यांचा तो खोडकर उत्साह बघून खूप मजा येत होती.
मधे सुंदरबनी ला एक चहाचा ब्रेक घेऊन आम्ही पुढे निघालो आणि दुपारी साधारण दीड दोन च्या सुमाराला जम्मूला आमच्या घरी पोचलो.
ओळखीचा परिसर आणि सवयीची जागा दिसल्यामुळे सृष्टी खूप खुश झाली. गाडीतून आम्ही बाहेर निघाल्या निघाल्या लगेच माझ्या कडेवरून खाली उतरून घराच्या दारापाशी जाऊन पोचली सुद्धा. घराचं मुख्य लाकडी दार उघडून आत गेल्या गेल्या मी क्षणभर थबकले. माझं लक्ष व्हरांड्यात ठेवलेल्या डोअर मॅट वर गेलं. त्याच्यावर मला काहीतरी हलताना दिसलं. आधी सृष्टीला उचलून कडेवर घेतलं आणि तिला घराबाहेर नेत ऐश्वर्या बरोबर बाहेरच थांबायला सांगितलं. दोन पावलं पुढे होऊन जरा नीट निरीक्षण केलं तेव्हा लक्षात आलं की ते एका भल्यामोठ्या झुरळाचे पंख होते. पण माझ्या घरातल्या झुरळांचा तर मी केव्हाच नायनाट केला होता. 'अरे देवा, म्हणजे मागच्या महिन्याभरात मी नाही असं बघून या शत्रूनी परत एन्ट्री घेतली की काय घरात? पण मग इथे जर नुसते त्याचे पंखच दिसतायत याचाच अर्थ कोणीतरी त्या जीवाला मारून खाल्लं असावं….पण कोणी ? साप ?? छे, साप असं selective जेवण का करेल! मग कोण ? बेडूक?? पण मी तरी तोपर्यंत कोणत्याही बेडकाला कधी पंख सोडून नुसतं झुरळ खाताना पाहिलं नव्हतं...त्यामुळे बेडूक ही लिस्ट मधून आऊट झाला...मग कोण? विंचू??? हं, शक्यता नाकारता येत नव्हती. पण मग आता हा विंचू कुठे आणि कसा शोधायचा ?" काही क्षणांत इतके सगळे विचार येऊन गेले माझ्या मनात ! बाहेरून ऐश्वर्या आणि सृष्टी आत यायची घाई करत होत्या. त्यांना परिस्थितीची थोडीशी कल्पना देत अजून थोडा वेळ थांबायला सांगितलं आणि माझा मोर्चा पुन्हा त्या crime scene कडे वळवला. 'जिथे पुरावा मिळालाय तिथूनच तपास सुरू करावा,' असा विचार करत मी समोरच्या shoe rack मधून माझी एक चप्पल हातात घेतली आणि एका बाजूनी हळूच ते डोअर मॅट उचलून धरलं… बघते तर काय - त्याच्याखालून एक भला मोठा विंचू निघाला आणि दाराच्या म्हणजेच पर्यायानी माझ्या दिशेनी धावायला लागला. मी पण पूर्ण तयारीतच होते. त्याला काही कळायच्या आत मी चप्पलच्या एका फटक्यात त्याला तिथेच गारद केलं. आत जाऊन सगळ्या घरात खाली वाकून वाकून जिथे नजर पोचत होती तिथपर्यंतची जमीन चेक करून खात्री करून घेतली आणि मग मुलींना आत बोलावलं. नंतर जेव्हा त्या धारातीर्थी पडलेल्या विंचवाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला केरभरणीत उचलून घेतलं तेव्हा त्याचा खरा आकार लक्षात आला… बराच लांब आणि मोठा होता तो- जवळजवळ सहा सात इंच तरी असेल! क्षणभर मनात चर्र् झालं…..रोज दुपारी ऐश्वर्याची वाट बघताना सृष्टी जिथे उभी असायची बरोब्बर त्याच जागी तो विंचूही दबा धरून बसला होता. वेळीच लक्षात आल्यामुळे पुढे येणारं संभाव्य संकट टळलं होतं !
क्रमशः

प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो,

आजपर्यंत तुम्ही माझ्या सैन्यगाथेचं खूप कौतुक केलंत. प्रत्येक वेळी अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात. तुम्हां सगळ्यांबरोबर मी माझ्या या सैनिकी प्रवासातला प्रत्येक दिवस, प्रत्येक अनुभव पुन्हा नव्यानी जगले. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी सुचवल्याप्रमाणे आता लवकरच माझी ही सैन्यगाथा मी पुस्तक रुपात तुमच्या समक्ष घेऊन येते आहे.

तेव्हा आता यापुढील (शेवटचे काही) भाग पुस्तकात वाचायला विसरू नका.

तुमचं प्रोत्साहन आणि प्रेम असंच सतत लाभत राहील आणि मला अजून लिहायची प्रेरणा देईल याबद्दल खात्री आहे मला !

तुम्हां सर्वांचे अगदी मनापासून आभार !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका जीवनात कित्येक जीवने जगलाहात तुम्ही ! जीवनाचा , निसर्गाचा , समाजाचा , सैनिकी विश्वाचा ... कशा - कशाचा अनुभव आणि आनंद घेतला आहे तुम्ही !
सुख - दु:ख , निराशा , आशा , यश , प्रेम , धीरोदात्त संयम , असहायता , श्रद्धा , आदर ... सगळ्या सगळ्या भाव - भावनांचा चिंब भिजावणारा नियतीचा प्रपात शिरावर घेऊन सगळ्या-सगळ्या वधिलिखिताना कवेत घेऊन !

आणि तो शब्दश: वाचकां समवेत लुटला आहे , सोन लुटाव तसा !

तुम्हाला श त श: सलाम .

अभिनन्दन! लेखमाला खूप छान होती. सैन्य कुटुम्बीय कसे रहातात याची थोडीफार ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. अन्यथा या बद्दल काहिच माहिती नव्हती. पुढील वाटचाली साठी तुम्हाला आणि परिवाराला शुभेच्छा Happy

पशुपत यांना अनुमोदन.
कधी नयनरम्य परीसरातून फेरफटका तर कधी प्राण कंठाशी यायला लावणारे भावनांचे उचंबळ, कधी ममकार तर कधी गंमतीदार असे छान छान अनुभव! तुमच्या लेखनात जादू आहे. पुस्तकासाठी खूप शुभेच्छा!

Praj,
सध्या lockdown मुळे पुस्तकाचं काम लांबणीवर पडलं आहे. Happy