हरवलेलं आईपण

Submitted by सामो on 11 October, 2019 - 14:28

माझी एक मैत्रिण आहे. शरयु म्हणुन. ती साधारण २९-३० वयामध्ये अमेरीकेमध्ये आली. त्यावेळी तिची लेक होती ३ वर्षांची. पहील्यांदा ती आली आणि मग तीन महीन्यांनी तिचा नवरा, लेकीला घेउन आला. बरं हिचा जॉब व्यवस्थित चालू होता. पण नवर्‍याला काही जॉब लागत नव्हता. कारण त्याचं फील्ड फार वेगळं होतं शिवाय एच-४ व्हिसा. मग ३-४ वर्षं नवरा मुलीला सांभाळत धडपड करत होता. आणि ही घरातील, एकमेव अर्निंग मेंबर होती. ही मात्र उशीरा पर्यंत ऑफिसात कामाला जुंपलेली असे. वीकेन्डसना देखील क्वचित ऑफिसात जावे लागे. या सर्वात तिच्या मुलीला फार कमी वेळ देता येई.
नंतर त्या ताणाने आणि मुख्य म्हणजे झोपेच्या अनियमिततेमुळे, ती आजारी पडली. आजार चिघळला, एक / दीड वर्षं उपचार होतच होते,औषधं लागू पडेपर्यंत, स्टॅबिलिटी येईपर्यंत तितका काळ गेला. त्याही काळात नवर्‍याला नोकरी नाही कारण एच-४ व्हिसा. हिच्यावरच घरची कमाईची जबाबदारी. खूप ताणाची वर्षे होती, डोक्यावर सतत अनिश्चिततेची तलवार असे. आजारात मुलीशी ना खेळता आलं ना लाड करता आले. चिमुकली लेक आजारामुळे आईला आढ्याकडे डोळे लावुन पडलेली पाही नाहीतर मग ऑफिसकरता आवराआवर करताना. असे दिवस गेले, मुलगी झाली ७-८ वर्षांची. पुढे तिला दूरगावी नोकरी मिळाली. ग्रीन कार्ड नसल्याने, येईल ती नोकरी स्वीकारत गेली. मिळेल तिथे फिरत राहीली नशीबाने त्या काळात, तिच्या सासूबाईंना ग्रीन कार्ड मिळाल्याने त्या अमेरीकेत, आल्या. इकडे नवरा स्कॉलरशिप मिळवून पी एच डी करत होता. पण फिरतीच्या नोकरीमुळे एकंदर घरी जाता येत नसे. मुलगी मोठी होत होती. नशीबाने सासूबाई मुलीचं बघत होत्या.
बाहेरगावी तिच्या अपरोक्ष मुलगी मोठी होत राहीली, हिच्या स्वप्नात मात्र मुलगी ३ वर्षाचीच येत राहीली. काही काळाने घरी आली तोवर घरादाराला, तिच्या नसण्याची छान अगदी मस्त सवय होउन गेली होती. विशेषतः मुलीने डिफेन्स मेकॅनिझमही असेल, पण हिच्याबरोबरचे भावनिक नाते तोडलेले होते. मुलगी मोकळेपणाने बोलत नसे. तिलाही सवय न राहील्याने, मुलीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणुन काही तिला बघता येत नसे. उदाहरणार्थ - टिनेजमध्ये मुलांचे व्यक्तीमत्व घडत असते , हे विसरुन ती मुलगी लहान असल्यासारखीच ट्रीट करे. यातून मुलगी तिच्याजवळ खुलण्या पेक्षा दूर दूर गेली. मुलीला आज्जी जास्त जवळची वाटे. हे देखील तिने पचविले, न पचून करते काय.
पुढे साबा ७६ व्या वर्षी वारल्या. तोवर मुलगी कॉलेजला जाण्याइतकी मोठी झाली. पिल्लू घरट्यातून उडून गेले.
___________ ही झाली शरयुची चित्तरकथा, रडकथा, नाईलाज को इलाज क्या कहाणी_____

आता वाचकांनी सल्ला द्यायचा आहे. नव्हे तशी विनंती आहे.-

तिची मातृत्वाची आस अपूर्ण राहीली ती राहीली. आता मेनापॉझच्या काळात मन सैरभैर होतं, मध्येच रडू येतं. वैफल्य येतं. मुलीची आठवण येते. कोणा बाळाला तरी जवळ घेउन त्यावरती मायेचा वर्षाव करावा असे वाटते. तिने विचारही करुन पाहीला की एखादे मूल दत्तक घ्यावे की काय. पण आपल्या सोयीसाठी दत्तक घेणे चूकीचे आहे हे तर तिला कळतेच परंतु दत्तक घेतलेल्या मुलांचे काही इश्युज निघाले तर ते सोडविण्यास तिला असमर्थ वाटते. कोणताही पाळीव प्राणी आणायचा म्हणजे जबाबदारी. त्याचं हगणं - मुतणं कोणी काढायचं. म्हणुन तो ऑप्शनही रद्दबातल झालेला आहे. ती अजुनही नोकरी करते. तिला सतत वाटतं आयुष्यात आपण फक्त एक 'नोकरदार' भूमिका केली. ना मुलीवर संस्कार करायला आपल्याकडे कधी वेळ होता ना, लाड करायला. धडपणे मुलीला खायलाही आपण घालू शकलो नाही. तिची उंची जास्त वाढली असती का, जर मी तिचा आहार सांभाळला असता? असे बेसिक प्रश्न तिला पडतात. तिला मनस्वी त्रास होतो. मुलगीही क्वचित लागेलसं पट्टकन बोलून जाते -तुला अमकं तरी माहीते का? माझं वय काय हे तरी माहीते का? टाइप्स. असं झालं की तिच्या जिव्हारी लागते. डोळ्यात पाणी येते. मुलगी शहाणी आहे क्वचितच असे होते. हे नेहमीचे नाही. हा नॉर्म नाही. नवर्‍याला कधी हे बोलून दाखवलं की तो म्हणतो - काहीच वर्षं तर दूर होतीस, त्याला हे कळत नाही - ती मनानी नेहमीच दूर राहिली. एक तर आजारपणामुळे किंवा ऑफिसात पिळून घेतल्यामुळे.
___________________________________________
मेनापॉज हा फॅक्टर आहेच त्यासंदर्भात सल्ला दिला तरी तो वेलकमच आहे. पन्नाशीच्या सुमारास, मन प्रसन्न कसं ठेवायचं? भूतकाळात जे होउन गेलं त्यावर कुठे कुणाचं नियंत्रण असतं? सगळं कळतं पण वळत नाही. कधीकधी तिला काउन्सिलिंग घ्यावेसे वाटते. That she might opt for. मी तिला खूप सांगू पहाते - "शरयु, अगं आपल्यालाच फार वाटतं. मुलांना अगदी प्रचंड अशी आपली गरज नसते. तू जेवढा वेळ मुलीला दिलास, तो कदाचित तिला पुरला असेल. तू का स्वतःला कोसून घेतेस?" तरी आता, सुजाण वाचकांनी सल्ला द्यावा.

Group content visibility: 
Use group defaults

<<<तिची मातृत्वाची आस अपूर्ण राहीली ती राहीली. >>>
<<< नवर्‍याला कधी हे बोलून दाखवलं की तो म्हणतो - काहीच वर्षं तर दूर होतीस, त्याला हे कळत नाही - ती मनानी नेहमीच दूर राहिली. >>>
तिच्या जागी नवऱ्याने फिरतीची नोकरी वगैरे केली असती तर असा लेख आला असता का? आणि काय प्रतिक्रिया आल्या असत्या, हाच विचार सर्वप्रथम डोक्यात आला. बिचाऱ्या आईने खस्ता खात, एकटीने लहानाचे मोठे केले आणि नवरा मात्र बायको-मुलीला टाकून मजा करत उंडारत होता, असे काहीसे वाचायला मिळाले असते.

अ‍ॅमीचे हे पटले >>> मैत्रिणीने हे मुद्दाम केले नाही हे. परिस्थिती तिच्या व नवर्‍याच्याही हातात नव्हती. म्हणुन स्वतःला दोष देऊ नये.

आशा आहे, नाते सुधारेल.

सीमंतिनी, ' कृतज्ञता' हे मूल्य तिने आचरले पाहीजे खरे आहे. पण माणसाचं मन नेहमी काय आहे पेक्षा काय नाही वरच रेंगाळत असतं. त्याशिवाय मनाच्या श्लोकांची गरज पडली नसती. पण हा उपाय आवश्यक आहे हे खरे आहे. ती भयंकर निगेटिव्ह गोष्टी लक्षात ठेवणारी अशी स्वतःकरताच त्रासदायक व्यक्ती आहे खरी. तिला सांगते की निदान स्वतःच्या मनःस्वास्थ्याकरता आता 'कृतज्ञता' हे सूत्र आचरणात आण बाई.
'

Happy आपण आपल्या आयुष्यात खूश असलं तर मुलगी "हे माहिती का ते माहिती का" म्हणाली तर "हायला, नाही माहिती पण मस्त कॉफी करते, सांग मला" म्हणून पुढे चालत राहता येतं. इतक्या गोष्टी असतात मॅनेज करायला की "हे माहिती नाही" ह्याचे अवाजवी दु:ख नसते. आपण आपला सांभाळ, आपली शिस्त नीट करायला शिकलो की इतर (इतरमध्ये मुलं पण) शिस्तीत राहतात. आणि नाहीच राहिले तरी त्याचा त्रास आपण करून घेत नाही.

मुलीपेक्षा शरयूला स्वतःला ह्या क्षणी 'मॉडेल' आईची जास्त गरज आहे असे वाटले.

>>>> मुलीपेक्षा शरयूला स्वतःला ह्या क्षणी 'मॉडेल' आईची जास्त गरज आहे असे वाटले.>>>>>> खरं तर माझ्या मते तिला बर्‍याच गोष्टींची गरज आहे आणि डिव्हाइड & रुल ओर रादर रुल आऊट करायला, तिने काउन्सिलरकडे जायला हवे. हार्मोनल अप्स डाउन्स मुळे हे प्रॉब्लेम अजुन बाऊ वाटण्याचा संभवा आहेच की. जेव्हा दुसर्‍याबद्दल मनात खदखदते, दुसरा काही बोलला की रडू येते तेव्हा कुठेतरी आत्मपरीक्षणाचीही गरज असते.
.
माझी एक मैत्रीण मला मस्त म्हणाली होती - We teach other ppl how to treat us Happy कसलं मार्मिक वाक्य आहे ते.

मुलीशी मैत्री जुळवण्याचा प्रयत्न करावा.आणि तिच्या(आईच्या) हातात काही नव्हते हे सत्य पटवून सांगावे.आईने संवाद वाढवावा. मुलगी मोठी आहे. समजून घेईल.आणि हो मेनॉपॉजबद्दलही माहिती द्यावी

इतकं महत्वाचं वाटत होतं हे सगळं तर तेव्हाच काही वर्षांनंतर भारतात परतून वेळ द्यायचा विचार का नाही केला. हातात नसलेली परिस्थिती खरच होती का? त्यापेक्षा जाणीवपूर्वक केलेली निवड होती त्यांनी.
सर्व सल्ले छान पण उगाच आपण परिस्थितिचे बळी वगैरे असल्याचा आव आणण्यात काय अर्थ?

इतकं महत्वाचं वाटत होतं हे सगळं तर तेव्हाच काही वर्षांनंतर भारतात परतून वेळ द्यायचा विचार का नाही केला. हातात नसलेली परिस्थिती खरच होती का? त्यापेक्षा जाणीवपूर्वक केलेली निवड होती त्यांनी.
सर्व सल्ले छान पण उगाच आपण परिस्थितिचे बळी वगैरे असल्याचा आव आणण्यात काय अर्थ? >> +१
we make choices but in the end choices make us

<< मेनापॉज हा फॅक्टर आहेच त्यासंदर्भात सल्ला दिला तरी तो वेलकमच आहे. पन्नाशीच्या सुमारास, मन प्रसन्न कसं ठेवायचं? भूतकाळात जे होउन गेलं त्यावर कुठे कुणाचं नियंत्रण असतं? >>> मेनोपॉज मध्ये भावनिक नियंत्रण यायला मेडिटेशन अगदी नियमित पणे करावं. मनाचे श्लोक , गीता यांच्या अर्थसहित चा वाचण्याने, 'आपण सगळ्या गोष्टींचा कर्ता नाही , तो कर्ता करविता आपल्या काही करवून घेतो' अशी जाणीव आली तर मैत्रिणीला स्वतः ला वाटणारी अपराधी पणाची बोच कमी होईल.
भूतकाळातल्या प्राप्त परिस्थितीत आपण आपलं कर्तव्य पार पाडले होते, म्हणून भूतकाळ बद्दल स्वतःस क्षमा करून टाकायची हे जाणीपूर्वक शिकायला हवे.
"आजचा दिवस तरी मी दुःख करणार नाही . घडलेल्या सर्व गोष्टींना मी एकटीच जबाबदार नसल्याने, जीवनातल्या तसेच आजच्या दिवसात घडलेल्या चांगल्या गोष्टी आठवेन आणि त्या बद्दल ईश्र्वराची कृतज्ञ राहीन".... अशी सकारात्मक विचारांची सवय लाऊन घ्यावी.
आपल्यापेक्षा पराकोटीचे दुःख सहन करणारी लुळी, पांगळी, असाध्य रोग झालेली माणसे आठवावी आणि आपल्या चांगल्या परिस्थितीची, आरोग्याची बाजू लक्षात घेऊन दुःख करायचे नाही , प्रत्येक घटने कडे साक्षी भावाने पाहायचे सुरू करावे.
'प्रत्येक नकारात्मक भावनेच्या परिणामामुळे शरीर आणखी आजारी होईल असे लक्षात घेणे हे मेनोपोज मधून जाणाऱ्या प्रत्येक स्त्री साठी अत्यंत आवश्यक आहे.

तिने 'बागकाम' सुरु केलेले आहे. बागकामातही बियाणापासुन इवली 'रोपे' जगविणे, ती 'हार्डन' करणे म्हणजे हळू हळू ऊन दाखवत त्यांना सुदॄढ करणे आदि पालकत्व निभावण्याचे पैलू आहेत. (https://www.fix.com/blog/steps-to-harden-seedlings) मातृत्वाची आस कन्स्ट्रक्टिव्ह रीतीने चॅनेलाइझ होते आहे - असे तिचे मत आहे. सर्वांचे मदतीबद्दल आभार. माबोकरांचे ती मनापासून आभार मानते.

Pages