हरवलेलं आईपण

Submitted by सामो on 11 October, 2019 - 14:28

माझी एक मैत्रिण आहे. शरयु म्हणुन. ती साधारण २९-३० वयामध्ये अमेरीकेमध्ये आली. त्यावेळी तिची लेक होती ३ वर्षांची. पहील्यांदा ती आली आणि मग तीन महीन्यांनी तिचा नवरा, लेकीला घेउन आला. बरं हिचा जॉब व्यवस्थित चालू होता. पण नवर्‍याला काही जॉब लागत नव्हता. कारण त्याचं फील्ड फार वेगळं होतं शिवाय एच-४ व्हिसा. मग ३-४ वर्षं नवरा मुलीला सांभाळत धडपड करत होता. आणि ही घरातील, एकमेव अर्निंग मेंबर होती. ही मात्र उशीरा पर्यंत ऑफिसात कामाला जुंपलेली असे. वीकेन्डसना देखील क्वचित ऑफिसात जावे लागे. या सर्वात तिच्या मुलीला फार कमी वेळ देता येई.
नंतर त्या ताणाने आणि मुख्य म्हणजे झोपेच्या अनियमिततेमुळे, ती आजारी पडली. आजार चिघळला, एक / दीड वर्षं उपचार होतच होते,औषधं लागू पडेपर्यंत, स्टॅबिलिटी येईपर्यंत तितका काळ गेला. त्याही काळात नवर्‍याला नोकरी नाही कारण एच-४ व्हिसा. हिच्यावरच घरची कमाईची जबाबदारी. खूप ताणाची वर्षे होती, डोक्यावर सतत अनिश्चिततेची तलवार असे. आजारात मुलीशी ना खेळता आलं ना लाड करता आले. चिमुकली लेक आजारामुळे आईला आढ्याकडे डोळे लावुन पडलेली पाही नाहीतर मग ऑफिसकरता आवराआवर करताना. असे दिवस गेले, मुलगी झाली ७-८ वर्षांची. पुढे तिला दूरगावी नोकरी मिळाली. ग्रीन कार्ड नसल्याने, येईल ती नोकरी स्वीकारत गेली. मिळेल तिथे फिरत राहीली नशीबाने त्या काळात, तिच्या सासूबाईंना ग्रीन कार्ड मिळाल्याने त्या अमेरीकेत, आल्या. इकडे नवरा स्कॉलरशिप मिळवून पी एच डी करत होता. पण फिरतीच्या नोकरीमुळे एकंदर घरी जाता येत नसे. मुलगी मोठी होत होती. नशीबाने सासूबाई मुलीचं बघत होत्या.
बाहेरगावी तिच्या अपरोक्ष मुलगी मोठी होत राहीली, हिच्या स्वप्नात मात्र मुलगी ३ वर्षाचीच येत राहीली. काही काळाने घरी आली तोवर घरादाराला, तिच्या नसण्याची छान अगदी मस्त सवय होउन गेली होती. विशेषतः मुलीने डिफेन्स मेकॅनिझमही असेल, पण हिच्याबरोबरचे भावनिक नाते तोडलेले होते. मुलगी मोकळेपणाने बोलत नसे. तिलाही सवय न राहील्याने, मुलीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणुन काही तिला बघता येत नसे. उदाहरणार्थ - टिनेजमध्ये मुलांचे व्यक्तीमत्व घडत असते , हे विसरुन ती मुलगी लहान असल्यासारखीच ट्रीट करे. यातून मुलगी तिच्याजवळ खुलण्या पेक्षा दूर दूर गेली. मुलीला आज्जी जास्त जवळची वाटे. हे देखील तिने पचविले, न पचून करते काय.
पुढे साबा ७६ व्या वर्षी वारल्या. तोवर मुलगी कॉलेजला जाण्याइतकी मोठी झाली. पिल्लू घरट्यातून उडून गेले.
___________ ही झाली शरयुची चित्तरकथा, रडकथा, नाईलाज को इलाज क्या कहाणी_____

आता वाचकांनी सल्ला द्यायचा आहे. नव्हे तशी विनंती आहे.-

तिची मातृत्वाची आस अपूर्ण राहीली ती राहीली. आता मेनापॉझच्या काळात मन सैरभैर होतं, मध्येच रडू येतं. वैफल्य येतं. मुलीची आठवण येते. कोणा बाळाला तरी जवळ घेउन त्यावरती मायेचा वर्षाव करावा असे वाटते. तिने विचारही करुन पाहीला की एखादे मूल दत्तक घ्यावे की काय. पण आपल्या सोयीसाठी दत्तक घेणे चूकीचे आहे हे तर तिला कळतेच परंतु दत्तक घेतलेल्या मुलांचे काही इश्युज निघाले तर ते सोडविण्यास तिला असमर्थ वाटते. कोणताही पाळीव प्राणी आणायचा म्हणजे जबाबदारी. त्याचं हगणं - मुतणं कोणी काढायचं. म्हणुन तो ऑप्शनही रद्दबातल झालेला आहे. ती अजुनही नोकरी करते. तिला सतत वाटतं आयुष्यात आपण फक्त एक 'नोकरदार' भूमिका केली. ना मुलीवर संस्कार करायला आपल्याकडे कधी वेळ होता ना, लाड करायला. धडपणे मुलीला खायलाही आपण घालू शकलो नाही. तिची उंची जास्त वाढली असती का, जर मी तिचा आहार सांभाळला असता? असे बेसिक प्रश्न तिला पडतात. तिला मनस्वी त्रास होतो. मुलगीही क्वचित लागेलसं पट्टकन बोलून जाते -तुला अमकं तरी माहीते का? माझं वय काय हे तरी माहीते का? टाइप्स. असं झालं की तिच्या जिव्हारी लागते. डोळ्यात पाणी येते. मुलगी शहाणी आहे क्वचितच असे होते. हे नेहमीचे नाही. हा नॉर्म नाही. नवर्‍याला कधी हे बोलून दाखवलं की तो म्हणतो - काहीच वर्षं तर दूर होतीस, त्याला हे कळत नाही - ती मनानी नेहमीच दूर राहिली. एक तर आजारपणामुळे किंवा ऑफिसात पिळून घेतल्यामुळे.
___________________________________________
मेनापॉज हा फॅक्टर आहेच त्यासंदर्भात सल्ला दिला तरी तो वेलकमच आहे. पन्नाशीच्या सुमारास, मन प्रसन्न कसं ठेवायचं? भूतकाळात जे होउन गेलं त्यावर कुठे कुणाचं नियंत्रण असतं? सगळं कळतं पण वळत नाही. कधीकधी तिला काउन्सिलिंग घ्यावेसे वाटते. That she might opt for. मी तिला खूप सांगू पहाते - "शरयु, अगं आपल्यालाच फार वाटतं. मुलांना अगदी प्रचंड अशी आपली गरज नसते. तू जेवढा वेळ मुलीला दिलास, तो कदाचित तिला पुरला असेल. तू का स्वतःला कोसून घेतेस?" तरी आता, सुजाण वाचकांनी सल्ला द्यावा.

Group content visibility: 
Use group defaults

तुमच्या मैत्रिणीला मायबोली, मिसळपाव, ऐसिअक्षरे वगैरे वर अकाउंट काढायला सांगा. मस्त टाईमपास होईल आणि असले विचार मनात येणार नाहीत.
आधीच अकाउंट असतील तर आणखी काढायला सांगा.

काय सल्ला द्यावा हे कळत नाही. तुम्ही तिला जे सांगितलंत त्यात तथ्य असेलही पण मुलांचं लहानपण आपण एन्जॉय करायला मोकळे नव्हतो ही अपराधी भावना काढून टाकणं सोपं नसावं. काऊन्सेलिंग नक्की ट्राय करावं. मुलीशी पुन्हा रिकनेक्ट होण्गाकरता प्रयत्न करावेत. मैत्रिण म्हणून, आई ह्या रोलपेक्षाही. तिच्याशी मोकळेपणाने बोलणं शक्य असल्यास तो ही प्रयत्न करावं.

तिला कन्येशीच एकदा मोकळेपणी चर्चा करायला हवी, परिस्थितीमुळे कळत नकळत झालेल्या चुका, मुलीबरोबरचे नाते ठीक करण्यासाठी मुलीलाच बोलते करणे, मुलीच्या मातेबद्दल ज्या तक्रारी असतील त्या मोकळेपणाने ऐकुन घेणे, त्यावर स्वतःचे मान्य/अमान्य/नाईलाज अशी जी परिस्थिती असेल ती समजाऊन सांगणे. मुख्य म्हणजे कमीपणा घेऊन, काही कारणे असोत पण मी तुला वेळ देऊ शकले नाही याचा मला खुप वाईट वाटते आहे व ते मल ठीक करायचे आहे हे कन्येपर्यंत पोचवणे.

पूर्ण परिस्थिती माहित नसल्याने सल्ला वगैरे म्हणून नाही पण
३-५ वर्षे वयांच्या मुलींच्या फॉस्टर केअर संदर्भात (फुल टाईम फॉस्टरिंग करण्याची ईच्छा नसल्यास पार्ट टाईम किंवा फॉस्टरिंग सिस्टिम ला हातभार लावणरे ईतर कामही करता येते) काम केल्यास अजून काही मुली ज्यांना आई बरोबरच आजीचे प्रेम आणि सहवासही लाभला नाही त्यांना अशी मायेची सावली देता येईल.

सामो, मैत्रिणीची पूर्वपीठिका दुर्दैवी आहे खरंच, पण भविष्य होपलेस नाही.

मुलगी आता मोठी आहे, शहाणीही आहे म्हणतेस, तिच्याशी जाणीवपूर्वक मैत्री करता येऊ शकते. कधीतरी तिला आपली बाजू थोडक्यात सांगून दोघींतल्या वाया गेलेल्या काळाबद्दल मनापासून हळहळ व्यक्त केली तर तिच्यापर्यंत नक्की पोचेल असं मला वाटतं. नुसता असा प्रयत्न केला तरी तेवढ्यानेसुद्धा शरयूच्या मनावरचं ओझं थोडंफार हलकं होईल.

दत्तक मुलाची किंवा पाळीव प्राण्याची कायमस्वरूपी जबाबदारी घ्यायला नको वाटतं हे समजण्यासारखं आहे. पण प्राण्यांची आवड असेल तर जवळच्या अ‍ॅनिमल शेल्टरमध्ये रेग्युलरली वेळ आणि/किंवा वस्तूंची मदत करता येऊ शकते. त्यातूनही बॉन्ड्स तयार होतात. मुलांची आवड असेल आणि शक्य असेल तर उपलब्ध वेळात ट्यूशन्स, चाइल्डकेअर असं काही ती प्रोव्हाइड करू शकते का?

काउन्सिलिंगबद्दल तू लिहिलं आहेसच - ते नक्कीच ट्राय करावं.

एवढ्या कमी माहितीवरून लिहिणं कदाचित चुकीचं आहे, पण शरयूने इतर कोणाआधी स्वतःच स्वत:ला क्षमा करायला हवी आहे असं वाटतं. सोल ब्रेडविनर असणं, आजारी पडणं, यातलं काहीच तिच्या नियंत्रणात नव्हतं. उलट त्याही परिस्थितीत ती काम करून घर चालवत राहिली हे कौतुकास्पदच आहे आणि त्यानेही तिच्या मुलीच्या वाढीत तिचा अप्रत्यक्षरीत्या का होईना पण हातभार लागलेला आहेच हे तिला सांग.

सुनिधीने लिहिलेय तेच लिहिणार होते. गेलेले क्षण परत येणार नाहीत पण अजून वेळ इतकीही निघून गेली नाहीये. मुलीशी मोकळेपणाने बोलून पहावे नक्कीच. गिल्टसकट स्वतःची बाजू सांगून पहावी. मुलीला ती समजून घेता आली तर अजूनही दोघींमधे चांगले नाते निर्माण होऊ शकते.

हाब फॉस्टर पेरेंटींगचा विचार तिने केला. परंतु फॉस्टर केअरचे ही काही धोके आहेत असे तिला वाटले. उदा - क्वचित मुले उगाच बालंट आणतात आदि. पण सगळीकडे भीत राहीलं तर काय उपयोग जरा धाडस करायला हवं.
तो मुद्दा लिहायचाच राहीला. आपले बरोबर आहे. फॉस्टर केअरमध्ये परीक्षा, इन्टर्व्यु घेउनच मुलांना सोपवतात. तो मार्ग एक दिसतोय.
_____________
सुनिधी 'मुलीशी बोलण्याचा, मुलीपुढे व्यक्त होण्याचा' फार सुरेख उपाय सुचविलात मला नाही वाटत हा तिला सुचलाय किंवा तिने कधी अमलात आणलेला आहे. धन्यवाद तिच्यापर्यंत जरुर पोचवेन.
_____________________
सायो, काउन्सिलिंग ट्राय करेल ती. बरोबर बोललात.
___________________
स्वाती - तुझं पहीलच वाक्य किती उभारी देणारं आहे बघ - मैत्रिणीची पूर्वपीठिका दुर्दैवी आहे खरंच, पण भविष्य होपलेस नाही.
अ‍ॅनिमल शेल्टरचा उपाय फार मस्त सांगीतलास. तिथे मदत दिलीच पाहीजे. आपली बाजू मांडली तर मुलीला नक्की कळेल.
नक्कीच !!!

खूप मस्त सल्ले मिळत आहेत. खरच आभार. इथल्या कुमार आदि, वैद्यकिय क्षेत्रातील लोकांनी मेनापॉजबद्दल सल्लाही जरुर द्यावा.
_____________
धन्स मैत्रेयी, हा उपाय तिच्या लक्षात नक्कीच आलेला नाहीये.

>>>>>>>> एवढ्या कमी माहितीवरून लिहिणं कदाचित चुकीचं आहे,>>>>>> स्वाती अतिशय दुबळ्या व्यक्तीमत्वाची आहे ती. तिला मी विचारलं - Why didn't you choose your battles. तुझं आयुष्य तू तुझ्या टर्मसवरती का नाही जगू शकलीस आणि तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती हा दुबळेपणा कबूल करते. पण क्षमा कशी करायची हे कळत नाही Sad
>>>> सोल ब्रेडविनर असणं, आजारी पडणं, यातलं काहीच तिच्या नियंत्रणात नव्हतं. >>>> हे तिच्य ती स्वतः ठाम नसण्याची शिक्षा आहे.

-- तुझा अ‍ॅनॅलिसिस बरोब्बर आहे. आधी स्वतःला क्षमा करायला हवं.

उदा - क्वचित मुले उगाच बालंट आणतात आदि. पण सगळीकडे भीत राहीलं तर काय उपयोग जरा धाडस करायला हवं. >> मुलांची डायरेक्ट जबाबदारी घ्यायलाच हवी असे कंपल्सरी नसते. ह्या सिस्टिमला हातभार लावणारे कोणतेही काम केल्याने शेवटी मुलांचीच मदत होते. कस्टडी बॅटल, हॉस्पिटल्स, आर्मी मॉम्स, अशा कारणांमुळे पालकांच्या सहवासाला दुरावलेल्या मुलांना ते रहात असलेल्या फॅसिलिटी मध्ये जाऊन वेळ देता येतो.

हे वाचून पहा कदाचित काही मदत होऊ शकेल

खरे तर लेक, आई अणि बाबा या सर्वांनीच फॅमिली काउंसेलिंगचा विचार करावा. कारण समस्या वरवर मायलेकीची असली तरी आईला आत्ता जे दु:ख आहे ते बाबाला समजणेही महत्वाचे. बाबा मायलेकीतला दुवा बनू शकेल. आईने जसे गमावले तसेच लेकीनेही गमावले. जे क्षण निसटले ते परत येणार नाहीत पण मायलेकी एकमेकींना समजून घेवून नव्याने मैत्रीचे नाते जोडू शकतील. भविष्यात स्वतःचे कुटुंब उभारताना लेकीलाही गमावलेले क्षण सतावणार नाहीत , निकोप सुरुवात करता येइल.
महत्वाचे म्हणजे आईने स्वतचे 'नोकरदार' असणे कमी लेखू नये. भले जवळ राहून लेकीवर संस्कार करणे , लाड करणे हे शक्य नव्हते पण आईने दिलेल्या आर्थिक स्थैर्यावर घर उभे होते. इतर अनेक घरांतून बाबा असेच 'फक्त नोकरदार ' म्हणून भूमिका निभावतात. इथे ती जागा आईला घ्यावी लागली. कुटुंबापासून दूर राहून असे 'ब्रेडविनर' म्हणून दिवस काढायला खूप धैर्य लागते. विशेषतः परक्या देशात!
मातृत्वाच्या आसेबाबत ,
बिग ब्रदर बिग सिस्टर चे सदस्यत्व घेणे शक्य आहे का? त्यांच्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करता येइल. फॅमिली सर्विस कडे चौकशी केल्यास अ‍ॅट रिस्क मुलामुलींसाठी सेवाभावी उपक्रम असतात त्यांची माहिती मिळेल. त्यांच्यासाठीही स्वयंसेवक म्हणून काम करता येइल. CASA साठी काम करता येइल. लोकल हॉस्पिटलमधे NICU त बाळांसाठी स्वयंसेवक म्हणून गरज असते तिथे चौकशी करता येइल.

>> तर लेक, आई अणि बाबा या सर्वांनीच फॅमिली काउंसेलिंगचा विचार करावा. कारण समस्या वरवर मायलेकीची असली तरी आईला आत्ता जे दु:ख आहे ते बाबाला समजणेही महत्वाचे. बाबा मायलेकीतला दुवा बनू शकेल. आईने जसे गमावले तसेच लेकीनेही गमावले>> हा उपाय पटला.

थँक्स, सामो. मैत्रीणीला शुभेच्छा. समजा कन्येशी चर्चा केलीच, तर वडिलांनी देखील भाग घ्यायला हरकत नाही (मैत्रीणीला चालत असेल). बाकी मैत्रमंडळींबरोबर पार्ट्या करणे, फक्त तिघांनी वा दोघींनीच खास खरेदी, सुट्टीवर छान जागी प्रवासाला जाता येईल. नवा देश पहायला जायचे.
सखी चे स्त्रियांसाठी शेल्टर असतात, तेथील स्त्रियांना सखीच्या परवानगीने मदत करता येऊ शकते. पण त्यांनी कहाणी दुर्दैवी असु शकते त्यामुळे मैत्रीणीला तिथे काम करताना खंबीर असावे लागेल.

हाब फार छान माहीती / लेख आहे हा. दुरुन दुरुन मदत करता येते हेदेखील खूप महत्वाचे आहे. खरच इथे आपण मुलांना मदत करतो की मुले आपल्याला .... असे वाटावे असे दिसतायत, इतके भावबंध जुळलेले दिसतायत.
______________
स्वाती, >>>>>>>>> इतर अनेक घरांतून बाबा असेच 'फक्त नोकरदार ' म्हणून भूमिका निभावतात. इथे ती जागा आईला घ्यावी लागली. >>>>>>> हे लक्षातच आले नव्हते. शरयुला नक्की सांगेन. हा त्याग म्हणा आपल्या पिल्लांना वेळ देता न येणं हा वडीलांचा अनुभव असतो खरा. त्याचा तर कोणी 'हरवलेलं वडीलपण ' म्हणुन बाऊ करत नाही Sad
>>>>> अ‍ॅट रिस्क मुलामुलींसाठी>>> ती भित्रट आहे. मुख्य निगेटिव्ह विचार करते. करायला जायचो एक अन भलतच गळ्याशी आलं तर हाच पवित्रा असतो. परंतु हाब म्हणतात तसे, दुरुन दुरुन, मदत जरुर करता यावी. बोलेन याविषयावर.
____________
>>>>>>>>> मैत्रमंडळींबरोबर पार्ट्या करणे, फक्त तिघांनी वा दोघींनीच खास खरेदी, सुट्टीवर छान जागी प्रवासाला जाता येईल. नवा देश पहायला जायचे.>>>>> होय सुनिधी, हा फार सुंदर सल्ला आहे. तिघांच्या तीन, वेळापत्रकांमुळे सगळं जमेलच असे नाही पण सुरुवात करायला काय हरकत आहे.
>>>>>>>> सखी चे स्त्रियांसाठी शेल्टर असतात, तेथील स्त्रियांना सखीच्या परवानगीने मदत करता येऊ शकते. पण त्यांनी कहाणी दुर्दैवी असु शकते त्यामुळे मैत्रीणीला तिथे काम करताना खंबीर असावे लागेल.>>>>>> खरं तर कधी कधी वाटतं शरयु स्वत:च्या दु:खावर फार लक्ष केंद्रित करते की काय? कदाचित 'सखी' मधील मैत्रिणींच्या दुर्दैवातून असेही घडू शकेल, तिला तिच्या दु:खाच्या प्रमाणाचे भान येईल. एक कॉन्टेक्स्ट येइल व स्वतःचे दु:ख जवाएवढे वाटून जाइल.

खरे तर लेक, आई अणि बाबा या सर्वांनीच फॅमिली काउंसेलिंगचा विचार करावा. >> योग्य सल्ला.
इतर सल्लेही चांगले आहेत.

लेख वाचून माझ्या मनात जे आलं होतं ते स्वाती२ यांच्या प्रतिसादात आधीच कव्हर झालंय. पण तरी माझ्या भाषेत लिहते

> आपण फक्त एक 'नोकरदार' भूमिका केली. ना मुलीवर संस्कार करायला आपल्याकडे कधी वेळ होता ना, लाड करायला. धडपणे मुलीला खायलाही आपण घालू शकलो नाही. तिची उंची जास्त वाढली असती का, जर मी तिचा आहार सांभाळला असता? असे बेसिक प्रश्न तिला पडतात. > लेखातल्या आई, मुलगी (आणि बहुतेक मुलीला घडवणारी सासूदेखील, तिघीही) जेंडर स्टिरिओटायपच्या बळी आहेत असं वाटतं. मुलांवर संस्कार, लाड, खाऊ घालणे वगैरेच ग्लॅमराईज्ड वर्णन करणारं लिखाण, सिनेमे, गाणी मीडियामध्ये खूप प्रमाणात उपलब्ध असणे हे यामागचे कारण आहे. सिनेमातली आई काय करते गोभी के पराठे आणि गाजर का हलवा बनवते, माझी आजी-आई निबंधतल्या बायका काय करतात मुलंनातवंडांना वेगवेगळे पदार्थ खाऊ घालतात, डोक्यावर तेल थापून देतात आणि कुशीत घेऊन झोपतात. श्यामची आई काय करते श्यामवर संस्कार करते.
त्या शाम आणि आईची अन्न वस्त्र निवाराची सोय आभाळातून होत असते बहुतेक. ब्रेडविनर अदृश्य असतो. आणि एखादी स्त्री संस्कार-लाड-खाऊ ऐवजी (कुटुंबाची गरज म्हणून) ब्रेडविनर होत असेल किंवा मला स्वतःला वेगळी आयडेंटिटी हवीय म्हणून घराबाहेर पडत असेल तर या असल्या स्टिरिओटिपिकल चित्रीकरणामुळे तिला गिल्ट येतो/दिला जातो.
स्वातीने लिहलंय तसं इतर अनेक घरांतून बाबा असेच 'फक्त नोकरदार ' म्हणून भूमिका निभावत असतात. त्यांनी दिलेल्या आर्थिक स्थैर्यावर घर उभे असते. आपण मुलाचे लाड केले नाहीत, त्यांना भरवलं नाही, त्यांच्यावर संस्कार केले नाहीत याचा त्यांना गिल्ट येतो का? का येत नाही? त्यांना ही त्यांची काम वाटतच नाहीत, ती कामं त्यांनी आऊटसोर्स केलीयत. त्यांना आपण ब्रेडविनर असण्याचा अभिमान असतो. मुलंदेखील त्यांचा आदर करतात.
ब्रेडविनर असणाऱ्या बाईनेदेखील (कुठल्याही आर्थिक वर्गातल्या) अभिमानी असावं. मुलांना सांगावं कि या घरात मी पॅन्ट घालणारी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.
आणि शक्य होईल तिथे स्टिरिओटीपीकल चित्रीकरणाचा कडकडून विरोध करावा you owe it to yourself, breadwinner mothers of lower income group and next generation women who are fighting to break stereotypes.

शरयूने मुलीशी १:१ बोलावंच पण त्यात मी हे हे केलं नाही याबद्दल मला अपराधी वाटतं हा भाव असू नये. त्याऐवजी मी हे हे केलं, त्यामुळे तुला हे हे मिळालं, याचा मला अभिमान आहे आणि तुलादेखील आपल्या आईबद्दल अभिमान वाटावा अस मला वाटतं. तुला कोणाबद्दल आदर वाटावा, तू कोणाची ऋणी असावं हे मी ठरवू शकत नाही. आई-मुलगी नात बनवायचा चान्स काही कारणामुळे सुटून गेला, पण आपण मैत्रिणीचं नात आता यापुढे जाऊन बनवू शकतो का? मला ते खरंच आवडेल. टिपिकल आईच्या प्रतिमेत मी बसत नसले तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी माझ्या पद्धतीने तुझी काळजी करतेच. <- अशा अर्थाचं काहीतरी बोलावं किंवा पत्र लिहावं.

अ‍ॅमी ख-ण-ख-णी-त प्रतिसाद दिलेला आहेस.
स्वाती ने जे सांगीतले की शरयुने, स्वतःला आधी माफ केले पाहीजे, ते तू का आणि कसे माफ केले पाहीजेस हे उत्तम रीत्या मांडलेले आहेस.
एवढे सुरेख प्रतिसाद आहेत एकेक. वोह सुलझ (सॉर्टेड) जायेगी. अर्थात जर तिने मनावर घेतले तर.
>>>>>> आणि शक्य होईल तिथे स्टिरिओटीपीकल चित्रीकरणाचा कडकडून विरोध करावा >>>>>>>>>>> मान्य! पहीलं स्वतःला ते पटलं तर मग दुसर्‍याला कन्विन्स करता यावे.

बाप रे या धाग्यावरती किती पैलूंचे दर्शन घडले. कोणाची सदहृदयता तर कुणाचा सूज्ञपणा, विचारीपणा, समोरच्याचे गार्‍हाणे समजून घेउन त्यावर सल्ला देण्याची क्षमता, आपली आपली कन्व्हिक्शन्स आणि ते पटवून देण्याचे कसब - मी खरोखर सायो, हाब, सुनिधी, दोघी स्वाती, अ‍ॅमी सर्वांची आभारीच नव्हे ऋणी आहे.
अन्य वाचकांचे देखील आभार.

अ‍ॅमी, अतिशय सुरेख प्रतिसाद! विशेष म्हणजे ", ती कामं त्यांनी आऊटसोर्स केलीयत. त्यांना आपण ब्रेडविनर असण्याचा अभिमान असतो. मुलंदेखील त्यांचा आदर करतात." हेच मला नेहमी खटकते.मुलें वडलांची नोकरी सहज अ‍ॅक्सेप्ट करतात,त्याचे समर्थनही करतात.

ॲमी एक सल्ला म्हणून उत्तम प्रतिसाद या केसला तो पर्रफेक्ट लागूही होतो. पण ओवरऑल विचार करता एकांगी वाटला.

पण ब्रेडविनर असल्याचा पुरुषांना अभिमान असतो आणि त्या नादात घरसंसाराकडे दुर्लक्ष झालेले त्यांना चालते वा गिल्ट येत नाही हे सरसकटीकरण पटले नाही. समाजाने पुरुषाक्डून ही अपेक्षा ठेवली आहे की त्याने कमवायची जबाबदारी उचलावी तर याचे दडपणही कित्येकांना "मनाविरुद्ध" झेलावे लागतेच. ज्याची परीणीती आत्महत्येपर्यंतही होऊ शकते.
आपल्या विचारांची वाढ पुरुषप्रधान संस्कृतीत झाल्याने आणि घरपोरे सांभाळायचे काम बाईचे अशी धारणा असलेल्या समाजात झाल्याने मुलांना आपण जास्त वेळ देऊ शकलो नाही याचे गिल्ट असे तितकेसे नसले तरी मुलांसोबतचा वेळ आपल्या वाट्याला नाही आला याचे वैषम्य असू शकतेच. खास करून जर मुलांच्या मित्रमैत्रीणींना आईबाबा आजीआजोबा पुरेसे उप्लब्ध होत असतील तेव्हा आपले मूलही अपेक्षा ठेवत असेल. त्रास तर होत असेलच. आमच्या ऑफिसातील आई लोक्स वेळेवर घरी निघतात. पण त्याच पोस्टवर काम करणारे बाबा लोकांकडून मात्र किमान दोन तास अजून थांबावे अशी अपेक्षा केली जाते. ते सारे अभिमानाने मिरवत मनापासून थांबत असतील असे नाहीये. असो विषय वेगळा नको व्हायला. तुम्ही योग्यच लिहिलेत. हे फक्त दुसरया बाजूचे ॲडीशन समजा.

@ धागा आणि माझा वैयक्तिक सल्ला - त्या आईला मुलीशी संवाद साधायला सांगा. संवाद हा कुठल्याही नात्याचा ऑक्सिजन असतो. त्यांनतर मग ईतर उपाय. ईथे छानछान प्रतिसाद त्यावर आलेच आहेत.

>>>>> त्या आईला मुलीशी संवाद साधायला सांगा. संवाद हा कुठल्याही नात्याचा ऑक्सिजन असतो.>>>> अतिशय अ‍ॅप्ट (योग्य)उपमा दिलीत ऋन्मेष.
_______________________
ऋ आपले मुद्देदेखील बरोबर आहेत. एच ४ वरती असताना, तिच्या नवर्‍याला , (अगदी जरी तो स्वयंपाक, घराची आवराआवर, लाँड्री व मुलीचे संगोपन परफेक्ट करत असला तरी) भयंकर ताण येत असे, नैराश्य येत असे. असे नैराश्य नोकरी नाही म्हणुन एखाद्या विवाहित स्त्रीला येणारच नाही असे मी म्हणू शकत नाही पण त्या मानाने कमी असेल. त्यामानाने मग पुरुषांकडुन कमावण्याची, घराबाहेर पडण्याची अपेक्षा फार केली जाते.

अ‍ॅमी,
खूप चांगला प्रतिसाद. अगदीच पटला.

वरचे बहुतेक सल्ले पटले. ॲमीचा आत्मसन्मानाचा मुद्दा विशेष आवडला.
कुटुंबातल्या प्रत्येकानेच त्या विशिष्ट काळात काही ना काही गमावले आहे, तडजोड केली आहे. मला मुलीच्या वयाच्या फेजचा अंदाज लेखावरून आला नाही तरी पण असे वाटते की मुलगी जशी वयाने परिपक्व, जगाचे अनुभव घेऊन प्रगल्भ होईल तशी शरयूला समजून घेईल आणि अनवधानानेही तिचे मन दुखावणार नाही. स्त्रीला आईपणाची आस असते तितकीच मुलांच्या विशेषत: मुलीच्या आयुष्यात आई महत्वाची असते. (अपवाद असतील!) तेव्हा कधी ना कधी त्या दोघीतले मायलेकीचे नाते जोम धरेलच. काही काळ जावा लागेल कदाचित.

>>>> स्त्रीला आईपणाची आस असते तितकीच मुलांच्या विशेषत: मुलीच्या आयुष्यात आई महत्वाची असते. (अपवाद असतील!) तेव्हा कधी ना कधी त्या दोघीतले मायलेकीचे नाते जोम धरेलच. काही काळ जावा लागेल कदाचित.>>>> धन्यवाद चंद्रा आणि मुलगी नकळत्या वयात जर कधी कटू चुकुन्माकून बोलली असेल तरी शरयुने इतका बाऊ करुन जिव्हारी लावुन घ्यायलाच नको होते. मुलगी नव्हती प्रगल्भ, पण शरयु तर होती. तिला मी 'रडी' म्हणते. रडी आणि कुढी. कसं व्हायचं अशांचं Sad

अ‍ॅमी, चांगला प्रतिसाद!

मुलांना/ घरासाठी वेळ देणे याबाबत गिल्टची देवाणघेवाण ही थकवणारी असते. शिवाय बरेचदा मुलांच्या मनातही विनाकारण कटूता पेरते . त्यामुळे हे प्रकार वेळीच थांबवावेत. पालकांची घरातली , एखाद्या फंक्शनच्या वेळी अनुपस्थिती कशी हाताळायची , मुलांना काय सांगायचे याचे प्लॅनिंग हवे आणि त्यात सगळे मोठे एकत्र हवे. साधारण ७-८ वर्षाच्या मुलांना त्यांना समजेल अशा भाषेत खरी कारणे सांगितली तर पटतात. तुला खूप खेळणी देता यावी म्हणून आई ऑफिसला जाते वगैरे येडचॅप कारणे देवू नयेत आणि आज तुझ्या आईला रजा घ्यायला काही हरकत नव्हती असे म्हणून घरातील इतरांनी मुलांचे मन कलुषितही करु नये. आईबाबांची अनुपस्थिती मुलांना आवडली नाही तरी ती स्विकारता यावी अशा प्रकारे सुरुवातीपासूनच संवाद साधला , पर्यायी क्वालिटी टाईम ठरवला तर बरे पडते.
माझ्या नात्यात दोन उदाहरणे आहेत जिथे मुल हायस्कूलला जाईपर्यंत आजीआजोबांनी वाढवले आणि आईवडील परदेशात नोकरी करत होते. अजून एका उदाहरणात आई संशोधनाच्या कामासाठी एका राज्यात आणि बाबा, दोन मुलं पीस स्टेशन पोस्टिंग होते तिथे. सध्याच्या परीस्थितीत हा पर्याय योग्य असे धरुन लाँग डिस्टन्स नात्यासाठी सगळ्याच मोठ्यांनी सहकार्य केले आणि मुलांशी योग्य भाषेत संवाद साधत राहीले. आपण एकत्र रहात नाही याचे दु:ख वाटले तरी अपराधी वाटू द्यायचे नाही यासाठी सगळे प्रयत्नशील होते. कालांतराने कुटुंबाला एकत्र रहाणे शक्य झाले. तेव्हा पुन्हा थोड्या अ‍ॅडजस्टमेंट कराव्या लागल्या मात्र तसे करावे लागेल हे सगळे धरुन होते. एकत्र नात्यांसाठी पुरेसा वेळ दिला आणि मंडळी रुळली.

सामो,
अ‍ॅट -रिस्क मुलं म्हणजे वाईट नव्हे तर ज्या मुलांच्या पालकांना काही कारणांने मुलांसाठी वेळ देणे, योग्य रिसोर्सेस उपलब्ध करु देणे शक्य नाहीये अशी मुले. योग्य मार्गदर्शनाअभावी अशा मुलांचे आयुष्य नेहमी चुकीच्या मार्गालाच लागते असे नाही पण बरेचदा कुवतीपेक्षा बरेच कमी पदरात पडणे होते. डिप्लॉय केलेले सर्विस मेन आणि वुमेन , दोन जॉब करुन घर चालवण्याची धडपड करणारे एकटे पालक, नातवंडाचे पालक झालेले थकलेले आजी आजोबा अशा वेगवेगळ्या परीस्थितीतल्या पालकांना आणि मुलांना आधार , मार्गदर्शन असे स्वरुप असते. मेंटरिंग करताना तुम्ही एकटे नसता, ट्रेनिंग देतात आणि जोडीला इतर मेंटर्स , ट्युटर्स अशी टीम असते.

>>>> अ‍ॅट -रिस्क मुलं म्हणजे वाईट नव्हे>>> आहह्ह्ह!! मला वाटलं होतं की अतिशय आबाळ झालेली व ज्युव्हेनाइल क्राइम्स चे किंवा सिव्हीअर डॉमेस्टिक व्हायलन्स चा पूर्वपिठिका/ भूतकाळ असलेली मुले की काय. मग त्यांच्याकरता जरा विशेष शिक्षण घेतलेले ट्रेन्ड लोकं हवेत कारण या मुलांना बरेचदा 'फॉल्स मेमरीज' असू शकतात ज्यांचे आरोपण त्यांच्या फॉस्टर पाल्यांवर होउन, मग केसेस होतात आणि ते सिद्ध करता करता नाकी नऊ येतात.
>>>>> मेंटरिंग करताना तुम्ही एकटे नसता, ट्रेनिंग देतात आणि जोडीला इतर मेंटर्स , ट्युटर्स अशी टीम असते.>>>> अतिशय सुरेख प्रकल्प आहेत की. हे असं सकारात्मक माहीतही नसतं जे माबोवरील चर्चेमधून कळुन येतं.
धन्स स्वाती.

ग्रॅटीट्यूड प्रॅक्टीस हवी. युनिव्हर्स्/देव इ इ चे हिने किती किती बाबतीत खरं तर आभार मानायला हवे- नोकरदार होता आलं ह्याबद्दल आभार, मूल झाले आणि ते व्यवस्थित शिक्षण घेत आहे ह्याबद्दल आभार, नवरा डॉक्टरेट झाला ह्याबद्दल आभार, नातीचे प्रेमाने करणारी सासू म्हणून आभार, आता साथ देणारे शरीर आहे म्हणून आभार. रोज ग्रॅटीट्यूड प्रॅक्टीस मध्ये वेळ गेला तर काय मिळालं नाही आणि आता कसं मिळेलपेक्षा जे आहे ते सगळं सगळं किती किती आणि कसं कसं साजरं करू असं होईल....

प्रत्येक घरात काही ना काही दु:ख असतेच. मराठीत एक म्हण आहे "घरोघरी त्याच परी, न बोलेल तिच खरी". अर्थ आपल्या दु:खात कुढावे असा नाही तर दु:खापेक्षा जे आहे ते सुख साजरे करण्यात वेळ घालवावा. शरीर साथ देते तर नवीन एखादा खेळ, छंद जमेल का? मुलगी तिच्याशी धड नाही बोलणार पण सासूची जयंती-मयंती साजरी करायला तर राजी होईल. तितपत तरी बाँडींग होईल. जे आहे ते साजरं करायचं बळ मिळण्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा!

Pages