सृजन सोहळा

Submitted by Asu on 11 October, 2019 - 02:21

सृजन सोहळा

शालू हिरवा पृथ्वी ल्याली
सूर्यबिंब कुमकुम भाली
क्षितिजावरती भल्या सकाळी
वसुंधरेच्या गाली लाली

नववधूसम अंगी भरली
सोनपिवळ्या रंगी न्हाली
सुखसमृद्धीचे रूप हिरवे
रानोरानी दिसते बरवे

सृष्टी प्रसवली हिरव्या रंगा
हिरवा शालू सर्व अंगा
धरतीचा हिरवा सृजन सोहळा
हिरवा हिरवा रंग वेगळा

निळ्या नभाची निळी निळाई
पावसातून भूमीत पडे
पिवळ्या पिवळ्या सूर्यकिरणांची
पिवळाई मग त्यात मिसळे

निळा पिवळा मिलन होता
बीजातून हिरवे रूप खडे
निळ्या नभातून किरणे झरता
हिरवे वाटे जग सगळे

- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults