तू खिच मेरी फोटू

Submitted by _तृप्ती_ on 11 October, 2019 - 00:36

पाटलाच्या वाड्यावर कालपासनं लईचं गडबड सुरु व्हती. धाकलं मालक आलेत नव्ह अन त्यांच्या परिस ४-५ पोरंपोरी बी आल्याती. त्यांना म्हणे पाटलाचं शेत बघायचं व्हतं, गाव कसं असतंय, शेतात काम कसे करत्यात लोकं, असलं काय न काय. तसं काय त्यांचा कुणास त्रास बी नाय काय. पाटलाचा वाडा ह्यो मोठा. राहतंय कोन, पाटील अन वहिनीसाहेब. ते बी खुश व्हतं पोरंपोरी आल्यात म्हून. तस म्हणजी समदं आलबेल होतं म्हना की. आता ह्यात एकाच मानसाला लई तरास व्हतं व्हता. मंगी, म्हंजी तसं तिचं नाव हाय मंगल. पन समद्या गावाची मंगीच. मंगी पाटलाकडं लहान असल्यापासनं कामाला. मंगी म्हंजी जसा कामाला हात भराभरा चालवी, तसा तोंडाचा पट्टा बी लयं चालवतीये. मंगीच्या हातचं जेवन तर एकदम फर्मास. आख्या गावात कोंबडी बनवावी तर ती मंगी शिवाय दुसरं कोन न्हाईच मुळी. वहिनीसाहेबाचं तर मंगीशिवाय कामच व्हायचं नाय. आता शहरातनं पोरं पोरी आली तर कोंबडी अन चुलीवरच्या भाकरी तर व्हायलाच हव्यात. धाकल मालक तर समदयास्नी मंगीच्या कोंबडीचं कौतिक करून करून थकलं. पन एक अडचण व्हतिच. मंगी गेलीती सुट्टी घेऊन घरी. आता नवं नवं लगीन, दादला बी ह्यो अस्सा मर्द गडी की मंगीला आभाळ दोन बोटच राहिलं बघा. मंगी तशी काय कमीची न्हाय. शेलाटी बांधा, घट्ट लांब येणी, आणि लईच बोलणारं डोळं. पुढचं घायाळ झालंच म्हणून समजा. अन तरी बी न्हाईच झालं तर यकदा मंगीच्या हातचं जेवन जेवलं कि माणसं यडीचं व्हत्यात. तर आता मंगी गेली व्हती सुट्टीवर. त्ये बी नवं लगीन झालेली. मंगीचे दिस कसे दादल्याच्या मागं मागं करन्यात चाललं व्हतं. मंगीचा दादला शेजारच्या तालुक्याच्या गावात कामाला. तो बी जानार ८ दिसांनी. मंग काय नीट भेट व्हतीय व्हय. म्हनून तर मंगी पाटलाकडून सुट्टी घेऊन बसली व्हती. दादला गेला की परत वाडयावर. पन आता आली न पंचाईत. हे धाकलं मालक, पोरं-पोरी घेऊन आले आणि म्हणाले मंगीच्या हातचीच कोंबडी पाह्यजे. वहिनीसाहबेचा पोरावर लई जीव. मंग काय बोलवलं की मंगीला दोन दिस. मंगी बिचारी काय करतीय. आली तशीच चरफडत. आता हे दोन दिस म्हंजे अगदी जडच व्हते तिला. तसं मंगीला लोकांसनी खायाला करून घालाया लई आवडतय. पन हे म्हंजे जरा. तरी बी मंगी आली. कसंही असलं तरी पाटलानं मंगीला लहानपनापासून आधार दिला हाय. लग्नात बी लई आहेर केलता.
मंगी आली अन वाड्याच्या दारावरच थांबली. तिला काय पाऊलच टाकवना. दादल्याचा चेहरा काय जाईचना डोळ्यासमोरून. असं वाटलं, असंच फिरून माघारी जावं. पन दादल्यानी समजावली व्हती तिला. पाटील अन वहिनीसाहेब भली मानसं हाईत. दोन दिसाचा तर प्रश्न. मंगी आपली असल्या कसल्या इचारात दारातच उभी. एवढ्यात वहिनीसाहेब आल्या. " अगं बाई मंगे, आलीस का. बरं झालं बाई." मंगी कसंनुसं हसली. वहिनीबाई मंगीला पाहून लई खुश झाल्या. " मंगे हिरवा चुडा छान दिसतोय गं. काय ग, बांगडी वाढली की नाय?" मंगी काय झ्याक लाजली म्हणता. "अग बाई, तेज आलं ग चेहऱ्यावर. आणि ते बोलणं काय बंद झालं कि काय तुझं लगीन झाल्यावर" मंगी हसली. " न्हाय न्हाय. तोंडाचा पट्टा सोडल्याशिवाय कामं व्हतं न्हाईत माझी. माहिती हाय कि तुम्हास्नी". "अगं, मग आल्यापासून अशी मूग गिळून उभी. म्हटलं, नवऱ्याने तोंड बंद केलं की काय तुझं." मंगी चक्क लाजली. "काय तरीच तुमचं" म्हणून आत पळाली अन सवयीनं काम बी कराया लागली. वहिनीबाई म्हणल्या, आजच कोंबडी करू. पोरं पोरी गेलीत शेतावर. दुपारच्याला तिकडचं जेवतील अन रातच्याला वाडयावर कोंबडी अन चुलीवरच्या भाकरी. मंगी कामाला लागली. तसं यकदा का कामाला लागली की मंगी अगदी मन लावून काम करी. तिनं स्वतः खाटकाकडं जाऊन चांगली कोंबडी बघून घेतली. वाडयावर मागच्या अंगणातली चूल बघून आली. सदाला चूल सारखी करायला सांगून बी आली. मग लागली मसाला कराया. मंगी काय बी झालं तरी वाटण कुटणं करूनच कोंबडीचं कालवण बनवायची. तिच काम अन तोंड भराभर चालायला लागलं. वाड्यातल्या समद्या नोकरमाणसांने कळलं की मंगी आली हाय. तश्या लक्ष्मबाई पन आल्या मंगीच्या मदतीला. पन ती काय हात लाऊ देत न्हाय. तसं लक्ष्मबाई नुसत्याच गप्पा ठोकाया बसल्या. तशी बी वाड्यामध्ये नोकरमानस जास्त अन काम तसं कमीच. " मंगे, लईच बेस वास यायला लागलं बघ. काय घालतेस तर काय" "आजी, वास आलं न्हवं. मंग कोंबडी चांगली व्हनार बघा. नाहीतर काय उपयेग वाटन्याकुटन्याचा". लक्ष्मबाई कौतिकानी मंगीकडं बघत व्हत्या. अन कुटता कुटता मंगीच समदं सांगून बी झालं. सासू तशी खट हाय, पन दादल्यासमूर लई प्रेमानं वागवती हाय. तसं सासरं यकदा म्हनले, मंगीच्या हातचं जेवलं तवा लई दिसांनी मन भरलं म्हनून. सासूनं हे मोठं मोठं डोळं वटारल. पन दादला लईच प्रेमळ हाय. लय जपतंय. अन मंगीला काय काय आठवाया लागलं. एवढ्यात पोरंपोरी आले. अन काय ते वाडयावर नुसतं आवाज उठला. काय बाई दंगा. आपल्यापेक्षा बी जास्त कोणी बोलत या वाडयावर, हे मंगीला आत्ताच कळलं. वहिनीसाहेबांनी रातच्याला कोंबडीचा बेत हाय म्हटल्यावर तर केवढा दंगा केला समदयानी. तशी बी आत्ता संध्याकाळ सराया आली व्हती. मंगीन पाह्यलं तर धाकलं मालक, अजून दोन पोरं अन दोन पोरी बी व्हत्या. काय त्यांचं बोलणं, काय वागणं, काय कापडं. अन ते पोरींचे केस तर रंगीबेरंगीच व्हतं. काय बाई कुत्रीच्या रंगावानी केसाचा रंग. अन कापडं जरा बरी न्हाय मिळाली ह्यांना. पोरांसारखीच चड्डी घालून आलत्या. न्हाय म्हंजी शहरात चालतंय व्हो पन गावातल्या लोकांस्नी कशापय फुकट पिक्चर दाखवायचा. समदी शेतात जाऊन हुंदडून आली व्हती. त्यात वाडयावर आल्या आल्या मसाल्याचा वास भूक चाळवत व्हता. मंग समदी मंडळी मागच्या अंगणात चुलीजवळ.
मंगीने कोंबडी शिजवायला टाकली अन बाकीच्या जेवनाचं बघाया लागली. पोरंपोरी गाणी लावून तिथंच नाचाया लागले. मंगीला वाटलं ह्या शहरातल्या पोरांचं बरं हाय, कुटं बी जात्यात, कसं बी वागतात, काय भीडभाड न्हाय. पोरीबी पोरांच्या बरुबर. ती बी गाणी ऐकत ऐकत जेवन बनवत राहिली. इतक्यात एक पोरगं आलं चुलीजवळ. "मंगुताई, वास भारी येतोय. तुमची रेसिपी सांगा की." मंगीला काय कळलंच न्हाय. " म्हणजे हे सगळं कसं बनवता तुम्ही? मी घरी गेलो की करून बघेन." मंगीला हसूच आलं, "तुम्हि घरला जाऊन कोंबडी शिजवणार व्हय." "का? जमणार नाही का मला?" "न्हाय व्ह. पण बापे लोकं कुट रोजचं जेवन बनवत्यात." "अहो, मला आवडतं जेवण बनवायला. आपण असं करूया का, मी रेकॉर्डिंग करतो. तुम्ही सांगा." मंगीला हे समदं नवीनच व्हतं. पन लय झ्याक वाटत व्हतं की शहरातलं एक पोरगं तिच्याकडून जेवन बनवायला शिकत व्हतं. तिनं कोंबडी कशी बघून घ्यायची इथून सांगाया सुरुवात केली. वर मधी मधी तिची टिपणी सुरूच असायची. " म्हंजी शहरात ताज कोंबड मिळतं का ते बघा. पन कसं हाय कोंबडीच लंगडी तर कालवण बी लंगडं." तिनं मसाला कसा बनवायचा ते बी सांगितलं. मंगीच प्रमाण म्हणजे हे मूठभर, ते चिमूटभर, ते वासाला, हे चवीला, हे असलं. "तुमी ते मिक्सरवर वाटा. मला बया पाटा वरवंट्याचा वास आला की मगच जमतया. " पोरगं खरंच सगळं रेकॉर्ड करत व्हतं. "मंगूताई, आधी माहिती असतं तर तुम्हाला मदत करायला वाड्यावरच थांबलो असतो." तेच्या गळ्यात एक मोठा कॅमेरा व्हता. " मंगूताई, एक फोटो काढतो. " "अग बया, फोटू. त्यो बी असा चुलीजवळ." " छान दिसताय कि" असं म्हणून त्याने एक फोटो काढला सुद्धा. आणि तो गेला पोरांच्यात नाचाया. मंगू पुन्हा कामात. मंगी लग्नात फोटू काढाया काय पन लाजत व्हती. अन हे पोरगं फोटू काढून गेलं तर कळलं बी नाय तिला. तिला वाटलं असं कसं फोटू काढला या पोरांनी. पन मग तिला वाटलं चांगलं हाय पोरग. नाहीतर कोन इतकं इचारतं. तिनं आपल काहीबाही इचार झटकल अन भाकरीचं पीठ मळाया लागली. तसं वाहिनीसाहेब यकदा काय हवं नको पाहून गेल्या. पोरांचा धिगाणा चालूच. काय काय गाणी लावत व्हती, नाचत व्हती, फोटू काढत व्हती. मंगीनं सदाला हाक दिली अन वाढायची तयारी कराया संगितलं. मंगी गरमगरम भाकरी करून वाढणार आन पोरं ते चापणार. ते मगाचं पोरगं आलं की परत. "मंगूताई, आता भाकरी करतानाचा व्हिडीओ काढूया." मंगीला वाटलं आता भाकरीचं काय येवढं मोठंसं. पन काढ बाबा, तुला काढायचं तर काढ. आता ह्या पोरानं पुन्हयांदा फोटू बी काढला. आता मंगी जरा चपापलीच. न्हाय म्हन्जी दोन दिसापूर्वीच पेपरात बातमी व्हती. आजकाल शहरात म्हणं लय फसवत्यात. कसले फोटू काढतात अन कुठं छापत्यात. दादला पन म्हणाला व्हता, “मंगे, कधी कधी आपलं गावचं बरं. शहरात कशाचा नेम न्हाय. बाईला लय फसिवतात. पोरी बी फोटू काढतु म्हटलं की पाघळत्यात. आपलं जपूनच रहाया हवं.” अग बया, आता हे बेणं माझं कशापाय इतकं फोटू काढतंय. इचार करता करता मंगीची भाकरी कधी न्हवं ती जळली. हे पोरगं आपलं इथंच. "काय रं. जा की जेवाया बस. झालं न्हवं आता भाकरी बघुन." "मंगूताई, मी एक भाकरी करू का? मी कधी केलीच नाहीये. तुम्ही शिकवाल का?" या बया. हे तर गळ्यातच पडतया. मंगी यकदम सावध झाली. पन तोपतूर हे बेणं, मंगूताई समोरची परात आपल्यापुढे घेऊन बसलं की. "आता शिकवा. असा गोळा करायचा ना. " मंगीने बी एक भाकर कराया घेतली अन मी करते ते बघून कर म्हनली. पोरगं बी कराया लागलं. पन त्याचं काय जमना. मंगीन त्याचा बी गोळा घेऊन नीट भाकर केली. बाकीची पोरं मिटक्या मारत खात व्हती. या पोराने दुसऱ्या एका पोराला पकडून आणल अन म्हणलं माझा मंगूताई बरुबर विडिओ कर.
आता मंगी लईच घाबरली. हे पोरगं नक्की करतंय तरी काय. आता दादल्याला कसं सांगू बया हे समदं. किती फोटू काढलं काय माहिती. अन ते काय रेकॉर्ड रेकॉर्ड म्हणतंय. मंगीला निसत्या इचारानी घाम फुटाया लागला. तरी मगापासून "तू खिच मेरी फोटू.तू खिच मेरी फोटू" गाणं लावून नाचत व्हती. मीच येडी. मला कसं काय बी लक्षात आलं न्हाय. ती आपली कशीबशी भाकऱ्या थापत व्हती. यकदा का जेवनं झाली कि वहिनीसायबांना सांगायचं रातच्याला घरीच सोडाया. ही पोरं गेल्याशिवाय परत यायचंच न्हाय. इकडं हे पोरगं ते व्हिडिओ का काय बघून लयच नाचत व्हतं. मंगीच्या कानावर आलं. " अरे असला भारी आलाय हा विडिओ. आणि मंगूताई बघ. भारी नं. आत्ताच फेसबुकवर टाकतो." आता तर मंगी चपापलीच. मंगूताई म्हटला, फेसबुकावर टाकतो म्हंजी काय. आता चुलीतला कोळसाच घालते ह्याच्या कॅमेरात म्हणजे जळेल मेलं. हे पोरगं आलं न परत नाचत नाचत. " ग्रेट मंगूताई, एक सेल्फी काढूया. तुझ्यामुळे आज एकदम मजा आली बघ. एक सेल्फी तो बनता है." असं म्हणत हे पोरगं आलं की मंगीच्या जवळ. आत्ता सेल्फी लांब उभं राहून घेत्यात व्हय. पन मंगी आपली लांब लांब. " अगं मंगूताई, तिकडे कुठे उभी आहेस? तुझा आणि माझा सेल्फी आहे ना. मग इथे थांब ना." असं म्हणत पोरगं मंगीच्या बाजूला सरकलं. आता मंगीच टकूरच हाललं. हे पोरगं असल शहरातलं अन पाटलाचं पाव्हणं. पन म्या आता याले दाखवतेच. मंगीन चुलीतला कोळसा घेतला अन धावली त्या पोराजवळ. "काय समजलास काय रं तू? गावातली पोरगी म्हणजे किती बी फोटू काढून घेईल व्हय. कोळसाच घालते तुझ्या डोसक्यात. म्हंजे हवा जाईल. कसलं फोटू काढलंस माझं. दाखव आधी." पोरगं बावचळल. "अगं मंगूताई...." म्हणून पुढं सरकणार तोच मंगी, " पुढं आलास तर डोस्क्यात घालेन हं." सगळेच गोंधळले. मंगीला अचानक काय झालं, कोनाला कळचना. सगळा आवाज ऐकून वहिनीसाहेब, पाटील समदे आले कि. वहिनेसाहेब तर मंगीचा अवतार बघून घाबरूनच गेल्या. " मंगे, काय ग काय झालं. कोळसा कशाला घेतला? टाक तो चुलीत." त्यांनीच तो काढून चुलीत टाकला. आता मंगीचे त्राणच गेले. मटकन खाली बसली अन रडाया लागली. वहिनीसाहेबांनी पोराने इचारलं, "काय रे पोरांनो, काय झालं? " पोरांनी झालं ते सांगितलं. वहिनीसाहेबांना जरा अंदाज आला. "मंगे, अगं काय वाईटसाईट इचार करू नगं. अगं आपली पोरं हायेत. असं कसं वाईट करतील तुझं?" आत्ता मंगीला कंठ फुटला. ते माझा दादला सांगत व्हता शेहरात कसलं कसलं कुणाचं फोटू काढतात अन काय वाईट वाईट करत्यात. काढताना काय कळत बी नाय. घाबरले हो, वहिनीसाहेब मी. हे बेणं सारखं माझ्या मागं मागं करत व्हतं. आता थांबलं मग थांबलं. ह्येच आपलं सुरूच. म्हणून मग कोळसा काढला चुलीतला." आता मात्र सगळे हसाया लागले. ते पोरगं पण मंगूताईची माफी मागू लागलं. त्याला तर काय समजलंच नव्हतं, त्याच्या भाकर करण्यानी मंगीच्या जीवाचा कसा कोळसा झालता ते. आता मंगीला बी हसू आलं की आपण लईच खुळ्यावानी वागलो. स्वतःच म्हनाली, " वहिनीसाहेब, तुमची जेवन राहिली हायत नं. गरम भाकरी करून वाढते." तर धाकल मालक म्हणत्यात कसं, "मंगूताई भाकर करलं पण कुणीही फोटो काढणार नसेल तरच" मंगीचा इचार बदलायच्या आत समदी मंडळी लगोलग कोंबडी अन भाकर खायाला बसली की मंग.

Group content visibility: 
Use group defaults

मस्तच. एकेक पंचेस!!
>>>>>>> काय बाई कुत्रीच्या रंगावानी केसाचा रंग.>>>>>>
>>>>>>पोरांसारखीच चड्डी घालून आलत्या. न्हाय म्हंजी शहरात चालतंय व्हो पन गावातल्या लोकांस्नी कशापय फुकट पिक्चर दाखवायचा. >>>>>>>
हाहाहा
डोळ्यांपुढे उभी राहीली मंगी Happy

Lol छानेय.
'न्हायचं' ऐवजी न्हाईच केलं तर ठीक होईल.