युगांतर - आरंभ अंताचा! भाग ४२

Submitted by मी मधुरा on 10 October, 2019 - 02:13

"भीम, तुझ्या बंधुंना सांग की बाहेरून लाकडे आणू नका सध्यातरी. तू काल आणलेली चार झाडे अजून पडली आहेत पडवीत. ती पुरतील अनेक दिवस."

भीम ओसरीवर बसला होता. त्याच्या हातातल्या तृणपात्याकडे नजर लावून एकाग्रपणे बघत होता. बहुदा कुंतीचे शब्दही त्याच्या कानापर्यंत पोचले नसावेत. त्याची तंद्री भंग करायला हे पुरेसे नसावे.

कुंती मात्र दुपारच्या भोजनाची तयारी करण्यात व्यस्त होती. पुत्रांनी धान्य आणले की ते शिजवण्याकरता आणि अन्न स्वादिष्ट बनवण्याकरता बाकीची तयारी असायला हवी, म्हणून तिची लगबग सुरु होती आणि शक्तीचे काम म्हणल्यावर भीम शिवाय पान हलत नसे. तिने पुन्हा भीमला हाक मारली.

"भीम, थोडे लाकूड कापून आण आत्तासाठी."
काहीच प्रतिसाद नाही आला. तिला आश्चर्य वाटले. ओसरीवर बसलेल्या भीमाला पाहून ती त्याच्या जवळ गेली.
"भीम..... वृकोदरा....." तिने त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि त्याची तंद्री तुटली.
"माताश्री..... काही काम होते का?"
"ते तर असतेच भीम."
"सांगा ना माताश्री. लाकूड हवे आहे का? फळे आणायची आहेत? की.... "
"भीम.... तुला आठवण येते आहे ना?" कुंतीने थेट डोळ्यांत बघत त्याला विचारले.
तिने त्याच्या मनातले अचूक ओळखले तसा भीम ओशाळला.

"पण आपली कितीही इच्छा असेल तरी हिडिंबा आणि घटोत्कच मानवी वस्तीत नाही राहू शकत रे."
तिने हळव्या मनाने भीमाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि आत निघून गेली. भीमने हातातले तृणपाते कपाळाला टेकवले.
'एका वर्षाचा सहवास आणि आयुष्यभराच्या आठवणी. खरचं हिडिंबा.... तू माझ्या आयुष्यातले सर्वात प्रिय आणि आनंददायी क्षण आहेस. आपला संसार, आपला पुत्र, आपलं प्रेम...... आणि तुझा त्याग.....! तुझा त्याग....? की आपला? पण आपण नक्की कशाचा त्याग केला हिडिंबा? एकमेकांच्या सहवासाचा की सर्वजण ज्याला दुर्मिळ म्हणतात त्या सुखासुखी संसाराचा? खरचं वर्षानंतर असा संसार त्यागणं सोप्प असतं? तेही केवळ शब्द दिला म्हणून? नाही..... निदान माझ्याकरता तरी हे सोप्पे नव्हते.... आणि तुझ्याकरता? नक्कीच नसणार. पण शब्द तुला स्वार्थापेक्षा महत्वाचा वाटला. नाहीतर अडवलं असतंस मला. अधिकार होता तुझा माझ्यावर! नात्याचा.... प्रेमाचा! पण तू स्वतःहून शब्द पाळलास. मला खूप अभिमान आहे तुझा.
घटोत्कच जन्माला आला आणि बघता बघता तरूणावस्थेतल्या देहाचा झाला काही निमिषांत! खरतरं त्याला सुद्धा दानव योनी प्राप्त झाली होती. पण तो मानवी गुणांनी आणि विचारांनी समृद्ध असेल असा विचारही केला नव्हता मी. तुझे गर्भसंस्कार..... तेच होते त्यामागे! बघ हिडिंबा..... सगळंच किती आपलंस करून घेतलंस तू! मानवी जीवनपध्दती, मानवी राहणीमान, आणि माझ्या मनाचा एक कोपरा सुद्धा! तो सदैव तुझ्या आठवणींनी भरलेला असेल, हिडिंबा. तुला त्यात मी सतत जपेन.... अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत! मानव योनीतला हा भीम, दानव योनीतल्या हिडिंबेला कधीच विसरणार नाही. आणि तू? तू विसरू शकशील मला, हिडिंबा? आणि 'नाही'..... तर कशी जगत असशील एकटी? देह दानवी असला तरी मनाने तर तू...... काळजी घे. माझ्या घटोत्कचाची आणि माझ्या प्रिय पत्नीचीही! घेशील ना?" त्याच्या हातून तृणपाते वाऱ्यावर उडून गेले. त्याने डोळ्यांत आलेले पाणी टिपले आणि कुंतीची मदत करायला कुटीत निघून गेला.
___________

"प्रणाम द्वारकाधिश!" द्रुपदने कृष्णाला अभिवादन केले आणि दोघांनी कक्षात प्रवेश केला.
"गोविंद...." द्रौपदी कृष्णाला पाहून जागेवरून उठली. हात जोडून तिने त्याच्याकडे आनंदाने पाहिले.
"अगं.... द्रौपदी? काय सुंदर दिसते आहेस! स्वयंवर जवळ आले की रूप उजळते नै का, दाऊ?"
द्रौपदी गोड लाजली.
"गोविंद, बलराम, मिष्टान्न घ्या." नुकत्याच काढलेल्या लोण्याच्या गोळा आणि बाकी एक ना अनेक पक्वान्न भरून सोन्याच्या दोन थाळ्या घेऊन दास उभे होते.
"नवनित!" कृष्णाने फक्त लोण्याची वाटी हातात घेतली.
"राजन्, दोन थाळ्यांची गरज नाही. एकच पुरे आहे." लोणी खाणाऱ्या कृष्णाच्या लोभस रुपाकडे पाहत बलराम म्हणाला.
"द्रौपदीने खासकरून लोणी का मागवलं हे आत्ता कळलं मला." द्रुपद स्मित करून म्हणाला.
"सुमधुर! उत्तम आहे." कृष्णाने लोणी संपवत प्रतिक्रिया दिली.
बलराम इतर पदार्थ चाखून पाहत होता.
"द्रौपदी, आता बघ.... दाऊ साधारण १ घटिका तरी व्यस्त राहतील पदार्थ चाखण्यात. आणि पदार्थ खाऊन झाला की तो कसा वाटला ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला सुरुवात होईल." कृष्णाने कुजबुजत्या स्वरात सांगितले.
"काय? पण कसं?"
"बघत रहा."
बलरामने बुंदीचा लाडू खायला सुरुवात केली आणि चेहऱ्यावर एक हलकं स्मित आलं. नंतर मोदक खाऊन संपवत प्रसन्नपणे बलरामाने अजून एक पदार्थ उचलला. तो तोंडात टाकला आणि त्याचा चेहऱ्यावरचे पूर्ण स्मितच गायब झाले. बलरामाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. कृष्ण खळखळून हसला.
"काय झाले भ्राताश्री बलराम?" द्रौपदीने काळजीने विचारले.
"काही नाही द्रौपदी..... त्यांना हा पदार्थ नविन आहे. आणि तो गोड नाही, याची कल्पना नव्हती त्यांना. हो ना भ्राताश्री?"
बलरामाने काहीतरी चिडून बोलण्याचा प्रयत्न केला पण तोंड भरलेले असल्याने काहीच बोलू शकला नाही.
"मगं? जय्यत तयारी झालेली असणार स्वयंवराची. हो ना द्रौपदी?" द्रौपदीकडे बघत कृष्णाने तिला खोडकर नजरेने विचारले.
"काय हे गोविंद!" तिने नजर झुकवून स्मित केले.
"तुम्ही आलात हे आमचं भाग्य आहे!" द्रुपद म्हणाला.
"पांचाल नरेश, माझ्या या गोड भगिनीच्या स्वयंवराला कसा बरं अनुपस्थित असेन मी?" कृष्ण खांद्यावरचा गुलाबी शेला नीट करत उद्गारला.
"तुम्हाला जे हवं नको आहे ते द्रौपदी स्वयं पाहणार आहे. तेव्हा काही आवश्यकता असल्यास तिला कळवा. आमचे सारे सेवक तुमच्या सेवेस हजर आहेतच." द्रुपदाने रजा घेतली.
_____________

"कर्णा...."
"दुर्योधन..... स्वागत आहे."
"आगत-स्वागत सोड. मी तुला घेऊन जायला आलो आहे. पांचाल नगरीतून आलेली वार्ता ऐकलीस का?"
"कसली वार्ता?"
"अरे, आमंत्रण आलेले आहे स्वयंवराचे."
"पांचाल नगरीतून?"
"हो. इतकं आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे त्यात?"
"दुर्योधन, मी काही अधिक बोललो तर क्षमा करं. पण द्रोणाचार्यांशी वैर असताना त्यांनी हस्तिनापुरास स्वयंवराचे आमंत्रण का दिले?"
"आता वैर कसले? ते तर तेव्हाच संपले जेव्हा पांचालनरेशनी नाक घासून माफी मागितली द्रोणाचार्यांची. आणि द्रोणाचार्यांनीही माफ केलं त्याला..... नाहीतर अर्ध राज्य परत का दिलं असतं त्यांनी द्रुपदला?"
"दुर्योधन, द्रुपद तो व्यक्ती आहे ज्याने द्रोणाचार्य ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना ओळख देणे नाकारले. 'हक्क म्हणून नाही, भिक्षा म्हणून मागं' असं सांगत ज्याने साधे गोधनही मित्रत्वाचा हक्क म्हणून दिले नाही, तो द्रुपद आहे. अर्धे राज्य.... अर्धे राज्य अपमानकारक पराजयामुळे हातातून गेले आहे. आणि आहे ते सुद्धा द्रोणांनी दिलेली भेट आहे. तो द्रुपद हस्तिनापुराशी आणि पर्यायाने त्याला हरवणाऱ्या कौरव आणि द्रोणाचार्यांशी सख्ख जोडण्याचा प्रयत्न का करेल? ज्याला क्षत्रिय असण्याचा इतका गर्व होता त्याने द्रोणांची खरचं मनापासून माफी मागितली असेल हे कश्यावरून?"
दुर्योधनाचे डोके कर्णाच्या बोलण्याचा भार उचलून उचलून पार थकून आणि गोंधळून गेले होते. "तू किती विचार करतोस रे! मी इथे तुला सोबत घेऊन जायला आलो आहे, तुझे हे तर्क-वितर्क ऐकत बसायला नाही."
"पण दुर्योधन....."
"तू काय सुचवायचा प्रयत्न करतो आहेस नक्की? हे बघ, मी जाणारचं आहे स्वयंवरात. मामाश्रींनी सांगितले आहे मला.... पांचाल नरेशची कन्या सुंदर आहे. त्याची कन्या माझी पत्नी बनली की ते अर्धे पांचाल सुद्धा हस्तिनापुरात सामावून घेता येईल."
"पण हे स्वयंवर एक जाळे असू शकते ना, दुर्योधन?"
"म्हणजे?"
"अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून त्याने कौरवांना स्वयंवरास बोलावले असेल तर?"
"काय बोलतो आहेस तू?"
"तिथे स्वयंवरात त्याने मुद्दाम काही अशक्यप्राय पण लावून स्वयंवरात भाग घेणाऱ्या सर्वांचे हसे करायचे ठरवले असेल, आणि म्हणून कौरवांना बोलावले असेल तर?"
"तसं का असेल पण? तुला माहिती आहे ना की जर स्वयंवरात कोणीच जिंकले नाही तर काय होते ते? स्वतःच्या राजकन्येचे स्वयंवर तो कौरवांचा अपमान करण्यात कशाला घालवेल? आणि कौरवांपुढे मागच्या वेळी त्याची काय गत झाली होती हे विसरला नसणार तो. मला तरी नाही वाटत कौरवांचा अपमान द्रुपदाला स्वतःच्या प्रतिष्ठेपेक्षा जास्त महत्वाचा असेल."
"पण दुर्योधन....."
"आता काय 'पण' वगैरे? हे बघ, त्यांनी खुद्द द्रोणाचार्य पुत्रालाही आमंत्रित केले आहे त्या स्वयंवरात. अश्वत्थामाही येणार आहे तिकडे. मग तुलाच काय त्रास आहे? चल सोबत."
दुर्योधनाने कर्णाला ओढत महालाच्या बाहेर आणले. सज्ज असलेला रथ उभा पाहून कर्ण चकित झाला. "तू सगळी तयारी करूनच आला आहेस?"
"हो, मग काय!"
"पण मला आमंत्रण नाहीये दुर्योधन."
".....आणि तुझ्या नावाचं वेगळ आमंत्रण हवच्चेय कशाला?"
"दुर्योधन?"
"दुर्योधन आणि कर्ण वेगळे नाहीत, हे माहिती आहे सर्वांना. मग ते वेगवेगळे आमंत्रण देतीलच का? चलं बरं आता."
कर्णाच्या चेहऱ्यावर स्मित आले. दुर्योधनाच्या हातात असतं तर त्याने आपल्यासोबत द्वंद्व करायला का होईना पण अर्जुनाला जिवंत सोडलं असत, असा विचार त्याच्या मनाला आनंद देऊन गेला.
"वृषाली, मी निघालो." त्याने बाहेरूनच हाक देऊन सांगितले आणि रथावर चढून दोघांनी पांचालनगरी कडे कूच केली.
___________
"आज तुम्हीही चला आमच्या सोबत!" ओसरी वर पडलेल्या झाडांची फळे गोळा करताना भीमच्या कानांवर हे वाक्य पडलं आणि त्याने मागे वळून सहदेवाकडे पाहिले.
"मी?"
"हो, तुम्हीच भ्राताश्री."
भीमला आश्चर्यच वाटले. एरवी भिक्षा मागायला आपल्याला कधी सोबत येऊ न देणारे बांधव आज आपल्याला सोबत घ्यायला स्वतःहूनच तयार कसे झाले, हे त्याला कळेना. तो सगळ्यांसोबत चालत सुटला.
नकुलला मागे ओढून त्याने चालण्याचा वेग मंदावला.
"काय रे? या वेळी कसं काय मत बदललं? माझे विशाल उदर आणि देह वगैरे दिसून तुम्हाला मिळणाऱ्या भिक्षेत घट होणार नाही का आता?" खोडकरपणे भीमने विचारलं.
"भ्राताश्री, आज पांचाल महालात स्वयंवर आहे. त्यात सर्वांना मिळणार आहे भोजन. आणि किती तरी दिवसांनी राजवाड्यातले संपूर्ण वाढलेले ताट मिळणार आहे."
"आणि तिथे कोणी आपल्याला ओळखले म्हणजे रे? अर्जुनाने तर युध्दात हरवले होते पांचालनरेशला. आपल्याला पाहिले तर त्यांना समजणार नाही का की लाक्षागृहातून आपण वाचलो आहोत?"
"भ्राताश्री, त्यांनी इतक्या अपमानानंतर हस्तिनापूरास आमंत्रण पाठवले नसेल. त्यामुळे कौरव तिथे नसणार. आणि पांचालनरेशने आपल्याला केवळ एकदाच पाहिले आहे.... तेही युध्दात..... क्षत्रिय वेषात. मग ब्राह्मण वेषात कोण ओळखणार आपल्याला?" पण तरीही शत्रूच्या स्वयंवरात भोजन करायला जायचे म्हणजे परवानगीशिवायेथे देवयानीच्या कक्षात शर्मिष्ठेने जाण्यासारखे! भीम काही बोलणार त्या आधी नकुल म्हणाला, "आणि भ्राताश्री, जर ओळखून हल्ला केलाच, तर तुम्ही आहातचं की सोबत." नकुलने विश्वासाने भीमाकडे पाहिले.
"बरं.... चलं." खांद्यावर हात ठेवून भीम नकुल सोबत इतरांच्या मागे राजमहालाच्या दिशेने चालू लागला.

©मधुरा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

£>>>दानव = दैत्य = राक्षस (समानार्थी शब्द आहेत.)>>>
नाहीत. ही वेगवेगळी कुळे/ जमाती आहेत. जून्या वैदिक साहित्यात या जमातीन्चे भौगोलिक प्रदेश पण वेगवेगळे आहेत.

आणि हो, हिडिंबा नरभक्षक होती. पण टोळी??? हिडिंबा आणि हिडिंब राज्य करत होते त्या जंगलावर!>>

राज्य करत होते त्या जंगलावर म्हणजे प्रजा असणारच ना Happy
हिडिंबा आणि हिडिंब हे अरण्यातल्या राक्षस जमातीचे प्रमुख होते.

मनिम्याव,

त्या स्वयंवरात कृष्णाने भाग घेणे मान्यच नव्हते. कारण तिच्याच घरच्यांनी विरोध केला होता. अजून एक.... त्यात कुठलाच पण नव्हता. 'जो आवडेल, तो निवड' ! तिने कृष्णाला निवडले ज्याचा सहभागच अमान्य होता स्वयंवर रचैत्यांना.

द्रौपदीच्या वेळी विरोध इतर स्पर्धेकांकडून झाला होता.

Happy

नाहीत. ही वेगवेगळी कुळे/ जमाती आहेत. जून्या वैदिक साहित्यात या जमातीन्चे भौगोलिक प्रदेश पण वेगवेगळे आहेत.
>>>>>>>>>>>>>

जात-उपजात यावर लिहितच नाहीये.
For example: जर फुलं ही योनी धरली तर सुर्यफुल आणि गुलाब वेगवेगळे आहेतच. Happy

हे दानव, राक्षस, दैत्य शरीराने धष्टपुष्ट आणि स्वतःचे आकारमान बदलू शकणारे अश्या अर्थाने समानार्थी!

हिडिंबा-हिडिंब प्रमुख होते आणि प्रजाही होती जंगलात. पण टोळी कसं म्हणू शकता ? Lol

शिरेन,
वृकोदर हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ जास्त पाचनशक्ती असणारा. लांडगा वगैरे नाही.

बाकी कुळ आणि योनी यात शारीरिक फरक योनी या शब्दाने अधोरेखित होतो. त्यांचे शरीरही वेगळे होते मनुष्यापेक्षा.
Happy

वृकोदर हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ जास्त पाचनशक्ती असणारा. लांडगा वगैरे नाही.>>> ब रं छान
जाउदे. तुमचा तुमच्या चुकिच्या किंवा उथळ माहिती वर गाढ विश्वास आहे.

तुमची लिहिण्याची style रसाळ आहे पण अशा रसाळ गोष्टीं मधुनच सत्या वर चमत्काराची पुट चढतात. पण संजय लीला भन्साळी च्या चित्रपटा ला इतिहास मानायचेच दिवस आहेत सध्या.

Vrika means wolf and Udara means stomach. In Short, Vrikodara means wolf bellied. It is said that wolves are always hungry and eats a lot but their waist is always slim. Bhima is referred as Vrikodara since he is known for his insatiable hunger and also for his slim waistness.

आंतरजालावरून साभार !!!!!

Let's not fight on this. We both are correct on meaning. Lol But why Bhim is being called by the name Vrukodar may have lots of theories.

वृकोदर Meaning in Hindi - वृकोदर का मतलब हिंदी में
वृकोदर संस्कृत [संज्ञा पुल्लिंग] 1. (महाभारत) भीमसेन 2. वह व्यक्ति जिसकी पाचन शक्ति बहुत अधिक हो 3. भेड़िये जैसे बड़े पेट वाला।

वृकोदर - संज्ञा पुलिंग [संस्कृत] 1. भीमसेन का एक नाम । विशेष - कहते हैं, भीमसेन के पेट में वृक नाम की विकट अग्नि थी । इसी से उनका यह नाम पड़ा । 2. ब्राह्मण (को कहते हैं) । 3. शिव के गणों का एक वर्ग (को कहते हैं) ।

>>>>>>>>www.bsarakari.com वरून साभार

>>हिडिंबा-हिडिंब प्रमुख होते आणि प्रजाही होती जंगलात. पण टोळी कसं म्हणू शकता >>
Ok. टोळी नसेल म्हणायच तर राक्षस समाज म्हणा.

Pages