मुक्काम : आर्मी पोस्ट ऑफिस - वैदेही देशपांडे

Submitted by चिनूक्स on 14 April, 2009 - 15:42

'मुक्काम : आर्मी पोस्ट ऑफिस' हे वैदेही देशपांडे यांचे अनुभवकथन. सैनिकी आयुष्यातील अनुभव, घडामोडी, पद्धती या सार्‍यांचा अतिशय खोलात जाऊन वेध घेणार्‍या पंधरा लेखांचा हा संग्रह आहे. लेखिकेचे पती हे लष्करातील उच्चपदस्थ अधिकारी. त्यांच्यासमवेत कारगिलपासून अंदमानपर्यंत भारतातील असंख्य ठिकाणच्या लोकजीवनाचा व लष्करातील जीवनपद्धतीचा अनुभव लेखिकेने घेतला. या सैनिकी आयुष्यातील आनंद, दु:ख, अडचणी यांच्याशी त्या समरस झाल्या. लष्करातील मजा, काळज्या लोकांना कळायला हव्यात, सैनिकांच्या अस्थिर आयुष्यामुळे त्यांच्या कुटुंबांत पडणारे पडसाद लोकांपर्यंत पोहोचवायला हवेत, या उर्मीतून हे लेख लिहिले गेले.

देशासाठी कशाचीही पर्वा न करता प्राणांची आहुती देणारे ज्ञात-अज्ञात सैनिक. त्यांचे अस्तित्व आपण गृहीत धरतो आणि त्यांच्या भरवशावर आपण विश्वासाने, आनंदाने जगतो. अशा सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आयुष्याची ही झलक आहे. कमालीच्या प्रासादिक पद्धतीने लिहिलेली. 'सैनिक' नावाच्या 'माणसा'ला ओळखायला मदत करणारी...

mapo.jpg

------------------------------------------------------------------------------------

मुक्काम पोस्ट : ए.पी.ओ

"आता काय बाई मजा आहे एका मुलीची ! आर्मीच्या आयुष्यात पार्ट्याच पार्ट्या असतात." - इति माझी मैत्रीण.
"ह्या शांताला हे काय सुचलं? एक मुलगी आधीच परदेशी जाऊन बसली आहे. ह्या आर्मीवाल्यांच्या फार लांब लांब बदल्या होतात. सारखी ही मंडळी घरापासून दूर आणि त्यातून धोक्याचं आयुष्य. सरळ मुंबई-पुण्यातला मुलगा नाही का बघायचा?" - माझ्या आईच्या मैत्रिणीने व्यक्त केलेली चिंता.
"नाही म्हणजे लग्न ठरलं हे फार छान झालं, पण नीट चौकशी केलीस नं? नाही म्हणजे ही आर्मीवाली माणसं जरा जास्त घेतात." अंगठ्याने पिण्याची खूण करून खालच्या सुरात वडिलांच्या मित्रांनी बोलून दाखविलेली भीती !
"अरे ! काय थ्रिलिंग आयुष्य असतं ह्या लोकांचं, काय चार्म आहे ह्या आयुष्यात, नाही तर करा एकाच ऑफिसमध्ये जन्मभर खर्डेघाशी !" - इति भावाचा मित्र.

पंचवीस वर्षांपूर्वी लष्करी अधिकारी कॅप्टन आनंद उर्फ दिलीप देशपांडे यांच्याशी माझं लग्न ठरल्यावर अशा परस्परविरोधी प्रतिक्रिया मी रोज ऐकत होते आणि जास्तच गोंधळून जात होते. कारण त्यातले खरे काय किंवा खोटे काय, हे मला तरी कुठे माहीत होते?

आता दोन तपांच्या अनुभवांनंतर वाटते, ह्या आयुष्याचे खरे चित्रण फार कमी वेळा केले जाते. कथा, कादंबर्‍या अगर चित्रपटांमधून ह्या जीवनाचे उदात्तीकरण तरी केले जाते, या आयुष्यातल्या घटना भडक, अतिरंजित तरी केल्या जातात, किंवा काही वेळा त्यातल्या हडेलहप्पीची, शिस्तीची चेष्टा अगर हेटाळणी केली जाते. परंतु प्रत्येक वेळेला ज्या प्रमुख गोष्टींची दखल घ्यायला पाहिजे, ती घेतलीच जात नाही.

'युद्ध नसताना काय बरं करतात ही सैन्यदलं?' हा अनेकांना पडणारा प्रश्न, कारण त्याचे अस्तित्व जाणवावे असे फारसे काही घडत नाही. युद्ध सुरू झाले की मात्र सर्वांना जाग येते. मग त्यांचे अस्तित्व, प्रशिक्षण, त्यांची हत्यारे, सामग्री ह्या सर्वांची आठवण होते व त्यांची उपस्थिती आवश्यक वाटू लागते.

१९९९ साली झालेल्या कारगील उद्रेकामुळे बरीच जागरुकता निर्माण झाली. त्यातील बहुतांशी युद्ध पायदळ व तोफखान्याने केले होते. 'मीडिया' या प्रभावशाली माध्यमाने, सरहद्द कशी असते? युद्ध कसे होते? लष्कराला किती भौगोलिक कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागते, ह्याचे प्रत्यक्ष दर्शन जनमानसाला घडविले. टीव्हीद्वारा सामान्य माणसांनी ही लढाई व त्यातील भयानकता घरात बसून पाहिली. त्यामुळे जनमनात नक्कीच फरक पडला.

परंतु पंचवीस वर्षांपूर्वी परिस्थिती खूपच निराळी होती. महाराष्ट्रीयन मध्यमवर्गाला सैनिकी आयुष्याचे वावडे नसले, तरी हे जीवन परिचयाचे नव्हते, किंवा अजूनही म्हणावे तेवढे नाही,

सर्वसाधारण नागरी जीवनात असणारे सर्व गुणदोष ह्या जीवनात आहेत. मोठ्या यंत्रणेतल्या अनेक त्रुटी आहेत. ह्या यंत्रणेचा भाग बनलेली अनेक माणसे भारताच्या कानाकोपर्‍यातून आपले गुणदोष घेऊन आली आहेत. परंतु ती ह्या भारतवर्षातील मातीचे रंगरूप लेऊन त्यात मिसळली आहेत, म्हणून त्यांचे आवरण जरी भिन्न, जरा अनोळखी असले तरी मूळ रूप तेच आहे.

तिन्ही दलांच्या कार्यपद्धतीत, शिस्तीत बरेच साम्य असले, तरी प्रत्येकाचा बाज वेगळा आहे. अगदी नुसते सैन्यदल जरी घेतले, तरी त्यातील प्रत्येक विभागाची जीवनपद्धती त्यांच्या सेनादलातील कामानुसार वेगवेगळी आहे. सेनादलातील इतर विभाग व पायदळ ह्यांच्या जीवनपद्धतीत लक्षणीय फरक आहे.

इन्फंट्री अथवा पायदळ हा सेनादलाचा प्रत्यक्ष सरहद्दीवर शत्रूशी आमनेसामने लढणारा विभाग. शत्रूवर चढाई करतात ते पायदळाचे लोक. तोफखाना व रणगाडा तुकड्या त्यांना साहाय्य करतात. भारतातील सीमेचा खूप मोठा भाग असा आहे की, जिथे रणगाडे जाऊच शकत नाहीत. तर हिमालयाच्या दर्‍याखोर्‍यांमुळे तोफखान्याला मर्यादा पडते. अशा ठिकाणी सर्व मदार पायदळावरच असते. चढाई करताना एक संघ किंवा तुकडी असणे आवश्यक असते, म्हणून पायदळाची रचना वेगळी आहे.

पायदळ हे अनेक रेजिमेंटांमध्ये विभागले गेले आहे. ह्या रेजिमेंटांची नावे मराठा, पंजाब, शीख, गुरखा, जाट, महार, राजपूत, कुमाँओ, गढवाल, मद्रास, डोगरा, जम्मू-काश्मीर, आसाम रायफल्स, गार्डस्, ग्रेनेडिअर्स वगैरे आहेत. ह्या रेजिमेंटमध्ये नावाप्रमाणे त्या त्या भागातले किंवा जातीचे वीस ते पंचवीस हजार जवान असतात. त्याला एक युनिट अगर पलटण म्हणतात. ह्या पलटणींना १ मराठा, २ मराठा, ३ मराठा असा आधी नंबर व नंतर रेजिमेंटचे नाव दिलेले असते. काही पलटणी खूप जुन्या आहेत. मराठा रेजिमेंटच्या १ मराठा, २ मराठा ह्या अडीचशे वर्षे जुन्या पलटणी आहेत. ह्या रेजिमेंटमध्ये त्या त्या भागातले अगर जातीचे जवान असले, तरी त्यांचे अधिकारी मात्र कुठल्याही जातीचे / धर्माचे अगर कुठल्याही भागातले असतात.

एका रेजिमेंटमध्ये जवान एका भागातले असणे, अथवा एका जातीचे असणे ब्रिटिशांना सोयीचे होते म्हणून त्यांनी तशी रचना केली. त्या रचनेत बरेच तथ्य आहे म्हणून अजून तरी तीच रचना चालू आहे, त्याचबरोबर काही रेजिमेंटस् अशीसुद्धा आहेत की, ज्यात जातीचा अगर प्रदेशाचा संबंध नाही. उदा. गार्डस् व ग्रेनेडिअर्स.

एका भागातल्या लोकांची भाषा, खाण्यापिण्याच्या सवयी सारख्या असतात. त्यांच्या राहण्याच्या पद्धतीत साम्य असते. त्यांचे सणवार, रीतिरिवाज, देवदैवते एक असतात. ह्या गोष्टी दिसायला लहान असल्या, तरी त्याने बराच फरक पडतो. 'शिवाजी महाराज की जय' ह्या आरोळीने मराठा जवानाला जेवढी 'स्फूर्ती' मिळेल तेवढी शीख जवानाला मिळणार नाही, तर 'सत् श्री अकाल' म्हटल्यावर त्यांना जेवढे स्फुरण चढेल तेवढे इतर कुणाला चढणार नाही. वरून छोट्या वाटणार्‍या ह्या गोष्टींची पाळेमुळे किती खोलवर गेली आहेत, ते अशा ठिकाणी समजते.

जवानांची अनेक चाचण्यांनंतर व लेखी परीक्षेनंतर निवड झाली की, त्याला त्याच्या रेजिमेंटच्या सर्वांत मोठ्या केंद्रात एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. रेजिमेंटच्या केंद्राला 'रेजिमेंटल सेंटर' म्हणतात. वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, त्याला एका पलटणीत पाठवले जाते. निवृत्त होईपर्यंत तो त्याच पलटणीत राहतो. अनेक प्रकारचे प्रशिक्षण घेण्यासाठी निरनिराळ्या कोर्सेससाठी तो गेला, तरी परत त्याच पलटणीत येतो. बढती मिळत गेली, तर पलटणीच्या बाहेर काम करावयाच्या अनुभवासाठी दोन किंवा तीन वर्षे बाहेर बदली होते. जवानाचा सर्वांत मोठा हुद्दा 'सुभेदार मेजर' असतो. तो पलटणीतला मुख्य जवानांचा प्रतिनिधी असतो. ह्या त्याच्या पंचवीस-सवीस वर्षांच्या दीर्घसेवेत पलटण हेच त्याचे घर बनते.

अधिकार्‍यांना प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष सेवेत जाताना स्वतःचे रेजिमेंट निवडायचा अधिकार असतो. पण पलटण मात्र रिक्त जागांवर अवलंबून असते. सेकंड लेफ्टनंट, लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर, ले. कर्नल असे हे हुद्दे तो पलटणीतच चढतो. ह्या प्रवासाला १८ ते १९ वर्षे लागतात. अनुभवासाठी ब्रिगेड, डिव्हिजन, प्रशिक्षण देणारा अधिकारी म्हणून इतर ठिकाणी दोन-दोन वर्षे काम करावी लागले, तरी जास्त वेळ पलटणीत जातो. कर्नल (Co-Commanding Officer) हा युनिटचा मुख्य असतो. कर्नल पदानंतर अधिकार्‍यांचा युनिटशी संबंध संपतो. कारण ब्रिगेडियर हा तीन पलटणींचा मुख्य असतो व तो सर्व सूचना तीन पलटणींच्या कर्नल्सना देत असतो.

कर्नलचे काय, कुठल्याही अधिकार्‍याचे अथवा जवानाचे नाव त्याच्या पलटणीशी कायमचे जोडले जाते. जसे फिल्डमार्शल माणेकशांची पलटण '८ गुरखा' आहे, तर पहिले परमवीरचक्र मिळविणारे अधिकारी सोमनाथ शर्मांचे युनिट '४ कुमाँओ' आहे. अधिकार्‍यांना व जवानांना मिळणारी शौर्यपदके जशी त्यांच्या नावावर लिहिली जातात, तशीच ती पलटणीच्या इतिहासात कायमची कोरली जातात.

पंजाबी, शीख, मराठा अशी अनेक कुटुंबं आहेत की, ज्यांचा लष्करी सेवा हा तीन किंवा चार पिढ्यांचा धर्म आहे. आजोबा, वडील, मुलगा एकाच पलटणीचे मुख्य अधिकारी बनले आहेत, तर काही पलटणींचे नेतृत्व एकाच घरातल्या तीन भावांनी वेगवेगळ्या वेळी केले आहे. प्रशिक्षण घेतलेल्या अधिकार्‍याची पार्श्वभूमी लष्करी असली, तर त्याला त्याच्या वडिलांच्या अगर दोन्हीकडच्या आजोबांच्या पलटणीमध्ये पाहिजे तिथे प्रवेश करता येतो. तो त्याचा हक्क समजला जातो. अशा अनेक प्रथा आनंदाने, अभिमानाने पाळल्या जातात.

अधिकारी व जवान एकत्र राहिल्यामुळे त्यांच्यात अनेक प्रकारची नाती निर्माण होतात, एक भावनिक एकसंधपणा येतो. आपापसातले चांगले-वाईट गुण एकमेकांना माहित होतात. ह्या सगळ्यांचा उपयोग लढाईच्या वेळेस होतो, किंवा व्हावा म्हणूनच पायदळाची रचना अशी केली आहे. हे सर्व पुराण एवढ्याचसाठी सांगितले की, ह्या अधिकार्‍यांबरोबर राहून त्यांचे कुटुंबीयपण त्या त्या पलटणीचा भाग बनून जातात. '१४ मराठा' हे दिलीपचे युनिट. तिथे लग्नाच्या आधी तो पाच वर्षे होता. आज '१४ मराठा' हे आमच्या सगळ्यांचे दुसरे घर आहे.

आता ही हजार माणसांची पलटण आपले विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर घेऊन, दर तीन वर्षांनी जागा बदलत असते. कधी काश्मीर, तर कधी राजस्थान, तर कधी अंदमान! लढणार्‍या पलटणीला सर्व भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेता आले पाहिजे. ह्यात तीन वर्षे शांततेचे ठिकाण, तर दोन वर्षे सरहद्द, अशी विभागणी होते. शांततेच्या ठिकाणी घरे, शाळा व सर्व सोयी उपलब्ध असतात, तर सरहद्दीवर कुटुंबाला न्यायला परवानगी नसते. त्यावेळेस कुटुंबाला हव्या त्या ठिकाणी घर मिळते.

ह्या पलटणीच्या भ्रमंतीमुळे मला भारत बघायला मिळाला. १९७६ साली आमचे लग्न झाले, तेव्हा तीन वर्षांचा अत्यंत अशांततामय काळ मिझोराम येथे संपवून पलटण सिलीगुडीपासून चाळीस कि.मी.वर तिश्ता नदीच्या काठावर पोहोचली होती. दिलीप युनिटबरोबर तिथे पोहोचला. त्यानंतर त्याने मला बोलावले. मुंबई-कलकत्ता-बागडोगरा असा विमानाने प्रवास करत मी बागडोगरा विमानतळावर पोहोचले. प्रवास करावयाची हौस खूप असली तरी प्रत्यक्षात मुंबई, पुण्याच्या बाहेर एकटी पडले नव्हते. त्यामुळे प्रवासाचा अनुभव शून्यच. त्यातून 'लष्करी' आयुष्य कसे असते, ह्याबद्दल पूर्ण अनभिज्ञ होते. बाहेरून धीटपणा, स्मार्टपणा याचे आवरण घेतले तरी मनातून घाबरलेली होते. बरोबरचे सर्व प्रवासी आपापले सामान घेऊन निघून जात होते, तरीही मला घ्यायला मात्र कुणीच आले नव्हते. हळूहळू माझी भीती वाढत होती. बाहेरची एकही जागा, ठिकाण अगर माणूस माझ्या माहितीचे नव्हते. पुढे काय करावयाचे ह्याची पुसटशी कल्पनाही मला नव्हती. माझी अस्वस्थता, भीती माझ्या चेहर्‍यावर पूर्ण दिसायला लागली, तेव्हा दोन गणवेषातले तरूण अधिकारी अत्यंत गंभीर व रागावलेल्या चेहर्‍याने माझ्याजवळ आले व मला म्हणाले,
"आपण सौ. देशपांडे का?"
"हो," मी अतिशय चाचरत म्हणाले.
त्यांना काही विचारावे अशी इच्छा झाली, तरी त्यांच्या चेहर्‍यावरच्या भावामुळे मी विचारले नाही.
"कॅप्टन देशपांडे गावाला गेले आहेत म्हणून आम्ही तुम्हाला न्यायला आलो आहोत. आमच्याबरोबर चला." त्यांनी मला ऑर्डर सोडली व माझे सामान उचलले.
मी भीत भीत मनाचा हिय्या करत म्हणाले,
"पण मी येणार हे माहीत असूनही कसा गेला?"
"म्हणजे काय? ही आर्मी आहे. त्याला कर्नलसाहेबांनी बाहेर पाठविले म्हणजे जायलाच पाहिजे. तो आता परत दोन महिन्यांनी येईल." एक जण म्हणाला.
"किती दिवसांनी?" मी आश्चर्याने विचारले.
"दोन महिन्यांनी!" दुसर्‍याने जोरात सांगितले.

आता मात्र माझे अश्रू बाहेर पडत होते. मी रडक्या स्वरात म्हटले,
"मी इथूनच परत जाते." पण ते दोघे लांब ढांगा टाकत चालतच होते. मी पूर्ण गोंधळून गेले. तेवढ्यात समोरच्या काचेतून मी दिलीपला बघितले. तिथून त्याच्याबरोबर आणखी दोघे अधिकारी माझी ही अवस्था बघून हसत होते.

नवीन येणार्‍या अधिकार्‍यांच्या बायकांचे स्वागत हा खास लग्न न झालेल्या अधिकार्‍यांचा मान असतो म्हणून त्यात रॅगिंग, थोडी चेष्टा, गंमत असल्याने स्वागत रंगतदार व आठवणीत राहील असे होते. संध्याकाळी माझ्या स्वागताची पार्टी झाली. त्यात मला हातात बंदूक घेऊन शपथ घ्यायला लावली...
"मी सर्वांना वेळी-अवेळी जेवायला घालेन. नवर्‍याला तीन-चार महिने दूर पाठवलं तरी तक्रार करणार नाही. न लग्न झालेल्या अधिकार्‍यांच्या लग्नासाठी प्रयत्न करेन." वगैरे वगैरे. ह्या चेष्टेच्या मागे आपुलकी होती. ज्याने मला जिंकले त्या हजार माणसांच्या कुटुंबाची मी केव्हा भाग बनून गेले, ते माझे मलाच समजले नाही.

ह्या मोठ्या कुटुंबात आमच्या बायकांचे असे एक स्वतंत्र राज्य निर्माण झाले. सर्वच जणी घरापासून लांब, त्यात राहण्याचा जागासुद्धा गावांपासून लांब असायच्या. त्यामुळे इतर शेजार नाही का बाजार नाही. लग्नाआधीची, काही हवे असेल तर स्कूटरला किक मारून बाहेर पडायचे, ही सवय प्रथम मला फार नडली. राहण्याची जागा पंचवीस-तीस कि.मी. दूर असल्याने एकटीला जाणे शक्य नाही व नवरा दिमतीला असेल ह्याची खात्री नाही.

नवर्‍यांचे पलायन ही फार मोठी बाब होती. केव्हा, किती दिवस बाहेर जातील ह्याचा भरवसा नाही. कधी एक्झरसाइज म्हणजे लुटुपुटूची लढाई तर कधी 'फिल्ड फायरिंग' तर कधी 'पेट्रोलिंग'. कारण कुठलेही असले, तरी महिना-दोन महिन्यांची निश्चिंती!

मग अशा वेळेस आमचे तिलोत्तमेचे राज्य! अगदी एखादी घरातली वस्तू संपली इथपासून ते कुणाला बरे नाही इथपर्यंत असलेल्या सर्व अडचणींना एकमेकींचा आधार असायचा. आर्मीतल्या अडचणी पण निराळ्या. बदली झाल्यावर घर न मिळणे, चार-पाच वेळा घर बदलायला लागणे, कधी एक खोली तर कधी बॅडमिंटन खेळता येईल एवढे घर मिळणे, दोन-तीन महिने पगार न येणे, पाहुणे आले असता वाहन न मिळणे अशा अनंत गोष्टी! पण हे सर्व सुकर होत होते, कारण कुठला तरी अनामिक धागा आम्हांला बांधून ठेवत होता.

आम्ही ना एका प्रांतातल्या, ना एका भाषेच्या, ना एका धर्माच्या, पण कुठल्या तरी अदृश्य धाग्यांनी किती घट्ट बांधले गेलो आहोत ह्याची प्रचिती एक दिवस आली.

पलटण पिथोरागडला होती तेव्हाची गोष्ट. सर्व युनिट हिमालयात दहा हजार फुटांवर ट्रेनिंगसाठी गेले होते. तीन महिन्यांचे ट्रेनिंग आणखी महिनाभर लांबले. चार महिन्यांत त्या पिथोरागडसारख्या छोट्या गावात सगळ्याजणी कंटाळून गेल्या. मग एकेक अधिकारी परत येऊ लागले. आमच्यात दोघी नववधू होत्या, त्यांची तोंडे अगदी सुकून गेली. बाकी सर्व अधिकारी परत आले, पण हे दोघे काही कामासाठी तिथेच राहिले. आता त्या दोघीच नाही, तर सर्वजण त्यांची वाट पाहू लागले. अखेर पंधरा दिवसांनी ते दोघे तिथून निघाल्याची बातमी आली, पण वाटेत दरडी कोसळून रस्ता बंद झाल्यामुळे परत दोन दिवस थांबावे लागले. 'वाट पाहणे' या प्रकाराचा 'अंत' पाहून त्या दिवशी जेवणापर्यंत ते दोघे पोहोचतील अशी बातमी आली. स्वयंपाक सज्ज ठेवून त्या दोघी माझ्याकडे आल्या. आम्ही गच्चीत बसून चहा घेत होतो. अर्थात एक नजर रस्त्यावर होतीच. अचानक हवा खराब झाली. जोरात वारे वाहू लागले, सगळ्यांच्याच मनात पाल चुकचुकली, पण प्रत्यक्षात कोणी काही बोलले नाही.

अचानक घरासमोर दोन जीप्स येऊन उभ्या राहिल्या. त्यातून युनिटचे मुख्य कर्नल व इतर अधिकारी उतरले. आम्हाला तिघींना एकत्र पाहून आमच्या घराकडे वळले.

आर्मीत अनेक पद्धती आहेत. अपघात किंवा वाईट बातमी सांगायला सर्वांत वरिष्ठ अधिकारी जातो. ऑफिसच्या वेळात त्या सर्वांना घरी येताना पाहून आमच्या पोटात गोळा उठला. तिथला रस्ता, दरडी, वादळ, नाही नाही ते विचार एका क्षणात आमच्यासमोर येऊन गेले. कुणी काही बोलेना. दोघींचे चेहरे भेदरलेले तर ओठ थरथरत होते. दोघींच्यात एक पाऊल टाकायची शक्ती नव्हती. मनाचा हिय्या करून मी दार उघडले. कर्नलने एकीचे नाव घेऊन ती कुठे आहे म्हणून विचारले, तर तिची पुढे यायची हिंमत होईना. ती थोडी पुढे आली तशी..
"अभिनंदन, अभिनंदन"चा वर्षाव सुरू झाला. आम्ही चक्रावलो. मैत्रिणीचा नवरा आर्मीच्या महत्त्वाच्या परीक्षेत उत्तम तर्‍हेने पास झाला म्हणून ही बातमी द्यायला व मिठाई खायला सर्वजण आले होते.

दोन मिनिटांपूर्वी आम्ही काय विचार करत होतो. त्या क्षणी उठलेली कळ व आमच्या तिघींच्या डोळ्यांतील पाणी, आमची मैत्री मात्र कायमची दृढ करून गेले.

डोक्यावरचा अनामिक ताण, भविष्याची भीती व 'उद्या' ह्या अनिश्चिततेचा काळा ढग नेहमीच होता. त्यात मैत्रीचा चंदेरी धागा आम्हांला जवळ आणत होता. आधार देत होता.

ह्या वाटचालीत अनेक अनुभव आले. मी ज्या गावात गेले तिथे शाळेत नोकरी केली; त्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांशी संबंध आला. त्यांचे आयुष्य जवळून पाहता आले, जे एरवी आर्मी कँपमध्ये राहिल्यामुळे बघता येत नाही. भारतातल्या विविध प्रांतातल्या लोकांचे दर्शन मनापासून भावले. अनेक माणसे भेटली. कधी ती आवडली, तर कधी त्यांच्याशी वाद घातला, तर कधी त्यांच्या आडमुठेपणामुळे तणतणले, तर काहींनी मनात आयुष्यभरासाठी हक्काचे कोपरे निर्माण केले. प्रत्येक गाव सोडताना डोळ्यांत पाणी होते. शाळेतल्या मुलांनी प्रेमाने दिलेल्या वस्तूंनी घराच्या भिंती सजल्या. कार्डे, पत्रे ह्यांची फाईल फुगत गेली.

जी गोष्ट माणसांची तीच इथल्या सृष्टीची! भारतात अनेक दिशांनी प्रवास झाला. डोळे भरभरून इथला निसर्ग पाहिला. त्याच्या विविधतेने आणि अनोखेपणाने त्याच्या जबरदस्त प्रेमात पडले. हिमालय तर नेहमीचाच साथी व आयुष्याचा हिस्सा बनला. कारगिलपासून ते आसामपर्यंतच्या रांगा पाहताना तो माझा कधी झाला, ते कळलेच नाही. त्याच्या प्रत्येक रुपावर मी मोहरून जात होते तेव्हा तो गालातल्या गालात हसत होता, असे मला नेहमी वाटायचे.

एकदा हिमालयातली थंडी संपत आली होती. फांद्या निष्पर्ण असल्या तरी रसरसलेल्या होत्या. बारीक कोंब असे होते की जाणकारालाच दिसावेत. अचानक एक दिवस सर्व झाडे गुलाबी, लाल कोवळ्या पालवीचा साज घालून आली. निसर्गाचा अनुपम चमत्कार पाहिल्याचा आनंद झाला. असे अनेक क्षण माझ्या ओंजळीत आहेत.

सुट्टीत पुण्याला गेल्यावर आपल्या शिक्षणाचा पूर्ण उपयोग करून छान पगार व मस्त बोनस मिळविणार्‍या मैत्रिणी भेटायच्या. एका जागी राहिल्यामुळे अनेक फायदे त्यांना मिळत होते. त्यांच्या मुलांना छंद जोपासण्याची संधी मिळत होती. खोटे कशाला सांगा? काही वेळा वाईट वाटायचे. मुलींच्या बदललेल्या अनेक शाळांमुळे अपराधी वाटायचे, त्यांना लहानपणापासूनचे मित्र-मैत्रिणी मिळणार नाहीत म्हणून वाईट वाटायचे; पण आता वाटते, त्यांच्याइतके भारताच्या अनेक कोपर्‍यांत इतर कुणाला इतके मित्र व अंकल-आंटी भेटतील?

माणसांचे विविध अनुभव व निसर्गात रमलेले अनेक सोनेरी क्षण हा मला मिळालेला 'बोनस'. मुंबई, पुण्यात राहून चार आकडी बोनस मिळाला असता कदाचित, पण माझा हा 'अनमोल ठेवा' अशा प्रवासाशिवाय कुठे मिळाला असता?

आमची बदली भारताच्या ह्या टोकापासून दुसर्‍या टोकाला जरी झाली, तरी आमच्या पत्त्यांत फार थोडा बदल होत असे. पत्ता असायचा -

कॅप्टन आनंद देशपांडे
१४ मराठा लाईट इन्फंट्री
c/o 56 APO.
किंवा 99 APO.

APO म्हणजे आर्मी पोस्ट ऑफिस. ह्या एवढ्याशा संदर्भरहित पत्त्यांवरची पत्रे अचूक जात. अजूनही जातात.

असा हा आमचा ए.पी.ओ.च्या मुक्कामातला प्रवास! इथले अनुभव कधी माणसांबद्दल आहेत तर कधी निसर्गाबद्दल, तर काही वेळा आलेल्या अनुभवांतून अनेक प्रश्नचिन्हे उभी राहिली त्याबद्दल आहेत. हा या प्रवासातला माझा मनाचा प्रवास आहे.

मुळात स्वभाव बडबडा असल्याने आपले अनुभव दुसर्‍याला सांगायची उर्मी गप्प बसू देत नाही म्हणून विद्वत्ता नसताना, फारसे शब्दवैभव नसतानासुद्धा हा लेखनाचा प्रपंच करत आहे.

------------------------------------------------------------------------------------

किस्सा युनिफॉर्म का

हिमालयाच्या कुशीत, कुमाँओ भागातील डोंगरावर वसलेल्या शांत छोट्या पिथोरागड गावातल्या पिटुकल्या 'आर्मी स्टेशन'ला खडबडून जाग आली होती. या ठाण्यामधील सर्व माणसे कामात, घाईत होती. गाड्या इकडून तिकडे धावत होत्या. सर्व बाजूला साफसफाई सुरु होती.

पिथोरागडला आर्मी कमांडर भेट देणार असा फतवा आला आणि वातावरणच बदलून गेले. आर्मीत, 'आर्मी कमांडर' किंवा इतर उच्च अधिकारी, भेट किंवा पाहणी करणार म्हटल्यावर, वातावरण एकदम तापू लागते. हा एक प्रकारचा 'व्हायरल फिव्हर'च असतो. ह्याची लक्षणे फार जोरदार! अत्यंत संसर्गजन्य असलेल्या या रोगाची लागण फार झटपट होते. ह्यामुळे माणसे सफाईला लागतात. चुन्याची व गेरूची पोती रिकामी होतात. आर्मीत एक म्हण आहे, 'जे स्थिर आहे त्याला रंग द्या व जे हलतंय त्याला सॅल्यूट ठोका.' मेसमधे खरे तर सारखीच सफाई चालू असते; पण हा फतवा आला आणि चांदी-पितळेच्या वस्तू लखलखू लागल्या. गावात असलेली चांगली बेकरी, मिठाईवाल्यांकडे हेलपाटे वाढू लागले.

या रोगाचा दुसरा गंभीर परिणाम झाला तो स्थानिक हौशी कलाकारांवर. मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी त्यांची जमवाजमव सुरू झाली. इतके दिवस झालेल्या उपासमारीचे उट्टे काढायला हा एक अचूक मोका त्यांना मिळाला होता. त्यांचा उत्साह चढत्या भाजणीत वाढू लागला व वातावरण घुमू लागले.
या उत्साहाच्या लाटेत जवानांच्या बायकांसाठी चालत असलेले 'वेलफेअर सेंटर' चैतन्यमय होऊन गेले. तेथेही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

सर्व अधिकारी व जवान मंडळी, आर्मी कमांडर करणार असलेल्या इन्स्पेक्शनच्या तयारीत गर्क झाली.
कुठलाही वरिष्ठ अधिकारी आला की, तो सर्व अधिकारी व जवानांची एकत्र सभा घेतो. ह्या सभेला 'दरबार' म्हणतात. या दरबारामध्ये कुठलाही जवान, अधिकारी वरिष्ठ अधिकार्‍याला प्रश्न विचारू शकतात अगर आपली अडचण सांगू शकतात. अगदी खालच्या हुद्द्याच्या माणसालाही वरिष्ठांकडे जाण्याची एखादी संधी मिळावी, त्यासाठी या सभेचे आयोजन असते. युनिटमध्ये सुद्धा दर आठवड्याला दरबार होतो, पण मुख्य पाहुण्याचा हुद्दा जेवढा जास्त, तेवढी त्याची तयारीपण जास्त असते.

या कमांडरसाहेबांबरोबर त्यांच्या सौभाग्यवतीपण येणार होत्या. तेव्हा त्यांना कार्यक्रमात व्यग्र ठेवायची जबाबदारी आम्हां बायकांकडे होती. त्यावेळेस ब्रिगेड चालवत असलेल्या बालवाडीत मी नोकरी करत होते. संसर्गजन्य तापाची झळ या चिमुकल्या मंडळीनापण लागली होती.

सौभाग्यवती हेलिकॉप्टरमधून उतरल्यावर लगेचच आमच्या शाळेत भेट द्यायला येणार होत्या. त्यांचा पहिला चाळीस मिनिटांचा वेळ शाळेसाठी होता. आल्यावर एका चुणचुणीत मुलीकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावयाचे. मग मुलांची कवायत, शाळेच्या वर्गांमधून चक्कर व सौभाग्यवतींच्या हस्ते चॉकलेट वाटप करून कार्यक्रम संपवायचा, असा सुटसुटीत कार्यक्रम आम्ही तीन शिक्षिका व प्रिन्सिपॉल बाईंनी ठरविला. कवायत करताना जरा रंगीबेरंगी दिसावे, म्हणून निशाणे घेऊन कवायत करावी असे ठरले.

कवायत बसविणे, ड्रम वाजविणे हे करण्यासाठी ब्रिगेडमधून दयालसिंग नावाचे जवान यायला लागले. त्यांच्या ड्रमबरोबर निशाणे कधी खाली, तर कधी वर जाऊ लागली. ती एकाच दिशेला जावीत या प्रयत्नात त्या पाच हजार फुटांवरील थंड पिथोरागडमध्येही आम्हांला घामाच्या धारा लागल्या. पण त्या बालमंडळींना दयालसिंगांनी चांगलेच ताब्यात ठेवले. दयालसिंगच्या हुशारीमुळे चॉकलेटचे वाटप व इतर त्यापाठची तयारी त्यांच्याच गळ्यात पडली, त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो.

शेवटी भेटीचा तो सुदिन उजाडला. शाळेच्या पटांगणात पन्नास-साठ मुले निशाणे घेऊन उभी होती. एक रस्ता ओलांडून हेलिकॉप्टर उतरण्याचे मोठे पटांगण होते, म्हणूनच सौभाग्यवतींची पहिली भेट शाळेत होती. सर्व तयारी झाली. परंतु आमचे दयालसिंग बेपत्ता होते. आम्हा शिक्षकगणांचे बी. पी. वाढायला लागले. तेवढ्यात दयालसिंगांऐवजी तीन नवखे जवान आले. दयालसिंग हुशार, अनुभवी व मागील आघाडी सांभाळण्यात पटाईत असल्यामुळे युनिटमध्ये झालेल्या अनेक कार्यक्रमांना त्यांची गरज होती म्हणून हा आयत्यावेळचा बदल झाला, जो आम्हाला फारच महागात पडला. त्या तिघांना पाहून आम्ही डोक्याला हात लावला. घाईघाईने त्यांना काम समजावले. 'प्रथम ड्रम वाजवून कवायत घ्यायची', 'चॉकलेटं वाटायची' अशी ढोबळ कामे सांगितली, पण जास्त समजावयाला वेळ नव्हता, कारण क्षितिजावर हेलिकॉप्टरचा ठिपका दिसू लागला.

ते हेलिकॉप्टर जसजसे जवळ यायला लागले, तसतसा आमचा बालचमू आनंदू लागला, ओरडू लागला. नंतर ते आमच्या डोक्यावर आल्यावर तर त्यांच्या आनंदाला सीमाच राहिली नाही. मोठा आवाज व बरीच धूळ उडवत ते समोरच्या पटांगणात उतरले. तोपर्यंत आमचा बालचमू त्या हेलिकॉप्टरने इतका आकर्षित झाला की निशाणे, कवायत विसरून सरळ रस्त्यावर धावला; कारण तिथून चांगले दृश्य दिसत होते. आमची तारांबळ उडाली. आरडाओरड करून त्यांना आत आणायला सुरुवात केली, पण मुले ऐकेनात. आम्ही त्यांना आत पिटाळत होतो; तर काही व्रात्य मुले परत परत पळत होती. मदतनीस धावून आले. त्यांनी सर्वांना आत आणले.

आम्ही त्यांच्या रांगा बनवत असताना एका मदतनिसाने नुसते गेट बंद केले नाही, तर त्याला भले मोठे कुलूप लावले. त्याचा आम्हाला पत्ताच नव्हता. जेव्हा गाडीचा हॉर्न मोठ्याने वाजू लागला, तेव्हा आमच्या प्रिन्सिपॉलबाई पळाल्या. परंतु सौभाग्यवतींचे स्वागत आधीच मोठ्या कुलूपाने झाले होते. किल्ली शोधण्यासाठी मुलांचा बरा, असा शिक्षिकांचा गोंधळ झाला. किल्ली जवळ असलेल्या मदतनिसाला बोलावून दार उघडण्यात आले. माफी मागतच स्वागत झाले. त्या गडबडीत प्रमुख बाई पुष्पगुच्छाचे विसरून गेल्या. आम्ही पण आठवण करून दिली नाही, कारण सौभाग्यवती आपल्या दाक्षिणात्य मैत्रिणीला घेऊन आल्या होत्या. एक पुष्पगुच्छ वाढवावा लागणार होता.

तोवर दुसरा मदतनीस ड्रम घेऊन सरसावला. त्याची मुलांना सवय नव्हती. ती गोंधळली. ड्रमच्या आवाजाबरोबर काही निशाणे वर तर काही खाली जाऊ लागली. जरा कवायत थोडी बरी जमायला लागली, तोपर्यंत ते दुष्ट हेलिकॉप्टर परत उडाले, प्रमुख बाईंनी डोळ्याचे आकारमान एवढे वाढविले की जागेवरून कुणीही हलले नाही. पण वर खाली जाणारी ती निशाणे हालायचीच थांबली, कारण बालचमूचे डोळे त्या हेलिकॉप्टरवर खिळले होते. आमच्या कवायतीचा बोर्‍या वाजवून ते दिसेनासे झाले.

सौभाग्यवतींना व त्यांच्या मैत्रिणीला मोठ्या बाईंबरोबर पाठवून आम्ही जादाचा पुष्पगुच्छ व चॉकलेट वाटपाच्या तयारीला लागलो. पाहतो तो काय, चॉकलेट्स् अर्धीच. मदतनिसांना विचारल्यावर ते म्हणाले,
"मॅडम, मघाशी मुले आत येईनात म्हणून दिली. आपने ही बोला था, ये बच्चों के लिये हैं|"
"छान." म्हणून आम्ही कपाळावर हात मारला.

शाळेत वाढदिवसाला मुलांनी वाटलेली तर्‍हतर्‍हेची चॉकलेट्स् ठेवलेली होती. त्याची भर घालून वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा, 'त्याला मोठे मिळाले', 'मला लहान मिळाले', 'मला त्याच्यासारखे लाल हवे' म्हणून रडारड सुरू झाली.

आम्हा शिक्षिकांची सहनशक्ती आता संपायला आली होती. परंतु आणखी एक धक्का बसायचा बाकी होता. पुष्पगुच्छ देण्यासाठी निवडलेली चुणचुणीत मुलगी दोन नवीन व्यक्तींना पाहून गोंधळली. आपला सर्व स्मार्टनेस वापरून लांबून खणखणीत आवाजात तिने विचारले, "मॅडम, पहले फूल गोरे ऑन्टी को देने हैं, या काली ऑन्टी को?"

'स्टारट्रेक'मधल्या माणसांसारखे कळ दाबून अंतर्धान पावता आले असते, तर किती बरे झाले असते, असा विचार समस्त शिक्षिकांच्या मनात आला नसता तरच नवल!

'फजिती' हा खरे नेहेमीचाच प्रकार, पण फौजी फजित्यांना वेगळा रंग असतो. त्या अव्यवस्थितपणामुळे नाही, तर 'अति' व्यवस्थितपणामुळे होतात. नको त्या उत्साहाने मदत केल्याने होतात. गोंधळ होऊ नये म्हणून जितकी अधिक काळजी घेतली जाते, तितका गोंधळ व्हायच्या शक्यता वाढतात. त्यामुळे गंमत वाढत जाते.

लष्करात वरिष्ठ मंडळींची बडदास्त हे एक फार मोठे 'प्रकरण' असते. त्यात घेतलेल्या अतिदक्षतेने फार गमतीजमती होतात. हा असाच एक किस्सा!

सिलीगुडीजवळ तिश्ताच्या काठावर अगदी जंगलात एक डाक बंगला होता. बंगला जरा उंचावर होता. खाली तिश्ताचे भले मोठे पात्र होते. थंडीत पाणी कमी झाल्याने पात्रात फारसे पाणी नव्हते, मात्र अनेक डबकी होती. रात्री तिथे जंगलातली अनेक जनावरे पाणी प्यायला यायची, कारण आजूबाजूला घनदाट जंगल होते. त्यामुळे सहसा न दिसणारे प्राणी तिथे पहायला मिळायचे, तर पहाटे अनेक प्रकारचे पक्षी दिसायचे. एका जनरल व त्यांच्या पत्नीला प्राणी पक्षी बघायचा छंद होता. त्यांना ती जागा म्हणजे स्वर्गच वाटली. आर्मीमध्ये जाहीर केले तर नको इतकी व्यवस्था ठेवतात व वातावरण बिघडून जाते, म्हणून त्यांनी फक्त जे.सी.ओ. साहेबांना पुढे जाऊन डाक बंगल्याचे आरक्षण करायला सांगितले. जे.सी.ओ. साहेबांना जनरलसाहेबांचे काम म्हटल्यावर स्फुरण चढले. ते बरोबर सहा माणसांची 'वर्किंग पार्टी' घेऊन गेले. (एखाद्या कामासाठी माणसे नेणे याला वर्किंग पार्टी म्हणतात.)

श्री. व सौ. जनरल ठरल्या दिवशी पोहोचले. जेवणाची व इतर व्यवस्था पाहून खूष झाले. जनरलसाहेबांना संशय आला, पण ते गप्प बसले.
पौर्णिमेची रात्र होती. जेवण करून बाहेर बसले, तर खाली शुकशुकाट! सहजी दिसणारी हरणे, कोल्हेपण दिसत नव्हते, ना त्यांचा काही आवाज ऐकू येत होता. मध्यरात्रीपर्यंत बसून सौ. कंटाळल्या. श्री. म्हणाले,
"सगळ्यांनी मला छातीठोकपणे सांगितलं होतं की, इथून खूप प्राणी दिसतात, पण इथं तर काहीच नाही."
रात्रभर बिचारे खुट्ट वाजले की, आपल्या दुर्बिणी सरसावून बघत, पण तमाम प्राणीवर्ग गायब झाला होता. पहाटे पहाटे थोडा प्राण्यांचा आवाज आला आणि पाठोपाठ दोन-चार गोळ्यांचा बार उडविल्याचा आवाज आला. जनरलसाहेब ताडकन उठले. त्यांच्या डोक्यात काय झाले असेल याचा लख्खकन् प्रकाश पडला.

"साहब, इधर आओ." त्यांनी ओरडून जे.सी.ओ. साहेबांना बोलाविले. ते घाबरून पळत पळत आले. त्यांना कळत नव्हते, चूक कोठे झाली?
"साहब, वर्किंग पार्टी आणली का?" -जनरल.
"हो सर!" -जे.सी.ओ.
"बाकीची माणसं कुठे आहेत?" -जनरल.
"खाली आहेत सर." -जे. सी. ओ.
"काय करत आहेत?" -जनरल.
"मशाली घेऊन उभी आहेत सर." -जे. सी. ओ.
"कशासाठी?" -जनरल.
"सर, काल रात्री आलो, तर पाहिलं की, जंगली जनावरं फार येतात. बार्किंग डिअर व हायनाच्या आवाजानं झोप येत नाही. तुम्ही येथे आराम करावयाला येणार, तर तुम्हांला त्रास होणार, म्हणून आजूबाजूला मशाली पेटवून उभे राहायला सांगितलं. आता त्यांचं तेल संपल्यावर दोन कोल्हे आले, तर हवेत बार केले. आता परत काही येणार नाही सर!" त्यांनी काकुळतीला येऊन स्पष्टीकरण केले.

जनरलसाहेब हतबुद्ध झाले. महत्प्रयासाने जमविलेल्या पौर्णिमेच्या त्या बेताचे अमावस्येत रुपांतर झाले होते.

हेच जनरलसाहेब, 'जंगली प्राणी बघायला आम्ही येत आहोत' सांगून जर आले असते तर याच जे.सी.ओ. साहेबांनी आदल्या दिवशी आलेली चार-पाच हरणे, कोल्हे आधी पकडून रात्री त्यांच्यासमोर सोडून द्यायला कमी केले नसते. अशी ही आर्मीची अनोखी खातिरदारी!

सूचनांचे परिणाम भलतेच होणे, हा प्रकार मेसमध्ये फार घडतो. 'मेस' हे युनिटच्या मोठ्या कुटुंबाचे घर. अधिकार्‍यांची एकत्र यायची जागा. पाहुण्यांना बोलविण्याची जागा. यात हॉटेलसारख्या सात-आठ खोल्या असतात. त्यात लग्न न झालेले किंवा काही कौटुंबिक कारणामुळे एकटे राहणारे अधिकारी राहतात. खूप मोठे मोठे दोन-तीन हॉल असतात. प्रवेशद्वारापाशी एका मोठ्या टेबलावर एक मोठी वही ठेवलेली असते, त्याला 'व्हिजिटिंग बुक' म्हणतात. येणारे पाहुणे यात सही करतात, कधी शेरा लिहितात. ही वही तीस ते चाळीस वर्षं चालते. युनिटमध्ये बदली झाली की व परत जाताना युनिटचे ऑफिसर यात सही करतात. अधिकार्‍यांना आपल्या जुन्या सह्या पाहून मजा वाटते. त्या वहीबरोबर त्या टेबलावर राष्ट्रपती, रेजिमेंटचा मुख्य अधिकारी यांचा फोटो आणि त्या युनिटच्या मुख्य अधिकार्‍याचे नाव असते.

सर्व हॉल्समध्ये सोफे, उंची फर्निचर, उत्तम पडदे असतात. त्यातल्या एका ठिकाणी बार असतो. सर्व दालनांचा थाट बघण्यासारखा असतो. चांदीचे अनेक कप्स व ढाली यांनी कोपरे, टेबले सजलेली असतात. जेवढे युनिट जुने, तेवढे चांदीचे कप जास्त असतात. १ मराठा, २ मराठा अशा दोनशे-अडीचशे वर्षं जुन्या युनिटकडे पुष्कळ चांदीच्या वस्तू आहेत. रेजिमेंटल सेंटरसारख्या मोठ्या केंद्राच्या मेसेस एकाच ठिकाणी कायम असल्याने खूप मोठ्या व सजविलेल्या असतात. बाहेर बँडसाठी स्वतंत्र जागा असते. बाहेरच्या बागा, हिरवळी मेहनतीने स्वच्छ ठेवल्या जातात. इथे बायका नेहमीच पाहुण्या असतात. जेवणपण प्रथम बायकांनी घ्यावयाचे असते. अखंड मागाहून जेवायची सवय असलेल्या बायकांना प्रथम थोडे अवघड वाटते, नंतर मात्र त्याची नको इतकी सवय होते.

कर्नल नंतरचा दुसरा वरिष्ठ अधिकारी त्या मेसचा मुख्य असतो, तर दुसरा एखादा अधिकारी मेस सेक्रेटरी असतो. सर्व मेसचे रोजचे काम, जेवणाची तयारी, पार्टीची देखभाल करण्यासाठी नेमलेला 'मेस हवालदार' हे एक प्रस्थ असते. कामात हुशार, चोख, हरहुन्नरी, जनसंपर्क साधण्याची कला असलेल्या हवालदाराला हे काम मिळते. मेसच्या कोठीचे काम, त्याची देखभाल, पार्टी झाल्यावर सामानाची मोजणी, असली किचकट कामे त्यांना करावी लागतात. मेस हवालदाराच्या व्यक्तिमत्त्वावर मेसचे वातावरण बदलू शकते.

'१४ मराठा' सोलनला होती. चंदीगड ते सिमला रस्त्यावर सोलन येते. दोन्ही शहरांत अनेक लष्करी ठाणी असल्याने अधिकार्‍यांची नियमित वर्दळ या रस्त्यावर होत असे. येणारे जाणारे अनेक हुद्द्यांचे अधिकारी हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा चहा, पाणी, विश्रांतीसाठी मेसमध्ये थांबायचे. आमचे हवालदार साळुंके कुणीही ऑफिसर नसला, तरी त्यांचे उत्तम स्वागत व देखभाल करीत. डिव्हिजनमध्ये अनेक जणांच्या लक्षात '१४ मराठा' त्या स्वागतामुळे लक्षात होती.

कंटाळवाण्या, विनाकारण लांबलेल्या पार्टीत हे मेस हवालदार पांढराशुभ्र पोषाख, त्यावर लाल जरतारी जॅकेट घालून, ताठ मानेने मार्च करत येत व मुख्य अधिकार्‍याला सॅल्यूट मारून "श्रीमान भोजन तैय्यार है|" असे जाहीर करीत, तेव्हा ते अगदी देवदूतांसारखे वाटत. ही प्रथा आपली 'चला वाढलंय'चा लष्करी अवतार होता.

या मेसचा मुख्य कूक अथवा स्वयंपाकी हे पण एक प्रकरणच असायचे, कारण पार्टीच्या वेळेस सर्व मदार त्याच्या कौशल्यावर असायची.

सहा फुटाच्यावर उंची असलेला देवीसिंग मुख्य स्वयंपाकी होता. मनमानी, अरेरावी करण्यात तो पटाईत होता. असेल तर सूत, नाहीतर भूत असा मामला होता; परंतु त्याच्या कामात तो तरबेज होता. चायनीज, इंग्लिश प्रकारचे जेवण, अनेक प्रकारची पुडिंग्ज अगदी कमी सामान उपलब्ध असतानासुद्धा करावयाचा. केक केला तर त्यावर थोडी ब्रँडी टाकून, ती पेटवून ट्रेमध्ये घालून पाठवताना अचानक दिवे घालवायला विसरायचा नाही. साखर जाळून 'कॅरेमल'ची बास्केट करून त्यात फ्रूट 'सॅलड' अशा लोकांवर छाप मारण्यासाठी अनेक गोष्टी करावयाच्या. त्याच्या ह्या कौशल्यावर भरोसा ठेवून मी, डलहौसीत बर्फ पडत असताना पाहुण्यांसाठी डोशाचा बेत ठरविला. तिथे चहा कपात ओतता ओतता गार व्हायचा म्हणून सर्व गरम पाहिजे हा आग्रह होता. त्याची मर्जी सांभाळून त्याच्या मागणीनुसार आणखी एका गॅसची सोय केली.

जेवण तयार आहे हा निरोप मिळाल्यावर मी पाहुण्यांबरोबर उठले. त्या कडाक्याच्या थंडीत गरम गरम डोसे खायला घालून पाहुण्यांना गार करावयाची स्वप्ने मी बघत होते. मी जेवणाच्या खोलीत पाऊल टाकले आणि टेबलाकडे पाहून माझ्या पोटात खड्डा पडला. डोसे, सांबार बरोबर चटणीमधून सुद्धा 'वाफा' येत होत्या. "देवीसिंग सबकुछ गरम चाहिए|" या माझ्या सूचनेचा परिणाम होता. नंतर त्यांनी फोडणीच्या वाफा होत्या म्हणून बचाव केला; पण मी स्वतः 'गरम चटणी' खाल्ली होती.

अशा या कुणालाही न जुमानणार्‍या देवीसिंगची देवकी फार लाडकी होती. ती पाच वर्षांची असताना जेव्हा आम्ही कारगिलला गेलो, तेव्हा देवीसिंग तिथेच होता. तिथे खेळायला जागा कमी व थंडीत खूप भूक लागायची, म्हणून भैय्याबरोबर तिच्या बर्‍याच चकरा कूक हाऊस अथवा मेसच्या स्वयंपाकघरात व्हायच्या. एकदा खूप मोठी पार्टी झाली. देवीसिंगने चायनीज जेवण उत्तम प्रकारे केले. दुसर्‍या दिवशी देवकी त्याला म्हणाली, "देवीसिंग भैय्या, आज आप थक गये है ना? कल आपने बहुत काम किया|" तिच्या या एका वाक्याने पहाडासारखा देवीसिंग विरघळला. मला कौतुकाने हे सांगितले. पुढे किती तरी दिवस तिला विचारून पुडिंग्ज करावयाचा आणि ही पण शहाणी आपली फर्माईश सांगायची.

देवीसिंग हुशार तर चिन्नप्पा गरीब. आधीच सहाय्यक स्वयंपाकी असल्याने देवीसिंगच्या कौशल्याखाली दबून जायचा. चिन्नप्पाचा मवाळपणा बघून देवीसिंग त्याच्यावर जास्तच दादागिरी करून त्याला घाबरवून टाकायचा.

एक दिवस चिन्नप्पाच्या अंगावर पार्टीची जबाबदारी आली. खूष करण्यासाठी त्याने प्रयत्नांची शिकस्त केली. पुडिंग्जच्या वेळेस केक आल्यावर सर्वांना आश्चर्य वाटले. कारण चिन्नप्पा एरवी शेवयांची खीर किंवा कस्टर्ड असे सोपे पदार्थ करून वेळ मारून न्यायचा. आज नुसता केक नव्हता, तर त्यावर आयसिंगची रंगीबेरंगी फुले होती. पहिला घास तोंडात गेला आणि चिन्नप्पाच्या सात पिढ्यांचा उद्धार झाला. कणिक शिजवून त्यात रंग घालून त्याने फुले तयार केली होती. त्यानंतर तो या फंदात परत कधीही पडला नाही; पण तरीही तो सर्वांचा अतिशय लाडका होता. युनिट मिझोराम, कारगील किंवा इतर कुठेही असताना अधिकारी रात्री-बेरात्री कामावरून परत यायचे. ते येणार हे समजल्यावर भरपूर गरम पाण्याची व्यवस्था करून तो जेवण तयार ठेवून वाट बघत असे. दोन-तीन दिवस चालून, अगर खूप काम करून आल्यानंतर गरम पाण्याची आंघोळ व गरम साधे जेवण अधिकारी मंडळींना स्वर्गसुखाचा आनंद मिळवून देत असे. चिन्नप्पा स्वतः जागून हे करावयाचा. लग्न न झालेल्या अधिकार्‍यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ त्याच्या त्याच्या पद्धतीने करून मायेने खायला घालायचा. एक-दोन महाराष्ट्रीय अधिकार्‍यांना आवडतात म्हणून माझ्याकडून पोहे व साबुदाण्याची खिचडी मुद्दाम शिकला होता.

या लोकांची निष्ठा, प्रेम, माणुसकी पाहिली की, त्यांच्या अनेक चुका, गोंधळ, त्रुटी नजरेआड कराव्याशा वाटतात.

------------------------------------------------------------------------------------

मुक्काम : आर्मी पोस्ट ऑफिस
लेखिका - वैदेही देशपांडे
प्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे
पृष्ठसंख्या - ११८

------------------------------------------------------------------------------------

पुस्तकातील निवडक भाग राजहंस प्रकाशन, पुणे, यांच्या सौजन्याने
टंकलेखन सहाय्य - श्रद्धा द्रविड, अंशुमान सोवनी

------------------------------------------------------------------------------------
हे पुस्तक आता मायबोलीच्या खरेदी विभागात उपलब्ध आहे.
http://kharedi.maayboli.com/shop/product.php?productid=17107

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी..! अरे माणसा.. तू किती टाईप करतोस!

चांगलंच दिसतय पुस्तक!..

कुठून निवडतोस इतकी छान पुस्तकं चिन्मय? तुझं लिखाण बघून लागलीच पुस्तक घ्यायला हवं असं वाटायला लागतं.

माझा सख्खा दीर कर्नल असून सध्या पुण्याला कमांडींग ऑफिसर आहे. त्यामुळे अगदी जराशी का होईना कल्पना आहे त्यांच्या आयुष्याची. सिव्हिलियन बॅकग्राऊंडची मुलगी आर्मी ऑफिसरची बायको झाली की तीला खरंच जास्त कठीण जात असावं. माझी जाऊ स्वतः मराठा रेजिमेंटच्या बर्‍याच मोठ्या पदावरच्या ऑफिसरची मुलगी. त्यामुळे तीला "हे आयुष्य काही नवीन नाही" असं वाटतं. तरिही कारगील प्रसंगी, तसंच वर्षभर सीमेजवळ आपलं सैन्य उभं असताना मागे राहीलेल्या बायकांचं आयुष्य किती कठीण असतं हे जाणवलं.

पुस्तक नक्कीच वाचनिय दिसतेय. पुढच्या भाभेत घेईन.

छानच आहे हा उपक्रम. मी या पुस्तकातले किंवा या लेखिकेचे लेखन वाचल्यासारखे वाटतेय.

छानच दिसतंय पुस्तक!! पुढ्च्या भारतभेटीत नक्कीच आणेन.

केदार, अमेय त्यासाठी भारतात जाईपर्यंत थांबण्याची आवश्यकता उरणार नाही. हे पण पुस्तक लवकरच मायबोली खरेदी विभागात उपलब्ध होईल.
संदर्भ : अक्षरवार्ता मालिकेतली आधीची दोन्ही पुस्तकं पानीकम आणि माझं एक स्वप्न होत माबो खरेदी विभागात आलय.

हे पुस्तक इथे मायबोलीवर विकत मिळेल का? मला सुरुवात करायचीय चांगली मराठी पुस्तकं वाचायला. मस्त वाटले एवढेच वाचून.

मनुस्विनि,

अक्षरवार्ता मालिकेतील सर्व पुस्तके मायबोलीच्या खरेदी विभागात उपलब्ध करणार आहोत. हे ही पुस्तक एक दोन दिवसांत विकत घेता येईल.

http://www.maayboli.com/aksharvarta

क्रेडिट कार्ड चालते ना तिथे? काय आहे ना कधीच माबो वरून पुस्तकं काही घेतले नाही म्हणून असे प्रश्ण.:)

छान वाटले वाचायला...
धन्यवाद चिनूक्स... Happy

फारच छान.

हा उपक्रम सुद्धा अतिशय स्तुत्य आहे. सगळ्यांचे अश्या प्रकारच्या पुस्तकांशी ओळख करुन दिल्याबद्दल आभार.

सुरेख रे! युद्धाशिवाय आपल्या सैन्याबद्द्ल विचार पण केला जात नाही. यातल्या किती तरी गोष्टी माहित नव्हत्या.

सुंदर.
चिनूक्स, इतका सुंदर उपक्रम सुरु केल्या बद्दल तुमचे खुप खुप आभार.

**************************
काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत

मस्त दिसतय ..
धन्यवाद चिनूक्स या पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्द्ल... Happy

कितीही धन्यवाद दिले तरी अपुरेच पडतील, तरीही " धन्यवाद". Happy

चिनुक्ष फारच छान उपक्रम आणि पुस्तकसुद्धा.

अरे हे सहीच आहे ! तुम्हा तिघांना परत अनेक धन्यवाद.

  ***
  दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
  पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)

  क्ष,
  अरे मला टंकलेखन करण्यासाठी श्रद्धा आणि अंशुमान यांनी मदत केली आहे.. Happy

  आहा! Happy
  पण हे ही नसे थोडके..! छान उपक्रम चालू केलायंस!

  मस्तच आहे लेख.. नक्की वाचायला पाहिजे हे पुस्तक. !

  "विश लिस्ट" मधे अजून एक. हा उपक्रम मस्तच आहे. चिनूक्स, श्र, अंशुमान, धन्यवाद !!!

  सुंदर लेख..तिघांना धन्यवाद
  चिनूक्स, सुंदर उपक्रम, तुमचे खुप आभार..:)

  चिन्मय, मस्तच.. पुस्तक आणतेच आता.. हा उपक्रम आणि तुझी पुस्तकांची निवड फारच छान..
  ________________________
  अपने हाथोंकी ल़कीरोंपर इतना विश्वास मत करना,
  जिनके हाथ नही होते उनकी भी तकदीर होती है

  चिन्मय धन्यवाद्!माझे पुस्तक अनेक लोकांना माहित करुन दिल्याबद्द्ल!
  मी त्या करिताच लिहिले होते.
  परत धन्यवाद!

  छान आहे

  धन्यवाद

  छानच. चिन्मय, हा फारच चांगला उपक्रम आहे. जरूर वाचणार हे पुतक. आमच्या घरात तिनही फोर्सेसमध्ये लोकं असल्यामुळे ह्या पुस्तकात जास्त इंटरेस्ट.

  मी वाचले आहे हे पुस्तक. हे पुस्तक वाचल्यावर स्वतःच्या सुरक्षित आयुष्याची अन नॉन इश्यूचा मोठा इश्यू करून त्याचे अवडम्बर माजवणार्‍या आपल्या आयुष्याची लाज वाटते.
  बाकी चिनूचे आभार. आणि एवढ्या टायपिंगबद्दल मानले पाहिजे....

  ओहो , वैदेही ताई , आश्चर्याचा धक्काच दिला की तुम्ही. फार फार आवडले तुमचे पुस्तक्.विकतही घेतले आहे. मला ते मिळून सार्‍याजणीच्या अक्षरस्पर्श ग्रंथालयतून मिळाले होते.

  Pages