मन बलवान, लागे चट्टान..

Submitted by सीमंतिनी on 7 October, 2019 - 01:54

तिसऱ्यांदा नापास! आता मात्र क्लेयरला काय करावे सुचेना. पण त्याच क्षणी तिने केवळ क्रिकेटच्या प्रेमापोटी पुन्हा परीक्षा द्यायचे ठरवलं.

गोलबॉर्न हे आजही वीस-बावीस हजार लोकसंख्येचे ऑस्ट्रेलियन गाव. गोरी, गोबरी, सोनेरी केसांची क्लेयर पॉलसॅक गोलबोर्नमधली एक साधारण हायस्कूलर. अशा लहानशा गावात संधीही काहीश्या मोजक्याच उपलब्ध. क्लेयरला क्रिकेट मनापासून आवडायचे. पण लहान गावात मुलींची टीम नव्हती. मुलांबरोबर खेळण्यात क्लेयर आणि तिच्या दोन-चार क्रिकेटप्रेमी मैत्रिणींना अज्जिबात रस नव्हता. टीव्हीवर मॅच बघणे, कधी क्रिकेटवरची मासिके-पुस्तके वाचणे ह्यावर ती आपली हौस भागवून घेत होती.

तशात २००५ साली एक दिवशी क्लेयरला एक फ्लायर मिळालं. सिडनीला अंपायरिंग (पंच) प्रशिक्षण शाळा नवीन मुलां-मुलींचीची भरती करणार होती. बहुतेक इतर देशात पंच प्रशिक्षणासाठी आधी जिल्हा किंवा तत्सम स्तरावर क्रिकेट खेळण्याचा अनुभव असणे आवश्यक असते. अशा नियमांमुळे मुलींना अंपायरिंग क्षेत्रात येण्यास अडचणी येतात कारण गोलबॉर्नसारख्या बऱ्याच गावात महिला क्रिकेट नसते. त्यामुळे आजही प्रगत देशात अत्यल्प (जवळपास केवळ 3%) महिला क्रिकेट पंच आहेत. सुदैवाने सिडनीमधल्या प्रशिक्षण केंद्रात असे जाचक नियम नव्हते. क्लेयरला केंद्रात प्रवेश मिळाला.

आता क्लेयर पुढे अनेक अडचणी आल्या. हायस्कूलचा अभ्यास सांभाळून ती प्रशिक्षण पूर्ण करत होती. सिडनी ते गोलबॉर्न जवळजवळ दोनशे किलोमीटर्सचा रस्ता. त्यात क्लेयर नुकतीच १६ वर्षांची झाली असल्याने अजून स्वतः गाडी चालवत नसे. पण क्लेयरचा उत्साह बघून तिचे बाबा तिला प्रशिक्षण शाळेत न्यायला तयार झाले. दोन वर्ष दर शनिवार-रविवार क्लेयर गोलबॉर्नहून सिडनीला जात असे. पुढे कॉलेजसाठी ती सिडनीमध्ये गेल्यावर ही यातायात कमी झाली.

पंच होण्यासाठी एकूण चाळीस नियम शिकावे लागतात. नुसते नियम माहिती असून भागत नाही तर त्यांची अंमलबजावणी कधी आणि कशी करणार हेही माहिती असणे महत्वाचे असते. हल्ली क्रिकेट सामन्यात ‘रेफ्री’ ही असतो. पण हे रेफ्री मैदानाबाहेर असतात. मैदानावर नियमानुसार निकाल देणे हे अंपायरचे काम. कधी क्रिकेट न खेळल्यामुळे क्लेयरची सुरुवात जणू बॅकफूट वर झाली. इतर विद्यार्थ्यांपेक्षा जास्त वेळा परीक्षा द्याव्या लागल्या. पण आपल्या नापास होण्याचा बाऊ न करता अंगी अंपायरिंगचे कसब बाणवण्यावर क्लेयरने लक्ष केंद्रित केले. शेवटी चौथ्यांदा क्लेयर परीक्षा पास झाली. आता एक वेगळी परीक्षा तिच्यापुढे येणार होती.

पंच होणे हा एक उत्तम व्यवसाय ठरू शकतो. आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीस वर्षाला सहा आकडी मानधन मिळू शकते. पण असे असूनही महिला अंपायर आजही कमी आहेत. ह्याला कारणे अनेक आहेत. उदाहरणार्थ, अनेक वेळा प्रशिक्षणासाठी आर्थिक अडचणी असतात तर कधी लोकांच्या टोमण्यांचा सामना करावा लागतो. “बॉलरचा रन-अप बघायचा का अंपायर” अशा पद्धतीचे कुजकट शेरे तोंडावर मारले जातात. कधी सामान्यांच्या वेळेस लागणारी शारिरीक तयारी जसे सहा सात तास उन्हात मैदानावर उभे राहणे कमी पडते, मुले लहान असतील तर त्यांना सोडून ५-६ दिवस सामान्यांच्या जागी जाऊन राहावे लागणे कधी शक्य नसते. तर कधी केवळ मानसिक तयारी अपुरी पडते - बारा खेळाडू आक्रमक पद्धतीने “हाऊज दॅट??” विचारतात तेव्हा नियमानुसार निकाल देणे अवघड आहे. त्यात केवळ पंच महिला म्हणून खेळाडू, मग ते खेळाडू स्त्री असो की पुरुष, अधिक आक्रमक होताना दिसतात. म्हणून आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये ही पुरुष पंचच अनेकवेळा काम करताना दिसतात. अशा परिस्थिती मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पंचाचे काम करण्याचे स्वप्न एका मुलीने बघणे म्हणजे वेडेपणा होता.

क्लेयरला राज्यस्तरीय पंच झाल्यावर आता केवळ प्रेक्षक म्हणून सामने न बघता प्रत्यक्ष खेळात सहभागी होता येणार याचाच खूप आनंद झाला. पंच होण्यासाठी लागणारा मनोनिग्रह आता अधिकच टोकाचा झाला. शेरेबाजीकडे सोयिस्कर दुर्लक्ष करून तिने आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले. २००७ पासून जवळजवळ दहा वर्ष सातत्याने उत्तम रितीने पंचगिरी करत होती. तिला आंतरराष्ट्रीय सामन्यातही संधी मिळू लागली. ह्यात अनेक महत्त्वपूर्ण सामन्यात तिने पंचाची कामगिरी बजावली उदा: महिला ट्वेंटी-ट्वेंटी सामने, महिला आंतराष्ट्रीय वर्ल्ड कप. एप्रिल 2019 च्या पुरुषांच्या वर्ल्डकप सामान्यामध्ये क्लेयरने इतिहास घडवला. नामिबिया विरुद्ध ओमान ह्या पुरुषांच्या सामन्यात तिने पंच म्हणून कामगिरी बजावली. ती वर्ल्डकप मधली पहिली महिला पंच ठरली. वर्ल्डकप क्रिकेटला जवळजवळ पन्नास वर्षांचा इतिहास आहे. आणि त्यात केवळ एक महिला पंच असावी - हे बदलले पाहिजे असे बहुतेक क्रिकेटप्रेमीजनांचे मत आहे. क्लेयर ही पंच प्रशिक्षिका म्हणून फावल्या वेळात काम करते. आता ऑस्ट्रेलियासह अनेक देशात महिला पंचांना प्रशिक्षण माफक फीमध्ये किंवा मोफत उपलब्ध करून देण्याकडे कल आहे. हळूहळू चित्र बदलत आहे. नुकतीच भारताच्या जी एस लक्ष्मीची निवड आंतरराष्ट्रीय रेफ्री म्हणून झाली आहे.

क्लेयरची गोष्ट तर फक्त सुरुवात आहे...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!! मस्त!!
काहीच माहित नव्हतं याबद्दल. धन्यवाद.

भारी.
याबद्दल काहीच माहिती नव्हती. धन्यवाद.

भारी लेख! क्लेअरचा फोटो पण दे ना लेखात एखादा.
सी, तू कुठून अशा अनवट वाटांना पायवाटा करणाऱ्या स्त्रियांची माहिती मिळवतेस आणि ती इतक्या छान प्रकारे सगळ्यांपर्यंत पोहोचवतेस! यासाठी तुला टोपीकाढू सलाम!

जि, फोटो प्रताधिकार मुक्त इ इ नियमात बसणारा सापडणे कठीण आहे. पण ह्या लिंक वर तिचा व्हिडीयो आहे.

https://www.youtube.com/watch?v=sbvKkOFTwyY

सर्व आय.डी- धन्यवाद!!

सुरेख लेख सिमंतिनी!!
>>>>>> बारा खेळाडू आक्रमक पद्धतीने “हाऊज दॅट??” विचारतात तेव्हा नियमानुसार निकाल देणे अवघड आहे. त्यात केवळ पंच महिला म्हणून खेळाडू, मग ते खेळाडू स्त्री असो की पुरुष, अधिक आक्रमक होताना दिसतात>>> खरच मनोबल हवं.

उत्तम माहिती. छान लेख.
टेनिसमध्ये महिला पंच बऱ्यापैकी दिसतात.
भारतात प्रीमियर कबड्डी लीगमध्येही अनेक महिला पंच आहेत.