शब्देविण संवादु

Submitted by सतीश कुमार on 5 October, 2019 - 01:12

" तिला काहीं सांगायचंय " या नाटकाचा टी वी वरचा प्रोमो पाहिलाय?
" यश, माझ्याशी बोलना," आपली तेजू म्हणते.
" असं बोल म्हंटल्यावर काय बोलणार, सुचायला हवं ना काहीतरी…" अस्ताद उत्तरतो.
" जोडीदाराशी काय बोलावं हे सुचायची गरज पडली, की समजावं संवाद संपत चाललाय.." तेजश्री म्हणते.

माझा प्रश्न असा आहे की यात अस्तादचं काय चुकलं? खरंच संवाद एवढ्याशा गोष्टीवरून संपतो? स्त्रियांपेक्षा पुरुष कमी बोलतात हे संशोधनाअंती सिद्ध झालंय, मग 'तू माझ्याशी बोल' असा तिचा हट्ट का? उलट तिनेच एखाद्या विषयावर त्याचं मत विचारून त्याला बोलकं करता आलं नसतं का? घराघरात चालणाऱ्या नवरा बायकोंच्या वादाला सुरुवात, नवऱ्याकडून अवास्तव अपेक्षा बाळगणाऱ्या बायकाच करतात असं वाटतं. परिणामी जे सहजीवन असायला हवं त्याचं काहीं काळानंतर केवळ सोबत यात परावर्तन होतं, आणि आयुष्य मजेत जगण्या ऐवजी एखादी शिक्षा भोगण्यात कंठावं असं होऊन जातं.

मागच्या आठवड्यात रविवारी सकाळीच मुलगा आणि सून यांच्यात धुसफूस सुरू झाली. पत्नीला विचारले तेव्हा कारण कळले कि मुलगा त्याच्या बायकोला गुणवत्ता वेळ (क्वालीटी टाईम) देत नाही म्हणून ती मुसमुसत होती. तिच्या नवीन सलवार कमीझचे त्याने कौतुक केले नव्हते म्हणून तिचा घसा दाटून आला होता. तो तिला " आय लव यू " असे म्हणून सहा वर्षे झाली अशी तिची तक्रार होती. वादविवाद करून थकल्यावर शेवटी समझोता या मुद्यावर झाला कि त्याने तिला लांब फिरायला न्यावे, बाहेरच खावे आणि त्यानंतर सिनेमा बघूनच घरी परतावे. मुलाने तिचे म्हणणे मान्य करताच तिची कळी खुलली आणि वीस मिनिटांत दोघं बाहेर पडली सुद्धा. अर्थात नातवाला आमच्याकडे सोपवून.

माझे मन भूतकाळात शिरले. मी माझ्या आजी आजोबांचे एकमेकांवर असण्याऱ्या प्रेमाच्या आठवणीत गुंगून गेलो. त्याच आजी आजोबांचा माझा मुलगाही एक भाग होता. जेव्हा जेव्हा माझी आजी माझ्याबरोबर असायची तेव्हा ती आजोबांबद्दल बऱ्याच गोष्टी सांगत असे, तिची आणि आजोबांची भेट कशी झाली, तिला आजोबांची भीती कशी वाटायची, त्यांच्या खोलीत जाताना तिच्या छातीत कशी धडकी भरायची, बाहेरच्या खोलीतच तिला कशी डुलकी लागायची, आजोबांशी बोलणे व्हायचे ते कधीतरीच असायचे आणि तेही त्यांच्या चेहऱ्याकडे न बघताच, इत्यादी. परंतु ह्या गोष्टी सांगत असताना तिच्या चेहऱ्यावर हसू उमटत असे. आजोबांबद्दल बोलताना तिच्या आवाजात एक प्रकारचा आदर असायचा, प्रेम असायचं.

मला खरोखरच आश्चर्य वाटायचे कि आजोबात तिने काय पाहिले ? माझ्या आजोबांच्या कपाळावर तर कायम आडव्या रेषा असायच्या. आवाज नेहमी गुरगुरल्या सारखा यायचा आणि हसण्याशी असणारे त्यांचे वैर तर सर्वश्रुतच होते.

मला प्रश्न पडायचा कि गेली पन्नास वर्ष एकमेकांसोबत असणारी हि दोघं कशी काय एकमेकांवर इतकं उत्कट प्रेम करू शकतात?. माझी आजी अजूनही त्यांच्यावर कशी काय भाळू शकते? ते कसे काय तिच्यासाठी जगातले एकमेव पुरुषोत्तम असू शकतात? त्यांच्याही आयुष्यात वादळे येऊन गेली असतीलच. विसंवाद झाला असेलच. वादविवाद घडले नसतील कशावरून? जगात असे कुठलेही कुटुंब नसेल कि ज्यात वाद झालाच नसेल आणि तरीही ही वृध्दा त्यांचे नाव घेतल्यावर एखाद्या षोडश वर्षीय तरुणी सारखी लाजते. तिच्या डोळ्यात चमक येते. जगाचा अनुभव तिला काय कमी आहे? तिचे सारे आयुष्य सुखाचा त्याग करण्यातच तर गेले आणि तरीही माझ्या आजीनी माझ्या आजोबांबद्दल एकही वावगा शब्द कधीही काढला नाही. काय म्हणावे तिला? मी तिला विचारलं " आजी, तू आजोंबाशी संवाद कसा साधतेस गं? ती म्हणाली, " ज्ञानेश्वर काय म्हणाले माहीत आहे ना तुला..? ते म्हणतात, " शब्देविण संवादु दुजेवीण अनुवादू। हे तव कैसेनि गमे।परेहि परते बोलणे खुंटले। वैखरी कैसेनि सांगे। "

मी अगदी शपथेवर सांगू शकतो कि आजोबा तिला कधीच " आय लव्ह यू " म्हणाले नसतील.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults