रवि

Submitted by सतीश कुमार on 4 October, 2019 - 21:53

वृत्त - तुम्ही ठरवाल ते.
छंद - मुक्त

" रवि "

बंदिस्त आकाशात पूर्वेकडून पश्चिमेकडे गेली कित्येक सहस्त्रकं फेऱ्या मारतो आहेस तू रवि

विश्वाच्या कारागृहातून सुटका करून घेण्यासाठी धडपडतो आहेस  दिवस रात्र तू रवि

संध्याकाळच्या संधिप्रकाशात कोणी पहात नसताना समुद्रात उडी मारतोस जीवन संपवण्यासाठी तू पण,

तुझ्या भोवती फिरणारे ते नऊ पहारेकरी परत जुंपतात तुला रात्र संपताच कवायतीला रवि

तुझे तप्त  उसासे वाफा होतात पण कारागृहाच्या भिंती वितळत नाहीत रवि

आणि तू बंदीवासातलि दुःखं उराशी बाळगून  जळत राहतोस कापरासारखा रवि

चंद्राला प्रकाश तुझा पण सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा मात्र  त्याच्या नावाने रवि

आणि वैशाखात तुझ्या अंगाची लाही होताना शंख मात्र  तुझ्या नावाने रवि

माझी स्थिती तुझ्या पेक्षा तसूभरही वेगळी नाही रवि

मी ही फेऱ्या मारतोय अहोरात्र आणि अडकलोय दुनिया नावाच्या महाजालात या रवि

मलाही तुझे ते नऊ पहारेकरी छळतात कुंडलीत करकचून बांधून रवि

राहू केतू तुलाच काय मलाही फटकावतात त्या नऊ दरवानानां मधे घेऊन रवि

आणि कालसर्पयोग असे भयानक नाव देऊन होमहवनाच्या काळ्याकुट्ट धुराड्यात गुदमरायला लावतात रवि

आणि सूर्य ग्रहण असले गोंडस नाव देऊन आपली खिल्ली उडवतात रवि

काय ..? जे न देखे रवी ते देखे कवि, म्हणून माझी स्थिती तुझ्या पेक्षा बरी म्हणतोयस रवि...?

तू माझ्या पत्रिकेत कुठल्याही स्थानी असतोस तेव्हा चांगलाच असतोस रवि

पण तुझ्या पत्रिकेत मी असायचं भाग्य मला कुठे आहे रवि..?

म्हणून सांगतोय मी कसला तर दीड दमडीचा फुकाचा कवि, रवि...

तू नसलास तर मी डोळे असूनही चाचपडणारा  केवळ आंधळा, रवि

Group content visibility: 
Use group defaults

सतिशकुमार रवी वाचलं की ताक घुसळण्याची रवी आठवते हो.
रवि, कवि मधले वि पहीले असतात. अर्थात संपादन केलच पाहीजे असा काही आग्रह नाही.

@ सामो, हा हा हा..! खरंय तुमचं. माझ्या एका दीर्घअक्षरा मुळे तुम्हाला ताक आठवते पण तुमच्या नावासमोर तुम्ही एक अक्षर गाळल्यामुळे मला "ते" आठवते आणि लगेच उपहारगृह गाठावे आणि खावे असे वाटते. अर्थात ते अक्षर तुम्ही संपादित नाही केलं तरीही मी खाणारच आहे..! धन्यवाद ...!

"तुमच्या" वगैरे अहंकार काढुन बघा जरा. तुम्ही नसता, अन्य कोणी रवि च्या जागी रवी लिहीले असते तरी असाच प्रतिसाद असता. बरेचदा चक्रपाणि च्या जागीही लोक चक्रपाणी लिहीत असतात. पाणि म्हणजे हात पाणिग्रहणमधला.
तुम्हाला दुरुस्त करायचे नसेल तर तो तुमचा पर्याय आणि हक्क आहे. पण उगाच दुखावुन घेउ नका किंवा पर्सनली घेऊ नका. फक्त इतकी वेगळीच सुंदर कविता वाचताना, तो शब्द मीठाच्या खड्यासारखा येतोय.
अजुन एक मी चूका करत नाही असे नाही पण त्या स्वीकारुन सुधारण्यास मला कमीपणा वाटत नाही. इतकाच फरक.