परीची दुनिया (भाग ७)

Submitted by nimita on 2 October, 2019 - 15:41

थोड्या वेळानंतर परीचे बाबा आले - परीला आणि तिच्या आईला घरी घेऊन जायला ! आई तर खूपच खुशीत होती. आणि आई खुश त्यामुळे परी पण खुश!! शेवटी एकदाची परीराणीची स्वारी आई बाबांबरोबर घरी जाऊन पोचली. दारातच तिला आजी उभी असलेली दिसली...अजून पण खूप लोक होते तिथे - सगळे परीच्या घरात येण्याचीच वाट बघत होते. आजी आईला म्हणाली," थांब जरा बाहेरच , आधी दृष्ट काढते, मग औक्षण करते .. आणि मग आण तिला घरात ; लक्ष्मी आलीये आपल्या घरी!" आजीचं बोलणं ऐकून आईच्या चेहेऱ्यावर समाधान दिसलं परीला. पण खरं तर तिला आता हळूहळू भूक लागायला सुरुवात झाली होती....' लावावा का आपला टँ चा सूर ?' परीच्या मनात आलं; पण तेवढ्यात तिचं लक्ष आजीकडे गेलं...'असं काय करतीये आजी? नुसतेच गोल गोल हात का फिरवतीये हवेत ? आणि हळू आवाजात काहीतरी म्हणते पण आहे !' तेवढ्यात आजी म्हणाली," झाली बाई दृष्ट काढून- आता औक्षण!" परी पुन्हा नीट लक्ष देऊन बघायला लागली. किती नवीन नवीन शब्द ऐकू येत होते तिला.. 'अच्छा, म्हणजे ते गोल गोल हात फिरवणं म्हणजे दृष्ट होय! पण आता परत आजी काहीतरी गोल गोल फिरवतीये !! हे म्हणजे ते औक्षण का काय म्हणतात ते असेल.' एकीकडे विचार करता करता परी त्या गोल गोल फिरणाऱ्या तबकाकडे आणि त्यातल्या ज्योतीकडे अगदी एकटक बघत होती. खूप छान, शांत वाटत होतं तिला...तेवढ्या वेळापुरती तिची भूक जणू काही गायबच झाली होती. " बघ बघ, कशी बघतीये टकामका," आजी कौतुकानी म्हणाली आणि सगळे हसायला लागले...आता त्यात हसण्यासारखं काय होतं- परीला काहीच कळेना! आजीचं औक्षण झाल्यावर आई परीला घेऊन घरात शिरली आणि सरळ देवघरात गेली. आईला तिथे असं डोळे बंद करून शांत उभं राहिलेलं बघून परीनी पण आपले डोळे हळूच मिटले. किती मस्त वाटत होतं तिथे परीला- कुठलातरी खूप छान वास येत होता. तिनी डोळे उघडून आजूबाजूला पाहिलं - 'कशाचा बरं असेल हा वास?' तेवढ्यात बाबा आईच्या कानात कुजबुजले," तुला आवडतो म्हणून मुद्दाम मोगऱ्याचा गजरा आणलाय... " ते पुढे काहीतरी म्हणणार होते बहुतेक पण तेवढ्यात आजी आत आली आणि बाबा हळूच बाहेर निघून गेले. तिनी आईकडे बघितलं तर ती इतकी गोड हसत होती !! परीला काहीच कळत नव्हतं - 'नक्की काय चाललंय या दोघांचं?जाऊ दे- आई हसतीये म्हणजे काहीतरी छानच असणार! पण अगं आई...आता जरा माझ्याकडे पण बघ की गं ! मला आता भूक लागलीये .' परी आईचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत होती, पण आई मात्र आजीबरोबर काहीतरी बोलण्यात गुंग होती. मग काय- शेवटी परीनी आपला तो ठेवणीतला टँ sss चा सूर छेडला.तिला असं रडताना बघून आजी आईला म्हणाली,"भूक लागली असेल गं तिला..जा आता खोलीत. आणि तुही आराम कर आता."

"अले अले, काय जालं आमच्या पलीला ? भुकु लागली?" एकीकडे परीला शांत करत आई तिला घेऊन त्यांच्या खोलीत गेली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users