हॅरी पॉटर - भाग दोन

Submitted by radhanisha on 2 October, 2019 - 13:38

हॅरी पॉटरच्या जगातले जादुई प्राणी

या जगात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जादुई प्राणी / जादुई जीव आहेत . त्यातले कथेच्या दृष्टीने महत्वाचे आणि विविधतेची साधारण कल्पना येईल असे काही पुढीलप्रमाणे -

१ . हाऊस एल्फ्स -

हाऊस एल्फ हे अतिशय जुन्या व श्रीमंत प्युअर ब्लड जादूगार घराण्यांमध्येच आढळून येतात . हाऊस एल्फची उंची साधारण 3 फूट असते . हाऊस एल्फ हे आपल्या मालकाची आज्ञा पाळण्यास जादूने बद्ध असतात . मालकाची कोणतीही आज्ञा ते मोडू शकत नाहीत . हाऊस एल्फसना माणसासारख्याच भावभावना असतात पण बहुतांश जादूगार त्यांना माणसाहून खूप कमी दर्जाचे समजतात . त्यांना पगार दिला जात नाही , विनामूल्य राबवले जाते , काही निर्दय जादूगार तर आपल्या हाऊस एल्फना लहानसहान चुका झाल्यास शारीरिक शिक्षा देतात , उदा . काठीने मारणे , उपाशी ठेवणे किंवा स्वतःला शिक्षा करून घे अशी आज्ञा देणे . आणि 99 % हाऊस एल्फसची या सगळ्याला काहीच तक्रार नसते . बहुतेक हाऊस एल्फ हे मालकाप्रति अतिशय निष्ठावान असतात . मालकाविषयी वाईट शब्द ते उच्चारु शकत नाहीत . मालकाने कितीही वाईट वागणूक दिली तरी त्याला ती देण्याचा हक्कच आहे किंवा ते योग्यच आहे असे समजण्याएवढे त्यांचे ब्रेनवॉशिंग पिढ्यानपिढ्या झालेले असते . ते स्वतःही आपल्या वैयक्तिक भावनांना महत्व देत नाहीत , मालकाला खुश / निदान संतुष्ट ठेवणं हेच त्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे असते .

हाऊस एल्फने जर मनापासून ठरवलंच तर तो मालकाची एखादी आज्ञा मोडू शकतो पण तसं करताना त्याला त्रास होतो , शिवाय नंतर स्वतःच स्वतःला जबर शिक्षा करून घ्यावी लागते .

जे जादूगार आपल्या हाऊस एल्फस शी खरोखर चांगले , माणसासारखे वागतात त्यांचे एल्फस तर मालकावर भक्तियुक्त प्रेमच करतात , समर्पण हा सगळ्याच हाऊस एल्फस चा मूलभूत गुणधर्म आहे . ज्यांचे मालक वाईट वागतात त्यांचे एल्फस हे आपल्या सोबत अन्यायपूर्ण वागणूक होत आहे असं म्हणत नाहीत आणि ज्यांचे मालक चांगले वागतात त्यांना तर आभाळच ठेंगणं होतं , अशा मालकासाठी ते स्वइच्छेने जीवसुद्धा द्यायला तयार होतात .

हाऊस एल्फसना जादू करण्यासाठी छडीची गरज लागत नाही . त्यांची जादू जादूगारांच्या जादूपेक्षा वेगळ्या प्रकारची असते .

हाऊस एल्फ हा या गुलामीच्या जगण्यातून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे , तो म्हणजे मालकाने एखादा कपडा त्याला द्यायचा . पण अर्थात फुकटचा हरकाम्या गुलाम हातचा कोण जाऊ देईल ? दुसरी गोष्ट म्हणजे ही मुक्तता बहुतांश हाऊस एल्फसना नकोच असते . सगळी वाईट वागणूक सहन करण्याची त्यांची तयारी असते पण मुक्तता नको . कारण मुक्तता हि प्रचंड अपमानास्पद , नामुष्कीची गोष्ट असा त्यांच्या प्रजातीचा दृढ समज आहे .

अशा या समाजात एक बंडखोर हाऊस एल्फ निघतो - डॉबी ... ज्याला आपल्यावर अन्याय होत आहे , आपला छळ होत आहे याची जाणीव असते आणि तो मालकाच्या आज्ञेविरुद्ध जाऊन हॅरीला मदत करण्याचा प्रयत्न करतो . हॅरी पॉटर अँड चेंबर ऑफ सिक्रेट्स या पुस्तकात डॉबी वाचकाला प्रथम भेटतो . पुस्तकाच्या उत्तरार्धात हॅरी आपल्या चतुराईचा वापर करून डॉबीला त्याच्या मालकाच्या गुलामगिरीतून सोडवतो . पुढे 4 वर्षात अनेक वेळा डॉबी हॅरी व त्याच्या मित्रांना मदत करतो .

डॉबीला मुक्त करणं हा बऱ्याच मोठ्या कथानकातला अगदी छोटासा भाग आहे .

पुढे विंकी , क्रिचर , होकी असे आणखी काही हाऊस एल्फ वाचकाला भेटतात .

हॅरीची मैत्रीण व एक महत्त्वाचं पात्र असलेली हर्माइनी ग्रेन्जर हाऊस एल्फस वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांना व इतर जादूगारांना जागृक करण्याचा प्रयत्न करते .. याबाबत थोडी अधिक माहिती हर्माइनीची ओळख करून घेताना पाहू .

२ - हिपोग्रिफ / गरुड अश्व -

शरीराचा पुढचा भाग पक्ष्याचा , दोन मोठे पंख आणि खालचा भाग घोड्याचा असा हा प्राणी . हॉगवार्ट्स मधील रुबियस हॅग्रिडने ह्या प्राण्यांचा कळप जवळच्या जंगलात जोपासलेला असतो . हे उडू शकतात , यांचा वापर कदाचित प्रवासासाठी केला जात असावा किंवा ही दुर्मिळ प्राणिजात नष्ट होऊ नये यासाठी त्यांची वाढ केली असावी . हे प्राणी फार मानी असतात . अपमान झाला असं वाटल्यास शारीरिक हल्ला करू शकतात .

हॅरी पॉटर अँड प्रिजनर ऑफ अझ्काबान मध्ये एका विद्यार्थ्यावर हल्ला केल्याबद्दल बकबीक नावाच्या हिपोग्रिफला जादू मंत्रालय मृत्युदंडाची शिक्षा ठोठावते . यामध्ये हिपोग्रिफची चूक नसते व तो विद्यार्थीही गंभीर जखमी झाल्याचे केवळ नाटक करत असतो , जादू मंत्रालयाने हिपोग्रिफला मृत्युदंड द्यावा म्हणून सदर मुलाचे वडील , जे मंत्रालयात उच्छपदस्थ अधिकारी आहेत ते दबाव आणत असतात . पुस्तकाच्या शेवटी हॅरी आणि त्याचे मित्र हिपोग्रिफला मृत्यूदंडापासून वाचवतात . पुस्तकाच्या शेवटी हा हिपोग्रिफ एक महत्वाची भूमिका पार पाडतो .

३ - थेस्ट्रॉल्स -

हे उडणाऱ्या घोड्यासदृश्य काळ्या रंगाचे प्राणी आहेत . यांचे पंख प्रचंड वटवाघळाच्या पंखांप्रमाणे दिसतात . थेस्ट्रॉल्स फक्त अशाच माणसांना दिसू शकतात ज्यांनी कुणाचातरी मृत्यू होताना पाहिला आहे . जादूगार समाजातले अनेक लोक यांना अशुभ मानतात . हे उडू शकतात .

हिपोग्रिफ्सप्रमाणे थेस्ट्रॉल्सचाही कळप हॅग्रिडने हॉगवॉर्ट्स जवळच्या जंगलात जोपासला आहे .

हॉगवार्ट्सच्या स्टेशनपासून विद्यालयापर्यंत विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या घोडागाड्या घोड्यांशिवायच धावतात . त्यांना अदृश्य घोडे जुंपले असावेत किंवा त्या जादूने धावत असाव्यात असंच सगळे विद्यार्थी समजत असतात .

पण हॅरीच्या हॉगवार्ट्सच्या पाचव्या वर्षात म्हणजे ऑर्डर ऑफ फिनिक्स पुस्तकात त्याला हे प्राणी दिसू लागतात . त्याच्या मित्रांना दिसत नाहीत . लुना नावाची मुलगी तुला भास होत नाहीयेत मलाही सुरुवातीपासून हे प्राणी दिसतात असं सांगून त्याला आश्वस्त करण्याचा प्रयत्न करते .

याच वर्षी जादुई प्राण्यांसंबंधीचे शिक्षण या विषयाच्या वर्गात हॅरी व इतर सर्व विद्यार्थ्यांना थेस्ट्रॉल्सची ओळख करून दिली जाते . आणि अचानक या वर्षापासून आपल्याला हे का दिसू लागले याचं कोडं हॅरीला उलगडतं .

याच वर्षी हॅरी व त्याचे मित्र एका महत्त्वाच्या हवाई प्रवासासाठी थेस्ट्रॉल्सचा उपयोग करतात .

४ . वेअरवुल्फ / नरलांडगा -

पूर्वी अनेक फँटसी चित्रपटांमधून / कादंबऱ्यांमधून प्रेक्षक - वाचकांच्या परिचयाची झालेला वेअरवुल्फ हा जीव हॅरी पॉटर मध्येही आपल्याला भेटतो .

एका वेअरवुल्फने दंश / चावा घेतल्यास दुसरा माणूसही वेअरवुल्फ बनतो हीच मूळ संकल्पना ठेवली आहे . पण याशिवाय आणखीही अनेक लहानमोठे बारकावे लेखिकेने आपल्या वेअरवुल्फ मध्ये निर्माण केले आहेत .

हॅरी पॉटरच्या जगातले वेअरवुल्फ फक्त पूर्ण चंद्र असलेल्या पौर्णिमेच्या रात्री वेअरवुल्फ मध्ये रुपांतरीत होतात . मनाला वाटेल तेव्हा ते रूप बदलू शकत नाहीत , फक्त पौर्णिमेच्याच रात्री ते रूप बदलू शकतात ... ते बदलतंच .. हि ऐच्छीक क्रिया नाही . वेअरवुल्फ मध्ये रूपांतर झाल्यावर त्याला आपण कोण वगैरे काहीही आठवत नाही , तो कुणालाही ओळखत नाही . त्याचं एका हिसंक घातकी जनावरात रूपांतर झालेलं असतं ... अशावेळी हा वेअरवुल्फ त्याचा जिवलग मित्र जरी समोर आला तरी त्याचा जीव घेऊ शकतो . दुसऱ्या दिवशी पुन्हा माणूस झाल्यानंतर आदल्या रात्री आपण काय केलं हे त्याला व्यवस्थित आठवतं . वेअरवुल्फ हा फक्त माणसालाच धोकेदायक असतो , तो इतर प्राण्यांना स्वतःहून इजा पोहोचवत नाही ... अर्थात एखादा लहान प्राणी आपणहून त्याच्या वाट्यास गेला तर तो गप्प राहत नाही .

वेअरवुल्फचे हे पौर्णिमेच्या रात्री माणसामधून वेअरवुल्फ मध्ये होणारे रूपांतरण अतिशय वेदनादायी असते . आणि पौर्णिमा संपून पुन्हा माणसात रूपांतर झाल्यानंतरही पुढचे काही दिवस फार थकवा आणि आजारी असल्याची भावना जाणवते . हॅरी पॉटरच्या जगतात 1970 मध्ये वुल्फ्सबेन या काढ्याचा ( potion ) चा शोध लावला गेला . हा काढा घेतल्यावर वेअरवुल्फच्या रूपांतरण प्रक्रियेतील वेदना कमी होतात आणि रूपांतर झाल्यानंतरही तो आपली खरी ओळख विसरत नाही , हिंसक होत नाही , शांत राहू शकतो .

ह्या काढ्याचा शोध लागला खरा पण ह्या काढ्याचे घटक पदार्थ अतिशय महाग असून हा काढा बनवण्याची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची होती . अचूक पद्धतीने बनवला न गेल्यास तो विषारी होतो , तो बनवता येण्याइतके काढेशास्त्रातलं नैपुण्य असलेले जादूगार फार थोडे होते . त्यामुळे ह्याची प्राप्ती सर्वसामान्य गरीब वेअरवुल्फसच्या आवाक्याबाहेरचीच राहिली . काही नशीबवान जादूगारांनाच हा परवडू शके .

बहुतांशी जादूगारच वेअरवुल्फच्या दंशानंतर वेअरवुल्फ बनतात . मगल सुद्धा वेअरवुल्फ बनू शकतात ; नाही असं नाही पण अशा 99 % केसेस मध्ये मगल व्यक्ती त्या भयानक जखमेने , वेअरवुल्फच्या विषाने मृत्युमुखी पडते . जादूगारच या जखमेतून बचावण्याची शक्यता जास्त असते . काही वेळा वेअरवुल्फ दंश ( इनफेक्ट ) करून सोडून देतात तर काहीवेळा जीव घेतात .

जादूगार समाजात वेअरवुल्फना अतिशय वाईट वागणूक दिली जाते . इतर जादूगार कुटुंबे त्याच्याशी कसलाही संबंध ठेवत नाहीत . वेअरवुल्फ झालेले जादूगार पौर्णिमा सोडून इतर दिवशी आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे चांगले वागतात , अचानक हिंसक वागत नाहीत ( अर्थात काही अपवाद असतात ) . पण सर्वसामान्य जादूगार समाज हे समजून घेत नाही . त्यांच्यामते वेअरवुल्फ हा मनुष्यरूपातही धोकादायक असतो . वेअरवुल्फस बद्दल जादूगार समाजात घृणा , तिरस्कार , दहशत आणि प्रचंड भीती व गैरसमज आहेत . सततच्या वाईट वागणुकीमुळे वेअरवुल्फसच्याही मनात समाजाबद्दल , सरकार बद्दल तिरस्काराची भावना निर्माण होते व ते वाईट मार्गावर चालू लागण्याची शक्यता वाढते .

जादूगार हा वेअरवुल्फ आहे समजल्यावर त्याला नोकरी मिळणे फार कठीण जाते . 1990 मध्ये तर जादू मंत्रालयाने अँटी वेअरवुल्फ कायदा निर्माण केला , त्यानुसार वेअरवुल्फना नोकरी मिळणे जवळजवळ अशक्य झाले . परिणामी अनेक वेअरवुल्फना आपल्या जादुई योग्यतेहून खालच्या दर्जाची कामे स्वीकारावी लागली तर अनेकांनी तत्कालीन कुख्यात गुन्हेगार जादूगार लॉर्ड वोल्डेमॉर्टचं अनुयायित्व स्वीकारलं , कारण वोल्डेमॉर्टच्या कारकिर्दीत तरी आपली परिस्थिती सुधारेल अशी त्यांची आशा होती .

हॅरी पॉटर सिरिजमधलं एक महत्त्वाचं पात्र हे वेअरवुल्फ आहे . त्याची ओळख करून घेताना वेअरवुल्फ या संकल्पनेबद्दल पुरेशी माहिती असावी म्हणून वरील माहिती सांगितली आहे .

५ . गॉब्लिन्स / पिशाच्च -

हे प्राणी उंची , रूप यामध्ये थोडेफार हाऊस एल्फ्सशी मिळतेजुळते असतात . चेहरा जास्त मानवसदृश्य असतो . यांचे दात - नखं हे मांसाहारी प्राण्यांप्रमाणे असतात . यातल्या बहुतेकांना इंग्लिश भाषा बोलता येते .. पण या प्रजातीची स्वतःची अशी एक खास जटील भाषा आहे , आपापसात संवाद साधण्यासाठी ते हि भाषा वापरतात . गॉब्लिन्स हे अतिशय बुद्धिमान असतात . जादुगार समाज चलन म्हणून सोने , चांदी व ब्रॉन्झची नाणी वापरतो ; ही नाणी घडवण्याचं काम गॉब्लिन्स करतात . जादूगारांची बँक ग्रिंगॉट्सचे सगळे व्यवहार गॉब्लिन्स सांभाळतात .

अनेक जादूगार गॉब्लिन्सना जादूगारांहून कमी दर्जाचे समजतात . पण गॉब्लिन्सचा स्वभाव हाऊस एल्फ्सच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध टोकाचा आहे . आपल्याला जादूगार कमी दर्जाचे समजतात याबद्दल त्यांच्या मनात राग आहे . स्वसंरक्षणासाठी / स्वार्थासाठी / अपमानाचा सूड घेण्यासाठी ते वेळप्रसंगी जादूगारावर जीवघेणा हल्लाही करू शकतात . जादूगार समाजाशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत खरे पण ते परस्पर आपुलकीमुळे नाही तर एकमेकांना एकमेकांची गरज आहे म्हणून ..... नाईलाज म्हणून . जादूगार समाजाच्या इतिहासात गॉब्लिन्सची अनेक बंडे ; जादूगार विरुद्ध गॉब्लिन्स अशा लढाया झाल्या आहेत .

गॉब्लिन्सचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते तयार करत असलेल्या जादुई वस्तू ...गॉब्लिन्सनी तयार केलेल्या वस्तू अतिशय मजबूत , सुंदर , सहजासहजी नष्ट न होणाऱ्या असतात , हजारो वर्षे उत्तम टिकतात आणि काहींमध्ये विलक्षण गुणधर्म आणि जादुई शक्तीही असतात .

गॉब्लिन प्रजातीची खरेदी - विक्री आणि मालकी हक्काची संकल्पना एकदम अनोखी आणि भिन्न आहे . त्यांच्या मते वस्तू बनवणारा तिचा खरा मालक असतो , ती विकत घेणारा मालक होत नाही . गॉब्लिन्सनी बनवलेली एखादी वस्तू जादूगाराने विकत घेतली की ते असं समजतात कि ती वस्तू भाड्याने दिली आहे आणि त्या जादूगाराचा जेव्हा मृत्यू होईल त्यानंतर ती गॉब्लिन्सना परत दिली पाहिजे , आणि जर ठेवायची असल्यास तिचे मूल्य पुन्हा चुकते केले पाहिजे . अर्थात जादूगार हे मानत नाहीत व अशी खरेदी केलेली वस्तू पुढील पिढ्यांकडे सोपवली जाते . या गोष्टीला गॉब्लिन्स चोरी मानतात .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाही भाग मस्त झालाय!
आजकाल एल्फची संख्या राजकारणात वाढली की काय, अशी रास्त शंका येतेय.
Lol