कृष्णविवर - २

Submitted by हायझेनबर्ग on 28 September, 2019 - 20:55

कृष्णविवर - १

भाग २ - 'ते' आणि 'ती'

तळ्याच्या बाजुच्या वाटेने शाळेत जातांना कधी त्यांच्यापैकी एखादा लांबून जरी दिसला तरी माझ्या काळजाचा ठोका चुकत असे. घरापासून शाळेपर्यंतचा बाकी रस्ता तसा निर्धोक होता पण, डाव्या बाजूला मोठ्ठा ऊतार असलेले खोल तळे आणि ऊजव्या बाजूला दोन पुरूषभर ऊंचीची हिरवीगार पात्यांची ऊसाची शेते असलेली तळ्याकाठची निर्जन पायवाट माझा ऊर दडपून टाकत असे. दगाफटका होण्याची सगळ्यात जास्त भिती ह्याच पायवाटेवर होती. फर्लांगभर लांबीची ती पायवाट मद्रास-मेलच्या रुळांना जाऊन मिळाली की मग कुठे पायवाटेवर एवढ्या वेळ लगबगीने चालतांना रोखून धरलेला श्वास सोडतांना मला एकदम सुटल्यासारखे वाटे. पायवाटेच्या मधोमध तळ्याच्या ऊतारावरची एक भलीमोठी शिळा मी हेरून ठेवली होती. मध्येच काही चाहूल लागल्यास पटकन पायवाट ऊतरून त्या भल्या मोठ्या दगडामागे लपून बसायचे अशी योजना पायवाटेवरून जातांना माझ्या मनात मी प्रत्येकवेळी घोकून ठेवत असे.

त्यादिवशी सकाळी शाळेत जातांना पायवाटेच्या बाजुच्या शेतातली सळसळ नेहमीपेक्षा जास्तच जाणवली. मला वाटलं वार्‍यामुळे ऊसाची पिकं हलल्याने मला भास झाला असावा. सळसळीचा आवाज जसजसा जवळ येऊ लागला तसे माझे पाय जागीच थिजले, पण क्षणभरच! मी घाईघाईने डावीकडच्या तळ्याच्या ऊताराकडे माझे अंग झोकून दिले आणि गुडघ्यातून वाकत पायवाटेला समांतर सरपटत जाऊन मोठ्या शिळेच्या मागे लपून राहिले. ते दिसत नसूनही पायवाटेवरच्या चिखलातल्या त्यांच्या पावलांच्या आवाजाने माझी छाती धडधडत होती. एक, दोन, तीन की अजून जास्त? ते नेमके किती असावेत? त्यांच्या पावलांच्या आवाजावरून मला अंदाज लावता येईना. शिळेमागच्या त्या नीरव शांततेत माझ्याच नाकातून निघणार्‍या गरम श्वासांचा आवाजदेखील मला असह्य होत होता. ऊतारावरून सरपटतांना तळ्याकाठच्या टोकदार लव्हाळ्यांनी ऊघड्या हातांवर आणि पायांवर सपासप मारलेल्या फटकार्‍यांनी लांबलचक ओरखडे ऊमटले होते. शिळेच्या धारदार कडेवर कोपर घासून तिथली त्वचा सोलपटली होती. डाव्या हाताच्या घट्टं वळलेल्या मुठीमुळे बोटांची नखं पंजात रुतून रक्त साकळल्याने लालसर व्रण पडले होते. शेवटी भिती असह्य झाल्याने मी डोळे मिटून घेतले, आणि स्वामी अय्यप्पाला मनातल्या मनात आळवत राहिले. आपण त्यांना बघितले नाही की ते सुद्धा आपल्याला पाहू शकणार नाही असेच मला वाटत होते. भिती आणि हतबलता काय असते ते मला पहिल्यांदाच प्रकर्षाने जाणवत होतं.

(भितीची जाणीव आताशा मला नवी नाही, तरी भिती हतबलतेला जन्माला घालते की हतबलता भितीला हे देखील मला अजून नेमके सांगता येणार नाही. जेव्हा जेव्हा ह्या दोन आदिम भावना मनातली सगळी जागा व्यापून टाकतात, तेव्हा तेव्हा आपण सर्वात जास्त दु:ख, यातना भोगतो हे मात्र आता मला चांगले ठाऊक आहे. आपल्याच आत आपणच पेरलेली आणि खत-पाणी घालून मूळ धरू दिलेली भितीची ही वल्लरी आपल्याच मनाला लगडून, वरवर सरकत राहून आपल्याला आतून गुदमरवत रहाते. ह्या समयी हजारो पिढ्यांचा ईतिहास आणि जगाबद्दलच्या ज्ञानाचा पसारा रोमारोमात साठवूनही प्रेमासाठी जागा राखून असलेले आपले मन एकेका क्षणाचे अस्तित्व जगण्यासाठी झगडत राहते. भितीची ही वल्लरी जितक्या वेगाने ऊंचचऊंच वाढत राहते तितक्याच वेगाने आपल्या भोवतालचे आपले जग आकुंचित होत राहते. प्रत्यक्षाहूनही जिची प्रतिमा जीवघेणी त्या भितीच्या वल्लरीला मानवी मनाच्या बाहेर रूजता येईल अशी जागा ह्या जगात नाही हे मनाला पक्के माहित असूनही ते पुन्हा पुन्हा तिला खत-पाणी घालतच राहते.)

त्यांच्या पावलांचा आवाज हळूहळू पुसट होऊन आजिबात येईनासा होईपर्यंत मी शिळेमागे वाट बघत राहिले. एव्हाना छातीचे ठोके पूर्ववत झाले होते, भितीच्या दंशाचे पंजावरचे लालसर व्रणही मिटून गेले होते. भितीची वल्लरी वेगाने कोमेजून जात मान टाकत होती. आवाज न करता शिळेमागून बाहेर येत मी मान ऊंचावत पायवाटेकडे बघितले तेव्हा ते तिघे मला दूरवर लगबगीने चालतांना दिसले. एक सुस्कारा टाकत शाळेच्या फ्रॉकला लागलेली ओलसर माती झटकून, पाठीवरचे दप्तर सावरत मी मोठ्या मेहनतीने तळ्याच्या काठाचा ऊतार चढून वर आले. चिखलाने बरबटलेले हात पुसत पायवाटेवर मी पुन्हा माझ्या दोन पायांवर ऊभी रहातच होते आणि माझी छाती पुन्हा वेगाने धडधडू लागली. समोरचे गवत पुन्हा सळसळले आणि त्यांच्यातला एक शांतपणे माझ्यासमोर येऊन ऊभा राहिला, मला न्याहाळत. जणू मी बाहेर येण्याची वाट बघत तो ईतका वेळ गवताआड दबा धरून बसलेला असावा. ऊंच गवताआडून त्याने मला लपतांना कधी आणि कसे बघितले असेल? मला कल्पना नाही.
पावलांखालच्या जमिनीपर्यंत आकुंचन पावलेले माझे जग त्या क्षणात थिजून गेले. त्या क्षणाला ना भूतकाळ होता ना भविष्यकाळ ना पुढे जाण्याची घाई, पण पावलांखाली ऊरलेल्या माझ्या जगाचा शेवटचा तुकडा नाहीसा करण्याचे बळ मात्र त्या क्षणात नक्की होते. का कोणास ठाऊक प्रतिमेतून प्रत्यक्षात ऊतरलेल्या त्या क्षणात माझ्या मनाने भितीची वल्लरी पुन्हा रुजू दिली नाही. नजरबंदी होऊन एखादी आठवण पुन्हा पुन्हा समोर दिसत रहावी किंवा दूरच्या प्रवासात आपल्या अस्तित्वाचा तुकडा जो आपण आपल्यासोबत आणूही शकलो नाही आणि तो पुन्हा आपल्याला मिळेल ह्याची शाश्वतीही मनाला वाटत नाही तो डोळ्यांसमोर तरळात रहावा, तसे त्या क्षणात मला काय दिसले असेल तर ते फक्त माझ्या अम्माचे पाणीदार डोळे. असेच काही कालातीत क्षण आम्हा दोघांच्या मधून युगे लोटण्याच्या गतीने निघून गेले. त्या क्षणांमध्ये त्याने माझ्या डोळ्यांत काय बघितले मला माहित नाही पण तो माझ्यासमोरून लगबगीने निघून गेला. पुढे चालणारे तिघे आणि त्यांच्या मागे तो सगळ्यात ऊंच, तळ्याच्या पलिकडच्या काठापासून मैलभर पसरलेल्या बांबुंच्या वनात लगबगीनं शिरतांना मी त्यांना पाहिलं होतं.

संध्याकाळी अम्माबरोबर फॅक्टरीतून घरी गेल्यावर पांढर्‍याशुभ्र कपड्यांत पडवीत बसलेल्या अच्चनला जेव्हा मी त्यांच्याबद्दल सांगितले तेव्हा तो मनापासून हसला होता. माझ्या मनात दाटून राहिलेली भिती त्याच्यासमोर मांडतांना त्याने ती हसण्यावारी न्यावी ह्याचा मला मनातून राग येत होता. मी वैतागून निघून जात असल्याचे पाहून हसतच तो म्हणाला, "ते आपल्यापेक्षा खूप हुशार, डोळ्यांतून बोलतात. बिनाकामाची लगबग?, नवीन बाळ येणार". मला अच्चनच्या बोलण्याचा अर्थ आजिबात लागत नव्हता, पण त्यारात्री बराच वेळ अच्चन मला त्यांच्याबद्दल काहीबाही सांगत राहिला. "ते आपल्यापेक्षा खूप जुने. ते आधी, आपण नंतर. ते खूप मोठे आपण खूप लहान. ते मालक, आपण ऊपरे. हे सगळे त्यांचे, त्यांनी बनवले. त्यांनी खूप बघितले, ते खूप हुशार" आणि अजून बरेच काही. त्या एका रात्रीत अच्चनने बहुधा त्याच्या ऊभ्या आयुष्यात ऊच्चारले नसतील एवढे सगळे शब्द एकदम बोलून टाकले.
दुसर्‍या दिवशी पायवाटेवरून शाळेला जातांना तळ्याच्या पलिकडच्या काठावर ते मला पुन्हा ऊभे दिसले, ते चार आणि त्यांच्यामध्ये एक छोटसं बाळ. जल्लोशाने भारलेल्या त्यांच्या गगनभेदी आवाजांनी तळ्याच्या पाण्यावर नवीननवीन तरंग ऊमटत राहिले. डोळ्यांतून बोलणारे, ठरवून नव्या जन्माचा ऊत्सव साजरा करणारे ते सुद्धा अच्चन सारखेच कायम हसरे आणि आनंदी असले पाहिजेत.

अच्चन आता फिरून कधीच येणार नाही हे कळल्यापासून मला शाळेत निघतांना अच्चनचा सकाळच्या साखरझोपेत हसणारा निरागस चेहरा आठवत राही. मला वाटे त्याला नेहमी ज्यांची स्वप्ने पडत त्याने फिरून त्यांच्यात नवा जन्म घेतला असेल का? आता तो दिवसभर त्यांच्याबरोबरच निळ्या आकाशाखाली ऊंच गवतातून हसत फिरत असेल का? मग पायवाटेवरून शाळेला जातांना पुन्हा ऊंच गवताची सळसळ होईल, पण मी ह्यावेळी आजिबात शिळेमागे लपायला जाणार नाही. मी तिथेच ऊभी राहून त्याची वाट बघेन. अन अचानक गवतातून चेल्लाकुट्टी (लहानसा अच्चन) बाहेर येईल. मला समोर ऊभी पाहून तो नेहमीसारखे बोलणार काहीच नाही पण त्याच्या डोळ्यांतून मला नक्की कळेल त्याला काय म्हणायचे आहे, काय सांगायचे आहे. मी त्याच्याकडे मला आणि अम्माला त्याच्याबरोबर बांबुच्या वनात घेऊन जाण्याचा हट्ट करेल.

----------------------------------

रियाधवरून ट्रंक कॉल आल्यापासून अम्मा दिवस दिवस ऊदास चेहर्‍याने भिंतीला टेकून बसून राही. शुन्यात लागलेली तिची नजर मला बघूनही तसूभर देखील हलत नसे. मी सकाळी शाळेत जातांना, संध्याकाळी फॅक्टरीतून आल्यावर किंवा आम्हा दोघींसाठी जेवण बनवतांना एका शब्दानेही ती कधी माझ्याशी बोलली नाही की तिने माझी विचारपूस केली नाही. पहिल्यांदाच चुलीवर तांदळाची भाकरी भाजतांना माझी बोटं भाजून चटका लागल्यावर नकळत माझ्या तोंडांतून स्स्स्सsssssस्स्स्स निघाले तेव्हाच फक्त ती मान वळवून माझ्याकडे बघितले पण तेवढेच. गालांवर पडलेल्या सुकलेल्या अश्रूंचे डाग पुसण्याचे किंवा मोकळे सोडलेले लांब, कुरळे केस बांधण्याचे भानही तिला रहात नसे. संध्याकाळचा दिवा लावण्याईतपत किंवा मला जेवण बनवण्यात मदत करण्याईतपतही तिचे ऊदास मन ऊभारी घेत नव्हते. अश्याच एका ऊदास संध्याकाळी मलाही अच्चनची आठवण अनावर झाली म्हणून मी त्याची व्हायोलीन घेऊन पडवीत आले. तो नेहमीच सुरूवात जी धून वाजवून करीत असे ती धून मी अजून अर्धीही वाजवली नव्हती तर अम्मा पडवीत आली आणि तिने माझ्या हातातून व्हायोलीन काढून घेतली. त्यादिवशी तळ्याकाठी 'त्याच्या' डोळ्यात मला दिसलेले अम्माचे डोळे आणि आजचे अम्माचे डोळे कितीतरी वेगळे होते. तीन आठवडे ऊलटून गेले होते पण अजूनही फॅक्टरीवर जाणे तिने मनावर घेतले नव्हते.

मी शाळेतून दुपारी फॅक्टरीवर गेले की मला अम्माचे नेहमी धडधडणारे मशीन शांत दिसे. आज तरी अम्मा फॅक्टरी वर आली असेल असे मला रोज नव्याने वाटत राही. रियाधवरून फोन आला तेव्हा तिने मशीनवर शिवायला घेतलेला निळ्या रंगाचा बुशशर्ट अजूनही अनाथ मुलासारखा मशीनरच केविलवाणा पडून होता. मी एका कोपर्‍यात शांतपणे खाली मान घालून शर्टांना मशीनवर बटन लावत राही. तेव्हा म्हातारा थंपी येऊन माझ्या डोक्यावरून हात फिरवत हलकेसे हसून जाई. फॅक्टरीतल्या दुसर्‍या बायका माझ्याकडे अम्माची विचारपूस करीत, जेवायला बोलवित पण त्यांच्याबरोबर जाण्याची माझी आजिबात ईच्छा होत नसे.
महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी, संध्याकाळी फॅक्टरीतून निघतांना म्हातार्‍या सुपरवायझर थंपींने माझ्या हातावर अम्मा आणि माझ्या महिन्याभराच्या कामाचे पैसे ठेवले. माझ्याकडे बघून त्याच्या नेहमीच्या कापर्‍या आणि विक्षिप्त आवाजात तो म्हणाला, "एवढा शोक करून तुझी अम्मा एक तर वेडी होईल नाही तर मरून जाईल. चल! मी येतो तुझ्याबरोबर, बघू ह्या तिरसट म्हातार्‍याचे अनुभवाचे चार शब्द तिच्या डोक्यात शहाणपणाच्या काही गोष्टी घालू शकले तर." असे म्हणत म्हातारा थंपी लगोलग ताग्यातले शर्टाचे कापड, कॉलरचे कटिंग आणि कात्री एका पिशवीत भरून माझ्याबरोबर चालू लागला.

मी पुढे आणि माझ्या चार पावलं मागे म्हातारा थंपी एकमेकांशी काहीही न बोलता घराकडे निमूट चालत राहिलो. थंपी घरी येणार म्हणून मला मनातून बरेच वाटत होते. अचानक त्याला काय वाटले काय माहित तो झपाझप पावलं टाकत माझ्या बरोबरीनं चालू लागला, चालण्याच्या श्रमामुळे अजूनच कापर्‍या झालेल्या आवाजात मला म्हणाला, "माझ्याच्याने आता अजून फार दिवस काम होईल असं दिसत नाही. चाळीस वर्षांत फॅक्टरी मालकांच्या तीन पिढ्या माझ्या अजुनाजून म्हातार्‍या होत चाललेल्या खांद्यांवर नाचून गेल्या. अजून सहा महिने फारतर फार, मग बस्स! तुमचा म्हातारा थंपी गळ्यातला टेलरिंगचा टेप आणि कानावरची पेन्सिल कायमसाठी ऊतरवणार. कोल्लमवरून मी कॉलेज अर्धवट सोडलेल्या माझ्या भाच्याला, पप्पनला पत्र पाठवून बोलावून घेतलं आहे. पुढच्या सहा महिन्यात मी त्याला तयार केलं आणि त्याने माझं काम सांभाळलं की हा म्हातारा चाळीस वर्षात पहिल्यांदा साखर खायला मोकळा"

थंपी आता फार दिवस फॅक्टरीत राहणार नाही ऐकून मला एकदम भरून आले. माझ्यासाठी थंपी म्हणजेच फॅक्टरी आणि फॅक्टरी म्हणजेच थंपी होता, त्या दोन वेगळ्या गोष्टी नव्हत्याच. निर्जीव फॅक्टरीतले एक निर्जीव सिलाई मशीन असल्यासारखाच म्हातारा थंपी एक चालते बोलती मशीन बनून फॅक्टरीचा भाग झाला होता. दुपारच्या जेवणाची सुटी झाली की एकत्र डबा खातांना मशीनवर काम करणार्‍या बायकांपैकी एखादी चावटपणे म्हणत, "तीसेक वर्षांपूर्वी थंपीने फॅक्टरीतून फार नाही पण फक्त अर्ध्या-पाऊण तासाची जरी सुटी काढली असती तर त्याला एखादी बायको शोधून लग्न करायला वेळ मिळाला असता". मग अजून एखादी म्हणे, "हो ना! जराशी टीप चुकली की अंगावर वस्सकन न ओरडता प्रेमाने कसं समजाववं हे कोणीतरी शिकवलं असतं मग त्याला" असे काही कोणी बोलले की सगळ्या बायका फिदीफिदी हसत. मग कोणी म्हणे 'थंपीच्या पाकिटात एका तरूण स्त्रीचा जुना फोटोच असतो' तर कोणी म्हणे 'माझी साठीला आलेली मावशी आहे अजून बिनलग्नाची तिचं स्थळ सुचवूया का म्हातार्‍याला'. अशा एक ना अनेक वात्रट गोष्टी. त्या गोष्टी वाढतच चाललेल्या दिसल्या की अम्मा त्यांना दटावे " नीला ईथेच आहे आणि ऐकते आहे" हे नुसत्या डोळ्यांनीच मान ऊडवत सांगे. असे सांगितले की सगळ्या बायका हसणे थांबवून एकदम विषय बदलून भलतेच काही तरी बोलायला लागत. मी मात्र मान खाली घालून गालातल्या गालात हसत माझा डबा चिवडत राही.

म्हातारा थंपी किती म्हातारा होता मला माहित नाही, पण अम्मा सांगत असे की थंपीने मागच्या चाळीस वर्षात एक दिवसही फॅक्टरीतून सुटी घेतली नाही की फॅक्टरीला कुलूप लाऊन तो कधी दुसरीकडे कुठे झोपायला गेला नाही. फॅक्टरीच्या एका कोपर्‍यात कुलूप लाऊन ठेवलेली एक लोखंडी पेटी, एक घासलेटचा स्टोव्ह आणि पेटीवर भिंतीच्या आधाराने ऊभी केलेली एक वळकटी कायम ठेवलेली दिसे, तेवढाच होता एकांड्या थंपीचा चाळीस वर्षे खपून कमावलेला संसार. खूप पाऊस पडून तळ्याचे पाणी फुगल्याने पायवाट पाण्याखाली गेली की बर्‍याच जणींना फॅक्टरीमध्ये जाता येत नसे मग म्हातारा थंपी तो दिवस आणि रात्रीतून फॅक्टरीत राबत एकट्यानेच चार बायकांचे काम करून टाकी.

"साखर, थंपी?" माझे मन एवढ्या सगळ्या विचार आणि आठवणींच्या कप्प्यांचे कानेकोपरे धुंडाळून येत म्हातार्‍या थंपीचा साखर शब्द ऐकून कपाळ्यावर आठ्या आणत जागीच थबकले.
"मुली, माझ्यासारख्या हाडाच्या टेलरला साखर वर्ज्य असते. हाडाच्या टेलरची नजर कशी हवी? ससाण्यासारखी तीक्ष्ण, मापातला पाव मिलिमीटरचा फरक सुद्धा नजरेला चटकन टिपता आला पाहिजे. नजरेबरहुकूम मशीनवर हात आणि पाय चालले पाहिजेत. मी जर तुझ्यासारखी साखर खाल्ली असती ना तर एव्हाना ह्या तुमच्या म्हातार्‍या थंपीला जाड जाड भिंगांचे चष्मे लाऊन काठी टेकत फिरावं लागलं असतं आणि त्याही आधी मालकांनी पन्नाशी येण्याच्या आधीच फॅक्टरीतून घालवून दिलं असतं ते वगेळंच, कळलं?" मला म्हातारा, विक्षिप्त थंपी कधी नव्हे ते स्वतःवरच आनंदलेला दिसला.

म्हातारा थंपी आणि मी घरी पोहोचलो तेव्हा अम्मा केस मोकळे सोडून शुन्यात बघत पलंगावर मान टाकून बसलेली होती. थंपीला आत येतांना बघून ती तेवढ्यापुरते सावरून बसली. थंपीने एकदा तिच्याकडे बघितले आणि तो शांतपणे पलंगावर बसला. मी त्याला आतून पितळेच्या पेल्यात पाणी आणून दिले. अनेक क्षण शांततेत गेले तसा एक अस्फुट हुंदका अम्माच्या डोळ्यातून निसटला. एकदा अम्माच्या डोक्यावरून हात फिरवून माझ्याकडे बघत थंपी म्हणाला,
"तुला सांगतो मुली, तुझ्या अच्चनसारखाच माझा अच्चन सुद्धा खूप प्रेमळ माणूस होता. पंधरा वर्षांचा असल्यापासून तो माझ्या मुट्टाचन बरोबर रोज भाताच्या शेतात कामाला जायचा. पाऊस असो वा पाणी पस्तीस वर्षे रोज न चुकता दोघे शेतात जात. पन्नासपेक्षा जास्त वर्षे रोज शेतात जाणारा माझा मुट्टाचन एकदा तापाचे निमित्त होऊन अचानक आजारी पडला. वैद्याच्या आठवडाभराच्या औषधपाण्यानेही गुण न आल्याने शेवटी मुट्टाच्चन रात्रीपासून शेवटच्या घटका मोजत खाटेवर पडला होता. हालचाल नाही, डोळे सताड ऊघडे, तोंडाचा आ वासलेला. छातीचा भाता तेवढा बारीकसा वरखाली चालू, शेवटचीच धुगधूगी ऊरली होती म्हातार्‍यात. आता कधीही तो शेवटचा श्वास घेईल वाटून घरातले आम्ही सगळे पहाटेपासूनच त्याच्या ऊशाला ऊभे होतो. रोजची शेतात जाण्याची वेळ झाली तसा माझा अच्चन ऊठला आणि मुट्टाचनला म्हणाला, 'भाताची पेरणी करून येतो.' मुट्टाच्चनचे डोळे बारीक हलले. अच्चन वीस पावलं गेला असेल तोच माझ्या मुट्टाच्चनने मान टाकली, सगळ्यांनी एकच गलका केला. तो गलका ऐकून माझा अच्चन थबकला पण फिरून माघारी घरात आला नाही. थेट संध्याकाळी भाताची पेरणी करूनच तो घरी परतला.
मुली, शरीरावर झालेल्या जखमा मनाला शहाणपण शिकवतात पण मनावरच खोल घाव झाले तर त्याला शहाणपण कोणी शिकवायचे? "

एवढे बोलून म्हातारा थंपी अम्मासारखाच शुन्यात बघत बसून राहिला. पण दोनच मिनिटं बस्स! पेला जमिनीवर ठेवत म्हातारा थंपी ताडकन ऊठून,
'तुझ्यासाठी फॅक्टरी सोडून आलो. फॅक्टरी काय माझ्या अच्चनची दौलत नाही ईथे बसून आसवं गाळत वेळ घालवायला. ह्या पिशवीत कॉलरचं कटिंग आहे. तुझ्या नाही तर मुलीच्या पोटाची थोडीकाही फिकिर असेल तर हे कापून फॅक्टरीवर पाठव' असे विक्षिप्त पुटपुटत लगोलग निघाला सुद्धा!

थंपीला जाऊन अर्धा तास होत आला होता तरी अम्मा अजूनही सताड डोळ्यांनी दारातून पडवीतल्या अच्चनच्या नेहमीच्या झोपण्याच्या जागेकडे एकटक नजर लाऊन बसली होती. माझ्याच्याने ते बघवेना म्हणून मी चूल पेटवून भाकरीचे पीठ मळायला घेतले. तीन आठवड्यांच्या सरावानंतर मला पीठ आणि पाण्याचा अंदाज येऊन आता ते बर्‍यापैकी मळता येत होते. तव्यावरून भाकरी चुलीत ऊतरवतांना बोटांना चटके बसणंही आताशा कमी झालं होतं. चुलीतला धूर डोळ्यात जाऊन डोळे चुरचुरून त्यांची आग होणं सुद्धा जरा जरा सवयीचं झालं होतं.

मी पहिली भाकरी तव्यावर टाकतच होते तेव्हाच मला मागे पितळेचा पेला लाथाडल्याचा आवाज ऐकू आला. मी मागे वळून पाहिले तोवर अम्माने अंगावरचे सगळे कपडे काढून जमिनीवर फेकून दिले होते. एकही वस्त्र नसलेलं तिचं शरीर, मोकळे सोडलेले कंबरेपर्यंत लांब केस, श्वासांचा प्रचंड आवेग, घट्ट मिटून घेतलेल्या ओठांतून निघणारे हुंकार आणि अजूनही पडवीकडे एकटक रोखलेली नजर पाहून माझी छाती क्षणात दडपून, धडधडू आली. अम्माने घाईघाईत थंपीने ठेवलेल्या पिशवीतली कात्री काढली आणि ती तरातरा न्हाणीघराकडे गेली. दुसर्‍याच क्षणी तिने न्हानीघरात जाऊन जमिनीवर बसकण मारत कात्रीने सटासटा तिचे लांब, काळे, कुरळे केस मानेपासून कापायला घेतले. तिच्या श्वासांचा आवेग आणि घट्ट मिटून घेतलेल्या ओठांतून निघणारे हुंकार ऐकून अजूनही मला तिच्या अवताराची खूप भिती वाटत होती. मी तिचे हे रूप ह्याआधी कधीच पाहिले नव्हते, अनुभवले नव्हते. मला मी काय करावे ते सुद्धा सुचत नव्हते, म्हणून मी पळत जाऊन पडवीत ठेवलेल्या पिपातून बादलीभर पाणी ऊपसून मोठ्या कष्टाने ती बादली ऊचलून अम्माजवळ आणून ठेवली आणि पुन्हा चुलीजवळ येऊन बसले. चुलीसमोरच्या त्या काही क्षणात मला पहिल्याने वाटले आपण ईथून पळून जावे. न्हाणीघरातून अजूनही ऐकू येणारे अम्माचे भयानक हुंकार मला असह्य होत होते. मी काहीतरी होऊन माझे कान बंद व्हावेत आणि ते आवाज मला ऐकू येऊ नयेत म्हणून माझ्या मनाला कसेतरी तिथून लांब पाठवण्याचा प्रयत्न करीत होते. पण शाळा, फॅक्टरी आणि घर ह्याशिवाय पल्लकड मधली चौथी जागा मला माहितच नव्हती. अचानक मला तलावाच्या बाजुचे ते बांबुचे बेट आठवले आणि पुढच्याच क्षणाला, 'अम्मा, अच्चन आणि मी तिघे जेवायला बसलो आहोत. अम्मा अच्चनला फॅक्टरीमधल्या म्हातार्‍या थंपीच्या आणि मी शाळेमधल्या गोष्टी सांगत आहे. अच्चन कधी अम्माकडे बघत व्हायोलीनच्या सुरात हसतो आहे तर कधी माझ्या डोक्यावरून हात फिरवत नेहमीसारखा त्याच्या डोळ्यांतून माझ्याशी बोलतो आहे' असे आमच्या कधीतरी हसर्‍या असलेल्या घराचे स्वप्न दिसू लागले.
तव्यावरची भाकरी पलटत ऊघड्या डोळ्यांनी ते स्वप्न बघत असतांनाच माझ्या डोक्यावरून अम्माचा हात फिरला आणि माझे स्वप्न मोडले. मी मागे वळून अम्माकडे बघितले तर अच्चनच्या पांढर्‍याशुभ्र कपड्यांसारखीच पांढरीशुभ्र साडी नेसून ती माझ्या समोर ऊभी होती. मानेपर्यंत कापलेले तिचे केस पाहून मला अगदी कसेसेच झाले आणि भरून आले. तिचा चेहरा अजूनही पाण्याने निथळत होता आणि हातात व्हायोलीन होते. अच्चनसारख्याच हसर्‍या चेहर्‍याने व्हायोलीन माझ्या समोर धरत ती मला म्हणाली, 'तू बैस पडवीत जरा वेळ, जेवण झाले की मी तुला आवाज देते.'
......त्यादिवशी तळ्याकाठी दिसलेल्या 'त्याच्या' डोळ्यांसारखेच आता पुन्हा मला 'तिचे' डोळे दिसत होते.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिला भाग पुन्ह वाचला. अम्मा अच्चनसाठी स्वतःला जबाबदार समजते आहे का? दोघींची ग्रिविंग प्रोसेस फारच आर्तपणे ऊतरली आहे.
नाव न घेता हत्तींचा रेफरन्स काय मस्त वापरला आहे. नीला हत्तींच्या कुटुंबात आपलं कुटुंब बघते का? अच्चनने हत्ती म्हणून जन्म घेतला असेल.... किती नोबल विचार.
थंपीची कामाला वाहून घेण्याचा स्वभाव कुठून आला ते थेट न सांगता नुसतेच सुचवले आहे ते आवडले. थंपी गेल्यावर निलाच्या आयुष्यात पप्पनची एंट्री होते असे दिसते आहे.
खुप मस्त..पुढचा भाग लवकर येईल अशी अपेक्षा.

छान झालाय हाही भाग Happy
खास तुमच्या शैलीतील कथा वाचावयास मिळाली, आनन्द झाला Happy

नाव न घेता हत्तींचा रेफरन्स काय मस्त वापरला आहे. नीला हत्तींच्या कुटुंबात आपलं कुटुंब बघते का? अच्चनने हत्ती म्हणून जन्म घेतला असेल....
>>> मानलं अश्विनी जी तुम्हाला आणि लेखकाला. कसं ओळखलं तुम्ही? मी तर जमीनदार किंवा राज/सरदार कुळातील दांडगट, जुलुम करणारी पोरं समजत होतो. भारीच हं.

अजनबी हा नविन भाग आहे ना?

Submitted by स्वप्नील ७७७ on 30 September, 2019 - 04:25

हो म्हणजे हा भाग यायला इतका उशीर झाला आहे तर याच्या पुढचा भाग लवकर यावा म्हणून विनंती (एडिट केलं मी)

हो, पहिल्या भागानंतर दुसरा भाग प्रकाशित करण्यास खूप वेळ लागला त्याबद्दल क्षमस्व. (हे आधी लिहायचे राहून गेले.)
पुढचा भाग लवकर प्रकाशित करण्याचा प्रयत्न करत आहे.
आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.

हाब, फारच सुरेख. सगळं डोळ्यासमोर घडतंय असं वाटावं इतकं प्रभावी लिखाण आहे. सर्व भावभावनाही थेट पोहोचतात.

दोन्ही भाग झपाटल्यासारखे सलग वाचले. फार गुंतवून ठेवणारं, निःशब्द करणारं लिहिता तुम्ही. एकाच घटनेवर आई आणि मुलीचं तितकंच आर्त, तरीही वेगळं वागणं काय सुरेख उतरलंय. पुढचा भाग येऊ देत लवकर Happy

खूपच सुरेख....एक एक प्रसंग मग तो हत्तीच्या कळपाचा असुदे की थंपी च्या दिन चर्येचा की अम्माच्या दुःखाचा.. सर्वकाही डोळ्या समोर दिसतं आहे इतके सुंदर सटीक वर्णन..खूपच छान हा ब .... आता पुढचा भाग लवकर टाका

हाब, हि गोष्ट पूर्ण करा ना प्लिज. माझी मनापासून इच्छा आहे ही गोष्ट पूर्ण वाचण्याची. >>> +१११११

हो ना
मला वाटले होते, मलाच पुढचा पार्ट सापडत नव्हता कि काय..
Happy