कृष्णविवर - १

Submitted by हायझेनबर्ग on 14 April, 2019 - 21:32

आज पुन्हा पावसाची रिपरिप चालू व्हायची चिन्ह दिसत होती. सिलाई मशीन चालवतांना माझी नजर राहून राहून खिडकीतून दिसणार्‍या चाळीच्या गेट कडे जात होती. चांगले सहा दिवस झाले मान्सून कासारगोडच्या किनार्‍याला धडकून, पण साधे तासभर सूर्यदर्शन होईल ईतपतही ऊसंत दिली नाही त्याने. सतत भरून असलेलं आभाळ, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा, प्रलयकाळ अजून काय वेगळा असावा? सिजू आजही भिजूनच येतोय की काय? आज पुन्हा भिजला तर ऊद्या पुन्हा शाळेसाठीचे कपडे ह्या दमट हवेत वाळणार कसे? सकाळी शाळेच्या ओलसर पँटवरून फिरवण्यासाठी तवा गरम करून दिला तर म्हणे, 'ह्या तव्याला अंड्याचा वास येतो'. बाजूच्या कलापिनीकडून ईस्त्री घेऊन ये म्हणाले तर म्हणे, 'त्यापेक्षा ही ओलीच पँट घालून जातो'. एवढ्या दिवसात माझ्या लक्षात आले नाही खरे पण अलिकडे कलापिनीचे नाव काढले की त्याच्या कपाळावर आठ्या पडतात. अगदी सहावीत जाई पर्यंत कलापिनी शिवाय चैन पडत नसे आणि आता अगदी नावच टाकलं तिचं. शाळेत काही बिनसलं की काय दोघांचं? हल्ली शाळेतल्या मित्रांच्यातच जास्त रमतो, ते ही ठीकच आहे म्हणा.. कलापिनी थोडीच त्याच्याबरोबर क्रिकेट खेळणार आहे की मासे पकडायला किंवा सिनेमा बघायला जाणार आहे.

स्वामी अय्यप्पा! मान्सून सुरू झाल्यापासून चाळीच्या अंगणाच्या बदलेल्या रूपाकडे माझं लक्षच गेलं नाही. कुंपणाच्या भिंती शेवाळं चढून चांगल्याच हिरव्या दिसतायेत. नारळांच्या बुंध्याशी शेकडो जांभळी, नाजूक फुलं ह्यावर्षीही अगदी न चुकता तरारून आली आहेत. बेडकांच्या चढ्या सुरातल्या आवाजाची आता कुठे कानांनी नोंद घेतली. कोपर्‍यातली वर्गीसांची खटारा स्कूटर तर वेलींनी पूर्ण वेढूनच टाकली.
बिचारे जॉर्ज वर्गीस! शाळेतून निवृत्तं झाल्यावर म्हातारे वर्गीस किती ऊत्साहात सुटीसाठी म्हणून लेकीकडे कोचीला गेले होते. आंघोळ करतांना पाय घसरून पडायचे निमित्त काय झाले, त्यांनी आठवड्याभरातच बिछाना धरला. त्यालाही आता दोन वर्ष होत आली. एवढ्या मोठ्या काळासाठी कासारगोड सोडून जाण्याचा त्यांचा मनसुबा नव्हताच. त्यांचे चर्चचे काम त्यांना आजिबात कासारगोड पासून लांब राहू देणार नाही. पण फिरून चाळीत ते कधी परतणार आहेत अय्यप्पाला नाही तर त्यांच्या लॉर्ड जीझसलाच ठाऊक असेल. घरातले सामानही अजून तसेच आहे. ईथे असेपर्यंत सिजूला त्यांचा भयंकर लळा होता. त्यांच्या खटारा गाडीवरून सिजूला मोठ्या हौसेने फिवून आणित आणि पुढ्यात बसलेला सिजू गाडीचा कर्कश्य भोंगा वाजवून सगळी चाळ दणाणून सोडत असे. बिचारे वर्गीस! जिथे असतील तिथे मजेत असू दे. ते ईथे असते तर सिजूच्या आयुष्यात आजोबाच्या रूपाने निदान एक पुरूष असला असता.
खिडकीसमोरच्या समोरच्या दोन टेकड्यांवर चांगली गुडघाभर हिरवीगार लव्हाळी ऊगवलेली दिसत होती. टेकड्यांपलिकडला राखाडी समुद्र, काळवंडलेले क्षितिज आणि खिडकीपर्यंत ऊतरलेले ढग, नजरेमोरचा समुद्र क्षितिजावरून ऊलटा फिरून आभाळभर पसरल्यासारखा दिसत होता. किनार्‍यालगत पांढर्‍या शिडांच्या गलबतांचे दोन ठिपके तेवढे हलतांना दिसत होते. चाळीपासून टेकड्यांपर्यंत तर आता चांगलीच दलदल झाली असणार. सिजू हमखास त्या दलदलीत रविवारी मित्रांबरोबर मासे आणि खेकडे पकडायला जाणार आणि नेहमीसारखी बोटं सुजवून येणार.

सिलाई मशीनचे पेडल मारत सहजच खिडकीतून बाहेर बघतांना एका मागोमाग एक केवढे तरी विचार बिना आवाज करत मनात ऊमटून गेले. हातांनी किंवा डोळ्यांनी स्पर्श न करता येण्यासारखं सगळं काही मनाने शिवता येतं. पण डोळ्यांनी काय बघायचं किंवा हातांनी कशाला स्पर्श करायचा हे आपल्याला ठरवता येतं तसं मनाने कशाला शिवायचं आणि कशाला नाही ते कोण ठवरणार?
तेवढ्यात खिडकीच्या टीनच्या पागोळ्यांवर टपटप आवाज करत पावसाची पहिली सर आलीच. सिजू स्कूलबॅग डोक्यावर घेऊन गेट मधून लगबगीने आत धावतांना दिसला. पन्नास पावलं मागे दोन वेण्या घातलेली कलापिनी सुद्धा खाली मान घालून पावसाचा मारा चुकवत येतांना दिसली. लांबून केवढी तरी ऊंच वाटली ती मला.
माझी नजर खिडकी समोरून दाराकडे वळेपर्यंत जिन्यातून धडाधडा एकावेळी दोन-दोन पायर्‍या चढत सिजू दारात पोचला सुद्धा. दारातूनच त्याने ऊत्साहाने विचारलं, "मुन्नारचं काय?" मी पटकन म्हणून गेले "नाSSही म्हणजे नाSSही". क्षणात त्याचा गोरा, ऊत्साही चेहरा बदलून लाल झाला आणि कपाळावर आठ्या पडल्या. "तू माझी अम्मा नाहीसच..मुलांना कैदेत ठेऊन त्यांचे हालहाल करणार्या चेटकीणीपेक्षाही वाईट बाई आहेस तू.... माझ्या हातात असते तर मी तुझ्यापोटी जन्मच घेतला नसता नाही तर अर्ध्या रात्री ट्रेन पकडून आधी कोचीला आणि तिथून मस्कत नाही तर बहारीनला पळून गेलो असतो" फणकार्‍याने ओरडत आणि पाठीवरची स्कूलबॅग कोपर्‍यात फेकून देऊन तो धाडधाड जिना ऊतरून आल्यापावली निघून गेला. अजून मिसरूडही न फुटलेला पोरगा आज पुन्हा आईला चेटकीण ठरवून डोक्यात राख घालून ताडताड निघून गेला आणि माझी छाती पुन्हा त्याच्या काळजीने भरून गेली. आताशा कधी चेटकीन तर कधी चित्तम्मा म्हणणे नेहमीचेच....हे वयात येणारे मुलगे म्हणजे चालते फिरते माथेफिरूच! ह्या वयात त्यांच्या अच्चनपेक्षाही अम्मा लोकांशी त्यांना काय वैर वाटत असावं? मला माहित नाही. चाळीतल्याच काय कासारगोडमधल्या कुठल्याही घरात डोकवा हेच चित्र, थोडे मनाविरूद्ध घडले की आलीच ह्यांची बंडखोरी ऊफाळून.

पण मी सुद्धा ह्यावेळी त्याला बहुधा जास्तच ताणले, असे निक्षून 'नाSSही' म्हणण्यापेक्षा थोडे धीराने घ्यायला हवे होते. तेरा चौदा वर्षांची ही मुलं मुन्नारला जाऊन राहणार म्हणे दोन दिवस मान्सूनचं वाढतं पाणी बघायला? सोबत शिक्षक किंवा कोणी मोठे असते तर गोष्टं वेगळी होती. त्याच कारणामुळे मागच्या वेळी पेरियारलाही नाही जाऊ दिलं त्या रागाचाही वचपा काढतोय बहुधा. जाऊ दे! भूक लागली की येईल पुन्हा एवढूसा चेहरा बनवून आणि म्हणेल, "आज नारळ घालून मीन करी असेल तरच मी जेवणार आहे". फणकार्‍यांना अम्मा दाद देत नाही हे कळूनही ऊसना रूसवा दाखवत काहीतरी पदरात पाडून घेणे त्याला चांगले जमते. डोकं ठिकाणावर असेल तर त्याच्यासारखा लाघवी मुलगा म्हणजे कुठल्याही अम्माच्या डोळ्यातलं नक्षत्रं. पण त्याच डोक्यात एखादी तिडिक गेली की विस्फोट ठरलेला. मग झेलत बसा त्याच्या जीभेचे फटकारे. पण नेहमीच्या फणकार्‍याने बोलण्याबरोबरच आज सिजू काही तरी वेगळं म्हणाला. काय म्हणाला बरं, "अर्ध्या रात्रीतून मस्कतला नाही तर बहारीनला पळून जाईन." खरंच एवढी मोठी बंडखोरी करू शकतो माझा सिजू? मित्रांच्या संगतीत राहूनच ह्या विक्षिप्त कल्पनेने त्याच्या डोक्यात मूळ धरले असणार. नाही नाही! मी ह्यावेळी असे आजिबात होऊ देणार नाही. आता मी पूर्वीची हाताश, दुसर्‍याच्या दावणीला बांधलेली नीला नाही. तो मला चेटकीण म्हणू दे नाही तर राक्षसीण, मी त्याला ह्या विवरात स्वतःला झोकू देणार नाही. हे जीवघेणे मृगजळ त्याच्या भाग्यात लिहिले असेल तर त्याचे भाग्य मी माझ्या हातांनी पुसून टाकीन. मला मिळालेल्या कृष्णविवराच्या शापाचा बळी मी माझ्या निरागस पाडसाला होऊ देणार नाही. स्वामी अय्यपा! हे कृष्णविवर माझ्या आयुष्यात आता कितव्यांदा ऊघडू पहात आहे आणि अजून किती वेळा ते माझे शापित आयुष्य गिळू पाहणार आहे?
त्यादिवशी सिजू सांगत होता, "अम्माची तुला माहितीये, आमचे विज्ञानाचे अध्यापक सांगत होते, 'नवीन शोधानुसार तारामंडलात राक्षसी कृष्णविवरं असतात. ती आपण डोळ्यांनी बघू शकत नाही, पण कृष्णविवर त्याच्या परिघातले सर्व काही आत खेचून घेते आणि आत गेलेले काहीही कधीच बाहेर येत नाही, अगदी प्रकाशाचा कण सुद्धा नाही.'. मग आपली पृथ्वी अशा कृष्ण्विवराच्या परिघात आली तर काय होईल?"... माझ्यासारख्या कॉलेजही पूर्ण न करू शकलेल्या पस्तीशीच्या बाईला विज्ञान वगैरे काही कळत नाही. पण 'जिथून आजिबात काहीही बाहेर पडू शकत नाही' असे आयुष्याचे लचके तोडून खेचून घेणारे अंधारे विवर माणसांच्या जगात नक्कीच आहे. माझे आयुष्य पहिल्याने ह्या कृष्णविवराच्या परिघात आले तेव्हा ....

भाग १ - मोजक्या शब्दांचा माणूस

पलक्कड! नजर जाईल तिथवर पसरलेली भाताची शेतं, धरणापासून ते डोंगरपाथ्याच्या शेतापर्यंतच पाटांचं जाळं, दिवसातून दोन वेळा शेतातली शांतता चिरत धावणारी मद्रास मेल, माझी गुपितं माहित असलेली एक प्राचीन वास्तू आणि कधी गावात तर कधी शेतात धुमाकूळ घालत चित्कारत वाहणारे हत्तींचे कळप ह्या माझ्या पल्लकडच्या मागे ऊरलेल्या शेवटच्या काही आठवणी. आठवणींच्या ह्या रंगीत सुखचित्रात तीन चेहरे आहेत - पांढर्‍याशुभ्र हसर्‍या चेहर्‍याचा अच्चन, भूतकाळाच्या सावल्यांनी झाकोळलेली अम्मा आणि तिसरा.... पप्पनच्या चेहर्‍याच्या आठवणीत रंग भरण्याची ईच्छा मी आजवर जाणूनबुजून दाबत आले आहे.

पांढर्‍याशुभ्र हसर्‍या चेहर्‍याने, मला माझे नाव दिले - 'नीलांबरी'. अच्चनला मी कधीही विचारले तू माझे नाव नीलांबरीच का ठेवलेस? अच्चन फक्त डोळ्यातून हसे. मी अगदीच हट्ट धरला तर म्हणे 'मला आवडले'. कदाचित मी न विचारताही माझ्या नावामागचे गुपित सांगण्याची अच्चनची स्वतःची ईच्छा होण्याची वेळ अजून आली नव्हती. अच्चनची ईच्छा नसतांना त्याच्याशी बोलणे कोणासाठीही कल्पनेपलिकडची अवघड गोष्टं असे. अम्मा आणि माझ्याशी अच्चनचा भरभरून संवाद म्हणजे एखादा शब्द किंवा चार शब्दांचे एखादे अर्धवट वाक्य. पण ईतरांशी तो अगदीच गरजेपुरतं ते सुद्धा फक्त त्याच्या स्वत:चे समाधान होईल ईतके मोजकेच बोले. शब्द एवढे मोजून मापून वापरण्यासाठी अच्चन कोणी भातशेतीचा मालक नव्हता की त्याची स्वतःची रबर फॅक्टरी नव्हती. तो कोणी गर्विष्ठ असामी नव्हता की त्याला माणसांचा तिरस्कार वाटत नव्हता. तो एक साधा तांदळापासून मद्य घोटण्याची भट्टी लावणारा दुर्मिळ आणि कुशल कारागिर होता. दुपारी त्याच्या भातशेतीच्या मालकाकडून निरोप आला, 'चेल्लाकुट्टी, आज रात्री!' की अंधार पडताच अच्चन भट्टीचे सामान जुन्या सायकलवर लादून नेई आणि मालकाच्या शेतात भट्टी लावी. ना कोणी त्याच्याशी बोले ना त्याला कोणाशी बोलण्याची गरज पडे. अच्चनकडे अगदी कुठल्याही पानाफुलापासून मद्य बनवण्याची अफलातून कला होती जी त्याला ना कोणी शिकवली, ना त्याने कधी कोणापाशी ऊलगडून सांगितली. मी पावसात भिजून तापाने फणफणले किंवा तासनतास सिलाई मशीनवरच्या बैठकीतून मागे लागलेल्या पाठदुखीमुळे रात्ररात्र झोप न लागून अम्मा रडकुंडीला आली की अच्चन अर्ध्या रात्री ऊठे. एकही शब्द न बोलता त्याच्या अनेक बाटल्यांपैकी एका कसल्याश्या फुलांच्या मद्याने भरलेल्या बाटलीतून काढून अर्धे भरलेले फुलपात्र आमच्या ओठाला लावी. मला तर ते पिऊन जाग येई तेव्हा दुसर्‍या दिवसाची ऊन्हं कलायला देखील लागलेली असत. आपले नेमके काय दुखत होते ते आठवेनासे होई ईतका पोटात भुकेचा भयंकर वणवा पेटलेला असे.

त्या वयातही एवढ्या मोठ्या अच्चनला सगळे चेल्लाकुट्टी (माझ्या प्रिय बाळा) का म्हणत मला कधीच कळाले नाही. "अच्चन, तुला तुझ्या अच्चनने किंवा अम्माने काही खरेखुरे नाव दिले नाही का?" असे मी विचारले तर तो नुसताच लहान मुलासारखा निरागस हसे. "तू कुठे जन्मला? तुला कोणी मोठे केले? पल्लकडमध्ये येण्याआधी तू कुठे होतास?", अशी माझ्या प्रश्नांची सरबत्ती ऐकून सगळ्या प्रश्नांना तो एकाच शब्दाने ऊत्तर देई, "कट्टील (जंगलात)". त्याचे लहान मुलासारखे निरागस हसणे पाहून मलाही त्याच्यासाठी 'चेलाकुट्टी' सोडून दुसरे काही नाव सुचत नसे. अम्मा म्हणे, "एका मुसळधार पावसाच्या रात्री तुझ्या मुट्टाचनला (माझ्या आजोबांना) लहानगा अच्चन घराच्या पडवीत झोपलेला दिसला आणि तेव्हापासून तो ईथेच आहे, माझ्याबरोबर."
जेव्हा कधी रात्रीची भट्टी लाऊन अच्चन पहाटे घरी येई तेव्हा आत न येता तो पडवीतच झोपून राही. सकाळी मी शाळेत आणि अम्मा कपड्यांच्या फॅक्टरीत निघतांना त्याचा झोपेतही काहीतरी मजेशीर स्वप्न बघितल्यासारखा खुदूखुदू हसणारा चेहरा बघून आम्हाला सुद्धा हसू येई. अम्मा म्हणे, "त्याला जंगलाची नाही तर हत्तींची स्वप्नं पडत असणार, माणसांची स्वप्नं त्याला हसवणार नाहीत".

दुपारी शाळा सुटली की मी तिथूनच अम्माच्या फॅक्टरीत सिलाई मशीनवर हलकी फुलकी कामं करायला जाई. संध्याकाळी साडे सहाचा भोंगा होऊन आमची फॅक्टरी सुटली की आम्ही दोघी घरी येऊ तेव्हा अच्चन त्याला कुठूनतरी मिळलेला जुन्या वर्तमानपत्राचा तुकडा अगदी डोळ्यांजवळ धरून तो वाचण्याचा प्रयत्न करत पडवीतच बसलेला दिसे. कित्येक महिन्यांपासून कागदाचा तो एकच तुकडा वाचण्याचे त्याचे प्रयत्न चालू होते. आम्हाला येतांना पाहताच कागदाचा तुकडा त्याच्या पांढर्‍याशुभ्र बंडीत तो लगबगीनं ठेऊन देई. अच्चनने त्याच्या ऊभ्या आयुष्यात पांढर्‍या रंगाशिवाय दुसर्‍या कोणत्याही रंगाचा कपडा अंगावर चढवल्याचे मला आठवत नाही. अम्मा आतून व्हायोलीन आणून त्याच्या हातात देई. दिवसातून पहिल्यांदाच एकमेकांना बघण्याचा आनंद दोघांच्याही चेहर्‍यावर सारखाच ऊमटे. त्या दोघांच्या नात्यात शब्दांवाचून काहीच अडले नव्हते. व्हायोलीन अच्चनच्या हातात देऊन अम्मा रात्रीचे जेवण बनवण्यासाठी आत गेली की अच्चन पुढचा तासभर डोळे मिटून व्हायोलीनच्या सुरांशी खेळत राही. मी पडवीत बसून अम्माची "त्याला सांग जेवण तयार आहे" अशी हाक कधी ऐकू येते ह्याची वाट बघत शाळेच्या पुस्तकात डोके खुपसून बसे. आपल्या घरात 'लहान मूल नेमके कोण आहे?' असे अम्माला विचारण्याचे विक्षिप्त विचार कधीकधी माझ्या मनात येत. रात्री जेवतांना मी शाळेतल्या आणि अम्मा फॅक्टरीतल्या गोष्टी अच्चनला सांगत राहू. अम्मा म्हणाली "आज दोन महिन्यांनी नीलाने घातलेली टीप म्हातार्‍या सुपरवायजर थंपीच्या कसोटीला ऊतरली. आता थंपी लवकरच नीलाला वेगळं मशीन देईल चालवायला" की अच्चन माझ्या पाठीवर हात ठेऊन डोळ्यांनीच 'वा! छान छान" म्हणे. बहुतेक आम्हा दोघींनाही त्याचे डोळे वाचून त्याला काय म्हणायचे आहे ते आपोआपच कळून जाई. त्याच्या डोळ्यांची भाषा त्याचे मोजके बोलणे आम्हाला कधीच त्रासदायक वाटत नसे. अच्चन आणि अम्मा बरोबरचा पल्लकड मधला प्रत्येक दिवस सारखाच पण हसरा होता.

मग एके दिवशी रात्री सायकलवर सामान लादून गेलेला अच्चन सकाळी पडवीत झोपलेला दिसलाच नाही. रिकामी पडवी पाहून अम्मा आणि मी एकमेकांच्या काळजीने भरलेल्या चेहर्‍याकडे बघत राहिलो. ह्यापूर्वी असे कधीच झाले नव्हते. मालकाचे शेत आणि आमचे घर सोडून अच्चन जाऊ शकेल अशी तिसरी जागा पल्लकडमध्ये नव्हती. तेवढ्यात कोणीतरी धावत आले आणि सांगितले, "मालकांच्या शेतात काल पोलिसांची धाड पडली. चेल्लाकुट्टीला पोलिस दोरीने बांधून घेऊन गेले."भेदरलेले चेहर्‍यांनी अम्मा आणि मी लगबगीनं पोलिस स्टेशनकडे धावलो. "ही जागा लहान मुलींसाठी नाही. मी आत जाऊन अच्चनला घेऊन येते तोवर तू ईथे ह्या बाकावर बैस" म्हणत मला बाकावर बसवून अम्मा धावत आत गेली सुद्धा. रंग ऊडालेल्या काळपट भिंती, बीड्या फुंकत माझ्याकडे बघत जाणारे पोलिस, आतून येणारे लोकांचे ओरडण्याचे, रडण्याचे आवाज, मला तिथून पळून जावेसे वाटत होते. दोनेक तासांनी अम्मा आली तेव्हा तिच्या मागे सुजून काळ्यानिळ्या पडलेल्या चेहर्‍याने अच्चन मान खाली घालून ऊभा होता. अच्चनचा हात धरून मी पुढे आणि अम्मा आमच्या मागे असे एकमेकांशी काहीही न बोलता घराकडे चालत राहिलो. धावपळ करून अम्मा खूप थकली असावी त्यामुळे आमच्या बरोबरीने चालणे तिला जमत नसावे असे मला वाटले.
घरी पोहोचल्यानंतर अम्मा आत जाऊन भिंतीला डोकं टेकवून ऊदास नजरेनं बसून राहिली. मला काय करावं? कोणाशी बोलावं? काय बोलावं? काही सुचत नव्हतं. पडवीत बसलेल्या अच्चनला मी व्हायोलीन आणून दिली. माझ्याकडे बघून तो नेहमीसारखाच डोळ्यांतून हसला पण त्याने व्हायोलीन न वाजवता बाजूला ठेऊन दिली. पुढचे कितीतरी तास असेच ऊदासवाणे गेले. ऊन्हं कलली, फॅक्टरी सुटल्याचा भोंगा झाला तशी अम्मा ऊठली आणि तिने व्हायोलीन अच्चन समोर धरली. दोघेही नेहमीसारखेच एकमेकांकडे बघून हसले, पण दोघांच्याही डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. रात्री जेवतांना अम्मा म्हणाली, "आज नीलाला पोलिस स्टेशन बघायला मिळाले पण तिला ते फार काही आवडले नाही. तर आता पुन्हा तिला तिथे कधीच जायचे नाही. हो की नाही नीला?"
"हो, मला आजिबात नाही आवडली ती जागा आणि तिथले आवाज. त्या मिश्यांवाल्या, खाकी वर्दीतल्या पोलिसांची मला भिती वाटते" मी अच्चनकडे पहात रडवेल्या चेहर्‍याने म्हणाले. त्याचा सुजलेला चेहरा बघतांना माझे डोळे भरून आले होते.
माझ्या पाठीवर हात फिरवत अच्चन डोळ्यांनीच म्हणाला "ऊगी ऊगी! आता तुला तिथे कधीच जावे लागणार नाही"
रात्री झोपतांना अम्माने माझ्या हातात अच्चनला पडवीत नेऊन देण्यासाठी अर्धे भरलेले फुलपात्र दिले आणि दुसरे अर्धे भरलेले फुलपात्र स्वतः पिऊन ती झोपून गेली. त्या रात्री अम्माचे काय दुखत होते मला अजूनही कळालेले नाही.

कालचा दिवस आमच्या आयुष्यात जणू आलाच नव्हता असे रोजच्यासारखेच सकाळी मी आणि अम्मा निघालो तेव्हा पांढरे शुभ्र कपडे घालून अच्चन पडवीत बसला होता. आमच्याकडे आळीपाळीने डोळे भरून बघून झाल्यावर हातातला कागद पुढे करून तो म्हणाला, "गल्फ! मी जातो. चार वर्ष. पैसे पाठवतो"
रियाधमध्ये बांधकामासाठी मजूर लोकांच्या भरतीची जाहिरात होती. चार दिवसांनी कोचीमधून मजुरांना घेऊन गलबत निघणार होते. अम्माचे डोळे भरून आले पण ती काही म्हणाली नाही. काही बोलून, समजाऊन, ईच्छेविरूद्ध अच्चनकडून एक साधा शब्द वदवणे अवघड. तर काही करवून घेणे त्याच्या बाबतीत शक्य नाही हे अम्माला माहित होते. तिने आतून आणून व्हायोलीन त्याच्या हातात ठेवले आणि ती रडत त्याच्या गळ्यात पडली. तिचा आवेग ओसरल्यावर तिला बाजुला करून माझ्याकडे बघत अच्चनने व्हायोलीन माझ्या हातात ठेवले. माझा चेहरा ओंजळीत घेऊन तो म्हणाला, "तुझ्या जन्माच्या वेळी खूप पाऊस. पाच दिवस. तू आलीस, निळे आकाश दिसले. तू नीलांबरी. गल्फ! फक्त निळे आकाश. पाऊस नाहीच. तुझी खूप आठवण येणार." आणि अच्चन निघून गेला. त्या दिवसापासून संध्याकाळी पडवीत अच्चन दिसला नाही की त्याच्या व्हायोलीनचे सूर ऊमटले नाहीत. दर महिन्याला मनीऑर्डर घेऊन आलेला, खाकी वर्दीतला पोस्ट्मन तेवढा पडवीत दोन मिनिटं बसायचा.

दोन वर्षात अच्चनच्या नसण्याची सवय झाली होती पण दिवसातून कितीतरी वेळा पांढर्‍याशुभ्र कपड्यातला त्याचा हसरा, निरागस चेहरा मनाला घरं पाडून जाई. तो गेल्यापासून त्याच्या मोजकं बोलण्याची लागण बहुधा अम्माला झाली होती. न बोलता कितीतरी वेळ भरून आलेल्या डोळ्यांनी ती व्हायोलीनकडे बघत बसून राही. मी रहात असलेल्या निळ्या आकाशाखालीच दुसर्‍या टोकाला अच्चन आहे ह्या कल्पनेने मला थोडा दिलासा मिळे, पण माणसांच्या त्या ऊजाड जगात अच्चनला ईथल्यासारखी जंगलांची आणि हत्तींची स्वप्न पडत असतील का? काही दुखले खुपले तर फुलपात्रात घालून तो काय पिणार? असे प्रश्न मला सतावत राही. मग मार्चच्या एका रणरणत्या ऊन्हाळ्यातल्या दुपारी अम्मा आणि मी काम करत असलेल्या कपड्यांच्या फॅक्टरीत रियाधवरून ट्रंक कॉल आला, "चेल्लाकुट्टी बांधकामाच्या ईमारतीवरून पडून डोकं फुटून मेला."
नकळत त्याच्या परिघात आलेल्या माझ्या आयुष्याचा एक जिवंत हिस्सा आणि अच्चनचं निश्चल शरीर कृष्णविवराने गिळून टाकलं. मी सिलाई केलेले निर्जीव कपडे सातासमुद्रापार जात, पण डोकं फुटून मेलेल्या अच्चनच्या हाडामासाच्या शरीराला कृष्णविवरातून काढून त्याच्या हक्काच्या घरी कोण आणणार? कोठडीतून अच्चनला घेऊन येणार्‍या अम्मासारखे, अच्चनच्या कलेवराला घेऊन येण्यासाठी लागणारे धैर्य मी कोठून आणणार? मला अजूनही स्वप्नात, पांढर्‍या शुभ्र कपड्यातला अच्चन निळ्या आकाशाकाडे बघत खाली पडतांना दिसतो... तो पडत राहतो, डोळ्यांतून हसत राहतो. माझ्या कानांत त्याच्या व्हायोलीनचे सूर ऊमटत राहतात. तो पडायचा थांबत नाही कारण ह्या कृष्णविवराला तळ नाही.

क्रमशः ..

छोटेसे मनोगत :- मायबोलीवरच्या अलिकडच्या घडामोडी बघून काही सांगावेसे वाटले म्हणून...
लिहिणे हा माझ्यासाठी एक अनुभव आहे आणि तो वाचकांच्या अभिप्रायांशिवाय खचितच अपूर्ण आहे. 'ही माझी कलाकृती, तिच्याकडे जसे मी बघतो तसेच सगळ्यांनी बघावे, ती जशी मला आवडली तशीच सगळ्यांना आवडावी' अशी 'अनरिअ‍ॅलिस्टिक' अपेक्षा बाळगणे हे मी 'स्वतःचीच मोठ्ठी फसवणूक करणे' असे समजतो. ह्याचीच दुसरी बाजू, 'सगळ्यांना आवडेल असेच कायम मी लिहावे' असे कुठलेही कंपल्शन मी स्वतःवर लादत नाही. तस्मात माझ्या लेखनावर, जेवढं पॉझिटिव, प्रतिक्रियांचं स्वागत आहे तेवढंच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त लेखनातल्या (घटना+पात्र), शैलीतल्या कमतरता दाखवून देणार्‍या, लेखातल्या न आवडलेल्या, न पटलेल्या गोष्टी सांगणार्‍या प्रतिक्रियांचं स्वागत आहे.
प्रत्येक वाचकाला मोकळेपणानं त्याच्या मनातलं सांगता यावं, हवा तसा प्रतिसाद देण्याचं त्याचं स्वातंत्र्य अबाधित रहावं म्हणून मी माझ्यापुरतं, ह्यापुढे कुठल्याही (टीका असो वा कौतुक) प्रतिक्रियेवर माझा स्वतःचा प्रतिसाद न लिहिण्याचं ठरवलं आहे आणि ईतर वाचकांकडून सुद्धा तशी अपेक्षा करतो आहे. (प्रतिक्रिया प्रश्नार्थक असेल किंवा चर्चा करण्याची अपेक्षा असेल तर प्रतिसाद द्यायला नक्कीच आवडेल.). थोडक्यात कुठल्याही कारणास्तव 'माझ्या लेखनासंबंधात' प्रतिसाद देतांना वाचकांनी नाऊमेद होऊन हात आखडता घेऊ नये एवढेच म्हणणे आहे.

हे वाचून तुम्हाला जर मी लेखक म्हणून स्वार्थी वाटत असेन तर खात्री बाळगा तुम्हाला अगदी बरोबर वाटते आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अम्मा म्हणे, "त्याला जंगलाची नाही तर हत्तींची स्वप्नं पडत असणार, माणसांची स्वप्नं त्याला हसवणार नाहीत".
>>>
काय कातील वाक्य आहे.

लिखाण आवडले हेवेसांनल

Masttch

काय लिहलंय _/\_
सकाळीच अधाशासारखं वाचायला सुरवात केली होती पण लगेच लक्षात आलं की हे वेळ देऊन, सावकाश, रिचवत वाचावे लागणार आहे.

तुमची उणीव का जाणवत होती हे लक्षात आलं. परत आल्याबद्दल खूप आभार. आणि पु भा प्र.

नेहमीप्रमाणे खूप छान, आवडलं... Happy
तुमच्या कथांमध्ये एखादी संस्कृती समरसून उभी करता डोळ्यासमोर.. येथे कोची चे वातावरण तसेच हळवी तरीही अगतिक निलांबरी, बंडखोर मुलगा आणि अचचन चा स्वभाव ही पात्रे नेमकी वाचकांसमोर आणली आहेत.. लिहीत राहा, तुमच्या लेखनाचा आनंद घेत राहू आम्ही Happy

अप्रतिम...!! खूप आवडले..! Happy मी तुमचे काही लेखन वाचले आणि fan झालो. आजकाल तुमच्यासारखा लाखातून एखादा लेखक असतो..! Happy

By the way, < Danke, Ich war nie zu weit weg > हे जर्मन आहे ना? अर्थ काय होतो?

हातांनी किंवा डोळ्यांनी स्पर्श न करता येण्यासारखं सगळं काही मनाने शिवता येतं. पण डोळ्यांनी काय बघायचं किंवा हातांनी कशाला स्पर्श करायचा हे आपल्याला ठरवता येतं तसं मनाने कशाला शिवायचं आणि कशाला नाही ते कोण ठवरणार?...

अ प्र ति म...

किती मस्त लिहिता तुम्ही...

हातांनी किंवा डोळ्यांनी स्पर्श न करता येण्यासारखं सगळं काही मनाने शिवता येतं. पण डोळ्यांनी काय बघायचं किंवा हातांनी कशाला स्पर्श करायचा हे आपल्याला ठरवता येतं तसं मनाने कशाला शिवायचं आणि कशाला नाही ते कोण ठवरणार?...

अ प्र ति म...

किती मस्त लिहिता तुम्ही...

मस्त लिहिलंयस!
असे वेगवेगळ्या कथानकांचे/ काळाचे तुकडे जोडत बनलेली कथा वाचायला फार आवडते. मजा आली!
पुभाप्र.

Pages