"शेवटची भेट" भाग १

Submitted by eshwari on 26 September, 2019 - 03:42

जाता जाता आठवण म्हणून
डोळ्यांत अश्रू तू देऊन गेलास
माझ्या मनाला माझ्यापासूनच
परकं करून गेलास

रुसले हे मन माझे
माझाशी आज बोलत नाही
तू न माझा राहिलास
हे त्या वेड्याला पटत नाही

कितीही समजावले तरी
माझे तो मानतच नाही
तुझ्याच विचारात राहते
माझे दु:ख त्याला कळतच नाही

वेडं हे मन माझे
तुझी वाट पाहणं सोडत नाही
तू परत कधीच येणार नाही
कदाचित त्याच्या मनालाही हे पटत नाही.........

असाच काहीसा गोंधळ नूतनच्या मनात सुरु होता.. रात्री सामानाची भराभर करता करता ती संदेश आणि तिच्या जुन्या आठवणी पुन्हा पुन्हा स्मरत होती. एकीकडे जुन्या आठवणींचा प्रवाह आणि दुसरीकडे डोळ्यातून वाहणारा अश्रूंचा प्रवाह दोन्हींना थांबवणं आज तिला शक्य न्हवतं. जणू काही आजच एकदाचं खूप मनभरून रडून घ्यायचं आणि उद्यापासून त्या सगळ्या जुन्या आठवणींना कायमच कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त करून , संदेशपासून कायमचं दूर निघून जायचं.
दुसऱ्या दिवशी शेवटी तिची उरलीसुरली आवराआवर करून झाली , तिने आपले डोळे पुसले आणि ती आपली बॅग घेऊन बाहेर आली. तिचे आई-बाबा , भाऊ सगळेजण हॉलमध्ये तिची वाट बघत बसले होते. नूतन बाहेर येताच तिची आई आपल्या जागेवरून उठली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली," बाळा सांभाळून जा गं , एकटीच जातेयस ना, मी आशाला सांगून ठेवलंय. ती येईल तिकडे स्टेशनवर तुला घ्यायला" आणि आईच्या डोळ्यात पाणी आलं कारण दोनच दिवसांपूर्वी नूतनने असा निर्णय घेतला होता कि ती कोल्हापूरला तिच्या ताईकडे जाणार आहे आणि तिथेच ती आपलं उरलेलं शिक्षण पूर्ण करणार होती. तिच्या आशाताईला जेव्हा हि गोष्ट कळली तेव्हा तिला खूप आनंद झाला होता.तिने तर आई-बाबांना हेही सांगून टाकलं की जमलच तर एक छानसा मुलगा बघून कोल्हापुरलाच नूतनचं लग्न पक्क करून तिचं लग्न लाऊन देणार आहे . पण बिचाऱ्या नुतनला फक्त आणि फक्त संदेश पासून दूर जायचं होतं …. खूप दूर ...... पण खरच ती दूर जाणार होती ?
शेवटी नूतन घराबाहेर पडली तिचे बाबा आणि भाऊ तिला स्टेशनवर सोडायला येणार होते. जाता जाता एकवार तिने मागे वळून दारात उभी असलेल्या आणि डोळ्यात अश्रू असलेल्या आईकडे पाहिले. तिलाही रडू येत होते पण कसबसं स्वतःला सावरत तीने आईला हात दाखवला आणि पुढे निघाली. ती “कायमचीच परत कधीही न येण्यासाठी …………”

ट्रेन मध्ये बसल्यानंतर वेळ होताच ट्रेन सुरु झाली , तिने स्टेशनवर उभ्या असलेल्या आपल्या बाबांना व भावाला हात दाखवून त्यांचा निरोप घेतला. नंतर ती पुन्हा आपल्या जागेवर येउन बसली. खिडकीबाहेर पाहता पाहता तिच्या मनात विचार आले कि खरच तिचे आई -बाबा किती प्रेम करतात तिच्यावर. जणू त्याचं आयुष्याच तिच्यावर प्रेम करण्यासाठी बनलंय आणि ती …. तिचं काय?…… तिने मात्र एका अश्या मुलावर प्रेम केलं ज्याच्यासाठी ती म्हणजे केवळ गृहीत धरण्याची वस्तूच होती. काहीही झालं तरी त्याला वाटायचं ती आहे समजूतदार सांभाळून घेईल , बघेल तिचं ती , करेल मला माफ … आणि खूप काही. मग अचानक तिला तो काळा दिवस आठवला, ज्या दिवशी ती या प्रेमासारख्या मोठ्या गैरसमजातून बाहेर आली होती आणि क्षणात तिचं आयुष्य असताव्यास्त झालं होतं. तिची स्वप्न …स्वप्नच राहिली होती …

त्या दिवशी नूतन काहीशी जास्तच गोंधळलेली आणि चिंतेत दिसत होती. आणि सारखी सारखी आपल्या मोबाइलकडे आतुरतेने पाहत होती. वारंवार तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होती उस्तुकता, भीती, दुखं सारं काही एखादा ऋतू बदलावा तसे तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. काही वेळाने शेवटी एकदाचा तिचा मोबईल वाजलाच , तिने पटकन तो कॉल उचलला समोर संदेश बोलत होता
नूतन ," संदेश काय झालं रे , तुझे आईबाबा काय म्हणाले रे? , त्यांना माझा फोटो दाखवलास का? त्यांना मी आवडले का? आपलं रिलेशन त्यांनि मान्य केलं का?”
संदेश," नाही … नूतन त्यांनी नकार दिलाय आपल्या लग्नाला, मी त्यांना खूप कन्व्हेन्स केलं पण ते काहीच ऐकायला तयार न्हवते. त्यांनी हे हे रिलेशन इथेच थांबवायला सांगितलंय , i m really very sorry नूतन plz नूतन आपल्याला हे नातं इथेच थांबवायला हवं. मी माझ्या आईवडिलांच्या विरोधात नाही ग जाऊ शकत…" आणि त्याचं बोलणं नूतन शांतपणे ऐकत होती आणि मधेच तिने संदेशचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतंच कॉल कट केला. आणि एकदम ती रडू लागली. खूप रडली होती ती, आपल्या आईच्या कुशीत शिरून तिला खूप रडावसं वाटत होतं, सर्वकाही तिला सांगावं असं वाटत होतं. पण ती कुणालाच काही सांगू शकत न्हवती. तिच्या प्रेमाला सर्वांनी स्वीकारलं असतं ?….
त्याच्या तिसऱ्याच दिवशीच तिने कोल्हापूरला आपल्या मोठ्या ताईकडे जाण्याचा निर्णय घेतला होता, तेही कायमचं , किमान दुसऱ्या मुलाशी तीच लग्न होईपर्यंत तरी..... कारण आता तिचं लग्न कुणाशी होणार आहे , तिला तो आवडेल का? या सगळ्यांशी तिला काही घेणं देणंच न्हवतं.
ती कोल्हापूरला पोहोचली. तिची आशाताई आणि तिचे भाऊजी तिला स्टेशनवर घ्यायला आले होते. स्तेशनवर उतरल्यानंतर चेहऱ्यावर उसनं हसू आणत तिने ताईला मिठी मारली. मग तिघेही घरी निघाले. बरेच दिवस लागले नुतनला तिथे रुळायला पण संदेशच्या आठवणी काही तिची पाठ सोडायला तयार न्हवत्या. नेहमी ती एकटीच बसून असायची. कुठेतरी हरवल्यासारखी शून्यात पहायची. तिच्या ताईच्या नजरेतून मात्र हि गोष्ट सुटली न्हवती.
एक दिवस घरात कुणीही नसताना तिच्या ताईने तिला विचारलेच कि ," नूतन , बाळे काय झालंय तुला ? तू इथे आल्यापासून मी पाहतेय तू खूप डिस्टर्ब दिसतेयस. काही प्रोब्लेम आहे का? असेल तर सांग मला plz ?"
आशा नुतनची सर्वात लाडकी मोठी बहिण होती. सगळ्या गोष्टी ती आपल्या ताईबरोबर शेअर करायची. पण संदेशची गोष्ट तिने जाणीवपूर्वक तिच्यापासून लपवून ठेवली होती. ताईने असं विचारल्यावर नुतानाने आपल्या ताईकडे पाहिलं आणि क्षणात तिच्या अश्रूंचा बांध फुटला एखाद्या लहान मुलीप्रमाणे ती आपल्या ताईला बिलगून ओक्साबोक्शी रडू लागली. तिची ताईही क्षणभरासाठी गोंधळून गेली. मग कसंबसं तिने नुतानला शांत केलं आणि समजावलं . मग नुतनने संदेश आणि तिच्या नात्याबद्दल सगळ काही तिच्या ताईला सांगून टाकलं. ते ऐकून तिची ताई एकदम टेन्शनमध्ये आली. कारण तिला नुतनकडून अशी कधी अपेक्षाच न्हवती even ती असं काही करेल हे तिला स्वप्नातही वाटलं न्हवतं. पण हा प्रसंग पाहता हि वेळ तिला ओरडायची नसून तिला मानसिक आधार देण्याची आहे हे तिला चांगलंच कळत होतं. मग तिने नुतानला विचारलं ,"मग आता पुढे तू काय करायचं ठरवलंयस?"
नूतन," काही नाही , मी त्याला कायमचं विसरून जाणार आहे . म्हणूनच मी इथे आलीय " हे ऐकून आशाला थोडं बरं वाटलं.
मग तिचा मूड ठीक करण्यासाठी आशा तिला बाहेर फिरायला घेऊन गेली. दोघी घरी येत असताना नूतन मात्र अजूनही अस्वस्थच होती, अजूनही ती संदेशच्या आठवणीतून बाहेर पडली न्हवती आणि त्यामुळेच चालता चालता गाड्यांच्या गर्दीत ती कधी अशापासून वेगळी झाली, तिला कळलेच नाही. काही वेळानंतर रस्त्यावर करकचून ब्रेक दाबण्याचा मोठा आवाज आला आणि सगळ्या गाड्या जागच्या जागी थांबल्या. तिथे लोकांचा एकच आरडओरडा सुरु झाला. त्याच गर्दीतून आशा वाट काढत पुढे आली आणि तिने समोर जे काही पहिले ते पाहून जागच्या जागीच ती मटकन खाली बसली. समोर तिची लाडकी लहान बहिण नूतन रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध होऊन पडली होती. तिच्या आजूबाजूला रक्ताचा सडा पडला होता. प्रसंगावधान राखत काही जणांनी नुतनला उचलून एका गाडीत ठेवलं आणि आशाही रडत रडत त्याच गाडीत बसून हॉस्पिटलला निघून गेली.

2 महिन्यानंतर ………….

नुतनला नकार दिल्यानंतर संदेशही फारसा आनंदी राहिला न्हवता. त्यालाही तिची खूप आठवण यायची. तिने दिलेले गुलाबाचे फुल, त्याच्या वाढदिवसानिमित्त आपल्या पॉकेटमनीमधून तिने त्याच्यासाठी घेतलेला त्याच्याच आवडीच्या आकाशी रंगाचा शर्ट. सगळं काही त्याने जपून ठेवलं होतं. पण नेहमीप्रमाणेच त्याने पुन्हा तिला गृहीत धरलं कि हळू हळू ती स्वतःला यातून सावरेल. शेवटी तोही आपल्या आईवडीलांपुढे मजबूर झाला होता. पण एक दिवस त्यानेच नुतनला शब्द दिला होता कि तो काहीही झालं तरी तो लग्न करील तर फक्त तिच्याशीच वाटल्यास त्याचे आई-वडीलही त्याच्या विरोधात का जाईनात……. आणि तोच ऐनवेळी स्वतःच्या शब्दापासून फिरला होता.
ते सगळं आठवून काही क्षणासाठी का होईना पण त्याच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. त्याला अजूनही नुतनची फार आठवण येत होती. शेवटी म्हणतात न कि एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याबरोबर असते तेव्हा आपल्याला तिची कदर नसते पण जेव्हा तीच व्यक्ती आपल्यापासून दूर होते तेव्हा त्या व्यक्तीची किंमत आपल्याला कळते. आणि तिला भेटण्यासाठी आपलं मन असूसतं. संदेशच्या मनाचीही अशीच काहीशी अवस्था झाली होती. पण तो हे ठरवू शकत न्हवता कि त्याला कुणाची साथ द्यायची आहे एकीकडे आईवडील आणि दुसरीकडे त्याची प्रिय नूतन. आणि शेवटी तो आपल्या आईवडिलांकडे झुकला.
काही दिवसांपूर्वी तो काही कामानिमित्त त्याच्या गावी म्हणजे रत्नागिरीला गेला होता. काम संपताच तो मुंबईला त्याच्या बाईक वरून निघाला होता. दिवस पावसाळ्याचे होते , संदेश कोल्हापूरमार्गे निघाला होता. पावसामुळे सगळीकडे हिरवागार वातावरण झालं होतं. तेवढ्यातुनही त्याला नुतनची आठवण आली होती. कारण एकदा अश्याच पावसाळ्याच्या दिवसांत नूतन त्याच्याबरोबर घरी पिकनिकचं कारण सांगून बाहेर फिरली होती. तिला कोकण खूप आवडायचं. ती म्हणायची अश्याच निसर्गाच्या सानिध्यात आपण आपल्या दोघांच एक सुंदर घर बनवून आपला संसार थाटायचा." नुतनचे ते शब्द आठवताच त्याला खूप वाईट वाटलं. मग एके ठिकाणी मधेच त्याची बाईक बंद पडली. त्याने जेव्हा उतरून आसपास मदतीसाठी पाहिलं, पण कुठेही मदत मिळण्याची चिन्हे दिसेनात. राहून राहून त्याच मन एका दिशेने ओढ घेत होतं. शेवटी तो त्या दिशेने गेला तेव्हा त्याला एक कौलारू घर दिसलं , मदतीसाठी म्हणून तो आपली बाईक घेऊन त्या घराच्या दिशेने निघाला. ती जागा त्याच्यासाठी अनोळखी होती, त्या घराजवळ येताच त्याच्या मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिली होती. घराजवळ येताच त्याने दर ठोठावले. एका मध्यम वयाच्या माणसाने दरवाजा उघडला.
संदेश ,"माझी बाईक खराब झालीय plz काही मदत मिळेल का? "

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users