दरवळून टाक ना!

Submitted by निशिकांत on 23 September, 2019 - 00:40

एक प्यास अंतरात, शांतवून टाक ना !
माझिया मिठीत रात्र दरवळून टाक ना !

का असा उगाच बाण मारतोस चहुकडे ?
मार नेम, काळजास भळभळून टाक ना !

कैद आसवास मी किती सख्या करायचे ?
आठवात ये तयास ओघळून टाक ना !

वेदनेतही सुखास शोध शोध शोधले
अन् बजावले मनास "तू हसून टाक ना" !

फैसले विकावयास बैसलेत पंच हे
लाच दे नि न्यायदीप मालवून टाक ना !

"काय जग म्हणेल?" या विवंचनेत त्रस्त का ?
हो भणंग, काळजीस ठोकरून टाक ना !

माणसा जुलूम कोठवर किती सहायचे ?
घे मशाल रान सर्व पेटवून टाक ना !

प्रेत विनविते सख्या चिता नकोस पेटवू
झाड वाचवावया, मला पुरून टाक ना !

काफिया, रदीफ अन् खयाल मस्त पाहिजे
शक्य हे असेल तर गझल लिहून टाक ना !

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह वाह! मस्तच! मी तर चालीत गुणगुणुनही पाहिली. उत्तम!

फक्त इथे-
का असा उगाच बाण मारतोस चहुकडे ? >>>> 'हु' ऱ्हस्व आहे आणि मी दीर्घ वाचतेय. तिथे अडकते आहे. बाकी सगळ मस्त गुणगुणता आलं. Happy

वाह!

सुंदर
मधुरा ताई अगदी बरोबर आहे
हे गीत गुणगुणता यतेय