कल्याणी खरच तू अस्तित्वात आहेस ना ?.......

Submitted by Sujata Siddha on 21 September, 2019 - 05:58

“खुळा आहेस का तू अभ्या ? “ माझा कलीग विभव मला वेड्यात काढत होता , आम्ही दोघेही एका नामवंत रिअल इस्टेट कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करायचो ,कुठं आहे माहितीये का आमची साईट? एका जंगलात,..जंगल म्हणजे प्रॉपर जंगल बरं का ? भोर च्या पुढे साधारण ४० एक कि.मी. वर , जवळ जवळ २०० एकरांचं जंगल आहे , पण develop केलेलं, शहराच्या जंजाळात राहून पकलेल्या ज्या लोकांना सुरक्षित राहून काहीतरी थ्रिल्लिंग करावं असं वाटतं त्यांच्यासाठी इथे फार्म हाऊस आणि मचाण बांधलेले . बांबू हाऊस आणि टेन्टस पण आहेत ,विकत घ्या नाहीतर रेन्ट वर , ज्याला जे आवडेल त्याच्यात त्याने राहावं, दोन दिवस निवांत यायचं , शौक असेल तर शिकार करायची नाहीतर जंगलात राहायची मजा अनुभवून रिफ्रेश होऊन आपापल्या घरी जायचं , भोर गावातली चार-पाच कुटुंब तिथं दिवसा कामाला येतात , आपल्याला हवं ते खायला प्यायला करून देतात , सगळी व्यवस्था बघतात आणि रात्री गावात परत जातात,
साईटवरची स्वयंपाकीण ‘आशा’ , तिला सगळे आशा ताई म्हणतात , तिला जसं काही अन्नपूर्णेचं वरदान आहे , जो पदार्थ करेल तो चवीला एक नंबर ,’ , कांदा भजी , भरलं वांग , हिरव्या मिरचीचा झुणका , आणि नॉन व्हेज तर अशी काही बनवते की मी तिच्या नवऱ्यासमोरच ‘य ‘ वेळा तिच्या हाताचा मुका घेऊन म्हणतो , “आशा ताई यु आर ग्रेट !.. “ मग ती लाजून आत पळते ,काय म्हणता नवरा काही बोलत नाही ? अरे हॅट , काय बिशाद त्याची , आपल्यापुढे काही बोलायची , बबन तर आपला यार आहे , आपण कधी कुणाला कमी नाही लेखलं , Bishops मधून शिकलो असलो ,म्हणून काय झालं ? ६ -२ ‘’ उंची , घारे डोळे , रोज जिम ला जाऊन मिळवलेली sculpted body , आणि अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी सिनिअर सेल्स मॅनेजरची पोस्ट हे सगळं जरी असलं तरी आपण माज नाही केला हा कधी त्याचा , आणि सगळ्यात महत्वाचं ,आपल्याकडे कला आहे समोरच्याला बघता बघता खिशात घालायची . उगाच नाही वाजवून ऐंशी हजार पगार घेत , साईट व्हिझिट ला येणारे मोठे लोक जसे आपल्या प्रेमात आहेत ना , तसेच सगळे कामगार आणि ड्रायव्हर सुद्धा आपले यार -दोस्त आहेत , फिदा असतात सगळे आपल्यावर!
तुम्हाला म्हणून सांगतो ,झाडावरून नुकत्याच काढलेल्या ताज्या लालभडक तिखट लावलेल्या , डझनभर कैरीच्या फोडी कंपनीच्या डायरेक्टर आणि सिईओ च्या आधी मला मिळतात साईटवर गेलं की आणि तलंग कोंबडी शिजवली ना की सगळयांच्या आधी माझ्यासाठी लपवून झाकून बाजूला ठेवली जाते , असा थाट असतो आपला साईटवर , तलंग कोंबडी माहितीये ना? नाही ?..., बास का राव ? SSS अहो तलंग म्हणजे कवळी कोंबडी , तारूण्यात नुकतच पदार्पण केलेली . तर मी काय सांगत होतो हा, असंच एकदा साईटवर निघालो होतो मी कस्टमर ला घेऊन, तेव्हाच ती दिसलेली ,’ गोरी गुलाबी कांती , हरणासारखे टपोरे डोळे , लांबसडक चमकदार केसांत डोकावणारी सोनेरी छटा ,१६-१७ वर्षांची , सडपातळ बांधा आणि ताडमाड उंच , तिला बघता क्षणी मला वाटून गेलं कि हीच ती जिच्याशी लग्न करायचंय मला !!
“खुळा आहेस का तु अभ्या ? “ विभव मला विचारत होता , कुठं दिसली तुला ती ?
“साईट वर जाताना , वाढाणे - जोगवाडी , च्या रस्त्यावर ती दिसली मला , खुराड्यातून बाहेर पळून अचानक तिची कोंबडी आमच्या गाडीच्या पुढे आली म्हणून ती जोरात पळत आली आणि आपल्या कोंबडीला पटकन उचलून छातीशी धरत , आमच्याकडे हसून बघत ती आत घरात पळाली , तिथंच कलेजा खल्लास झाला आपला यार विभ्या !... “
विभवला मी हे सांगताच त्याने कपाळावर हात मारून घेतला , “ होपेलेस आहेस एक नंबरचा अभ्या तू , अरे दिसायला चांगली असेल म्हणून काय झालं , कुठं तु , कुठं ती ? एकापेक्षा एक सरस , उच्चशिक्षित , गल्लेलठ्ठ पगार मिळवणाऱ्या मुली सांगून येताहेत तुला , आणि तुला कोण आवडलं तर हि तलंग कोंबडी !... “ विभव खो खो हसत म्हणाला .
“ विभव यार, चेष्टा नको करूस , खरच मला लग्न करायचंय तिच्याशी …”
“काकूंना सांगितलंस का घरी ? बिनपाण्याने काढतील तुझी .. “
“नाही सांगितलं , पण मम्मी तुला माहिती नाही कशी आहे, तिला आवडो न आवडो , मला आवडली आहे म्हटल्यावर ती काही विचार नाही करणार जास्त , काहीही झालं तरी ती माझ्याबरोबर असते नेहेमी.”
“मग झालं तर , अडचण कशाची म्हणायची? उडवून टाका बार! ..” विभव अजूनही चेष्टेच्या मूडमध्ये होता, त्याला खोटंच वाटत होतं .मी एक उसासा सोडला , तीन दिवसांपूर्वी ती दिसल्या पासून असंच होतंय हो मला , एवढ्या मुली फिरवल्या आजपर्यंत , पण कधी कुणासाठी इतका वेडा नव्हतो झालो , seriously !.. आता उद्याची साईट व्हिझिट विभ्याची , गुरूवारी माझा weekly off म्हणजे थेट शुक्रवारी भेटणार ती मला , तोपर्यँत झोपेचं खोबरं राव !!!...
अभय या शुक्रवारी तू जाणार आहेस ना साईट वर ? आमचा बॉस विचारत होता , “हो सर मीच जाणार आहे , का काही प्रॉब्लेम ? “ “अरे प्रॉब्लेम काही नाही , आज तुझ्याबरोबर येणारी व्यक्ती well known actress आहे मराठीतली , तू सवयीप्रमाणे तिला flirt करायला जाऊ नकोस , “ आमचा बॉस हसत म्हणाला .
मी मनात उसासा टाकून म्हटलं ‘बॉस...आता ऐश्वर्या जरी आली तरी मी flirt करणार नाही , आपल्याकडे आता हार्टच नाही राहिलं ते गेलं त्या ‘तलंग’ कडे , “
तर अशा तऱ्हेने तलंग’ ने आपल्यावर जादू गेली आणि आठवड्यातून सातही दिवस माझ्या फेऱ्या व्हायला लागल्या साईटवर , पण गमंत म्हणजे त्या दिवसानंतर ‘तलंग मला दिसलीच नाही , आता माझं हसणं बोलणं पार बंद झालं , एकच ध्यास लागला ‘तलंग ‘ चा . दोनदा ती ज्या खोपटातून बाहेर पळत आली होती तिथे उगाच पाणी प्यायला जाऊन पण आलो , आणि झोपडीतल्या आंधळ्या म्हातारीशी ढीगभर गप्पा मारून आलो , हळूच ‘तलंग’ चा विषय पण काढला , काय म्हणता डायरेक्ट कसं विचारलं ? नाही हो , समोरच्याला कळू न देता माहिती कशी काढायची हे नाही जमलं तर कसला डोंबलाचा सेल्स मॅनेजर मी , गुंतवून ठेवलं म्हातारीला गप्पांमध्ये , आणि मग हळूच विचारलं , ‘आजी तुम्हाला दिसत नाही , मग एखादी कोंबडी पळून बाहेर रस्त्यावर गेली आणि गाडीखाली आली तर ? “
तेव्हा आजी म्हणाली ,”त्ये आनी कसं हुईल ? नात हाये कि माझी मस चपळ ,धावत जाऊन उचलून आनती . “
“मग आत्ता कुठे आहे ती ? “ मी विचारलं
“रानात गेली हाये, यील कि संध्याकाळ पत्तर . “
“नाव काय तिचं आजी ? “
“तुला कशाला पायजे बाबा तिचं नाव ?”
“अहो भेटली रानात तर धाडतो तिला घरी “
“कल्याणी …. “ असं म्हणून म्हातारी जमिनीवर दोन्ही हात टेकवून उठली आणि चाचपडत काठी घेऊन पाखरांना हुसकायला अंगणात टाकलेल्या वाळवणाकडे गेली . उसासे टाकत मी घरी आलो , चला नाव तर कळालं , प्रगती आहे ‘अभय सरदार’ तुमची , मी स्वतःची पाठ थोपटत म्हणालो.
त्या दिवसापासून रोज साईटवर जायला लागलो, वाढणे- जोगदेव रस्ता आला कि विश्रांती घ्यायला म्हणून गाडी
थांबवायची आणि चहा पिता पिता चौकशा करायच्या.पण कल्याणी परत काही दिसली नाही, असंच एकदा एक गावकरी भेटला, त्याला चहा पाजला ,आणि चौकशा सुरू केल्या,“समोरच्या झोपडीतली आजी एकटीच राहते का हो ? ““नाय बा , पोरगा हाये कि तिचा ,आन नातं बी हाये तिला .”
“ कुठं असती नातं ? “
“बापाबरीबर जाती नव्ह का रानात ? “
“ कल्याणी ? “
“अंगा अशी , तुम्हाला बरीच माहिती दिसतीया म्हातारीची आनी नातीची , काय राव काय ईचार ? “ गावकऱ्याने डोळे बारीक करून, एक भिवई उडवत मला विचारलं ,आणि मी चक्क लाजलो , हे म्हणजे आक्रितच .
“नाय हो , सहज विचारलं , लग्न बिग्नाचा काही विचार नाही का नातीच्या ?”
“हॅहॅहॅ गावकरी हसला , ते आनी कशाला ? अजून आठ तर वर्षांची हाये , मोप टाईम हाय अजून .”
“ऑ SSSSS “ हे काय भलतंच ? आता परत म्हातारीकडे खोपट्यात जाऊन चौकशी करणं आलं , आता ती खट म्हातारी दाद देईल का ? चांगलंच लफडं झालं राव !.. यावेळेस विभ्याला मस्का लावला , नाही नाही म्हणता म्हणता तो दोन बिअर आणि एक नॉनव्हेज वर तयार झाला , विभ्या एक नंबरचा डामचीक आणि खत्रूड आहे . एक ग्रिहाईक पटवता येत नाही त्याला म्हातारी कसली दाद देतीये , आला तोंड वेंगाडून , आता मलाच काहीतरी खटपट केली पाहिजे . गेलो परत साईटवर , तिथून येताना बबन ला सांगून एक कोंबडी मागवली आणि जाताना वाढणे-जोगदेव च्या रस्त्यावर थांबलो , कल्याणीच्या घराच्या दिशेने कोंबडी सोडली , आधीच बाबावरलेली आणि घाबरलेली ती कोंडी पाकपाक करत इकडे तिकडे धावायला लागली , मग मी पळत तिच्या मागे गेलो आणि तिला पकडली , म्हातारी खोपटातून बाहेर आलीच होती , तिच्या हातात कोंबडी देऊन म्हणालो , “घ्या आजी तुमची कोंबडी , आली असती आत्ता गाडीखाली “
“चॅक ...माझी न्हाय हि “ हाताने चाचपडत ती म्हणाली , आता आली का पंचाईत , मी कुठे घरी घेऊन जाऊ कोंबडीला? मम्मी म्हणेल आता कोंबड्या पाळायच्या का मी ? परत नेऊन साईटवर सोडावी म्हणून मी तिच्या हातातून घ्यायला गेलो तशी म्हातारी कोंबडी सोडायला तयार नाही म्हणते कशी ,”आता आलीच हाय आपणहून तर र्हाऊ दे हिथच , “
डॅम्बीस म्हतारी !..
“ आजी तुमची नातं कुठं दिसत नाही , गेली का रानात ? “
“ आत्ताच ग्येली कि सैपाक करत हुती इतका वेळ “
“आठ वर्षाच्या नातीला स्वयंपाक येतो ? “ मी पण डामचीक पणे विचारलं .
“आठ कुठली मस अठरा वर्षाची हाये , सगळी कामं करती कि ,आता लग्नाला आली नव्ह का ? तू आनि का बाबा चौकशा करतुयास नातीच्या माझ्या ? “
आता मी आनंदलो , बागडलो , म्हातारीच्या पुढ्यात मांडी घालून बसलो , “आजी मला लग्न करायचंय तुमच्या नातीशी .तुमच्या नातीला मी खूप सुखात ठेवीन . मी एक चांगल्या घरातला , कमावता चांगला मुलगा आहे ,“ मी उगाचच केसावरून शक्यतो पुढचं झुलुप न विस्कटता हात फिरवत, सभ्य चेहरा करत म्हणालो .
म्हातारी विचारात पडली , संध्याकाळी तिचा बा आला कि बोलते म्हटली आणि मी तरंगत च घरी आलो , मम्मीला सगळं सांगायचं असं ठरवून .. पण मम्मी म्हणजे भारीच आहे आपली , तिला आधीच माझ्या बदललेल्या वागण्यावरून संशय आल्यामुळे तिने विभ्या कडे सगळी चौकशी केलीच होती , विभ्या पण चोंबडला होता तिला सगळं , तर ती त्याच्याबरोबर जाऊन तिकडे चौकशी करून आलेली , फक्त मी आपणहोऊन विषय काढायची वाट बघत होती , तिने तर माझी विकेट च उडवली , मला म्हणते , तुला भास झाला , “कल्याणी नावाची मुलगी लहान आहे आठ वर्षांची .”
मी पैजेवर तिला म्हटलं कि मी आजच म्हातारीशी बोलून आलो , तर मला म्हणते म्हातारीला खूळ लागलंय , असं कस राव म्हातारी खुळी असली तरी मी खुळा नाहीये ना , या या माझ्या डोळ्यांनी पहिली तिला मी , आणि ती तिच्या खोपटात जाईपर्यँत बघत होतो आम्ही एकमेकांना , आणि मम्मी म्हणतीये कि ती नाही ?
आज महिना झाला मी मुक्काम ठोकून आहे म्हातारीच्या खोपटात , मी आणि म्हातारी सोडून सगळे म्हणतायत कि कल्याणी नाही , ती आठ वर्षांची परकरी पोर इकडून तिकडून नाचते माझ्यासमोर , तिचा बाप , मम्मी , गावकरी , विभ्या ,आमचा बॉस , झालंच तर बबन , आशा ताई , ड्रायव्हर ,सगळे आळीपाळीने येऊन मला समजावून सांगतायत ‘कल्याणी ‘ नाही , तिचा बाप तर मला म्हटला की या पोरीच्या जन्माआधी तिला एक मोठी बहीण होती , तिचं नाव कल्याणी होतं ती गेल्यावर १० वर्षांनी हि झाली म्हणून हीच नाव तेच ठेवलं , हिच्यावेळेला बाळंत होताना कल्याणीची आई गेली. मग मला दिसली ती कोण होती ? मी वर्णन केल्यावर तिच्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं , म्हणतो अशीच दिसायची माझी पोर .
शक्यच नाही , मी देव मानत नाही तसं भूतं खेतं हि मानत नाही , ती मला दिसली ,माझ्याकडे बघून हसली आणि याच घरात पळताना मी तिला पाहिलं , ती येईलच कधी ना कधी , असा मला ठाम विश्वास वाटतो , पण या बाकीच्या लोकांमुळे राव कधी कधी बॅलन्स जातो एकदम , वाटतं हे म्हणतात तेच खरं असेल तर ? मग मी असेल नसेल तेवढं बळ एकवटून तिला हाक मारतो , तिला हाक मारतो आणि खूप कळवळून विचारतो ‘कल्याणी खरंच तू अस्तित्वात आहेस ना गं ? “

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली जमली आहे. पण हि कथा खरंच अस्तित्वात आहे का? "संपूर्ण मायबोलीवरचं नवीन लेखन" मधून गायबच झाली अचानक. दुपारी वाचली आता पुन्हा शोधतो शोधतो तर गायब.

छान मांडणी आहे.
ते बाळ एकवटूनबळ करा तेवढ... शेवटची ओळ.

atuldpatil  : योग्य तो बदल केला आहे , आता कदाचित search  करताना लगेच सापडेल . 

पद्म ,Ajnabi,atuldpatil,सिद्धि', सामो , मन्या ऽ : Many Thanks  !.. 

मस्त

भरिये... पण...शेवट.. नाही पटला....फक्त म्हातारी आणि अभ्याला दिसते ती १८ वर्षाची कल्याणी ...आज्जीच समजू शकते..पण ह्याला का दिसावी ह्याच पण उत्तर हवं होत कथेत ..