पुन्हा एकदा

Submitted by Ravi Shenolikar on 21 September, 2019 - 02:48

शेवटची चढण चढून ती कड्याच्या टोकाशी येऊन उभी राहिली. खालच्या खोल दरीत तिने डोकावून पाहिले. बस्स, आता एक उडी आणि संपेल एकदाचे सर्व काही. दारूण निराशा, दु:ख, वेदना....सगळ्याला पूर्णविराम. कायमचा.
तिने मान वर करून पाहिले. अनंत निळे आकाश सर्वदूर पसरले होते. केवढी अफाट आहे ही सृष्टी! थांगच लागत नाही. अंतराळात अशा किती सृष्टी आहेत त्याची गणतीच नाही. क्षितिजापर्यंत तिची नजर जाऊन भिडली. त्या भव्यतेपुढे तिला तिचे दु:ख फार क्षुद्र वाटू लागले. अशी होते का मी? पराभव स्वीकारणारी, पळपुटी? कधीच नाही. संघर्षाला मी कधीच घाबरले नाही. मग आज इथे का आले आहे?
मंद वार्‍याची झुळुक अधूनमधून येऊन सुखावत होती. तिला वाटले, आपण एखाद्या गोष्टीत इतके बुडून जातो, की त्याच्या पलिकडे काही जग आहे हेच विसरायला होते. मनाचे हे घेरलेपण मोडले तर सगळं सोपं होऊन जाईल. तिची चूक तिला आता उमगली होती. त्या विस्तीर्ण भवतालाने तिला काहीतरी शिकवले होते. तिच्या चेहर्‍यावरचे मळभ दूर होऊन प्रसन्न स्मित झळकू लागले. आत्मविश्वासाने ती मागे वळून चालू लागली....पुन्हा एकदा.....जीवनाकडे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार छान!

आपण एखाद्या गोष्टीत इतके बुडून जातो, की त्याच्या पलिकडे काही जग आहे हेच विसरायला होते.>>> अगदी खरंय!

सकारात्मक आहे कथा, आवडली.

आपण झापड लाउन फिरतो आणि जग संकुचित करुन बसतो, कोते करुन बसतो - हे सत्य आहे. माझी एक मैत्रीण आहे ती अनुभवसंपन्न तर आहेच पण इतरांचे सुख्स-दु:ख निरखण्याची क्षमता, कौशल्य आहे तिच्याकडे. तिच्याशी बोलून फार शांती मिळते.
बरेचदा आपल्याला वाटत असतं किती सुखी आहेत सारेजण, कोणाला दु:ख च नाही. पण दु:ख प्रत्येकाला कमी-अधिक प्रमाणात आहे.

व्वा!