खरेच सार्वजनिक गणेशोत्सव बन्द झाला पाहिजे.

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 September, 2019 - 13:29

खरेच सार्वजनिक गणेशोत्सव बन्द झाला पाहिजे.

>>>>>

मायबोलीवर आज हे वाक्य वाचले.
आणि असं वाटले कोणीतरी माझ्या छातीत खंजीर खुपसतेय..

क्षणभरात लहानपणीच्या शेकडो आठवणी डोळ्यासमोर तरळून गेल्या.
मला आठवतेय मी चौथीत होतो. आमच्या बाळ गोपाळ मित्रमंडळाने ठरवले गणपती आणायचा. मोठ्यांनी विरोध केला. आम्ही पुन्हा ठरवले, आता तर आणायचा म्हणजे आणायचाच. वयाने सर्वात मोठा मुलगा जो सहावीत होता तो अध्यक्ष झाला. सर्वात गुणी मुलाला सेक्रेटरी केले. मी गणितात हुशार म्हणून मी हिशोब सांभाळणारा खजिनदार झालो. बाकीच्यांनीही आपापल्या जबाबदारया वाटून घेतल्या. वर्गणी जमा करण्यापासून, स्पॉन्सर शोधणे, सजावट करणे, लाईट स्पीकर, वाजतगाजत मुर्ती आणने, तिची पाचसहा दिवस पूजा अर्चा, आरती भजन, आम्हीच बसवलेले मनोरंजनाचे कार्यक्रम ते अखेर ईतर घरगुती गणपतींसोबत वाजत गाजत विसर्जन.. सगळं काही धमाल मौजमस्तीत यथासांग पार पडले.
बरंच चुकलो, बरंच शिकलो..
शिव्याही बरेच खाल्या.. सांभाळून घेणारेही बरेच भेटले..
पण सगळं काही झाल्यावर एक जबाबदारी घेऊन ती ईतक्या मोठ्या उत्साहात निभावली, खेळतानाचे आपापसातले हेवेदावे सोडत एकत्र येत एकजूट दाखवत एक कार्य पार पाडले, यातून जे समाधान मिळाले ते निव्वळ अनुभवायचीच गोष्ट.

आज काही ठिकाणी या सणाला ओंगळ स्वरूप प्राप्त झालेही असेल. पण ते आणखी कश्याला झाले नाही. सणांचेच का घेऊन बसलात. या कारणास्तव आजवर कधी दारूचे बार बंदच करा असा ओरडा मी ऐकला नाही. की तिथे तेच अपेक्षितच असते म्हणून सूट. आणि सण मात्र काटेकोरपणे संस्कृती पाळूनच झाले पाहिजे. तिथे धांगडधिंगा जराही खपवून घेतला जाणार नाही हा अट्टाहास... असे आहे का?
जिथे काही गैर घडत असेल तिथे नियम लावा, मूळावरच घाव कश्यासाठी??

मी नास्तिक आहे. पण सणांचे महत्व जाणतो. आयुष्यातल्या बालपणीच्या ज्या काही सुखद आठवणी आहेत त्यात या सणांचाच वाटा मोठा आहे. आणि हा आनंद हे सण घरच्याघरी साजरे करून खचितच मिळाला असता. मी स्वत:ला याबाबत फार नशीबवान समजतो की माझे अखंड बालपण दक्षिण मुंबईतील मोकळ्याढाकळ्या वातावरणात गेले. जिथे गणपती रंगपंचमी नवरात्र हंडी होळी दिवाळी सारेच सण एकत्र येतच साजरे झाले. त्यामुळे काही गैरप्रकारांकडे बोट दाखवत हा आनंद येत्या पिढीपासून हिराऊन घ्यावे असे वाटत नाही.

टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव ज्या कारणासाठी सुरू केले त्याची गरज येत्या काळात आणखी जास्त आहे. लोकं प्रत्यक्ष आयुष्यात कमी आणि सोशलसाईटवरच सोशल होऊ लागलेत. त्यांना हे सार्वजनिक गणोशोत्सवासारखे सण एकत्र आणू शकतात. अन्यथा मराठी संकेत्स्थळावर ऑनलाईन सार्वजनिक गणेश्प्त्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यातच धन्यता मानावी लागेल Sad

चूकभूलघ्यावीद्यावी
ऋन्मेष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

च्रप्स कॉमेंट तुमची असली तरी या विचारांचे आणि मताचे बरेच जण त्या धाग्यावर दिसले.. त्या सर्वांशीच संवाद साधायचा आहे. Happy

काय सुष्ट काय अनिष्ट - कोण ठरवणार? Sad
सध्या काय होतय गणेशोत्सवात, काय होते याची मला ऐकीव माहीतीच आहे. कारण मला गणेशोत्सव पाहून १५ वर्षे झाली आहेत. पण बाबांची काळजी वाटते, वाट्तं त्यांना आवाज, दणदणाट सोसत असेल का? फोनवर बाबा म्हणतात "ऑल इज वेल" पण तरीही
.
हां, लहान मुलांचे बालपण, मजा, गंमती हरवू नये हे देखील वाटते.
अतिरेक टाळला पाहीजे. आपली आपल्याला शिस्त असली की मग कोणालाच काही सांगावे लागत नाही. ( याचा अर्थ मला शिस्त आहे असा मुळीच नाही बर्का Wink )
.
एक सिव्हिक सेन्स मात्र हवा. भारतीय समाज उत्सवप्रिय आहे हे कौतुकास्पदच आहे. पण काहीतरी शिस्त हवीच. स्पेशली ज्ये.ना./ लहान बाळं/ प्राणीपक्षी .... यांचाही विचार व्हावा.

सार्वजनिक गणेशोत्सव व्हायलाच हवा. याला अनुमोदन.
संस्कृती आहे ती आपली.
आजकाल या सणांना लोकांनी विकृत रंग दिला आहे, हे ही खरे. डिजे बंद व्हायला हवा वगैरे आहेच. पण त्याहूनही महत्त्वाचे मूर्ती विसर्जन. मूर्ती विसर्जन परिसर दुषित करते. केवळ pop नाही तर शाडूची मूर्तीसुद्धा eco friendly नाही. गाळ बनून ती नदीत साचून राहते. (शाडू माती पाण्यात विरघळत नाही.)
मूर्तीचे विषारी रंग/केमिकल्स नदी प्रवाहात वाहून शेतात जातात आणि पिकांमध्ये पाण्यासोबत शोषले जातात. शेवटी पुन्हा आपल्याच पोटात जातात.

खूप मोठा मुद्दा आहे. पण यावर नुसती चर्चा होते आणि पुन्हा सगळे (जैसे थे च !) मूर्ती विकत घेऊन pop किंवा शाडूची (हिला eco friendly मानून) तिचे विसर्जन करून नदी आणि अप्रत्यक्षपणे आपलेच अन्न दूषित करतात.

खरतर मूर्ती मातीची (साध्या मातीची) बनवावी. आणि विसर्जन कुंडीत करावे. अन्यथा काही खरोखर पर्यावरणाच्या दृष्टीने सुलभ पर्याय निवडावा.

हे मा वै म

सार्वजनिक गणेशोत्सव बंद करणे शक्य नाही, आणि झालेही नाही पाहिजे! पण एक गोष्ट आहे ती म्हणजे, रस्त्याचा विचार न करता, सार्वजनिक ठिकाणी उभे करणारे गणपती मांडव. आता हे मुंबई सारख्या शहरात तर माहिती नाही पण छोट्या गावात नियम ढाब्यावर बसवून सर्रास रस्त्यावर गणेश मांडव बांधले जातात.

महाकाय मुर्तींचे विसर्जन कसे करतात? कशा विरघळतात त्या?

आयुष्यातल्या बालपणीच्या ज्या काही सुखद आठवणी आहेत त्यात या सणांचाच वाटा मोठा आहे >> खुप अनुमोदन.

अशा वेळी दारु पिवुन नाचण्याची मजाच काही और आहे- नो डिस्को ऑर पब क्यान म्याच इट !!!

टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव ज्या कारणासाठी सुरू केले त्याची गरज येत्या काळात आणखी जास्त आहे. लोकं प्रत्यक्ष आयुष्यात कमी आणि सोशलसाईटवरच सोशल होऊ लागलेत. त्यांना हे सार्वजनिक गणोशोत्सवासारखे सण एकत्र आणू शकतात>>>>

पूर्णपणे सहमत. त्यासाठी आमची मूर्ती मुंबईत सर्वात उंच वगैरे नौटंकी, झुंडीनी लोकांनी येऊन केवळ मिनीटभराचे दर्शन घेण्यासाठी रांगा लावण्याचा इव्हेंट करणे वगैरे बंद करा. लक्ष गणपतीवरून हटवा व ते लोकांवर न्या. परिसरातील लोक कसे सोशल होतील यावर लक्ष द्या. 10 दिवस स्पीकरवर बाबुराव फॅमिली ऐकून व 11 व्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत नाचून लोक सोशल होतात हें विचार डोक्यातून हटवा.

अन्यथा हा इव्हेंट बंद करा. सध्या जे सुरू आहे त्याला मी तरी उत्सव म्हणणार नाही.

रस्त्याचा विचार न करता, सार्वजनिक ठिकाणी उभे करणारे गणपती मांडव>>>

नव्या मुंबईत गेले 4 5 वर्षे बंद झाले हे प्रकार.

सार्वजनिक गणेशोत्सव व्हायलाच हवा. याला अनुमोदन.
संस्कृती आहे ती आपली>>>>

सार्वजनिक गणेशोत्सव ही कोणाचीच संस्कृती नाही. साध्या मातीची साधी मूर्ती करून जयंतीच्या दिवशी स्वतःच्या घरात पूजन व दुसऱ्या दिवशी विसर्जन ही संस्कृती आहे.

ही घरातील खासगी संस्कृती लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक केली, त्या योगे गल्लीतील लोक एकत्र येतील व त्यांना त्यांच्या पारतंत्राविषयी चार गोष्टी सांगता येतील म्हणून. सभा आयोजित करून लोकांना बोलवून स्वातंत्र्याच्या गोष्टी सांगण्यावर इंग्रज सरकारचे कडक लक्ष असायचे म्हणून हे धार्मिक निमित्त देऊन लोक गोळा केले जात. हे निमित्ताचे प्रयोजन संपले तेव्हा गणपती सार्वजनिक कारायचेही प्रयोजन संपले.

साध्या मातीच्या साध्या मूर्तीचेही विकृतीकरण होऊन संस्कृतीची विकृती झालेली आहे.

मातीची साधी मूर्ती करून जयंतीच्या दिवशी स्वतःच्या घरात पूजन व दुसऱ्या दिवशी विसर्जन ही संस्कृती आहे. >>> जयंती कुणाची साधना? तू माघी गणपती बद्दल म्हणतेयस का?

हे निमित्ताचे प्रयोजन संपले तेव्हा गणपती सार्वजनिक कारायचेही प्रयोजन संपले.>>>>> अजूनही लोकांनी डिस्कस करावेत असे अनेक टॉपिक आहेत. पण सद्ध्या लोकांना कुठे वेळ असतो काही ऐकून घ्यायला किंवा सांगायला? सगळे प्रॅक्टिकली व्यस्त असतात कामात. पण त्याकाळी सार्वजनिक गणेशोत्सव हा पायंडा पडला आणि तो सर्वांनी आजतागायत सुरु ठेवला. म्हणून मी त्यालाही संस्कृती म्हणाले.
निदान त्या निमित्ताने एकाच एरियात राहणाऱ्या लोकांना एकमेकांची ओळख होते, निदान चेहरे दिसतात. शेजारधर्म वगैरे सोडा पण आजकाल लोकांना शेजारी कोण राहते हे ही माहिती नसते धावपळीच्या जिवनात. त्यामुळे गणेशोत्सव व्हावा.

हे मा वै म

नदीकाठच्या मातीची/कोणत्याही मातीची 7 दिवस तोड फोड न होता टिकेल अशी आणि चांगली दिसेल अशी पार्थिव गणेशाची प्रोफेशनल मूर्ती:
हे प्रत्येकाला शक्य आहे का?आणि आता नद्या आणि काठावरचा गाळ बघता त्या मूर्तीचे कंटेंट अत्यंत त्याज्य अश्या वस्तू असू शकतील असे वाटते.
शाडू सुद्धा म्हणावा तितका चांगला नाही.गेली काही वर्षे लोक शेणाच्या/कागदाच्या लगद्याच्या मूर्ती विकतात.लोक घेतही असावे.पण अजूनही माईंडसेट 'शेणाची गणेशमूर्ती नको' असा आहे.
आता सीड गणेश विकतात, म्हणजे विसर्जन रिकाम्या कुंडीत करून त्या बी चे झाड येईल ती कल्पना आवडते.यावेळी सीड गणेश उशिरा पाहिले त्यामुळे घेता आले नाही.शिवाय किमती बऱ्याच महाग आहेत.(सीड राखी 300 की काहीतरी होती, गणपती 3000).पुढच्या वर्षी वेळेत शोध करून परवडणारा सीड गणेश आणण्याचा विचार आहे.)
बाकी मंडळं, प्रत्येकाचा वेगळा गणपती हा हौसेचा भाग आहे.वेगळे मंडप न घालता असलेल्या हॉल/देवळात मूर्ती स्थापन करून हा उत्सव करायला लावला पाहिजे.एकंदर गणपतीतला उत्साह बघता 'इतके गणपती बसवू नका,गावात एकच बसवा' सांगणे आणि त्याची अंमलबजावणी दोन्ही अवघड आहे.
मंडप रस्त्यात नको, वाहतुकीला अडथळा नको,येणाऱ्या पब्लिकने भर रस्त्यात भल्यामोठ्या गाड्या लावून दर्शनाला जाऊ नये इतक्या अपेक्षा पूर्ण झाल्या तरी भरपूर.

सर्व देशांचे स्वतःचे सांस्कृतिक उत्सव असतात आणि ते दणक्यात साजरे केले जातात .
इतिहास काय आहे ते विसरा पण आता गणेश उत्सव नी सांस्कृतिक उत्सवाचे स्थान घेतले आहे आणि हा उत्सव मराठी संस्कृती शी जोडला गेला आहे .
त्या मध्ये त्रुटी जरूर आहेत त्या मान्य सुधा आहेत .
१) रस्त्यावर मंडप आल्या मुळे वाहतुकीला अडचण.
२) गणेश मूर्ती मुळे होणारे पाण्याच्या साठ्याच प्रदूषण.
३), विसर्जन दिवशी भक्ता कडून चौपाटी वर होणारा कचरा .
हे मुख्य आक्षेप आहेत.
गल्ली बोळातून असलेल्या सार्वजनिक मंडळांचे विलीनीकरण करून प्रतेक भागात एकाच मंडळ असावे आणि तिथे भव्य प्रमाणात उत्सव साजरा करावा .
एकच मंडळ असेल तर सरकार जागा निश्चित करून देवू शकते .
त्या मुळे मुंबई किंवा पुण्या सारख्या शहरातील मंडळांची संख्या कमी होईल पण उत्सव चे भव्य पना टिकून राहील .
मुर्त्या ह्या शाडू chya मातीच्या न बनवता पर्यावरण फ्रेंडली वस्तू पासून बनवाव्यात .
जमलं तर रंग सुधा कृत्रिम वापरू नयेत .
विसर्जन दिवशी सर्वांनी एक थैली बरोबर ठेवावी आणि होणारा कचरा जमा करून कचरा कुंडीत टाकावा .
पण उत्सव बंद करा ही मागणी अवास्तव आहे .
उत्सव हे समाजाच्या जिवंत पणाचे लक्षण आहे .
कसलेच उत्सव नसलेला समाज मृत समाजच संबोधला पाहिजे .

प्रभाकर नानावटी चे ते स्वतःचे विचार आहेत पण त्यांना ते सांगायचे आहे ते योग्य आहे आणि समाजानी त्याचा स्वीकार करावा असे त्यांचे मत असेल तर चुकीचे आहे .
ती विचाराची दृष्टी त्यांची वयक्तिक आहे .ती बरोबर आहे असे समजायचे काही कारण नाही
Hamar कल्चर चे लेखक संशोधक असले तरी ते स्वतः ला सर्व ज्ञानी समजत असतील तर त्यांचा तो सर्वात मोठा गैर समज आहे .

टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव ज्या कारणासाठी सुरू केले त्याची गरज येत्या काळात आणखी जास्त आहे. लोकं प्रत्यक्ष आयुष्यात कमी आणि सोशलसाईटवरच सोशल होऊ लागलेत. त्यांना हे सार्वजनिक गणोशोत्सवासारखे सण एकत्र आणू शकतात. अन्यथा मराठी संकेत्स्थळावर ऑनलाईन सार्वजनिक गणेश्प्त्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यातच धन्यता मानावी लागेल Sad>>>+१
उत्सव हे समाजाच्या जिवंत पणाचे लक्षण आहे .>>>+१

आपल्या सर्वांच्याच बालपणीच्या गणेशोत्सवाच्या रम्य आठवणी आहेत. तो निखळ आनंद पुड्।अच्या पिड्।ईकडे पोचता व्हावा असे मनापासून वाटते. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव बंद न करता ज्या त्रासदायक बाबी आहेत त्यासाठी नियम कडक करण्याची गरज आहे.

मूळ धाग्यातल्या बालपणीच्या आठवणी या 'सार्वजनिक गणेशोत्सव'च्या आहेत का?
आणि सोसायटी, चाळीत साजरे होणारे उत्सव बंद करा अशी मागणी कोणी करतंय का?

> Submitted by Rajesh188 on 20 September, 2019 - 13:29 > सुचवण्या चांगल्या आहेत.
प्रत्येक भागात एकतरी मंदिर असण्याची शक्यता आहे. जर मंदिरातच उत्सव साजरा केला तर > एकच मंडळ असेल तर सरकार जागा निश्चित करून देवू शकते .> परत वेगळ्या जागेची गरज पडणार नाही.

मूळ धाग्यातल्या बालपणीच्या आठवणी या 'सार्वजनिक गणेशोत्सव'च्या आहेत का?
>>>

हो
बिल्डींगमधील मुलांनी एकत्र येत बिल्डींगच्या आवारात गणपती स्थापन केला. बिल्डींगबाहेरूनही वर्गणी जमा केलेली. आणि बाहेरचे लोकंही दर्शन घेऊन गेले.
फक्त गणपती ११ दिवसांचा नसून गौरीविसर्जनाला बिल्डींगमधील ईतर गणपतींसोबत भाऊच्या धक्याला समुद्रात विसर्जित केला.
सलग तीन वर्षे गणपती बसवून मोठ्यांच्या विनंतीला मान देत थांबलो. शेवटच्या वर्षी शेवटच्या दिवशी शेवटचा निरोप देताना त्या वयात काय वाटले होते हे सांगू शकत नाही. आज आता ही पोस्ट लिहितानाही डोळ्यात पाणी आहे ..

सार्वजनिक गणेशोत्सव ही कोणाचीच संस्कृती नाही. साध्या मातीची साधी मूर्ती करून जयंतीच्या दिवशी स्वतःच्या घरात पूजन व दुसऱ्या दिवशी विसर्जन ही संस्कृती आहे.
>>>>

कश्याला संस्कृती म्हणायचे आणि कश्याला नाही याचे निकष काय आहेत?
किंवा आपण कुठल्या संदर्भाच्या आधारे वरची संस्कृती नमूद केली आहे?

हे मी आपला मुद्दा खोडत नाहीये तर ज्ञानात भर घालायला विचारत आहे.
कोणीही उत्तर द्यावे.

जगणं निरस नि एकसूरी नको व्हायला म्हणून ऋतूमानानुसार पुर्वजांनी सण, समारंभ,उत्सव यांची परंपरा घालून दिली. संस्कार होत होत पुढे परंपरांची संस्कृती तयार झाली.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रयोजन संपलेले आहे ( आता लोकांना जमा करण्यासाठी व तसे जमा करुन त्याना काहीतरी "ध्येय" देण्यासाठी सर्वजनीक गणेशोत्सवाची गरज नाही) त्यामुळे तो बंद व्हायलाच हवा.

परन्तु लोकाग्रहास्तव यात सुट द्यायचीच असेल तर केवळ १९४७ पुर्वीपासुन जे मोजके सार्वजनीक गणपती आहेत, तेच फक्त चालु द्यावेत. कारण ते अशा सार्वजनीक गणेशोत्सवाच्या प्रयोजनाचे प्रतिनिधीत्व करतात.

माझं तर उलट म्हणणं आहे.

सगळ्यांनी हौसेखातर घरोघरी बसवलेले बाप्पा उठवा, सार्वजनिक गणपती उठवा आणि एका परीसरात एकच गणपती बसवा. आपापल्या घरून बाप्पासाठी प्रसाद आणा दिवस-वेळ ठरवून. वर्गणीतुन सीड गणेश आणा आणि उरलेल्या पैश्यातून आजूबाजूच्या शाळेतल्या गरजू आणि हुशार मुलांना प्रायोजित करा. पालिकेच्या शाळेत मराठी/हिंदी/गुजराथी/उर्दू माध्यम शाळांना काही मदत हवी असल्यास द्या. अपंग शाळा, जिद्द शाळा अश्या ठिकाणी भरीव मदत करा.

मला तर वीट आलाय, " हमने इस साल बाप्पा बिठाया है! " ऐकायचा! बाप्पा काय टॉम्या आहे? सिट टॉमी सिट! श्रद्धेच्या नावाखाली शोऑफ! सगळ्यांनी ड्रेस / साड्या मिरवत जायचं एकमेकांकडे, पाव पाव किलो मिठाई घेऊन! तिथे दुसर्‍या हलवायाकडचा तय्यार डिश खाऊ खायचा. बाकी बाप्पा राहिला साईडला. मी कितीचे मोदक घेतले, माझ्या डिशमध्ये काय होतं, मी कितीची साडी घेतली एवढंच. चुकून एकाद दोघे आरती नीट म्हणतात. चाल आणि शब्द, दोघेही वेळोवेळी शहीद!

बरं सगळे डायेटवाले, काय करायचं मग मिठायांच?

वैताग नुसता!

गणेश मित्रमंडळ तर अजुन दिव्य! दिवसभर तिथे कोणी नसत, आमचा इथला राजा नि आमचा तिथला राजा. बरं मनोरंजन तरी दर्जेदार करा, नाही!
सगळे जण वर्गणी काढा नि आणा एकादं नाटक तीन दिवस, २ शोज रोज. फ्री! एकाद्या उत्तम चित्रपटाचा शो ठेवा, पूर्ण पाच दिवस किंवा एरीयातले लोककलाकार, कालेजातली पथनाट्य पथकं, एकपात्री, कथ्थक, मणीपुरी, ओडीसी असे कलाकार. त्यांनाही व्यासपीठ! त्यांचे पोषाख वै स्पॉन्सर करा. त्यातून रोजगार सुद्धा!

जाऊ द्या, इथे कळफलक बडवून काही साध्य होणार नाही!

>>बरं सगळे डायेटवाले, काय करायचं मग मिठायांच? >> फक्त नवर्‍यांची चंगळ न काय Sad (ते ओठांचा तिरका चंबू करुन नाक असं विचित्र करतात ती बाहुली कल्पावी)

कोणाला कशाचा त्रास होईल ते काही सांगता येत नाही .
मध्ये पुण्या मधील एका बाई का कोंबड्याच्या आरवण्याचा त्रास होत होता .
फ्रान्स की कोणत्या देशात सुधा कोंबड्या च्या आरवण्याच्या त्रास होत होता केस कोर्टात गेली आणि कोर्टाने आरवणे हा कोंबड्याच्या जन्म सिद्ध हक्क आहे असे सांगितलं

Pages