परीची दुनिया (भाग ६)

Submitted by nimita on 16 September, 2019 - 13:55

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक कोणीतरी काकू खोलीत आली. परीला पाळण्यातून उचलून घेत ती तिच्या आईला म्हणाली," ताई, बेबीला bcg द्यायचंय ना ...घेऊन जाते नर्स कडे." आणि परीच्या काही लक्षात येईपर्यंत ती चक्क चक्क परीला बाहेर घेऊन जायला लागली. "आईला सोडून मी नाही येणार," परीनी हळूच आपला निषेध नोंदवायचा प्रयत्न केला. पण ती काकू ऐकतच नव्हती. मग नाईलाजानी परीला आपला तार सप्तकातला सूर लावायला लागला. ती काकू काही बोलणार तेवढ्यात आई आलीच. परीला आपल्या कुशीत घेत म्हणाली, " मी आणते तिला,तुम्ही व्हा पुढे."

आईच्या कुशीत गुरफटून परी विसावली. पण थोड्याच वेळात आजूबाजूला बरेच आवाज ऐकू यायला लागले. तिनी डोळे उघडून बघितलं तर आईच्या चेहेऱ्यावर काळजी दिसत होती. "आई ला एवढं टेन्शन का आलंय? ती माझ्याबरोबर असली की मला तर कधीच कुठलं टेन्शन नसतं? किती सुरक्षित वाटतं तिच्या कुशीत आलं की ! पण मग माझ्यासारखीच तिची पण आई असेल का? तिला पण तिच्या आईच्या कुशीत छान वाटत असेल का?" परीची विचारचक्रं सुरू झाली." पण मग अजून तिची आई का नाही आली? मला थोडंसं जरी बरं वाटत नसेल तरी माझ्या आईला बरोब्बर कळतं आणि ती लगेच येऊन मला कुशीत घेते. मग हिच्या आईला का नाही कळलं अजून ?" परीनी मान वळवून आजूबाजूला बघायचा प्रयत्न केला. तिच्यासारखीच अजूनही दोन तीन बाळं होती त्यांच्या आयांबरोबर... आणि परवाच्या त्या 'टुचुक' वाल्या काकू पण दिसल्या तिला. त्यांना बघून तिला एकदम शोनू आणि त्याचं रडणं आठवलं. "अरेच्या, आता मला पण देणार वाटतं ते 'टुचुक' का काय ते! खूप दुखलं होतं शोनूला, म्हणूनच आईला टेन्शन आलं असेल का? मला दुखेल म्हणून ? अगं आई, पण आत्तापासूनच कशाला घाबरतीयेस ? जर दुखलं तर बघूया ना मग !" परीच्या मनात एकदम तिच्या आईबद्दल खूपच प्रेम उफाळून आलं.." मला दुखेल की काय - या नुसत्या कल्पनेनीच आईला किती त्रास होतोय !" तिच्याही नकळत तिनी दुपट्यातून हात बाहेर काढला आणि आईच्या हातावर ठेवला. आईनी पण तितक्याच सहजपणे परीचा तो इवलासा हात आपल्या ओठांशी नेला आणि परीकडे बघून ती कसनुसं हसली.

तेवढ्यात त्या टुचुक काकूंनी हाक मारली आणि आई परीला घेऊन त्यांच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसली. आईच्या चेहेऱ्यावरची चलबिचल वाढली होती - "थोडं हळू हं," आईनी काकूंना सांगितल्याचं परीला ऐकू आलं. "अहो ताई, कशाला एवढं टेन्शन घेताय? इंजेक्शन देणार म्हटलं की थोडं दुखणारच . आम्हाला पण नाही आवडत हो लहान बाळांना असं रडवायला.... पण काय करणार; त्यांच्या भविष्यासाठी हे करावं लागतं!" त्या टुचुक काकू एकीकडे इंजेक्शन ची तयारी करत करत आईशी बोलत होत्या. परी पण लक्ष देऊन ऐकत होती. पण तिला नीट समजतच नव्हतं.. 'इंजेक्शन काय असतं ? शोनू तर म्हणाला होता की टुचुक करतात! म्हणजे मला दोन वेळा दुखणार की काय ? एकदा टुचुक आणि एकदा इंजेक्शन !! आणि भविष्य म्हणजे ? हे सगळे मोठे लोक किती अवघड अवघड शब्द वापरतात!" परीचे विचार चालूच होते तेवढ्यात तिला कुठेतरी काहीतरी टोचलं... एकदम जोरात....कित्ती दुखलं तिला! साहजिकच तिनी एक निषेधाचा 'टँ sss' लावला - चांगला दमदार ! आत्ता कळलं तिला - त्या दिवशी शोनू का रडत होता ते. पण परी सूर पकडेपर्यंत ते दुखायचं थांबून गेलं ; त्यामुळे मग परीचं रडणं देखील थांबलं. ते बघून टुचुक काकू आईला म्हणाल्या," अरे वा! एकदम शूरवीर आहे की तुमची मुलगी ! सुई बाहेर काढल्यावर लगेच गप्प झाली!!" त्यांनी केलेलं कौतुक ऐकून परीची आई खूप खुश झाली. परीला घट्ट जवळ घेत तिनी परीच्या कपाळावर आपले ओठ टेकले....आईकडून अचानक होणाऱ्या या प्रेमाच्या वर्षावामुळे परी पण एकदम खुश झाली आणि आईला हसताना बघून ती पण खुदकन हसली .

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users