सोळा आण्याच्या गोष्टी - धाप -आशिका

Submitted by आशिका on 14 September, 2019 - 22:43

धाप लागली होती तिला, दरदरुन घाम फुटला होता आणि थकवाही जाणवत होता. घशाला कोरड पडत होती. अस्वस्थता, अशक्तपणा क्षणाक्षणाला वाढत चालला होता. डोळ्यांपुढे अंधारुन येऊ लागलं.

अवतीभवती बरीच हालचाल तिला जाणवत होती. ते लोकही शर्थीचे प्रयत्न करत होते, तिला या प्रसंगातही आश्वस्त करत होते, आधार देत होते.

काय होणार आता? इथेच संपणार का सारं? या जाणीवेने ती सुन्न झाली. सुहृदांचे चेहरे डोळ्यांसमोर फेर धरु लागले. भावुक झाली ती. आता श्वासही अडकू लागला.

इतक्यात......

मिटणार्‍या डोळ्यांसमोर तिला आकडा दिसला ९९९९……..

त्या क्षणी सारा त्रास नाहीसा झाला.

ध्येय दॄष्टीपथात आले होते.

दहा हजार पायर्‍या चढून ती गिरनार पर्वतावरील दत्तगुरुंच्या पादुकांसमोर उभी होती....

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults