चंद्र अर्धा राहिला - कुशस्थळीहून आलेला पाहुणा - पायस

Submitted by पायस on 10 September, 2019 - 01:11

२१ मार्च २०१९
वेळः अंदाजे पहाटेचे साडेपाच
स्थळः कोचीपासून काही अंतरावरील सागरकिनारा

"वेळ काय दिली आहे रे वेधशाळेने?"
"चंद्रास्त ५:५० ला आहे. त्यानंतर १ तास सोल्युनार पिरिअड सुरु होईल. त्या वेळात भरपूर मासे मिळतील. दुसरा स्लॉट मग दुपारी बारा ते दोन मध्ये आहे."
"तो नाही परवडायचा. आधीच उकाडा, त्यात सूर्य डोक्यावर आल्यानंतर आपली बिकट अवस्था होईल."
"अरे आवरा पोरांनो! परत भरती यायच्या आत चटाचटा काम उरकलं पाहिजे. परत बाजार वेळेत गाठायचा आहे."
"अजून वीस मिनिटे आहेत आजोबा ...."
वयस्कर, अनुभवी बोल नव्या शास्त्रोक्त मासेमारांना घाई करायला सांगत होते आणि शास्त्रीय पद्धतीवर भक्कम विश्वास असलेल्या नवीन पिढीला त्या घाईमागचे कारण समजत नव्हते. आता अचानक भरती तर येऊ शकत नाही. होऊन होऊन काय होईल?

धडाम्!!
छप्पाक्!!!

दूर अंतरावर समुद्रात आग लागल्यासारखी वाटत होती. सगळे एकमेकांकडे टकामका पाहत राहिले. हे प्रकरण निस्तरणे त्यांच्या क्षमतेच्या बाहेरचे होते. यासाठी आयसीजीला फोन लावणे गरजेचे होते. पण त्यांना हे ठाऊक नव्हते की हे प्रकरण आयसीजीलाही झेपण्यासारखे नव्हते.

*****

२३ एप्रिल २०१९
वेळः साखरझोपेची
स्थळः पुणे

जेव्हा त्याचा फोन खणाणला तेव्हा कौशिक मुखर्जीच्या डोळ्यांवर अजूनही झोप रेंगाळत होती. झोपेतही फोन घेण्याचे एक विलक्षण कसब त्याच्याकडे होते. सविताच्या मते या कलेच्या जोरावरच तिचा नवरा कामावर टिकून होता. किलकिल्या डोळ्यांनी त्याने फोन बघितला - रवि कश्यप कॉलिंग. बोका, मनातल्या मनात रवि कश्यपचा उद्धार करत कौशिकने निद्रादेवीचा आसरा घेतला आणि कॉल घेतला.
"हॅलो, कौशिक. झोपमोड केल्याबद्दल सॉरी, पण कामच तसं आहे."
"काय काम आहे?"
"असं फोनवर नाही सांगता येणार. तू इथे ये मग बोलू."
"इथे म्हणजे कुठे?"
"अजून कुठे असणार मी? आयुकात ये."
"बरं. भेटू."
"ए थांब फोन नको ठेऊ. आत्ताच्या आत्ता ये इथे."
"बरं. ठीक आहे."
कौशिकने फोन ठेवला आणि त्याने हात शेजारच्या रिकाम्या जागेत टाकला. नवर्‍याला साजेसा दचकून तो जागा झाला. सविता खोलीत नव्हती. धावत तो खोलीबाहेर डोकावला तर सविताने चहाचे आधण टाकले होते.
"रविने मला तुझ्याआधी फोन लावला होता." तिच्या चेहर्‍यावर मिश्किल हसू होते.
बोका... आता सकाळी सकाळी रवि कश्यपचा चेहरा बघण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

*******

"डॅम इट रवि, धिस बेटर बी समथिंग रिअली इंपॉर्टंट!! तुला माहिती आहे की मी आज ऑफ घेतला होता."
"काम डाऊन. कॉफी घे. मी काय म्हणतो ते ऐकून घे आणि मग त्रागा करायचा असला तर कर. नंतर सुब्बुला सुद्धा तोंड दाखवायचं आहे."
सुब्बु म्हणजे आदित्य सुब्रमण्यम. आदित्य खगोलशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. कौशिक आणि रवि त्यांच्या सोबत काम करत होते. रवि भौतिकशास्त्राचा अभ्यासक होता तर कौशिकचा मुख्य विषय गणित होता. त्यांच्या चालू प्रकल्पांमध्ये आदित्य-एल-१ साठी तयार होत असलेल्या सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपचा समावेश होता. इस्रोसोबत सौरमंडळाचा अभ्यास करण्यासाठी नियोजित आदित्य-एल-१ मिशनचा हा टेलिस्कोप एक भाग होता. त्यासंदर्भातली एक डेडलाईन त्यांनी नुकतीच पूर्ण केली होती. आणि इस्रोचे संशोधकही आता चांद्रयान-२ कडे वेध लावून बसले होते. एकंदरीत त्यामुळे कसलेही प्रेसिंग मॅटर्स नव्हते. मग अशावेळी काय काम आले असावे?

"२१ मार्चला एक विशेष गोष्ट घडली. तुझ्या कानावर आलं असेलच."
"काय?"
"तू पेपर वाचत नाहीस का? पेपरमध्येही मोघम बातमी आली होती."
"अरे रवि पेपरवाले सनसनाटी छापायलाच बसले आहेत. त्यांचं कामच आहे ते. सुपरमून होता ना त्यादिवशी? त्यात काय विशेष? वर्षातून एक तरी सुपरमून येतोच. आणि तसंही सुपरमूनची प्रिसाईज व्याख्या आजवर कोणीही दिलेली नाही. मग यंदा काय भविष्यवाण्या छापून आल्या आहेत?"
"झालं?" रविने सोबत आणलेला टाइम्स ऑफ इंडिया उघडला. अगदी बारीक बातमी होती. केरळ किनार्‍याजवळ संशयास्पद हालचाली.
"आज पहाटे सहाच्या सुमारास कोचीपासून काही अंतरावर समुद्रामध्ये संशयास्पद हालचाली नोंदवल्या गेल्या. स्थानिक मासेमार्‍यांनी टेहळणी केल्यावर त्यांना तिथे चकमक झाल्याचे अंश दिसून आले. तसेच एखादे गलबत फुटले असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. झाल्या प्रकाराची आयसीजी (इंडियन कोस्ट गार्ड) शहानिशा करत आहे. या प्रकारामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय आमच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे."
"यासाठी तू मला सकाळी सकाळी बोलावून घेतलंस?" कौशिकचे राजकारणविषयक औदासीन्य प्रसिद्ध होते.
"हो आणि नाही. हा जो कोण वार्ताहर आहे त्याला अर्थातच जरुर तितकीच माहिती पुरवली गेली आहे. कधी नव्हे ते हिंदू, इंडियन एक्सप्रेस अगदी इथले सकाळ आणि महाराष्ट्र टाइम्स सुद्धा यावर मोघम भाष्य करत आहेत."
"मग? तुझा मुद्दा काय आहे?"
"त्यांच्याकडे मोघम भाष्य करण्याखेरीज पर्यायच नाही. आयसीजीला जे काही सापडलं ते शॉकिंग आहे. त्यांना एका वाहनाचे अवशेष सापडले खरे पण ते वाहन जल-स्थल-वायु मार्गांसाठी नाही आहे."
"म्हणजे?"
"आयसीजीला तिथे एक जिवंत माणूस सापडला आहे. या माणसाचा असा दावा आहे की तो समांतर विश्वातून आला आहे आणि ते वाहन एकप्रकारचे टाईम मशीन आहे."

******

"काय पण फेकतोस कुश" सविता ताटं घेता घेता म्हणाली.
"अरे तुझ्या नवर्‍याला एवढा मोठा सन्मान देत आहेत आणि तुला या गप्पा वाटत आहेत?" शुक्तो वाढून घेत कौशिक म्हणाला.
"हत्. कोणीतरी रँडम माणूस सापडतो काय, तो समांतर विश्वातून आला आहे असं सांगतो काय आणि लगेच निघाले सगळे त्याच्यावर विश्वास ठेवायला? बरं हे सर्व पब्लिकपर्यंत पोहोचणार सुद्धा नाही. यात कसला आला आहे सन्मान?"
"हे सर्व आत्ताच षट्कर्णी झालं तर माझी नोकरी जायची पाळी येईल. तू आहेस म्हणून नाहीतर मी कोणालाही एवढं टॉप सीक्रेट सांगितलं नसतं." आपल्या बायकोच्या तोंडात तीळच काय उपवासाचा साबुदाणाही भिजेल याची त्याला खात्री होती.
"त्याची चिंता तुला नको. बरं मग आता काय करणार आहेस?"
"भेटलो सुब्बुला मग. सुब्बु म्हणतो आहे की मी आणि रविने आधी थुंबा गाठायचं. पुढचं तिथे कळवतील."
"रवि काय म्हणतो आहे?"
"तो काय म्हणणार? एकटा जीव! ना आगा ना पीछा! एका पायावर तयार झाला. आता थुंबा गाठल्यावरच कळेल काय ते! इकडची कामं मार्गी लावून पुढच्या महिन्यात जाण्याचा प्लॅन आहे. असो बडबड खूप झाली, आमाके माछ दाओ"
"हूं... आपनी एबम आपनार माछ. पण हा रवि जरा विचित्रच आहे ना? चेहरा असा पांढुरका, फिकट. फारसा कोणात मिसळत नाही. नातेवाईकांचा पत्ता नाही.."
"आता तो अ‍ॅनेमिक आहे यात त्याचा काय दोष? आणि अनाथ असल्यामुळेही कदाचित स्वभाव तसा ... जाऊ दे ना. हे प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावून परतलो की झालं."

*****

थुंबामध्ये दोघेही पूर्वी येऊन गेले होते. त्यांचे संशोधक मित्रही तिथे होतेच. दाक्षिणात्य कॉफीचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांना अतिशय गुप्ततेत एका विशिष्ट ठिकाणी पोहोचवण्यात आले. हे ठिकाण कुठे आहे हे त्यांनाही सांगता आले नसते. इमारतीचे बाह्य स्वरुप अंतर्रचनेशी विसंगत होते. बाहेरून एखाद्या सिनेगॉग सारखी दिसणारी ती इमारत आतून मात्र अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज होती. हिचा वापर नक्की कशासाठी होत असावा याचा अंदाज बांधणे अशक्य होते. विश्रामकक्षात त्यांच्यासाठी केक आणि कॉफी आली. तो केक खाताच दोघांच्या चेहर्‍यावर सुखद आश्चर्य पसरले. पदार्थ केकसारखा दिसत असला तरी चव आणि पोत पनीरचा होता.
"मला केकपेक्षा हा पदार्थच जास्त आवडतो आणि सुदैवाने आमच्या कँटिनच्या आचार्‍याला हा पदार्थ जमतो देखील."
चेक्सचा शर्ट आणि कॉटन जीन्स असा पेहराव केलेली एक स्त्री उभी होती. दोघे उठून उभे राहण्यापूर्वीच तिने दोघांना बसण्याची खूण केली. वयाचा अंदाज येत नसला तरी चाळीशी ओलांडली असावी. ही इथली प्रमुख असावी असे दिसत होते.
"याला छेनापोडा म्हणतात. पनीरमध्ये साखर, वेलची आणि मनुका घालून बनवतात. आता ऑथेंटिक छेनापोडा तर इथे मिळणार नाही पण सरावाने आमचे बल्लवाचार्य यात पारंगत होत चालले आहेत. आवडला?" नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. चहाची किटलीही आली होती. चहाचे घुटके घेत पुढचे संभाषण सुरु झाले.
"माझं नाव मैत्रेयी. माझ्या कामाचे नक्की स्वरुप काय, ही जागा कुठली आणि इथे काय प्रकारचे काम केलं जातं या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकत नाही. तुम्ही आजच्या भेटीविषयी संपूर्ण गुप्तता बाळगणार आहात. रुटीन म्हणून काही कागदपत्रांवर तुमची नोंद होईल आणि हमीपत्रांवर तुम्हाला सही करावी लागेल. घडला प्रकार शक्य तितका गुप्त ठेवायची आमची इच्छा होती पण आता तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याखेरीज आम्ही पुढील पाऊले उचलू शकत नाही. तसेही जर ही व्यक्ती खरंच समांतर विश्वातून आली असेल तर तिची मदत करणे हे आपले कर्तव्यच नव्हे तर अभिमानाची गोष्ट ठरेल."
"आम्ही त्या व्यक्तीला भेटू शकतो का?"
"अलबत! रुटीन बाबी उरकू आणि लगेच भेट सुरू करूयात."

*****

समांतर विश्वातून आलेली व्यक्तीकडून त्यांच्या काही अवास्तव अपेक्षा असल्याच तर त्या सपशेल फोल ठरल्या होत्या. बिस्किट कलरचा कुडता आणि काळ्या रंगाची सुती विजार अशा वेषात एक अतिसामान्य पुरुष एकटाच त्या खोलीत बसला होता. त्याची उत्तम बडदास्त ठेवली असली तरी नजरकैद ती नजरकैद! मध्ये एक जाड काच होती. काचेतून तो त्यांना आणि ते त्याला बघू शकत असले तरी आवाज जाण्याची सोय माईकवाटे होती. निश्चितच सरकारी तपासात याच्याकडे काहीतरी विशेष सापडले असले पाहिजे ज्यामुळे त्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली गेली होती. कदाचित त्याच्या "टाईम मशीनमध्ये" काहीतरी गूढ असावे?
"तुमचं नाव सांगता?"
"रैवत. रैवत ककुद्मिन"
"रैवत. तुम्ही भारतीय आहात?"
"मी हिंदुस्तानी आहे. मला तुमच्या टाईमलाईनची जुजबी माहिती दिली आहे. आमच्या टाईमलाईनमध्ये फाळणी झाली नाही."
"ओह ओके." जर हा थापा मारत असेल तर याने जेव्हीएनचे गंगाधररावांचे पानिपत वाचलं आहे बहुतेक, कौशिक मनात म्हणाला.
"तुमचा असा दावा आहे की तुम्ही समांतर विश्वातून आला आहात. त्याविषयी विस्ताराने सांगू शकाल?"
"जर तुमच्यापैकी कोणी शास्त्रज्ञ असेल तर माझी हरकत नाही. किमान मी जे काही सांगतो आहे ते तुम्हाला कळेल तरी."
"हे दोघे महोदय शास्त्रज्ञ आहेत." मैत्रेयीने पुस्ती जोडली.
"अच्छा मग बोलायला हरकत नाही. मी स्वतः शास्त्रज्ञ नाही पण वेळ पडलीच तर मुद्दा समजावता यावा इतपत माहिती मला आमच्या शास्त्रज्ञांनी दिली होती. तर झालं असं ...."

******

रैवत ककुद्मिन अहवालः

आज रवि कश्यप आणि कौशिक मुखर्जी या दोन शास्त्रज्ञांनी रैवतला भेट दिली. रैवतच्या कहाणीला दोघांनी खोटे ठरविले नाही पण ती खरी आहे असेही सांगितले नाही. त्या दोघांमुळे काही तांत्रिक मुद्दे मात्र स्पष्ट झाले. रैवतच्या दाव्यानुसार तो एका समांतर पृथ्वीवरून आला आहे. या पृथ्वीच्या इतिहासानुसार १७३९-४० मध्ये बाजीराव पेशव्याने दिल्ली गाठून नादिरशहाला परतावून लावले. एवढेच नव्हे तर मुघल सैन्याला सोबत घेऊन त्याचा बद्कशानपर्यंत पाठलाग केला. या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला मुघल बादशहा मराठ्यांच्या हातचे बाहुले बनला. आज तिथे युकेच्या धर्तीवर घटनात्मक राजसत्ताक व्यवस्था आहे. त्यांनी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत ते विविध काळप्रवाहांना जोडणार आहेत. हा कालधारा जोडप्रकल्प यशस्वी होण्याकरिता त्यांनी कृत्रिमरित्या आईन्स्टाईन-रोझेनबर्ग पूल, सोप्या शब्दांत वर्महोल तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाची चाचणी करण्यासाठी त्यांनी काळप्रवासी म्हणून रैवतची निवड केली.

या चाचणीत एक मोठा घोळ झाला. ही चाचणी त्यांनी चंद्रावर करायचे ठरवले होते. त्यानुसार चंद्रावर सर्व उपकरणे सज्ज करण्यात आली. अनेक देशांचा यात सहभाग होता. त्यासाठी जी राजकीय खेकटी खेळवावी लागतात ती देखील खेळवून झाली. पण या सर्वांत त्यांनी चंद्राची स्थिती नीट ध्यानात घेतली नाही. इथून पुढचा अहवाल हा रवि-कौशिक यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाचे स्वैर शब्दांकन आहे. रैवत ज्या प्रवासाचा दावा करतो आहे तो प्रवास चतुर्मिती अवकाशातील आहे. बिंदु (अ१, ब१, क१, ड१) पासून बिंदु (अ२, ब२, क२, ड२) पर्यंतचा प्रवास. या अवकाशात आपल्याला ठाऊक असलेल्या युक्लिडिय भूमितीचे नियम लागू पडत नाहीत. गणिती सहसा या अवकाशाचा विचार मॅनिफोल्ड्सच्या स्वरुपात करतात. मॅनिफोल्ड म्हणजे नक्की काय हा मुद्दा गौण आहे पण मॅनिफोल्डचा एक गुणविशेष म्हणजे स्थानिक पातळीवर अवकाश हे युक्लिडिय अवकाशाप्रमाणे वागते. याप्रकारे अवकाशाचे विश्लेषण करण्याचे अनेक फायदे आहेत, पुन्हा त्यातले बारकावे गौण आहेत. या मॅनिफोल्ड्सचे विशिष्ट नियम आहेत. या नियमांनुसार काही गोष्टी निषिद्ध आहेत. सोपे उदाहरण द्यायचे तर जसे शालेय अंकगणितात शून्याने भागणे निषिद्ध आहे. पण अशा निषिद्ध गोष्टींचे प्रकटीकरण मात्र होते आणि यासाठी मांडलेल्या गणिताला त्याची उकल करणे भाग आहे. सहसा त्याला सिंग्युलॅरिटी म्हणतात. या सिंग्युलॅरिटी रिझॉल्व्ह कराव्या लागतात. ब्लॅकहोल/वर्महोल याअ देखील एक प्रकारच्या सिंग्युलॅरिटी आहेत. सिंग्युलॅरिटीजचे अनेक प्रकार आहेत. कालप्रवासासाठी काही विशिष्ट प्रकारच्या सिंग्युलॅरिटी अनुरुप आहेत. रैवतच्या कालधारेत २१ मार्च २०१९ रोजी त्यांना एक विशेष प्रकारची सिंग्युलॅरिटी निर्माण करण्यात त्यांना यश मिळणे अपेक्षित होते व त्या वर्महोलमधून रैवत कालधारेत दोन्ही दिशांना प्रवास करू शकला असता. पण त्यांनी सुपरमूनची शक्यता गृहीत धरली नाही. चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ आल्यामुळे गुरुत्वाकर्षण वाढून त्यांना अपेक्षित असलेल्या प्रकारचे वर्महोल निर्माण झाले नाही आणि रैवत कालधारेत भरकटला आणि आपल्या कालधारेत येऊन आदळला. रैवतकडे परत जाण्याचा एक मार्ग आहे. त्याचे पृथ्वीवासी अशी अनेक वर्महोल्स उघडत आहेत. फक्त त्यातले एक आपल्या कालधारेत कधी उघडेल हे सांगता येणे अवघड आहे. यासाठी विशिष्ट पार्शिअल डिफरन्शिअल इक्वेशन सोडवावी लागतील. सध्या अशी समीकरणे सोडवता येतील असा कंप्युटर प्रोग्राम या कालधारेत अस्तित्वात नाही. पण रैवतकडे असा प्रोग्राम आहे. पण त्याकरिता त्याला एक सुपरकंप्युटर वापरावा लागेल. रैवतची अपेक्षा आहे की आपले शास्त्रज्ञ हा प्रोग्राम परमवर रन करून त्याची मदत करतील.

अवेटिंग फर्दर ऑर्डर्स
मैत्रेयी

*****

काही महिने असेच उलटले. रविने रैवतची कहाणी ऐकल्यावर एक सुस्कारा सोडला होता आणि यातून अंग काढून घेतले. कौशिकने त्याला अनेकदा यामागचे कारण विचारले. खूपच खोदून खोदून विचारल्यावर तो म्हणाला
"तू किंगडम नावाचा मांगा वाचला आहेस का?"
"नाही."
"त्यात वांग जिआन (ओऊसेन) नावाचा एक सेनापती दाखवला आहे. तो कायम म्हणतो "आय हॅव इंटरेस्ट इन ओन्ली दोज बॅटल्स दॅट आय कॅन डेफिनेटली विन!" बस्, मी सुद्धा तेच करतो आहे."
"अरे पण?"
"हे बघ कौशिक. तू विश्वामित्र मी कश्यप. आपली सृष्टी वेगळी आहे, वेगळीच बरी."
कौशिकने मात्र या प्रश्नाचा पाठपुरावा करणे सोडले नाही. हे जे काही सॉफ्टवेअर आहे ते जर जेन्युईन असेल तर ते अतिशय अ‍ॅडव्हान्स्ड पार्शिअल डिफरन्शिअल इक्वेशन सॉल्व्हर आहे. त्याचा अभ्यास झालाच पाहिजे. पण आत्तापर्यंत त्याचे सर्व प्रयत्न विफल गेले होते. या सॉफ्टवेअरचा अल्गोरिदम त्याला समजतच नव्हता. एकतर ते सॉफ्टवेअर तरी बोगस आहे किंवा कौशिककडे पुरेशी बौद्धिक क्षमता नाही. पण सॉफ्टवेअरचा कोड एखाद्या सॉल्व्हरसारखा वाटत होता खरा.
"काही प्रोग्रेस?" सविताने बेडमध्ये शिरत विचारले. कौशिकने नकारार्थी मान डोलावली. अर्थात अपयशी ठरलेला तो एकटाच नव्हता. त्याच्यासारखे अजून तीन शास्त्रज्ञ तो कोड तपासत होते.
"तुझा दिवस चांगला गेलेला दिसतो. आज पॉडकास्ट मोड ऑन?"
"हो. आज काही सेक्युरिटी विषयक पॉडकास्ट्स ऐकत होते. बर्‍याच दिवसांनी बफर ओव्हरफ्लो विषयी ऐकायला मिळालं." सविता सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. तिला या विषयातलं अद्ययावत ज्ञान होतं.
"अस्सं?"
"अरे बेसिकली तुला एखादं सॉफ्टवेअर वापरायचं असेल तर ते रन करावं लागतं. थोडक्यात त्याच्या कोडला कोणीतरी आज्ञा द्यावी लागते. काही कोड असे असतात ज्यांना आज्ञा देण्याचा काहीच मार्ग नसतो. त्यामुळे ते कधीच रन होऊ शकत नाही. त्याला डेडकोड म्हणतात."
"मग असा कोड मुळात लिहितातच का?"
"मुद्दामून नाही लिहित, अनलेस तुम्ही अ‍ॅटॅकर आहात. मग तुम्ही असं भासवता की एखादा कोड डेडकोड आहे पण प्रत्यक्षात छुप्या पद्धतीने त्याला आज्ञा देऊन रन करता येतं आणि "डेडकोड" तुमच्या प्रणालीला इजा पोहोचवतो."

******

बर्‍याच यत्नांनंतर कौशिकचा मैत्रेयीशी संपर्क झाला.
"मैत्रेयी कोणी तो कोड रन केला नाही ना?"
"कौशिक इतक्या सहजासहजी आपण असा अज्ञात कोड परमवर रन नाही करत."
"नॉट ऑन परम पर से. ऑन एनी मशीन! मी फक्त कोड वाचत होतो पण बाय चान्स इतर कोणी कोड रन नाही ना केला?"
"नाही. का?"
"हुश्श! सर्वात आधी स्टॉप अदर्स फ्रॉम डूइंग एनीथिंग. यू आर नॉट गोइंग टू बिलिव्ह धिस!"

******

रवि आणि कौशिक कौशिकच्या ऑफिसमध्ये बसले होते. कौशिककडे आता जवळपास पूर्ण स्टोरी होती.
"हा जो कोणी रैवत होता, तो निश्चितच भारताचा हितचिंतक नव्हता. तो प्रोग्राम वर वर पाहता व्हॅलिड पार्शिअल डिफरन्शिअल इक्वेशन सॉल्व्हर आहे पण त्याने वर्णन केलेली इक्वेशन्स हा प्रोग्राम सॉल्व्ह करू शकत नाही. कदाचित आत्ता तसा प्रोग्राम खरंच अस्तित्त्वात नाही. कदाचित तसा प्रोग्राम लिहिणे अशक्य आहे. हू नोज! रैवतचा प्रोग्राम एक अतिशय सोफिस्टिकेटेड व्हायरस आहे. जर तो परमवर रन केला असता तर काय झालं असतं याची आपण कल्पनाच करू शकतो. निष्णात सॉफ्टवेअर अ‍ॅनॅलिस्ट्सनाही तो व्हायरस आहे हे कळायला बराच वेळ लागला."
"पण इतर कुठल्या मशीनवर तो रन केला असता तर?"
"तर तो नेटवर्कवरून पसरला असता. आणि दिसायला आऊटपुट म्हणून एक तारीख केवळ आली असती - २३ सप्टेंबर २०१९."
"...... शॉकिंग!! मग रैवतचं काय केलं?"

*****

"मिस्टर रैवत, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. २३ सप्टेंबरला तुम्हाला हवं ते वर्महोल चंद्रावर उघडेल."
रैवत मंदसा हसला. अचानक त्याच्या चेहर्‍यावर वेदनेचे भाव आले. त्याला आकडी आल्याची लक्षणे दिसू लागली. वैद्यकीय मदत येईपर्यंत तो निजधामास गेला होता. त्याने दातात एक अतिशय सूक्ष्म अशी स्ट्रीकनीनची कॅप्सूल लपवलेली होती."

*****

"अंत भला तो सब भला! पर मान गये यार, तू तर रातोरात हिरो झालास."
"पण एक सांग रवि, तू इतक्या ठामपणे म्हणालास की रैवतने सांगितलेला गणिती प्रश्न सोडवणे अशक्य आहे आणि त्यामुळे तुला त्यात रस नाही. हे कसं काय?"
"अरे सुपरमून व्हेग संकल्पना आहे. चंद्राच्या स्थितीचे परिणाम त्यांनी ध्यानात घेतले असणारच! मला ती थाप वाटली म्हणून ...."
"पण शेवटी ती आकडेमोड एक सॉफ्टवेअरने केली आहे, सॉफ्टवेअरमध्ये चुका असू शकतात. सॉफ्टवेअरमधल्या चुकांमुळे अनेक डिझास्टर्स झालेले आहे."
"वेल, माझा अंदाज चुकून बरोबर ठरला."
"का रैवतने सांगितलेल्या पद्धतीतले डिटेल्स चुकीचे आहेत हे आधीच ठाऊक असल्याने तू हा निष्कर्ष काढलास?"
"......."
"तू विश्वामित्र मी कश्यप. आपली सृष्टी वेगळी आहे, वेगळीच बरी. तुझे हे शब्द आधी मी हसण्यावारी नेले पण तुझी मिसिंग हिस्टरी, सततचे आजारपण आणि रैवतच्या स्टोरीमध्ये तू घेतलेला इंटरेस्ट जो अचानक नाहीसा झाला. रवि?
रविने स्मित केले. त्या स्मिताला करुणेची झालर होती.
"काही गोष्टी न बोललेल्याच बर्‍या असतात कौशिक. वर्महोलचे साईडइफेक्ट्स आणि आशेवर पडलेले पाणी या दोन्हींबद्दल न बोललेलेच श्रेयस्कर!"

(समाप्त)
~*~*~*~*~

शीर्षकाचा खुलासा - https://en.wikipedia.org/wiki/Kakudmi

Group content visibility: 
Use group defaults

नेहमीप्रमाणे खतरनाक.. केवळ जबरी.. Happy
कथेतील तान्त्रिक/गणितीय बाबी सुद्धा समजल्या त्यामुळे मजा आली Happy

तुम्ही केलेले विवेचन, कथेची मांडणी ह्यावरुन हे दिसुन येतय की तुमचा या विषयात गाढा अभ्यास आहे Happy

अमेझिंग आहे. गणिती आणि वैज्ञानिक संकल्पना आणि त्यांंचा उपयोग करून लिहीलेली कथा फार आवडलंय.

भारीच !! मध्येच गंगाधर पंतांच्या पानिपताचे संदर्भ आल्याने एकदम मस्त वाटले. माझी एक नंबर आवडती गोष्ट आहे ती नारळीकरांची !!! वर्महोल आणि मॅनिफोल्ड वाचताना इंटरस्टेलर ची आठवण झाली. भन्नाट Happy

भाषेविषयी बरेच प्रश्न पडले. ह्युमन आणि मशिन दोघांच्या.
(सो कॉल्ड) अल्टरनेट युनिव्हर्स मधील व्यक्तीला आपली भाषा का समजेल? जरं समजत्येय, तर ती अल्टरनेट युनिव्हर्स मधली व्यक्ती नाही हे कोणालाच का वाटलं नाही?
आणि त्याने प्रोग्रॅम आणलेला तो तिकडे कुठल्यातरी सिस्टिमवर चालणार असेल. तो इकडे चालवायला त्याने क्रॉस कंपायलरही बरोबर आणलाय असं धरुन चालू. पण तो अक्रॉस युनिव्हर्स पोर्टेबल ?? असा असला तर आमचा आर्किटेक्ट पोर्टेबिलिटीवर आमच्या कोड कडून जे काय अचाट एक्स्पेक्ट करतो ते खरं वाटू लागेल मला Wink Proud

आणि नॉन परम मशीन ही आयसोलेटेड नेटवर्क मध्ये ठेवून असा अननोन कोड रन करतील ना? अर्थात हव्या त्या नेटवर नाही तो पर्यंत स्प्रेड नाही होणार आणि योग्य वेळी होईल असं काही नक्कीच करता येऊ शकेल.

आणि संपर्काची साधने, रेडिओ लहरी वापरून चंद्रावर संदेश नाही का पाठवता येणार? त्या पृथ्वीवासिंयांनी चंद्रावर काही तरी बेस उघडला आहे ना? आणि बरं जर ती पार्शिअल डिफरंशिअल इक्वेशन सोडवायचा प्रोग्रॅम घेऊन आला तर मग ती तारिख वेळच का नाही घेऊन आला? असा प्रशन पडला नाही का?

तो सुपर ह्युमन इम्युन बरा राहिलाय आपल्या वातावरणाला.
फारच कीस पाडतोय मी! Biggrin

गोष्ट म्हणून ठीक आहे. Happy

आल्टरनेट युनिवर्स मधला मराठी माणूस असू शकतो की तो. माणसे वेगळी का दिसतील? समांतर विश्व म्हणजे स्थळ काळ व्यक्ती तेच फक्त त्याच घटना , गोष्टी इथे घडल्या त्यापेक्षा वेगळ्या घडत गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे परिणाम वेगळेच असू शकतात. जसे पानिपतात मराठे जिंकले असते तर? आनंदीबाईंनी ध चा मा केल्याचे उघडकीला आले असते तर? विक्रम सुखरूप लँडिंग करून सिग्नल्स पाठवू लागला असता तर ? जितक्या शक्यता तितकी समांतर विश्वे!! बरोबर ना? (की मीच मिस करतेय काही ?)तसेच चंद्रावर बेस उघडलाय ते त्या समांतर विश्वात.

हो. पॅरलल युनिव्हर्स म्हणजे सगळं तेच पण थोडंस काहीतरी वेगळं. जसं स्टॅच्यु ऑफ लिबर्टी हिरव्या ऐवजी निळ्या रंगाचा ते विसरुन गेलो. Biggrin फुकट हो इतक्या सगळ्या सिरियल बघणे!
आता पॅरलल युनिव्हर्स मध्ये लॉ ऑफ फिजिक्स बदलतात, मग इव्हॉल्युशन वेगळं नसेल का झालं? लॉ ऑफ गव्हर्नंस, व्याधी, इलाज.... टाईम क्रिटिकल किती गोष्टी आहेत. बरं हे पॅरलल नक्की कधी अपडेट होतं?
अर्थात वेगळ्या डायमेंशन मधला मी... जन्मतः मुलगा मेला, म्हणून टाईम ट्रॅव्हल करुन तिकडे जाणं आणि भूतकाळात जाऊन वेगळ्या युनि. मधल्या आपल्या मुलाचा जीव वाचवणं. इकडचा मुलगा गेला (ढगात) म्हणून तिकडच्या जीव वाचवलेल्या मुलाला इकडे आणणं. फ्रिंज सिरियल मधल्या सारखं. Biggrin

मस्त आहे गोष्ट. आवडली!

> विश्रामकक्षात त्यांच्यासाठी केक आणि कॉफी आली. तो केक खाताच दोघांच्या चेहर्यावर सुखद आश्चर्य पसरले.….................. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. चहाची किटलीही आली होती. चहाचे घुटके घेत पुढचे संभाषण सुरु झाले. > नक्की काय होतं चहा की कॉफी?

> "हे बघ कौशिक. तू विश्वामित्र मी कश्यप. आपली सृष्टी वेगळी आहे, वेगळीच बरी." > ही विश्वामित्र आणि कौशिक काय भानगडय? काही गोष्ट आहे का त्यांची?

सर्व वाचकांचे आभार.
अज्ञातवासी, मी_मधुरा, किल्ली, अनघा, मामी, समाधानी, मॅगी, टवणे सर, रॉनी, maitreyee, rmd, सनव, धनि, अमितव, मन्या ऽ, अ‍ॅमी प्रतिसादांकरिता धन्यवाद Happy

नक्की काय होतं चहा की कॉफी? >> दोन्ही पर्याय उपलब्ध होते, गोंधळ होत असल्यास क्षमस्व.
फारच कीस पाडतोय मी! >> Happy पाडा की. ही गोष्ट शास्त्रीयदृष्ट्या चिरफाड करायला अतिशय उपयुक्त आहे (आणि त्यासाठी इनअ‍ॅक्युरसीज् चे ठासून भरलेले इंधन पण आहे). त्यानिमित्ताने कोणी या शास्त्रीय संकल्पनांचा अभ्यास करणार असेल तर या उपक्रमाचा हेतु सफल झाला Happy पण...

पॅरलल युनिव्हर्स मध्ये लॉ ऑफ फिजिक्स बदलतात, >> दॅट डिपेन्ड्स! मल्टीव्हर्स केवळ एक अटकळ आहे ज्याच्याविषयक काही प्रमाणात गणिती भाकिते करता येतात/केली जातात. या मल्टीव्हर्स अटकळीचे अनेक सिद्धांत आहेत ज्यापैकी काही सिद्धांत मूलभूत भौतिक नियम वेगळे असण्याची मुभा देतात. हे सिद्धांत खरंच लागू पडतात का? कोणास ठाऊक. काही सिद्धांत असेही आहेत जे मूलभूत भौतिक नियम बहुतांश समांतर विश्वांसाठी समान असल्याचे प्रतिपादन करतात आणि त्यांचे तूर्तास तरी खंडन करता येत नाही. सहसा सायफाय सिनेमे आणि मालिकांमध्ये हे दुसर्‍या प्रकारचे सिद्धांत गृहीत धरतात कारण ते सोयीस्कर आहेत, यामुळे त्यांना भौतिक नियम समान असण्याची शक्यता खूप जास्त असल्याचा मुद्दा वापरता येतो. याला अपवाद आहेत. राज कॉमिक्सच्या २००० साली आलेल्या कोहराम विशेषांकांत पहिल्या प्रकारचे मल्टीव्हर्स कल्पलेले आहे (त्यांचे स्पष्टीकरण बोगस आहे पण तरीही). ज्याच्यावर ते गेली दोन वर्षे सर्वनायक सीरिज आणि पुनरोत्थान सीरिजच्या मार्फत डेव्हलप करत आहेत.

ही विश्वामित्र आणि कौशिक काय भानगडय? काही गोष्ट आहे का त्यांची? >> हे रुपक म्हणून वापरले आहे. संयोजकांनी रचलेला मूळ गाभा/writing prompt मला भारतकेंद्री वाटल्यामुळे भारतीय पुराणकथांमधून एक रुपक उचलण्याचा मोह आवरला नाही.
कौशिक हे विश्वामित्रांचे दुसरे नाव आहे. पौराणिक कथांनुसार विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता जे एकप्रकारे समांतर विश्वाकरिता रुपक आहे. तर कश्यप ऋषींना वायुपुराण आणि मत्स्यपुराण आपला सृष्टीकर्ता मानतात. आशा आहे या रुपकासाठी एवढे संत्रे सोलणे पुरेसे ठरावे.

अच्छा.
सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद पायस Happy

मस्त कथा! आवडली Happy
या रवीची बॅकस्टोरी काय आहे नेमकी? २३ सप्टेंबर या तारखेचा significance आहे का काही?

पूर्ण समजली नाही. पुन्हा वाचून पाहीन. या दोन्ही (धनि च्या कथेतही) २०/२१ मार्च व २३ सप्टें चा संदर्भ आहे. इक्विनॉक्स चा असावा तो त्या वर्षीच्या.

मस्त. शेवट तर मस्तच आहे.

२०/२१ मार्च व २३ सप्टें चा संदर्भ आहे >>> तो बहुतेक संयोजकांनीच दिला आहे स्पर्धेच्या आराखड्यात.

तारखेचे वैज्ञानिक महत्त्व आहे.
त्यासाठी, चंद्र अर्धा राहिला स्पर्धेची मुळ घोषणा इथे बघावी https://www.maayboli.com/node/71285
तसेच इथे https://en.wikipedia.org/wiki/March_equinox मार्च व सप्टेंबर इक्विनॉक्स च्या तारखा दिल्या आहेत त्या ही बघाव्यात.

जबरदस्त कथा.

मला असे वाटतेय की रवी सुद्धा तिकडूनच आलाय. त्याला तिकडचे सगळे माहीत असल्यामुळे रैवतची कथा खरी हे त्याने लगेच ओळखले पण प्रोग्रॅम पृथ्वीच्या भल्यासाठी नाही हे लक्षात येताच त्याचा इंटरेस्ट संपला. त्याला परत जाण्यात रस असावा पण प्रोग्रॅम रन झाल्यावर जो उत्पात घडला असता तो मान्य नसावा. म्हणून आशेवर पाणी पडले. कौशिकला याचा अंदाज आलाय.

रैवतने आत्महत्या का केली? वर्महोल बनतोय म्हणजे आपले गुपित फुटले हे त्याला कळले?

Pages