पुणे..गणपती दर्शन..

Submitted by अमृताक्षर on 9 September, 2019 - 13:18

रोज या ना त्या कारणाने कॅन्सल होणारा आमचा पुणे गणपती दर्शन चा कार्यक्रम आज एकदाचा ठरला होता. रविवार असल्यामुळे मला तशी क्लास ला सुट्टीच होती मग काय संध्याकाळी सगळ्या रुमेट्स छान आवरून बाहेर पडलो.

कुणालाही मोहवून टाकणार बाप्पांचं लोभसवाणं रूप पाहून मन अगदी प्रसन्न झालं. काही मंडळांनी केलेले डेकोरेशन म्हणजे नवनवीन कल्पनांचा आविष्कारच जणू. त्यात डोळे दिपवणारी रोषणाई आणि अप्रतिम रांगोळ्या.
पण थोड्याच वेळात माणसांनी आणि त्यांनी केलेल्या भरमसाठ  कचऱ्याने सगळा रस्ताच झाकून गेला. रविवार असल्यामुळे सगळ्यांना आजच बाप्पाला भेटायचं होतं. प्रत्येक चौकात बाप्पा समोर मोठ्याने कानठळ्या बसवणारा स्पीकर वाजत होता आणि ते कमी कि काय म्हणून विनाकारण वाजणारे वाहनांचे कर्कश हॉर्न. मी एकाच दिवसात त्या आवाजाने मेटाकुटीला आली बाप्पाचे तर सुपासारखे मोठे मोठे कान तो तर पार वैतागला असेल आणि या सगळ्या गर्दी गोंगाटात समोर आलेल्या भक्ताच म्हणणं त्याला काही ऐकू गेलेलं नसेल. इथला हा सगळा कार्यक्रम आपल्या आई बाबांना फोनवरून बाप्पा कौतुकाने सांगत असेल तिकडून आपल्या बाळाच्या काळजीने व्याकुळ झालेली आई “बाळा, तू गर्दीत नीट राहा बर का आणि घरी लवकर ये कार्तिकेय आठवण करतोय तुला” असा प्रेमळ सल्ला देत असेल. दिवसभर बॉलीवूड चे ढिंचॅक गाणे ऐकून थकलेला बाप्पा त्याच्या लाडक्या भक्तांनी आणलेले मोदक आवडीने खात असेल पण बाप्पाला खायला सुद्धा कुणी वेळ देत नसेल एक मोदक सोंडेत घेतला कि इतक्या गर्दीत सुद्धा त्याच्यासोबत सेल्फी  काढायला पुढे सरसावलेले सेल्फीवीर “बाप्पा चीझ” म्हणून म्हणून त्याला डिस्टर्ब करत असेल.

पण तरीसुद्धा बाप्पा आपल्या भक्तांच हे आगळंवेगळं निरागस प्रेम कित्येक वर्षांपासून आनंदाने स्वीकारतोय आणि आपल्या लेकराला भरभरून आशीर्वाद देतोय त्याच्या मनोकामना पूर्ण करतोय.

खरंच त्रास देणाऱ्या प्रत्येकाला मोठ्या मनाने माफ करून त्यांना बदल्यात फक्त प्रेम,आनंद द्यायला देवच व्हायला लागतं ,नाहीतर आपण, गोंधळ घालून कुणी दुपारची झोपमोड जरी केली तरी भांडायला बसतो.

(नोंद घ्यावी असे काही :-

१. काही मंडळांनी खूप सुंदर सामाजिक प्रबोधनपर देखावे सादर केले होते ते खरंच कौतुकास्पद होते.

२. काही मंडळांनी वाहतूक नियमनाकरिता स्वयंसेवक ठेवले होते आणि काही ठिकाणी कचरा व्यवस्थापन सुद्धा छान केले होते .)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users