माझी सैन्यगाथा (भाग २८)

Submitted by nimita on 8 September, 2019 - 13:20

उन्हाळ्याचा रखरखाट संपून आता हळूहळू थंडी पडायला सुरुवात झाली होती. पण जम्मूचा उन्हाळा जितका प्रखर तितकीच तिकडची थंडीही अगदी कडाक्याची! ऐन थंडीच्या दिवसांत तर पहाटे पहाटे इतकं धुकं पडायचं की खिडकीतून बाहेर पाहिलं तर समोरचं काही म्हणजे काही दिसायचं नाही...बागेतली झाडं, बागेच्या पलीकडचा रस्ता, रस्त्याच्या पल्याडची घरं... सगळं काही धुक्याच्या पडद्यामागे लपून गेलेलं असायचं. कधी कधी तर बाहेर रस्त्यावर स्कूल बस येऊन थांबायची पण आम्हांला दिसायचीच नाही....फक्त ऐकू यायची...म्हणजे बसचा ड्रायव्हर जोरजोरात हॉर्न वाजवायचा आणि गाडीचे हेडलाईट्स ऑन ऑफ करून सिग्नल द्यायचा. त्यावरून अंदाज बांधत मी आणि ऐश्वर्या बसपाशी पोचायचो.

अशा गोठवणाऱ्या थंडीत मुलांना त्यांच्या पांघरुणातून बाहेर काढून शाळेकरता तयार करणं हे समस्त 'आई' वर्गाकरता अशक्य कोटीतलं काम असायचं.....अगदी जीवावर यायचं ! हो ना...आधी स्वतः त्या उबदार रजईमधून बाहेर निघा आणि मग मुलांना ओढून बाहेर काढा.. त्यामुळे सगळे जण ख्रिसमस च्या सुट्ट्यांची अगदी आतुरतेनी वाट बघत होते - आणि शेवटी एकदाच्या सुट्ट्या सुरू झाल्या. तमाम मुलं -आणि पर्यायानी त्यांच्या आया- यांना आता भल्या पहाटे उठायची गरज नव्हती. जाग आल्यानंतर सुद्धा रजई मधे लोळत पडायची परवानगी मुलांना मिळाली होती.

अशाच एका भल्या पहाटे मला जाग आली...हो ! हा जगाचा नियमच आहे.. जेव्हा आपल्याला उशिरापर्यंत झोपायची परवानगी असते तेव्हा नेमकी भल्या पहाटे जाग येते....मलाही याच नियमानुसार त्या पहाटे जाग आली..डोळे उघडून पाहिलं तर वर ceiling fan गोल गोल फिरताना दिसला. मनात पहिला प्रश्न आला-' इतक्या थंडीत फॅन कोणी ऑन केला?' मी तर नक्कीच नव्हता केला ; आणि ऐश्वर्यानी करायचा तर प्रश्नच नाही कारण तिला थंडीच्या नुसत्या विचारानीच कुडकुडायला होतं.. मग हा फॅन कसा काय फिरतोय?' काही क्षणांत इतके सगळे विचार येऊन गेले मनात. थोडं नीट पाहिल्यावर लक्षात आलं की फॅन फिरतो तर आहे पण गोल गोल नाही- तर वेडा वाकडा ! एकदम शंका आली -' हा भूकंप तर नाहीये ना? छे, भूकंप असता तर फक्त फॅन च कसा हलला असता?' मीच माझी शंका मोडून काढली. अजून थोडा वेळ वाट बघायचं ठरवलं. पुढच्या काही मिनिटांत आपोआपच फॅनचं ते फिरणं/ हलणं थांबलं. थोडं उजाडल्यावर वरच्या मजल्यावर राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीला त्याबद्दल विचारलं...कारण जर भूकंपामुळे माझ्या घरातला फॅन हलत असला तर तिच्या घराची जमीनही नक्कीच हलली असणार...आणि माझा अंदाज खरा ठरला. तिला पण पहाटे तिची कॉट थोडी हलल्याचं जाणवलं होतं.

नंतर रेडिओ वर सकाळच्या बातम्यांमधेही भूकंप झाल्याची पुष्टी झाली. पण अगदी हलका झटका असल्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी नव्हती झाली. सगळं काही 'आलबेल' होतं.

पण या सगळ्या एपिसोड मुळे माझ्या मनात विचारांची चक्रं सुरू झाली. मनात सगळ्यात आधी मुलींचा विचार आला. सृष्टी तर हे सगळं समजण्यासाठी खूपच लहान होती. ऐश्वर्या उठल्यावर तिला जवळ बसवून घेतलं आणि भूकंप आणि त्यामुळे उद्भवणारे संभावित धोके याबद्दल तिला समजेल अशा भाषेत सांगितलं. अशा वेळी स्वतःचा बचाव कसा करायचा हेही सांगितलं आणि चांगली दोन तीन वेळा उजळणीही करून घेतली.

आजची शिकवण तिच्या किती लक्षात आहे हे बघायला म्हणून दुपारी अगदी सहजच तिला विचारलं," जर कधी असा भूकंप आला आणि मी जवळपास नसले तर तू काय करशील?" त्यावर क्षणभर विचार करून ती म्हणाली," तू जर इथे नसलीस तर ? तर मग मी काय करीन सांगू का? मी पटकन सृष्टीला उचलून घेईन आणि पळत पळत बाहेर आपल्या घरासमोरच्या मोकळ्या जागेत जाऊन उभी राहीन !" तिचं ते उत्तर ऐकलं ;तिच्या चेहेऱ्यावरचा तो आत्मविश्वास बघितला आणि मी खरंच धन्य झाले. अशा परिस्थितीची नुसती कल्पना करतानासुद्धा तिच्या मनात पहिल्यांदा सृष्टीचा विचार आला होता. 'आई जवळ नसताना आपल्या छोट्या बहिणीच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्यावर आहे,' हे तिनी स्वतःच ठरवून घेतलं होतं.

मी मनोमन त्या दोघींची, त्यांच्यातल्या या नात्याची दृष्ट काढली. एक 'आई' म्हणून त्या क्षणी माझ्यासारखी नशीबवान कोणी नव्हती!!

तो पूर्ण दिवस मी याच विचाराच्या धुंदीत होते. पण राहून राहून एका गोष्टीचं अप्रूप वाटत होतं....ऐश्वर्याच्या या भगिनी प्रेमाचं....'सहवासानी प्रेम वाढतं' हे मी ऐकून होते, पण आता मला त्याची प्रचिती येत होती.

याबद्दल विचार करताना माझं मन भूतकाळात जाऊन पोचलं... वेलिंग्टन ला... जेव्हा वेलिंग्टन हुन बस्तान बांधायची वेळ आली तेव्हा मला सृष्टीच्या वेळी सातवा महिना लागला होता. आता लवकरच घरात एक छोटं बाळ येणार या नुसत्या कल्पनेनीच ऐश्वर्या खुश होती. एके दिवशी पॅकिंग करताना तिच्या कपड्यांची बॉक्स उघडली तेव्हा आतून तिचे लहानपणीचे कपडे निघाले... छोटी छोटी झबली, टोपडी, दुपटी....तिला खूप गंमत वाटत होती ते सगळं बघताना.. सारखी विचारत होती," आई, माझे हात इतके छोटे होते ? माझं डोकं इतकं लहान होतं?" तेव्हा बोलता बोलता मी तिला म्हणाले ," हो, पण आता हे सगळे कपडे येणाऱ्या बाळाला घालायचे."माझं ते वाक्य ऐकलं मात्र आणि ती एकदम थबकली. मला म्हणाली," अगं, पण हे माझे कपडे आहेत ना? मग बाळाला का द्यायचे?बाळासाठी नवीन आणू या ना." तिला समजावत मी म्हणाले," लहान बाळांना नवीन कपडे नाही घालत. त्यांच्या नाजूक स्किन ला टोचतात ना ते.. म्हणून असे वापरून मऊ मऊ झालेले कपडे घालायचे असतात त्यांना.आणि तसंही आता तर तुला हे कपडे किती लहान होतात ना ?" पण 'आपले कपडे दुसऱ्या कोणाला तरी द्यायचे' ही कल्पना तिला अजिबात पटली नाही. साहजिकच होतं म्हणा.. कारण तोपर्यंत तिला कधीच काहीच share करायला लागलं नव्हतं.आणि आता अचानक हा गौप्यस्फोट झाला होता. तिनी तिचे ते सगळे कपडे एकत्र केले आणि मला म्हणाली," अगं, लहान नाहीयेत काही, हे बघ माझा हात जातोय अजून ह्या फ्रॉक मधे. आणि हे दुपटं तर मला खूप आवडतं." त्यावेळी मी काही बोलले नाही. पण त्या प्रसंगामुळे माझी बेचैनी वाढली .Sibling rivalry बद्दल मी बरंच काही ऐकलं होतं. आपली खेळणी आणि इतर वस्तू आता दुसऱ्या कोणाबरोबर तरी वाटून घ्याव्या लागणार, इतकंच नाही तर आपले आईबाबा पण आता फक्त आपले नसणार - ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर आपल्या लहान भावंडाबद्दल मनात अढी धरल्याची काही उदाहरणं होती माझ्या ऐकण्यात.

तो पूर्ण दिवस मी या विचारांतच घालवला.विचारांती एक कल्पना सुचली. त्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी आमची फोटो अल्बम्स ची बॉक्स पॅक करायला घेतली. ऐश्वर्याला मदतीला बोलावलं. साहजिकच ती एक एक अल्बम उघडून त्यातले फोटो बघण्यात रंगून गेली. तीच वेळ साधून मी तिचा लहानपणचा अल्बम उघडला आणि तिला दाखवला.म्हटलं," हे बघ, तू लहान बाळ होतीस ना तेव्हाचे तुझे फोटो..." तीही खूप उत्साहानी सगळे फोटो बघत होती. त्यात तिला तेल मालिश करताना, अंघोळ घालताना, मांडीवर घेऊन झोपवताना असे वेगवेगळ्या वेळी काढलेले फोटो होते. मी एकीकडे तिला सांगत होते," हे बघ, तू जेव्हा लहान होतीस ना, तेव्हा तुला स्वतः काहीच काम करता यायचं नाही, म्हणून मीच तुझी सगळी कामं करत होते...मालिश, अंघोळ, तुझं खाणं पिणं... सगळं ! मग हळूहळू तू मोठी झालीस आणि आता सगळी कामं तू स्वतः करतेस- like a good girl. पण आता आपल्याकडे जे बाळ येईल ते पण तर असंच तुझ्यासारखं छोटंसं असेल..मग त्याचं पण सगळं काम मलाच करावं लागेल ना ! त्यामुळे मी तर खूपच busy होईन, एखाद्या वेळी तुझ्यापेक्षा बाळाकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. पण तू मला मदत करशील ना ? कारण बाबा तर नसणार आपल्या जवळ. मग तू आणि मी मिळून आपल्या बाळाची काळजी घेऊ या. चालेल ना?"

माझं म्हणणं पटलं असावं तिला. कारण ती लगेच मला म्हणाली," हो आई, आपण दोघी मिळून बाळाकडे लक्ष देऊ." आणि एवढंच म्हणून थांबली नाही तर तिच्या खेळण्यांमधलं एक टेडी बेअर काढून घेत म्हणाली," हे देऊ या बाळाला खेळायला. हे खूप मऊ मऊ आहे ना; त्याच्या स्किनला टोचणार पण नाही." तिचं ते निरागस बोलणं आणि वागणं बघून खूप कौतुक वाटलं होतं तिचं. त्यानंतर मग बराच वेळ आम्ही दोघी 'येणाऱ्या बाळाची काळजी कशी आणि कोणी घ्यायची' हेच ठरवत बसलो होतो.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users