काही स्वप्नवत वर्षे

Submitted by रेव्यु on 7 September, 2019 - 09:51

अविस्मरणीय परवानू –
आयुष्यातले कांही दिवस ,कांही वर्षे मनात एक आपले घर करून जातात्,अश्या स्मृती सोडून जातात, चंदनाच्या खोडाप्रमाणे असा दरवळ सोडून जातात की उर्वरीत आयुष्य आपण त्यांच्यावर जगतो.

या गत आयुष्यातील मनोहारी कप्पा म्हणजे परवानू.परवानू म्हणजे फक्त एक गांव नाही.त्या गांवातील आमच्या वास्तव्याला एक चरित्र आहे,एक बाज आहे,एक साज आहे ,एक नजाकत आहे अन पहिल्या पावसात भिजलेल्या मातीचा गंध जसा वेळोवेळी मुग्ध करून जातो तसा या गावचा स्मृतीगंध आहे.

तिथले मित्र,तिथली माणसे,त्या दिवसांत अनुभवलेले धुंद क्षण अन या सर्वांस सदैव एका रसिक अन जाणत्या सखीसारखा साथ देणारा निसर्ग यांची अनुभुती घेतलेल्या ,आकंठ पान केलेल्या सर्व सख्या सोबत्यांना ही माझी ओबडधोबड भेट आहे.
आपले करियर प्रयोगशील अन स्थित्यंतर करण्यास उत्सुक असताना आम्ही नाशिकहून हिमाचल प्रदेशाच्या पायथ्याशी वसणार्‍या परवाणूस स्थलांतर केले.पेशव्यांनंतर एवढी दूर स्वारी करणारे आम्हीच पहिले असे गमतीने मित्र म्हणत असत तेंव्हा.तर या स्थित्यंतराचा पहिला टप्पा म्हणजे इंटरव्यू-त्याची ही गोष्ट,

इंटरव्यूतच या गावाने असे वेड लावले की तिथे जाण्यावाचून पर्याय राहीला नाही.
डिसेंबर मध्ये परवानूच्या एका कंपनीतून इन्टरव्यूला बोलावले गेले.रेल्वेचा प्रथम श्रेणीचा परतीचा प्रवास खर्च मिळणार होता अन त्या वेळच्या प्रथेप्रमाणे द्वितीय श्रेणीने प्रवास केल्यास बराच खर्च सुटून दिल्ली -आग्रा दर्शन वगैरे फुकटात होईल या प्रामाणिक ( ) इच्छेने जायचे ठरवले.एवढ्या दूर नवीन नोकरी करण्याचा मुळीच उद्देश नव्हता. नाशिक ते बेळगाव कोल्हापूर मार्गे (सटाणा कोल्हापूर येष्टीने) हा सर्वात लांबचा प्रवास केलेला -तोही लग्ना नंतर सासरी जायला म्हणून.

त्यामुळे शिवालिक्-हिमाचल पर्वतांच्या पायथ्याशी वसलेले हे गाव टेलिग्रॅम् आल्यावर फक्त नकाशात पाहिले होते.(त्या पुरातन काळी तांतडीचे संदेश या प्रकारे पाठविले जात्-अन प्रत्यक्ष बोलायचे झाले तर जी.पी.ओ म्हणजे जनरल पोस्ट ऑफिसात जाऊन ट्रंक कॉल लावून लाईनीत बसावे लागे-असो-त्याबद्दल एक वेगळा रोमहर्षक लेख लिहिता येईल) .या गावाच्या भोवताली माझ्या मनात एक गूढ वलय होते.
पंजाब मेलने दिल्लीला पोहोचलो(अर्थात द्वितीय श्रेणीत्).वाटेत आग्रा दर्शन ही झाले.रात्री दिल्लीच्या आंतर राज्यीय बस अड्ड्यावर्(याला अड्डा हे फार समर्पक नाव आहे )चन्दिगढ ची बस उभी होती.चंदिगढ्हून पुढील बस मिळेल असे कळाले होते.१९८४-८५ हे आतंकवाद्यांच्या चरमसीमेचे दिवस होते.जीवघेणी थंडी अन ती काय असते याचा कधीच अनुभव न घेतलेला मी मराठी गडी!!राती दहा साडेदहाला बस सुटली.बस मध्ये कांबळी वजा शाली गुरफटल्या मुळे मुळीच ओळखू न येणारे ७-८ चेहेरे/इसम ,अविरतपणे कुडकुडणारा असहाय मी ,मिट्ट अंधारातून अन अनोळख्या प्रदेशातून बस कापत नेणारा चालक अन वाहक असा हा लवाजमा.

पहाटे साडेतीनला चंदिगढ गाठले.बस स्थानकावर मोजकेच लोक होते.थोडे भितिप्रद,थोडे गूढ वातावरण होते.छोट्या छोट्या शेकोट्या पेटलेल्या-अन लोक "सेंकत(शेकत)" होते.अन आयुष्यात पहिल्यांदा सिविल वेषातील माणसाला मी पाठीवर बंदूक घेऊन बसलेले पाहिले. अर्थात महाराष्ट्रातही हे दृष्य हल्ली दिसते हा भाग अलाहिदा.

आता पुढली बस कुठे मिळेल्,काय करावे,कुणाला विचारावे या संभ्रमात अन दिशाहीन अवस्थेत मी हिंडत होतो.त्यातल्या त्यात सभ्य वाटणार्‍या एका घोळक्यापाशी जाऊन शक्य तेवढ्या हिंदीत मी विचारले "परवनूकी बस किधर मिलेंगी?" त्यापैकी कुणालाच काही न कळल्याने त्यानी प्रतिसाद दिलाच नाही अन थोड्या वेळाने त्यातील एक जण कनवाळूपणाने म्हणाला---

"बैठ्ठो जी थोड्डा तप ल्येओ,वड्डी सर्द्दी हैगी" ----थोड्या वेळाने मला उमगले की तो मला बसायला सांगतोय अन शेकायला सांगतोय. मी बसल्यावर थोडी ऊब मला ही वाटू लागली अन मग त्यातील एकाने मला प्रश्नादाखल विचारले "किथ्थू जाणा है ज्जी,अजनवी लगते हो!!"

मी परवाणू म्हणून उत्तर दिले,एक क्षणभर त्याला उमगले नाही अन मग तो उत्तरला "ओह्हो --परमाण्णू जाणा है त्वान्नू?"
मी होकार दिला अन तेंव्हा मला उमगले की पंजाबीत परवाणूला अणुशास्त्रातला "परमाणू" म्हणतात्.हिमाचल मधील खेड्याला दिलेले "परमाणू "हे नाव ऐकून अन पंजाब्यांची अणुशास्त्रातील प्रगती पाहून माझा ऊर भरून आला.

"हौर थोड्डा रुको ,हुणे शिमलेआली गड्डी आणी है"या त्याच्या आश्वासनावर विश्वास ठेवून मी वाट पाहतोच आहे की नाहीए-एक बस अचानक आगारात आली अन वाहक ओरडू लागला"कालका,परमाणू,सोलन्,शिमला---".लगोलग मी बस मध्ये चढलो अन परवाणूचे तिकिट घेऊन स्थानापन्न झालो.

साधारण पंचेचाळीस मिनिटांच्या प्रवासानंतर पहाटे पांचच्या सुमारास एका निर्मनुष्य अशा पेट्रोलपम्प वजा बस स्थानकावर गुडुप्प अंधारात अन जिवघेण्या प्रचंड थंडीत ,एकुलत्या एका मुसाफिरास म्हणजे अस्मादिकांस सोडून ती बस पुढे सोलन्-सिमल्यास निघून गेली.मोठा भयावह प्रसंग होता.धुके अन अंधारात काहीही दिसत नव्हते.दूरवर धुके,जीवघेणी थंडी ,अंधाराचा सराव झाल्यावर कुठेतरी दूर मिणमिणते दिवे,विचारावे तरी कुणाला अशा असंख्य यक्षप्रश्नांना न जुमानता गावात जातेय अशा वाटणार्‍या रस्त्यास नाकासमोर धरून चालू लागलो.पांचेक मिनिटात समोर अत्यंत सुबकशी घरे,त्यां समोर लाल वीटांच्या कुंपणावरील चिमुकल्या वेली अन हिरवळी अन दुतर्फा अशा छोट्या छोट्या घरांच्या मधून जाणारा रस्ता ही माझी परवानूच्या वसाहतीची मनोरम स्वप्नसदृश प्रथमदर्शनाची मनमोहक आठवण.

अन अचानक दिसू लागले--एका अत्यंत सुंदर घराच्या बाजूला जरा आडोसा धरून एक दरबान शेकोटी पेटवून बसला होता.मोठ्ठा थोरला लांब लोकरी कोट घालून -ज्याला इंग्रजीत ग्रेट कोट म्हणतात तो- बसला होता.मी त्याला जाऊन फॅक्टरी कुठे आहे किंवा एखादी जागा जिथे मला ४-५ तास काढ्ता येतील अथवा ताजेतवाने होण्याजोगे हॉटेल आहे का इ.विचारपूस केली.पठ्ठा म्हणाला "हे गेस्ट हाऊस आहे अन इथे तिर्हाईतास प्रवेश नाही अन जवळचे हॉटेल शिवालिक ३ एक मैल दूर आहे.जरा उजाडल्यावरच तुम्हाला शोधता येईल"

झालं!! अडला हरी करणार काय ,तिथेच मी त्याची परवानगी घेऊन त्याच्याबरोबर बसलो.मोठे विनोदी दृश्य होते.उत्तरेतील अगदी टोकाचे गाव तिथे एक बाळबोध मराठी भाऊ अन तो पहाडी गुरखा शेकोटी पेटवून पहाट व्हायची वाट पाहत होते,संभाषण करायचा प्रयत्न करीत होते.

पहाटेचे ६-१५ झाले अन एक टॅक्क्सी येवून उभी राहिली.ड्रायवर ओरडून म्हणाला "ओय बहदूर,जसबीर खानसामेसे कहेना दिल्लीसे कोई सहाब नही आया" अन जसा आला तसाच तो भुर्रकन,उडून गेला.
मी सहज कुतुहल म्हणून गुरख्याला विचारले "कोण येणार होते?"

तो म्हणाला "अंदर कमरा रख्खा है जी-कोई सहाब आनेवाला था!!"
तेवढ्यात मी आलेल्या जसबीर खानसाम्याला विचारले"यहां आसपासमे कंपनीवाले कोई रहते है क्या?"
तो उत्तरला"रस्तेके परली साईड जी एम साहाब रहते है जी------कंपनीके"

मला ज्या कंपनीत इंटरव्यु द्यायचा होता त्याच कंपनीचे ते जनरल मॅनेजर होते हे ऐकल्यावर जरा हायसे वाटले.पण एवढ्या वरिष्ठ हुद्द्यावरील माणसाला तसदी देणे ही प्रशस्त वाटेना.शेवटी हिय्या करून रस्त्यापलिकडील त्या बंगल्याची बेल वाजवली अन तत्पूर्वी मृतावस्थेत असलेल्या बल्ब खालील नावाची पाटी वाचली--नाव चक्क "पानसे" असे मराठी माणसाचे होते.

डोळे चोळत रात्रीच्या पोशाखात्,गाऊन मध्ये,पानसे बाहेर आले अन मी परिचय करून दिल्यावर म्हणाले "अहो,आणखी झोपायचं नाही का?अजून ६-३० होताहेत्,तुमची ट्रेन ५-४५ ला पोहोचली असेल ना?"
मग मी सर्व वृत्तांत संक्षेपात सांगितला अन मग मनोमन खुलासा झाला.आमच्या द्वितिय श्रेणी अन आग्र्याच्या लफड्यामुळे रात्रीच्या ट्रेन ऐवजी माझे बसने येणे मला भोवले होते.साधारणतः सर्व मंडळी कालका मेलने दिल्लीहून येतात अन पहाटे टेक्सी त्याला घेऊन येते अन गेस्ट हाऊसला सोडते.मीही बसने आलो एवढे मोघम सांगून सारवासारव करून वेळ मारून नेली.

पानश्यांनी मग दरबानला बोलवून माझी व्यवस्था करण्यास सांगितले.
थोडक्यात ज्या खोलीबाहेर मे शेकोटीवर शेकत बसलो होतो ती खोली माझ्यासाठी आरक्षित होती.
शेवटी दस्तूरखुद्दांची व्यवस्था त्याच खोलीत झाली.रजईत घुसलो अन पाहतो ते काय त्या बिस्तर्‍यात गरम पाण्याची बाटली ठेवून गादी उबदार ठेवण्यात आली होती.उत्तर हिंदुस्तानात थंडीचा सामना कसा करायचा या क्लृप्तीची पहिली झलक होती ही.अत्यंत सुखदायक अशी दोन एक तास झोप झाली.अन हळू हळू उत्तरेतल्या विषेशतः हिल स्टेशनमधल्या लाईफ स्टाईलची ,तिथल्या जीवनाची झलक अन ओळख त्या क्षणापासून सुरू झाली.'

चकाकत्या टाईल्स असलेली बाथरूम,तिन चार प्रकारचे शावर असलेले गरम अन थंड पाण्याचे नळ्,टर्किश गाऊन, बाहेर अत्यंत कलात्मक रितिने सजवलेली खोली,शुभ्र परीटघडीचे टेबल क्लॉथ असलेले डायनिंग टेबल्,त्यावर नाजूक नक्षीकाम केलेली क्रोकरी-काटे,चमचे अन सुर्‍या,सुंदर पुष्प रचना केलेला फ्लॉवर वास्,मला तर ही नवलाईच होती.

पटांगणात प्रशस्त लॉनवर टाकलेल्या शुभ्र रंगाच्या वेताच्या खुर्च्या .अन सर्वात अद्भुत अनुभूती देणारा हवेतील्,वातावरणातील ताजेपणा,प्रसन्न करणारा एक उत्साह.

समोरच शाळा

अन शाळेचे उन्हात भरलेले वर्ग,कॉल्नीतील इतर घरातील मागच्या व्हरांड्यात बसून "धूप सेंकणार्‍या" स्त्रिया--अशी माझी टेहेळणी चालू असतानाच अचानक बेअर्‍याने प्रश्न केला
"चाय लाऊं क्या साब?"

मी होकार देता क्षणीच ४-५ चिनी मातीच्या वेगवेगळ्या आकाराच्या किटल्या घेऊन तो आला.पूर्ण सफेद गणवेष्,शुभ्र पूर्ण बाह्याचा स्वेटर,काळे पॉलिश्ड बूट ,अक्कडबाज फौजी मिशा असा तो अन त्याच्या समोर पँट ,वर नाशिकच्या थंडीस पुरेलसा हाफ स्वेटर अन त्याबाहेर असलेला बुश्कोट्,खाली अनवाणी असा मी .विसंगती सुसंगतपणे मूर्तरूप झाली होती.

मग त्याने विचारले "चाय बनाऊं सर?"
मी होकार दिला--पुढचा प्रश्न
"चिनी कितनी?"
मला कळेना
"चीनी कितनी" (तेंव्हा "चिनी कम" हा पिक्चर आला नव्हता )

मग द्रुक अन श्राव्य यांचा आधार घेत कळले की चिनी म्हणजे साखर्.मला हा प्रश्न आधी क्वचितच कुणी विचारला होता.कारण आपला चहा काढ्याच्या स्वरूपात असतो.
मी २ चमचे म्हटल्यावर मग दूध किती ची उजळणी झाली.शेवटी त्या त्रस्त समंधाला शांत करण्यासाठी थातूर मातूर उत्तरे देवून चहा बनवून घेतला.

मग पुनः "नाश्तेमे क्या लोगे अंडा या प्रांठा" मग "अन्डा कैसा बॉईल्ड ,पोच्ड्,स्क्रँबल्ड की फ्राईड की ओम्लेट्--अन ओम्लेट साधे की मसाला की प्याज टमाटरवाला" अशी चढती भाजणी झाली. हीच पुनरावृत्ती परांठ्यात ही झाली.

शेवटी नाश्ता संपवून बूट चढवून तयार झालो.कंपनीची गाडी येताच बाहेर आलो.अन फॅक्टरीत गेलो.इंटरव्युत मराठी प्रतिभा झळकली अन पैसे मागताना मात्र जीभ अडखळली.आपले सिलेक्शन होणार एवढा मात्र आत्मविश्वास होता.औपचारिक निर्णयाची वाट पाहायची होती.

लंच ब्रेक झाला.एका मेनेजर बरोबर गाव बघायला बाहेर पडलो.ऊन लख्ख पडल्याने थंडी कमी भासत होती.मीही आजू बाजूला व इतरांना पाहून शर्ट "इन" केला होता.तरी शॉर्ट स्लीव्ह चा बुशकोट पाहून मी मराठी अथवा मद्रासी असल्याची ओळख सगळ्यांना लगेच पटली होती.कारण किर्लोस्कर्,लेलँड हून येणारी बहुतेक सर्व मंडळी पहिल्यांदा अशीच यायची हे त्या मॅनेजरने अनवधानाने म्हटल अन मग जीभ चावली.

मग फेरफटका सुरू झाला.
उंच पर्वतराई,खाली दरीतून जाणारा नागवळणी कालका-सिमला गाडीचा दिमाखदार ट्रॅक अन तासातासाला जाणारी ती डौलदार आगगाडी,रस्त्यालगत मांडलेल्या तजेलदार भाज्या अन फळे,नुकत्याच संपलेल्या शाळेतून येणारी गणवेषातील मुले अन सफरचंदासारखे त्यांचे गुलाबी गाल्,देखण्या स्त्रिया अन अफगाणी,काश्मिरी अन देवभूमीतील हिंदुंच्या संकराचे वारसदार रुबाबदार पुरुष्,खाली दरीत वाहणारी कौसल्या नदी,

डावीकडे वर विराजमान कसौली टॉवर अन दूर वर दिसणारे सनावर पब्लिक स्कूल --हे प्रथम दर्शन.
एक सुंदर वळसा घेऊन टिंबर ट्रेल या हॉटेल समोर आम्ही उतरलो

मला" अगर फिर्दौस बर रुए जमीन अस्त्,हमीन अस्त हमीन अस्त हमीन अस्त" ची पुनः आठवण आली.
उतरत्या डोंगरांवरील शेती,

खाले खळखळणारी नदी,त्यावरील धनुष्याकृती पूल्,बाजूला पाणचक्की अन दळणारा मक्याचा आटा,दूर एक सुंदर चिमुकले देऊळ्,अन कड्यावर वसवलेले हे हॉटेल्.मालकाच्या सौंदर्य दृष्टीची दाद द्यायला हवी.पर्वतराएच्या उतरणीवर्,तिच्या पाठीवर वसलेली घरे तर इतकी देखणी होती की दोन डोळे पुरत नव्हते.सनावरच्या शाळेची लाल कौले उन्हात चमकत होती.वरखाली करणारे पहाडी एकमेकांना सुरेल हाळी द्यायचे अन ऐकताना कान सुखावयाचे.कौसल्या नदीच्या दोन्ही किनारी गुरे चरत होती.त्यांच्या गळ्यातील किण् किण घंटानाद उत्तरायुष्यात मला माऊंट टिटलसच्या उतारावर पुनः एकदा ऐकू आला.
मला वाटतं इथे "टिम्बर ट्रेल" ला आणणं हा कंपनीच्या एच आर डिपार्र्टमेंटचा युनिक सेलिन्ग पॉइंट असावा.मी तर हरखूनच गेलो होतो अन माझ्या इथल्या पुढील स्वप्नवत आयुष्याची सहकुटुंब सहपरिवार स्वप्ने ऑलरेडी पाहू लागलो होतो.
नाशिकला पोहोचता क्षणी ऑफर लेटर पोहोचले.जी पी ओ तून ट्रंक कॉल करतांना अख्ख्या पोस्ट ऑफिसला मी परवानूला जातोय ही खबर कळली अन त्याबरोबर परवानू कुठे आहे देखील कळले.मे मध्ये आमची अविस्मरणीय आनंदयात्रा,स्वप्नयात्रा सुरू झाली.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! काय सुरेख लिहिलंय.. आत्ता बॅग उचलून परवाणूला पोचावे असे वाटले!
पुभाप्र! वाचायला अतिशय उत्सुक आहे!

मस्त वर्णन.
पण तुमचा लेख फक्त ग्रुपपुरता मर्यादित झालाय त्याला संपादन करून Public करा.

छान

पण हे वाहते पान झाले आहे:)