आर्टिकल 15

Submitted by radhanisha on 2 September, 2019 - 08:47

आर्टिकल 15 चा प्लॉट 2014 साली उत्तरप्रदेशातल्या एका गावात झालेल्या तीन मुलींच्या गॅंग रेपवर आधारित आहे.

डेली लेबरवर काम करणाऱ्या तीन 15 वर्षांच्या मुली मालकाकडे तीन रुपये वाढवून मागतात आणि त्याने नकार दिल्यावरही अडून बसतात. गँगरेप करून "त्यांच्या" समाजाला धडा मिळावा म्हणून त्या मुलींपैकी दोन मुलींचा बलात्कार करून त्यांना जीवे मारून झाडाला लटकावलं जातं , तिसरी निसटण्यात यशस्वी होते . केस बंद करण्यासाठी त्या मुलींच्या वडिलांनाच त्यात गोवण्याचा प्रयत्न सुरू असतो . चुलत बहिणींमध्ये समलैंगिक संबंध होते म्हणून दोघींच्या वडिलांनी संतापाने त्यांचा खून केला असं खोटं कारण निर्माण केलं जातं आणि तशी अफवा पसरवण्याचा पद्धतशीर प्रयत्नही केला जातो .

गावात नवीन नियुक्त झालेला आयपीएस ऑफिसर, अयान रंजन - आयुष्यमान खुराना सत्याच्या मुळापर्यंत जाऊन खऱ्या गुन्हेगाराचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो ...

चित्रपटात कोणतेही टाळ्या, शिट्या पाडू डायलॉग्ज नाहीत , गाणीही जवळपास नाहीतच , मूळ कथा बाजूला ठेवणारी लव्ह स्टोरी नाही... आयुष्यमान खुरानाने अत्यंत खरा वाटेल असा पोलीस अधिकारी साकारला आहे ... यापुढे सिक्स पॅक वाले , 10 गुंडांना लोळवणारे , कुत्तों का झुंड कितना भी बड़ा हो उनके लिए एक शेर ही काफी होता है , आता माझी सटकली - असले नाटकी संवाद असलेले पोलीस पडद्यावर कधीही बघवणार नाहीत ..... बधाई हो हा मी त्याचा पाहिलेला पहिला चित्रपट .. वेगवेगळे विषय असलेले निवडक उत्कृष्ट दर्जाचे चित्रपट करत हा अभिनेता हळूहळू बॉलिवूड मध्ये स्वतःचं स्थान निर्माण करत आहे ....

मनोज पाहवा यांचा चेहरा विनोदी भूमिकांमध्ये पाहिल्याने परिचित होता पण नाव माहीत नव्हतं .. या चित्रपटातली त्यांची भूमिका मात्र विनोदी नाही .. सुरुवातीला राजकीय दबावाखाली असलेला बिचारा पोलीस असं वाटत असताना मध्येच प्रसंगांना कलाटणी मिळून प्रेक्षकाला एक शॉक दिला आहे ... अभिनय अर्थात ग्रेट .

सयानी गुप्ता हीने तीन मुलींपैकी पळून गेलेल्या मुलीच्या मोठया बहीणीचं गौरा हे पात्र साकारलं आहे .. रूढार्थाने सुंदर ह्या व्याख्येत बसत नसली तरी अभिनय अतिशय नैसर्गिक आहे ... कुठलंही कॅरॅक्टर जिवंत करू शकेल असं टॅलेंट तिच्यात दिसलं... या चित्रपटात दरिद्री , बहुजन समाजातील स्त्रीची भूमिका तिने खूप ताकदीने साकारली आहे .

पडद्यावर ग्रामीण भारत जिवंत केला आहे ... उत्तर भारतातल्या खेड्यातली जातीव्यवस्था पाहून मन सुन्न झालं ... टपरीसमोर एक बाक रिकामी असताना 4 लोक खाली बसून चहा पीत आहेत , मंदिरात प्रवेश केल्याबद्दल उघडे करून मारहाण , शाळेतील मुलांचा स्वयंपाक दलित स्त्रीने केला म्हणून 150 मुलांचं अन्न फेकून देणं - तिला काम सोडावं लागणं .. ब्राह्मण - दलित एकता रॅलीत ब्राह्मण उमेदवार / पार्टीचे लोक दलित कुटुंबियांसमवेत बसून जेवताना टीव्हीवर बातम्यांमध्ये दाखवतात , त्यानंतर महंत स्वतःचं जेवण आणि ताट - वाटी स्वतःच्या घरून घेऊन आला होता , ते टीव्हीवर दाखवलं नाही अशी टिप्पणी गौरा करते .

3 मुली मिसिंग असल्याची तक्रार आल्यावर ती नोंदवून घेतली जात नाही ... ज्यावेळी आयुष्यमान एफआयआर का नोंदवला नाही असं विचारतो तेव्हा - " इतना सिरियस नही लग रहा था " असं उत्तर दिलं जातं आणि कब लगता है सिरियस ? विचारल्यावर - " इन लोगों के तो झुठे केसेस आते रहते है " असं उत्तर मिळतं .

2 मुलींची प्रेतं मिळाल्यावरही तिसऱ्या मुलीला शोधण्याबाबत आयुष्यमान बोलत असताना , शोधण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही असं आडून आडून सूचित करण्याचा प्रयत्न केला जातो , एक पोलीस "जनवरी में इन लोगों का एक लडका भाग के गया था" , असं सांगण्याचा प्रयत्न करत असताना " आयुष्यमान तडकून " कौन है ये लोग , इन लोगों का ऐसा , इन लोगों का वैसा , ज्युपिटर वरून आलेत का ? " असा प्रश्न करतो .... " हे लोग " म्हणजे दलितांना वेगळी वागणूक दिली जाणं हे त्याने कधीही अनुभवलेलं नाही ... खुद्द मृत मुलींचे वडील - " रातभर रखके छोड देते , मारा क्यू ? " असा प्रश्न विचारतात तेव्हा काय म्हणावं समजत नाही ... एवढी अगतिकता , आपल्या सोबत अशी भयानक घटना घडणं हे ते किती सहज स्वीकारतात ... आपल्याला न्याय / सुरक्षा मिळेल / मिळावी - तो आपलाही हक्क आहे यांची अपेक्षाही ते करत नाहीत .. आपल्याच देशात एवढया वाईट परिस्थितीत जगणारे लोक आहेत याची आपल्याला कल्पनाही नसते ....

पोस्ट मार्टम मध्ये सामूहिक बलात्कार रिजल्ट आल्यावर रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टर वर दबाव आणण्याचा प्रयत्न , केस क्लोज करण्याचे प्रयत्न , गुन्हेगारापर्यंत पोहोचत असणाऱ्या आयुष्यमानला कायद्याच्या बारीकसारीक नियमांत अडकवून , कुभांड रचण्याचा प्रयत्न करून सस्पेंड करण्याचा प्रयत्न होणं , राजकारण्यांबद्दलची दहशत .. लहान गावातली परिस्थिती .... समाज सुरळीत चालण्यासाठी राजा , सेवक , दास अशी घडी ब्रह्मदेवाने बनवली आहे आपण तिला आव्हान देणं बरोबर नाही असं मानणारे लोक , जो हम देते है वही उनकी औकात म्हणणारा गुन्हेगार , सामाजिक शांतता - सुव्यवस्था टिकवणं म्हणजे अन्यायाला विरोध करणाऱ्यांची तोंडं बंद करणं असं समजणारे तथाकथित सुशिक्षित लोक ... अन्यायाला विरोध करणारे लोक समाजात अस्थिरता उत्पन्न करू इच्छिणारे आहेत असा आरोप करून त्यांची मुस्कटदाबी करणं ..

डोकं भणाणून गेलं चित्रपट पाहताना .... गटारात पूर्ण डुबकी मारून साफ करणारा माणूस पाहून शब्दशः डोळ्यात पाणी आलं ... काय करू शकतो आपण हे बदलावं म्हणून ... Sad माझ्याकडून तरी चित्रपटाला 10 पैकी 10 .. ही ट्रेलरची लिंक ,

https://youtu.be/HKOJY0cU63E

युट्यूब वर पूर्ण चित्रपटही आहे ....

https://youtu.be/kt3KzATtjZI

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा चित्रपट पहावणारच नाही. अभिनय व इतर बाजू उत्तम असतील तर नाहीच नाही.
मानूस हा नक्की कशा प्रकारचा प्राणी आहे? Sad

@ radhanisha

यूट्यूब लिन्क ऑफिशिअल प्रिन्टची नाही, पायरेटेड प्रिंटची आहे, कृपया डिलीट करा.

नेटफ्लिक्स वर ऑफिशिअल प्रिंट आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा.

पाहिला. सुन्न झालं.
निहाल सिंग बद्दल कळाल्यावर तर धक्काच बसला एकदम.!
पण मल एक नाही कळालं..त्या पोलिसाने अंशुला का मारलं?

आयुषमान तर एकदम जबरदस्त अभिनेता आहे यात दुमतच नाही..
संपूर्ण सिनेमात तो आयुषमान न वाटता आयान रंजनच वाटतो. कोण्त्याही भुमिकेत समरसून जातो एकदम.!

.त्या पोलिसाने अंशुला का मारलं?
तो पोलिस ब्रह्मदत्त कि कोन ! तो सुद्धा त्य गँग रेप मध्ये सह भागी होता तापलेले प्रकरन आन्गाशि येइल आनि नोकरि जाईल म्हणून मारले

ओके.
सत्येंद्र ब्रह्मदत्त च नाव घेतो हे समजलं. पण मला तो पोलिस ब्रह्मदत्त आहे हे समजलंच नाही. युटुब च्या प्रिंट वर म्युझिक चा च आवाज जास्त होता. संवाद व्यवस्थित एकू आले नाहीत.

ह्या प्रकरणात खुद्द दोन पोलिस सहभागी होते. किती भयानक आहे हे.!

डाउनलोड करून ठेवला होता, पण बघायला वेळ मिळत नव्हता. पण इकडे वाचून आज थोडा वेळ काढून बघितला, अन खरेच वर्थ आहे.

अनुप कुमार ने टाकलेला विडिओ बघा, क्वालिटी चांगली आहे अन आवाज पण