बाप्पा बाप्पा…

Submitted by Asu on 1 September, 2019 - 22:46

माझ्या नातीने आभाने स्वतः बनवलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीसह-

बाप्पा बाप्पा… (बालकविता)

बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा
बाहेर ये ना मारू या गप्पा
मखरात मस्त जाऊन बसलास
तुला सांगतो तिथेच फसलास
रोज रोज गोड गोड खायला
भारी भारी वस्त्र ल्यायला
आरती पूजा मोठाच थाट
मिठाया मोदक भरलंय ताट
नवस फेडून भरती पेटी
तुझ्या दुधाला सोन्याची वाटी
लाखो जमती दर दिवसाला
श्रीमंतांना तुझा वशिला
ढोल ताशे हवे कशाला
भक्तगण नाचे धुंद नशीला
इवले इवले डोळे काचेचे गोळे
तुला दिसेना गरीब भोळे
सुपाएवढे कान डोईला भार
ऐकू येईना आर्त पुकार
मोदक खाऊन फुगले पोट
जलविन दीनांचे सुकले ओठ
नाही तुला काहीच खबर
मखरातून जरा खाली उतर
लहान तोंडी मोठा घास
हात जोडुनि विनंती खास
सुबुद्धी दे तू मोठ्यांना
अन् मोदक लाडू छोट्यांना

- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
(दि.02.09.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जो जो भजे मज ज्या भावे त्या तैसा मी पावे.
देव गणेश भक्तांना खुश करण्यासाठी दहा दिवस भक्तांचे? वेडेवाकडे प्रेमाचे प्रकार ( चाळे) सहन करतात. भक्तांनी केलेलं ध्वनी, जल, वायू प्रदुषणाचा त्रास भक्तांनाच होतो.