सामाजिक उपक्रम - आपत्ती व्यवस्थापन (भाग २) - प्रश्न मंजुषा

Submitted by संयोजक on 31 August, 2019 - 20:25

आपत्कालीन व्यवस्थापन -प्रश्न मंजुषा
---------------------------------------------

नमस्कार सर्वांना,

मानवाने अनिर्बंधपणे वापरलेले कर्म स्वातंत्र्यच मानवी जीवनात अनेक ठिकाणी विविध विघ्ने अर्थात आपत्ती निर्माण करत असते. वित्त आणि जीवितहानी करणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे आपत्ती. अशी आपत्ती शक्यतो येऊच नये आणि आलीच तर योग्य त्या उपाययोजनांमुळे कमीत कमी हानी होईल ह्यासाठी उचित प्रयास करणे हे आपलं कर्तव्य असते. म्हणूनच आपत्ती व्यवस्थापन आता काळाची गरज झाली आहे. ह्याविषयीची अनेक चर्चासत्रे आपण प्रत्यक्ष आपत्ती घडून गेल्यावर ऐकत असतो, पाहत असतो. आपल्याला काही जुजबी गोष्टींचे ज्ञान असावे म्हणून इकडे आपण एक २५ प्रश्नांची छोटीशी प्रश्न मंजुषा देवून त्यातून मिळणारी उत्तरे आणि होणाऱ्या चर्चेद्वारे अश्या परिस्थितीत वापरण्याजोगे विविध पर्याय मायबोलीकरांच्या माहितीसाठी ठेवत आहोत ज्यातुन काही नवीन गोष्टी नक्कीच शिकायला मिळतील.

विषय खुप व्यापक प्रमाणात असल्याने आपण सर्व काही ह्या २५ मुद्द्यांमध्ये समाविष्ट करू शकत नाही तरीही आपल्या व्यक्तिगत जीवनात ज्या गोष्टी उपयोगी असतील त्याचा प्राधान्याने विचार करून हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. प्रत्येक प्रश्नानंतर त्याचे थोडक्यात उत्तर देवून ससंदर्भ स्पष्टीकरण अपेक्षित आहे. आपल्याला येथे ५ मुख्य मुद्द्यांवर प्रत्येक विषयासंबधी ५ प्रश्न दिले जातील. प्रत्येक विषयाची उत्तरे आणि चर्चेसाठी १ दिवस देण्यात येईल. त्यानंतर पुढील विषयासंबधी प्रश्न मंजुषा सादर करण्यात येईल.

ह्या उपक्रमाकरिता खालील विषय असतील ―

१) रस्त्यावरील अपघात -
(शहरी विभाग आणि गाव)
५ सप्टेंबर २०१९

२) स्वयंपाक घरातील अपघात -
(प्रामुख्याने आग)
६ सप्टेंबर २०१९

३) विद्युतशक्ती संबंधी आपत्ती -
(घर आणि ऑफिस)
७ सप्टेंबर २०१९

४) नैसर्गिक आपत्ती -
( पुर, भूकंप, वादळ आणि भूस्सखलन )
८ सप्टेंबर २०१९

५) मानव निर्मित आपत्ती -
(युद्धजन्य परिस्थिती )
९ सप्टेंबर २०१९

~~~~~~~~~~~~~~~~~~~

विषय क्रमांक १
रस्त्यावरील अपघात -

१) अपघातग्रस्त जख्मी व्यक्तीच्या डोक्याला मार लागला असेल आणि जखमेतून रक्तस्त्राव होत असेल तर बँडेज बांधताना काय काळजी घायला हवी ?

२) शेतातील वाटेवर एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आहे आणि प्राथमिक निरीक्षणात त्या व्यक्तीस साप चावल्याचे लक्षात आले तर एक आपत्कालीन स्वयंसेवक म्हणून तुम्ही काय काय खबरदारीचे उपाय अवलंबात आणाल ?

३) दुचाकी अपघातात एक हात अस्थिभंग झालाय आणि अंतर्गत रक्तस्त्राव असण्याचीही शक्यता आहे तर अश्या अत्यव्यस्थ रुग्णास कुठला प्रथमोचार करतात ?

४) स्वताःचा जीव वाचविणे आणि लगोलग आपली रस्सीसुद्धा परत मिळवणे हे कुठली आपत्काल परिस्थिति उद्भवल्यानंतर करावयाची योजना आहे आणि ह्यासाठी कुठली गाठ वापरावी ?

५) पाण्यात बूड़त असणाऱ्या व्यक्तीस दोरीच्या साहाय्याने कसे वाचवले जाते आणि बुडून बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीस कुठल्या प्रकारचा कृत्रिम श्वासोच्छवास द्यायचा असतो ?

---------------------------------

विषय क्रमांक २
स्वयंपाक घरातील अपघात -

१) आगीमुळे घरातील जिन्याचा वापर करणे आपत्कालीन परिस्थितीत शक्य न झाल्यास दुमजली घरात अडकलेल्या आणि/किंवा जख्मी व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यासाठी दोरीचा वापर कश्या पद्धतीने करता येईल ?

२) स्टोव्हचा भड़का उडाल्याने किंवा इतर कुठल्याही प्रकारे आग लागण्याची संभावना असल्यास आग फैलावु नये ह्याकरिता आगीच्या त्रिकोणापैकी कुठल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित कराल आणि त्यासाठी काय कार्यवाही कराल ?

३) गॅस शेगडीचा बर्नर चुकून चालुच राहिलाय आणि थोड्याच वेळात गॅसचा वास आल्याने तुम्हाला ते लक्षात आले तर आपत्ती व्यवस्थापनासाठी तुमच्या प्रतिक्रियेचा क्रम काय असेल ?

४) गरम /उकळते तेल अंगावर पडल्यास कोणते प्रथमोचार आवश्यक आहेत ?

५) स्वयंपाक घरातील नित्याच्या वापरातील असणाऱ्या वस्तुंपैकी प्राथमिक उपचारासाठी कोणकोणत्या गोष्टी उपयोगी पडू शकतात त्याची विस्तृत यादी नमूद करा.

--------------------------------------

विषय क्रमांक ३
विद्युतशक्ती संबंधी आपत्ती-

१) तुम्ही तुमच्या कार्यालयात महत्वाची कागदपत्रे हाताळत असताना अकस्मात शॉर्ट सर्किटमुळे आग भडकली तर तुमच्या प्रतिक्रियांचा क्रम काय असेल ?

२) विजेचा धक्का बसत असणाऱ्या व्यक्तीस वाचवताना आपण कायकाय खबरदारी घेणे आवश्यक आहे आणि विजेच्या धक्क्याने बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीस काय प्रथमोचार द्यावा ?

३) पावसाळ्यात वीजा कड़कड़त असताना उघड्या जागी आडोसा शोधताना आपण कुठल्या स्थानाना टाळले पाहिजे ?

४) बिघाड झाल्याने विजेचा सौम्य झटका लागत असलेले घरगुती उपकरण अत्यावश्यक परिस्थितीत वापरण्याची वेळ आली तर काय काळजी घेणे अपेक्षित आहे ?

५) चार चाकी वाहन चालवत असताना एक तीव्र दाबाची जीवंत विद्युतवाहिनी जर रस्त्यावर पडलेली असेल तर तो रस्ता ओलांडताना आपण कसली खबरदारी घ्याल ?

--------------------------------------

विषय क्रमांक ४
नैसर्गिक आपत्ती -

१) भूकंपानंतर आपत्कालीन स्वयंसेवकाचे प्रथम कार्य काय असते आणि ते कसे पार पाडले जाते?

२) पुरासारख्या नैसर्गिक आपत्ती नंतर दुय्यम आपत्ती कुठली ठरू शकते ? त्यासाठी प्रतिबंधक उपाय काय ?

३) शक्तिशाली चक्रीवादळा सारख्या आपत्तीमध्ये नियमित दळण वळणाची सुविधा कोलमडून पडलेली असताना आपण आपल्या मदतीसाठीचा संदेश बाह्य जगात कसा पोहोचवू शकतो ? ह्यासाठी वापरली जाणारी यंत्रणा कशाप्रकारे कार्य करते ?

४) भूस्खलन टाळता येण्यासाठी कोणत्या उपाय योजना करणे आपल्याला शक्य असते ?

५) आज आपल्या देशात अनेक ठिकाणी उद्भवत असलेली भूजलसाठ्याची कमतरता आणि अवर्षणासारख्या घटना ह्या खऱ्या अर्थाने नैसर्गिक आपत्ती म्हणता येणार नाहीत ह्यामागील कारणे लिहा.

--------------------------------------

विषय क्रमांक ५
मानव निर्मित आपत्ती -

१) आण्विक स्फोट झाल्यावर आपण सुरक्षित स्थळ म्हणून कशाचा उपयोग कराल ? का ?

२) युद्धपश्चात किंवा इतर कुठल्याही परिस्थितीत जीवंत बॉंम्ब निदर्शनास आल्यावर कोणकोणती कारवाई करणे अपेक्षित आहे ?

३) कुठले अस्त्र गरीबांचा अणुबॉम्ब म्हणून ओळखले जाते आणि का ?

४) युद्धजन्य किंवा दंगल परिस्थितीत ही एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने टाळायची आहे ती म्हणजे .....? कारण ..?

५) घरफोडी किंवा चोरी अश्या गोष्टी सणवाराला असलेल्या मोठ्या सुट्टीच्या कालावधीत आपल्याबाबत घडू नयेत म्हणून काय काय खबरदारी घ्यावी ?

––•○□धन्यवाद□○•––

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रस्त्यावर अपघात झालेल्या व्यक्तिची इच्छा "मला कुठल्यातरी हॉस्पिटलमध्ये न्या" ही असते. आपण काही करावे अशी अपेक्षा नसते. शिवाय कोण पट्टी घेऊन फिरत असतो?
तसेच ही खरी पोलीस केस असल्याने सिविल हॉस्पिटलमध्ये नेऊन नोंद करून उपचार करून घ्यावे लागतात.

आपत्कालीन व्यवस्थापनाचे बेसिक ट्रेनिंग घेतले आहे त्यामुळे आवडता विषय आहे. ह्या पावसाळ्यात भारताने भरपूर आपत्तींना तोंड दिलं आहे आणि आपत्कालीन व्यवस्थापन थोडेफार शिकून घेणे काळाची गरज आहे. संयोजकांनी हा विषय ठेवल्याबद्दल आभार.

१) अपघातग्रस्त जख्मी व्यक्तीच्या डोक्याला मार लागला असेल आणि जखमेतून रक्तस्त्राव होत असेल तर बँडेज बांधताना काय काळजी घायला हवी ? - डोक्यात काच वगैरे गेली असेल तर डॉक्टरांच्या हवाली करेपर्यंत त्या काचेला धक्का लागून अजून रक्तस्त्राव होवू नये म्हणून त्या जखमेभोवती चुंबळी (डोक्यावरून मोठ्या पाट्या वाहून नेतात तेव्हा डोक्यावर फडक्याचा गोल करून ठेवतात तो) ठेवून मग बॅन्डेज बांधावे. हे बँडेज अगदी पट्टीचे असावे असे नाही. उपलब्ध कुठल्याही स्वच्छ कापडाचे असावे. चुंबळी देखील मोठा रुमाल वगैरेची करता येते.

२) शेतातील वाटेवर एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आहे आणि प्राथमिक निरीक्षणात त्या व्यक्तीस साप चावल्याचे लक्षात आले तर एक आपत्कालीन स्वयंसेवक म्हणून तुम्ही काय काय खबरदारीचे उपाय अवलंबात आणाल ? - हाता किंवा पायाला साप चावला असेल तर उपलब्ध दोरी, कापड दंश केलेल्या जागेपासून हृदयाच्या बाजूला घट्ट बांधावे व विषयुक्त रक्ताचा हृदयाच्या दिशेचा प्रवाह थांबवायचा प्रयास करावा आणि ताबडतोब दवाखान्यात घेवून जावे.

३) दुचाकी अपघातात एक हात अस्थिभंग झालाय आणि अंतर्गत रक्तस्त्राव असण्याचीही शक्यता आहे तर अश्या अत्यव्यस्थ रुग्णास कुठला प्रथमोचार करतात ? - ताबडतोब त्रिकोणी कापडाने (त्रिकोणी नसेल तर चौकोनी कापड/स्कार्फ कर्णामध्ये दुमडून त्रिकोण बनवावा) हात अलगद गळ्यात बांधावा आणि कोपराच्या बाजूला कापड जरा दुमडून सेफ्टीपीन लावून खोबणी तयार करावी म्हणजे हात त्या झोळीतून सटकून, धक्का लागून अजून त्रास होणार नाही. मग डॉक्टरांकडे हलवावे.

४) स्वताःचा जीव वाचविणे आणि लगोलग आपली रस्सीसुद्धा परत मिळवणे हे कुठली आपत्काल परिस्थिति उद्भवल्यानंतर करावयाची योजना आहे आणि ह्यासाठी कुठली गाठ वापरावी ? - एखाद्या आग लागलेल्या इमारतीतून दोरीच्या सहाय्याने खाली उतरायचे असेल तर खिडकीच्या मजबूत गजाला चोर गाठ (Draw Hitch) बांधावी म्हणजे तोच दोर परत मिळवून पुढल्या रेस्क्यूसाठी वापरता येतो.

५) पाण्यात बूड़त असणाऱ्या व्यक्तीस दोरीच्या साहाय्याने कसे वाचवले जाते आणि बुडून बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीस कुठल्या प्रकारचा कृत्रिम श्वासोच्छवास द्यायचा असतो ? - जाड दोराच्या एका टोकाला नाविक वापरतात तशी गाठ मारायची. ही गाठ खूप मोठी असते त्यामुळे जडही असते. दोराचे दुसरे टोक डाव्या हातात घेवून उजव्या हाताने उरलेल्या दोराचे मोठे लूप्स विशिष्ठ पद्धतीने करून डाव्या पंजात एकत्र धरायचे. पंजा लूज ठेवायचा. गाठीचं टोक उजव्या हातापासून थोडं खाली लटकतं राहील अश्या पद्धतीने उरलेला दोर उजव्या हातात घेवून गाठीचा पेंड्युलम जरा हलवून उजव्या हाताने तो दोर वाहून जाणार्‍या/बुडणार्‍या व्यक्तीच्या दिशेने फेकायचा. डाव्या हातातील लूप्स लूज असल्याने गाठीच्या वजनाचा अंदाज घेवून दोर कंट्रोलमध्ये ठेवून हव्या तितक्या अंतरावर फेकता येतो. त्या व्यक्तीला तो दोर पकडण्यास सांगून दोर हळूहळू खेचून घ्यावा.

बुडून बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीस CPR द्यावा.

खुप छान उपक्रम. अश्विनी छान माहिती. फक्त या गाठी कश्या पध्दतीने मारतात त्याचे व्हिडियो देता येत असतील तर पहा.

खुप छान प्रतिसाद अश्विनी के

https://m.youtube.com/watch?v=soq9CiuX67w
सीपीआर पद्धत
__________

आधी सीपीआरच्या वेगवेगळ्या पद्धती प्रसंगानुरूप वापरल्या जात जसे की शेफ़र्स, सिल्वेस्टर, होल्गर नेल्सन इत्यादी. आता आधुनिक तंत्रज्ञानाने सर्वच सुलभ झालेय तरीही बेसिक गोष्टी माहीत असल्यास आणि सराव केल्यास अश्या बिकट स्थितीत नक्कीच उपयोगी पडतात.

माझ्यापरीने उत्तरं द्यायचा प्रयास करतेय. माझी थोडी रिव्हिजन होतेय. तरी रिफ्रेशर कोर्स करायला हवाय परत. इतरांनीही भर घाला.

१) आगीमुळे घरातील जिन्याचा वापर करणे आपत्कालीन परिस्थितीत शक्य न झाल्यास दुमजली घरात अडकलेल्या आणि/किंवा जख्मी व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यासाठी दोरीचा वापर कश्या पद्धतीने करता येईल ? -

खुर्चीची गाठ - ह्या गाठीत खुर्चीसारखं बसवून माणसाला सुरक्षितपणे खाली उतरवू शकतो. ह्याचे प्रॅक्टिकल आम्ही ट्रेनिंगच्या वेळेस केले आहे.

शिडीची गाठ - ह्या गाठीत अंतरा अंतरावर गाठी पाडल्या जातात. अक्षरशः २-५ मिनिटांत कितीतरी गाठी पाडायचं टेक्निक आहे ह्यात. ह्या गाठी पावलाच्या अंगठ्याच्या बेचक्यात अडकवून पायर्‍या उतरल्याप्रमाणे खाली उतरायचे. जरा धाडसी आहे, पण वेळ येताच वरून धडाधडा खाली उड्या टाकण्याचे वेडे धाडस करण्यापेक्षा थोडा पेशन्स व हिंमत राखून तरूण लोक असे उतरू शकतात.

२) स्टोव्हचा भड़का उडाल्याने किंवा इतर कुठल्याही प्रकारे आग लागण्याची संभावना असल्यास आग फैलावु नये ह्याकरिता आगीच्या त्रिकोणापैकी कुठल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित कराल आणि त्यासाठी काय कार्यवाही कराल ?

फायर ट्रँगल - Oxygen, Heat, Fuel. ह्या तिन्हीपैकी एक जरी गोष्ट तोडता आली तरी आग विझते.

उदाहरण :-

Oxygen - फोडणीने पेट घेतला. स्वैपाकघरात कणीक तर हाताशी असतेच. एक बचकभर कणीक घेवून पेटलेल्या फोडणीच्या/तेलाच्या कढई/कढल्यात टाकायची. Oxygen तोडला गेल्याने आग विझते.

३) गॅस शेगडीचा बर्नर चुकून चालुच राहिलाय आणि थोड्याच वेळात गॅसचा वास आल्याने तुम्हाला ते लक्षात आले तर आपत्ती व्यवस्थापनासाठी तुमच्या प्रतिक्रियेचा क्रम काय असेल ? - शेगडी / सिलिंडर बंद करणे, दारं खिडक्या सताड उघडणे व जमलेला गॅस बाहेर जावू देणे. उदबत्ती/निरांजन पेटलेले असेल तर ताबडतोब विझवणे. विजेच्या उपकरणांच्या स्विचला बंद्/चालू न करणे. असे करताना स्पार्क उडून गॅस पेट घेवू शकतो. गॅस कंपनीला लीकेजबद्द्ल तक्रार देवून ताबडतोब माणूस बोलावून घेणे.

४) गरम /उकळते तेल अंगावर पडल्यास कोणते प्रथमोचार आवश्यक आहेत ? - शक्य असल्यास तेल पुसून घेवून भाजलेला भाग ताबडतोब गार पाण्याखाली (बर्फाच्या नव्हे) धरणे, भाजलेल्या जागेवर उपलब्ध असल्यास sterile gauze टाकून (घट्ट बांधून नव्हे) ताबडतोब डॉक्टरकडे जाणे.

५) स्वयंपाक घरातील नित्याच्या वापरातील असणाऱ्या वस्तुंपैकी प्राथमिक उपचारासाठी कोणकोणत्या गोष्टी उपयोगी पडू शकतात त्याची विस्तृत यादी नमूद करा. - हळद, साखर, धुतलेली फडकी, पाणी ---- अजून आठवलं तर लिहीन.

छान चाललीय चर्चा!

जखमेवर रक्त थांबण्यासाठी कॉफी पण टाकलेली बघितलीय मी.... योग्य आहे का ते?

आणि भाजलेल्या जागेवर बटाटा खिसून लावलेलाही पाहिला आहे!

फायर फाईटिंग आणि फर्स्ट एड चे कोर्स आणि ट्रेनिंग कंपनीमध्ये असताना झालं. पण त्या वेळी फ्याक्ट्रीत काही प्रसंग झाला तर त्या साठी ठेवलेल्या डिपार्टमेंटचे लोक कामं करतील, तुम्ही त्यांना मदत करायची हे सांगितले होते. स्वत: ठरवायचे नव्हते. खोटे लुटुपुटू ड्रील होत असे दर महिन्याला. बाहेर काही करण्याचा प्रसंग आला नाही.
बाहेर फार विचित्र अनुभव येतात. मदत करणाऱ्यावरच पोलीस संशय घेतात म्हणून लोक मागेमागे राहतात. एकदा माळशेज घाटात धबधब्यात भिजणारा घसरून पडला, पायाचे हाड मोडलेला तरुण होता. त्याच्या बरोबरच्या मित्रांनी त्यास रस्त्यातच आडवे झोपवून एसटी थांबवली. तो ओरडत होता. कंडक्टर दारही उघडायला तयार नाही. "मजा करताय ना? खासगी वाहनाने न्या."
"अहो कोण घेत नाही."
" नाही घेणार, पुढे पोलीस केसमध्ये याच एसटीचा नंबर लिहितात की आम्हालाच गुंतवतात. तुमच्याच बसलाच अपघात झाला. "
"घ्या हो."
"घेतो, पण टोकावडेला उतरा,आणि दुसरे वाहन करा."
कंडक्टरांना वाईट अनुभव असतात.
----
नुसते ज्ञान कामाचे नाही. नसत्या उचापत्या अंगाशी येतात.
--------
शेजारीपाजारी काही झालं तर मदतीला जातोच. पण विचारतो कोणत्या हॉस्पिटलात नेऊ. खरं म्हणजे अपघात झाल्यास सिविलमध्येच न्यायचे असते पण यांचा विश्वास अमक्यातमक्याकडे बेस्ट ट्रिटमेंट मिळते. सल्ला देऊन काही उपयोग होत नाही. कुठे जायचे तिकडे पोहोचवायचे. उगाच पट्टी मारण्यात वेळ घालवला असं पुढे कोण म्हणेल ते नकोच.

स्वयंपाकघरातील प्रथमोपचार साहीत्य = हळद,चहापत्ती - छोटी जखम [ कापणे, खरचटणे ] ,साखर,मीठ,पाणी - अशक्तपणा वाटल्यास,बटाटा - भाजणे, जिरेपूड- बारीक ताप असल्यास,मोहरी - पोटीस,धणे-ऊन्हाळी,हिंग- पोटदूखी,सूंठ-डोकेदूखी.

तूप == किरकोळ भाजलेली जख्म लवकर भरून त्वचा पूर्ववत होण्यासाठी

चुना + गुळ + कच्चा तंबाखू = काच फुटून तिचा बारीकसा (अगदी साखरेच्या कणा इतका) तुकड़ा किंवा एखादे बारीक कुस पायात शिरला असेल तर हे कॉम्बिनेशन त्याला बाहेर खेचून काढ़ते

दूध + जायफळ उगाळून लावलेले ( तसेच मीठ पाणी घड़ी) खुप ताप असताना उष्णता कमी करते

तुरटी = कापल्याने रक्त आल्यास ते थांबवण्यास

साधी कॉफी = लूझ मोशन्स मध्ये उपयोगी

लाटणे, पोळी भाजण्यासाठीचा कालथा = हाताच्या फ्रैक्चरसाठी झोळी बैंडेज करताना आधार पट्टी

--------- इमर्जन्सी मध्ये प्रथमोचार करून नंतर योग्य वैद्यकीय उपचार हे आवश्यक--------

मुकामार लागल्यास आणि त्यावर सूज आल्यास अनेक वेदना शामक गोष्टी आपल्या किचन मध्ये असतात.

आग लागण्याविषयी एक वाक्य वाचलेले आठवले --
आग लागली की ती विझवायला पहिल्या क्षणाला १ पेलाभर पाणी पुरेसे असते, दुसऱ्या क्षणाला बादलीभर पाणी पूरते मात्र तिसऱ्या क्षणाला कित्येक टैंकर पाणी अपुरे पडते.

हा त्रिकोण आणि त्यातील ३न्ही बाजूंचे गुणधर्म कायम ध्यानात ठेवले तर ह्या आपत्तीपासून आपण नेहमीच सुरक्षित राहू शकतो हे नक्की !

अतिशय उपयुक्त धागा.
सर्वानी चांगली माहिती दिली आहे.एक शंका
आमच्याकडे आग विझवायचे सिलिंडर आहे.अश्या वस्तू शक्यतो वापराव्या लागू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते.पण असे होण्यात तो 3 वर्षं तसाच पडून आहे.भगवान ना करे वापरायची वेळ आली आणि तो बिघडला आणि वापरता आलाच नाही(न वापरल्याने पार्ट गंजले कळलं) तर काय?
असे सिलिंडर ठीक आहेत का हे दर वर्षी तपासायची काही योजना/ट्रिक आहे का?