सामाजिक उपक्रम - चर्चासत्र - आपत्ती व्यवस्थापन (भाग १)

Submitted by संयोजक on 31 August, 2019 - 20:17

आजच्या चर्चासत्राचा विषय आहे, "आपत्ती व्यवस्थापनासंबंधी पूर्वतयारी".

आपत्ती (Disaster) म्हणजे काय?
अतिशय कमी वेळेत समाजाच्या नित्यक्रमात व्यत्यय येतो ज्यामुळे, खूप व्यापक प्रमाणात परिसरातील माणसं, प्राणी व वनस्पती यांची जीवितहानी होते, आर्थिक नुकसान होते अशा दुर्घटनेला आपत्ती म्हणतात.
संदर्भ https://en.wikipedia.org/wiki/Disaster

आपत्तीचे प्रकार -
दोन मुख्य प्रकार म्हणजे नैसर्गिक व मानवनिर्मित.
भूकंप, भूस्खलन, पूर व दुष्काळ या सारख्या आपत्ती या नैसर्गिक आहेत.
तर, दंगल, चेंगराचेंगरी, युद्ध, अणुस्फोट किंवा औद्योगिक रसायनांची गळती या सारख्या आपत्ती मानव निर्मित आहेत.

आपत्ती व्यवस्थापनाची गरज -
बदलत्या काळामध्ये सगळ्यांनीच, अगदी प्राथमिक का होईना, पण आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी करणे गरजेचे आहे. पूर्व तयारीचा भर, प्रत्यक्ष आपत्ती येण्याआधी काय काय करावे यावर आहे. यात घरातल्या सदस्यांशी संवाद साधून ऐनवेळेला काय करायचे , कुठे जायचे, कोणाशी संपर्क करावा याची माहिती चर्चा करून ठरवावी. यामुळे प्रत्यक्ष आपत्तीमध्ये होणारे सर्व प्रकारचे नुकसान कमीतकमी करता येऊ शकते.

पुनर्वसन व प्रशासनाचा सहभाग -
आपत्ती येऊन गेल्यानंतर झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याप्रकारे मदत केली जाऊ शकते? तुम्ही इतरांना नव्याने उभे राहण्यासाठी कशाप्रकारे मदत करू शकता?

आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण -
तुम्ही हे प्रशिक्षण घेतले आहे का? यासाठी मान्यताप्राप्त काही संस्था किंवा आंतरजालावर अभ्यासक्रम आहेत का? वैयक्तिक पातळीवर या प्रशिक्षणाचा तुम्हाला कसा उपयोग झाला?

या वर्षी महाराष्ट्रात पूर व दुष्काळ परिस्थिती एकाच वेळेला वेगवेगळ्या भागांत होती. पूर परिस्थिती आता निवळली असली तरी, पूरामुळे झालेले नुकसान भरून काढण्यात अनेक जणं गुंतलेले आहेत. प्रत्यक्ष पूरापेक्षा पुरानंतर रोगराई, आर्थिक इ स्वरूपात जास्त नुकसान होऊ शकते.

आपले कोणी मायबोलीकर प्रत्यक्ष पुरपरिस्थितीत अडकल्याने क्षतिग्रस्त झाले असतील तर त्या सर्वांचे येथे नमूद केलेले (अराजकीय) निरीक्षण आणि कोणी मायबोलीकर मदत कार्यात वैयक्तिक स्तरावर किंवा संस्थेतर्फे सहभागी झालेले असतील तर त्यांचे प्रत्यक्ष अनुभव आणि मदत कार्यात जाणवलेल्या त्रुटी ह्याविषयीचे मांडलेले मूल्यमापन सर्वांसाठी मार्गदर्शक ठरू शकते. उपलब्ध संसाधनाची कमतरता आणि त्यावरही मात करून देवू करण्यात आलेली मदत ह्याचा थोडक्यात परामर्श येथे घेता येईल. आणि जर पुन्हा कधी दुर्दैवाने अशी परिस्थिती उद्भवली तर आपल्याकडे कायकाय असायला हवे होते, आणि काय नाही मिळाले तरी त्यासाठी कशी पर्यायी व्यवस्था उभारता येऊ शकते ह्यासंबधी सर्व नागरिकांमध्ये जागरूकता येणे हां एकमेव उद्देश येथे आहे.

चर्चेच्या अंतिम टप्प्यात पूरग्रस्त भागातील नागरिकांनी किंवा प्रशासनाने काही पूर्वतयारी केली होती का? कशा प्रकारे? त्याचा कसा फायदा झाला? ह्याचाही एक तटस्थ भूमिकेतून आढावा येथे घेता येईल.

आपत्ती व्यवस्थापन (भाग २) - प्रश्न मंजुषा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला स्वतःला आपत्ती मधे सापडल्याचा अथवा व्यवस्थपानाचा प्रत्यक्ष अनुभव नाही परंतु मी संलग्न असलेल्या मैत्री संस्थेतर्फे पूर आपत्तीग्रस्त भागात, कामाचा पूर्वानुभव असलेल्या स्वयंसेवकांच्या गटाला पूरग्रस्त भागात मदतकार्य करताना आलेल्या अनुभवांचा वृत्तांत महाराष्ट्र टाईम्स मधे प्रसिद्ध झाला होता त्याचा हा दुवा

https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/floods-floods-...

महापूर किती मोठा होता किंवा किती भयंकर हे तसं टीव्ही मध्ये बघतच होतो पण बघणं आणि प्रत्यक्ष असा प्रसंग आपल्यावर येणं यात खूप फरक आहे. सांगली मध्ये जास्त पाऊस पडलाय आणि म्हणून पूर आलाय असं आतापर्यंत कधीच झालं नाही. कोयना परिसरात आणि चांदोली परिसरात पाऊस झाला की सांगलीत पूर येतो. २००५ ला पूर आलेला तेव्हा लोकांना कुठे पाणी आलेलं वगैरे अंदाज होता आणि त्याभरवश्यावर राहिल्याने सगळा गोंधळ झाला. खरंतर पाणी येणार हे जवळ जवळ दिसत असताना लोक घर सोडायला तयार न्हवते. का ते त्यांनाच माहीत? पाणी ४ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट दरम्यान थोडे अतिच वाढले (५० फुट ते ५५फुट) आणि जे नको व्हायला होतं तेच झालं. बरीच लोकं आपापल्या घरी छतावर, पहिल्या मजल्यावर वगैरे अडकले. इथून सुरवात झाली ती मदतकार्याची. मदतकार्य हे दोन प्रकारचे होते. १)पुरात अडकलेल्या लोकांना वाचवणे आणि २)काही जणांनी बेघर लोकांना आपल्या घरी, सार्वजनिक मंदिरात एखाद्या हॉल मध्ये राहण्याची सोय करून दिले. काहींनी आपले शेड्स जनावरांना बांधण्यासाठी उपलब्द करून दिले.
यातील पाहिले मदतकार्य फार अवघड होते. कारण एक तर बोट तेवढ्या प्रमाणात उपलब्द न्हवत्या आणि दुसरे म्हणजे लोक घराच्या बाहेर निघायला तयार न्हवते. काही बिल्डिंगस चे इन्ट्रन्स हे तळघरातून होते आणि तेच पाण्यात गेल्यामुळे त्यांना बाहेर कसं काढायचा हा एक मोठा प्रश्न होता. त्यातच पुरामुळे त्या भागातील वीजपुरवठा ही बंद होता. समोर पाणी होतं पण नळाला पाणी नसल्याने प्यायच्या पाण्याचा ही प्रश्न पडलेला. आणखी एक मुख्य अडचण म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध येताना बोट गटांगळ्या खात होती. बोट पाण्यात जाताना गणपती बाप्पा मोरया म्हणून जायची आणि काही तासात तीन चार लोकांना घेऊन यायची. आता बरीच मदत येऊ लागली होती पाणी ही हळूहळू उतरत होतं.पण लोकांनी मेहनतीने बांधलेली घरं बऱ्यापैकी उध्वस्त झालेली होती. सांगलीची मुख्य बाजारपेठ ही नदीच्या जवळ असल्याने तीही पूर्णपणे पाण्यात होती. परिणामी व्यापार आणि व्यवहार दोन्ही ठप्प होते. आता खरतर मुख्य पार्ट सुरू झाला होता पुनर्वसन चा. शहरात बघावं तिकडे फक्त आणि फक्त लोकांनी घरातून बाहेर काढलेला कचरा होता. या आपत्ती साठी काय योजना कराव्या हा एक प्रश्नच आहे तसा? हे लिही पर्यंत सांगलीत आयुर्विन पुलावर पाण्याची पातळी २७ फुटावर गेल्याची समजतंय आणि शहरावर पुन्हा एकदा महापुराचं सावट येऊ पाहतेय. गणपती बाप्पा आता तूच वाचाव तुझ्या भक्तांना! गणपती बाप्पा मोरया!!

हां अनुभव वाचता एकच लक्षात येते सांगली कोल्हापुरकरांना खुप बिकट परिस्थितीचा सामना करावा लागलाय आणि त्यातून अजूनही पुरेशी सुटका झालेली नाही.
कोकण विभागातील कोणी मायबोलीकर असतील तर त्यांचेही अनुभव येथे मांडले तर बरे होईल !

आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण -
तुम्ही हे प्रशिक्षण घेतले आहे का? यासाठी मान्यताप्राप्त काही संस्था किंवा आंतरजालावर अभ्यासक्रम आहेत का?

प्रशिक्षण घेतलेले नाही घेण्याची ईच्छा आहे अशांकरता पुण्यात मैत्री आणि परिवर्तन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे:
आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा
https://www.maayboli.com/node/72346