तो आवाज आला त्या रात्री !!!...

Submitted by Sujata Siddha on 28 August, 2019 - 07:37

रात्रीच्या काळोखात लांबलचक चकचकीत दिसणाऱ्या नागमोडी डांबरी रस्त्यांकडे पाहत वारणा बसून होती , खरं तर रात्र असली तरी म्युनिसीपालटीचे दिवे रस्त्यावर सर्वत्र लुकलुकत होते , पण त्याच्या प्रकाशात ते शांत लांबवर पसरलेले अरुंद डांबरी रस्ते जास्त गूढ दिसत होते . मुंबईत १० बाय बाराच्या जेमतेम दोन खोल्यात आणि 12 माणसांच्या कुटुंबात वारणा रहात होती , आई वडिल ,आजी -आजोबा , काका काकू त्यांची तीन मुलं आणि एक लग्न न झालेली आत्या आणि , तिच्याहून लहान एक काका , त्यातच आता वारणाला नवीन भावंड येऊ घातलं होतं ,दिवसभर दोन खोल्यांच्या आणि एवढ्या माणसांच्या गराड्यात वारणा गुदमरून जाई , पिकलेलं उंबर टपकन खाली पडल्यावर त्या एवढ्याशा उंबरात बुजबुजलेले लाल लाल किडे कसे दिसतात , आपल्या घराचा पत्रा जर कोणी वरून उचकटून आत डोकावून पाहिल तर आपण ही असेच दिसत असू ,तिला वाटे . उन्हाळ्याची सुट्टी म्हणून वारणा आपल्या आजीकडे औरंगाबाद ला आली होती ,आजोळचं भरलं गोकुळासारखं वाटणारं ऐसपैस घर, वारणाला त्याचं फार अप्रूप होतं . सरकारी घरांची हि वसाहत लांबच लांब पसरली होती , प्रत्येकाच्या हुद्द्याप्रमाणे घरांचे types होते , A, B ,C D..आणि त्यानुसार रचना होती , वारणाच्या आजोबांच घर D - type मध्ये होतं , ‘ त्याला दोन्ही बाजूंनी दार आणि दोन्ही बाजूंनी अंगण होतं , पुढचं मोठ्ठं अंगण मुलांना खेळण्यासाठी, त्याच्या समोर काळे डांबरी रस्ते होते जिथून उपनगरा मधून बाहेर रोडपर्यत ,किरकोळ वाहतूक चालत असे , आजूबाजूच्या प्रत्येक घरापुढे असंच अंगण , तिथून पायऱ्या चढून वर आलं की मग ओसरी ,मग हॉल , आतल्या बाजूला पूर्वेला स्वयंपाक घर ,त्याच्या डाव्या बाजूला मोठया मामा -मामी ची खोली, पुढे धाकट्या मामा-मामाची खोली , मग भलामोठा व्हरांडा आणि त्याच्या पुढे मागचं अंगण , त्याला आजी परसदार म्हणे , तिथे सीताफळ, शेवगा, कडुनिंब यांची झाडं लावलेली , तिथंच आजीने लिंपून ठेवलेली भली मोठी चूलही होती . रात्री जेवण झाल्यावर मामा , मामी आजी आजोबा सगळे गप्पा मारत असत , उन्हाळ्यात गरम होऊ लागलं की सगळे रहिवासी पुढल्या दाराच्या ओसरीवर झोपत , वारणाच्या घरचेही , असं बाहेर झोपलं की रात्री वारणा हमखास जागी होई , दिवसा गाड्यांच्या आवाजाने गजबजणारे ते रस्ते रात्री असे शांत झालेले बघताना तिला खूप गंमत वाटे , आजूबाजूच्या झाडांची , वर पाहिलं की लुकलुकणाऱ्या चांदण्यांची तिला गंमत वाटे , आजहि ती नेहेमीसारखी मध्यरात्री उठून बसली होती ,आजूबाजूला सगळे गाढ झोपले होते, झाडांच्या सावल्यांचा विचित्र नाच आणि शांत झालेले रस्ते बघून गादीवर लवंडणार ,तेवढ्यात कुजबुजत्या स्वरात तिला एक हाक ऐकू आली, “वारणा !! “ वारणाने दचकून इकडे तिकडे पाहिले , सगळे गाढ झोपले होते , तिला वाटले भास झाला ,पण तरी ती मनातून चांगलीच घाबरली पट्कन पांघरूण डोक्यावर घेऊन शांत पडून राहिली , तितक्यात पुन्हा तो आवाज आला ‘वारणा ! “ ... वारणाने आणखीनच घट्ट डोळे मिटून घेतले आणि आजीच्या कुशीत शिरून , पांघरुणात घुसमटून जाईल एवढ स्वतः:ला लपेटून घेतलं ,तरीही तिला सारखं वाटत होतं कोणीतरी खसकन तिचं पांघरूण ओढेल , भीतीने हात पाय कापत असतानाच रात्री कधीतरी तिला झोप लागली , सकाळ झाली ,कोवळी उन्ह तोंडावर आल्यावर वारणाला जाग आली , तिच्या आजूबाजूचे सगळे उठून अंथरूण गोळा करून आत गेले होते , आळोखे पिळोखे देत वारणा उठली , आवरून मुलांमध्ये खेळायला पण गेली , रात्रीची गोष्ट मात्र बिचारी पूर्ण विसरून गेली , तिला आठवण झाली ते थेट रात्री आजीला ओट्यावर अंथरूण घालताना बघून ! … तिच्या घशाला कोरड पडली “आजी नको नको …बाहेर नको !”
“का ग ? “
“मला भीती वाटते “
“काय मेलं भ्यायचं दोडा , आम्ही असतो ना सगळे भवतीनी ? लई भित्री पोरगी आहे निमाची ..झोप गपचीप ., आत उकाड्याने जीव जातो कोण झोपणार तुझ्याबरोबर ? , एकटी झोपशील का आत ? “ . वारणाच्या डोळ्यापुढे भल्या मोठ्या घरात ती एकटी झोपलीये असं दृश्य आलं आणि ती आणखीन भ्यायली , नको नको आत मी एकटी नाही झोपणार “
“मग झोप गप बाहेर, बघतेच मी कोण खातंय तुला “ आजी पांघरूण झटकत म्हणाली ,तसंही गरीब मुलाशी हट्टाने लग्न केलं म्हणून तिला आपल्या थोरल्या लेकीचा जरा राग होता , तो कधी कधी आपसूकच ‘वारणा ‘ वर निघत असे. नाईलाजाने वारणा अंथरुणावर पडली , कालच्यासारखच स्वतःला घट्ट पांघरुणात लपेटून घेतलं , दिवसभर खेळून दमल्यामुळे तिला लगेचच गाढ झोप लागली , एक प्रहर उलटून गेला आणि मध्यरात्रीच्या सुमारास तोच कुजबुता स्वर आता जरा जवळून ऐकू आला , “वारणा !..” आवाज आला तशी ,परत डोक्यावरून पांघरूण घेऊन वारणा निपचित पडून राहिली ,तिच्या पोटात गोळा आला , वारणाच्या जीर्ण झालेल्या चादरीला एक छोटंसं छिद्र पडलं होतं , ते बरोबर तिच्या डोळ्यांपाशी येत होतं , त्याच्यात बोट घालून तिने ते आणखीन मोठं केलं आणि बाहेर पाहू लागली , समोर रस्त्यावर दिव्याखाली कोणीतरी उभं होतं , पांढरे शुभ्र कपडे अंधारातही चमकत होते , त्या अंधारातही आणि पांघरूणातून दिसणाऱ्या एवढ्याशा छिद्रातूनही तिला कळलं की ती व्यक्ती वारणाकडेच बघत होती आणि हातवारे करून तिला जवळ बोलावत होती. क्षणभरच नजरानजर झाली आणि मग एकाएकी वारणा उठली आणि थेट पांघरूणातून बाहेर पडली , समोर बघत भारावल्यासारखी चालायला लागली ,समोरच्या व्यक्तीच्या चेहेऱ्यावर आता हास्य होतं , पुढचं ग्राउंड संपत आलं आता उडी मारून समोर ती जाणार तेवढ्यात मागून तिला कोणीतरी धरलं , ती एकदम झटका लागल्यासारखी तिथेच थांबली , “कुठं निघालीस रातीची ? “ आजीच्या खेकसण्याने वारणा भानावर आली आणि तिने समोर बोट दाखवलं , “ते बोलावतायत “
“कोण बोलवतंय ? कोनी बी नाय तिथ , चल “
आजीनी वारणाला आता घरात नेऊन झोपवलं आणि ती पण तिच्याजवळ झोपली .
दुसऱ्या दिवसापासून आजीने आजोबांच्या मागे टुमणं लावलं , “निमाच्या च्या पोरीला घरला नेऊन सोडा , रातच्याला झोपेत चालायची सवय आहे तिला , आपल्या जीवाला घोर नको .”
बिचारी वारणा तिला काहीच आठवत नव्हतं आपण केव्हा उठलो केव्हा झोपेत चालायला लागलो , अजून तर आठ दिवस पण झाले नव्हते येऊन अजून तिला कितीतरी गोष्टी करायच्या राहिल्या होत्या ,मन्या , चिमी , सगळ्यांबरोबर खेळायचं राहील होत , आता त्यांचे दोनच पेपर राहिले होते शेवटचे , ते झाले कि मग सगळ्यांनी मिळून धमाल करायची होती , दगड मारून आंबे पाडायचे होते , , मेंदीची पानं दगडावर वाटून हात रंगवायचे होते , दुपारच्या टळटळीत उन्हात खेळून दमल्यावर डिडोणीच्या पानांची गादी करून त्या थंड थंड गादीवर झोपायचं होत ,चटक्यांच्या बिया घासून चटके द्यायचे होते , आजी आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी शेवया वळायला येतील तेव्हा पाटावर बसून हांताने शेवया वळायच्या होत्या , कुरडईचा गरम गरम चीक दूधसाखर टाकून खायचा होता . बापरे हे सगळं टाकून त्या घरात जायचं ? त्या ? ...वारणाला आपलं कोंडवाड्यासारखं घर आठवलं आणि ती रडायला लागली , “नको आजी मला तिकडे पाठवू नको , मला अजून राहायचं आहे “
“गप दोडा , काल मला जाग आली म्हनून न्हायतर गेली असतीस कुठंही ..आन निमाला मी काय उत्तर दिलं असत , ते काहि न्हाई तू आपली जा घरला तुझ्या , लागलं तर मागनं ये परत आईबरीबर “ लहानग्या वारणाचं मन रांगड्या आजीला कसं कळावं ? शेतकऱ्याची अशिक्षित मुलगी ती , सगळी हयात गेल्यावर आता कुठे तरी थोडं शुद्ध बोलायला शिकली होती , वारणा रड रड रडली , पण आजीने तिला घरी पोहोचवा असा एकच धोशा लावला आणि आजोबानी दुसऱ्या दिवशी पोहोचवायचं कबूल केलं . मुंबईला लगेच परत जायचं म्हणून वारणा कोमेजून गेली , रात्री न जेवता तशीच झोपून गेली , मध्यरात्री कसल्याशा आवाजाने ती एकदम दचकून जागी झाली ,जाग आल्यावर तिच्या लक्षात आलं , तिला आतमध्ये एकटीलाच झोपवले होते आणि बाकी सगळे बाहेर झोपले होते , तितक्यात तिला ते दिसलं , कोणीतरी खिडकीशी उभं होतं , वारणाला बाहेर बोलावत होत , एक दोन क्षण वारणा बघत राहिली आणि मग हळूच उठली , कडी उघडून बाहेर आली ,तेव्हढ्यात जे कोणी बाहेर होत ते एकदम रस्त्यावर गेलं एकाएकी , आणि तिकडून तिला खुणावू लागलं ,वारणा तिकडे बघत खाली उतरली ,रस्त्यावरच्या दिव्यांचा प्रकाश वर ओसरीपर्यत पोहोचत होता , त्या अंधुकशा उजेडात चालायला लागली , ग्राउंड पार करून ती रस्त्यावर आली ,आता त्या पांढऱ्या कपड्यातील व्यक्तीने तिचा हात धरला “चल “
‘कुठे ?” वारणाने निरागस पणे विचारलं
“तुला मुंबईला जायचं नाहीये ना “ त्या अनोळखी व्यक्तीने कुजबुजत विचारलं .
“नाही जायचं , पण आजी इथे राहून देत नाही “ डोळ्यात आलेलं पाणी हातांनीच पुसत वारणा म्हणाली .
“मग तू माझ्याबरोबर चल , सकाळी तू दिसली नाहीस कि आजी थोडावेळ गोंधळ घालेल आणि मग आजोबा कामावर गेले कि तू घरी जा , मग तुला कोणी पोहोचवणार नाही , मुंबईला “
“खरच असं होईल ?” वारणाचे डोळे आनंदाने चमकले
“हो “
यावर अतिशय आनंदाने त्याचा हात धरून उड्या ती मारत निघाली , एकच सेकंद चालली असेल नसेल आणि तिला आपण एकदम बाजार मैदानात आलोय याची जाणीव झाली ,आजीबरोबर कितीतरी वेळा ती यायची नाही का इथे सामान घ्यायला ,? भाजी घ्यायला . ? आत्ता रात्रीच्या अंधारात तिथ खूप भकास वाटत होत . तिथे एक कायम बंद असणारी विहीर होती , चिमीने सांगितलं होत कि तिथे ‘ढगे ’ काकांच्या मुलाने उडी मारून जीव दिला होता , म्हणून त्याच भूत असतं तिथे , पण आत्ता तर तिला ती उघडी दिसली , “ वारणा उडी मार !...आत लपून बैस जा “ तो तिला सांगत होता , तिने त्याच्याकडे बघितलं मात्र भीतीने तिची बोबडी वळली ,त्याचे रोखलेले डोळे आता पूर्ण पांढरे दिसत होते , मानेनेच नाही नाही म्हणत ती मागे जायला लागली , त्याचे ते घाणेरडे डोळे गरगर फिरायला लागले , “जा आत , उडी मार ,लपून बैस !!” डोळ्यांबरोबर मानही जोरात फिरायला लागली , “जा , आत , उडी मार , लपून बैस !!”
“आई SSSSSSSS “ वारणा ओरडायला गेली पण तिची किंकाळी आतल्या आतच राहिली , समोरचं भयानक दृश्य पाहून ती तिथेच बेशुद्ध पडली .
...... सकाळी भाजी घेऊन येणाऱ्या बायका , दूधवाला सगळ्यांना एक ९-१० वर्षाची लहान मुलगी विहिरीजवळ बेशुद्ध पडलेली दिसली आणि एकच गलका उडाला , त्यांच्यापैकी कुणीतरी तिला ओळखले , “अरे ZZZZZ हि तर ‘पिंगळे ‘ बाईची नातं “ झालं कुणीतरी घरी वर्दी दिली आणि सगळे पळत आले , वारणाला उचलून घरी आणलं , आता ती शुद्धीवर आली होती , पण अंगात ताप भरला होता , ताबडतोब मुंबईला फोन गेला , आणि वारणाच्या आईने , भावाला विनवणी केली तिला घरी घेऊन या. त्या माउलीला माहिती होत गाडी भाड्याची सोय होईपर्यत चार पाच दिवस जातील कोणी उसने पासने लवकर देणार नाही , कारण आधीचीच उधारी थकली होती, वारणाला आणायला खूप दिवस लागतील , त्यापेक्षा तिकडून कोणीतरी पोहोचवेल तरी लगोलग , कधी एकदा वारणाला बघेन असं तिला झालं होतं , निरोप ऐकल्यावर मामीने नाक मुरडलं आणि वाटलंच होतं अशा प्रकारचा एक झटका मानेला देऊन ती आत निघून गेली , स्पेशल गाडी करून वारणाला मुंबईला नेण्याची तयारी सुरू झाली , आणि मामा गाडीवाल्याशी बोलायला बाहेर गेला तोवर , परत तिला आवाज ऐकू आला , “वारणा येतेस ना ? लपायला ? “ वारणाने क्षीण नजरेने आवाजच्या दिशेने पाहिले , आणि तो तिला दिसला… ! .. खिडकीत उभा राहून तिला बोलावत होता .
गाडी दारात उभी करून मामा जोरात हाक मारत आत आला , “ आई , चला निघूया , गाडी आलीये बाहेर “
आजी लगबगीने वारणाजवळ आली , “वारे , चला बाई घरला जाऊ तुझ्या , वारे … “ आजीने हलवलं तशी वारणा कलंडली , डोळे उघडेच होते , त्यात जीव मात्र नव्हता !!!!....

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईग्ग Sad

मस्त लिहिलंय.
मला पॅन्स लॅबिरिंथमधल्या ऑफिलियाची आठवण झाली.
तुमच्या कथांचे लेखन चढत्या आलेखाने छान होत आहे.

भयकथा चांगली लिहिली आहे. खिळवून ठेवते. पण मुलीचे नाव वारणा? वारणा नाव हे गावाचे/संस्थेचे/बँकेचे/नदीचे म्हणूनच आजवर सवयीचे होते. त्यामुळे वाचताना थोडे विचित्र वाटत होते.

Dhangya , निशा राकेश ,atuldpatil ,mi_anu,sachin kulkarni, हायझेनबर्ग ,मन्या ,ॲमी,सस्मित,Akku320 ,विनिता.झक्कास, पलक , jayshree deshku..., : मनापासून धन्यवाद !.. Happy