ब्रिगेडिअर बाबा जाधव

Submitted by Shrinivas D Kulkarni on 26 August, 2019 - 08:08

"मी ब्रिगेडिअर बाबा जाधव बोलतोय."

"या रविवारी आपण सकाळी दहा वाजता नांदुर्णीला आमच्या घरी या. महत्वाचे काम हातावेगळे करणे आहे. हे काम सोमवारपर्यंत लांबण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण आपल्या कामाची पर्यायी व्यवस्था करुन यावे. मुक्कामाची सोय आमच्याच घरी केली आहे."

सुस्पष्ट आवाज, तपशीलवार आणि काटेकोर सूचना, आवाजात कमालीची जरब. माझ्या नजरेसमेर एका करड्या शिस्तीच्या सैन्याधिकार्‍याचा चेहेरा यायला लागला.

तसं मला ब्रिगेडिअर बाबा जाधव फक्त ऐकुन माहिती होते. आण्णा आणि आईकडुन समस्त जाधव घराण्याचा

इतिहास अनेकवेळा ऐकलेला. इतिहासप्रसिद्ध घराणं. बापजाद्यांनी तलवारी गाजविलेल्या. भंडारा उधळावा त्या भक्तिनं आणि सहजतेनं रणांगणांवर रक्त उधळणारं घराणं. इमानीला आणि जबानीला पक्के अशी जाधवांची ख्याती. नांदुर्णीला आमच्या बांधाला बांध लागुन जाधवांची शेतीवाडी. दोघांच्याही पूर्वजांना खर्ड्याच्पा लढाईत बजावलेल्या कामगिरीबद्दल इनामजमीन मिळाली. खर्ड्याच्या लढाईचा हा समान धागा पुढच्पा पिढ्यांनी आपलेपणाने जपला. खेळीमेळीने सख्खे शेजारी म्हणुन एकत्र नांदले. सणवार, जत्रायात्रा बरोबरीने केल्या. या घरची लेक सासरी जायला निघाली तर त्याघरी आधी जाऊन वडिलधार्‍यांच्या पाया पडायची, त्या घरच्या आजी आणि काकी स्वताची लेक निघाल्यासारख्या डोळ्याला पदर लावुन निरोप द्यायच्या. इकडं काहि चांगलं घडलं तर तिकडं पुरणावरणाचा स्वयंपाक व्हायचा.

कालाय तस्मै नमः

कालौघ वहात असतो. जुनं जातं, नवं येतं. येणारं नवं वारं आपल्याबरोबर काहि नवे विचार घेऊन येतं. नव्या जगात जुन्या नात्यांनाच स्थान नसेल तर तो जिव्हाळा कुठुन येणार? आपलेपणाच्या ओलाव्यावर दुष्काळ पचवाणारी माणसं पोटार्थी होतात तेंव्हा त्यांची नियत फिरतेच. राजेरजवाड्यांबरोबर लढाया संपल्या पण परकिय राजवटीबरोबर संघर्ष सुरु झाला. हा संघर्ष चालू होता

तोवर दोन्ही घराणी एक झाड दोन फांद्या इतकी अभेद्य होती. स्वातंत्र्य मिळालं आणि वाटा वेगळ्या झाल्या. जाधवांनी फेटा उतरवला आणि पांढरी टोपी चढवुन राजकारणाच्या आखाड्यात उडी मारली. आमच्या पूर्वजांनी शिक्षणाची वाट आधीच धरलेली, त्याच वाटेवर पुढचे निघाले. शेतीशी संबंध तुटत गेला तो इतका कि आण्णांनी सगळि शेती सर्कत्याच्या भरंवशावर सोडली. गाव सोडलं आणि आम्ही पक्के शहरी होऊन गेलो. नावापुरते शेतकरी राहिलो. हुरड्याचे मानकरी.

"कुणाचा फोन होता रे?" आईच्या प्रश्र्नाने मी भानावर आलो. आईची देवपूजा झालेली दिसते.

"ब्रिगेडिअर बाबा जाधवांचा होता. त्यांनी रविवारी नांदुर्णीला बोलावलंय"

"अरे देवा! आता काय नवीन खेकट काढलंय जाधवांनी? आणि तुझा हा ब्रिगेडिअर म्हणजे म्हाळसाकाकीचा मुलगा ना रे?"

"आई, आता जाधवांची वंशावळ का पाठ आहे मला? काय काम आहे ते सांगितलं नाही पण महत्वाचं काम हातावेगळं करायचं म्हणत होते."

" जा बाबा तो येवढं बोलावतो आहे तर. त्याला म्हणाव, आतातरी तो बांधाचा झगडा मिटव रे.किती पिढ्या खपायच्या या वादात? तुझं तर तुझं खरं पण संपव बाबा एकदाचं"

आईचं म्हणणं खरं होतं. चार पिढ्यांपूर्वीपर्यंत गुण्यागोविंदानं एकत्र नांदणार्‍या आमच्या दोन घराण्यांत बांधावरुन वाद सुरु झाले आणि विकोपाला गेले. कोर्टकज्ज्यापायी दोन्ही घरांनी अमाप संपत्ती अक्षरशः उधळली. इरेसरीला पडलेले दोन्ही घरातले कर्तै पुरुष अहमहमिकेने लढत आणि आयुष्षाच्या अखेरीस हा नकोसा वारसा पुढच्या पिढिच्या हाती देत. कोणाच्या मनांत कली शिरला होता आणि कोण राजा हरिश्र्चंद्र होता हे कोर्टाला अजुन ठरवता आलं नव्हतं. मलाही ह्या वादाचा फटका बसलाच होता. ती जीर्णशीर्ण झालेली कागदपत्रं सांभाळायची. हॉस्पिटलमधले पेशंटस सोडुन कोर्टात हजर रहायचं आणि पुढची तारीख घेऊन परत यायचं. प्रत्येक तारखेवेळी आईची फार घालमेल व्हायची. सकाळपासुन देवांना पाण्यात बुडवुन ठेवायची आणि त्यांना आपलं गार्‍हाणं ऐकवायची. मी कोर्टातुन परत आल्यावर अधीरतेनं विचारायची

" शिरु, झाला ना रे आपल्यासारखा खटला??

तिला काहिच झालं नाही हे कसं सांगावं हा प्रश्र्न मला नेहेमी पडायचा. मग माझं मौन पाहुन ती समजुन जायची.

" होईल बरं, लवकरच. देवाच्या दारी उशीर असला तरी न्याय असतोच रे" असं म्हणुन माझी समजूत काढायची. पण मनातुन ती खट्टु झालेली असायची. हा राग दुसर्‍या दिवशी बिचार्‍या देवांवर निघायचा.

" कसं दिसत नाही तुम्हांला ? का तारखेच्याच दिवशी झोप लागते कि काय?" बिचारे देव निमूटपणे ऐकुन घ्यायचे.

रविवार उजाडला. मी सकाळीच निघालो आणि बरोब्बर न्याहारीच्या वेळेसच नादुर्णीला पोहोचलो. शिरस्त्याप्रमाणे बबन्याच्या हॉटेलात शिरलो तर बबन्या पुढं येऊन म्हणाला

"या गाववाले. तुमचं स्वागत आहे"

"नाटकं बंद कर बबन्या, भूक लागलीये, मिसळ दे पटकन"

" डॉक्टरसाहेब, आज नाष्ट्याला मिसळ न्हाई. लोणी लावलेला पाव खावा पाव. आणि जोडीला मंजुळाच्या हातचं आम्लेट. मजाय राव तुमची!"

"बबन्या, काय चेष्टा लावलीय राव?"

"च्येष्टा नाही आणि फिष्टा नाही, ब्रिगेडिअरसाहेबांचा हुकूम आहे. आल्याआल्या वाड्यावर लावुन द्या"

हुकूम आहे म्हटल्यावर नाईलाज होता. बबन्याच्या 'एवन' हॉटेलातील तिखटजाळ मिसळ आणि घट्ट दुधातला चहा सोडुन निघणं तसं जीवावर आलं होतं. हे मंजुळा काय प्रकरण आहे? विचारायचं राहुनच गेलं. एवढ्यात जाधवांची गढी आलीच.

भलाथोरला, जुन्या वैभवाची साक्ष देत उभा असलेला वाडा. किती पिढ्या बघितल्यात यानं कोणास ठाउक? तो दिंडिदरवाजा ओलांडुन मी आत पाऊल टाकलं मात्र,तेवढ्यात

"यावं, यावं डॉक्टरसाहेब. आपलं स्वागत आहे" असं अगदी करड्या आवाजातलं स्वागत कानी आलं.मी मान उचलुन बघितलं तर समोर एक ब्राँझचा पुतळा वाटावा असा रापलेल्या पण तुकतुकित चेहेर्‍याचा, भरदार अंगयष्टीचा, पांढर्‍या पण अक्कडबाज मिशांचा अस्सल लष्करी बाण्याचा ,'पुरुष' उभा. हेच ब्रिगेडिअर बाबा जाधव. शंकाच नाही. अंगाप्रत्यंगातुन ती लष्करी आदब झळकते आहे, नजर अत्यंत स्थिर, मूर्तीमंत खानदानी व्यक्तिमत्व. या पहिल्या दर्शनानेच मी भारावलो. चटकन पुढे होऊन पाया पडलो तर मला उचलुन मिठीत घेत म्हणाले

"आपण कसले आमचे पाय धरता? आपली जागा इथं. आमच्या ह्रदयाशी. आपण बसावं डॉक्टरसाहेब."

आम्ही दोघेही स्थानापन्न झाले. थोड्या ईकडच्यातिकडच्या गप्पा झाल्या. ब्रिगेडिअरसाहेब आता निव्रुत्त झाले आहेत, एकुलती एक मुलगी लग्न करुन परदेशी स्थायिक झाली. अर्धांगिनीला संसार अर्धवट टाकुन जावं लागलं.वगैरे गोष्टी समजल्या.

"मंजुळा", ब्रिगेडिअरसाहेबांनी शक्य तितक्या सौम्य आवाजात हाक मारली.

"आले बाबा" आतुन नाजुक प्रतिसाद.

हातात न्याहरीच्या पदार्थांनी भरलेला ट्रे घेऊन एक सावळी पण नाकिडोळि तरतरीत मुलगी आली.

"ही आमची मानसकन्या मंजुळा."

"मानसकन्या?" मी

"होय, हिचे आईवडिल आमच्याच शेतीवर होते. गेल्यावर्षी दुर्दैवाने अपघातात गेले. नेमके त्याच वेळी आम्ही निव्रुत्त होऊन परत आलो. तेंव्हापासुनअगदी सख्ख्या मुलीनं घ्यावी अशी आमची काळजी घेते. आता हिच्या लग्नाची काळजी आहे. कोणी चांगलासा मुलगा आपल्या पहाण्यातअसेल तर बघा. पण आधी न्याहारी सुरु करा."

सर्व पदार्थ अत्यंत चविष्ट होते. बबन्याकडची मिसळ हुकल्याचे दुःख जरा कमी झालं.

न्याहारीनंतर ब्रिगेडिअरसाहेब मला आतल्या खोलीत घेउन गेले.

"डॉक्टरसाहेब, महत्वाचं बोलायचं होतं."

"बोलूयात, पण साहेब म्हणू नका. आपण वडिल, आपण मला शिरु म्हणू शकता."

"खरंय, असल्या उपाध्यांनी आपलेपणा कमी होतो. तर शिरुभाऊ, मी आपल्यासाठी बाबा, हवं तर बाबाकाका म्हणा."

अखेर बाबासाहेबवर तह झाला.

"तर शिरुभाऊ, आमचं सारं आयुष्य सैनिकी पेशात गेलं. पण गावच्या मातीची ओढ काहि संपली नाही. म्हणतात ना, ज्या जागी तुमची नाळ पुरलेली असते त्या जागी मन ओढ घेत रहातं. याच गावांत आमचं लहानपण गेलं. त्पावेळी तुमचे वडिल आण्णासाहेब म्हणजे आमचे हिरो. आख्ख्या गावांत शेक्सपिअर वाचलेला आणि पचविलेला एकमेव माणूस. त्याकाळी थोरली माणसं एकमेकांशी फटकुन वागत पण मुलांवर बंधनं नव्हती. याचा फायदा घेऊन आम्ही आण्णासाहेबांकडुन उदंड शिकलो. त्यावेळच्या आपल्या दोन घरांमधला एक रिवाज सांगतो. या घरात माप ओलांडुन येणारी नवी सून या घरात येण्याआधी त्या घरी जात असे. प्रथेनुसार आपल्या मातोश्रीदेखील आधी या घरी आल्या. त्यांना काय वाटलं कोणासठाऊक पण त्यांनी आमच्या आईसाहेबांना बघितलं आणि 'आई' म्हणुन घट्ट मिठी मारली. आपल्या पारंपारिक वैराच्या सीमा अस्पष्ट व्हायची ही सुरुवात. हा प्रसंग आमच्या मनात कायम कोरल्यासारखा राहिला. निव्रुत्तीनंतर आम्ही हाच धागा पुढं न्यायचा ठरविलं आणि या सीमाभिंती पाडायचं ठरविलंय. आयुष्य सीमेवर गेलंय. सीमांच रक्षण करतांना कधी जीवावरवरचे खेळ खेळावे लागतात पण हे खेळ खेळतांना एक गोष्ट ध्यानांत राहिली ती म्हणजे अशा सीमांमुळे निर्माण झालेलं वैर संपविण्याचा सर्वोत्तम मार्ग तलवारीचा नसुन प्रेमाचा असतो. आता काही जणांना प्रेमाची भाषा समजतच नसेल तर ती शिकविण्यासाठी बंदुका आणि तलवारी हाती घ्याव्याच लागतात. तशा त्या आम्हिही हाती घेतल्या आणि यथेच्छ वापरल्यादेखील. रणांगण निष्ठुर असतं. तिथं मायेच्या ओलाव्यांना जागा नसते. पण हे आपलं आयुष्य आहे, इथं मतभेदांची मुळं नष्ट करण्यासाठी शिरुभाऊ, अंतरीचं प्रेमच उपयोगी ठरतं. आमचं ठरलंय. आता आपली वादातली जमीन अर्धीअर्धी वाटुन घ्यायची. वादाच्या सीमा ओलांडुन पुन्हा पूर्वीसारखं प्रेमानं रहायचं. आणखी एक मागणं आहे. तुम्ही तुमची जमीन कसायला घ्या. नांदती ठेवा तिला. आमचं आयुष्य या मातीच्या सेवेत गेलंय, आधी सैनिक म्हणुन आणि आता शेतकरी म्हणुन. एक सांगतो, या मातीच्या सेवेसारखं दुसरं सुख नाही. तिच्पावर प्रेम करा ती तुम्हांला भरभरुन दिल्याशिवाय रहाणार नाही. तुमचा होकार असेल तर उद्याच कागदपत्र करुन टाकू."

हा प्रस्ताव नाकारणं कठिण होतं. समोरचा माणूस लष्करी शिस्तितुन आलेल्या नितळपणाचं साक्षात उदाहरण होता. कुठलेही डावपेच नसलेला हा प्रस्ताव मी चटकन स्विकारला आणि माझ्या होकारानंतर बाबासाहेबांनी पुन्हा एकदा मला मिठीत घेतलं. कोणा पूर्वजाच्या अप्पलपोटेपणापायी दोन घराण्यामध्ये उभ्या राहिलेल्या सीमाभिंती ढासळल्या. दुसर्‍या दिवशी आम्ही कागदपत्रं करुन घेतली आणि बाबासाहेबांचा निरोप घेऊन निघालो.

घरी आलो. शरयू दारातच उभी होती.

"आधी आईंना भेट. कालपासुन देव पाण्यांत घालुन बसल्या आहेत."

मी आईकडे गेलो. पेढ्यांचा पुडा तिच्या हाती दिला. घडलेलं सगळं सांगितलं. बाबासाहेबांचं एकुण व्यक्तिमत्व, त्यांनी आईची सांगितलेली आठवण, मंजुळा वगैरे. ऐकतांना तिच्या डोळ्यांतुन अश्रुधारा. कशाच्या? अखेर वाद मिटला म्हणुन कि म्हाळसाकाकीच्या आठवणींच्या?

सकाळी उठलो तर देवघरातुन आवाज येत होते. आता काय? मिटला ना वाद? पण देवांची सुटका झालेली दिसत नाही. मी आईची समजूत घालायला पोहोचलो तर अनोखं द्रुष्य.

"चांगली बुद्भि दिलीस रे बाबा त्या ब्रिगेडिअराला. हसू नकोस, म्हाळसाकाकीचे संस्कार वाया नाही जायचे याची खात्री होती मला. फार रागावले कारे तुझ्यावर? पण काय करु रे घरच्या कर्त्यासवरत्पा पुरुषांची त्या वादापायी होणारी फरफट बघवायची नाही रे मला. तू माझा आपला म्हणुन तुझ्यावर राग निघायचा इतकंच. आता ही फुलं घे, छान गंध लावते बघ तुला. निवांत रहा. अशीच क्रुपा ठेव. आमच्यावर आणि जाधवांवरपण. कळलं ना?"

समस्त देवांना कळलं असावं बहुतेक, कारण आई उठली आणि मला पाहुन म्हणाली,

"आपलेच आहेत जाधव. आपलं झालं, आता त्यांचंदेखील भलं होऊ देत असं निक्षुन सांगितलंय माझ्या देवांना. घे , खडीसाखरेचा नैवेद्य."

" आई, देवांची काय बिशाद आहे? तुझं नाही ऐकलं तर रोज ऐकुन घ्यावं लागणार बिचार्‍यांना,"

यानंतर नांदुर्णीला येणंजाणं वाढलं बाबासाहेबांच्या आज्ञेनुसार आणि मार्गदर्शनानुसार शेती करायला घेतली. बघताबघता शिवार फुलुन आलं. बाबासाहेबांच्या गाठीभेटी होत राहिल्या.

आमचा वाद संपल्यानंतर वर्षभरातली गोष्ट असेल. मी नांदुर्णीला गेलो. सवयीनं आधी बबन्याच्या एवनमध्ये. तिथं शांतता. बबन्या कुठंतरी आत बसलेला.

"काय रे, आज शुकशुकाट का येवढा?"

"ब्रिगेडिअरसाहेब.....

" काय झालं बाबासाहेबांना?"

"त्यांना आत घेतलंय खुनाच्या आरोपावरुन."

बाबासाहेबांच्या मळ्यावर अनेक माणसं काम करायची. त्या माणसांना हवं नको ते पहाण्याचं काम मंजुळाकडे. बाबासाहेब नसतील त्यादिवशी तर तीच मालकिण असायची. अशाच एके दिवशी बाबासाहेब काही कामानिमित्ताने जवळच्या गांवी गेले होते. शेतीचं फारसं काम नसल्याने एकदोनच गडीमाणसं होती. त्यातला एकजण डोकं दुखतंय म्हणुन घरी गेला. आसपास कुणी नाही हे बघुन दुसर्‍या गड्याने मंजुळावर हात टाकला. प्रतिकार झाला पण तोकडा पडला. माणूसपणाच्या सीमा पार झाल्या आणि पशुंनीही लाजावं अशी घटना घडली. बाबासाहेब परत आल्यावर मंजुळानं आकांत मांडला. तिचं आक्रंदन बाबासाहेबांना ऐकवेना. तडक बाहेर पडले. त्या गड्याला गावच्या चौकात गाठला आणि हातातल्या काठीचा एकच फटका दिला. घाव वर्मी बसला. रक्त नाहि आणि खूण नाही गडी जागेवरच गेला. तिथुन बाबासाहेब पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले आणि कबुलीजबाब देऊन मोकळे झाले.

मी चौकीवर गेलो. बाबासाहेबांना भेटता येईल का ते विचारलं तो फौजदार बिचारा आधीच या लोकविलक्षण प्रकाराने गोंधळलेला दिसत होता. त्याने मला परवानगी दिली. मी आतल्या खोलीत गेलो. तिथं एका खुर्चीवर बाबासाहेब ताठ मानेनं बसलेले.

"बाबासाहेब."

"शिरुभाऊ, सांत्वन नका करु. आम्हांला खेद नाही. या स्त्रियांची अब्रू कायम सुरक्षित रहावी म्हणुन तर आम्ही सीमेवर लढलो ना? मग आमचं कर्तव्य बजावतांना कोणीहि आडवा आला त्याला खतम केलाच पाहिजे. अगदी कायदादेखील आम्हांला थांबवु शकत नाही. सीमारक्षण काय फक्त देशांच्या सीमांवरच होतं काय? स्त्रीची अब्रू हा तिचा आत्मसन्मान आहे. त्याच्या सीमा ओलांडायचा हक्क कोणालाच नाही हे आम्ही आमच्या लष्करी जिवनांत शिकलोय. आम्ही कबुलीजबाब दिला आहे. गांवकर्‍यांना नाही पटलं त्यांनी लिहुन दिलंय कि तो अपघाती म्रुत्यु त्यांच्यासमोर घडला म्हणुन. आभारी आहे मी त्यांचा आणि तुमचादेखील.या आता आपण, वेळ संपत आली. कायद्याच्या सीमा ओलांडणं योग्य नव्हे."

घरी येऊन शरयूला आणि आईला सर्वप्रकार सांगितला. डोळ्यांना पदर लावत आई खोलीबाहेर गेली. मी हातपाय धुवुन बाहेर येतो तो देवघरातुन आवाज येत होते.

" काय हा अन्याय? अरे तुम्हिच नेमुन दिलं ना हे काम त्याला? मग त्याला शिक्षा का? आणि काय रे, द्रौपदीच्या अब्रूला हात घातला म्हणुन भलंथोरलं युद्ध घडवलंस ना तू? लाखो माणसं मेली. तुला कोणी बोलायच? तू देव ठरलास आणि तो मात्र गुन्हेगार काय? वा रे वा , बरा आहे तुझा न्याय! अरे तुझ्या जन्माष्टमीला म्हाळसाकाकीनं तिच्या पदरात जोजवलाय तुला. चांगले पांग फेडतोहेस हो तिचे. पोत्यांवारी फुलं उधळलीत जाधवांनी तुझ्यावर. जाधवांच्या कैक पिढ्यांचे फेटे झिजलेत तुझ्या पायावर. त्याची तरी बूज राख जरा. ते काही नाहि जाधवांचं आमचं घर एकच आहे. आमचा पोर आम्हांला सुखरुप माघारी पाहिजे. नांव विसरु नकोस, ब्रिगेडिअर बाबा जाधव."

(माझे आणखी लेखन आपण shridikul.blogspot.com या ठिकाणी वाचू शकता.

श्रीकुल

श्रीक्रुष्ण जयंती

23/8/2019

Group content visibility: 
Use group defaults

व्वा !!
सुरेख व्यक्तिचित्रण Happy पु. ले. शु.

छान आहे

लिहित रहा

मायबोलीवर लेखक म्हणून स्वागत >>>>१००

छान आहे.
फक्त <<<<<तुझा हा ब्रिगेडिअर म्हणजे म्हाळसाकाकीचा मुलगा ना रे?">>>>>. हा प्रश्न आईने शिरुला विचारणं खटकतंय. पुढे तिला सगळं माहित आहे असं संवादात लिहिलंय.