मिर्च मसाला

Submitted by क्षास on 19 August, 2019 - 10:46

जेव्हा मी पद्मावत सिनेमा पाहिला तेव्हा मला सहज वाटून गेलं की या सिनेमाचा शेवट जर वेगळा झाला असता तर? अग्नीमध्ये सामूहिक समर्पण करण्याऐवजी जर सगळ्या बायकांनी मिळून खिलजीला चोप दिला असता तर ? पण शेवटी तो इतिहास आहे. इतिहास कोणीही बदलू शकत नाही. पद्मावतसारखे सिनेमे पहिले की मला माझ्या मनात फार पूर्वीपासून घर करून बसलेला एक सिनेमा आठवतो, तो सिनेमा म्हणजे मिर्च मसाला. या सिनेमाच्या नावातच झणझणीतपणा आहे. आणि कथेतही एक वेगळा ठसका आहे. बेडर, निर्भीड सोनबाई (स्मिता पाटील) आणि जुलूम,अत्याचार करणारा गावचा सुभेदार ( नासिरुद्दीन शहा ) या दोन पात्रांभोवती फिरणारी मिर्च मसालाची कथा अनेक सामाजिक मुद्दे अधोरेखित करते. पुरुषप्रधान संस्कृती, हुकूमशाही, जातीयवाद, दारिद्र्य, स्वातंत्र्य अशा अनेक विषयांच्या छटा या सिनेमामध्ये subtly मिसळल्या आहेत. पण सिनेमाचा गाभा असलेला स्त्रीशक्तीचा रंग मात्र तरीही तेवढाच ठळक राहिला आहे.
सोनबाई आणि सुभेदार या नावांवरूनच कळलं असेल की सिनेमा खेडवळ वस्तीतल्या समाजजीवनावर बेतलेला आहे. सारा गाव सुभेदाराच्या गुलामगिरीखाली पार दबून गेलेला, अन्यायाने खंगलेला असतो. सुभेदाराच्या विरोधात कोणाचीही ब्र उच्चारायची हिम्मत नसते. काहींनी सोनबाईच्या पतीसारखं शहरात जाऊन नोकरी करायचं ठरवलेलं असतं तर काहींनी सुभेदाराचे पाय चाटत कसंबसं जगणं पत्करलेलं असतं. बाईला रूपाशिवाय मन आणि बुद्धीही असते याची जाणीव नसलेला तो काळ. चूल आणि मूल सांभाळणं एवढंच बायकांचं जग. संसारासाठी दोन-चार पैसे कमावण्यासाठी मसाल्याच्या कारखान्यात जमून मिरच्या कुटण्याशिवाय दुसरा कोणताही विरंगुळा नव्हता. सुभेदाराने बोलावलं तर निमूटपणे जायचं. जणू एखादी निर्जीव वस्तू असल्यासारखं स्वतःला बहाल करायचं. हे चक्र वर्षानुवर्षे चालत होतं. विरोध करणं कोणाच्याच हाती नव्हतं. सोनबाई मात्र तडफदार, खमकी होती. तिच्या रुपामुळे ती सुभेदाराच्या क्षणाधार्त नजरेत भरते. दुसरीकडे सोनबाईच्या नवऱ्याला शहरात नोकरी मिळते.ती त्याला जड मनाने त्याला निरोप देते. आता सुभेदाराला त्याचं भक्ष्य अगदी तोंडाजवळ आल्यासारखं वाटतं. तो सोनबाईशी लगट करण्याचा प्रयत्न करतो. सोनबाई चिडून त्याच्या कानशिलात लगावते. सगळ्यांसमोर झालेला अपमान सुभेदाराच्या जिव्हारी लागतो. बाईने हात उगारल्याचा विचार त्याच्या अंगाची लाही लाही करतो. तो सोनबाईला पकडून आणायला शिपायांना पाठवतो. सोनबाई जिवाच्या आकांताने पळत सुटते. पळत पळत मसाल्याच्या कारखान्यात पोहोचते. शिपायांनी धमकावूनसुद्धा म्हातारा रखवालदार अबू 'दरवाजा उघडणार नाही' असं छातीठोकपणे सांगून त्यांना परतावून लावतो. आता सोनबाईला कारखान्यातून बाहेर काढून धडा शिकवण्यासाठी त्याची राक्षसी वृत्ती पेटून उठते.
सोनबाईने कानाखाली मारल्याची बातमी गावभर पसरते. सोनबाई सहजासहजी हाती लागणार नाही अशी चाहूल लागताच सुभेदार गावच्या मुखियाला बोलावून घेतो. सोनबाईला माझ्या हवाली करा नाहीतर अख्खा गाव उध्वस्त होईल अशी धमकी देतो. मुखिया गांगरून जातो.
' इसमे क्या इतना सोचना, तुम्हारी भी नजर कभी ना कभी उसपे पडी ही होगी,असं सुभेदार मुखियाला तिरकसपणे म्हणत.
' नजर पे भी नजर रखनी पडती है' हे मुखियाचं वाक्य खूप काही सांगून जातं. मुखियाला सुभेदाराचा आदेश पाळण्याशिवाय पर्याय नसतो. तो त्याच्यापरीने सोनबाईची समजूत काढतो. बाहेर आली नाहीस तर सगळ्या गावकऱ्यांना याचे परिणाम भोगावे लागतील याची जाणीव करून देतो. पण सोनबाई 'मी माझ्या नवऱ्याने सांगितलं तरीही सुभेदाराकडे जाणार नाही' असं ठणकावून सांगते.
घाबरलेल्या बायका सोनबाईनेच काहीतरी केलं असेल या विचाराने तिला वाईटसाईट बोलू लागतात. स्वतःसोबत दुसर्यांनाही खाणाऱ्या सोनबाईने बाहेर जावं आणि सगळ्यांची या संकटातून सुटका करावी म्हणून तिला कोसू लागतात. 'इज्जत सिर्फ अमीरोंका शौक है' असं बरंच काही तिला सुनावलं जातं, हतबल होऊन सोनबाई विचारते
'आखिर मेरा दोष क्या है? पराये मर्द को दूर रखना दोष है?'
' तेरे रूपमे दोष है'
'तो क्या उसके देखना गलत नही?'
तेवढ्यात सुभेदार फौजेसोबत कारखान्यासमोर येऊन उभा ठाकतो, दरवाजा तोडला जातो. बायका जीव मुठीत घेऊन लपून बसतात. गावकरी श्वास रोखून उभे असतात. दरवाजा उघडताच शिपायांकडून बेछूट गोळीबार सुरु होतो. चौकीदार अबू घायाळ होऊन खाली पडतो. शेवटी भक्ष्य हाती आलंच या विचाराने सुभेदार छद्मी हसतो. तो सोनबाईच्या दिशेने येणार तेवढ्यात बायका मसाल्याचे ढीग सुभेदारावर उधळतात. बेसावध सुभेदार जिवाच्या आकांताने किंचाळतो. त्याच्या किंकाळीचा आवाज गगनाला भिडतो.
हा शेवटचा सिन अंगावर काटा आणणारा आहे. सुभेदाराचा कर्कश्य आक्रोश प्रतिकात्मक आहे. तेव्हा फक्त सुभेदारच नाही तर पुरुषप्रधान संस्कृतीत रुजलेल्या बुरसटलेल्या समजुतीही वेदनेने कळवळतात. स्त्रीची सुरक्षा पुरुषांच्याच हाती असते, केवळ श्रीमंत आणि प्रबळ माणसांनाच निर्णय घेण्याची मुभा असते, बाईला मन आणि बुद्धी नसते अशा अनेक चुकीच्या कल्पना सुभेदारासोबत खाली कोसळतात, नष्ट होतात.
सिनेमातल्या इतर स्त्री व्यक्तिरेखाही तितक्याच महत्वाच्या आहेत. सरस्वती (दीप्ती नवल) मुखियाची बायको असूनही स्वतःच्याच नवऱ्याच्या निर्णयाविरोधात बंड पुकारते. गावातल्या सर्व बायकांना एकवटून सोनबाईला सोडवण्यासाठी ती प्रयत्न करते. पण तिचे प्रयत्न फोल ठरतात. मुखिया तिला ओढत घरात आणून डांबून ठेवतो. मुखियाचा लहान भाऊ आणि राधा ( सुप्रिया पाठक ) एकमेकांवर प्रेम करत असतात. पण राधा मसाला कुटणाऱ्या बायकांपैकी एक आहे, आपल्या बरोबरीची नाही, खालच्या जातीची आहे म्हणून मुखिया त्यांच्या लग्नाला नकार देतो. दुसरीकडे मसाल्याच्या कारखान्यात काम करणारी लक्ष्मी ( रत्ना पाठक ) सुभेदाराचं ऐश्वर्य आणि रुबाब बघून भारावून जाते. कधीकधी तर स्वतःहूनच सुभेदाराकडे जाते. कारखान्यात अडकल्यावर सोनबाईला ती 'हा स्वाभिमान तुला परवडणारा नाही' , 'ऐसा आशिक तुझे फिर नही मिलेगा' असं सांगून त्याच्याकडे जाण्यासाठी उद्युक्त करते. इतर बायका सुभेदाराला भिऊन सोनबाईने बाहेर जावं यासाठी तिच्या मागे लागतात. तिने तिच्या मर्जीविरोधात त्याच्याकडे जाऊन हा विषय संपवावा हे सांगताना त्या थोड्याही कचरत नाहीत हे सगळं बघून खूप अस्वस्थ व्हायला होतं. हा सगळा प्रकार नेहमीचाच असताना तिने जाण्यास मनमानी करणं हे त्यांच्यामते चूक असतं. स्वतःच्या शरीरावर स्वतःचा हक्क नाही अशी त्या काळात स्त्रियांचीही समजूत झाली होती हे बघून धक्का बसतो. स्त्रियांनाही निर्णय घेण्याचा अधिकार आहे, नाही म्हणण्याचा अधिकार आहे हे मुळात त्या काळात स्त्रियांनाच जाणवायला अवकाश होता. तरीही जेव्हा सुभेदारासारखा राक्षस समोर आला तेव्हा सगळ्या एकवटून त्याला जन्माची अद्दल घडवली.
इतर फेमिनिस्ट सिनेमांपेक्षा हा सिनेमा फार वेगळा आहे. यातल्या स्त्री व्यक्तिरेखा अगदी खऱ्या वाटतात. त्यांचे संघर्ष, त्यांची धडपड हे सगळं खरं ,अगदी अस्सल वाटतं. या सिनेमाचा शेवट अंगावर काटा आणतो. यातले काही प्रसंग पाहून सुन्नता येते. संवाद मन हेलावून टाकतात. असा मास्टरपीस सिनेमा शेवटी हेच सांगून जातो की स्त्री ही मसाल्याप्रमाणेच आहे. मसाला पदार्थाला चव आणतो तसंच स्त्री शिवाय आयुष्य बेचव, निरस आहे. पण मसाल्यासारखंच स्त्रीसुद्धा प्रसंगी डोळ्यांतून पाणी काढते आणि धडा शिकवते हे ही तितकंच खरं!

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख!

मधुरा तुमचेही मत लिहा की.

मिर्च मसाला बघताना सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे सिनेमॅटोग्राफी.
मसाल्याच्या रंगांची उधळण!!! मस्तच!!!

नक्कीच आसा.
Happy
लेखकाला राग येणार नाही असे गृहीत धरून लिहिते आहे.
काही खटकल्यास माझे व्ययक्तिक मत आहे म्हणून सोडून द्यावे.
स्त्री ला सरसकट मसाल्याची उपमा देणे पटले नाही. ती पुरुषांच्या आयुष्यात महत्त्वाची आहे म्हणून फक्त तिचा मान करावा असे नाही. माणूस म्हणून तिचा आदर ठेवायला हवा. Happy

तुमचं मत व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद मधुरा.
शेवटच्या काही ओळींचा अर्थ " स्त्री पुरुषांच्या आयुष्यात महत्त्वाची आहे म्हणून फक्त तिचा मान करावा " असा कशामुळे निघाला मला कळले नाही. मी तिथे पुरुषांचा उल्लेखही केलेला नाही.मी स्त्रियांशिवाय पुरुषांचं आयुष्य निरस होईल म्हणून तिचा आदर ठेवावा अशा अर्थाने लिहिलेलं नाही. मुळात आदर ठेवण्यासाठी असा कुठला Criteria च गरजेचा नाही. माझं मत फक्त एवढंच होतं की आयुष्य अर्थपूर्ण बनवण्यात स्त्रियांचा वाटा असतो, मग ते आयुष्य पुरुषाचे असो वा स्त्रीचं.

स्त्री ला सरसकट उपमा दिली हे आवडलं नाही.
बाकी लेख उत्तम आहेच. त्यावर काही दुमत नाही.


माझं मत फक्त एवढंच होतं की आयुष्य अर्थपूर्ण बनवण्यात स्त्रियांचा वाटा असतो, मग ते आयुष्य पुरुषाचे असो वा स्त्रीचं.
>>>>>>या मताशी सहमत आहे. Happy

सिनेमा दोनदा पाहिला आहे, तरी तुम्ही लिहिलेलं परीक्षण आवडलं. छान लिहिलं आहे. आणि हो, त्या शेवटच्या ओळींमधे तुम्हला काय म्हणायचं होतं ते समजलं आणि पोचलं.

सिनेमा फार पूर्वी कधीतरी पाहिलाय. नीटसा आठवत नाही.

आपल्या शीलाचे रक्षण करायला म्हणून जोहर करणारी पद्मावती
आपल्या शीलाचे रक्षण करायला म्हणून बर्याच स्त्रियांना बंड करायला लावणारी सोनबाई (खरंतर सोनबाई ही फक्त एक ट्रिगर आहे, बंड करणारी, व्यवस्था उधळायचा प्रयत्न करणारी सरस्वतीच होती)
∆ दोघीही शीलाचे रक्षणच करतायत. हा दृष्टिकोनच जर पुरुषप्रधान संस्कृतीमुळे आला असेल तर त्याला स्त्रीवाद म्हणायचे का?

> लक्ष्मी ( रत्ना पाठक ) सुभेदाराचं ऐश्वर्य आणि रुबाब बघून भारावून जाते. कधीकधी तर स्वतःहूनच सुभेदाराकडे जाते. > की हा स्त्रीवाद आहे?

> कारखान्यात अडकल्यावर सोनबाईला ती 'हा स्वाभिमान तुला परवडणारा नाही' , 'ऐसा आशिक तुझे फिर नही मिलेगा' असं सांगून त्याच्याकडे जाण्यासाठी उद्युक्त करते. > अनुक्रमे पैसा आणि रुबाब (कि सेक्शुअल पॉवर?) साठी आहे का हा फीडबॅक?

अनुक्रमे पैसा आणि रुबाब (कि सेक्शुअल पॉवर?) साठी आहे का हा फीडबॅक?>> एक तर सुभेदार उपलब्ध आहे. तुझा नवरा तर रेल्वेत नोकरीसाठी बाहेरच आहे. तर सेक्क्षुअल भूक वेगळ्या पद्धतीने भागवता येइल. प्लस काही पैसे दागिने अनोख्या गिफ्टा पण तो सुभेदार देइल. तर अश्या पद्धतीने स्वतःचा स्वार्थ साधोन फायदा करून घे. असे असावे.

कालच वाचले परीक्षण. मुलीला शिकवायला धडपडा णारी दिप्ती नवल हे एक छान पात्र ह्या सिनेमात आहे. पण नवर्‍याच्या वर्चस्वाखाली दाबले गेलेले.

स्मिता अम्म्म्म्म्म्मेझिंग दिसते. सर्व स्त्रियांच्या अंगावर्चे जेन्युइन कच्छी भरतकामाचे नमुने फार बहारीचे आहेत. मला वाट्ते भानु अथैया ह्यांनी कप डे पट डिझाइन केला आहे. दिप्ती नवल तुलनेने श्रिमंत असल्याने तिचे कप डे अधिकच सुरेख आहेत. ह्यात एक गरब्याचे गाणे आहे ते ही फार जेन्युइन व मस्त चित्रित केले आहे. पूर्ण चित्रपट अतिशय कलरफुल आहे.

खरे तर नसिरुद्दीन चे काम ही मस्त आहे. एक सीन आजिबात मिस करू नका तो रेकॉर्ड प्लेयर वर गाणी ऐकत बसलेला असतो व साधे
खेडवळ लोक्स अतिश् य अचंब्याने बघत असतात. हा एक रेकॉर्ड आणायला साहायकाला सांगतो. तर ती रेकॉर्ड आणताना हातातून पडून फुटते.
तेव्हा ह्याचा पारा क्षणार्धात असा वर चढतो व काय शिव्या घालतो. जीवच घेइ ल सहायकाचा कारण ह्याचा शोऑफी इगो हर्ट झाला तो ही खेडवळा समोर. हा एक उत्तम सीन आहे.

शेवटाला तो एक दलित माणूस व एक गुरुजी शिक्षक ह्यांना खांबाला डांबून ठेवून तिची शिकार करायला जातो. हा जास्त करून पावर स्ट्रगल आहे. व उठाव करायची क्रांती करायची मनापासून इच्छा असलेले दलित माणूस व शिक्षक ही जोडी तो खांब जोर लावून मुळातूनच उख्डून टाकतात व स्वतंत्र होतात. हे दिग्दर्शकाने एक चांगले प्रतिक योजलेले आहे. पण स्त्रीवादाच्या चर्चेत हा मुद्दा मागे पड्तो. तसे नसावे.
स्वातंत्र्य प्रत्येकाला हवे. तो हक्क असतो. तिला शरीर संबंध नाकारण्याचे स्वातंत्र्य. सुप्रिया पाठकला आपल्या प्रेमिका बरोबर लग्न करायचे स्वातंत्र्य दीप्ति च्या मुलीला शिकायचे, दिप्ति ला नवर्‍याचे प्रेम मिळवण्याचे अशी अनेक इथे आहेत. मूळ कथा छो टीशी असून छान बांधली आहे.

स्त्री म्हणजे मसाला वगैरे मला काही पटले नाही. माझ्या जीवनात मी चौरस अन्न आहे प्लस डेझर्ट. व कोनत्याही बाप्याच्या जीवनात मसाल्यासारखे बसून त्याला चव आणायची मला अजिबात आवश्यकता वाटत नाही. ते त्याला स्वतःला करू दे.

मस्त प्रतिसाद अमा!

> एक तर सुभेदार उपलब्ध आहे. तुझा नवरा तर रेल्वेत नोकरीसाठी बाहेरच आहे. तर सेक्क्षुअल भूक वेगळ्या पद्धतीने भागवता येइल. प्लस काही पैसे दागिने अनोख्या गिफ्टा पण तो सुभेदार देइल. तर अश्या पद्धतीने स्वतःचा स्वार्थ साधोन फायदा करून घे. असे असावे. > रोचक आहे म्हणजे लक्ष्मी!
सरस्वती, लक्ष्मी, राधा वगैरे नावंपण विचार करून दिलीयत.

अंकुर, निशांतबद्दलपण लिहाल का? तुम्ही फारच बारकाव्याने पाहता सिनेमा आणि लिहतादेखील छान.

अंकुर, निशांतबद्दलपण लिहाल का? तुम्ही फारच बारकाव्याने पाहता सिनेमा आणि लिहतादेखील छान.>> ज्जे ब्बात हे डोक्यात होते. माझी मुलगी फिल्म राइटिंग मध्येच काम करते. तर तिने परवा अंकूर बघितला व आमचे भरपूर डिस्कशन झाले. शामबाबूंचा सिनेमा, एकंदरीत पॅरलल वेव्ह सिनेमा त्याकाळात बर्‍यापैकी रिलीज होत असत. व क्वालिटी पण चांगली असे. व बेस्ट म्हण जे एन एफ डी सी कडून पैसा उपलब्ध होत असे.
बिनडोक बॉलिवुडी सिनेमांपुढे हे सिनेमे एकदम शाइन होत. क्वालि टी मुळे. व एक वेगळा प्रेक्षकवर्ग पण राखून होते.

खरेतर सुभेदाराचे पात्र हे सैन्यातील अधिकार्‍याचे वागणे अगदी बरोबर रेखाटते. त्यांचा इगो, काम करवूनच घेण्याची शिस्त. जनरल ब्रिटिश सरकारचा एक हस्तक थोडी क्रूर छटा. आधिकार्‍याचा आब कायम राखणे. सर्वात उच्च कोटीचा अधिकारी त्या सेट अप मध्ये तोच म्हणून सर्वांना रग डतो. कर वसुली करतो. चांगले चुंगले अन्न, बायकांचा त्याच्या पुढे नाच. रगेल पणा चांगला रेखाटला आहे. त्याला कोणी विरोधच करत नाही तो स्मिता कडून आल्याने तो बावचळतो. व कसे वागावे कळत नाही. मग एकदम अ‍ॅग्रेशन च दाखवतो. ते अल्टिमेटली फेल जाते.

दोघीही शीलाचे रक्षणच करतायत. हा दृष्टिकोनच जर पुरुषप्रधान संस्कृतीमुळे आला असेल तर त्याला स्त्रीवाद म्हणायचे का?>>>>>> + १११

स्त्री म्हणजे मसाला वगैरे मला काही पटले नाही. माझ्या जीवनात मी चौरस अन्न आहे प्लस डेझर्ट. व कोनत्याही बाप्याच्या जीवनात मसाल्यासारखे बसून त्याला चव आणायची मला अजिबात आवश्यकता वाटत नाही. ते त्याला स्वतःला करू दे.>>>> +१११

. माझ्या जीवनात मी चौरस अन्न आहे प्लस डेझर्ट. व कोनत्याही बाप्याच्या जीवनात मसाल्यासारखे बसून त्याला चव आणायची मला अजिबात आवश्यकता वाटत नाही. ते त्याला स्वतःला करू दे.>> हे भारी आहे. एकूणच सगळाच प्रतिसाद आवडला अमा.

दोघीही शीलाचे रक्षणच करतायत. हा दृष्टिकोनच जर पुरुषप्रधान संस्कृतीमुळे आला असेल तर त्याला स्त्रीवाद म्हणायचे का?> पुरुषप्रधान संस्कृती आहे म्हणून स्त्रीवादाची गरज पडते ना? स्त्रीप्रधान संस्कृती असती तर पुरुषवादाची गरज पडली असती. Happy दोघे समान मानले गेले तर कुठलाच 'वाद' ( pun intended) नाही Wink

अंकुर हाही जबरदस्त सिनेमा आहे. शबाना आझमीचा अभिनय जबरदस्त आहे.

सशक्त अभिनयाने नटलेला सुरेख चित्रपट आणि तेवढं च सुन्दर परिक्षण Happy
मला नेहमी वाटत रहातं, की स्मिता ला अजुन उदंड आयुष्य मिळालं असतं तर तीने शबाना आझमी ची नक्कि छुट्टी केली असती.
शबाना चा अभिनय उच्च च आहे, पण स्मिता चा अभिनय अत्युच्च असायचा, आणि तो ही एकदम सरल, अजिबात ओढुन-ताणुन न केलेला.
स्मिता च्या चेहेर्यात ही एक प्रचंड आपलेपणा होता/वाटायचा (आता ती पाटिल होती.... महाराष्ट्रिय होती म्हणुन ही वाटत असेल मला कदाचित), त्या मानाने शबाना कधीच आपल्यातली वाटली नाही.
काय बुद्धी झाली आणि त्या बब्बर च्या प्रेमात पडली...आणि बिचारीच्या आयुष्याची माती झाली. Sad

चित्रपट आवडता आहे. लेख आणि अमांचा प्ररतिसाद दोन्ही आवडले.

स्मिता आणि.शबाना इतकी वर्षं समांतर चालल्या की. आणखी किती काळ हवा छुट्टी करायला?
दोघी कित्येक वेळा समोरासमोरही आल्यात.
तसंच समोरच्याची छुट्टी करणं हे दोघींच्याही अभिनयशाळेत बसत नाही.
शबाना कमर्शियलमध्ये जितकी सहज होती तितकीच स्मिता अवघडलेली वाटे. ती असे सिनेमा अट्टहासातून करतेय असं वाटत राही.

छान लेख.

अमांचा प्रतिसाद पण आवडला.

माझ्या जीवनात मी चौरस अन्न आहे प्लस डेझर्ट. व कोनत्याही बाप्याच्या जीवनात मसाल्यासारखे बसून त्याला चव आणायची मला अजिबात आवश्यकता वाटत नाही. ते त्याला स्वतःला करू दे.>> हे तर सगळ्यात भारी

चांगला लेख. फक्त शेवटचे तिखट फेकायचे दृष्य आठवते, बाकी काहीच आठवत नाही. आता पाहिला तर कसा वाटेल हे पहायला , पहायला हवा. म्हणजे चांगला वाटेल पण किती खोल उमटेल माहित नाही.

> माझी मुलगी फिल्म राइटिंग मध्येच काम करते. > भारीच की!

> तिने परवा अंकूर बघितला व आमचे भरपूर डिस्कशन झाले. > वेगळा लेख लिहा वेळ मिळाला की.

> शामबाबूंचा सिनेमा, एकंदरीत पॅरलल वेव्ह सिनेमा त्याकाळात बर्यापैकी रिलीज होत असत. व क्वालिटी पण चांगली असे. व बेस्ट म्हणजे एन एफ डी सी कडून पैसा उपलब्ध होत असे.
बिनडोक बॉलिवुडी सिनेमांपुढे हे सिनेमे एकदम शाइन होत. क्वालिटी मुळे. व एक वेगळा प्रेक्षकवर्ग पण राखून होते. > खरंय. एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं या सिनेमांनी बॉलिवूडला. खरंतर लेखमालाच येऊद्या या सिनेमावर. वाटल्यास तुम्ही आणि मुलगी ठरवून एकेक सिनेमा बघा आणि चर्चा करा आणि आमच्यासारख्यांचे ग्यान वाढवा.