चमचा !

Submitted by झुलेलाल on 17 August, 2019 - 04:12

चमचा!
आपण पुनर्जन्म वगैरे मानत असू किंवा नसू. पण एक प्रश्न मात्र आपल्याला खूप आवडतो. तो म्हणजे, ‘पुढच्या जन्मी तुला कोण व्हायला आवडेल?’… कारण, या प्रश्नाचं उत्तर एका मानसशास्त्राशी जोडलं गेलेलं असतं. बऱ्याचदा, या जन्मात न जमलेली किंवा राहून गेलेली एखादी गोष्ट जमविणे किंवा पूर्ण होणे हे आपल्या पुढच्या जन्माचं ध्येय असलं पाहिजे, असंच अनेकांना वाटतं. ‘पुनर्जन्म असलाच, तर पुढच्या जन्मी मला अमुक व्हायला आवडेल’, असं या प्रश्नावरचं उत्तर मिळतं, ते त्यामुळेच...
... सुट्टी असेल तेव्हा सकाळच्या नाश्त्यासोबत वर्तमानपत्र वाचायची मजा काही औरच असते. ती मी आज अनुभवत होतो. हातात गरमागरम चमचमीत कांदापोह्याची प्लेट आणि समोर मांडीवर वर्तमानपत्र ही त्या क्षणाच्या सर्वात चांगल्या सुखाची व्याख्या असते अशी माझी खात्री असल्याने, ते सुख अनुभवत असतानाच वर्तमानपत्रात कुठेतरी कांशीराम यांच्या ‘चमचा युगा’चा उल्लेख वाचला, आणि माझी वाचनमुद्रा क्षणभर खंडित झाली. हातातल्या कांदापोह्याच्या प्लेटमधला चमचा क्षणभर थरथरून गेल्याचा मला भास झाला, आणि माझी नजर वर्तमानपत्रावरून हातातल्या पोहेभरल्या चमच्यावर स्थिरावली. त्या क्षणी त्या चमच्याने माझ्याकडे पाहून डोळा मिचकावल्याचा भास मला झाला, आणि झटक्यात त्यातील खळग्यातले चमचाभर पोहे घशाखाली घालून मी चमच्याकडे पाहू लागलो.
पुढे जणू चमचा माझ्याशी बोलू लागला...
लहानपणी शाळेत असताना, वेगवेगळ्या विषयांवर निबंध लिहायला गुरुजी सांगत असत. त्यात, ‘मी पंतप्रधान असतो तर…’ वगैरे विषयाचाही समावेश असायचा आणि आपण त्यावर आवेशाने निबंध लिहित असू ते मला आजही चांगले आठवते. चमच्याकडे पाहाताना मला ते दिवस आठवले, आणि एक खंत मनाच्या कोपऱ्यातून उगवून मनभर पसरत आहे असा भास मला होऊ लागला. हातातला चमचा काहीसा उदास होत आहे, असे मला वाटू लागले. मी निरखून त्याच्याकडे पाहिले. त्याच्या खोलगट खड्ड्यावर एक काळसर ठिपका आहे, हे मला जाणवले, आणि मी विचार करू लागलो... हा काळा डाग चमच्यावर का बरे पडला असेल?... खरं म्हणजे, हा काही मनाला त्रास वगैरे करून घेण्याइतका गहनबिहन प्रश्न नव्हता. एका झटक्यासरशी तो झटकूनही टाकता आला असता. पण सुट्टीचा दिवस, समोर पसरलेलं वर्तमानपत्र, हातातील पोहेभरल्या प्लेटमधून आपल्याकडे पाहणारा चमचा आणि मोकळं मन एवढं सगळं जुळून आलेलं असताना असा प्रश्न झटकून टाकला तर नंतर करायचं काय, असा विचार करून मी तो प्रश्न मनात तसाच राहू दिला. मग वर्तमानपत्र बाजूला केलं. पोह्याची प्लेटही खाली ठेवली. आता माझ्या हातात फक्त चमचा होता. मी त्याच्याकडे निरखून पाहिले, आणि त्या काळ्या डागाविषयी विचार करू लागलो... माझी विचारतंद्री ऐन भरात आलेली असताना, बायकोने एका भांड्यातून आणखी पोहे आणले आणि हातातल्या चमच्यापेक्षा थोड्या मोठ्याशा चमच्याने तिने चमचाभर पोहे माझ्या प्लेटमध्ये टाकले... मी हाताने ‘पुरे’ म्हणत असताना, माझ्या हातातला चमचा आणि तो थोडा मोठा चमचा एकमेकांवर आपटले, आणि ‘किण्ण’ असा एक मंजुळ ध्वनी कानाशेजारी घुमला. त्याला एक गोड नाद आहे हे माझ्या लक्षात आले. मग मी त्यावर विचार करीत असताना, ‘कदाचित दोन चमचे बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे त्यांनी प्रेमाने एकमेकांची विचारपूस केली असावी’ असा विचार मनात येऊन चमच्यांना भाषादेखील असते, या निष्कर्षाचा मला शोध लागला.
... आता माझ्या मौनाचा अर्थ शोधण्यात माझी बायको गर्क झाली असावी. मोठा चमचा काहीशा जोरातच भांड्यात ठेवून तिने माझ्यासमोर तळवा हलविला, आणि भांड्यात चमचा आपटतानाच्या आवाजाने माझी तंद्री पुन्हा एकदा भंग झाली. या वेळी मोठ्या चमच्याच्या आपटण्याच्या ध्वनीतून त्याची नाराजी स्पष्टपणे उमटली आहे, असा मला भास झाला, आणि मी हातातल्या चमच्याकडे नजर वळविली. आता त्याच्यावरचा काळा डाग अधिकच ठळक झाला असावा, असे मला वाटू लागले होते. या क्षणी आपण मौन सोडले नाही, तर मनातल्या विचारास वाचा फुटणे कठीणच, असा विचार करून मी माझ्या प्लेटमधला तो छोटा चमचा बायकोसमेर उंचावला, आणि, ‘हा काळा डाग कसला’ असा प्रश्न नम्रपणे तिला विचारला. तिनेही काही क्षण चमच्यावरच्या त्या काळ्या डागाकडे पाहिले. विचार करतच ती चमच्याकडे निरखून पाहात होती, आणि मी तिच्या चेहऱ्यावरच्या बदलत्या भावरेषा निरखत होतो. माझ्या हातातला तो काळा डाग असलेला चमचा आता तिच्याशी बोलत असावा असे मला तिच्या डोळ्यात पाहताना वाटू लागले. असेच काही क्षण गेले, आणि अचानक, तिला माझ्या प्रश्नाचे उत्तर सापडले. ‘बरेच दिवस तो चमचा लोणच्याच्या बरणीत पडून होता... म्हणून काळा पडला असावा’... तिने मला सांगितले. मग मी चमच्याकडे पाहिले. काळवंडलेल्या चेहऱ्याने उदासपणे तो माझ्याकडेच पाहात होता. लोणचं संपल्यावर तो चमचा खूप वेळ घासला, तरी थोडासा डाग त्याच्यावर राहिलाच... त्या आठवणीची बायको उजळणी करत असताना काळवंडलेला तो चमचा समाधानाने उजळतोय, असे मला वाटले. अंगावरच्या छोट्याशा डागाचे आता आपल्याला काही वाटत नाही, असाच त्याचा भाव असावा असाही मला भास झाला. तरीही, थोड्या दिवसांच्या लोणच्याच्या सहवासामुळे याने आयुष्यभरासाठी स्वतःस डाग लावून घेतला, असा खेदजनक विचार माझ्या मनात आलाच! मग मी तो चमचा हलकेच प्लेटवर आपटला. रिकाम्या चमच्याचा नाद मधुर असतो, हे मला तेव्हा जाणवले. ज्या जागी आपण असू तेथे प्रामाणिक रहायचे, आणि आपले काम बजावायचे हा चमच्यांचा गुणधर्मच असतो. म्हणूनच तो अनेक दिवस बरणीतल्या लोणच्यासोबत बिनबोभाटपणे राहिला, नंतर पोह्याच्या प्लेटमध्ये आनंदाने आला, आणि दुसरा चमचा भेटताच त्याच्याशी संवादही साधता झाला... चमच्याचे हे वेगळेपण मला त्या क्षणी साक्षात्कारासारखे वाटू लागले, आणि पुढचा जन्म असलाच, तर आपणही चमचा व्हावे असे मला प्रकर्षाने वाटू लागले.
मग मी चमच्यांची कूळकथा शोधू लागलो. चमच्यांचे अनंत प्रकार असतात, आणि आकारानुसार त्यांचा वापर केला जातो, असे मला त्या संशोधनातून आढळून आले. मग मी उत्सुकतेपोटी चमच्यांची चित्रे शोधू लागलो, आणि हे सारे चमचे आपल्यादेखील आसपास आहेत, हे माझ्या लक्षात आले. कधीच शक्य नसलेल्या किंवा न पाहिलेल्या, न हाताळलेल्या किंवा आवाक्यापलीकडच्या गोष्टींचा विचार करत, आपण अमुक असतो तर, तमुक असतो तर अशा कल्पना लढवत आपण आपले बालपण वाया घालविले, त्याऐवजी, ‘आपण चमचा असतो तर…’ या विषयावर एखादा तरी निबंध लिहावयास हवा होता, असे मला वाटू लागले. मग, आपणास असे का वाटू लागले यावर मी विचार करू लागलो. असे विचार मनात येऊ लागले, की त्याचे उत्तर सापडेपर्यंत मनाला चैन पडत नाही. समजा, आपण चमचा असतो तर या विषयावर लहानपणीच आपण विचार केला असता, तर त्याने काय फरक पडणार होता, असाही प्रश्न मला पडला, आणि हातातला काळा डागवाला चमचा पोह्याच्या प्लेटमध्ये खुपसून चमचाभर पोहे पुन्हा तोंडात कोंबून मी त्याचेही उत्तर शोधू लागलो. पण त्यासाठी फार वेळ घालवावा लागला नाही. काही क्षणांतच मला पहिले त्तर सापडले. ते म्हणजे, आपण लहानपणीच यावर विचार केला असता, तर मोठेपणा, आता यावर विचार करण्यात वेळ घालवायची वेळच आली नसती, आणि आसपासच्या चमच्यांची वैशिष्ट्ये, त्यांची भाषा, त्यांचे परस्परांशी वागणे यांचा अर्थ कधीच आपल्याला उमगूनही गेला असता. चमचे ज्याच्यासोबत असतात, त्याच्याशी सेवाभावानेच नव्हे, तर एकनिष्ठेने राहतात, आणि जागा बदलल्यानंतर नव्या जागेत ज्याच्यासोबत राहतात, त्याच्याशीही त्यांची तेवढीच निष्ठा असते, हे सत्य आपल्याला लहानपणीच उमगले असते, असेही वाटून गेले. शिवाय, आकारानुसार त्यांची उपयुक्तता असते, हेही वास्तव जे आज उमगले, त्याची थोडीशी तरी ओळख लहानपणीच करून घेता येणेही शक्य झाले असते, असेही मला वाटू लागले.
चमचे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही चहासाखरेच्या डब्यातल्या चमच्यांना सहसा जागा बदलायची वेळच येत नाही. साखरेच्या डब्यातल्या चमच्यावर तर, कायम साखरेसोबत राहून साखरेचा थरच जमा झालेला असतो, हेही माझ्या लक्षात आले. आमच्या मिठाच्या डब्यात आईस्क्रीमच्या कपात असलेला प्लास्टिकचा चमचा पर्मनंटली ठेवलेला असतो. स्टीलचे चमचे मिठात टिकत नाहीत, असे बायकोने सांगितले. मग ओट्याखालचे कपाट उघडून मी वेगवेगळ्या चमच्यांची त्यांच्या आकारानुसार उपयुक्तता काय, यावर बायकोशी चर्चा केली. चपटा चमचा भाताच्या भांड्यातच चालतो, तर मोठा चमचा- आम्ही त्याला डाव असेही म्हणतो- आमटीच्या पातेलीतच वावरतो. ढवळण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो, हाही मला माहीत असलेलाच उपयोग बायकोकडून पुन्हा ऐकावयास मिळाला. एक पूर्ण चपटा असाही चमचा मला पहायला मिळाला. त्याला खोलगटपणा अजिबातच नव्हता. फक्त पसरटपणा असलेला हा चमचा, तव्यावरच्या पोळ्या, डोसा वगैरे पदार्थ परतण्यासाठी उपयोगी पडतो, असे बायकोने सांगितले.
टीस्पून आणि टेबलस्पून असे शब्द आपण नेहमी वापरतो. ते त्यांच्या आकारावरून आणि उपयुक्ततेवरूनच पडलेले असतात. कोणत्याही पदार्थात, चवीपुरता मीठमसाला घालण्यासाठी टीस्पून वापरतात, तर तयार पदार्थ पानात वाढून घेण्यासाठी टेबलस्पून वापरतात...
या नाना गुणांनी युक्त असलेल्या चमचा या वस्तूचे महात्म्य मला पोह्यांच्या प्लेटीतल्या एका छोट्याशा चमच्याने समजावून सांगितले, आणि ‘चमचायुग’ या शब्दाचा व्यापक अर्थ मला समजून आला. चमच्याशिवाय सारे व्यर्थ आहे, हे मला पटले, आणि चमचा ही या जगातील अत्यावश्यक चीज आहे, याची खात्री पटली.
पुढच्या जन्मी कोण व्हावे असे तुला वाटते, असा प्रश्न मला जर कुणी आता विचारला, तर क्षणाचाही विलंब न लावता मी उत्तर देईन, ‘च म चा’!

©️दिनेश गुणे

Group content visibility: 
Use group defaults