'गुळा-नारळाच्या पुर्‍या/वडे/घारे'- नारळी पौर्णिमा स्पेशल

Submitted by 'सिद्धि' on 15 August, 2019 - 13:59

साहित्य-
२ वाटी तांदळाचे पीठ (साधारण पाव किलो), 1 मोठया नारळाचा (संपूर्ण) चव/ किस, 1 वाटी गूळ(आवडी प्रमाणे कमी /जास्त घेऊ शकता).
किंचीतसे मीठ, पाव चमचा जायफळ पूड आणी वेलची पूड, तळण्यासाठी तेल. २ टिस्पून तूप.
IMG_20190815_123005.jpgकृती-
पराती मध्ये थोडेसे पाणी घालून बारीक मिक्सर केलेला नारळाचा कीस घालून घ्या.त्यामध्ये बारीक केलेला गूळ घ्यावा.
आता यात जायफळ पूड, वेलची पूड आणी किंचीतसे मीठ मिक्स करून घ्या. या तयार मिश्रणा मध्ये जेवढे मावेल तेवढेच तांदळाचे पीठ थोडे-थोडे मिक्स करायचे. नारळाचा कीस हा तांदळाच्या पीठा पेक्षा थोडा जास्त असला पाहीजे, तरच याला छान टेस्ट येते. हे मिश्रण अजिबात पाणी न वापरता तयार करायचे आहे. शेवटी तयार मिश्रण थोडे तूप हाताला लावून मऊसर मळून घ्यावे. तयार मिश्रणाचा गोळा झाकून अर्धा तास तसाच बाजूला ठेवून द्यावा. यामुळे ते व्यवस्थित मिळून येते. तसेच गुळाचे थोडे मोठे असलेले तुकडे देखील विरघळून जातात.
IMG_20190815_122928.jpg

तयार पिठाला तुपाचा हात लावून लहान-लहान गोळे बनवून त्याच्या छोटया-छोटया पुर्‍या करून घ्याव्या.(श्रीखंड पुरी करतो त्या मधील पुरी प्रमाणे) थोडी जाडसर, पण आकाराने छोट्या अश्या पुर्‍या थापाव्यात. तेल कडकडीत तापवून घ्यावे. आपण वडे तळतो त्या प्रमाणे या पुर्‍या तेला मध्ये मध्यम गॅसवर दोन्ही साईडने मस्त खुसखुशीत, लालसर रंगावर तळून घ्यावे. नारळी पौर्णिमेला दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्यासाठी आम्ही अश्या पुर्‍या/ वडे करतो. नारळी भाताला पर्याय म्हणून. फार तर २० मिनिटांत या तयार होतात. दुधा बरोबर,चहा बरोबर किंवा सकाळचा नाष्टा म्हणून खायला हरकत नाही. चविष्ट लागतातच आणि पौष्टिक ही आहेत.
1565891086324.jpg

.
*या पाककृती मध्ये तांदळाचे पीठ वापरत असल्याने काही ठिकाणी याच रेसिपी ला ‘गुळा- नारळाचे वडे' असे देखील म्हणतात. 'घारे' असे ही म्हणतात. साहित्य वगैरे विषेश काही लागत नाही. अगदी सहज-सोपी पाककृती आहे. ओभड-धोबड पणे घाई-घाई मध्ये करण्याजोगी रेसीपी आहे.

* उकडीच्या मोदकाचे सारण उरले असेल तर त्याच्या देखील सेम अश्याच तांदळाच्या पिठा मध्ये मिक्स करून पुर्‍या बनवता येतात.

* मैदा आणि गव्हाचे पिठ एकत्र करुन ‘नारळाच्या पोळ्या किंवा सांजोर्या/ साटोर्‍या' बनवल्या जातात. ती रेसिपी वेगळी आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते.
"आमच्याकडे कणीक वेगळे मळुण घेतले जाते. त्यामध्ये घातले जाणारे सारण हे उकडीच्या मोदकाच्या सारणा प्रमाणे असते. हे सारण पुरणपोळी च्या, पुरणा प्रमाने कणकेच्या गोळ्यामध्ये आत भरले जाते. आणि पोळी प्रमाणे लाटुन केल्या जातात."

(किट्टु२१ - रेसिपी ईथे पोस्ट करायला सांगितल्या बद्दल स्पेशल थॅक्स.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वडे छान दिसताहेत.
या वड्यांबद्दल कधी ऐकलंही नव्हतं, त्यामुळे माझ्यासाठी नवीन रेसिपी. भोपळ्याचे घारगे आणि कोकणातले वडे यांचं फ्युजन .

देवकी,भरत,झंपी tnx

Mast recipe ahe.shanka udya vicharte- देवकी ताई विचार ना! मोस्ट वेलकम.

भरत भोपळ्याचे घारे आमच्या इथे कोकणात देखील करतात.
रेसिपी सेम आहे. फक्त नारळाच्या ठिकाणी लाल भोपळ्याचा कीस मिक्सर न करता घालून हे घारे होतात. गुळ थोडा कमी घ्यायचा. आम्ही याला 'भोपळ्याचे घारे' म्हणतो, तुम्ही 'घारगे' म्हणताय ती हिच रेसिपी असावी बहुतेक.

सिद्धि
मस्तच दिसतायेत पुऱ्या, नक्की करून पाहणार.
तों पा सु

छान रेसिपी आहे. सेम भोपळ्याच्या घारग्यांची, फक्त लाल भोपळ्या ऐवजी नारळ वापरला आहे. कधी तरी करून बघायला (खायला) आवडेल.

भोपळ्याचे तर घारे असतात.
छान .. पाककृती खुप आवडली something new..
पुर्‍या चहाबरोबर तर खुप छान लागतील.
एक प्रश्न. सिद्धि ऑप्शन म्हणुन पुर्‍याला अनारश्या प्रमाणे खसखस लावली तर चालेल का?
(तसे खसखस नसेल तरी छान लागतील पुर्‍या.)

मीरा..,वावे,नितीन बाबा शेडगे - धन्यवाद

ऑप्शन म्हणुन पुर्‍याला अनारश्या प्रमाणे खसखस लावली तर चालेल का?
नितीन- मी केव्हा केलेल नाही तस. पण खसखस किवा पांढरे तीळ घालुन मस्त होतील.
आधी करुन बघते मग सांगते.

काल घाईत वाचले होते,तेव्हा मनात आले की ओले खोबरे की सुके खोबरे घ्यायचे. म्हणून रेसिपी आज परत नीट वाचली.आमच्याकडे भोपळ्याचे घारगे करतात पण गूळचूनाचे घारगे नवीन ऐकले.पण रेसिपी मस्त आहे.

भारी दिसताहेत पुऱ्या. घारगे आठवले.
आम्ही त्याला डांगर घाऱ्या म्हणतो. आईलोकांना जमत नाही फारशा चांगल्या, आज्जीलोक भारी करतात.
ही पाकृ करुन पहायला हवी.

डांगरघाऱ्या मी हेच म्हणणार होतो. डांगराच्या ( तांबडा भोपळा ) मोठाल्या फोडी वाफवून, त्यातील गोडसर शिजलेला मगज व गुळ गव्हाच्या पिठात कालवून घ्यायच्या व मस्त पिठ मळून पुऱ्या लाटून तळायच्या. घरची भरपूर डांगरे निघाली की मग हा बेत व्हायचा. दोन दिवस मस्त खात असायचो डांगरघाऱ्या. नाहीतर मग होत्या आपल्या नेहमीच्या तेलच्या अन् गुळवणी.

दिप्ती,देवकी,वाली,अमर ९९ - धन्यवाद
साधी सोपी पारंपरिक रेसिपी आहे. काही विशेष नाही... करुन बघा.

किट्ट २१- वन्स अगेन थॅक्स.

भारी दिसताहेत पुऱ्या. + १
नारळाचा कीस हा तांदळाच्या पीठा पेक्षा थोडा जास्त असेल तर वडे फुटणार नाहीत ना ?

मी काकडी गुळाचे वडे केले आहेत, मिश्रण थोडे शिजवून घ्यावे लागते. वडे तळताना जो दैवी वास दरवळतो, त्या आठवणीने भूक लागली Happy Happy

गूळ चुन पण आवडीचे कॉम्बो आहे, त्यामुळे नक्की करून बघेन.

नारळाचा कीस हा तांदळाच्या पीठा पेक्षा थोडा जास्त असेल तर वडे फुटणार नाहीत ना>>>

तांदूळ पीठ जास्त झाले तर वडे कडक होतील आणि चवीला सपक लागतील.

तांदूळ पीठ जास्त झाले तर वडे कडक होतील आणि चवीला सपक लागतील.
साधनाताई- सही पकडे हे.... धन्यवाद

काकडी गुळाचे वडे- मी पण करते. सेम पाककृती.