सामाजिक उपक्रम २०१९ आढावा

Submitted by कविन on 12 August, 2019 - 00:26

सर्वप्रथम हा आढावा प्रकाशित करण्यास यंदा विलंब झाल्याने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.

आपल्या सामाजिक उपक्रमाचे हे १० वे वर्ष. नेहमीप्रमाणे यावर्षीही आपल्यापैकी काही मायबोलीकरांनी एकत्र ये‌ऊन सामाजिक उपक्रमासाठी मायबोली आणि मिसळपाववर आवाहन व घोषणा केली. याप्रकारे आवाहनात दिलेल्या यादीतून इच्छुक देणगीदारांनी त्याच्या पसंतीच्या संस्था निवडल्या व ते देणगी दे‌ऊ शकत असलेली रक्कम सामाजिक उपक्रम टीमला कळवली. तसेच त्या संस्थेकडे पैसे जमा केल्यावर त्याबद्दलही आम्हाला कळवले. त्यामुळे त्या संस्थेकडून देणगीची पावती घेणे, ती देणगीदारांस सुपूर्द करणे व ज्या कामासाठी किंवा वस्तूसाठी देणगी दिली आहे त्या कामाची / वस्तू खरेदीच्या प्रगतीची संस्थेकडून माहिती घेणे यासंदर्भात आम्ही थोडीफार मदत करू शकलो.

ज्यांनी असा पसंतीक्रम कळवला नव्हता त्यांच्यासाठी संस्था निवडताना शक्यतो प्रत्येक संस्थेला समप्रमाणात देणगी मिळावी असा विचार केला गेला पण असं करतानाही आपण प्रत्येक संस्थेने नमुद केलेली यावर्षीची गरज शक्य तितकी पूर्ण हो‌ईल याकडेही शक्य तेव्हढं लक्ष दिलं आहे.

यावर्षी एकूणच प्रतिसाद थोडा कमी जाणवला. यामागे व्यस्तता, सोशल साईटवर आमचा आणि सगळ्य़ांचाच प्रसंगी कमी झालेला वावर हे कारण असावे. आपले काही देणगीदार आता वर्षभर यातील काही संस्थांना नियमीत देणगी देत असतात. उपक्रमामार्फ़त संस्थांची झालेली ओळख आज त्यांच्यामधेही एक दृढ बंध निर्माण करावयास कारणीभूत ठरली याचा आम्हाला आनंदच आहे. मदत मिळणे आणि सकारात्मक काम होणे हे आमच्या लेखी महत्वाचे आहे. आम्ही निव्वळ एक पूल आहोत आणि आमचा वाटा हा अगदीच खारीचा आहे या संस्थांच्या प्रत्यक्ष कामापुढे याची जाणीव सतत मनात जागी असते. तरी देखील सांगावयास आनंद वाटतो की या वर्षीदेखील उपक्रमाची माहिती वाचून मायबोली आणि मिसळपावचे सभासद नसलेल्या, किंवा मायबोली आणि मिसळपाववर केवळ वाचनमात्र येणाऱ्या  काहीजणांनीही मदतीचा हात पुढे केला. नियमीतपणे उपक्रमाचा भाग होणारे आपले काही देणगीदार, नवीन देणगीदार, मायबोलीकरांचे मित्र, नातेवाईक अशा सगळ्यांच्या हातभारामुळे हा उपक्रम पुर्णत्वास जाऊ शकला. आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाप्रती आम्ही आपले सदैव ऋणी राहू. 

देणगीदारांकडून त्या त्या संस्थेत देणगी जमा करण्याचं काम जवळपास पूर्ण झाले आहे. काही देणगीदारांची देणगी प्रक्रिया अजून सुरु आहे. 

आवाहनात लिहील्याप्रमाणे त्या देणगीचा विनियोग देखील काही संस्थांनी केला आहे. काही संस्थांमधे विनियोगाचे काम अजून चालू आहे. त्या सगळ्याची माहिती खाली देत आहोत. आपण यंदा एकूण रु. 

२,१७,५०१/- (रुपये   दोन लाख   सतरा हजार पाचशे एक मात्र) इतकी देणगी जमा करु शकलो . गेल्यावर्षी आपण एकूण रु. ४,६१,४०१/- (रुपये चार लाख  एकसष्ठ हजार चारशे  एक मात्र) इतकी देणगी जमा करु शकलो होतो

संस्थांची नावे व त्यांना मिळालेल्या देणगीतून त्यांनी केलेली कामे / घेतलेल्या वस्तूंची यादी देत आहोत :

1) शबरी सेवा समिती, ता. कर्जत: विहीर बांधणी प्रकल्प त्यांनी यंदा हाती घेतला होता.  त्यांना मिळालेल्या रु. ४१,०००/- (रुपये एक्केचाळीस हजार मात्र) या देणगीतून त्यांनी आपल्या आवाहन धाग्यात नमुद केलेल्या सुरेश पाडवी (दिव्यांग) या अपंग  व्यक्तीला उपजिविकेचं साधन म्हणून दुकान बांधणीत मदत केली आहे. बेलपाडा तालुका, पेठ जिल्हा नाशिक येथे एकाच गावात ६०० आंबा कलमे आदिवासी शेतकऱ्यांना वाटप केले.

2) सहारा अनाथालय, गेवराई बीड: आपल्या उपक्रमाद्वारे त्यांना एकूण रु. ४७,०००/- (रुपये सत्तेचाळीस हजार मात्र)  इतकी देणगी दिली गेली. बालग्राममधे आवश्यक असलेल्या साहित्याची खरेदी. (या देणगीचा विनियोग अजून बाकी आहे. ते काम येत्या एक दोन महिन्यात पूर्ण होऊन त्याचे तपशील इथे त्याप्रमाणे दिले जातील). मध्यंतरी  संतोष गर्जे ह्यांना अपघात झाला  त्यामुळे काम थोडे स्थगित झाले होते .

3) हरीओम शैक्षणिक व सांस्कृतिक मागासवर्गिय सेवाभावी बहुउद्देशीय संस्था, बुलढाणा: : आपल्या उपक्रमाद्वारे त्यांना एकूण रु. २५,०००/- (रुपये पंच्गवीस हजार मात्र)  इतकी देणगी दिली गेली. हि संस्था आपल्या आवाहन यादीत लिहीलेली नव्हती. यासस्थेसंबंधी नंतर काही देणगीदारांनी वैयक्तिक संपर्काचा वापर करुन चौकशी केली म्हणून संस्थेकडून तसे तपशील मागवून त्या देणगीदारांना दिले गेले .

4) सावली सेवा ट्रस्ट, पुणे: : आपल्या उपक्रमाद्वारे त्यांना एकूण  रू. ६१,५०१/ - (रुपये एकसष्ठ हजार पाचशे एक)  इतकी देणगी दिली गेली. 

गणवेष खरेदीसाठी व शैक्षणीक फी साठी त्याचा वापर करण्यात आला. 

5) स्नेहवन,पुणे: आपल्या उपक्रमाद्वारे त्यांना एकूण ₹रू. ४३,०००/- (रुपये त्रेचाळीस हजार मात्र)  इतकी देणगी दिली गेली.

त्यांनी या देणगीचा वापर स्वयंपाकघरात लागणारी भांडी व गरम /गार पाणी  डिस्पेन्सर बसवण्यासाठी केला.

सर्व संस्थांनी देणगीदारांना पावत्या दिल्या आहेत्. ज्यांना शक्य आहे त्यांनी साहित्य खरेदीच्या पावत्या, साहित्याचे प्रकाशचित्रे, बांधकामाचे प्रकाशचित्र आपल्यासाठी पाठविले आहेत. ते आपल्या वाचनासाठी वेगळा धागा काढून किंवा येथेच प्रतिसादामधे लवकरच प्रकाशीत केले जातील.

उपक्रमासाठी काम करणारे स्वयंसेवक : सुनिधी(प्राजक्ती कुलकर्णी), अतर्ंगी (मनोज), महेंद्र ढवाण, निशदे (निखील देशपांडे),अरुंधती कुलकर्णी, प्राची. (प्राची वेलणकर), कविन (कविता नवरे)

या सर्व उपक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचेच खूप मोलाचे सहकार्य लाभले. मायबोली प्रशासनाने मायबोलीचे माध्यम वापरण्याची परवानगी दिली आणि मिसळपाव प्रशासनाने मिसळपावचे व्यासपिठ उपलब्ध करुन दिले यासाठी त्यांचे विशेष आभार. सोशल नेटवर्किंगमधून काही उत्तम, विधायक व समाजोपयोगी कार्य करता येणे हा अनुभव आम्हां सर्वांसाठी नेहमीच सकारात्मक उर्जा देणारा आणि प्रेरणादायी असतो.

काही उल्लेख नजरचुकीने राहिलेले असल्यास आपण लक्षात आणून द्यालच ह्याची खात्री आहे. उपलब्ध प्रकाशचित्रे प्रतिसादात देत आहोत

सस्नेह,

सामाजिक उपक्रम २०१९ स्वयंसेवक टीम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहारा अनाथालय यांनी या वेळेस आपण दिलेल्या देणगीतून रेनवॉटर हार्वेस्टींग चे काम केले. त्यासाठी एकुण ५८, ९९२/- खर्च झाला.

प्लम्बिंग साहित्य 41867
प्लम्बिंग मजुरी 10,000
जेसीबी (7तास 30 मिनिटे 950 रुपये तासाने) 7125

सोबत कामाचे फोटो आणि पावत्या जोडत आहोत.

WhatsApp Image 2019-09-19 at 11.46.33 AM(2).jpegWhatsApp Image 2019-09-19 at 11.46.33 AM(1).jpegWhatsApp Image 2019-09-19 at 11.46.32 AM(3).jpegWhatsApp Image 2019-09-19 at 11.46.32 AM(2).jpegWhatsApp Image 2019-09-19 at 11.46.32 AM(1).jpegWhatsApp Image 2019-09-19 at 11.46.32 AM.jpeg

शबरी सेवा समितीने देणगीतून आपल्या आवाहन धाग्यात नमुद केलेल्या सुरेश पाडवी (दिव्यांग) या अपंग व्यक्तीला उपजिविकेचं साधन म्हणून दुकान बांधणीत मदत केली आहे. बेलपाडा तालुका, पेठ जिल्हा नाशिक येथे एकाच गावात ६०० आंबा कलमे आदिवासी शेतकऱ्यांना वाटप केले.

WhatsApp Image 2019-09-23 at 12.18.20 PM.jpegWhatsApp Image 2019-09-23 at 12.18.20 PM(1).jpeg

चमुतर्फे, सर्व देणगीदारांचे व उपक्रमाबद्दल उत्तेजन देणार्‍या सर्वांचे खुप आभार. तुम्हाला सांगु शकत नाही की या उपक्रमाची किती जणांना मदत होते, त्यांच्या किती महत्वाच्या गरजा पुर्ण होतात. धन्यवाद... धन्यवाद. आधार असाच कायम राहुदे.