घाटनदेवी व उंबरदार

Submitted by योगेश आहिरराव on 11 August, 2019 - 06:01

घाटनदेवी व उंबरदार

शनिवारी सकाळी लवकर निघून सुध्दा डोळखांब गाठायला नऊ वाजले. निमित्त होतं, अजयरावांनी सुचवलेल्या चोंढे घाटघर भागातल्या घाटनदेवी, उंबरदार व चोंढे या वाटा.
डोळखांबमध्ये पार्किंगचा बोर्ड लावलेल्या मोकळ्या मैदानात गाडी लावली खरी, पण काय माहित मला ती जागा सुरक्षित वाटेना. बाजूला असलेल्या हार फुले विकणाऱ्या काकांशी या बद्दल बोलत असताना, तिथे उभे असलेल्या शाळा मास्तरांनी त्यांच्या घराजवळ ठेवायला सुचवले. अर्थात त्या सार्वजनिक जागेपेक्षा तो पर्याय बरा वाटला. त्यांच्या घरी जाऊन गाडी ठेऊन पुन्हा माघारी येण्यात पाऊण तास गेला. आता पुढचं काम मेट गावी जाणारी जीपगाडी शोधणं. अश्या आडवेळी सीट भरायची शक्यता नाहीच. थोडा वेळ वाट पाहून सीट प्रमाणे थोडेफार पैसे कमी जास्त घेऊन तो भला जीपवाला आम्हाला सोडायला तयार झाला. तळवाडेहून उजवी मारून हिंग्लुद मार्गे कच्च्या रस्त्याने मेट गावात पोहचलो तेव्हा साडेदहा वाजलेले.
सहपरिवार जीप मधून मोठ्या सॅक घेत उतरल्यावर आमच्याकडे पाहत बरीच मंडळी जमा झाली. घाटनदेवीने जाणार असं सांगितल्यावर, पायथ्याच्या गावात नेहमी होते तसे चर्चा सत्र सुरू झाले. लय लांब आहे, उंन लागणार, बायका पोरांसोबत एवढं बोजा घेऊन, हि चालतील का ??? आणखी बरंच काही! एके ठिकाणी अंगणात शांतपणे बसून त्यांच्या साऱ्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करत, वाटेची सद्य स्थिती आणि निदान सुरुवात दाखवायला तरी कुणी सोबत मिळेल का या बद्दल विचारले. त्यावर समजलं सायंकाळी घाटघर मध्ये हळदीच्या कार्यक्रमासाठी बरीच मंडळी जाणार आहेत हवं तर त्यांच्या सोबत जरा वेळ आराम करून निघा. तरी किती वाजतील असं विचारल्यावर चार वाजेनंतर निघणार हे उत्तर मिळाले. ही मंडळी नेहमी जाणारी यांचा वेग आणि वेळ याचे गणित लहान निशांत आणि चार्वी सोबत असताना जुळणे अवघडच. एक मामा तयार झाले पण अवास्तव पैशाची मागणी त्यात ते हालेडुले मामा तिर्थप्राशन करून आलेले. दुसरं कुणीही तयार होईना, तिथे असलेल्या एकाने तोवर वाट समजून सांगत कागदावर कच्चा नकाशा काढून दिला. तसेही नियमित वापरात असलेल्या या वाटेबद्दल नियोजनाचा भाग म्हणून एकनाथ सोबत बोलणं झाले होतेच. २००८ मध्ये हरिश्चंद्रगड ते रतनगड रूट ट्रेक केला होता त्यावेळी चोंढे घाटाने उतरलो होतो. तर घाटघर साम्रद या वरच्या भागात भरपूर वेळा येणं झालं असल्यामुळे हा मुलुख तसा परिचित. बरोब्बर अकरा वाजता मेटहून निघालो. पहिला फोन एकनाथला केला, "दोन वाजेपर्यंत येतो". यावर एकनाथ, "काही वाटलं तर फोन करा मी येतो" असे म्हणाला. मेट गावाबाहेर पडताच सारा रखरखाट, अगदी झळा नसल्या तरी उन जाणवत होतं.
111_2.jpg
पूर्वेला अंदाजे सातशे मीटरवर घाटमाथा त्या पलीकडे उठावलेली ऐएमके रेंज. अर्ध्या उंचीवर असलेल्या पदरात झाडोरा पण त्या दिशेने गेलेली सोंड मात्र वैराण, एखाद दुसरं झाड काय ते नजरेत येत होतं. पहिला चढ पार करून पलीकडे उतारावर डाव्या बाजूला फळेश्र्वर महादेव मंदिर.
2222.jpg
बाजूलाच बारमाही पाण्याचा लहानसा ओढा त्याच पाण्यावर मंदिरा जवळ हिरव्या रोपांची लागवड केलेली नर्सरी. भर उन्हात ती हिरवीगार रोपं त्यावर कारंजा सारखे उडणारे पाणी पाहून डोळ्यांना वेगळाच तजेला मिळाला. इथेच आम्हाला आजी आजोबा त्यांची सुन व छोटी नात येताना दिसले. मेटहून वर घाटघरला मुलीकडे लग्नासाठी निघाले होते. त्यांना सुध्दा लहान चार्वी आणि निशांतकडे पाहून आश्चर्य वाटलं. पुढे एकत्रच गप्पा करत निघालो. कुठे काही वेळापूर्वी कुणी सोबत तयार होईना तर आता हे अचानक समोर, असो तर..
दोन मोठ्या ओढ्यांचा चढ उतार पार करून वाट सोंडेवर चढू लागली. उन्हामुळे घसारायुक्त बोडक्या सोंडेवर चढाई करताना चांगलाच घाम निघाला, त्यात मी आणि अश्विनी दोघे आलटून पालटून निशांतला धरून. चार्वी तरी बरं त्या आजींच्या नाती सोबत काहीतरी बडबड करण्यात गुंतली होती.
333_0.jpg
जिथे सावली मिळेल तिथे थोडं बसायचं मग पुन्हा निघायचं. आजोबांना म्हटलं, तुम्हाला आमच्या मुळे उशीर होत असेल तर तुम्ही व्हा पुढे आम्ही येतो मागून. यावर ते म्हणाले, "अर् माझं वय झालंया मिबी दम खातच जाणार". तासाभराच्या चाली नंतर मोठा ब्रेक घेतला सुका खाऊ आणि टॅग.
444.jpg
निशांत खाली सोडल्यावर बाकी खुश होई, माती लहान दगड खडी जे मिळेल ते हातात घेणार. पुन्हा कडेवर घेऊन निघालो मग किरकिर करणार. असेच लहान मोठे ब्रेक घेत जवळपास दोन अडीच तासानंतर सोडेंच्या मध्यावर आलो. इथून पुढे सोंड तीव्रपणे माथ्याच्या दिशेने गेलेली.
सुदैवाने वाट तशी न जाता सोंडेच्या पलीकडे, थोडक्यात डावीकडे वळून पदरात शिरली. झाडीने व्यापलेला आदर्श असा हा टप्पा. उंच उंच तसेच मोठे डेरेदार वृक्ष, महाकाय वेली तर विशेष नजरेत येणाऱ्या करवंदाच्या जाळ्या. इथेच एका ठिकाणी उजव्या हाताला गांडूळवाडीच्या दिशेने गेलेली वाट. अर्थातच ती न घेता मुख्य मोठी मळलेली आडवी वाट धरली. पदरात असल्यामुळे उन्हाचा त्रास नाही.
555_1.jpg
अंदाजे अर्धा तास सपाट चालीनंतर वाट उजवीकडे वळून कड्याला बिलगून चढू लागली. याच दरम्यान समोरच्या बाजूने कोथळा, लादेवाडीहून येणारी वाट मुख्य वाटेला मिळाली. या टप्प्यात ही छान झाडी, थोड चालायचं पुन्हा थोड बसायचं, कधी आम्ही पुढे तर कधी ते आजी आजोबा सारं एकदम निवांत. वाटेत कोथळाहून आलेले दोघं तिघ झपाझप पुढे पळत गेले. माथा समीप येऊ लागताच कड्यावर लावलेली रेलिंग दिसू लागली. झेड आकाराची वळणं घेत प्रशस्त बांधलेल्या वाटेने माथा गाठला तेव्हा तीन वाजलेले.
666_0.jpg
समोर एकनाथ आमची वाटच पाहत होता, दोन वाजेचा टाईम दिल्यामुळे तासभर इथे येऊन थांबला होता. मला म्हणे, "मी तुम्हाला भरपूर हाका मारल्या तुम्ही काही वर पाहिलंच नाही". मी म्हणालो, "अरे या मुलांच्या गडबडीत थांबत थांबत येतोय कसला आवाज येणार उलट तासभर उशीर झाला". माथ्यावर जिथे वाट येते तिथेच घाटनदेवीचे मंदिर आहे. सायंकाळी निवांत सूर्यास्त पहायला पुन्हा येऊ तेव्हा पाहू असे ठरले. इथून गावापर्यंत अर्ध्या तासाची डांबरी रस्त्याची चाल भर दुपारी ते टाळत, अश्विनी आणि दोन्ही मुलांना एकनाथ सोबत गाडीवर घरी पाठवून दिले. मी आरामात त्या आजी आजोबांसोबत जात नंतर वाटेत त्यांचा निरोप घेऊन रमत गमत एकनाथच्या घरी पोहचलो. पाहतो तर तोवर दोन्ही मुलं अंघोळ करून त्याचा अंगणात उड्या मारत होती.
777.jpg
खरंच काय कमाल असते ना डोंगरात... खुल्या आकाशात, स्वच्छ हवेत का नाही प्रसन्न वाटून चित्तवृत्ती उल्हासित होणार... कुठे सुरुवातीला किरकिर करणारा निशांत आणि इथे दंगा मस्तीत गुंग असणारा निशांत...
थोड गरम पिठलं भाकरी खाऊन, सूर्यास्त पहायला पुन्हा घाटनदेवी. यावेळी एकनाथची बाईक घेतली दहा मिनिटांत पॉईंटवर आलो तेव्हा सूर्य मावळतीला आला होता. त्याच्या सायंकाळच्या सोनेरी किरणांनी बेसाल्टचे महाकाय अलंग मदन कुलंग त्यांच्या बॅकग्राऊंड वर असलेल्या निळ्या आकाशी रंगात खुलून दिसत होते.
888_0.jpg
तिथं पाहत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. नारायण अंकल व अनिल जाधव यांच्या सोबत जानेवारी २००६ मध्ये या तिन्ही दुर्गांची तीन रात्र चार दिवस थोडक्यात तिन्ही दुर्गांवर रात्रीचा मुक्काम करून व्यवस्थित दर्शन घेत केलेली अशी मोहीम. आता तर ज्या प्रकारे हे किल्ले पाहिले जातात त्याबद्दल न बोलणं बरे.
घाटघरच्या या घाटनदेवी परिसरात वन विभागाने बरीच छोटी मोठी कामे केली आहेत. झाडांचा पार, कड्यावर रेलिंग, बाजूलाच व्यवस्थित केलेला छोटा तलाव, त्यालगत असलेला वॉचटॉवर आणि काही झोपडी सारखे बांधकाम. इथून पश्चिमेला सूर्य माहुली किल्ल्याच्या मागे मावळताना पाहणं एक सुखद अनुभव. हळूहळू संधीप्रकाश दाटू लागला. इकडून तिकडून कड्यालगत झपकन जाणाऱ्या पाकोळ्या, दूरवर कुठेतरी जंगलात क्षीण होत जाणारा तांबट पक्ष्याचा आवाज. साराच भन्नाट असा माहोल. मार्च महिना असूनही सूर्यास्त नंतर काही वेळातच हवेत गारवा जाणवू लागला. एकनाथकडे परतत असताना घाट चढून आलेली मेट गावातली सकाळी भेटलेली मंडळी दिसली. सोयरिक व नात्यातील आजूबाजूच्या वाडी वस्तीतील ही सारी मंडळी लग्नानिमित्त घाटघर मध्ये आलेली. सायंकाळ नंतर वाडीतून चक्कर, गप्पा टप्पा, मग जेवणाची तयारी. खुद्द एकनाथ सुद्धा स्वयंपाकात माहिर आहेच. पोटभर जेवण आणि पाठ टेकताच लागलेली झोप.
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे अजयराव, निशिकांत आणि अदिती सकाळी साडेआठच्या सुमारास आले. नियोजन नुसार उंबरदार घाटाने उतराई ठरलेली. चहा नाश्ता तयारी करून निघेपर्यंत दहा वाजून गेले. सध्या फार वापरात नसलेल्या या वाटेच्या सुरुवातीस सोबत म्हणून एकनाथ होताच. साम्रदकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागलो थोडं अंतर जाताच डावीकडे घाटघरच्या अप्पर जलाशया पलीकडं अलंग मदन कुलंगचे टिपिकल लँडस्कॅप.
999_0.jpg
रस्ता सोडून उजवीकडची ठळक पायवाट घेतली. त्याच वाटेवरची मावळतीला जाणारी चोंढे घाटाची वाट सोडून सरळ जात घाटघर जलविद्युत प्रकल्पाच्या कोकणकड्यावर आलो. इथे बरीच पिकनिक मंडळींची गर्दी. त्यांचे तऱ्हेतऱ्हेचे फोटो सेशन सुरू होते. गर्दी टाळून पुढे कड्यावर आलो.
9999.jpg
खाली जलविद्युत प्रकल्प लोअर घाटघर धरण तिथं पर्यंत आलेला गाडी रस्ता. त्याच जागी चोंढे घाट आणि उंबरदार घाट उतरतात. थोडक्यात इंग्रजी ‘V’ अक्षर जर घेतले खालचे टोक म्हणजे ही धरणाची जागा, तर वरच्या दोन बाजू म्हणजे चोंढे आणि उंबरदार घाट. खालच्या धरणाजवळ दगडी कोळश्यासारखी दगडांची मोठी रास तिथून पुढे वाट डांबरी रस्त्याला लागणार. असे एकनाथने वरून समजून सांगितलं.
पण जसं जसं कड्यालगत पुढे गेलो तो तासलेला सरळसोट कडा थेट शिपनुर डोंगराला भिडलेला. शिपनुर डोंगराच्या उंचीमुळे ती दरी जास्तच रौद्र वाटत होती. करवंदाच्या जाळीतून वाट बारमाही पाण्याचा अर्थात बारीक धार असलेला अरुंद ओढा पार करून पलीकडच्या नाळेत आली.
1111_0.jpg
हीच ती उंबरदारची सुरुवात, अगदी दाऱ्या घाट, डोणी दार, साधले घाटासारखी. निशांतला घेऊन सावकाश उतरायला सुरुवात करतो तोच एकनाथ व निशिकांत पुढे गेले सुद्धा. एकनाथला लग्नाला जायचे होते. ‘सुरुवात झाली आता आम्ही जाऊ’ असं त्याला आम्ही सांगितले तरी पण भाई ऐकत नव्हता. साधले घाटात व नळीच्या वाटेत असतो तसा स्लेट सारखा प्रकार. त्यामुळे सांभाळून पाय टाकणं. मोठा पॅच असेल तर दरीकडे पाठ करून वेळ प्रसंगी बुड टेकवून सावकाश उतराई. चार्वी, एकनाथ निशिकांत व अदिती सोबत पुढे गेली तर मागे मी अश्विनी व अजय आम्ही तिघेही अवघड ठिकाणी निशांतला एकमेकांकडे पास करत निघालो.
1222.jpg
नाळ सुरुवातीला नॉर्थ वेस्ट असल्यामुळे उन्हाचा त्रास नव्हता, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भर उन्हाळ्यात वरच्या ओढ्यातून येणारी नाळेत वाहती पाण्याची धार. थांबेल तिथे पाणी पिऊन तोंडावर मारणे हेच सुरू होते. तसेच या नाळेत उंबराची झाडं भरपूर त्यामुळे बहुदा उंबरदार हे नाव पडले असावे ! खाली उतरताना डाव्या बाजूस शिपनुर डोंगराची आभाळात गेलेली कातळभिंत फारच भेदक अगदी दाऱ्या घाट उतरताना ढाकोबा दिसतो तसेच. पुढे एका टप्प्यात भला मोठ्ठा धोंडा वाटेवर आडवा, त्यावर चढून उतरणे तर शक्यच नव्हतं बाजूला उजवीकडे चिमणी ज्यामधून एक वेळ चढाई जमली असती पण उतरणं !
1333.jpg
एकनाथ चिमणीतून आधी जात पुन्हा वर चढून आला, चिमणी बऱ्यापैकी उंच तर खालच्या बाजूला जास्तच रुंद. त्यामुळे पाठीवर आणि हाता पायावर जोर देत अर्धी चिमणी उतरून कड्याला बिलगून उतरणे, हा सारा मामला सॅक व लहान मुलांना घेऊन अवघडच. मोठ्या धोंड्या खाली माणूस सरपटत जाईल इतपत बारीक फट होती. अजयराव निशिकांत एकनाथ आत जाऊन पलीकडे बाहेर पडले. मग एक एक जण आत गेला, खाली मुरुमाचा घसारा वर हा धोंडा, अगदी भुयारा सारखं वाटत होते. मध्यभागी पुन्हा मदतीला दोघं जण थांबले मुलांना पास करून सावकाश बाहेर पडलो. चिमणी पेक्षा हा पर्याय नक्कीच बरा होता. जसे उतरत गेलो तशी इतर नाळेसारखी उताराची तीव्रता कमी व नाळ रुंद होत गेली. भरपूर पडझड झालेल्या या वाटेत एक दोन ठिकाणी चुकायला झाले पण एकनाथ बरोबर वाट काढणारच. अधून मधून ब्रेक घेत छोटे मोठे कातळ टप्पे पार करून नाळेतून उजवीकडे आडवी मारली थोडक्यात हा ट्रेव्हर्स एकनाथने अचूक घेतला अन्यथा १०१% चुकायची गॅरंटी.
1444.jpg
तीन चारशे मीटरचा हा ट्रेव्हर्स ५०-६० अंशापेक्षा अधिक तीव्र उताराच्या कातळाला बिलगून जेमतेम पाऊल बसेल ते सुद्धा घसरेल काय ही भिती. चार्वी व निशांतला अलगद अगदी व्यवस्थित नेत या ठिकाणी टीम मधील सर्वांची खूपच मदत झाली. आता वाट सौम्य उताराच्या बऱ्यापैकी झाडोरा असलेल्या सोंडेवरून. थोडफार घसारा आणि काही ठिकाणी वापर नसल्यामुळे माजलेले रान जे एकनाथ पुढे जात कोयत्याने बाजूला करी. तसेच उतरत वाट झाडीतून बाहेर येत मोठ्या अर्थात कोरड्या धबधब्यातील डोहाजवळ आली. इथेच कुणीतरी चूल मांडलेली, बहुदा लाकूड फाटा किंवा शिकारीसाठी येणाऱ्यांचे हे काम. आता खालचे धरण अगदी नजरेच्या टप्प्यात, तर मागे वळून पाहिले असताना आम्ही आलो ती उंबरदार घाटाची वाट.
155.jpg
उजवीकडे थोडे उतरत सकाळी वरून एकनाथने दाखवलेल्या कोळश्यासारख्या दिसणाऱ्या दगडांच्या मोठ्या ढिगाऱ्या जवळ आलो. तापलेल्या दगडांचा तो भाग उन्हात चढून लहान भिंतीवर असलेले तारांचे कुंपण पार करून प्रकल्पाच्या इमारती जवळ आलो. हेच लोअर घाटघर धरण. अप्पर धरणातून मारलेल्या बोगद्यातून पाणी इथे सोडून त्यावर वीज निमिर्ती केली जाते त्यावेळी हे धरण भरून जाते. विजेची मागणी घटली की मग हेच पाणी पुन्हा पंपाने वर नेले जाते. २००५ साली झालेल्या अतीवृष्टीमुळे इथे मोठी दुर्घटना घडली होती.
थोडा ब्रेक घेतला इथून पुढे अंदाजे पाच सहा किलोमीटर अंतरावर चोंढे, थोडक्यात ७०% उतराई संपून आता उर्वरित घाटाची उतराई डांबरी रस्त्याने. खरंतर अवघड जंगल वाटे पेक्षा उन्हात तो डांबरी रस्ता जास्त त्रासदायक. पण निघणं भाग होतंच, वाटेतला लहान बोगदा पार करून पाहतो तर पलीकडे गेटला कुलूप लावलेले, एकनाथने तिथल्या सिक्युरिटी गार्डला आवाज देऊन त्यांच्याकडून कुलूप उघडून घेतले. धरण आणि प्रकल्प सुरक्षेचा भाग…. असो.
166.jpg
पंधरा वीस मिनिटं चालल्यावर चोंढे घाटाच्या जवळील नाळेच्या वाटेने एकनाथ माघारी फिरला. दुपारचे तीन वाजत आलेले, गावातले लग्न तर राहिलं जवळपास अख्खा दिवस त्याचा आमच्यापायी गेला. पुढे चोंढे घाटाची वाट जिथे रस्त्यावर येऊन मिळते तिथे थांबलो. आता निशिकांत अजय व अदिती यांचा निरोप घ्यायची वेळ आली. तिघेही नियोजनानुसार चोंढे घाट चढून एकनाथकडे मुक्कामी जाणार व दुसऱ्या दिवशी आम्ही आलो त्या घाटनदेवी घाटाने उतरणार होते. त्यांना सोमवारी महाशिवरात्री असल्यामुळे सुट्टी होती, मला मात्र काहीही करून सोमवारी कामावर जायचं असल्याने निघणं भाग होते.
177.jpg
मनाच्या घालमेल अवस्थेतच निरोप घेऊन आम्ही निघालो. तासा दीड तासात चोंढे कॉलनीच्या थांब्यावर आलो. गार पाणी पिऊन विसावतो तोच जीप आली. रविवार असल्यामुळे डोळखांबला बाजाराची गर्दी त्याच गर्दीतून वाट काढत दोन दिवसाच्या आठवणी पुन्हा पुन्हा आठवत परतीच्या मार्गाला लागलो....

खरंतर कसलेल्या ट्रेकरला मुळीच अवघड नसलेल्या या उंबरदार वाटेला निव्वळ वापर नसल्या कारणामुळे अधिक वेळ लागला यात लहान मुलांची सुरक्षा ही महत्त्वाची होतीच. एकनाथ, अजयराव, अदिती, निशिकांत, खुद्द अश्विनी या सर्वांची खूपच मदत झाली. सगळेच नियमित डोंगरात फिरणारे असल्यामुळे सारं जुळून आले. छोटी चारू काहीही कुरबुर न करता तिच्या परीने व्यवस्थित उतरली.
एकनाथचे तर आभार मानावे तितके कमीच, गावात दोन ठिकाणी लग्न असूनही, उतरायला सुरुवात तर केलीच पण पुढे वाट क्लिअर होत नाहीये म्हणून शेवट पर्यंत सोबत आलाच. खरंच मानलं बुवा. यासाठी या सर्वांचे आभार मानावे तितके कमीच !!!

अधिक फोटोसाठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2019/04/ghatandevi-umbardar.html

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो सुरेखच आहेत.
योगेशराव तुम्ही इतक्या लहानग्यांना सोबत घेऊन भटकंती करत आहात, मानलं तुम्हाला आणि बच्चे कंपनीला.

धन्यवाद Srd व शाली.
उंबरदार ढाकोबा पाहायचं आहे. >>> ढाकोबा तिथे नाही तो जुन्नर जवळ, उंबरदार पाहून या.

लहान मुलांना घेऊन इतकी अवघड वाट उतरणं डेरिंगचे काम आहे. आपल्या कुटुंबाची आपल्याला मिळणारी साथ खरंच सुंदर आहे. लेखासाठी अनेक धन्यवाद!

छानच लेख. कसं जमतं एव्हधं सविस्तर वर्णन लिहिणं तुम्हा लोकाना. मला तर कुठल्याही ठिकाणी कसे गेलो तो रस्ताही आठवायचा नाही नंतर कोणी विचारलं तर. Proud मुलांना घेऊन गेलात ह्याचं खूप कौतुक वाटलं.