भूमिका

Submitted by कविता क्षीरसागर on 9 August, 2019 - 07:58

भूमिका

घड्याळात सहा वाजले. लगबगीने ती उठली. गादीवरती इतस्ततः पडलेली अभ्यासाची वह्या पुस्तके तिने दप्तरात नीट भरून ठेवली. चित्रांचे पुस्तक, रंगीत खडू , स्केचपेन आपल्या कप्प्यात व्यवस्थित ठेवले.
घर स्वच्छ झाडून काढले. लिंबाचे सरबत करेपर्यंत साडेसहा वाजून गेले होते. स्कुटीचा आवाज झाला, तशी पटकन तिने दार उघडले.

कधी नव्हे ते आज एवढे स्वच्छ घर पाहून आश्चर्याने आई दारातच थबकली. आईचा उजळलेला चेहरा बघून तिचाही कोवळा चेहरा आनंदाने लखलखला...

आईच्या हातात सरबताचा ग्लास देताना तिचे कौतुकभरले हसू पाहून तिचा इवलासा जीव तृप्त तृप्त झाला. हळूच तिने आईच्या हातात सारी दुपार खर्च करून तयार केलेले एक ग्रिटींग कार्ड दिले. वरती छान रंगीबेरंगी टवटवीत फुले रंगवलेली आणि आणि आत लिहिले होते ..

प्रिय आईस ,वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.

ते पाहून आईने डोळ्यातले आनंदाश्रू पुसत लेकीला जवळ घेतले आणि म्हणाली .."आज जणू आपल्या भूमिकांची अदलाबदल झालीय"

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users