वेश्या

Submitted by अजय चव्हाण on 9 August, 2019 - 02:05

मन नाही विकलं..ईमान नाही विकलं..
परीस्थितीच्याआड शरीर मी विकलं..
चंदन घासलं की, परिमळ निघतो..
मी घासल्यावर मग मळ का उरतो..
जगण्यासाठी मी जगणं सोडलं..
स्वतःसाठी नाही पण इतरांसाठी मरण मी पत्करलं...

खोट्या जगात या खरा जीव गुदमरतो..
स्वप्नांच्या रांगोळीवर पाऊस का असा पडतो...
भिजलेल्या मनाला या आवरावे कुणी..
गलिच्छ नजरांच्या सवयीला ह्या सांगावे कुणी..
छंद नाही हा माझा, नाही हा आनंद...
सोडुन गेला शाम मला नव्हता कुणी आधारी मुकूंद..

पोटाच्या खळगीला कळत तेव्हा नव्हतं..
दिला असता जीवही मी, पण बाळ माझं होत...
बाळाच्या भातुसाठी, म्हातार्यांच्या डाळीसाठी..
शरीराची फुकणी व मनाची चुल मी पेटवली..
कुणी म्हणे कुलटा मला, कुणी म्हणे वैश्या मला..
मान- अपमानाची ही सरपणे कधीच जळाली..

सावित्री, अनुसया, द्रौपदी, व जानकी ह्यांतली नसेल मी..
असेल मी अभागी, दरीद्री अन् घाण समाजातली..
खरं सांगते नव्हते मी अशी कधीच
नियतीने गाठ ही गळी बांधली.
असंचं जगता जगता मरायचं आहे मला..
माझ्या बाळाला खुप शिकवायचं मला..
कुणी थुंकलं माझ्यावर तर त्यात गैर नाही..
वैरी नशीब माझं, बाकी कुणाशी वैर नाही...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहिलंय असं तरी कसं म्हणु?? अंगावर काटा आला वाचताना.
एक स्त्री वेश्याव्यवसाय स्वतःसाठी कधीच निवडत नाही.तिच्यावर तो लादला जातो..

(वैश्या ऐवजी वेश्या)

सत्य आहे पण कटू आहे.... लिहीलं छान.

मुकंद च्या जागी मुकूंद पाहिजे होता का ? तेवढ पहा.

इशारे

फडफडाविसी पापण्या जरा
उघड्या खिडकीचा पिंजरा
न राहता सरळ उभी
भुलविण्याची तुझी खुबी

देऊन हनुवटीस आधार
करिसी दर्शकास बेजार
पोटासाठी करीशी सारे
भुकेला वासनेचे इशारे

इच्छा नसताना वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या इतकं वाईट नशीब कुणाचेच नसेल. डान्स बार बंद करणाऱ्या आबांना सुध्दा हा व्यवसाय थांबवता आला नाही. थायलंड सारखे देश आपल्या वरचा देहव्यापाराचा शिक्का पुसण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार फक्त असुरक्षित संबंध ठेवू नका याची जाहिरात करत असतं. तेच जर स्त्रीयांना हे करण्यासाठी भाग पाडणारांना मग ती स्री असो की पुरुष असो फाशीची शिक्षा दिली तर लगेच बंद होईल असे प्रकार. गरज फक्त राजकीय इच्छाशक्ती ची आहे.
कवितेतून वास्तव मांडले आहे. पु.ले.शु.

धन्यवाद ताई..नावात बदल केला आहे...

धन्यवाद Diyu, सिद्धी, प्राचीन..

@राजेंद्र देवी
छान आहे तुमची कविता..

प्रतिसादाबद्दल धन्यवाद चैतन्य..

हे कधीच थांबणार नाही किंबहुना थांबवू देणार नाही...
सगळ्याना हप्ते पोहचतात...

वेश्याव्यवसाय हा जगाच्या इतिहासातील सर्वात जुना व्यवसाय आहे असे म्हटले जाते. कोणताही व्यवसाय वाईट नसतो. समाजाच्या त्याकडे बघण्याच्या विकृत वृत्तीमुळे काही व्यवसाय बदनाम झाले आहेत. बाकी कविता अंतर्मुख करणारी आहे.

वेश्याव्यवसाय हा जगाच्या इतिहासातील सर्वात जुना व्यवसाय आहे असे म्हटले जाते. कोणताही व्यवसाय वाईट नसतो. Sad

दाहक!!! डोळ्यात पाणी आलं.
>>>>> स्वप्नांच्या रांगोळीवर पाऊस का असा पडतो...>>> खतरनाक उपमा आहे!