थरथरत्या बुबुळांपाशी ...! (भाग १)

Submitted by शुद्ध रक्त राजा on 8 August, 2019 - 08:34

(भाग १)

'विपश्यना केंद्राच्या प्रवेशद्वाराच्या समोरची सोंड चढावी. ती वाट आपल्याला प्रचंड कातळकड्याखाली आणून सोडते.' - इति गूगल
आणि गूगल मॅप्स ना साक्षी ठेवून आम्ही विपश्यना केंद्राच्या प्रवेश द्वारापाशी पोहोचलो. बघतो तर काय त्या प्रवेशद्वारासमोरची सोंड गायब झाली होती.

----------------------------------------

सकाळीच दिल्ली वरून घरी आलो होतो. हिमाचलला त्रिऊंड ट्रेक करायचा राहिला म्हणून आल्या आल्या काहीतरी करायलाच हवं या इर्षेने मैत्रेय ला ट्रेक ठरवायला सांगितला. आणि त्रिंगलवाडी ला जायचं ठरलं. रात्री पावणे दहा ची दादर साईनगर शिर्डी एक्सप्रेस पकडायची होती. चक्क ठरल्याप्रमाणे साडे आठला निघालो. सव्वा नऊ पर्यंत दादरला पोहोचलो. तिकिटं काढली आणि फलाटावर गेलो. आज सारं काही अगदी विलक्षणंच वाटत होतं. गाडी लागलेलीच होती. जनरल डब्यात चढलो आणि खिडकी मिळाली. एक तर तिघांपैकी कोणालाही उशीर झाला नाही. घाई गडबड नाही. गाडी सुद्धा रिकामी. आत्तापर्यंत केलेल्या ट्रेक मध्ये इतका प्रमाणशीर प्रवास झाला नव्हता. पुढे येणाऱ्या वादळा पूर्वीची ही शांतता होती हे मात्र तेव्हा ध्यानात आलं नाही.

----------------------------------------

परत इगतपुरी एस टी स्टँड वर यायचा निर्णय झाला. रात्रीचे 3 वाजले होते. एस टी स्टँड वर थोडा वेळ झोप काढण्याचा प्रयत्न केला पण डासांमुळे तीही सुखा सुखी येईना. म्हणून परत चालायचं ठरवलं. आधीच आलेल्या अश्या अनुभवातून कुठेही थांबून राहणं परवडणारं नव्हतं. आणि पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पनाही नव्हती. स्टँड बाहेर पडतानाच अचानक आदित्य च्या बॅगेत त्याची पाण्याची बाटली नसल्याचं लक्षात आलं. बाटली टप्परवेअरची असल्याने शोधण्याशिवाय पर्याय नव्हता. सारी आंतरिक ऊर्जा एकवटून आणि मनाला समजावून बाटली शोधकार्य सुरू केलं. पण एकूण घडलेल्या घटना पाहता पुढे येणाऱ्या परिस्थितीशी कसा सामना करायचा याची मनातच तयारी सुरू केली.

----------------------------------------

ट्रेनमध्ये बसलेलो असताना बाजूला एक लहान मुलगा त्याचे आईबाबा आणि काका वगैरे असा गोतावळा येऊन बसला. आदित्य मला आणि मैत्रेयला डिजिटल मार्केटिंग बद्दल सांगत होता. मध्येच मी त्या बाजूच्या लहान मुलाला विचारलं - 'खिडकीत बसायचंय का'. त्याने उत्तरच नाही दिलं. 'हिंदी मे पुछो उसको' - इति काका. 'बैठना है क्या विंडो पे' - परत मी. आणि पुढे जे घडलं ते कल्पनेच्या पालिकडलं होतं. तो मुलगा काहीही न बोलता तसाच बसून राहिला. एरवी लहान मुलं आल्या आल्याच खिडकी खिडकी करतात आणि गिल्ट देतात. तशी खिडकी नाही मिळाली तर खिडकीत येऊन उभे राहतात. आणि अंगाला चिकटतात. मग हळू हळू जागा करून खिडकीत बसतात. पण इथे जे झालं त्यावर विश्वास तरी कसा ठेवणार होतो मी. हे भयावह होतं आणि इथेच माझ्या मनात पहिल्यांदा शंकेची पाल चूकचुकली.

----------------------------------------

दुसऱ्या दिवशी सकाळी गडावरून उतरताना रात्र कशी घालवली हे आठवून काटा आला. जाणून बुजून गडाच्या दुसऱ्या बाजूला उतरलो आणि वेगळ्याच गावात उतरलो. जिथून आलो तिथून परत जायचा विचार सुद्धा मनाला शिवला नाही. एका आदिवासी पाड्यात उतरलो. चांदवाडी नाव त्याचं. तिथून सरळ चालत मुख्य डांबरी रस्त्यापाशी आलो. 20 मिनीटांनी रिक्षा मिळाली आणि आम्ही परत इगतपुरी रेल्वे स्टेशन ला पोहोचलो.

----------------------------------------

एकादशी. आईचा उपास होता. मला प्रकाशकडचा वडा हवा होता म्हणून तिच्यासाठी प्रकाश मधून साबुदाणा वडा घेऊन आलो. मग ट्रेकसाठी बॅग भरली. रिकामी केली. दुसरी छोटी बॅग भरली. सगळं बॅगेत राहिलं. अगदी व्यवस्थित राहिलं. असं होतं नसतं कधी. पण यावेळी मात्र झालं होतं. आता जेव्हा मी या गोष्टी आठवतो - विचार करतो तेव्हा नियती जणू आपल्याला संकेत देत होती असंच वाटतं.

----------------------------------------

परतीच्या प्रवासात नेहमीप्रमाणे जशी फोटोंची देवाण घेवाण होते तशी यावेळी होत नव्हती. जे आम्ही प्रत्यक्ष बघितलं होतं - अनुभवलं होतं ते क्षणात टिपता येण्यासारखं नव्हतं. आणि तो काळ आणि ती वेळ सुद्धा अशी होती की ते आपण कॅमेऱ्यात कैद करावं असं सूचणं देखील तेव्हा शक्य नव्हतं.

----------------------------------------

इगतपुरी परिसर आता बदललाय. मी पहिल्या ट्रेकला आठ वर्षांपूर्वी कळसुबाईला जाण्यासाठी रात्री इथेच उतरलो होतो. पण तेव्हा आत्ता सारखे स्ट्रीट लाईट नव्हते. सलग ५-५ वेगवेगळ्या बँकांचे ए टी एम सेंटर आणि २ पतपेढ्यांची कार्यालये तेव्हा पहिली नव्हती. रात्री जसं चालायला लागलो तसं हा बदल जाणवत होता. पण या सर्वात अजून एक महत्त्वाचा आणि अंतर्बाह्य हादरवणारा बदल पुढे जाणवला.

----------------------------------------

किल्ल्यावर बघायला तसं काही नाही. थोडे पडझड झालेले अवशेष, एक शेंदूर फासलेला दगड, २ वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले भगवे, पाण्याची टाकी, गुहा (जी आम्ही बघितली नाही), शंकराचं देऊळ आणि त्यासमोरचा लाल जरीपटका. देवळासमोर गेल्यावर हायसं वाटलं. वातावरणात थोडी पोसिटीव्हीटी आली.

----------------------------------------

२ स्ट्रीट लाईट मध्ये असा एक भाग येतो जिथे काळोख असतो. विपश्यना परिक्रमा करताना असाच एक भाग आला. आणि त्या १० सेकंदांसाठी म्हणून बॅटरी सुरू केली आणि बघतो तर काय साप्Sssssपाची कात. हा केवळ योगायोग नव्हता.

----------------------------------------

मैत्रेयने मिळवलेल्या माहितीनुसार पहाटेपासून तासातासाने त्रिंगलवाडीला जायला एसटी होत्या. जे साफ चुकीचं होतं. तिथे जायला एस टी च काय आधीच्या शेअर रिक्षा होत्या त्या सुद्धा बंद झाल्या होत्या. त्रिंगलवाडीतली माणसं स्वतःच्या गाडीतून किंवा पायी प्रवास करतात. रात्री घडलेल्या त्या प्रकारानंतर हा अजून एक धक्का आम्हाला बसला. नियतीचं मन आमच्या बाबतीत या वेळी कठोर झालं होतं.

----------------------------------------

विपश्यना केंद्राच्या बाजूने पुढे जाताना मागे वळून बघायला सुद्धा भीती वाटत होती. झपझप पावलं टाकत होतो. एकादशीचा चंद्र सुद्धा आकाशात गुडूप झाला होता. बाजूचा रौद्रभीषण कडा त्या काळोखात आणखीनच भयंकर झाला होता. पावलं हळू हळू जड व्हायला लागली. बॅटरीचा प्रकाश पण कमी वाटायला लागला. आणि आम्ही तिघे त्या डोंगरसोंडेच्या शोधात फिरत होतो.

----------------------------------------

किल्ल्याच्या पायथ्याशीच जैन लेणी आहेत. आतमध्ये प्रशस्त सभामंडप आहे. गाभाऱ्यात वृषभनाथाची पद्मासनस्थ भग्न मूर्ती आहे. बाहेर कोरीव कामाचे काही अवशेष पडलेले आहेत. इथूनच किल्ल्यावर जाण्यासाठी वाटा आहेत. यातली कोणती निवडायची यावर खूप खल झाला. सगळेच योगायोग एकाच वेळी कसे काय घडतात? अजून एक योगायोग घडू नये म्हणून तो खल.

----------------------------------------

रात्रीच्या मिट्ट काळोखात एका चौकापाशी आलो. बाजूला एक बांधकाम सुरू असलेली इमारत होती. गूगल मॅप्स वरून रस्ता बघितला. डावीकडे वळलो आदित्यने बॅटरी सुरू केली आणि समोर जमिनीवर क्रॉस दिसला. तिथेच थबकलो. अचानक एकाएकी कुत्री भुंकायला लागली. आंम्ही तसेच उलटे फिरलो. त्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत एक आकृती आमच्याकडे एकटक पहात होती. अंगावर घोंगडी घेतली होती बहूतेक.त्या आकृतीला चेहरा होता की नाही याचीच शंका आली आणि तसेच तडक कुत्रांच्या गराड्यातून आम्ही मागे वळलो.

क्रमशः

(गायब झालेल्या डोंगरसोडेचं पुढे काय झालं ; सापाची कात आणि तो पुढला भयाण रस्ता यांच्यात काय संबंध ; ती आकृती ,कुत्री आणि आम्ही तिघे यांच्यात अजून काय योगायोग घडले ; आणि एकूणच पुढला प्रवास कसा झाला याबद्दल जाणून घेण्यासाठी ... स्टे ट्यून्ड )

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

1. माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 15 ते 20 वर्षापासून ञिगंलवाडी साठी बस नाहीये.
2. ञिगंलवाडी गाव आणि किल्ला यात बरच अंतर आहे.
3. माझ्या अंदाजाप्रमाणे तुम्ही गेलात त्या मार्गावर दिवसा पण ये जा नसते तर राञी तर प्रश्नच नाही.
4. आडबाजूला आणि राञ असल्याने तुम्हाला भितीदायक अनुभव आला असावा.

pravintherider - घडलेल्या घटना अगदी खऱ्या आहेत. फक्त त्या भीतीदायक दाखवण्याचा प्रयत्न केलाय.