मोनार्क फुलपाखरांच्या स्थलांतराचे गुपित

Submitted by Dr Raju Kasambe on 4 August, 2019 - 07:46

मोनार्क फुलपाखरांच्या स्थलांतराचे गुपित

“दे हॅव फाऊंड इट!”
प्रा. फ्रेड अर्कहार्ट फोन खाली ठेवत हर्षातिशयाने जणू ओरडलेच. सौ. नोरा अर्कहार्ट सुद्धा ही बातमी एकूण उल्हसित झाल्या. १९३७ पासून म्हणजे जवळपास गत चाळीस वर्षांपासून प्रा. फ्रेड अर्कहार्ट आणि सौ. नोरा अर्कहार्ट उत्तर अमेरिकेतल्या मोनार्क फुलपाखरांच्या स्थलांतराचे गुपित जाणून घ्यायचा प्रयत्न करीत होते. त्यांचा सहकारी केनेथ बृगरनी लाखो मोनार्क फुलपाखरे मेक्सिकोत शोधून काढली होती. हिवाळ्यात टोरोंटो आणि उत्तर अमेरिकेतील अचानक गायब होणारी मोनार्क फुलपाखरे ३ हजार किलोमीटर दूर दक्षिणेला मेक्सिकोच्या जंगलामध्ये स्थलांतर करून जातात, ह्याचा सबळ पुरावा आज मिळाला होता. आनंदाच्या भरात अर्कहार्ट दांपत्याला काय करावे ते सुचत नव्हते. हातात हात धरून बराचवेळ ते केवळ येरझारा घालत राहिले.

प्रा. फ्रेड अर्कहार्ट ह्यांनी लावलेले शोध आणि त्यांचे जीवन म्हणजे जणू काही एखादा चित्रपटच, अगदीच अविश्वसनिय! एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करायचा ठरविल्यानंतर माघार घेणे म्हणजे नाहीच.

संयुक्त राज्य अमेरिकेच्या टोरोंटो शहरात फ्रेड एका न्हाव्याच्या घरी जन्माला आले. बालपणापासूनच त्यांना प्राणी पक्ष्यांचे आकर्षण होते. इतर मित्र मैदानी खेळ खेळत असताना हे महाशय मात्र ‘बॉक्स कॅमेरा’ घेऊन चिमन्यांच्या मागावर असायचे किंवा बेडूक बिडूक पकडत असायचे.

मोठेपणी फ्रेड एक हुशार निसर्गतज्ञ म्हणून नावारूपास आले. आजूबाजूच्या जंगलातील प्रत्येक पशू, पक्षी, साप, फुलपाखरू, कीटक, फुलं एवढेच नव्हे तर खडकांचे प्रकारसुद्धा त्यांना माहीत होते. कुठल्या पक्षाचा-किटकाचा आवाज कसा, कुठला साप विषारी, कुठला बिनविषारी सर्व काही त्यांना तोंडपाठ होते. असे म्हटले जायचे की त्या परिसरातील बच्चे कंपनी आणि निसर्ग प्रेमींसाठी फ्रेड म्हणजे चालता बोलता विश्वकोशच होते.
सुरूवातीला रॉयल ओंटॅरिओ म्यूझियममध्ये नोकरी केल्यानंतर टोरोंटो विद्यापीठात त्यांनी जीवशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरी पत्करली. पण, पहिली नोकरी करतानाच मोनार्क फुलपाखरांनी त्यांच्या मनात घर केले होते.

त्यावेळेस अमेरिकेत मोनार्क फुलपाखरांच्या हिवाळ्यात अदृश्य होण्याबद्दल वाद चालू होता. ती फुलपाखरे दुसरीकडे स्थलांतर करतात की सुप्तावस्थेत जातात? की दोन्ही करतात? ह्यावर वादविवाद चर्चा रंगत असे.

इ.स. १९३० मध्ये इंग्रज कीटक शास्त्रज्ञ सी.बी. विल्यम्स फुलपाखरांच्या स्थलांतराबाबत एक पुस्तक लिहिले होते. त्यातील एक संपूर्ण प्रकरण मोनार्क फुलपाखरांबद्दल होते. ह्या प्रकरणात मोनार्क फुलपाखरांच्या जुन्या नोंदी, निरीक्षणे, काही ठिकाणी ते लाखोच्या संख्येने जमल्याची, स्थलांतराची निरीक्षणे ह्या सर्व बाबींचा ऊहापोह केलेला होता.

खरी समस्या ही होते की मोनार्क फुलपाखरांना कुणी संपूर्ण स्थलांतर पूर्ण करताना बघितले नव्हते. काही व्यक्तींनी लाखो फुलपाखरे उडून जाताना बघितली होती. तर इतर ठिकाणी दुसर्‍याच कुणी तरी त्यांचे आगमन बघितले होते. पण ही दोन्ही ठिकाणची फुलपाखरे तिच कशावरून? की ती वेगवेगळी होती?

त्यावेळेस काही शास्त्रज्ञांनी फुलपाखरांच्या पंखांवर रंगीत ठिपके मारून किंवा फुलपाखरांच्या पंखांवरील पिंगट खवले खरवडून फुलपाखरे ओळखायचा प्रयत्न केला होता. पण असे रंगीत ठिपके मारलेले फुलपाखरू मिळाले तर त्याचे करायचे हे कुणालाच ज्ञात नव्हते.

पण खरी समस्या ही होती की एखाद्या फुलपाखरावर तुम्हाला स्वतःचा पत्ता घालता येईल का? पत्राप्रमाणे? अर्थात फ्रेड जवळ उत्तर पण होते. त्याला तिकीट, बिल्ला वा ‘टॅग’ लावून. फुलपाखराच्या पुढील पंखाच्या खालील बाजूस एक अगदी छोटेखानी ‘टॅग’ चिकटवायचा, आपल्याकडे स्त्रिया कपाळावर लावतात त्या टिकलीसारखा. ह्या ‘टॅग’ वर एक विशेष क्रमांक, दिनांक, तसेच फुलपाखरू कुणाला सापडल्यास त्याची माहिती कुठे कळवायची त्याचा पत्ता एवढी माहिती आसायला हवी. पक्षी स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी पक्ष्यांच्या पायात अशी माहिती असलेले अॅल्युमिनियमचे कडे वा वाळा (रिंग) घातले जाते. पक्ष्यांचे वजन जास्त असल्यामुळे पक्ष्यांना ह्या हलक्या कड्याचा त्रास होत नाही. पण फुलपाखरांसाठी विशेष योजना हवी, त्यांना असले वजनदार काही झेपावणार नाही.

झाले. प्रा. फ्रेड आणि सौ. नोरा अर्कहार्ट फुलपाखरांसाठी विशेष असे टिकलीसारखे बिल्ले तयार करून घ्यायच्या मागे लागले. मग त्यांना नवनवीन क्लूप्त्या सुचू लागल्या. त्यांचे प्रयोग सुरू झाले.

सुरूवातीला त्यांनी फुलपाखरांच्या जीवाला बेततिल एवढे छोटे बिल्ले बनवायला आणि त्या प्रत्येक बिल्ल्यावर वेगळा क्रमांक टाकायला सुरुवात केली. त्यावेळेस छपाई (प्रिंटिंग) तंत्रज्ञान आजच्याएवढे प्रगत नव्हते त्यामुळे अर्कहार्ट दांपत्य स्वतःच्या हाताने प्रत्येक बिल्ल्यावर, सुरूवातीला शाईने आणि नंतर पेन्सिलीने क्रमांक टाकायचे. त्यात त्यांचे हजारो तास खर्च व्हायचे. बोटे दुखायचे ते वेगळेच! नंतर टंकलेखन (टाइपरायटर) यंत्र आले. त्यानंतर एका मित्राने त्यांच्या साठी जर्मनीहून एक छपाईयंत्र विकत आणले. आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांना हे बिल्ले सहज चिकटतिल पण पडणार नाहीत अशा डिंकाची आवश्यकता होती.

Monarch 2019_tag.png
(Source: https://monarchwatch.org/tagging/)

सुदैवाने त्यांना तसा डिंक सुद्धा लवकरच सापडला. अशा स्वतः चिकटणार्‍य बिल्ल्याला ‘सेल्फ अॅडहेजीव टॅग’ असे नाव दिल्या गेले. १९५२ मध्ये लेख लिहून फ्रेडनी लोकांना मोनार्कच्या टॅगिंगसाठी मदत करण्याचे आवाहन केले. सुरूवातीला केवळ १२ स्वयंसेवक मिळाले.
पुढे चालून शाळकरी मुलांपासून, शिक्षक, प्राध्यापक आदि शेकडो स्वयंसेवक त्यांच्या कार्यात सहभागी झाले. त्यांच्या मदतीने मग हे ‘टॅगींग’चे कार्य मोठ्या प्रमाणावर पार पडू लागले. अशा प्रकारे हजारो मोनार्क फुलपाखरे क्रमांक घातलेले बिल्ले आपल्या पंखांवर घेऊन भरारी घेऊ लागली. ह्या टॅगिंग मागची आशा एवढीच होती की हे बिल्ला लावलेले फुलपाखरू कुणाला तरी, लांबच्या प्रदेशात कुठे तरी मिळेल आणि त्याच्या स्थलांतरबद्दल निश्चित माहिती मिळेल.

अनेक वर्ष हा संशोधन कार्यक्रम राबविल्यानंतर कितीतरी टॅग केलेल्या फुलपाखरांची ते ज्या ठिकाणी मिळाले तेथून माहिती गोळा झाली. त्या माहितीचा शास्त्रीय अभ्यास केल्यानंतर अर्कहार्ट दांपत्तीला तीन अनुमान काढता आले. एक म्हणजे, मोनार्क फुलपाखरे स्थलांतर करतात. दुसरे म्हणजे रॉकी पर्वतरांगांच्या पलीकडे स्थलांतर करून गेलेली फुलपाखरे कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनार्‍यालगत हिवाळा व्यतीत करतात. तिसरे म्हणजे, उर्वरित फुलपाखरे गायब अथवा दिसेनासी होतात. टोरोंटो येथे बिल्ला लावलेली हजारो फुलपाखरे मग जातात तरी कुठे? उत्तर अमेरिका खंडाच्या नकाशावर फ्रेडनी खुणाकरून स्थलांतराची उपलब्ध माहिती एकत्रित केली होती. अमेरिकेमधून प्रवासाला निघलेली फुलपाखरे दक्षिणेकडे जाताना कुठे तरी लुप्त होत होती.

उत्तर अमेरिका खंडाच्या दक्षिण टोकाला असलेल्या मेक्सिकोमध्ये तर ती उडून जात नसावीत ना? सर्व बिल्ले तर इंग्रजीत होते. आणि मेक्सिकोमध्ये तर स्पॅनिश भाषा प्रचलित आहे. अर्थात हा विचार करून पुढील वर्षी सर्व मोनार्क फुलपाखरांना स्पॅनिश भाषेतील बिल्ले डकवण्यात आले.

१९६९ मध्ये फ्रेड आणि नोरा स्वतः मेक्सिकोला जाऊन आले. पण, मेक्सिको फार मोठा देश असल्यामुळे त्यांना तो देश पिंजून काढणे शक्य झाले नाही. आणखी प्रयत्न म्हणून त्यांनी मेक्सिकन शास्त्रज्ञांना ह्या प्रकल्पात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यातही अपयशच आले.
मग नोरानी १९७२ मध्ये मेक्सिकन वृत्तपत्रांमधून मोनार्क फुलपाखरांबद्दल लिखाण सुरू केले. अपेक्षा हीच की निदान हे लेख वाचून कुणी तरी संपर्क करील. वेळ, आवड असलेली आणि समविचारी व्यक्ति मिळेल.

तसेच झाले. एक अमेरिकन तंत्रज्ञ, केनेथ बृगर ह्यांनी लेख वाचून फ्रेड आणि नोराशी संपर्क साधला. केनेथ बृगर एका मेक्सिकन कारखान्यात कामाला होते. त्यांचे कॅथी नावाच्या एका मेक्सिकन तरुणीशी लग्न झाले होते. केनेथ बृगर व कॅथीला मोनार्कच्या वेडाने जणू झपाटले. त्यांनी मोनार्क फुलपाखरांना शोधण्यासाथी संपूर्ण मेक्सिको पिंजून काढला.
कुठल्याही गावाला गेले की स्थानिकांना ते मोनार्कचे छायाचित्र दाखवून स्पॅनिशमध्ये विचारायचे,
‘हा व्हीस्तो एस्ता मारीपोसा?’ (तुम्ही हे फुलपाखरू बघितले काय?)

फ्रेडने त्यांना रस्त्यावर मरून पडलेल्या फुलपाखरांवर सुद्धा लक्ष ठेवायला सांगितले होते. आजूबाजूच्या जंगलात स्थलांतर करून आलेल्या फुलपाखरांबद्दल त्यामुळे माहिती मिळाली होती. १९७४ च्या शेवटी केनेथ बृगरनी काही मृत मोनार्क फुलपाखरे मिळाल्याचे कळविले आणि अधिक माहिती काढीत असल्याचे सांगितले.

९ जानेवारी १९७५ ला केनेथनी ती आनंदाची बातमी फ्रेडना दिली ज्यामुळे फ्रेडचा आनंद गगनात मावेनासा झाला. टोरोंटों येथे बिल्ले लावलेली आणि इतर लाखो फुलपाखरे मेक्सिको शहरापासून १८० किलोमीटर दूर असलेल्या पहाडी भागातील स्पृसच्या जंगलात आढळून आली होती.
फ्रेड आणि नोरा लागलीच विमानाने जाऊन त्याठिकाणी पोहोचले. ज्या प्रसंगाची चाळीस वर्षे वाट बघितली ती घटना १८ जानेवारी १९७५ रोजी त्यांना बघायला मिळाली. स्पृसच्या प्रत्येक लहान मोठ्या झाडावर मोनार्क फुलपाखरे लदबदली होती. अचानक सूर्यप्रकाशाची एक तिरीप गर्द झाडीतून डोकावली आणि त्याबाजूच्या सर्व मोनार्कनी आपले पंख उघडले. आणि जणू नारिंगी रंगाची उधळणच झाली.

sn-monarchs_0.jpg
(हजारो मोनार्क एकत्र जमल्याचे दृश्य. Source: https://www.sciencemag.org/news/2016/02/monarchs-mexico-recovering-recor...)

फुलपाखरांच्या एक पुंजक्याच्या वजनाने एका झाडाची एक बारकी फांदी तुटली आणि शेकडो फुलपाखरे पंख फडफडवीत उडू लागली. त्यातील एक फुलपाखरू फ्रेडनी अलगद चिमटीत धरून उचलले. बरोबर पाच महिन्यांपूर्वी तीन हजार किलोमीटर दूर टोरोंटोजवळ लावलेला बिल्ला अजूनही त्या फुलपाखराच्या पंखावर शाबूत होता. हा इवलासा जीव एवढे प्रचंड अंतर पार करून इथे आला होता!

‘टोरोंटोमधील फुलपाखरे हिवाळ्यात स्थलांतर करून जातात’ ह्या एका काल्पनिक स्पष्टीकरणाला फ्रेडच्या शोधामुळे वैज्ञानिक सत्य म्हणून जगभरात मान्यता मिळाली.

Monarch 1.jpg
(Source: https://www.monarchwatch.org/tagmig/)

ह्या एका महत्त्वपूर्ण शोधामुळे एका फुलपाखराच्या प्रजातीच्या संवर्धंनासाठी कितीतरी लांबीच्या पट्ट्यातील वनसंपत्ती, जंगले वाचविणे कसे आवश्यक ठरते ते सुद्धा दिसून आले. ह्या भागात मध्येच कुठेतरी जर संपूर्ण जंगल नष्ट झालेले असेल तर फुलपाखरांना ह्या स्थलांतरादरम्यान काहीच खायला मिळणार नाही. आणि सर्व फुलपाखरे मरून जातील.
मोनार्क फुलपाखरांनी पुन्हा एकदा मनुष्यजातीला वनसंवर्धंनाचा कानमंत्र दिला. एका संपूर्ण खंडावरील विविध अधिवासाची कशी आवश्यकता असते त्याचे हे जीवंत उदाहरण होय. फ्रेड आणि नोराच्या शोधानी आपल्याला परत शिकायला मिळाले! फ्रेड जगातील किटकशास्त्रज्ञांमध्ये हीरो झाले होते. बिल्ला लावलेले मोनार्क हातात धरून असलेल्या फ्रेडची छायाचित्रे संपूर्ण जगात प्रकाशित झाली. ‘मोनार्क फुलपाखरे कुठे जातात?’ ह्याचे गुपित त्यांनी उलगडले होते.

एका पत्रकाराने त्यांना विचारले
‘मोनार्क फुलपाखरांना त्यांचा प्रवास मार्ग कसा कळतो?’

‘मला आणखी चाळीस वर्ष द्या!’ फ्रेड मिश्किलपणे हसत म्हणाले!

अर्थात परमेश्वराने फ्रेडना आणखी चाळीस वर्ष दिली नाहीत. ते उत्तर कळायला ४० वर्ष पण लागले नाहीत. आज आपल्याला मोनार्क फुलपाखरांना त्यांचा प्रवास मार्ग कसा कळतो ह्याचे उत्तर माहीत असले तरी ते ऐकायला फ्रेड मात्र आपल्यात नाहीत. त्यांचे २००२ मध्येच देहावसान झाले.

डॉ. राजू कसंबे,
डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे

(रीडर्स डायजेस्ट व नॅशनल जिओग्राफिक मधील लेखांवर आधारित)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख.
@आज आपल्याला मोनार्क फुलपाखरांना त्यांचा प्रवास मार्ग कसा कळतो ह्याचे उत्तर माहीत असले >>>
काय आहे गुपित?

छान लेख.
ट्रंप बांधत असलेली मेक्सिको बॉर्डर भिंत टेक्सस मधल्या एका butterfly sanctuary मधेही उभी राहणार आहे त्यामुळे तिथल्या फुलपाखरांचे अस्तित्त्व धोक्यात येणार आहे असं वाचलं मध्यंतरी.
संदर्भः https://www.nationalgeographic.com/environment/2019/02/border-wall-set-t...