'पागोळी वाचवा अभियान' शंका आणि समाधान

Submitted by सुनिल प्रसादे on 31 July, 2019 - 04:25

'पागोळी वाचवा अभियान' हळूहळू पसरत चाललंय. सुरवातीला आम्हाला आमच्या दापोली तालुक्यातूनच त्याबद्दल विचारणा होत होती. परंतु सांगायला आनंद वाटतोय की आता आमच्याकडे सावंतवाडी, कणकवली, राजापूर, रत्नागिरी, चीपळूण, म्हसळा, श्रीवर्धन,अलिबाग, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली पासून ते पुणे, नाशिक, इंदापूर, जुन्नर, नंदुरबार, शहादा, धुळे, औरंगाबाद, बुलढाणा, सेलू, परभणी, सांगली, कोल्हापूर पर्यंतच्या लोकांकडून ह्या अभियानाबद्दलची माहिती विचारली जात आहे. आतापर्यंत नऊशेपेक्षाही जास्त लोक ह्या अभियानाशी जोडले गेले असून अभियानाची माहिती घेत आहेत आणि इतरांनाही देत आहेत. दिव्याने दिवा लागत आहे. लवकरच ही संख्या एक हजारचा टप्पा ओलांडेल असं वाटतंय. 'पागोळी वाचवा अभियानाने' लोकांच्या मनात उत्सुकता, पाण्याच्या बाबतीतली त्यांची स्वतःची जबाबदारी आणि आपण हे सहजपणे करू शकतो ह्याविषयीचा आत्मविश्वास जागवला आहे, ह्याची जाणीव लोकच आम्हाला पदोपदी करून देत आहेत. हे श्रेय निःसंशयपणे लोकांच्या मनातील पाण्याविषयीच्या तळमळीचेच आहे.

लोक अभियानाबद्दल वाचत आहेत, फेसबुक आणि व्हाट्सअप्पवर टाकलेले व्हिडीओ आणि फोटो पाहत आहेत, त्यावर विचार करत आहेत, त्याचबरोबर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने त्यांच्या मनामध्ये काही शंकाही निर्माण होत आहेत, जे अगदी स्वाभाविक आहे. लोकांच्या मनामध्ये उत्पन्न झालेल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न आम्ही इथे केला आहे.

लोकांचे प्रश्न
शंका आणि समाधान
--------------------------

1. खर्च किती येईल -

प्रश्न कितीही गंभीर असला आणि इच्छा कितीही प्रबळ असली तरी साहजिकपणे कुणाच्याही मनामध्ये पहिला प्रश्न उभा राहतो तो खर्चाचा. कमी खर्चिक आणि करायला सोपा असाच पर्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. ह्याचा खर्च सरासरी दोन ते अडीच हजार एव्हढाच येतो. तो प्रत्येकाच्या घराचा आकार, घर आणि खड्डा ह्यामधील अंतर आणि खड्डयाचे बांधकाम ह्या गोष्टींमुळे कमी जास्त होऊ शकतो. एखाद्याच्या घराला अगोदरच पन्हळी लावलेल्या असतील तर त्याचा तो खर्चदेखील कमी होऊ शकेल. कुणाला त्यासाठी एक ते दोन हजार खर्च येईल तर कुणाला चार ते पाच हजार येईल. पण त्यापेक्षा जास्त खर्च येणार नाही ह्याची काळजी घेतली आहे.

2. सुरवात कधी करावी -

पाऊस सुरू झाला आहे आणि आत्ता पावसात सुरवात कशी करायची असा एक संभ्रम काही लोकांच्या मनामध्ये येऊ शकतो. चांगल्या गोष्टीची सुरवात करायला कोणतीही वेळ योग्यच. सुरवातीलाच सर्व काही परिपूर्ण झालं पाहिजे असं काही गरजेचं नाही. तुमच्या घराच्या छपराच्या अर्ध्या भागातील पाणी जरी तुम्ही ह्या वर्षी खड्ड्यामध्ये सोडायला सुरवात केलीत तरी चांगली सुरवात झाली असे म्हणता येईल. कालांतराने त्याला पूर्णत्व येईलच. पावसात काही ठिकाणी एक मीटर खोल खड्डा खणताना पाणी लागू शकते आणि आणखी खोल जाणे कदाचित शक्य होणार नाही. परंतु त्यासाठी थांबायचे काही कारण नाही. खड्डा जेव्हढा खणता येईल तेव्हढा खोल खणावा आणि चाहुबाजूनी वीट बांधकाम करून घ्यावे. पाणी कमी झाल्यानंतर पुढे तो अधिक खोल करता येईल. आत्ता तुम्ही जर काही काम केलंत तर पुढच्या उन्हाळ्यात त्याचे परिणाम तुम्हाला समजून येतील आणि ते पाहून तुमच्यासह इतरांचाही हुरूप वाढण्यास मदत होईल.

3. खड्डा कसा असावा -

अभियानातील खड्डा हा महत्वाचा भाग आहे. त्याच्याविषयीचे विवेचन 'पाण्याची शेती कशी करावी ?' ह्या लेखात विस्तारित स्वरूपात केले आहे, ते पहावे. लेख सर्वांना पाठवला आहे आणि फेसबुकवरदेखील उपलब्ध आहे.

4. खड्डयातील पाण्यामुळे डास होतील का ? -

खड्डयातील पाणी सतत हलत राहिल्याने त्यामध्ये डास होण्याची शक्यता नाही. पावसाळा संपता संपता खड्डयातील पाणी हळूहळू जमिनींमध्ये जिरून खड्डा आपोआप सुकून जाईल.

5. आमच्या विहिरीचे किंवा कुपनलिकेचे पाणी नक्की वाढेल का ? आणि ह्यागोदार असे कुणी केले आहे का ? -

आम्ही जे काही सांगत आहोत त्यामध्ये नवीन असं काहीच नाही. मागील पंधरा वीस वर्षांमध्ये अनेक लोकांनी अशाप्रकारचे उपक्रम आपापल्या घर आणि आवारांमध्ये राबवले आहेत आणि त्याचा त्यांच्या विहिरीचे किंवा कुपनलिकेचे पाणी वाढण्यास निश्चितपणे हातभार लागला आहे. परंतु केवळ 'मी' आणि 'माझे' ह्या संकुचित वृत्तीने ह्या कृतीकडे कोणी पाहू नये असे कळकळीचे आवाहन आम्ही सर्वांना करतो आहोत. वर्तमानातील आपला 'मी' भविष्यातील आपल्याच 'आम्ही' ना (पुढील पिढ्या) जीवघेणा ठरू शकतो. सार्वजनिक हितामध्येच आपले वैयक्तिक हित लपलेले आहे याची जाणीव ठेवावी.

6. पाणथळ जागी हे करून काय फायदा होईल ? -

पाणथळ जागांमध्ये पावसाळ्यात भरपूर पाणी साठलेले दिसते. त्यामुळे लोकांना वाटते की अशा जागी आणखी पाणी जिरवायची गरजच काय ? अशा जागी पूर्वी शेती व्हायची, त्यावेळी ती जमीन नांगरली जायची आणि त्यामुळे त्या जमिनीमध्ये पाणी जिरण्याचा वेग हा तुलनेने जास्त असायचा. शेती बंद झाल्यामुळे अशा पाणथळ जागादेखील पडीक झाल्या. पडीक जमिनी नांगरल्या न गेल्यामुळे हळूहळू कडक होत जातात आणि त्यावर एक प्रकारचा टणक असा थर तयार होतो, जो जमिनींमध्ये पाणी जिरण्यास अटकाव करतो. त्यामूळे पाणी जिरण्याचे प्रमाण आपोआप कमी कमी होत जाते. अशा जमिनींमध्ये पाणी जरी साठलेले दिसत असले तरी नकळतपणे ते वाहत असते, जिरत नसते. त्यामुळे इतर कोरड्या जमिनी आणि अशा पाणथळ जमिनी ह्या दोघींचीही पाणी जिरवण्याची गरज समान असते.
पाणथळ जमिनींमध्ये खड्डा खणणे त्या जागेतील पाणी सुकल्यानंतरच सोयीचे होईल. त्याभोवती करायचं बांधकाम मात्र त्या जमिनीमध्ये पावसाळ्यात साठणाऱ्या पाण्याच्या पातळीच्या किमान एक फूट वरती राहील ह्याची काळजी घेऊन करावे लागेल, आणि यदाकदाचित अतिवृष्टीच्या वेळी बाहेरचे पाणी खड्ड्यामध्ये गेले तरी त्यामध्ये काळजी करण्यासारखे काहीच नाही.

7. समुद्राच्या किनारी असलेल्या गावांमध्ये हे करून काय फायदा ? -

समुद्रालगत वसलेल्या गावांमध्ये कितीही पाणी जरी जिरवले तरी ते लगेचच समुद्राला जाऊन मिळाले तर त्याचा काय फायदा, असा प्रश्न मनात येऊ शकतो. परंतु पाणी एकदा का जमिनीमध्ये जिरले की त्याची दिशा कोणती असेल हे सांगणे कठीण आहे. ते जसे समुद्राच्या दिशेला जाऊ शकते तसेच ते समांतर आणि विरुद्ध दिशेलादेखील जाऊ शकते. आपण अभियानात दाखवलेल्या पद्धतीप्रमाणे नैसर्गिक प्रभावाने जर पाणी जमिनीत जिरवले तर जमिनीखालची पाण्याची पातळी निश्चितपणे वाढेल. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्याबरोबर वाढत जाणारा पाण्याचा मचूळपणा कमी होण्याचा मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो. अशा ठिकाणच्या पाण्यामध्ये असणाऱ्या क्षारांचे प्रमाण मोठया प्रमाणावर कमी होईल आणि आरोग्याच्या दृष्टीने ही जमेची मोठी बाजू ठरू शकेल.

8. आमच्याकडे नळाचे पाणी येते, मग आम्ही हे करावे का किंवा का करावे ? -

एकीकडे आपल्याकडे उपलब्ध असलेले पाण्याचे सर्व नैसर्गिक स्रोत नैसर्गिक बदलांमुळे आणि आपल्या अक्षम्य हेळसांडीमुळे वेगाने आकुंचन पावत असताना आणि दूषित होत असताना पूर्णपणे त्यावरच अवलंबून असणाऱ्या नळपाणी योजना सर्रासपणे राबवाव्यात का हा मोठा गहन प्रश्न आहे. आजच्या घडीलाच स्रोतांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध न झाल्याने किंवा लवकर संपल्याने अनेक नळपाणी योजनांवर वर्षभराच्या मध्येच राम म्हणण्याची पाळी येते ही वस्तुस्थिती आपण अनुभवतोच आहोत. तेव्हा दारात नळ असला तरी घरात हंडे भरून ठेवण्यामागचा दृष्टिकोनच जमीन पुनर्भरणाच्या बाबतीत आपल्याला ठेवावा लागेल. नाहीतर जेव्हा जमिनीच्या वर पाणी उपलब्ध नसेल त्यावेळी जमिनीच्या खालीदेखील आपल्याला ते सापडणार नाही. तेव्हा केवळ वर्तमानातील गरजेचा विचार न करता आपण सर्वांनी अत्यंत गंभीरपणे आणि जबाबदारीने जमीन पुनर्भरणाच्या कामात सहभाग घेतला पाहिजे.

9. आमच्या भागात खूपच कमी पाऊस पडतो, तिथे ह्याचा काय फायदा -

ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या भागातच ह्या अभियानाची सर्वात जास्त गरज आहे. कमी प्रमाणात पडणारा पाऊस जास्तीत जास्त प्रमाणात साठवण्यासाठी ह्या अभियानासारखे दुसरे प्रभावी साधन वर्तमानात उपलब्ध असलेले दिसत नाही. मुळातच कमी प्रमाणात पडणारा पाऊस जर आपण तसाच विखरू दिला तर ते पाणी जमिनीवरून वाहून जाणे, केवळ जमिनीच्या वरवरच्या थरापर्यंतच जिरणे आणि थोड्याच काळात त्याचे बाष्पीभवन होऊन जाणे ह्यातच संपून जाते. पाण्याचा एकही थेंब फुकट न घालवता ते जमिनीत खोलवर जिरवले आणि वाहून जाणे व बाष्पीभवन होणे ह्यापासून वाचवले तर घराच्या छपरावर पडणाऱ्या पावसाच्या शंभर टक्के पाण्याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. मोठ्या प्रमाणात पाणी एकत्र करणे आणि ते जोरकसपणे जमिनीत जिरवणे हे काम अभियानाने सुचवलेल्या मॉडेलपेक्षा प्रभावीपणे करणारे दुसरे कोणतेच साधन सध्याच्या काळात उपलब्ध असलेले दिसत नाही.

10. पन्हाळीला फिल्टर्स लावावेत का ? -

पन्हळीला कसलेही फिल्टर्स लावण्याची आवश्यकता नाही. पन्हळीचे पाणी पाईपद्वारे खड्ड्यात आल्यानंतर ते जमिनीतून फिल्टर होऊनच सगळीकडे पसरणार आहे. आपली जमीन हीच सर्वोत्तम फिल्टर आहे.

11. तुम्ही देत असलेल्या माहितीचा वापर करण्यासाठी काही पैसे द्यावे लागतात का ? -

हे 'पागोळी वाचवा अभियान' आणि त्याअंतर्गत दिली गेलेली सर्व माहिती, व्हिडीओ, फोटो इत्यादी सर्व गोष्टी संपूर्णपणे विनामूल्य आहेत. उलटपक्षी ह्या माहितीचा उपयोग करून जमिनीखालचे संपलेले पाण्याचे साठे पुन्हा पाण्याने समृद्ध करण्याचे सामूहिक उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा हाच ह्या अभियानाचा उद्देश आहे.

12. ही माहिती आम्ही पुढे आणखी काही लोकांना पाठवली तर चालेल का ? -

अभियानांतर्गत दिलेली माहिती ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावी ह्याच उद्देशाने दिली गेली आहे. तेव्हा ती तुम्ही जेव्हढी जास्त प्रसारित कराल तेव्हढे आपल्या सर्वांच्याच फायद्याचे ठरणार आहे.

13. त्याचे काही पेटंट वगैरे तुम्ही घेतले आहे का? -

नाही ! अशाप्रकारचे कसलेही ओझे मनावर न घेता सांगितलेल्या गोष्टी आमलात कशा आणता येतील ह्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.

14. ह्या अभियानाचे मालक कोण आहेत -

हे अभियान आपल्या सर्वांच्या मालकीचे आहे.

16. प्रत्यक्ष अंमलबजावणी न करू शकणाऱ्यांनी अभियानामध्ये कशाप्रकारे सहभागी व्हावे -

अभियानामध्ये सहभागी होण्याची इच्छा निर्माण होणे ही भावनाच अभियानापोटीच्या सदिच्छा व्यक्त करणारी आहे. कोणत्याही कामाला सदिच्छांची आवश्यकता ही असतेच. अशा लोकांनी आपले हे 'पागोळी वाचवा अभियान' जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे ह्यासाठी प्रयत्न करावेत.
-------- --------- ------- ---------
वरील वेगवेगळ्या प्रश्नांव्यतीरिक्त पुढीलप्रमाणे आणखी दोन प्रश्नांची विचारणा आमच्याकडे झाली आहे.
पैकी एक तरुणांच्या काही संघटनांकडून आणि काही महिला बचत गटांकडून "पागोळी वाचवा अभियान" त्यांच्या गावांमध्ये कशा प्रकारे राबवता येईल ह्या संदर्भात विचारला गेला आहे.
आणि दुसरा प्रश्न दोन महाविद्यालयांकडून विचारला गेला आहे. "पागोळी वाचवा अभियान" अंतर्गत पाहिलेला प्रकल्प त्यांना आवडल्यामुळे त्यांच्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने सदरचा प्रकल्प कशा प्रकारे राबवावा जेणेकरून त्यांच्यामध्ये जलसंवर्धनाबद्दलची, जबाबदारी, आपुलकी आणि कृतिशील जागृती निर्माण होईल.
हे दोन्ही प्रश्न संस्था आणि संघटनात्मक पातळीवर विचारलेले असल्याने जागेअभावी इथे त्याचे विवेचन करणे अस्थायी ठरू शकेल. त्या त्या संस्थांना त्यांचे उत्तर वैयक्तिक पातळीवर दिले जाईल. भविष्यात त्याबद्दलची विचारणा वाढली तर सर्वांसाठीच ते आपल्याला खुलेपणाने करता येईल.
--------- -------- --------- ---------
तुमच्याही मनामध्ये काही शंका असतील तर त्या विनासंकोच विचारा. कारण समाधान न झालेल्या मनातील शंका हेच आपल्या निष्क्रियतेच मूळ असतं.

सुनिल प्रसादे.
दापोली.
दि. 30 जुलै, 2019.

अधिक माहिती- https://www.facebook.com/profile.php?id=100001449118448

#RainwaterHarvesting
#PagoliWachawaAbhiyan

Group content visibility: 
Use group defaults

संपूर्ण लेखमालिका आवडली. तुमचे हे अभियान सुद्धा आवडले.

काही शंका आहेत.
१. जमिनीवर पडलेले पाणी वाया जाते हा समज रेन हार्वेस्टिंग च्या निमित्ताने रूजतो आहे, त्यात तथ्य कितपत आहे ? शहरांमधे ही अलिकडे जमिनीचे पुनर्भरण केले जात आहे. पुण्यासारख्या शहरात जमिनीच्या पोटातले पाणी हे ना वापरण्याच्या लायकीचे ना पिण्याच्या राहीले आहे. या पाण्यावर मुंबई-पुण्यासारख्ञा शहरात शेती होत नाही. त्यामुळे शहरांमधून जमिनीचे पुनर्भरण कशासाठी ?

२. मूळचे ओढे, नाले संकुचित होत आहेत. त्यात कचरा, घाण मोठ्या प्रमाणावर आहे. आजूबाजूंच्या सोसायट्यातल्या प्रदूषणामुळे पाण्याचे जनिमीवरचे सर्वच नैसर्गिक स्त्रोत प्रर्दूषित होत आहेत. त्याबाबत जागृतीची आवश्यकता आहे.

३. नदीमधे मैला सोडला जातो. त्यामुळे खालच्या गावांना हे पाणी वापरण्यायोग्य राहत नाही. संपूर्ण भारतभर पाण्याची विल्हेवाट अशाच पद्धतीने लावली जाते. धार्मिक स्थळं असणा=या नद्यांचं विचारूच नका. थेटच सांडपाणी नदीत. निर्माल्य नदीत.

४. कीटकनाशके, रसायने, विविध प्रकारचे वंगण-तेल आणि सेप्टीक टँक यामुळे जमिनीखालील पाण्याचे स्त्रोत दूषित होत आहेत. नाल्यांमधेही रस्याने सोडून दिलेली आढळतात. त्यामुळे जमिनीखाली जे ओहोळ वाहतात त्यात रासायनिक प्रदूषणही आहे.

जे आहे त्या पाण्याचे व्यवस्थापन शिकवणारे अभियान देखील या सोबत गरजेचे आहे. परदेशात पाण्याची निगा राखली जाते. आपल्याकडे अतिशय बेफिकीरी आहे.

जमिनीवर पडलेले पाणी हे शेवटी नैसर्गिक स्त्रोत्रांद्वारे मोठ्या प्रवाहाला मिळते. ते वाया कधीही जात नाही. पण हे प्रवाह अडवले जात आहेत. पाण्याच्या प्रवाहांचा नकाशा तयार होत नाही. आता खरे म्हणजे उपग्रहांच्या मदतीने हे समजशक्य आहे. बांधकामांना परवानगी देताना जमिनीखालील आणि जमिनीवरील प्रवाहांना अडथळा होणार नाही हे पाहणे गरजेचे आहे.

या अडथळ्यांमुळे काही ठिकाणी पाणी तुंबणे व पूर येणे असे जे प्रकार होतात त्याला आळा बसेल. प्रवाह बाधीत झाल्याने खाली पाणी वाहत नाही. ते साचत राहते. मोठ्या इमारतींचे पार्किंग अलिकडे जमिनीखाली असते. त्यासाठी खूप खोल खड्डे घेतले जातात. चार पाच ईमारती सलग बांधून जागा मोकळी ठेवण्याची पद्धत आता रूजत चालली आहे. पण या मोठ्या खोल खड्ड्यांमुळे अनेक प्रवाह खंडीत होतात. पावसाळ्यात पार्किंग मधे पाणी साठलेले दिसून येते.

जर पुढे ठिकठिकाणी प्रवाह खंडीत झाले असतील तर पाण्याचे पुनर्भरण केले पाहीजे का ?